सुदैवाने किंवा कर्तृत्वाने हुकमी एक्का नेहमी हातात असण्याची सवय असलेल्या अमेरिकन माणसाला हा अनुभव भलताच धक्कादायक आणि भयावह आहे.
पडघम - विदेशनामा
मिलिंद जोशी, साऊथ ब्रान्सविक, न्यू जर्सी, अमेरिका
  • न्यू जर्सी, अमेरिका येथील लॉकडाउन
  • Sat , 23 May 2020
  • पडघम विदेशनामा करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

करोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाउन आहे. वेगवेगळ्या देशातल्या लॉकडाउनविषयीच्या दहा प्रातिनिधिक लेखांचा ‘देशोदेशीचे लॉकडाउन’ हा विशेषांक आज प्रकाशित करत आहोत. ही संपूर्ण कल्पना पत्रकार, ब्लॉगलेखिका सायली राजाध्यक्ष यांची. त्यांनी त्यांच्या ‘साडी आणि बरंच काही. Sarees and Other Stories’ या लोकप्रिय फेसबुक पेजवर गेले काही दिवस सातत्याने वेगवेगळ्या देशांतल्या मराठी भाषिकांशी संपर्क साधून त्यांना त्यांचे अनुभव लिहायला सांगितले. १० मे पासून त्यांनी त्यांच्या पेजवर ते अनुभव प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. त्यातील काही निवडक लेख त्यांच्या पूर्वपरवानगीने येथे प्रकाशित करत आहोत. या विशेषांकातून वेगवेगळ्या देशांतल्या लॉकडाउनचे स्वरूप, प्रकार यांची तोंडओळख व्हावी ही अपेक्षा आहे.

..................................................................................................................................................................

या वर्षाच्या सुरुवातीपासूनच वाढत्या झपाट्याने, विशेषतः गेल्या दोन-तीन महिन्यात करोना व्हायरसच्या बातम्यांनी आसमंत एवढा भरून आणि भारून गेला आहे की, इंटरनेट, टीव्ही किंवा कुठल्याही सोशल मीडियाशी संपर्क असलेल्या कोणालाही जगभर थैमान घालत असलेल्या या विषाणूबद्दल काहीही सांगण्याची गरज नाही असं वाटतं. सगळीकडे त्याच चर्चा, त्याचा उगम, त्याच्या प्रसाराचे मार्ग, त्यापासून बचाव करण्याचे उपाय, त्याची लक्षणं, रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्या… – सगळं अगदी तेच तेच!

आणि तरीही, कुठल्याही प्रचंड वावटळीमधल्या प्रत्येक पानापानाचं वेगळं अस्तित्व असतंच; त्याच्या नजरेमधून पाहिलेली वावटळ वेगळीच असते. तशी ही माझ्या अनुभवाची, माझ्या इम्प्रेशन्सची गोष्ट.

२०२० हे वर्ष भावी इतिहासात एक वैशिष्ट्यपूर्ण वर्ष म्हणून नोंदवलं जाईल याची खात्री वाटते. या पूर्वीच्या सगळ्या रोगांप्रमाणेच आपण याही रोगावर यशस्वी मात करू याबद्दल माझ्या मनात काडीचीही शंका नाही, कधीच नव्हती. एकदा ही साथ ओसरली की, मागे पाहताना, शंभरेक वर्षांनंतर आलेल्या या एवढ्या मोठ्या विश्वव्यापी साथीने केवढ्या जबरदस्त भीतीचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण केले होते आहे याचा आपल्याला सहज विसर पडेल. त्या वेळच्या लोकांच्या ‘वेडपटपणा’चे हसू येईल. तेव्हा का, आत्ताही, ज्या ठिकाणी या रोगाचा प्रसार फार नाही तेथील कित्येकांना या रोगावरच्या सामाजिक आणि मानसिक प्रतिक्रिया अतिरेकी वाटताहेत. म्हणून या व्हायरसच्या विशिष्ट दहशतीमुळे, त्याच्या परिणामांमुळे या अनुभवांमधून गेलेल्या सगळ्यांच्याच आठवणी आणि अनुभव महत्त्वाचे असतील.

मी गेली ३८ वर्षे अमेरिकेत राहतो आहे. इथल्या हवेला, लोकांना, राहणीला आणि विचारसरणीला पार रुळलो आहे; पण अजूनही मी सभोवताली एका परक्याच्या नाही, पण कुतुहलाच्या चष्म्यातूनच बघत असतो. मी आतापर्यंत अमेरिकन समाजमानसाचा आनंदी, उत्साही, दुर्दम्य आणि दिलदार चेहराच जास्त करून पाहिला आहे. गेले काही महिने चिंतीत असलेले, घाबरलेले आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गोंधळलेले, आत्मविश्वास गमावल्यासारखे दिसणारे अमेरिकन रूप मला नवीन आहे. अगदी ९/११च्या अनपेक्षित भयानक विध्वंसानंतर किंवा २००८च्या अर्थव्यवस्थेच्या कडेलोटानंतरही असा हरवलेला भाव मला जाणवला नव्हता.

करोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलंच आहे; पण त्यातही अमेरिकेतली रुग्णसंख्या आणि प्राणहानी इतर देशांच्या कित्येक पटींनी जास्त आहे. जागतिक संकटांमध्ये इतरांना मदतीचा हात देण्यात अमेरिका सहसा अग्रेसर असते, पण यावेळी प्रथमच हा देश स्वतः आजारी पडलेला मी पाहतो आहे. आणि हे सगळे घडले अवघ्या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये

अजूनही सभोवताल ज्याला ‘युद्धाचे धुके’ म्हणतात ते पसरलेले असल्यामुळे, या परिस्थितीची, इथे कसे येऊन पोचलो याची कारणे निश्चितपणे ठरवता येणार नाहीत. पण काही गोष्टी नक्की – त्यामध्ये चीनने त्यांच्याकडील सुरुवातीच्या प्रसाराबद्दल राखलेली अक्षम्य गुप्तता, युरोप-अमेरिकेमध्ये या विशिष्ट व्हायरसच्या संसर्गाच्या ताकदीची, प्रसाराच्या सामर्थ्याची वेळीच ओळख न पटणे म्हणा, धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे म्हणा किंवा वेळीच प्रतिबंधक उपाययोजना न करणे म्हणा ही महत्त्वाची कारणे मानावी लागतील.

अमेरिकेपुरते बोलायचे झाल्यास सुमारे दोन महिने सोशल डिस्टन्सिंगबद्दल देशव्यापी नियम करण्यामध्ये झालेली अक्षम्य दिरंगाई आणि रोगाचे निदान करण्यासाठी चाचण्या तयार करण्यामध्ये आणि त्या बाबतीत WHO देत असलेली मदत नाकारण्यामध्ये झालेल्या अनाकलनीय चुका, दीर्घकाळ रोगाच्या प्रसाराची विश्वसनीय आकडेवारी उपलब्ध नसणे या गोष्टी प्राणघातकरीत्या महत्त्वाच्या ठरल्या.

माझ्या वैयक्तिक दैनंदिन आयुष्यात सुदैवाने काहीच महत्त्वाचे बदल घडले नाहीत. माझ्या कंपनीने मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच घरून काम करण्याची ‘विनंती’ केली होती. आठवड्याभरातच या विनंतीचे सक्तीमध्ये रूपांतर झाले. आयटी क्षेत्रामध्ये घरून काम करणे यात काहीच नवीन नाही. गेली कित्येक वर्षं ते वाढत्या प्रमाणात चालूच होते. आता दिवसाचे ९० मैल ड्रायव्हिंग नसल्यामुळे, लीज केलेल्या गाडीवर ठरलेल्या मुदतीत ठरलेले मैल कसे वापरले जाणार ही एक क्षुल्लक चिंता आहे. त्या कंपनीशी बोलून त्यांची मनधरणी केली पाहिजे.

घरात लहान मुले नसल्यामुळे, त्यांची, त्यांच्या शाळेची किंवा शिक्षणाची जबाबदारी सांभाळून ऑफिसचे काम करा किंवा कोणा वृद्ध नातेवाईकांची काळजी घ्या वगैरे चिंताही सुदैवाने नाहीत. ग्रोसरी आणि इतर जीवनावश्यक गोष्टींची दुकाने ही सर्व काळ उघडी होती आणि आहेत. सुरुवातीला लॉकडाऊन होणार हे कळल्याक्षणी दुकानांवर धाड पडली. दूध, ब्रेड, पाणी या नेहमीच फटकन गायब होणाऱ्या गोष्टी. त्यात यावेळी हँड सॅनिटायझर आणि मास्कची भर पडली. पण त्याबरोबर टॉयलेट टिश्यूसुद्धा दुकानांमधून अदृश्य होत होते. लोक याचा एवढ्या प्रमाणात साठा करत होते, की कोविड-१९ च्या लक्षणांमध्ये डायरिया हे सर्वांत महत्त्वाचे लक्षण आहे की, काय अशी शंका यावी!

पुढे काय होईल या अनिश्चिततेने लोकांच्या भांबावलेल्या आणि अतार्किक विक्षिप्त प्रतिक्रियेचे हे एक उदाहरण म्हणता येईल. पण लवकरच ही परिस्थिती सुधारली. बहुतेक दुकानांच्या दाराशीच हँड सॅनिटायझर असतात, शॉपिंग कार्ट्स वारंवार डिसइन्फेक्टन्टने स्वच्छ पुसल्या जातात, जवळजवळ सगळेच लोक मास्क आणि ग्लोव्हज घालून असतात आणि सहा फुटांचे अंतर पाळले जाते. आपले आपण कार्ड वापरून पैसे द्यायचे असल्यामुळे कर्मचाऱ्यांशीही संबंध येत नाही.

इंडियन ग्रोसरीची दुकाने काही आठवडे बंद होती; पण तेथील डाळ, तांदूळ, पीठे आणि भाजण्या हे पदार्थ टिकाऊ असल्यामुळे त्यांची एरवीही बेगमी केलेली असते. अमेरिका फार मोठ्या प्रमाणात मांसाहारी देश असल्यामुळे, येथे चिकन, बीफ आणि पोर्कची अनेक अवाढव्य मीट पॅकिंग प्लॅन्ट्स (कत्तलखाने) आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये अशा काही प्लॅन्ट्समध्ये दाटीवाटीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये करोनाचा प्रसार आढळून आल्यामुळे ती प्लॅंट्स तातडीने बंद करावी लागली. यामुळे आता ग्रeोसरी स्टोअरमध्ये बीफ आणि पोर्कसारख्या पदार्थांची कमतरता भासेल, प्रत्येकी ठराविकच जिनसा घेता येतील अशा प्रकारचे निर्बंध येण्याची शक्यता आहे.

सध्या तरी लोकांपासून दूर राहणे हा एकच जालीम आणि विश्वसनीय उपाय या रोगाच्या प्रतिबंधासाठी माहिती असल्यामुळे आम्ही घरातच बहुतांश वेळ घालवतो. मित्र-मैत्रिणींशी स्काईप किंवा झूमवर व्हर्च्युअली बोलतो. घरासमोरील शाळेच्या विस्तीर्ण आवारात किंवा शेजारच्या वसाहतींमध्ये चालायला जाणे हा मोकळ्या हवेतला एकमेव विरंगुळा! शाळा सध्या डिजिटल असल्यामुळे ती इमारत गेले दोन महिने बंदच आहे. ती आता नवीन शालेय वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू होईल तेव्हाच उघडेल अशी आशा आहे.

पण सगळ्यांनाच घरून काम करणे शक्य नसते. दुकानदार, कारखान्यातले कामगार, हॉटेल, रेस्टॉरंटमधले, सिनेमा किंवा ब्रॉडवे थिएटरमधले, टॅक्सी, उबर किंवा ट्रक ड्रायव्हर अशा असंख्य कामगारांची उपजीविका त्यांच्या प्रत्यक्ष कामावर जाण्यावर अवलंबून असते. सोशल डिस्टन्सिंगच्या या जमान्यात विमानकंपन्या, हॉटेल्स, क्रूझ हे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. या सगळ्यामधून निर्माण झालेल्या बेकारीमुळे आणि त्याहून महत्त्वाचे हे सगळे कसे आणि कधी संपणार याबाबतच्या अनिश्चिततेमुळे सगळीकडे भीतीचे आणि घायकुतीचे वातावरण आहे.

घरात बसून राहण्याचा सगळ्यांनाच, विशेषतः आता थंडी ओसरायला लागल्यावर अतिशय कंटाळा आलेला आहे. सगळे जण काम करायला आणि चाकोरीतले आयुष्य पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे जगायला अधीर झाले आहेत. अमेरिकेतसुद्धा ज्या राज्यांमध्ये या साथीची फार झळ लागली नव्हती, तेथील लोकांनी राज्य सरकारच्या स्थानिक बंधनांविरुद्ध निदर्शने आणि मोर्चे सुरू केले आहेत. गरिबांना मोफत जेवण देण्यासाठी येणाऱ्या फूड ट्रॅक्सच्या रांगेत काल-परवापर्यंत मध्यमवर्गीय म्हटले जाणारे कित्येक लोक दिसत आहेत. त्यांच्यामध्येही राजकारणी आपली निवडणुकीची पोळी भाजून घ्यायला अधीर आहेत.

या हातावर पोट असलेल्या लोकांविषयी कितीही सहानुभूती असली, तरी या नाण्याला दुसरी बाजू आहे. न्यू यॉर्क आणि न्यू जर्सीसारख्या या साथीच्या वणव्यात होरपळून निघालेल्या जनतेला त्याची जाणीव आहे. काही आठवड्यापूर्वीच नुसत्या या राज्यांमध्ये जेव्हा दिवसाला ८०० आणि ९०० लोक आजाराला बळी पडत होते, तेव्हा त्या प्रेतांचे अंत्यविधी सोडा, त्यांना ठेवण्यासाठी हॉस्पिटलच्या मॉर्ग्स अपुऱ्या पडल्यामुळे रस्त्यावर वातानुकूलित केलेले ट्रक्स आणण्यापर्यंत वेळ आली होती. हॉस्पिटलमध्ये कोणालाही भेटण्याची परवानगी नसल्यामुळे बहुतेक रुग्णांना सर्वांत दुःखद प्रकारचे, एकाकी मरण पत्करावे लागत होते. डॉक्टर्स आणि नर्सेस दिवसाला चौदा ते सोळा तास तुटपुंज्या साधनांनिशी या रुग्णांच्या डोळ्यातल्या भीतीचा सामना करत होते, त्यांना वाचवायची पराकाष्ठा करत होते आणि वेळप्रसंगी परक्यांच्या जगण्या-मरण्याचा निर्णय स्वतः घेत होते.

ही परिस्थिती मोठ्या काटेकोर स्थानबद्धतेनंतर आता कोठे आटोक्यात येते आहे, ही वस्तुस्थिती विसरणे कठीण आहे.

या रोगासंबंधीच्या बातम्या अजूनही परस्परविरोधी आणि गोंधळून टाकणाऱ्याच आहेत. एकीकडे, वेगवेगळ्या पद्धतीच्या चाचण्या पुढे येत आहेत, त्या जास्त जास्त वेगाने आणि अचूकपणे रोगाचे निदान करू शकत आहेत. रेमडेसीव्हरसारखे नवीन औषध रोगाशी मुकाबला करून त्याची तीव्रता, आजाराची मुदत कमी करण्यात यशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे. या अनुकूल बातम्यांच्याच जोडीला कोविड-१९ हा आजार एखाद्याला पुन्हा पुन्हा होऊ शकेल का, याबद्दल खात्रीलायक माहिती नाही. हा आजार हवेतून पसरण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, काहीजणांना आजाराची काही लक्षणे दिसत नसतानाही त्यांच्या चाचणीमध्ये या आजाराच्या प्रतिकारक पेशी (अँटीबॉडीज) सापडल्या आहेत.

सेंटर्स फॉर डिझीज कंट्रोल (CDC) च्या मते, वर्षाअखेर शिशिर ऋतूमध्ये कोविड-१९ चीच एक नवीन जात पुन्हा पसरायला लागण्याची दाट शक्यता आहे. या सर्व बातम्या भयकारी आहेत. प्रत्यक्षात गेल्या आठवड्यापासून बऱ्याच राज्यांमध्ये हिंडण्या-फिरण्याचे, दुकाने उघडण्याचे नियम बरेच शिथिल केले जात आहेत. पुढच्या चार-सहा आठवड्यांमध्ये त्याचे परिणाम दिसू लागतील. कदाचित उन्हाळा सुरू होता होता या साथीचा प्रसार मंदावू शकेल; कदाचित नियम शिथिल करूनही साथीची मोठी लाट उसळणार नाही. मधल्या काळात रोगाचे निदान आणि त्यावर काही नियंत्रण औषधांद्वारे शक्य होईल. येते काही आठवडे आणि महिने तो निर्णय देतील.

या सर्व अनिश्चित वातावरणामध्ये सामान्य अमेरिकन माणूस, ज्याला आजच्या कठीण परिस्थितीतसुद्धा उद्याचे भवितव्य चांगलेच आहे, परिस्थिती आपल्या काबूत आहे हा दिलासा हवा असतो आणि विश्वास असतो, तो गोंधळून गेल्याचे नवल वाटायला नको. सध्या तरी रोगाचे वेळीच निदान करण्यासाठी चाचण्या उपलब्ध करणे, हळूहळू सावधानतेने अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करणे, साथीची पुन्हा एखादी मोठी लाट येऊ शकेल यासाठी हॉस्पिटल्सची तयारी ठेवणे या प्रकारच्या सावध योजनाच फक्त आखलेल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचीही, ज्यामुळे या रोगाचा प्रसार वेळीच ओळखून योग्य त्या व्यक्तींना धोक्याची सूचना देता येईल, कल्पना विचारात आहे. परंतु त्यामध्ये अमेरिकेतील व्यक्तिस्वातंत्र्याचे महात्म्य, खाजगी जीवनावर सरकारने अतिक्रमण करण्याची भीती हेही मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. व्हायरसवरील प्रतिबंधक लशीसाठी आणि उपचारक औषधांसाठी संशोधन चालूच आहे; पण ते सर्रास उपलब्ध व्हायला किमान काही महिने लागतील.

शेवटी, अमेरिकेचे प्रमुख इम्युनॉलॉजिस्ट डॉक्टर फाऊची म्हणाले त्याप्रमाणे, ‘आत्तातरी सगळी पाने व्हायरसच्या हातात आहेत; तो स्वतः त्याचे वेळापत्रक आणि पुढील दिशा ठरवतो आहे’. आणि सुदैवाने किंवा कर्तृत्वाने हुकमी एक्का नेहमी हातात असण्याची सवय असलेल्या अमेरिकन माणसाला हा अनुभव भलताच धक्कादायक आणि भयावह आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......