अजूनकाही
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दादागिरी पाकिस्तान अजिबात सहन करणार नाही; मोदींचा पाकिस्तानविरोध हा केवळ निवडणुकांपुरता मर्यादित आहे. निवडणुका आटोपल्या की, त्यांचा हा विरोधसुद्धा मावळेल. : पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार सचिव सरताज अझीझ.
अझीझभौ, तुम्ही तर टॉपमोस्ट सिक्रेटच सांगून टाकलंत राव! ही ट्रिक समजण्यासाठी तुम्हाला भारताकडे पाहण्याची गरज काय? तुमच्याकडचे लष्करी उच्चाधिकारी आणि राजकीय नेतेही तिकडे परिस्थिती बिघडली की, लोकांचं लक्ष विचलित करायला भारताविरुद्ध गरळ ओकायला सुरुवात करतात, तीही त्यासाठीच.
…………………………………………..
२. तरुणाईला ‘सैराट’ वेड लावणारी आर्ची आणि परशा यांची जोडी राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करणार आहे. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे दोघे राज्य निवडणूक आयोगाचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बनले असून ते निवडणूक आयोगाच्या पोस्टरवर झळकले आहेत.
मतदानाच्या दिवशी 'सैराट'चा शो ठेवू नका टीव्हीवर म्हणजे झालं. नाहीतर सगळंच मुसळ केरात जाईल. आता या निवडणुकीत हरलेले उमेदवार म्हणतील, 'आर्ची बसली अन् फांदी मोडली'!
…………………………………………..
३. विविध धर्म, महिला आणि अमेरिकेतल्या स्थलांतरितांच्या विरोधात गरळ ओकणारे डोनाल्ड ट्रम्प २० जानेवारीला अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर आपल्याला देश सोडून जावं लागेल का, असं माझी मुलं विचारतायत. ती खूप घाबरली आहेत. : भारतीय वंशाच्या अमेरिकेच्या सहाय्यक परराष्ट्र मंत्री निशा देसाई-बिस्वाल (यांची नियुक्ती अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली होती. त्या २० जानेवारीला पायउतार होतील.)
अमेरिकन ट्रोलभैरवांनी त्यांचा वंश, धर्म, जात वगैरेंचा अश्लाघ्य भाषेत उद्धार करून त्यांना सहकुटुंब पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला नाही का अजून? की त्यांच्याकडे 'देशद्रोह्यां'ना क्यूबाला पाठवण्याची पद्धत आहे?
…………………………………………..
४. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणीच्या खटल्यातून सबळ पुराव्याअभावी सलमान खानची निर्दोष मुक्तता.
ये बेचारा, शूटिंग के बोझ का मारा, इसे चाहिए जंगल का टॉनिक चिंकारा, अशी जाहिरात वाचल्यामुळे त्याचा गैरसमज झाला, असं न्यायाधिशांनी सांगितलं की नाही निकाल देताना?
…………………………………………..
५. अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या सेक्स टेपवरून सुरू झालेल्या विवादाविषयी बोलताना पुतीन यांनी ट्रम्प यांच्यावरचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून रशियातील सेक्स वर्कर्स जगात सर्वोत्कृष्ट असल्याचं सांगितलं.
रशियाचे अध्यक्ष अनुभवी दिसतात. बाकी या विधानात ट्रम्प यांना हिंदी सिनेमातल्या 'लॉयन'च्या स्टायलीत दिलेली गर्भित धमकीच दिसते आहे. ट्रम्पही अनुभवी आहेतच. यांच्या अनुभवांची त्यांना माहिती आहेसे दिसते.
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment