करोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाउन आहे. वेगवेगळ्या देशातल्या लॉकडाउनविषयीच्या दहा प्रातिनिधिक लेखांचा ‘देशोदेशीचे लॉकडाउन’ हा विशेषांक आज प्रकाशित करत आहोत. ही संपूर्ण कल्पना पत्रकार, ब्लॉगलेखिका सायली राजाध्यक्ष यांची. त्यांनी त्यांच्या ‘साडी आणि बरंच काही. Sarees and Other Stories’ या लोकप्रिय फेसबुक पेजवर गेले काही दिवस सातत्याने वेगवेगळ्या देशांतल्या मराठी भाषिकांशी संपर्क साधून त्यांना त्यांचे अनुभव लिहायला सांगितले. १० मे पासून त्यांनी त्यांच्या पेजवर ते अनुभव प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. त्यातील काही निवडक लेख त्यांच्या पूर्वपरवानगीने येथे प्रकाशित करत आहोत. या विशेषांकातून वेगवेगळ्या देशांतल्या लॉकडाउनचे स्वरूप, प्रकार यांची तोंडओळख व्हावी ही अपेक्षा आहे.
..................................................................................................................................................................
या देशात आल्यापासून मला प्रकर्षाने जाणवले होते की, इथल्या लोकांच्यात एक सर्वसामान्य समज आहे की, मोठ्या दुर्घटना आपल्यापासून लांब दुसऱ्या देशात घडत असतात. इथे येणारी संकटे ज्यात मनुष्यहानी होते, ती म्हणजे फार फार तर कधी कुठे अपघात झाला, अचानकच टोर्नेडो आले किंवा एखाद्या माथेफिरूने गोळ्या घातल्या तर लोक मृत्युमुखी पडतात. जगात इतरत्र भूकंप, सुनामी, पूर आला, असे काही मोठे घडले की त्याची बातमी इथे होते. त्याबद्दल लोक नुसते बोलतातच असे नाही तर भरभरून जमेल ती मदतही करतात. आधी कुतूहल वाटले की, असा कसा हा दृढ विश्वास आहे! मग लक्षात आले की, हा समज अगदीच निराधार आहे असेही नाही. कारण हलगर्जीपणामुळे होणाऱ्या मोठ्या दुर्घटना टळाव्यात म्हणून मूलभूत खबरदारी सगळीकडे घेतली जात असल्याने लोकांच्यात हा विश्वास निर्माण झाला आहे.
मात्र ९/११च्या घटनेने अमेरिकेतल्या लोकांच्या या विश्वासाला धक्का बसला आणि रोजच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टींवर त्याचा परिणाम झाला. अर्थव्यवस्था काही महिन्यांसाठी कोसळली. तर विमानप्रवास, सुरक्षा तपासणी असे काही कायमस्वरूपी बदल झाले. हे सगळे बदल प्रत्यक्ष डोळ्याला दिसणारे. पण अप्रत्यक्ष झालेला सगळ्यात मोठा बदल म्हणजे लोकांचा तो निरागस विश्वास काहीसा हरवला. कुठेही खुट्ट वाजले की बॉम्ब आहे आणि कुणीही दाढीवाला विमानात दिसला की तो आता आपले अपहरण करणार आहे या भीतीने लोक ग्रस्त झाले. आपल्याकडेही असे होऊ शकते याची धास्ती बरेच दिवस जनमानसात दिसून येत होती.
काळ सगळ्याचे औषध असतो, या नियमाने आत्ता कुठे अमेरिकन जनता परत एकदा भयमुक्त आयुष्य जगू लागलेली असतानाच...
सामाजिक, राजकीय, आर्थिक, तंत्रज्ञान, आणि वैयक्तिक जीवनशैली अशा प्रत्येक मितीला धक्का बसेल अशा करोना विषाणूच्या संसर्गाच्या संकटाने जगाला वेढले आणि सगळीच समीकरणे बदलून गेली. सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊन हे कधीच सहजी प्रचलित नसलेले दोन शब्द प्रत्येकाच्या ओठांवर खेळू लागले आहेत. प्रत्येक देशात याची विविध रूपात अंमलबजावणी झाली. काही देशातून पोलिसांच्या जबरदस्तीने, काही ठिकाणी इमर्जन्सी पुकारून, तर काही ठिकाणी लोकांच्या व्यवहारज्ञानावर विश्वास ठेवून. मात्र सारे जग दाराआड घरात कोंडले गेले. ज्या भागात संसर्ग जास्त तिथले बरेचसे व्यवहार ठप्प झाले. भल्याभल्या प्रगत देशातली आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली. नेत्यांचे नेतृत्व पणाला लागले. आर्थिक परिस्थिती धोक्यात आली आणि हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होण्याची वेळ आलीय.
सगळ्यात मोठा परिणाम झाला तो माणसाच्या दैनंदिनीवर. घरातच बसायचे हे बऱ्याच लोकांच्या पथ्यात न पडणारे. सगळे कायम हाताशी उपलब्ध असण्याची सवय असलेल्या अमेरिकेसारख्या देशात गोष्टी मिळत असूनही जाता येत नाही अशी कुचंबणा कधी होईल हे कुणालाच वाटले नव्हते. अचानकपणे येऊन ठेपलेल्या संकटाने सगळ्यांनाच नामोहरम केले.
मी ज्या ठिकाणी राहते तिथे अधिकृत लॉकडाऊन नसल्याने रेस्टॉरंटस /मूव्ही थिएटर्स/मॉल्स खेरीज सर्व सुरू आहे. मात्र सर्व दुकानांतून आवश्यक ती काळजी घेत आहेत. सॅनिटायझर्सने स्वच्छ करून दिलेल्या कार्ट्स घेऊन एकावेळी अगदी कमी लोकांनाच आत सोडत आहेत. आमचे सुदैव असे की, वस्तूंची टंचाई अशी कधीच नाही भासली. सर्व दुकाने सामानाने भरलेली असल्याने आपल्याला काही मिळणार नाही अशी धास्तीही वाटत नाही. आमच्या राज्यात जास्त संसर्ग नसल्याने तसे फारसे भीतीचे वातावरण नाही. तरीही आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत. गरज असेल तरच बाहेर जाणे, म्हणजे फक्त भाजीपाला आणण्यासाठी. तोही तीन आठवड्यातून एकदाच. जे आठवेल ते लगेच लिस्टमध्ये घालत जायचे म्हणजे काही विसरायला नको.
आमच्या आजूबाजूच्या काही छोट्या रेस्टॉरंट्सला मदत म्हणून आम्ही तिथून टेक आउटही केले. आणि ते सर्व अगदी सुरक्षितपणे केल्यामुळे कधीच धास्ती वाटली नाही. आपण थोडीतरी मदत करत आहोत त्यांचा धंदा चालू ठेवण्यासाठी हे समाधान. बाकी बाहेर जाण्याची वेळ येत नाही.
माझे आणि अमितचे काम ऑनलाईन १०० टक्के सुरू आहे. त्यामुळे कामाची सुट्टी आणि आता काय करू हाही प्रश्न नाही. माझ्या मुलीचे कॉलेजही पूर्ण ऑनलाइन सुरू आहे. त्यामुळे आम्ही तिघे तीन खोल्यात दारे बंद करून फोनवर असतो. घरात विविध प्रकारचे संभाषण एकाच वेळी सुरू असते. कानात वायरलेस इअरफोन्स असल्याने कोण कधी फोनवर आहे ते सांगता येत नाही. त्यामुळे एकमेकांना हाक मारणे, जोरात शिंकणे, ढेकर देणे हे सर्व आमच्या घरात सध्या मना आहे.
माझी मुलगी हे सर्व सुरू होण्याआधीच स्प्रिंग ब्रेकवर आली आणि त्यानंतर जाऊच शकली नाही. आता तिचे कॉलेज संपणार आणि होस्टेलवरची खोली रिकामी करावी लागणार यासाठी तिच्या कॉलेजने केलेली व्यवस्था अतिशय वाखाणण्यासारखी आहे. कॉलेजने एका कंपनीला पॅकिंगचे काम दिले आहे. त्यांनी माझ्या मुलीला व्हिडिओ कॉल केला. तिचे सामान तिच्यादेखत पॅक केले. आणि ते स्टोरेजमध्ये नेले. आता ती परत कधी केव्हा जाईल त्यावेळी ते सामान तिला तिच्या रूमवर आणून दिले जाईल. हे सर्व विनाशुल्क केले जात आहे. आणि त्यांचे किती कौतुक करू असे मला झाले.
माझा सकाळचा चालण्याचा व्यायाम थांबवण्याचीही गरज मला भासली नाही, कारण तसे एरवीही कुणी जास्त रस्त्यावर नसतेच. मात्र आता मी मास्क घेऊन जाते. कुणी दुसरे चालताना दिसलेच तर मग मास्क लावते. इथले बहुतांश लोक जे बाहेर आहेत ते मास्क - ग्लोव्हज अशी सर्व खबरदारी घेऊनच व्यवहार करत आहेत. आमची मेल रोज येते आहे. ट्रॅश गोळा करणारे आठवड्यातून त्यांच्या दिवशी येतच आहेत. एक दिवस सकाळी गार्बेज ट्रक आल्यावर मी आवर्जून बाहेर गेले आणि याही परिस्थितीत काम करत आहे म्हणून त्या ड्राइव्हरचे आभार मानले. त्याने हे माझे कामच आहे असे म्हणत कचऱ्याचा डबा त्याच्या गाडीत रिकामा केला.
आमचे मित्रमैत्रिणींचे भेटणे, सर्व सांस्कृतिक कार्यक्रम हे मात्र थांबले आहे. अमेरिकेत शनिवार-रविवारी एकमेकांना भेटणे, जेवायला बोलावणे आणि गप्पागोष्टी करणे हा प्रत्येक भारतीयाचा अगदी आवडीचा उद्योग. आता आम्ही ग्रुप फेसटाईमवर सर्वांनी एकत्र येणे, रेसिपीज शेअर करणे, वाढदिवस साजरे करणे हे सुरू केले आहे.
सर्व चित्र बदलले आहे हे नक्कीच.
लोकांचे समाजातले वागणे-जगणे मूलभूतपणे बदलून गेले आहे. कुणाशी संपर्कात आल्याने, हस्तांदोलन केल्यानेच नाही तर कुणाच्या सान्निध्यात असताना नुसता जवळून श्वास घेतल्यानेही परस्परांचे आयुष्य धोक्यात येऊ शकते या कल्पनेने लोकांचे सामाजिक जगणे यापुढे काळवंडून जाणार आहे. हे वाटण्याची तीव्रता हळूहळू कमी होईलही. लोक या विषाणूबरोबर जगायला शिकतील मात्र ही भीती जे कुणी या अनुभवातून गेले आहेत त्यांच्या मनात कायमची घर करून राहील. भेटल्यावर होणारा आनंद एका घट्ट मिठीने जितका प्रभावीपणे व्यक्त केला जात असे, तसे परत कधी सुरू होईल? पूर्वी ‘अरे हे प्रत्यक्ष भेटीतच बोलू, फोनवर नको’ याची जागा आता ‘भेटायलाच हवे आहे का, की हे सगळे फोनवरच करूया?’ याने घेतली जाणार आहे. विकसित तंत्रज्ञानामुळे हे सर्व करणे शक्य असल्यानेही लोकांची अनुपस्थिती फारशी मनावर घेतली जाणार नाही.
जशी आपल्याकडे संकटे येणार नाहीत असा काहीसा भ्रम इथे होता, तसाच काहीसा भ्रम किंवा उदासीनता गेल्या काही वर्षांत राजकारण आणि शिक्षणातही दिसू लागली होती. सगळीकडे एक प्रकारची ढील आल्यासारखे झाले होते. देशात असलेली समृद्धी, शांतता यानं एकप्रकारची आत्मसंतुष्टता आली होती. सगळे व्यवहार नीट सुरू असल्याने हे असेच चालणार काहीही केले तरी असे वाटू लागले होते. हे असे चालण्यासाठी किती तज्ज्ञ लोकांनी कष्ट घेतलेत आणि शिक्षण किती महत्त्वाचे आहे, याचा विसर पडू लागला होता.
याचे अगदी टोकाचे उदाहरण म्हणजे रिअॅलिटी टीव्ही मालिका बनवणाऱ्या आणि देश कसा चालवावा याचे कणभरही ज्ञान नसणाऱ्याला अमेरिकेने देशाच्या मानाच्या आणि जबाबदारीच्या खुर्चीवर बसवले. कदाचित असा विचार करूनही की, देश नीट चाललाच आहे तर बघू ही गंमत करून! काय फरक पडतोय? मात्र कोविड-१९ च्या या संकटाने सगळ्यांना काहीसे भानावर आणले आहे. प्रत्येक विषयातल्या तज्ज्ञांना किती महत्त्व असते आणि पात्रता असणाऱ्यांनीच देश चालवावा लागतो आणि देशाला खंबीर नेत्याची गरज असते, याचे भान अमेरिकन जनमानसाला आले आहे. सध्याच्या प्रशासनाच्या प्रचंड अपयशामुळे अमेरिकेचे राजकारण त्यातला पोरकटपणा जाऊन परत एकदा जशी गरज आहे तसे गंभीर बनेल.
तंत्रज्ञान, विज्ञान, आणि आरोग्यसेवा या तीन शाखांना या संकटाने प्रखर प्रकाशझोतात आणले आहे. या दशकात तंत्रज्ञानाने चांगलीच प्रगती केली असल्याने जग तसे अगोदरच एकमेकांशी जोडले गेले होते. तरीही प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम त्याला मर्यादा घालत होते. शिवाय इंटरनेटवरचे व्यवहार जरी प्रचलित होऊ लागले होते तरी अजूनही काही गोष्टींसाठी लोक प्रत्यक्ष व्यवहाराला प्राध्यान्य देत. ऑनलाईन व्यवहारातला तो मोठा अडथळा या करोनाच्या काळात दूर झाला आहे. जरी सगळंच आभासी जगात करू शकत नसलो तरी जे शक्य होतं तेही काही कंपन्या स्वार्थासाठी आणि जुन्या नोकरशाही पद्धतींमुळे टाळत असत. मात्र बरेच व्यवहार ऑनलाईन करणे भाग पडल्याने काही गोष्टी उघडकीस येऊ लागल्या आहेत.
विविध कलाकार आणि विद्वान लोकांनी या लॉकडाऊनच्या काळात डिजिटल मीडियाचा विधायकपणे उपयोग केला. त्यामुळे फोन/टॅब्लेट्स आणि त्याबद्दल असलेले बरेच गैरसमज आणि त्याचा होणार गैरवापर दूर होऊ लागलेला आहे. बेफिकिरीने स्क्रीनवर वेळ घालण्याऐवजी त्यावर बऱ्याच उपयुक्त गोष्टी उपलब्ध झाल्याने लोक त्याकडे आदराने बघू लागलेत.
ऑनलाईन शिक्षण काही मर्यादेपर्यंत शक्य आहे हेही लक्षात आले आहे. टाय-कोट घालून तासभर ये-जा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा घरूनही तितक्याच प्रभावीपणे काम करता येते, हे लक्षात आणून दिले गेले आहे.
तंत्रज्ञानाने शक्य असल्याने टेलिमेडिसिनचेही सूतोवाच जगभरात झाले आहे. ढीगभर मिटिंग्ज, क्लासेस, प्रत्यक्ष भेट, डॉक्टर अपॉइंटमेंट, वेटिंग रूममधला वेळ हे सगळे टाळून फक्त ई-मेल किंवा एका व्हिडिओ कॉलने ते काम होऊ शकते हे समजले आहे आणि आता ते तसे होऊही लागेल. ही बाहेर आलेली जिनी आता परत बाटलीत भरता येणार नाही. या जिनीचा वापर विधायक आणि प्रभावीपणे कसा करता येईल हे शिकावे लागणार आहे. विज्ञानाचे महत्त्व परत एकदा अधोरेखित झाले आहे. गेल्या काही काळात पुराणमतवाद्यांनी विज्ञानाला कमी लेखून लोकांचे लक्ष विचलित करायचा प्रयत्न केला होता. मात्र विज्ञान हे सत्याचा वाहक असल्याचे करोना विषाणूच्या संसर्गाने लोकांना पटवून दिले आहे.
संसर्गाच्या विविध टप्प्यातून जात असताना आता हेही लक्षात आले आहे की, हे काही आज आले तसे सहा महिन्यांत निघून जाणार नाहीये. आपल्याला या परिस्थितीतच काही काळ जगावे लागणार आहे. शत्रूला सतत सावलीसारखा बरोबर ठेवूनच रोजचे आयुष्य जगावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला कॉमनसेन्स जागृत ठेवावा लागणार आहे. केवळ मलाच काही होऊ नये हा स्वार्थी विचार नाही तर माझ्यामुळे दुसऱ्यालाही काही होऊ नये याचा विचार प्रत्येकाला करावा लागणार आहे. बऱ्याच मेकॅनिकली लागलेल्या सवयी बदलाव्या लागतील. मात्र इतिहासाने हे सिद्ध केले आहे की, प्रतिकूल परिस्थितीत नवीन गोष्टीही जन्माला येतात. गेल्या कित्येक दिवसांत त्या येत असलेल्या आपण पाहतो आहोतच. या कोविड-१९ च्या जागतिक महामारीने अशा बऱ्याच बदलांची नांदी केलेली असावी.
गेल्या काही वर्षांत प्रगती करण्याचा नादात भान सुटून झालेल्या बऱ्याच हानिकारक गोष्टींचा पुनर्विचार हे संकट माणसाला करायला लावत आहे. त्यात वैयक्तिक, सामाजिक, पर्यावरणाशी निगडीत बऱ्याच गोष्टी आहेत. हे संकट लोकांना ‘थोडे दमाने घ्या’ हे सांगत आहे. घरात राहावे लागत असल्याने लोकांना नाईलाजाने का होईना थोडे सिंहावलोकन करायला वेळ मिळाला आहे. रोजच्या धकाधकीपासून शांतपणे आपण माणूस म्हणून आणि समाज म्हणून कोण आहोत, याचा विचार करायला भाग पडते आहे.
माणूस सवयीचा गुलाम असतो. त्या सहजासहजी सुटत नाहीत. जेव्हा असे काहीतरी अघटित घडते त्यावेळी लक्षात येते की, पुढे जाण्याच्या धावपळीत आपण आपल्यालाच गमावून बसलो आहोत. अफाट वेग, कार्यक्षमता, पैसे आणि हायपर कनेक्टिव्हिटीने आपण स्वतःला गाडले आहे आणि आपणच हरवून गेलो आहोत.
औद्योगिक क्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचे आयुष्य वाणिज्य-व्यवसायाच्या गतीवर अवलंबून राहू लागले. आपणच आपल्या २४ तासांचे असे विभाजन केले की, सतत व्यस्त राहू. आपण आपले फोन घेऊन सुट्टीवर रेस्टॉरंट्समध्ये जाऊ लागलो. जेवता-जेवता काम करणे, टीव्ही बघणे, पार्कमध्ये चालत असताना इमेल बघणे - फेसबुक चाळणे हे व्यसन लागू लागले. सतत टु-डू लिस्ट आणि कॅलेंडरच्या तालावर नाचणे सुरू झाले. काही मिनिटे शांत बसणेदेखील जमेना किंवा कुठे ५-१० मिनिटे जास्त वाट बघावी लागली तर अस्वस्थ होऊ लागलो.
एका विद्यापीठाने मध्यंतरी केलेल्या एका रिसर्चमध्ये म्हटले आहे की, ११९५-२००५ या दहा वर्षांत पादचारी लोकांचा चालण्याचा वेग १० टक्क्याने वाढला आहे. या सततच्या अस्थिरपणामुळे मनाचे संतुलन बिघडत गेले. ताणतणाव आयुष्य ताब्यात घेऊ लागले. आपण काल काय केले आणि काय खाल्ले हेही आठवेनासे झाले. या वेगात आपण कुठे वाहत जात आहोत हे समजेनासे झाले. आणि आपल्याला हा फटका बसला. रेस्टॉरंट्स, मूव्ही थिएटर्स, पर्यटनस्थळे, मॉल्स सर्व बंद झाले. पहिले काही दिवस नवलाईचे म्हणून पार पडले. मात्र हळूहळू हाताशी असलेला वेळ आणि अवकाश मनाला व्यापून टाकू लागला.
बरेच लोक जरी घरून काम करत असले तरी वेळेत बरीच लवचीकता असल्याने वेळापत्रकाच्या बंधनातून मुक्तता झाली. नाहीतर ती कधीच शक्य झाली नसती. या अचानकपणे मिळालेल्या रिकामपणातून बरेच काही मिळवता येईल. मन शांत होण्यासाठी असे काहीही न करण्याचाही वेळ आवश्यक असतो हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. अशी मिळालेली मानसिक स्वतंत्रता माणसाच्या सर्जनशीलतेला वाव देते. सतत घाईगडबडीत आणि दबावाखाली असणारे मन वेगळा विचार न करता चाकोरीबद्ध जगत राहते. करोना विषाणूने आपल्या सर्वांना घरी बसवले आहे आणि जगभरात अचानकपणे विविध क्षेत्रांतल्या नवकल्पनांचे पेव फुटले आहे. ज्या आई-वडलांना मुलांबरोबर घालवायला सकाळच्या पाच मिनिटांखेरीज वेळ नव्हता, ते आता मुलांबरोबर बसून आर्ट प्रोजेक्ट करताहेत, खेळ खेळताहेत आणि एकत्र स्वयंपाक करताहेत.
हे झाले सगळे बाहेरचे. मात्र यापेक्षाही काहीतरी खोल, सूक्ष्म, मूलभूत यातून मिळवता येईल. या सगळ्या प्रसंगातून जाताना मिळालेल्या या वेळेचा उपयोग करून हरवलेल्या आपण आपल्यालाच परत मिळवता येण्याचा प्रयत्न करता येईल. वेगाच्या भरात हरवून जाऊन गुलाम बनलेल्या त्या ‘स्व’ला स्वातंत्र्य देता येईल. जो आपल्याला जमिनीवर स्थिर ठेवतो, जो नवनवीन कल्पनांची स्वप्ने बघतो, कुतूहलाने गोष्टींची विचारपूस करतो, क्षणभर थांबून फुलाचा वास घेतो. काहीही करताना भल्याबुऱ्याचा विचार करून स्वतःचे प्रतिबिंब जो न्याहाळत राहतो, तो आपल्याला सापडून जाईल. आजूबाजूच्या कोलाहलापासून मिळालेल्या या शांततेतच हे जमू शकेल. आणि मिळालेला तो कदाचित पुढे हानिकारक निर्णय घेताना घडलेल्या घटनांचा दहादा विचार करेल.
जसा वैयक्तिक पातळीवर आपल्यात तो ‘स्व’ दडलेला आहे, तसाच तो अमेरिका किंवा कुठल्याही देशाचा एक ‘स्व’ असेलच की! जर असेल तर अमेरिका कसे त्या ‘स्व’ला ओळखत असेल? कसे त्याला पडताळून बघत असेल? तो ‘स्व’ काय मानत आला आहे आणि आता तो कुठे भरकट आहे, असे त्याला वाटत असेल का? एक नागरिक म्हणून जर मी माझा ‘स्व’ गमावला असेल तर एका संपूर्ण देशाचे मग काय? जर तोच त्याने गमावला असेल तर तो माझे तरी कसे ऐकू शकेल? देश म्हणून त्याचा ‘स्व’ त्याला मिळवून देण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाचीच नाही का? एक वेळ अशीही येईल की, हे संकट जाईल किंवा त्याची तीव्रता कमी होईल.
हे खरे की मनाला क्लेश होईल इतकी मनुष्य आणि वित्तहानी झालेली आहे. या आधुनिक आणि प्रगत जगाची ही एक मोठी शोकांतिका ठरली आहे. झालेले नुकसान भरून काढून परत बांधणी करण्यासाठी कित्येक वर्षे झगडावे लागणार आहे. पण गेल्या काही महिन्यांत मिळालेल्या वेळेचा वापर करून आपण सिंहावलोकन करून तो आपला आणि या पृथ्वीचा ‘स्व’ परत मिळवला असेल तर हे सगळे परत एकत्र आणण्याची ताकद आपल्याला मिळेल. कदाचित परत हानिकारक वेगात स्वतःला न झोकून देता थोडी शांत, शहाणी आणि समंजसपणाची जीवनशैली हा आयुष्याचा सहजधर्म होईल.
अल्बर्ट कामूने १९४७ मध्ये लिहिलेल्या ‘द प्लेग’ या पुस्तकातले हे वाक्य - “A feeling normally as individual as the ache of separation from those one loves suddenly became a feeling in which all shared alike and—together with fear—the greatest affliction of the long period of exile that lay ahead.”
हे परत कधी खरे ठरू नये असे वाटत असेल तर ते आपल्याच हाती-मनी आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment