स्वीडनच्या लॉकडाऊन न करण्याच्या निर्णयानं सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे!
पडघम - विदेशनामा
वीणा जपे, स्टॉकहोम, स्वीडन
  • स्वीडनमधील लॉकडाउन
  • Sat , 23 May 2020
  • पडघम विदेशनामा करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

करोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाउन आहे. वेगवेगळ्या देशातल्या लॉकडाउनविषयीच्या दहा प्रातिनिधिक लेखांचा ‘देशोदेशीचे लॉकडाउन’ हा विशेषांक आज प्रकाशित करत आहोत. ही संपूर्ण कल्पना पत्रकार, ब्लॉगलेखिका सायली राजाध्यक्ष यांची. त्यांनी त्यांच्या ‘साडी आणि बरंच काही. Sarees and Other Stories’ या लोकप्रिय फेसबुक पेजवर गेले काही दिवस सातत्याने वेगवेगळ्या देशांतल्या मराठी भाषिकांशी संपर्क साधून त्यांना त्यांचे अनुभव लिहायला सांगितले. १० मे पासून त्यांनी त्यांच्या पेजवर ते अनुभव प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. त्यातील काही निवडक लेख त्यांच्या पूर्वपरवानगीने येथे प्रकाशित करत आहोत. या विशेषांकातून वेगवेगळ्या देशांतल्या लॉकडाउनचे स्वरूप, प्रकार यांची तोंडओळख व्हावी ही अपेक्षा आहे.

..................................................................................................................................................................

६ ते १४ मार्च या दरम्यान भारतीय कंपनीमध्ये काम करणाऱ्या नवऱ्याला भारतात जाण्याचं विमानाचं तिकीट हातात आलं असेल साधारणपणे फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात. तोपर्यंत चीनच्या करोना संक्रमणाच्या बातम्या कानावर येतच होत्या. मुलीची शाळा नियमित चालू होती. माझं स्वीडिश भाषेचं व व्यावसायिक प्रशिक्षणदेखील चालू होतं. सर्व काही सुरळीत चालू असताना आजूबाजूला होणाऱ्या सामाजिक बदलाची जाणीव व्हायला सुरुवात होत होती. मी शिकत असलेल्या शाळेतून वारंवार सांगितलं जात होतं की खोकला किंवा सर्दी असल्यास घरीच बसा.

चीनमध्ये पसरलेल्या करोनाच्या बातम्यांची वर्गात वाफाळलेल्या कॉफीबरोबर ब्रेकमध्ये चर्चा रंगात येत चालली होती. त्यात चुकून वर्ग चालू असताना कुणी शिंकलं किंवा खोकलं तर सगळे त्याच्याकडे एकसाथ बघून आपापल्या आसनावर अस्वस्थ चुळबूळ करत होते. अस्वस्थता संपून थोड्या वेळातच लेक्चर परत सुरू होत होते. त्यातच नवऱ्याच्या भारतप्रवासाचं तिकीट करोनाच्या कारणामुळे रद्द झाल्यानं जरा बरं वाटलं.

त्यानंतर मात्र हळूहळू चित्र बदलण्यास सुरुवात झाली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुढच्या अभ्यासवर्गाची सुरुवात झाली आणि दोन आठवड्यांत म्हणजेच साधारणपणे १८ मार्चच्या दरम्यान कोर्स ऑलनाइन सुरू होणार याची बातमी आली. या दरम्यान इथल्या सरकारनं सर्व व्यावसायिक प्रौढ शिक्षणवर्ग व त्यांचं शिक्षण ऑनलाइन सुरू होणार असा निर्णय जाहीर केला. दरम्यान महाविद्यालयं व शाळा चालू ठेवायचा निर्णय घेतला, पण त्याचबरोबर मुलांना घरी ठेवू इच्छिणाऱ्या पालकांसाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय दिला.

याच दरम्यान नवऱ्याच्या कार्यालयानंही घरून काम करण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघंही घरीच असल्याने मुलीला शाळेत पाठवायचं नाही असं चर्चेअंती ठरलं. त्या दरम्यान काही अनिवार्य कारणासाठी मी बाहेर पडले आणि मला जेव्हा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा लागला, तेव्हा मेट्रोच्या एका मोठ्या संपूर्ण डब्यात जास्तीत जास्त पाचच प्रवासी पाहून परिस्थितीचं गांभीर्य समजलं आणि पटलं. त्यातच औषधांच्या दुकानांमध्ये सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि एका व्यक्तीला सॅनिटायझरच्या दोनच छोट्या बाटल्या मिळणार असं जाहीर करण्यात आल्यामुळे आधी घाईघाईनं त्याची खरेदी उरकली. अर्थात आता हा तुटवडा बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे.

आता हळूहळू ‘चिंता करतो विश्वाची’ या रामदास स्वामींच्या उक्तीप्रमाणे आम्ही सगळेच जगभरातल्या आणि स्वीडनमधील करोनारुग्णांच्या वाढत्या आलेखाकडे बघून चिंताग्रस्त होतो, व्हॉटसअॅप ग्रुपवर चर्चांना उधाण आले होते. संकटकाळी जसे तोंडातून पटकन ‘आई ग...’ सहजपणे निघून जातं, त्याप्रमाणे आता बहुतेक जणांना मायदेशी, भारतात परत जावंसं वाटत होतं. याचं मुख्य कारण म्हणजे ही युद्धजन्य परिस्थिती हाताळण्याची या देशाची जगावेगळी पद्धत!

आजारी असाल तर घरी रहा, पॅनिक होऊ नका हा सरकारचा सल्ला होता. इथं करोनाच्या चाचण्यादेखील फारच कमी प्रमाणात करत होते. तुम्ही धोकादायक गटामध्ये असाल तरच तुम्हाला उपचार मिळतील असं जाहीर करण्यात आलं, त्यामुळे बहुतेक जणांनी स्वत:ला घरात क्वारंटाइन करून घेतलं.

त्यात भारतातल्या जवळच्या सर्वांचे काळजीमुळे फोन येत होते. कारण होतं - इथल्या सरकारचा लॉकडाऊन न करण्याचा निर्णय. स्वीडनच्या या निर्णयानं सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे, हे मात्र खरं. हा निर्णय कितपत योग्य किंवा अयोग्य हे येणारा काळच ठरवू शकेल.

हळूहळू येथील टीव्हीवरच्या बातम्यांमधून स्पष्ट सूचना मिळत होत्या की, तुम्ही स्वत: जबाबदारीनx वागा, सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळा, काही दिवसांनी ५० पेक्षा अधिक लोकांच्या जमावावर सरकारनं बंदी घातली. बातम्यांमधून साधारणपणे एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे इथं वृद्ध लोकांची काळजी घेणाऱ्या निवासांमध्ये करोनाचे प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे तिथं काम करणाऱ्या अथवा भेटायला जाणाऱ्या लोकांसाठी सरकारनं खूप निर्बंध घातले आहेत. या वृद्धांची सध्या सगळ्यात जास्त काळजी येथील सरकार घेत आहे. वृद्धांची देखरेख करणाऱ्या लोकांना ते थोडे जरी आजारी असल्यास किंवा त्यांना सर्दी असल्यास कामावर न येण्याचे सरकारी आदेश निघाले आहेत.

घरात सलग कुठेच बाहेर न पडता, कुणाला न भेटता सर्व कुटुंबियांनी दिवसभर बसून राहणं म्हणजे खरोखर कठीण काम. कुटुंबातल्या प्रत्येकाला दररोज काही न काही कामामुळे घराबाहेर पडण्याची सवय असल्यानं इथं घरात बसणं म्हणजे शिक्षेपेक्षा कमी नव्हतं. मुळातच आम्हा भारतीयांना शेजाऱ्यांमुळे, त्यांच्याशी बोलल्यामुळे, त्यांच्या घरी येण्या-जाण्यामुळे, नातेवाइकांमुळे आयुष्य कसं भरकन निघून जाते ते कळत नाही. पण इथं या कोणत्याच गोष्टी नसल्यामुळे घरात बसणं म्हणजे महाकठीण काम.

म्हणूनच सुरुवातीला अगदीच बाहेर न पडणाऱ्या आम्ही हळूहळू घराबाहेर पडण्यास सुरुवात केल्यावर जरा मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटलं. बाहेर पडल्यावर सुरुवातीला दिसणाऱ्या तुरळक गर्दीचं रूपांतर आता व्यवस्थित जनजीवन सुरू होण्यापर्यंत झालं आहे. संध्याकाळी आम्ही बाहेर पडल्यावर आम्हाला सर्व लोक आपणहून सरकारच्या सूचनांचं तंतोतत पालन करत आहेत, हे पाहून कौतुक वाटतं आणि जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य कसं पार पाडता येऊ शकतं, याचं उदाहरण दिसलेलं आहे.

दुकानांमध्ये सॅनिटायझर ठेवले जात आहेत, तसंच दर थोड्या वेळानं एकमेकांमध्ये अंतर ठेवून खरेदी करण्याच्या सूचना मिळत आहेत. वयोवृद्ध लोकांना खरेदीसाठी स्वत:हून मदत करणारे अनेक मदतीचे हातही भराभर उभे राहत होते व अजूनही राहत आहेत. भारतीय मालाचं दुकान घराजवळच असल्यानं आम्हाला अजून तरी या काळात भारतीय वस्तूंची चणचण भासलेली नाही. दरम्यान भारतीय माल विकणाऱ्या दुकानांमधून उशिरा माल घरी पोहोचत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी कानावर येत होत्या. बऱ्याच भारतीय दुकानदारांनी तसंच इथल्या स्थानिक दुकानांनी देखील या काळात घरपोच माल पोहोचवायच्या सेवा द्यायला सुरुवात केली.

काही दिवसांपूर्वी स्वीडनमध्ये लॉकडाऊन का नाही, याविषयी इथल्या एका नागरिकानं लिहलेला एक लेख वाचण्यात आला. त्यानुसार इथं देशातली काही महत्त्वाची खाती जसं आरोग्य, शिक्षण व इतर काही सरकार चालवत नसून स्वायत्तपणे तज्ज्ञ लोकांचं मंडळ अभ्यासपूर्वक महत्त्वाचे निर्णय घेतात आणि सरकारला त्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे ही महत्त्वाची खाती जोपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत सरकारही याबाबत निर्णय घेऊ शकणार नाही.

स्वीडन हा एक लहान देश असल्याने जर लॉकडाऊन केलं तर इथली अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, हीदेखील भीती सरकारच्या मनात असावी. कारण देश प्रगत असला तरी थंड वातावरणामुळे या देशात बहुतेक सर्व गोष्टी बाहेरून आयात करण्याकडेच जास्त कल आहे. त्यामुळे सरकार सर्व गोष्टींचा विचार करूनच निर्णय घेत आहे. एक मात्र नक्की लॉकडाऊन न करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे लोक स्वत: जबाबदारी घेऊन वागायला लागले आहेत.

मुलांना घरी बसवणं म्हणजे खरोखर त्यांचे पंख कापल्यासारखं आहे. पण या जागतिक संकटात सगळ्या मुलांनी दाखवलेला समजूदारपणा वाखाणण्याजोगा आहे. या कठीण काळात घरोघरी मुलांनी आई-वडिलांना साथ देऊन जी सकारात्मकता दाखवली, त्याला खरोखरच मनापासून सलाम.

अगदी इथलाच अनुभव सांगायचा झाला तर इथं आम्हा भारतीयांचं जीवन म्हणजे आठवड्याच्या शेवटी एकमेकांना भेटून सणवार साजरे करणं किंवा उन्हाळ्यात एकत्रित फिरायला जाणं. मात्र या काळात शाळेपासून ते मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठीपर्यंत सर्वच पर्याय मुलांना बंद झाल्याने आता ऑनलाइन शाळेची वेळ संपल्यावर काय करायचं, हे मोठ कोडंही मुलांनी एकमेकांना कॉन्फरन्स कॉल करून सोडवलं. मग रोजच्या या कॉलमध्ये एकमेकांशी बोलत बोलत विज्ञानाच्या प्रयोगांपासून ते पालकांसाठी म्युझिकल शो तयार करण्यापर्यंत मुलांनी कल्पकता दाखवली. त्याचबरोबर स्वयंपाकघरात आईला मदत करण्यापासून ते वेगवेगळे क्राफ्ट किंवा वाचनासारखे छंद पूर्ण करण्यात मुलं आनंदानं वेळ घालवत आहे. करोनाच्या संकटातून निघाल्यावर समजूतदार मुलं आणखी समजूतदार होणार यात काहीच शंका नाही.

अजून एक महत्त्वाची गोष्ट इथं घडली. ती म्हणजे येथील शिक्षणतज्ज्ञांनी मुलांना घरी ठेवू नका, तर शाळेत पाठवा असं जाहीर केलं आहे. कारण चालू परिस्थितीचा मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आहे. काही भागांमधून तर तुमची मुलं शाळेत आली नाही तर पालकांवर कारवाई होईल अशी पत्रं शाळेकडून पालकांना पाठवण्यात आली. त्यामुळे मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांमध्ये साहजिकच चिंतेचं वातावरण निर्माण झालं.

शाळा सुरू ठेवणं अथवा न ठेवणं याचे अधिकार सरकारनं संपूर्णपणे शाळांना दिले. बहुतेक शाळांनी शाळा चालू ठेवणंच पसंत केलं. मुलांनी शाळेत यावं म्हणून एका विशिष्ट मुदतीनंतर ऑनलाइन शिक्षण पूर्णपणे बंद केल्यामुळे बहुतेक पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचा निर्णय घेतला. त्यामुळे आता आहे ती परिस्थिती स्वीकारून पालकांनी मुलांना शाळेत पाठवायला सुरुवात केली आहे. अर्थात शाळादेखील स्वच्छता व इतर महत्त्वाच्या बाबींची काळजी घेत आहेत. या आठवड्यापासून आम्हीदेखील मुलीला शाळेत पाठवणं सुरू केल्यापासून ती आनंदानं शाळेतून घरी येतेय.

कोविड-१९च्या या कठीण परिस्थितीत अजून मित्रमंडळीच्या भेटीगाठी सुरू झाल्या नसल्या तरी सर्व नियम पाळून त्याही लवकरच सुरू होतील असं मला वाटतं. ८ मे रोजी स्वीडनमध्ये करोनाग्रस्त लोकांचा आकडा २४,७१३ इतका होता, तर मृतांची संख्या होती ३०५६.

सगळ्या जगाप्रमाणे सद्यपरिस्थितीचा सामना करत असताना आम्ही व अनेकांनी काही सकारात्मक बदल स्वत:मध्ये घडवले आहेत. ते म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा वापर फक्त टाळता न येणाऱ्या परिस्थितीतच करायचा, त्याऐवजी सायकलचा वापर इतर प्रवासासाठी करायचा, हा सर्वांत महत्त्वाचा बदल आम्ही आमच्या जीवनशैलीमध्ये केला आहे.

इथे लॉकडाऊन नसतानाही सर्व काही सुरळीत चालूच आहे. त्यामुळे आता आपण सकारात्मक राहून करोनाविषयीच्या बातम्या फार न वाचता, आवश्यक काळजी घेऊन आयुष्य सुरळीत चालू ठेवण्याकडे बहुतेकांचा कल आहे. सध्या रोज नियमितपणे फिरायला जाणं, भरपूर व्यायाम करून दिवसाची सुरुवात उत्साहानं करणं, याकडे इथल्या जवळपास सर्वच मित्रमैत्रिणींचा कल आहे. बहुधा येणाऱ्या काळाकडे पाहून हेच दिसतंय की, स्वयंशिस्त आणि सकारात्मकता या दोनच गोष्टी या संकटाशी झुंजायला पुरेसं बळ देऊ शकणार आहेत. आम्हीही आता आमचं सामान्य जीवन बऱ्यापैकी सुरू केलं आहे. या जागतिक संकटातून संपूर्ण जग लवकरात लवकर बाहेर पडो हीच सदिच्छा!

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......