या दशकातला, या आधीचा कुठला असा अनुभव असेल ज्याने सर्व देशांना, जाती-धर्मांना असं एकत्र येऊन विचार करण्यावर मजबूर केलं असेल?
पडघम - विदेशनामा
हिमाली कोकाटे, लंडन, इंग्लंड
  • इंग्लंडमधील लॉकडाउन
  • Sat , 23 May 2020
  • पडघम विदेशनामा करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

करोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाउन आहे. वेगवेगळ्या देशातल्या लॉकडाउनविषयीच्या दहा प्रातिनिधिक लेखांचा ‘देशोदेशीचे लॉकडाउन’ हा विशेषांक आज प्रकाशित करत आहोत. ही संपूर्ण कल्पना पत्रकार, ब्लॉगलेखिका सायली राजाध्यक्ष यांची. त्यांनी त्यांच्या ‘साडी आणि बरंच काही. Sarees and Other Stories’ या लोकप्रिय फेसबुक पेजवर गेले काही दिवस सातत्याने वेगवेगळ्या देशांतल्या मराठी भाषिकांशी संपर्क साधून त्यांना त्यांचे अनुभव लिहायला सांगितले. १० मे पासून त्यांनी त्यांच्या पेजवर ते अनुभव प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. त्यातील काही निवडक लेख त्यांच्या पूर्वपरवानगीने येथे प्रकाशित करत आहोत. या विशेषांकातून वेगवेगळ्या देशांतल्या लॉकडाउनचे स्वरूप, प्रकार यांची तोंडओळख व्हावी ही अपेक्षा आहे.

..................................................................................................................................................................

मी २०१४ मध्ये लंडनला कामानिमित्त आले. लंडन शहरापासून १५ मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या ईस्ट फिंचलेमध्ये राहते. मी राहते ते एक दुमजली, सहा बेडरूम्सचं घर आहे. त्यातली एक १५x१५ची बेडरूम, त्याला जोडून एक वॉशरूम हे माझं कुंपण. किचन मी आणि २ मुली शेअर करतो.

११ मार्चच्या संध्याकाळी मी घरी परतले तीच अंगदुखी घेऊन. दुसऱ्या दिवशी सकाळी अंग तापाने फणफणलं होतं. तोपर्यंत करोना जगभरात पसरतोय हे माहीत होतं, पण इंग्लंड शांत होतं. मी अंडरग्राऊंडने प्रवास करत असल्याने लगेच GPला कॉल केला. त्यांनी दवाखान्यात येऊ नका सांगितलं आणि NHSचा नंबर दिला. तिथून ज्या सूचना मिळाल्या त्यांचं पालन करत गेले. ऑफिसमध्ये क्लायंटस आणि HRला सांगितलं. लगेचच त्यांनी माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मेसेजस पाठवले आणि १२ मार्चपासून माझं १४ दिवसांचं स्व-विलगीकरण सुरू झालं. योगायोग म्हणजे ११ मार्चलाच इंग्लंड सरकारने करोनाला पहिल्यांदाच ‘महामारी’ घोषित केलं.

करोनाची टाइमलाईन पहिली तर WHOने ३० जानेवारीलाच ‘पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न’ जाहीर केली होती. इंग्लंडची पहिली केस २८ फेब्रुवारीला आली. ब्रिटिश स्वभावाला अनुसरून सरकार सावधानतेने मार्गदर्शक सूचना करत राहिलं आणि लोक त्याला नजरअंदाज. अशा काळात सामान्य जनता, व्यावसायिक हे सरकारकडे पुढच्या उपाययोजनांसाठी फार आशेने पाहत असतात, पण याच वेळी सरकारच्याच वेगवेगळ्या गटांमध्ये एकजूट नव्हती, हे दिसून आलं.

इथले वैज्ञानिक १ मार्चच्या आधीपासूनच लॉकडाउनची मागणी करत होते, पण ‘हर्ड इम्युनिटी’च्या नादापायी सरकारने लॉकडाउन जाहीर करण्यात विलंब केला. शेवटी याचं एक गणितीय मॉडेल बनवून त्याची इटलीशी तुलना केल्यावर हर्ड इम्युनिटी विकसित होईपर्यंत कमीत कमी ५,००,००० माणसं मरतील हे पुढे आल्यावर सरकारचं धाबं दणाणलं. हे इथल्या वृत्तपत्रांत छापून आल्यावर जनतेचा संयम सुटला. लॉकडाउन काही आता टळत नाही, हे पाहता लोकांनी ‘पॅनिक बाईंग’ चालू केलं. एका रात्रीत सुपर मार्केटचे शेल्व्हस रिकामे पडले.

शेवटी २० मार्चला शाळा बंद झाल्या. २३ मार्चपासून जीवनावश्यक सुविधा सोडून सर्व दुकानं बंद झाली. ३० जानेवारी ते २३ मार्चमधले ७ आठवडे सरकारने आपल्या संदिग्धतेमुळे गमावले, यावरून सरकारवर खूप टीका झाली. २७ मार्चच्या आसपास इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्रिटिश गादीचे वारसदार चार्ल्स यांनाही करोनाची लागण झालीये, हे कळल्यावर या टीकेचा सूर थोडा सौम्य झाला.

प्रत्येक देशात करोनाचे केंद्रबिंदू असतात. लंडनचा हिथ्रो विमानतळ हा शहरी हद्दीतील जगातला सगळ्यात व्यस्त विमानतळ. इथं दिवसाला २,०५,००० हून जास्त लोकं ये-जा करतात. असं असताना लंडन शहर या महामारीचा केंद्रबिंदू बनलं नसतं तरच आश्चर्य वाटलं असतं. असं असूनही काही गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटतात. आपण लॉकडाउन आणि कर्फ्यू यात गल्लत करतो. भारतात कर्फ्यू आहे, नागरिक जर रस्त्यावर बाहेर पडले तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. सार्वजनिक वाहूतक पूर्णपणे बंद आहे. लंडनमध्ये सार्वजनिक वाहूतक अजूनही चालू आहे. लंडनची ओळख असणाऱ्या लाल डबलडेकर बसेस, जाळ्यासारखी पसरलेली अंडरग्राऊंड रेल्वे बिनबोभाट चालू आहे.

इंग्लंडतल्या प्रवाशांना बऱ्याच देशांनी आत येण्यासाठी मज्जाव केला असला तरी देशांतर्गत असं काहीही नाहीये. एकंदरच प्रवाशी कमी झाले असले तरी त्या सुविधा बंद नाहीत. एक प्रकारे स्वतःच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारने जनतेवर सोडलीये. अनावश्यक कारणांसाठी घराबाहेर पडू नका, हे सरकार वारंवार सांगतंय, पण इथले पोलीस लोकांना लाठ्यांनी मारणं तर सोडाच, पण हातही लावू शकत नाहीत. सुपर मार्केटमध्ये आलेल्या लोकांचे कार्ट्स चेक करू म्हणून सांगणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात आलंय. जनता पॅनिक मोडवर असल्याने त्यांच्याशी अधिक सहानुभूतीने वागलं पाहिजे, याचं ट्रेनिंग पोलिसांना देण्यात येतंय.

एकदा लॉकडाउन जाहीर झाल्यानंतरचा सरकारचा अॅक्शन प्लॅन हा ‘देर आये दुरुस्त आये’ असाच होता. सरकारने तातडीनं ‘करोना व्हायरस अॅक्ट २०२०’ मंजूर करून घेतला. या कायद्याअंतर्गत सरकारने बरेच अधिनियम बनवले ज्याचा फायदा भाडेकरू, इमर्जन्सी स्वयंसेवक यांना झाला. करोनामुळे छोट्या, स्वतंत्र व्यवसायिकांचं, भाडेतत्त्वावर काम करणाऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय हे पाहता सरकारने जॉब रिटेन्शन आणि फरलो (Furlough) योजना अमलात आणली. जे व्यावसायिक किंवा कंपन्या यात कव्हर होतात त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांचे ८० टक्के वेतन (२,५०० पौंडापर्यंत दरव्यक्तीमागे) सरकार देतंय. करोनाचा ‘वैधानिक आजार भत्त्या’ (Statutory Sick Pay) मध्ये समावेश करून जनतेला खूप मोठा दिलासा दिलाय. यामुळे करोना किंवा करोनासदृश लक्षणांमुळे रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांचं वेतन कंपनीला देणं भाग आहे. याने होणारं नुकसान पूर्णपणे टाळता येणार नाहीये, पण त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला कमी बसावा यासाठी प्रयत्न आहेत. याची गरज किती होती हे यावरून स्पष्ट होतंय की, या योजनेच्या पहिल्याच दिवशी १,४०,००० कंपन्यांनी याचा फायदा घेण्यास सुरुवात केली.

याचा अर्थ सर्व व्यवस्थित आहे असं नाही. NHSवर आलेला दबाव लक्षणीय आहे. आपल्यासारखं एका तासात २० पेशंट्स हा प्रकार इथे नसतो. हॉस्पिटल दुधडी भरून वाहताहेत असं सरकारी हॉस्पिटल्समधेही फार क्वचित दिसतं. नॉर्मल दिवशी A&E मध्ये गेलात की, अगदी प्राणघातक परिस्थिती नसेल तर चार-पाच तास वेटिंग रूममध्ये काढावेच लागतात, कारण प्रत्येक गोष्टीचे प्रोटोकॉल्स पाळले जातात. हे सगळं पाहता रोज ६०००-७००० नवीन केसेसची नोंद होत असताना या हॉस्पिटल्सचं काय झालं असेल याची कल्पना करवत नाही.

इथल्या नर्सेस आणि डॉक्टर्सना PPE मिळत नव्हते, त्यावरून आंदोलनंही झाली, पण त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली. याच वेळी रिटायर झालेल्या नर्सेस आणि डॉक्टर्सना परत एकदा कामावर येण्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सेनेच्या तुकड्यांनी NHS अॅम्बुलन्सचा ताबा घेतला. लंडनच्या Excel सेंटर मध्ये ४००० खाटांचं ‘NHS Nightingale Hospital’ उभारण्यात आलं. याचसारखी हॉस्पिटल्स बर्मिंगहम, हॅरोगेट, मँचेस्टर आणि ब्रिस्टॉलमध्ये उभारण्याचे प्लॅन्स होते, पण या भव्यदिव्य अशा हॉस्पिटलमध्ये फक्त ५४ केसेस भरती झाल्या. आठवड्याला १० लक्ष पौंड खर्च असणारं हे हॉस्पिटल फार परिणामक ठरलं नाही आणि ३ एप्रिलला गाज्यावाज्यासहित उघडलेलं हे हॉस्पिटल सरकारने मेच्या दुसऱ्या आठवड्यात बंद करण्याचा निर्णय घेतला.

इथल्या जनतेचा प्रतिसाद पाहता त्यांचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. लोक स्वतःहून ‘सोशल डिस्टिंसिंग’ पळताहेत. मग ते पार्कमध्ये व्यायाम करताना असो किंवा दुकानांबाहेर लागलेल्या रांगा असो. दुकानात शिरतेवेळी आणि तिथून निघतेवेळी दुकानाच्या स्टाफला ‘थँक यू’ म्हणणं हे आधीपासूनच होतं, पण आता रांगेत उभ्याउभ्या त्यांच्याशी गप्पा मारल्या जातात आणि अशा वेळी काम केल्याबद्दल मनापासून धन्यवाद दिले जातायेत. तुम्ही NHS वर्कर असाल तर तुमचं कार्ड दाखवल्यावर तुम्हाला दुकानांत बिनरांगेचा प्रवेश आहे. टेस्कोसारख्या जायन्ट चेनने तर NHS वर्कर्ससाठी वेगळे तास ठेवलेत. तसंच वयोवृद्धांसाठीही वेगळे दिवस आणि तास निर्धारित आहेत. सुरुवातीचं ‘पॅनिक बाईंग’ बघता बऱ्याच गोष्टींवर दोन परमाणशी असे निर्बंध सध्या आहेत, पण त्यावरून बाचाबाची होतेय असं पाहिलं नाहीये.

शाळा बंद झाल्यावर एका आठवड्यात ऑनलाईन क्लासेस चालू झाले. अगदी स्विमिंग सोडलं तर बाकी सर्व अतिरिक्त अभ्यासक्रम सुरू आहेत. ज्यांना लहान मुलं आहेत त्यांच्या पालकांसाठी कामाचे तास मर्यादित करण्यात आलेत. बरीचशी व्हाईट कॉलर जनता ‘वर्क फ्रॉम होम’ला सरावलीये. अर्थात हे सर्व इथे शक्य आहे कारण घराघरात कॉम्प्युटर्स असणं, अमर्यादित वाय-फाय असणं हे खूप सामान्य आहे. विकसित आणि विकसनशील देशांतील फरक इथे मोठ्या प्रकर्षाने जाणवतो.

इथल्या वयोवृद्धांवर येणारी बंधनं वाढलीत. NHSच्या डेटाबेसमध्ये नोंदणी असणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला वेगळ्या सूचना मिळतात. प्रत्येकाला भेट देणं शक्य नसलं तरी सर्वांची नियमितपणे फोनवरून तपासणी होतेय. प्रायव्हेट डॉक्टर्स आणि नर्सेसना आपापल्या सर्जरी (क्लिनिक) साठी हे करणं अनिवार्य आहे. इथं मुळातच एकत्र कुटुंबव्यवस्था नाही. आई-वडील आणि सासू-सासरे हे दूरची फॅमिली मानली जातात. त्यामुळे गाठीभेटी ठरवून होतात. संडे रोस्ट हा धमाल आठवड्याचा, महिन्याचा प्रोग्रॅम असतो. ते सर्व आता बंद आहे. फोनवरून होणारी चौकशी हाच एक पर्याय. त्यात नुकताच ईस्टर होऊन गेलाय. या रविवारी मदर्स डे आहे. यावेळी बरीच कुटुंब एकत्र येतात, पण या बाबतीतही इथल्या लोकांनी खूप शिस्त पाळलीये.

माझ्या शेजारी राहणाऱ्या आजीबाईंना भेटायला त्यांचे नातू येतात, पण रस्त्याच्या कडेला गाडी लावून तिच्याशी गप्पा मारतात आणि निघून जातात. आपल्याला हे थोडं विचित्र वाटतं, पण त्यांच्यासाठी ही कुटुंबव्यवस्था नॉर्मल आहे. याचमुळे इथले ज्येष्ठ नागरिक हे बऱ्यापैकी स्वतंत्र असतात. त्यांच्यासाठीच्या सुविधाही खूप जास्त असतात. त्याच सुविधांना आता थोडं जास्त काम करावं लागतंय एवढंच.

‘सोशल डिस्टंसिंग’चे मानसिक परिणाम वेळीच ओळखून त्याबद्दलची खबरदारी घेणं हे इथल्या व्यवस्थेचं खरं यश. आमच्या बार्नेट बरोमध्ये ‘Let’s Talk’ हा उपक्रम राबवण्यात येतोय. तुम्हाला नैराश्य आलं असेल, चिंता वाटत असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल केला की, समोरच्याशी बोलता येतं. कधीकधी बऱ्याच गोष्टी असतात, ज्या आपण आपल्या कुटुंबियांनाही सांगत नाही, त्या इथं बोलू शकता. अशा परिस्थितीत केल्या जाणाऱ्या समुपदेशनामध्ये प्रशिक्षित असणारी ही माणसं हळुवारपणे तुमच्याशी गप्पा मारतात. इथं वेळेचं आणि विषयाचं बंधन नाहीये.

राहता राहिली माझी गोष्ट तर मला झालेला सिझनल फ्लू होता की, Covid हे मला अजूनही माहीत नाही. मी आजारी पडल्यावर करोना टेस्ट करू का, हे NHSला विचारल्यावर नकारघंटाच ऐकली. नंतर वाढणारे नंबर पाहता एकच सही पण आपली टेस्ट गरजेची नाही हेच वाटत गेलं.

माझी फ्लूची लक्षणं सात दिवस टिकली. सुरुवातीचे २ दिवस मी १२ तास काम करत होते. आपण लॉकडाउनमध्ये जातोय, पूर्ण टीमला (इंग्लंड आणि भारत) घरून काम करायचं आहे, हे कळल्यावर माझ्या कंपनीने BCP (Business Continuity Plan) कार्यान्वित केलाय.

माझा मॅनेजर याच काळात कौटुंबिक कारणांमुळे भारतात जाऊन तिथेच अडकला होता. त्यामुळे ५०-५५ लोक असलेल्या टीमसाठी हे प्लॅन्स करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. अंगात १०१चा ताप, खरखरणाऱ्या रेडिओसारखा आवाज, सतत दुखणारं डोकं अशा परिस्थितीत टीमला घेऊन तो प्लॅन बनवला आणि मगच सुट्टीवर गेले.

त्यानंतरचे पाच दिवस मला आठवतही नाहीत. दिवस केव्हा उगवला आणि मावळला याची शुद्ध नसायची. मी फोन वर दर दोन तासांचे अलार्म लावून ठेवले होते. उठून स्वतःचं टेम्परेचर घ्यायचं, डायरीत नोंदवून ठेवायचं, औषध म्हणून पॅरासिटॅमॉलची गोळी घ्यायची आणि त्यातून आलेल्या ग्लानीत पडून राहायचं. झोप यायची नाही पण डोळे उघडले तरी त्रास व्हायचा. हातपाय वळायचे. कोणीतरी पाय दाबून द्यावे असं वाटलं की, स्वतः थोडं तेल लावून मालिश करायची. दर दोन दिवसांनी गरम पाण्यात स्वच्छ कपडा टाकून अंग पुसून घ्यायचं.

फ्रिझरमध्ये अन्न साठवून ठेवून खाण्याला सरळ आळशीपणा म्हणतो आपण, पण या दिवसात मी बनवून ठेवलेलं हे अन्नच माझ्या कामी आलं. ते आणण्यासाठी खाली जाण्यापूर्वी मी घरातल्या बाकी सर्वांना मेसेजस करायचे. त्यांनी स्वतःला त्यांच्या खोल्यात डांबून घेतलं की, मग मी खाली जायचे. फ्रीझरमधून खरं तर अन्न एक-अर्धा दिवस आधी काढून ठेवावं लागतं, पण तसं करायची सोय नसल्याने मग मायक्रोवेव्हमध्ये डबल पॉवरने गरम करायचे. यासाठी १०-१५ मिनिटांहून जास्त वेळ लागायचा नाही, पण तेवढा वेळही उभं राहता येत नव्हतं. सर्व झाल्यावर मग जिथेजिथे स्पर्श केला असेल तिथे डिसइन्फेक्टन्ट टाकून ते साफ करून घ्यायचं जेणेकरून बरोबरच्या दोन मुलींना ते किचन वापरता यावं. हे करून वर येईपर्यंत मला धाप लागायची आणि जेवणावरची इच्छा मरून जायची.

चार दिवसांनी हे सगळं अन्न संपलं, अॅमेझॉन, टेस्को, वैट्रोज सगळ्यांचे डिलिव्हरी स्पॉट्स बंद झाले होते. कसाबसा एक स्पॉट मिळाला त्यातच जे मिळेल ते सामान मागवून घेतलं. ती डिलिव्हरी येईपर्यंत एक दिवस मॅगीवर ढकलला. हे सर्व इतक्या विस्ताराने सांगण्यामागचा उद्देश्य हा सहानुभूती मिळावी असा मुळीच नाहीये. पण मी गेली ९ वर्षं परदेशात एकटी राहतेय, त्यामागची कारणं मला सांगायची नाहीयेत, पण इतकी वर्षं मी खूप हेटाळणीचे सूर ऐकलेत. अगदी ‘तू काय बाबा डॉलर्स/पौंड्स छापतेस’पासून ‘परदेशातल्या सगळ्या लोकांची चंगळ असते’ इथपर्यंत. यासाठी परदेशस्थ लोक कुठल्या गोष्टींचा सामना करतात, हे फार कमी लोकांना माहित असतं.

एरवी एकटं राहणं वेगळं आणि तब्येत खालावलेली असताना एकटं राहणं आणि ही गोष्ट भारतात असणाऱ्या आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना कळू नये याची काळजी घेणं या वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही खोऱ्याने पैसा कमावला तरी अशा वेळी येणारं नैराश्य आणि त्यातून होणारा चिडचिडेपणा हा त्यांनाच कळू शकतो ज्यांनी हे भोगलंय.

माझे आई-वडील मुंबईत राहतात. दोघांनी सत्तरी ओलांडलीये. आईला गेल्या आठ वर्षांपासून chronic depression आहे. तिची औषधं एरवीही खूप रेग्युलेटेड असतात. लॉकडाउनच्या काळात तिच्या औषधांत जर खंड पडला तर होणारे दुष्परिणाम महाभयानक असतील. माझ्या बाबांचं एक वर्षांपूर्वी पोटाचं मोठं ऑपेरेशन झालंय. ते बाहेरचं खाऊ शकत नाहीत आणि घरी आई काही बनवू शकत नाही. लॉकडाउनमुळे घरी येणारी स्वयंपाकाची बाई दोन महिने बंद आहे. बहिणीच्या कंपनीत ले-ऑफ्स झालेत. त्यामुळे कंपनी सांगेल ती १४-१६ तासांची शिफ्ट तिला घरून करावी लागतेय. आई-बाबांकडे दर मिनिटाला लक्ष देणं तिलाही जमत नाहीये. आजूबाजूच्या प्रेमळ शेजाऱ्यांवरच आता भिस्त आहे. देव न करो पण माझ्या आईवडिलांना काही झालंच तर मला वेळेत भारतात परतताही येणार नाही याचा विचार करून डोक्याचा भुगा होतो. अशा वेळी आपण आपल्या पालकांसोबत नसण्याच्या गिल्टचं वजन खूप जास्त आहे आणि हे सर्व चालू असतानाच रोजचं काम आहेच.

प्रोजेक्ट्स एक एक करून बंद होताहेत. २०१४ ला सात लोकांबरोबर चालू केलेला हा अकाउंट, गेल्या पाच वर्षांत दिवसरात्र मेहनत करून ५५ पर्यंत वाढवला. आता एका महिन्यात ही संख्या २०वर आलीये. बरोबरच्या लोकांना इंडियाला परत पाठवण्याचे प्लॅन्स बनवावे लागताहेत. यातले बरेच इथं एकटे राहताहेत, इथं येताना त्यांनी स्वतःसाठी आर्थिक ध्येयं डोळ्यासमोर ठेवली असतील. त्यांना कोरड्या आवाजात ही बातमी देताना आपलंच मन आपल्याला खात असतं. बातमी कळताच त्यांचा लहान झालेला आवाज, त्यांनी अजून काही करता येईल का म्हणून काकुळतीने विचारलेले प्रश्न हे गळ्यात येणाऱ्या आवंढ्याबरोबर गिळावे लागतात.

भारतात खूप मिडल मॅनेजमेंटच्या लोकांना बेंचवर टाकलंय. टीमलीडपासून मॅनेजर्सपर्यंतचे हे पोरंबाळं असणारे लोक वीकेंडला कॉल करून ‘जॉब तरी राहील ना ग’ हा प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांना धीर कुठल्या तोंडाने द्यायचा कळत नाही. यातल्या बऱ्याच जणांचे जॉब्स जाणार आहेत, हे दिसतंय. त्यांचा कॉल संपला की काही वेळ काहीच सुचत नाही. मी आणि माझ्या मॅनेजरने या पोर्टफोलिओला एखाद्या बाळासारखं जपलंय, वाढवलंय. प्रसंगी भांडलोय पण या पोर्टफोलिओसाठी पर्सनल आयुष्याची काही वर्षं गमावलीत.

तो सुट्टीवरून दोन महिन्यानंतर स्वतःच्या आयुष्यातली वादळं झेलून आलाय. त्याला ’७० टक्के टीम कमी केलीये’ हे सांगताना माझा थरथरलेला आवाज त्याने ऐकला असावा, कारण तो शांत राहिला. मी नसताना तू या पोर्टफोलिओचं वाट्टोळं केलंस असं तो ओरडला असता तर ते याहून बरं झालं असतं. तुमच्यापैकी जे नोकरीला फक्त एक नोकरी मानता त्यांना हे अतिरंजित वाटेल, पण आम्हा दोघांची गेली पाच-सहा वर्षं खत-पाणी घालून वाढवलेल्या रोपट्याच्या मुळावर घाव घालताना एखाद्याला वाटावं अशी अवस्था आहे.

हे असं असूनही माझा त्रास हा मुंबईत अडकलेल्या परप्रांतीयांपेक्षा मोठा आहे असं मी म्हणणार नाही, पण फक्त मी विकसित, श्रीमंत देशात राहतेय म्हणून माझं दुःख कमी आहे असंही नाहीये. औरंगाबाद प्रकरण मला फेसबुकवरूनच कळलं. रुळावर पडलेले ते मृतदेह पाहून अंगावर काटा आला आणि त्याच पोष्टीच्या कमेंट सेक्शनमध्ये सो-कॉल्ड सुशिक्षितांनी परदेशातून भारतीय नागरिकांना परत आणण्याच्या योजनेवर ताशेरे ओढले होते, ते वाचून मला जितकं हतबल वाटलंय ते मी शब्दात सांगू शकत नाही. परदेशांत राहणाऱ्यांचे चॅलेंजेस खूप वेगळे असतात आणि प्रत्येकाकडे परत येण्याचा मार्ग असेलच असं नाही. आमचे पाय उन्हात पोळत नसतील खरे, पण मनाला लागणारे चटके कोणाला दाखवताही येत नाहीत. I am very sorely aware of my privilege and feeling guilty for it is the punishment i have sadly come to accept!

मला नॉर्मल व्हायला दोन आठवडे लागले. पण माझं १४ दिवसांचं सेल्फ आयसोलेशन पूर्ण व्हायच्या आधीच मी घरातून काम करायला सुरुवात केली होती. गेले ८आठ आठवडे मी घरातून काम करतेय आणि माझे कामाबाबतीचे काही संभ्रम दूर झालेत. १४-१६ तास काम करण्याच्या माझ्या सवयीसाठी मी नेहमी माझ्या टाइम मॅनॅजमेण्ट स्किलला दोष दिलाय, पण तेवढंच काम घरून मी आरामात सात-आठ तासात संपवू शकतेय. माझे खरे डिस्ट्रक्शन कुठे आहे हे मला कळलंय आणि याचा फायदा मला आयुष्यभर होईल. विचार करून वेड लागेल असं वाटलं की, मी माझ्या क्रोशेच्या सुया किंवा रंग उचलते. आठवड्यातून तीन-चारदा टेक-अवे मागवणारी मी आता रोज शहाण्या बाळासारखं गरमा-गरम जेवण जेवतेय.

इंग्लंडमध्ये अजूनही लॉकडाऊनमधून बाहेर पाडण्याचे प्लॅन्स नाहीत. काही मोठ्या कंपन्या ट्रायल बेसिसवर दुकानं उघडू पाहताहेत. ऑफिसेस कधी उघडतील याचा पत्ता नाही. भारतातल्या आयटी सेक्टरवर याचा दूरगामी परिणाम होणार आहे, कारण ‘वर्क फ्रॉम होम’मुळे आता ऑफशोर अकाउंट्सची संख्या वाढेल. जर इंग्लंडत बसून तुम्ही रिमोटली काम करू शकत असाल तर ते भारतातून का नाही होऊ शकणार, हे पटवताना आम्हा आयटी मॅनेजर्सची फेफे उडणार आहे. टेली-कम्युटिंगसाठी आता सुगीचे दिवस येतील. रोज सगळ्यांनी ऑफिसला हजेरी लावण्याऐवजी, नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करून देऊन लोकांना घरूनच काम करण्याची मुभा देता येऊ शकेल.

या आधी जर जग खूप जवळ आलंय असं तुम्हाला वाटत असेल तर या करोनाने त्यावरही कडी केलीये.

या दशकातला, या आधीचा कुठला असा अनुभव असेल ज्याने सर्व देशांना, जाती-धर्मांना असं एकत्र येऊन विचार करण्यावर मजबूर केलं असेल? म्हणूनच हे सहा महिने-वर्ष हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिलंच, पण यातून जे काही भलेबुरे दूरदर्शी परिणाम होतील, ते यापुढच्या पिढ्याही आठवतील.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......