करोनावर उपचार मिळेपर्यंत त्याच्याबरोबर जगावं लागणार आहे
पडघम - विदेशनामा
विश्वास अभ्यंकर, अल्मेर, नेदर्लंड्स
  • नेदर्लंड्समधील लॉकडाउन
  • Sat , 23 May 2020
  • पडघम विदेशनामा करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

करोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाउन आहे. वेगवेगळ्या देशातल्या लॉकडाउनविषयीच्या दहा प्रातिनिधिक लेखांचा ‘देशोदेशीचे लॉकडाउन’ हा विशेषांक आज प्रकाशित करत आहोत. ही संपूर्ण कल्पना पत्रकार, ब्लॉगलेखिका सायली राजाध्यक्ष यांची. त्यांनी त्यांच्या ‘साडी आणि बरंच काही. Sarees and Other Stories’ या लोकप्रिय फेसबुक पेजवर गेले काही दिवस सातत्याने वेगवेगळ्या देशांतल्या मराठी भाषिकांशी संपर्क साधून त्यांना त्यांचे अनुभव लिहायला सांगितले. १० मे पासून त्यांनी त्यांच्या पेजवर ते अनुभव प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. त्यातील काही निवडक लेख त्यांच्या पूर्वपरवानगीने येथे प्रकाशित करत आहोत. या विशेषांकातून वेगवेगळ्या देशांतल्या लॉकडाउनचे स्वरूप, प्रकार यांची तोंडओळख व्हावी ही अपेक्षा आहे.

..................................................................................................................................................................

नेदर्लंड्समध्ये वास्तव्याला येऊन आता एकूण १० वर्षं झाली, परंतु इतक्या वर्षांत जे घडलं नाही ते या वर्षी घडलं. इथल्या राजाच्या वाढदिवसाला, किंग्स डेला, रस्ते सुनसान होते, अर्थात कारणही तितकंच अपरिहार्य होतं.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूनं नेदर्लंड्सचं दार अखेरीस २७ फेब्रुवारी २०२०ला ठोठावलंच. इटलीतल्या लोम्बार्डी प्रदेशातून नुकत्याच परतलेल्या एका माणसामध्ये करोना विषाणूची चिन्हं दिसून आली आणि लगेचच इटली, चीन आणि दक्षिण कोरियातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्याचे आदेश डच सरकार आणि राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संस्था (RIVM) यांनी स्थानिक महानगरपालिकांच्या आरोग्य विभागांना दिले. ही केवळ सुरुवात होती. स्वतः सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यासक असून परिस्थितीचं गांभीर्य ध्यानात यायला मलाच वेळ लागला, तेव्हा इतर जनमानसात याबद्दल जागृती होणं आणि तेही केवळ एका रोग्यामुळे, हे त्या वेळी अवघडच होतं. आणि दुर्दैवानं झालंही तसंच. नेदर्लंड्समध्ये टिलबर्ग आणि ब्रेडा नावाच्या शहरांमध्ये आयोजित केलेल्या कार्निव्हल्समुळे या विषाणूचा प्रसार अगदीच सोपा झाला.

जसजसे रुग्ण वाढू लागले, तसतसे सरकारनं नियम बदलले. ‘इंटेलिजंट लॉकडाऊन’ लागू झालं आणि प्रत्येक वेळी लोकांना त्या नियमांबद्दल प्रसारमाध्यमांद्वारे माहिती करून दिली गेली. यातले कुठलेही नियम लागू करताना कधीही कुठल्याही गोष्टीचं अवडंबर केलं गेलं नाही. प्रधानमंत्री मार्क रुत सुरुवातीपासूनच आवाहन करत होते की- “असे नियम आहेत आणि ते स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी पाळावेत. यापलीकडे मी काहीच जबरदस्ती करू शकत नाही.” सर्वांत प्रथम साबणाने २० सेकंद हात धुवा, शारीरिक स्वच्छता पाळा आणि तुम्हाला सर्दी-खोकला असेल तर पूर्ण बरे होईस्तोवर घरीच राहा, असे साधारण पहिल्या काही दिवसातले आदेश होते.

परंतु तरीही विषाणूचा प्रसार न थांबल्यानं कमीत कमी १ जूनपर्यंत घरून काम करणं (वर्क फ्रॉम होम) आणि मुलांच्या शाळा-महाविद्यालयं, पाळणाघरं बंद अशी संभाव्य परिस्थिती निर्माण झाली. पंतप्रधान रुत यांच्या आदेशांचं तात्काळ पालन केलं गेलं. शिक्षण संस्थांनी इंटरनेटद्वारे ऑनलाईन वर्ग घ्यावेत किंवा तास रेकॉर्ड करून मुलांना पाठवावेत अशी योजना केली गेली. आणि त्यातही माध्यमिक शाळांवर भर दिला गेला जिथे लवकरच मुलांच्या परीक्षा होणार होत्या.

नोकरवर्गाला घरून काम करता येईल याची पूर्ण काळजी मालकवर्गाने घ्यावी अशी सूचना सरकारने केली. त्यानुसार माझा टीम लीडर स्वतः माझ्याकरता (आणि इतर काही सहकाऱ्यांकरता) एक लॅपटॉप आणि मॉनिटर घेऊन आला होता. या संपूर्ण काळामध्ये सर्वांचे ९० टक्क्यांपर्यंत पगार दिले जातील असंही सरकारनं घोषित केलं. माझ्या कंपनीने ज्यांना लहान मुलं आहेत, त्यांच्यावर रोजचं आठ तास काम झालं पाहिजे हे बंधन ठेवलेलं नव्हतं. आरोग्य, सुरक्षा आणि इतर अतिमहत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांनाच कामानिमित्त घराबाहेर जाण्यास परवानगी आहे. त्यांच्या मुलांचा दिवसभर सांभाळ करण्यासाठी वेगळी सोय केली गेली आहे, हे कौतुकास्पद आहे.

माझ्यासारख्याच इतर सर्व सामान्य नागरिकांना ‘आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका आणि जर पडलात तर इतर लोकांपासून १.५ मीटर अंतर ठेवा’ अशी सूचना करण्यात आली. ‘साधा सर्दी-खोकला झाल्यास घाबरून लगेच डॉक्टरला फोन करायची गरज नाही; केवळ श्वसनाला त्रास झाला किंवा खूप काळ ताप राहिला तरच डॉक्टरला फोन करा आणि मगच दवाखान्यात जा’ अशी सक्त ताकीद सर्वांना दिली गेली.

‘गृहोपयोगी गोष्टींचा साठा करून ठेवण्याची गरज नाही, जेणेकरून सर्वांना सर्व गोष्टी उपलब्ध होतील’ असे रुत यांनी सांगूनदेखील लोकांनी सर्वप्रथम टॉयलेट पेपर, नंतर मांस व चीज आणि त्यानंतर कांद्यावर धाड टाकली. टॉयलेट पेपरचा ढीग घेऊन चाललेली माणसे बघून फारच गंमत वाटत होती. सर्वांत हास्यास्पद बाब म्हणजे हशिश आणि गांजा कायदेशीर असणाऱ्या या देशात अशा संकटाच्या परिस्थितीत लोकांनी हे अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी किंवा त्यांचा साठा करून ठेवण्यासाठी देखील ‘कॉफी शॉप्स’च्या बाहेर रांगा लावल्या होत्या.

कालांतराने सर्वसाधारणपणे गर्दी कमी झाली. परिणामी रेल्वे, बस, मेट्रोमध्ये कपात करण्यात आली. त्यामुळे नेहमीचे गजबजलेले रस्ते ओस पडलेले पाहून भकास वाटायचं. ‘रेल्वेनं जात असाल तर तिकीट तपासनिसाच्या हातात तिकीट देण्याऐवजी स्वतः तुमचे तिकीट त्याच्याकडे असलेल्या मशीनवरून तपासून घ्या’ अशी विनंती नागरिकांना केली गेली. फूड डिलिव्हरी करणाऱ्या माणसांना त्यांच्या कंपन्यांकडून ग्राहकांच्या दरवाज्यापाशी पार्सल ठेवून जाण्याचे आदेश दिले गेले आणि त्यांचं पालनही झालं. सर्व आर्थिक व्यवहार शक्यतो कार्डने करण्याची विनंतीदेखील लोकांना केली गेली. या सर्व विनंती अथवा सूचनांमागचा हेतू एवढाच की, मनुष्य संपर्क कमी व्हावा.

आठवडी बाजारदेखील काही दिवस बंद ठेवले गेले. शंभरपेक्षा जास्त लोक एकत्र येतील अशा जागा व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्यामुळे रेस्टॉरंट्स, संग्रहालयं, सिनेमा आणि प्रेक्षागृहं, समुद्रकिनारे तसंच वाचनालयांमध्ये जाण्यास देखील बंदी घालण्यात आली. किराणा खरेदीसाठी आम्ही बाहेर पडायचो, अजूनही पडतो पण त्याव्यतिरिक्त फारसे नाही पडलो. तेव्हा प्रत्येक दुकानात ‘सुरक्षित (१.५ मी.) अंतर ठेवा’, ‘बास्केट घेणे अनिवार्य’, वगैरे सूचना लावलेल्या होत्या अथवा आहेत हे दिसलं. मी आणि भाग्यश्री दोघेही वेगवेगळ्या दुकानात जायचो/जातो कारण प्रत्येक घरटी एकालाच दुकानात जायची परवानगी होती/आहे. दुकानाबाहेरसुद्धा रांग असेल तर जमिनीवरती आखून दिलेल्या ठिकाणीच उभं राहावं लागतं.

चांगलं हवामान असलं की, घराबाहेर पडण्याचा मोह डच लोकांना एरवीच आवरत नाही, तर या काळात आवरणंसुद्धा कठीणंच होतं. त्यामुळे अचानक कधीतरी गर्दी व्हायची. इथे १२ वर्षांखालच्या मुलांमध्ये करोनाचा संसर्ग फारसा दिसला नाही. त्यामुळे त्या वयोगटापर्यंतच्या मुलांना बाहेर खेळायला तशी थोडी परवानगी होती. पण काहींच्या पालकांनीदेखील त्या संधीचा फायदा घेतला. आणि दुर्दैवाने त्याचा परिणाम असा झाला की, रुग्णांची संख्या आता ४२००० च्या वर गेली आहे आणि मृतांचा आकडा ५००० वर पोहोचला आहे. इथे वयस्कर नागरिक अधिक प्रमाणात असल्यामुळे हा आकडा एवढा वाढू शकला.

असं हे लॉकडाऊन सुरुवातीला २९ मार्चपर्यंतच होतं, ते ६ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलं. रुग्णांची संख्या कमी होत नाही हे बघून लॉकडाऊन २० मेपर्यंत लागू केलं गेलं. या लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगमुळेच आता दर दिवशी वाढणारा रुग्णांचा आकडा १०० च्या खाली आला आहे. त्यामुळे आता बंधनं हळूहळू शिथिल केली जात आहेत. काय करता येणार नाही, यापेक्षा काय करता येईल यावर भर दिला जातोय आणि लोकांना माहिती पुरवली जातीये.

११ मे पासून आता शाळा सुरू झाल्या पण तिथेही काही वर्ग सकाळी भरतात तर काही दुपारनंतर. १ जून पासून पब्लिक ट्रान्सपोर्ट नियमितपणे सुरू होईल, पण तिथे काही बंधनं अजूनही असतील. सार्वजनिक वाहतूक  व्यवस्था वापरताना प्रत्येकाला आता मास्क घालणं अनिवार्य असेल आणि ट्रेन, मेट्रो, बसच्या पूर्ण क्षमतेच्या ३० टक्के भरेल एवढ्याच लोकांना एकावेळी प्रवास करता येईल. रेस्टॉरंट्स हळूहळू सुरू करायला परवानगी दिली आहे, पण तिथेही एका वेळी फक्त ३० जण बसू शकतील. पर्सनल केअरच्या सोयी-सुविधा म्हणजेच केशकर्तनालयं, नेल पार्लर्स, मसाज सेंटर्स इ. यांनाही आता परवानगी मिळाली आहे, पण तिथे अपॉइंटमेंट घेऊनच जायचं हा नियम केला आहे.

आठवडी बाजार, वाचनालयं, संग्रहालयं देखील आता सुरू होतील. पोहण्याचे तलाव, खेळांचे सराव यांनासुद्धा परवानगी मिळाली असली तरी एकमेकांमध्ये १.५ मीटर अंतर ठेवणं गरजेचं आहे. अजूनही ‘शक्य असेल तर घरूनच काम करा’ असे आदेश दिले गेले आहेत. १ जुलैपर्यंत कुठेही ३० पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. १ जुलैनंतर कदाचित परिस्थिती बघून १०० हून जास्त लोक एकत्र यायला परवानगी मिळेल, पण त्याबद्दल आत्ता काहीच फारसं सांगता येत नाही. मोठ्या स्पर्धा, सोहळे, पार्ट्या यांच्यावर तर १ सप्टेंबरपर्यंत बंदीच आहे.

१३ मार्चपासून माझं घरून काम करणं सुरू झालं आणि लवकरच समजून चुकलो की, कितीही छान वाटत असलं तरी खूप दिवस घरूनच काम करावं लागेल आणि ते नक्कीच अवघड जाईल. रोज एकूण तीन तास जातात ऑफिसला जाता-येताना ते अचानक गायब झाले आणि उठल्या उठल्या जणू ऑफिसच्या कामाला बसायची सवय लागायला लागली. साधारण दीड-दोन आठवडे असेच गेले आणि मग मात्र काहीतरी बदल हवासा वाटला. एरवी नसणारी खाण्यापिण्याची चंगळ यासाठी होत होती, कारण भारतात सहज मिळणारे पण इथे क्वचित मिळणारे आणि हवे असतील तर स्वतःलाच करून खावे लागणारे पदार्थ करायला बराच वेळ मिळत होता.

त्यामुळे झालं असं की, आता वाटतं की सगळा वेळ डिशवॉशरमध्ये भांडी घालणं आणि धुवून झाली की, त्यातून काढणं यातच जातो आहे! रोजच्या ऑफिसच्या कामाच्या वेळाव्यतिरिक्त एकमेकांना वेळ दिला, आई-बाबा, सासू-सासरे आणि इतर सर्व नातेवाईक, भाऊ-बहिणी, मित्र-मैत्रिणी यांच्याशी बोलायला अर्थात खूप वेळ मिळाला, जो खरंच हवाही होता. पण त्याशिवायच्या वेळेत करायचं तरी काय? कारण आता दिवसही मोठा होत होता. अशा वेळी छंदांचा आधार घेतला. फोटोग्राफी केली, चित्रं काढली, गाणी ऐकली, गायली, पुस्तकं वाचली, ऐकली, बागकाम केलं. हे सगळं करून उरलेल्या वेळात चांगल्या सिरीज, शो बघितले. आणि आता बघता बघता दोन महिने झाले!

एक मायक्रोबायॉलॉजिस्ट म्हणून मला अजूनही या गोष्टीचं विलक्षण आकर्षण आहे की, एक सूक्ष्मातीसूक्ष्म जीव संपूर्ण जगाला वेठीला धरून आहे. त्याच्यामुळे माणसा-माणसांतल्या संबंधावर किती फरक पडला आहे, हे आता लॉकडाऊन संपल्यावर कळेलच. करोनावर उपचार मिळेपर्यंत आता त्याच्याबरोबर जगावं लागणार आहे, हे मात्र उघड आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......