पुढेमागे जनजीवन मूळपदावर येईल, पण या घटनेची इतिहासात नोंद होईल हे निश्चित!
पडघम - विदेशनामा
विनया रायदुर्ग, सिंगापूर
  • सिंगापूरमधील लॉकडाउन
  • Sat , 23 May 2020
  • पडघमविदेशनामाकरोना विषाणूCorona virusकोविड-१९Covid-19करोनाCoronaकरोना व्हायरसCoronavirusलॉकडाउनLockdown

करोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाउन आहे. वेगवेगळ्या देशातल्या लॉकडाउनविषयीच्या दहा प्रातिनिधिक लेखांचा ‘देशोदेशीचे लॉकडाउन’ हा विशेषांक आज प्रकाशित करत आहोत. ही संपूर्ण कल्पना पत्रकार, ब्लॉगलेखिका सायली राजाध्यक्ष यांची. त्यांनी त्यांच्या ‘साडी आणि बरंच काही. Sarees and Other Stories’ या लोकप्रिय फेसबुक पेजवर गेले काही दिवस सातत्याने वेगवेगळ्या देशांतल्या मराठी भाषिकांशी संपर्क साधून त्यांना त्यांचे अनुभव लिहायला सांगितले. १० मे पासून त्यांनी त्यांच्या पेजवर ते अनुभव प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. त्यातील काही निवडक लेख त्यांच्या पूर्वपरवानगीने येथे प्रकाशित करत आहोत. या विशेषांकातून वेगवेगळ्या देशांतल्या लॉकडाउनचे स्वरूप, प्रकार यांची तोंडओळख व्हावी ही अपेक्षा आहे.

..................................................................................................................................................................

२३ जानेवारीला पहिला कोविड-१९चा रुग्ण सिंगापूरमध्ये सापडला. चीनच्या वूहानमधून या रोगाची लागण सुरू झाली आहे आणि हा रोग अत्यंत संसर्गजन्य आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली. २००३ मधल्या सार्सचा अनुभव गाठीशी असल्याने सरकारने लगेच रुग्णांना क्वारंटाइन करणे, त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना १४ दिवस घरी राहण्याची नोटीस देणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे अश्या उपाययोजना सुरू केल्या.

पहिल्या काही केसेस मुख्यत्वेकरून चीनवरून आलेल्या प्रवासी लोकांच्या होत्या. पण नंतर हळूहळू स्थानिक लोकांमध्ये हा विषाणू पसरू लागला. दरवर्षी साधारण जानेवारी अखेरीस चिनी नववर्ष असते आणि त्यानिमित्ताने लोक चीनला त्यांच्या नातेवाईकांना भेटायला जातात किंवा अन्यत्र प्रवासाला जातात. या वर्षी मात्र सरकारने अनावश्यक प्रवास टाळा अशा सूचना द्यायला सुरुवात केली. काही लोकांनी प्रवास रद्द केला, पण काही जण तरीही प्रवासाला गेले. त्याचा परिणाम म्हणजे केसेस वाढू लागल्या.

मग सरकारने क्वारंटानचे नियम अजून कडक केले. जे विद्यार्थी प्रवास करून आले असतील त्यांनी १४ दिवस घरी रहावे आणि त्यांच्या शिक्षकांनी त्यांना दिवसातून दोन वेळा फोन करून ते नियमाचे पालन करत आहेत ना, याची खात्री आणि नोंद करावी असे नियम लागू झाले. तोच १४ दिवसांचा नियम मोठ्यांना. सुरुवातीला १४ दिवसांची रजा पगारी होती, पण नंतर लोकांना जबाबदारीची जाणीव यावी म्हणून ही रजा त्यांच्या वार्षिक रजेतून घेण्याचा नियम लागू झाला. उत्तम कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, क्वारंटाइनची अंमलबजावणी यामुळे पहिले दोन महिने त्या मानाने केसेस फार वाढल्या नाहीत.

मार्चमध्ये मलेशियाने लॉकडाऊन जाहीर केला. सिंगापूर आणि मलेशियाच्या जोहोर बाहरू शहराला जोडणारा पूल बंद झाला. असे कित्येक परिवार आहेत, जे जोहोर बाहरूमध्ये राहतात आणि सिंगापूरला रोज कामासाठी किंवा शिक्षणासाठी ये-जा करतात. अचानक पूल बंद झाल्याने अशा काही परिवारांची ताटातूट झाली. सिंगापूरमध्ये शेती हा प्रकार नाही. त्यामुळे सर्व वस्तू आयात कराव्या लागतात. अगदी पाणीदेखील मलेशियामधून येते. बाकी किराणा, भाजीपाला वगैरे मलेशियातून येत असल्याने लोकांना भीती वाटू लागली की, आता ग्रोसरी मिळणार नाही. त्यामुळे सुपरमार्केटमध्ये मोठ्या रांगा लावून लोकांनी माल गायब केला.

सरकारने आश्वासन दिले की, भरपूर किराणा माल उपलब्ध आहे तरी लोक बधेनात. मग एका व्यक्तीस एका वेळी दोन नूडलची पाकिटे आणि पाच किलो तांदूळ मिळेल असा नियम करण्यात आला. भारतीय किराणा मालाच्या दुकानदारांनी माल आहे, तो घेऊन जा, पुढचा कधी मिळेल माहीत नाही, असे सांगितले. त्यामुळे डाळी, आटा प्रकार गायब होऊ लागले.

सिंगापूरला मुस्तफा नावाचा एक मेगामॉल आहे, तिथे इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने चांदीपासून ते भारतीय ग्रोसरी, भाज्या सर्व काही मिळते. हा मॉल २४ तास सुरू असतो. त्यामुळे जोवर मुस्तफा सुरू आहे, तोवर भारतीय ग्रोसरीची कोणाला काळजी नसते. पण मुस्तफामध्ये काही केसेस निघाल्यामुळे एक महिनाभर मुस्तफा बंद झाले आणि भारतीयांमध्ये थोडी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. पण तरीही मालाचा अगदी पूर्ण तुटवडा जाणवला नाही.

फेब्रुवारी मार्चमध्ये बाहेरच्या देशात शिकणारे विद्यार्थी परत येऊ लागले. त्यात काही नवीन केसेस निघाल्या. त्यामुळे बाहेरून येणाऱ्यांवर १४ दिवस घरी राहणे बंधनकारक करण्यात आले. उत्तम सरकारी व्यवस्थेमुळे अगदी इटली, इंग्लंड, भारत कॅनडा सर्वत्र लॉकडाऊन सुरू होऊनदेखील सिंगापूरमध्ये जनजीवन सुरळीत सुरू होते. शाळा, कॉलेज, पाळणाघरे, ऑफिसेस सर्व चालू होते. सगळीकडून मित्रपरिवार, नातेवाईक फोन करून आश्चर्य व्यक्त करायचे की, तुमच्याकडे लॉकडाऊन कसा नाही?

सरकारने सर्व नागरिकांना अर्धा लीटर सॅनिटायझर, प्रत्येक घरी चार मास्क फुकट वाटले. फक्त आजारी असाल तरच मास्क वापरा, ट्रेन बसमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळा अशा सूचना असल्याने लोक निर्धास्तपणे वावरत होते.

मात्र एवढे करूनही केसेस कमी होईनात, तेव्हा मात्र सर्किट ब्रेकर सुरू करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आणि ७ एप्रिलपासून सर्किट ब्रेकर सुरू झाले. भाषणात पंतप्रधान म्हणाले, ‘आपल्या पूर्वजांनी युद्ध परिस्थिती, परकीय आक्रमण याचा सामना करत सिंगापूर हा देश दलदलीच्या प्रदेशातून प्रगत देश होण्याचा लढा दिला. करोना हे जागतिक संकट आहे आणि ते नव्या पिढीसाठी आव्हान आहे. पुढची काही वर्षं नवीन घडी बसवण्यात, आर्थिक मंदीमधून बाहेर येण्यात जातील. पण आपल्या पूर्वजांनी जितक्या कठीण परस्थितीचा निकराने सामना केला तसा आपण केला तर आपण सिंगापूरला या परिस्थितीतून नक्कीच बाहेर काढू.’

मग त्यांनी जाहीर केले की, अत्यावश्यक सेवा व खाण्यापिण्याची दुकाने सोडून सर्व मॉल शाळा ऑफिसेस बंद करण्यात येतील. फक्त डॉक्टरकडे किंवा खायला काही आणायचे असेल अथवा व्यायाम करायला बाहेर जायची परवानगी देण्यात आली. मुलांचं इ-लर्निंग सुरू झाले. आमच्या घरी मी लेक्चरर, नवरा आर्किटेक्ट. त्यामुळे चार खोल्यांमध्ये चार जण दिवसभर आपापल्या लॅपटॉपशी बोलण्याचा कार्यक्रम सुरू झाला. मात्र काही घरात मुले जास्त आणि एकच लॅपटॉप असल्याने थोडी अडचण भासू लागली.

सिंगापूरमध्ये मदतनीस असेल तर निवासी असल्याने ज्यांच्या घरी मदतनीस आहे, त्यांना थोडा दिलासा मिळाला. ज्यांच्याकडे नाही त्यांच्यावर आधी असलेला ताण अजून थोडा वाढला. इथे जास्त करून घरी स्वयंपाक न करणे अशी पद्धत असल्याने सर्किट ब्रेकरमध्ये नवीन प्रश्न निर्माण झाला. लोक सकाळचा चहादेखील बाहेरून विकत आणतात आणि आता बाहेर बसून खाण्यास बंदी असल्याने सर्व काही घरी आणून खायचे असल्याने प्लास्टिकचा कचरा वाढू लागला. मग लोकांनी घरून रिकामा डबा आणून त्यात पार्सल न्यावे या कल्पनेला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला.

सिंगापूर हे टुरिस्ट ठिकाण असल्याने हॉटेल्स, टॅक्सी रेस्टॉरंट यांना सर्वांत मोठा फटका बसला. टॅक्सीवाल्यांना थोडी मदत म्हणून ऑनलाईन फूड/ ग्रोसरी डिलिव्हरी करण्याची परवानगी मिळाली. त्यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळाला. हॉटेलमध्ये बाहेरून येणाऱ्यांच्या क्वारंटाइनची सोय केल्याने त्यांना थोडा हातभार लागला. स्वतःचा लहान व्यवसाय करणाऱ्यांना, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या अशांना सरकारने पुढचे तीन महिने आर्थिक मदत जाहीर केली. स्वयंसेवी संघटनांनी एकटे राहणाऱ्या वृद्ध लोकांना रोज खाद्यपदार्थ पोहचवण्याची जबाबदारी उचलली.

आणि अशातच इथल्या स्थलांतरित कामगारांच्या डॉर्मिटरीमध्ये केसेस व्हायला सुरुवात झाली. अशा डॉर्मिटरी जरी मुख्य वस्तीपासून दूर असल्या तरी तिथे एकेका खोलीत ८-१० जण राहत असल्याने केसेस भराभर वाढू लागल्या. रोज ८००-१००० केसेस. मग इथल्या मोठ्या एक्झिबिशन हॉलमध्ये पार्टिशन लावून त्यांची व्यवस्था करण्यात आली. इथे बांगलादेशचे बरेच कामगार आहेत. त्यांना भाषेचा प्रश्न येऊ लागला. मग ज्यांना बंगाली भाषा येते, त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मदत करावी असे आवाहन करण्यात आले. त्यांना खाद्यपदार्थ पेय, औषधे इत्यादी उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवी संघटना पुढे आल्या. सुमारे २०,००० कामगारांना रोज खाण्याचे डबे पोहोचवणे, त्यांच्या तपासण्या करून जे बरे आहेत, त्यांना रुग्णांपासून बाजूला करणे, हे कार्य सुरू झाले.

सामान्य लोकांना कायम शनिवार-रविवार मॉल किंवा पार्कमध्ये फिरायला जाणे, बाहेर खाणे याची सवय आहे. त्यावर बंधने आली. त्यामुळे आता बाहेर चालायला, फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आता व्यायामाला किंवा मार्केटला ‘एकट्याने जा’ असा नियम आला आहे. सुपरमार्केटची गर्दी कमी करण्यासाठी ओळखपत्राचा शेवटचा अंक विषम असेल त्यांनी विषम तारखेला जायचे आणि सम असेल त्यांनी सम तारखेला जायचा नियम आहे. दारातच ओळखपत्र स्कॅन करण्यात येते. त्यामुळे गर्दीला आळा घातला जातोय.

आता सर्किट ब्रेकर १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. एकीकडे घरी राहण्याची सवय नसल्याने आलेला कंटाळा घालवायला नवनवीन पदार्थ करणे, जुन्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांशी व्हिडिओ कॉल, घरच्या मंडळींबरोबर सिनेमा पाहणे, पत्ते खेळणे, गाणी म्हणणे यात एक नवीन लॉकडाऊन रुटीन सुरू झाले. सकाळी लवकर उठून ट्रेन गाठायची गडबड संपली. वीकडेमध्येदेखील सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण सगळे एकत्र करता येऊ लागले.

संध्याकाळी लॅपटॉप मिटला की काम संपले, पुन्हा तो परतीचा ट्रेनचा प्रवास संपला. संध्याकाळी आभाळ भरून आलेले बघत निवांतपणे चहाचे घोट घेण्यातली मज्जा अनुभवता येऊ लागली. आयुष्यातली धावपळ कमी झाल्यामुळे रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घेता येऊ लागला. करोनाचे हे आपल्यावर झालेले उपकारच म्हणायला हवे. अमोल पालेकरच्या सिनेमात एक गाणे आहे, ‘थोडा है थोडे की जरूरत है। जिंदगी फिर भी यहाँ खूबसूरत है’ याची प्रचिती आली. पुढेमागे जनजीवन मूळपदावर येईल, पण या घटनेची इतिहासात नोंद होईल हे निश्चित! आणि आपण आपल्या नातवंडांना सांगू ‘हो, आम्ही करोनाचा लॉकडाऊन प्रत्यक्ष अनुभवला’!

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......