आपण सगळे यातून लवकरात लवकर बाहेर पडू, सगळं नीट सुरळीत सुरू होईल याची खात्री बाळगा.
पडघम - विदेशनामा
नीरजा लाळे, ऑस्लो, नॉर्वे
  • नॉर्वेमधील लॉकडाउन
  • Sat , 23 May 2020
  • पडघम विदेशनामा करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

करोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाउन आहे. वेगवेगळ्या देशातल्या लॉकडाउनविषयीच्या दहा प्रातिनिधिक लेखांचा ‘देशोदेशीचे लॉकडाउन’ हा विशेषांक आज प्रकाशित करत आहोत. ही संपूर्ण कल्पना पत्रकार, ब्लॉगलेखिका सायली राजाध्यक्ष यांची. त्यांनी त्यांच्या ‘साडी आणि बरंच काही. Sarees and Other Stories’ या लोकप्रिय फेसबुक पेजवर गेले काही दिवस सातत्याने वेगवेगळ्या देशांतल्या मराठी भाषिकांशी संपर्क साधून त्यांना त्यांचे अनुभव लिहायला सांगितले. १० मे पासून त्यांनी त्यांच्या पेजवर ते अनुभव प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. त्यातील काही निवडक लेख त्यांच्या पूर्वपरवानगीने येथे प्रकाशित करत आहोत. या विशेषांकातून वेगवेगळ्या देशांतल्या लॉकडाउनचे स्वरूप, प्रकार यांची तोंडओळख व्हावी ही अपेक्षा आहे.

..................................................................................................................................................................

स्कँडेनेव्हियन देशांमध्ये करोनाचा संसर्ग रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळालं आहे. या देशांनी संकट लवकर ओळखलं आणि लवकर पावलं उचलली. अर्थात कमी लोकसंख्या हे या देशांना लाभलेलं वरदान आहे.

मी नॉर्वेमध्ये माझा नवरा आणि ९ वर्षाच्या मुलाबरोबर राहते. आम्ही तीन वर्षांपूर्वी कामानिमित्त इंग्लंडहून इथे शिफ्ट झालो. आता इथे स्थायिक आहोत.

नॉर्वेमध्ये फेब्रुवारीमध्ये एका आठवड्याची सुट्टी असते. या सुट्टीला ‘skiing हॉलिडे’ असे म्हणतात. इथले स्थानिक लोक फेब्रुवारी-मार्चमध्ये इटली आणि ऑस्ट्रिया या देशांमध्ये हमखास skiing साठी जातात. करोनाची पहिली केस इथे साधारण फेब्रुवारीच्या शेवटी सापडली. इटली आणि ऑस्ट्रियाच्या ट्रिपमुळे करोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. ११ मार्चला इथे एका दिवसात २३०च्या आसपास रुग्णसंख्या वाढली. लोकांनी मुलांना १२ मार्चला शाळेत पाठवलं नाही. डेन्मार्कने दोन दिवस आधीच शाळा बंद केल्या होत्या. १२ मार्चला सरकारनं लॉकडाऊन जाहीर केलं. त्या दिवशीपासून शाळा आणि ऑफिसेस बंद झाली. १३ मार्च ते २६ मार्च असा दोन आठवड्यांचा काळ आम्ही पहिल्या टप्प्यातल्या लॉकडाऊनमध्ये होतो.

Barnehage (kindergarten) आणि शाळा ताबडतोब बंद झाल्या. त्याचबरोबर स्विमिंग, टेनिस, जिम, रेस्टॉरंट्स बंद. सर्वच्या सर्व ऑफिसेसमध्ये (खाजगी व सरकारी) ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झालं.

इथले नागरिक वा रहिवाशी जे सुट्टीसाठी स्पेन, ऑस्ट्रिया, इटली असे जिथे कुठे गेले होते, त्यांना विमानं पाठवून परत आणण्यात आलं. इथले रहिवाशी आणि नागरिक यांना परत यायला परवानगी होती. प्रवास करणाऱ्या सगळ्यांना आणि लक्षणं असणाऱ्या सर्व लोकांना १४ दिवसांचं होम क्वारंटाइन सक्तीचं होतं.

त्यानंतर आली इस्टरची सुट्टी. त्यामुळे अर्थात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा २७ मार्च ते १३ एप्रिल असा.

ऑस्लोत खाण्यापिण्याच्या वस्तू आणि जीवनावश्यक वस्तू सहजरीत्या उपलब्ध होत्या. सीमा बंद झाल्यामुळे एशियन ग्रोसरीच्या दुकानात नेहमीच्या वेळेत आणि सगळ्या वस्तू येत नव्हत्या. कणिक आणि तांदूळ लगेच संपले. ते अजूनही येत नाहीयेत. नेहमीपेक्षा वेगळ्या ब्रँडचं चालत असेल तर ते मात्र भरपूर आहे.

१६ एप्रिलपासून शाळा ऑनलाईन सुरू झाल्या. कसलाही गडबड घोटाळा नाही. सकाळी ९ ते दुपारी २.३० शिक्षकांबरोबर कॉल, अभ्यास. एवढंच नाही तर फिजिकल अॅक्टिव्हिटीवर प्रचंड भर असल्यामुळे ते तास पण होते. शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. मुलांनीदेखील चांगला प्रतिसाद दिला. शाळा प्रकरण सुरळीत सुरू होतं. मुलं ऑनलाईन अभ्यास एन्जॉय करत होती. पण मित्र-मैत्रिणींबरोबरचं रोजचं भेटणं-बोलणं मिस करत होती. संध्याकाळी बाहेर सायकल चालवणं, आई-वडिलांबरीबर फिरायला जाणं, बॅडमिंटन किंवा टेनिस खेळणे हे उद्योग सुरू होते. मुलांनी चांगलंच सहकार्य केले. वैतागली पण सगळं शांतपणे निभावून नेलं.

आपले अनेक लोक भारतात आहेत असे समजून भारतात सांगितल्याप्रमाणे वागत होते/ आहेत. घरात स्वतःला बंदिस्त करून मुलांना मुळीच बाहेर काढायचे नाही. ५० पावलांवर दुकान असलं तरी महागडा ऑनलाइन भाजी पाला मागवायचा. तो तीन दिवस शिवायचा नाही. आता कुठे स्प्रिंग सुरू होऊन हवामान चांगलं होतंय. पण मुलं बिचारी खिडकीत, दारात उभी राहून बाहेर कधी सोडतील याची वाट पाहत बसायची.

या उलट स्थानिक लोक. इथे सगळी छोटी मुलं हवामान कसंही असलं तरी बाहेर खेळतात. बंदिस्त कोणीच कधीच नसतं. तर हे लोक मुलांना बाहेर खेळवायचे, कुठंही हात लावू देत, किती पण कसे पण खेळू देत. हे सगळं अपार्टमेंटच्या बाहेर पार्कमध्ये. करतील काय बिचारी मुलं. कायम बाहेर असणाऱ्यांना अचानक घरी बसवलं तर प्रॉब्लेम आहे मोठा. त्यात इथे घरं खूप काही मोठी नाहीत. मुलांवर मानसिक परिणाम होण्याची चिंता असते अशा वेळी. इथले लोक प्रॅक्टिकल आहेत. खेळू देत मुलांना. लावू देत इथेतिथे हात. सरकारने मुळीच म्हटलं नाहीये, घराबाहेर जाऊ नका. आणि घेतीलच की काळजी, मुलं आहेत स्वतःची.

नॉर्वे हा जगातला सर्वांत महागडा देश आहे. इथे आम्ही टॅक्स भरपूर भरतो (किमान ३६ टक्के आणि कमाल ६० टक्के). पण तो टॅक्सचा पैसा आपल्यासाठीच उपयोगी पडतो. इथे जी kindergarten आहेत ती, डॉक्टर आणि बऱ्याच सुविधा खूप सवलतीच्या दरात दिल्या जातात. यातला ८५ टक्के पैसा सरकारचा असतो, अर्थात आपलेच टॅक्सचे पैसे ते. तर हे लहान मुलांचे barnehage बंद होते, त्या सात-आठ आठवड्यांचे काही पैसे घेतले नाहीत. लोकांच्या नोकऱ्या जात होत्या. फी माफ केली होती मुलांची, कारण मुलं घरी होती.

आरोग्य सेवकांच्या मुलांसाठी सोय अर्थात केली होती. त्यामुळे त्यांचा मोठा प्रश्न सुटला होता.

इथे work from home कन्सेप्ट नवीन नाही. त्यामुळे ऑफिसची कामं अडली नाहीत. या काळातच जागतिक तेलाच्या किमती घसरल्या. त्यामुळे प्रोजेक्ट नाहीत, इकॉनॉमीचा प्रॉब्लेम, अनेक लोकांना कामावरून काढलं गेलं. तेलाच्या आणि इतर क्षेत्रातही. पर्यटन संपूर्णपणे बंद झालंय. हॉटेल्स रिकामी आहेत. हे सगळं लवकरात लवकर सुरळीत होईल आणि पुन्हा पूर्ववत होईल अशी फक्त प्रार्थना करू शकतो. या देशात एक चांगलं असं की- जर तुमचा PR (permanent residency) असेल तर दोन वर्षांपर्यंत NAV (welfare sytem) काही प्रमाणात तुमचा पगार तुम्हाला देतं. म्हणजे नोकरी गेली तरी दोन वर्षं निभावू शकतो.

मुळात या सर्व देशांना बंधनं माहीतच नाहीत. सर्वांना सर्व गोष्टींचं स्वातंत्र्य आहे. इथलं सरकार हे विश्वासाच्या आधारावर काम करतं. रहिवासी आणि नागरिक यांच्यावर विश्वास खूप मोठा आहे. त्यामुळे इथे कर्फ्यू लावण्याची गरज पडली नसावी.

भारतासारखा कडक लॉकडाऊन इथे कधीच नव्हता, सर्व पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू होता. ज्यांचे महिन्याचे पास आहेत, त्यांना एका महिन्याचा रिफंड मिळाला.

मुळात इथली लोकसंख्या कमी. जेमतेम ५० लाख. कोणी एकमेकांना एरवी पण खेटून उभे राहत नाही. त्यामुळे दोन मीटरचं अंतर ठेवा हे इथे लागूच होत नाही. कारण १२ महिने सोशल डिस्टन्सिंग!

मॉल्समध्ये काही दुकानं बंद होती. बाकी जरा कमी वेळ सुरू होती. कुठेही लोकांनी गर्दी केली नाही. मेट्रो आणि बस बहुतेक रिकाम्या धावत होत्या. पण बंद नव्हत्या.

बाहेर गरज असेल तरच पडायचे, शक्य झाल्यास पब्लिक ट्रान्सपोर्ट टाळायचा. घराबाहेर पडू नका असा सल्ला मुळीच नव्हता. त्या उलट रोज सकाळी संध्याकाळी बाहेर पडून व्यायाम करणारे, फिरायला, जॉगिंगला जाणारे लोक एरवीपेक्षा जास्त दिसू लागले. अर्थात हे करा असा सल्ला होता आणि कुठे बसनं वगैरे जायचा प्रश्न नव्हता. जिम बंद होती, पण फिटनेसला खूप महत्त्व असल्यामुळे बाहेर आणि घरी व्यायाम, जिमचं ऑनलाईन ट्रेनिंग असं सर्व सुरू होते.

माणसं हे सगळं सोशल डिस्टन्सिंग पाळून करत होती. रेस्टॉरंट आणि इतर व्यवसाय, हेअर ड्रेसर वगैरे सगळंच बंद होते.

विजा, पासपोर्ट असल्या गोष्टी प्राधान्यक्रमाच्या नसल्यानं ती सेवा बंद होती. जे इथे आहेत, त्यांना विजा संपतोय वगैरे काळजी नाही. मुलांकडे म्हणून आलेल्या पालकांना काळजी नाही. कोणालाही हाकलून देणार नाहीयेत.

इस्टरनंतर सरकारनं हळूहळू बंधनं कमी करायला सुरुवात केली. आधी kindergarten सुरू झाले. पाच लोकांची मर्यादा, त्यामुळे चार मुले आणि त्यांच्या मागे एक शिक्षक. जास्तीत जास्त वेळ बाहेर खेळायचे. पालकांना आत जाण्यास मनाई. पहिली ते चौथी शाळा सुरू झाल्या. सरकार आणि आरोग्य खात्याचे सर्व नियम पाळले जातायत. सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातंय.

ऑफिसमध्ये गरज असेल तरच लोक जातायत. २५ टक्क्यांपर्यंतच कर्मचाऱ्यांना परवानगी आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरूच आहे पण नेहमीइतके लोक नाहीत. अंतर पाळलं जातंय. सलून्स आणि रेस्टॉरंट्स सुरू झाली आहेत. इथे पण सगळे नियम पाळले जातायत. लहान उद्योगधंदे सुरू झालेत. ज्यांना तात्पुरतं कामावरून कमी केलं होतं, ते लोक हळूहळू कामावर रुजू होतायत. सार्वजनिक कार्यक्रमांना अजूनही परवानगी नाहीये.

आता पाचवीपासून पुढे शाळा लवकरच सुरू होतील. अर्थात बस आणि मेट्रोमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. हळूहळू सगळं नॉर्मलला येतंय. मुलं जाम खुश आहेत. त्यांचं शाळेचं रूटिन नेहमीसारखं सुरू झालंय. पण अजून स्विमिंग आणि टेनिस वगैरे सुरू व्हायला वेळ आहे. या गोष्टींसाठी ज्या लोकांनी सभासदत्व घेतलेलं आहे आहे, त्यांना नुकसान भरपाईसाठी काही पर्याय दिले आहेत.

आम्ही बाहेर पडतोय. सोशल डिस्टन्सिंग पाळतोय. अजून गेट टुगेदर्स सुरू केली नाहीत. काही महिने आपल्याला कोविड-१९बरोबर राहावे लागणार आहे. काळजी घ्यावी लागणार आहे. या काळामध्ये घरचे जास्त जवळ आलेत. माझा नवरा सेल्समध्ये असल्याने नेहमी बाहेर असतो. त्याला मी आजकाल म्हणते की, १२ वर्षांनी पहिल्यांदाच मला आणि मुलाला तुझा इतका सलग सहवास लाभला आहे. घरी फोन करून चौकशी करण्याचं प्रमाण वाढलं आहे.

वेळ मिळत असल्यामुळे छंद जोपासता येतायत. ते इथे नेहमीच येतात खरे! मुलं घरी, आम्ही घरी, सगळेच घरी, त्यामुळे शेजारपाजारचे लोक घनिष्ट मित्र बनले आहेत. सगळी मुलं बाहेर खेळत असताना आम्ही पण थोडा वेळ बाहेर असतो. खूप गप्पा मारतो. Hi-helloच्या पुढे नवीन ओळखी झाल्यात आहेत.

आपण सगळे यातून लवकरात लवकर बाहेर पडू, सगळं नीट सुरळीत सुरू होईल याची खात्री बाळगा. एकमेकांची काळजी घ्या.

स्वस्थ राहा, नियम पाळा. This too shall pass.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......