अजूनकाही
करोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाउन आहे. वेगवेगळ्या देशातल्या लॉकडाउनविषयीच्या दहा प्रातिनिधिक लेखांचा ‘देशोदेशीचे लॉकडाउन’ हा विशेषांक आज प्रकाशित करत आहोत. ही संपूर्ण कल्पना पत्रकार, ब्लॉगलेखिका सायली राजाध्यक्ष यांची. त्यांनी त्यांच्या ‘साडी आणि बरंच काही. Sarees and Other Stories’ या लोकप्रिय फेसबुक पेजवर गेले काही दिवस सातत्याने वेगवेगळ्या देशांतल्या मराठी भाषिकांशी संपर्क साधून त्यांना त्यांचे अनुभव लिहायला सांगितले. १० मे पासून त्यांनी त्यांच्या पेजवर ते अनुभव प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. त्यातील काही निवडक लेख त्यांच्या पूर्वपरवानगीने येथे प्रकाशित करत आहोत. या विशेषांकातून वेगवेगळ्या देशांतल्या लॉकडाउनचे स्वरूप, प्रकार यांची तोंडओळख व्हावी ही अपेक्षा आहे.
..................................................................................................................................................................
मी फ्रान्समध्ये २०११ साली डॉक्टरेट करायला आले, पॅरिसच्या आणि फ्रान्सच्या प्रेमात पडले आणि गेली ९ वर्षे इथेच राहते आहे. सध्या पाश्चर इन्स्टिट्यूयूटमध्ये इम्युनॉलॉजीमध्ये पोस्टडॉक्टरल रिसर्च करते आहे.
फ्रान्समध्ये १७ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं होतं, ते ११ मेपासून हळूहळू शिथिल करायला सुरुवात झाली आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या परिस्थितीविषयी आणि त्यात घातलेल्या बंधनाविषयी मी मागे एकदा लिहिलं होतंच. पण त्यानंतर देखील सेन नदीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जगातला चौथ्या क्रमांकाचा बाधित देश असल्याने इथे परिस्थिती गंभीरच होती आणि अजूनही आहे.
इटली आणि स्पेनप्रमाणेच या आजाराचं गांभीर्य लक्षात येऊन लॉकडाऊन करेपर्यंत थोडा उशीर झाला होता. साथीच्या तिसऱ्या टप्प्यात आल्यावर लॉकडाऊन सुरू केल्यानं त्याचा परिणाम दिसायला तब्बल दोन महिने वाट पाहावी लागली. आता आता कुठे थोडी परिस्थिती बरी वाटते आहे, पण अजूनही पूर्ण नियंत्रणात यायला काही काळ जावा लागेल.
लॉकडाऊनच्या काळात इथे जीवनावश्यक सुविधा देणारी दुकानं, ऑफिसेस सोडून बाकी सर्व बंद होतं. भाजीपाला, वाणसामान याचा कधीही तुटवडा जाणवला नाही. दुकानांमध्ये गर्दी जाणवली नाही. बहुतांश लोक ऑनलाईन सामान मागवत असल्याने मात्र डिलिव्हरीचे स्लॉट्स पटापट गायब होत होते आणि त्यासाठी वाट पाहावी लागत होती.
मी आणि माझा नवरा आम्ही दोघांनीदेखील १७ मार्चपासून घरूनच काम केले. मला दोन वर्षांची लहान मुलगी असल्याने तिला सांभाळून घरून काम ही थोडी तारेवरची कसरत होती आणि आहे. ऑफिस आणि घरकाम या सगळ्यात दिवस भर्रकन जात असल्याने काय करायचं असा प्रश्न नाही पडला कधी, पण तरी हा बदल बराच मोठा होता. इतके दिवस सोमवार ते शुक्रवार तिघे तीन दिशांना आणि फक्त विकेंडला घरी अशा परिस्थितीतून अचानक एकमेकांना भरपूर वेळ मिळाला.
माझी मुलगी सहा महिन्यांची असल्यापासून क्रेश (पाळणाघर)ला जाते आहे. त्यामुळे अचानक एवढे दिवस आई-बाबा मिळाल्याचा तिला मात्र खूप आनंद झाला. सुरुवातीला असे एकत्र असण्याची गंमत वाटली, पण आता थोडे कंटाळायला पण झाले आहे. अधेमधे थोडी चिडचिडदेखील होतीये. विशेषतः बाहेर जात येत नाही म्हणून लेक थोडी कंटाळते आहे. तिच्या वयाला साजेसे हट्ट पुरवताना दमछाक पण होते आहे. अशा वेळेला घरचे अजून कोणी असायला हवे होते असेदेखील वाटून जाते. ती क्रेशला पूर्णपणे विसरून जाऊ नये म्हणून आम्ही तिला अधेमधे आठवण करून देतोय.
इथल्या मित्रमैत्रिणींना प्रत्यक्षात आता बरेच दिवस भेटलो नाहीये, पण लॉकडाऊनच्या निमित्ताने आमची बिल्डिंगमधल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांशी छान ओळख झाली आहे. गेले दोन महिने फ्रान्समध्ये रोज संध्याकाळी आठ वाजता सगळे बाल्कनीत एकत्र येऊन करोनाच्या लढ्यात योगदान देणाऱ्या सर्वांना टाळ्या वाजवून अभिवादन करतोय. त्यानिमित्ताने शेजाऱ्यांशी बाल्कनीतून गप्पा होतायेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जाताहेत, गाणी म्हणली जाताहेत. व्हच्चर्युअल मीटिंगपेक्षा अधूनमधून प्रत्यक्षात माणसांशी बोलणे दिलासादायक आहे.
माझ्यासाठी फ्रान्समध्ये इतकी गंभीर परिस्थिती निर्माण होणे खरे तर धक्का होता. लोकांच्या शहाणपणावरचा विश्वास या आजाराने पूर्णपणे नाहीसा केला. सुरुवातीला लोक विवेकाने वागतील असे वाटले होते, पण जगात कुठेही जा, सर्व तऱ्हेची माणसं सापडणारच हे या लॉकडाऊनने चांगलंच शिकवलं. इथे देखील दोन प्रकारची माणसे दिसली. म्हणजे अजिबात घराबाहेर न पडणारी किंवा मग मास्क न लावता अगदी सगळीकडे फिरणारी, नियम न पाळणारी.
सुरुवातीच्या काळात जेव्हा नियम कडक नव्हते, तेव्हा लोकांनी बार, रेस्टॉरंट, बागांमध्ये गर्दी केली होती, पण मग बाधित रुग्णांचे आकडे वाढायला लागल्यावर सरकारला दंड अकरावा लागला, तेव्हा माणसे गुपचूप घरात राहू लागली. सरकारी पातळीवर जरा अजून आधी जागे व्हायला पाहिजे होते असे वाटले. पण सुदैवाने सध्याचे राष्ट्राध्यक्ष विनोदी विधाने करत नाहीत, हे तरी दिलासादायक आहे. आपल्याला कोणी वाली नाही असे तरी इथे लोकांना वाटत नाहीये.
जरी चीनएवढे प्रादुर्भावाला आटोक्यात आणायला जमले नाही, तरी इथे काही ठोस उपाय केले गेल्याचे नक्कीच दिसून आले. लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून रोजच्या रोज आकडे जाहीर होत होते. सर्व काही आलबेल आहे असं न सांगता मास्क, पीपीई किटचा तुडवडा, हॉस्पिटलवरचा ताण याविषयी सर्व बातम्या संयत रूपात येत होत्या. राष्ट्राध्यक्षांनी पाश्चर इन्स्टिट्यूटला भेट दिली आणि सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती घेतली. अनेक शास्त्रज्ञांशी भेटी घेतल्या, पण एकदाही जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात/पत्रकार परिषदेत लसीविषयी, औषधांविषयी कोणत्याही खोट्या आशा दाखवल्या नाहीत.
हे सगळे करताना मात्र टेस्ट करण्याचा वेग वाढवला गेला, इन्टेसिव्ह केअरमधील जागा वाढवल्या गेल्या. फ्रान्समध्ये मास्क, किट्स, सॅनिटायझर तयार केले गेले. हॉस्पिटल आणि एफाड (वृद्धांसाठीचे नर्सिंग होम्स) मधल्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला गेला. रिसर्चसाठी मोठी आर्थिक तरतूद केली गेली. सामान्यांसाठी क्रेश बंद असली तरी करोनाविरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना क्रेशची सुविधा दिली गेली. एरवी देखील ७० ते ८० टक्के वैद्यकीय संबंधित खर्च सोशिअल सेक्युरिटी (सरकार) कडून उचलला जातो, पण या काळात करोनाच्या टेस्ट वगैरेचा संपूर्ण खर्च सरकारने उचलला.
११ मेपासून लॉकडाऊन शिथिल व्हायला सुरुवात झाली आहे. लस आणि उपचार यावरच्या संशोधनाला बराच वेळ लागेल असे दिसतंय. या व्हायरससोबत काही काळ राहायला लागणार आहे. फ्रान्सचे लाल आणि हिरव्या रंगात भाग पाडले आहेत. पॅरिस आणि उपनगरे आणि पूर्व आणि ईशान्य फ्रान्सचा भाग लाल भागात येत असल्याने इथे मे अखेरपर्यंत अजूनही काही नियम कडक राहतील. बाकीच्या भागांमधले जनजीवन हळूहळू सुरळीत होईल.
पॅरिसच्या बाबतीत सांगायचे तर शक्य त्या कंपन्यांनी अजूनही कर्मचाऱ्यांना घरून काम करू द्यावे असे आवाहन केलंय. ज्यांना जाणे जरुरीचं आहे त्यांनी कामाच्या ठिकाणी एक ते दीड मीटर अंतर राखून काम करावे अशा सूचना आहेत. सुरुवातीला २०-४० टक्केच कामगारांना घेऊन काम करावे अशी योजना आहे. यापुढे काही काळ मेट्रोमध्ये मास्क अनिवार्य असणारेत. सकाळच्या (आणि संध्याकाळच्या कार्यालयीन गर्दीच्या वेळांमध्ये फक्त कंपनीकडून अटेस्टेशन असलेल्यांनाच मेट्रोमध्ये प्रवेश मिळणार आहे.
सरकारकडून प्रत्येक व्यक्तीस एक कापडी मास्क (धुवून वापरता येतील असे) लेटर बॉक्समध्ये ठेवण्यात येतायेत किंवा ठराविक सेंटर्समध्ये उपलब्ध करून देतायेत. शाळा, क्रेश टप्प्याटप्प्यात सुरू होतायेत. एका वर्गात दहापेक्षा जास्त मुले नसतील अशी खबरदारी शाळांना घ्यायला सांगितली आहे. शाळा आणि ऑफिसेस सुरू व्हायच्या आधी डिसइन्फेक्ट केली जातायेत. ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच हालचालींवर मर्यादा ठेवाव्यात आणि नातेवाईकांनी एफाडला भेट देणं टाळावं असं सांगण्यात आलंय. बागा, पर्यटनस्थळे, स्विमिंग पूल्स बंद राहणार आहेत.
नदीच्या काठी चालायला, व्यायामाला परवानगी आहे, पण तिकडे दारू नेण्यास बंदी केली आहे. लोकांच्या शहाणपणावर विश्वास ठेवून नियम शिथिल करायला सुरुवात केली खरी, पण त्याचे परिणाम येत्या दोन-तीन आठवड्यांनी दिसतील. एवढे दिवस घरात डांबून ठेवल्यावर सुरळीत आयुष्य सुरू करावेसे वाटणे साहजिक आहे, पण त्यामुळे नव्या पेशंट्सची लाट येण्याची दाट शक्यता दिसतीये. तेव्हा प्रत्येकाने खबरदारी घेणे खूप महत्त्वाचे आहे. शहाणे व्हायची अत्यंत गरज आहे.
करोनामुळे सामाजिक गणिते बदलली आहेत. बऱ्याचशा गोष्टी आता प्रत्यक्ष माणसांना न भेटता, बोलताच होतील असं वाटायला लागलंय. माझ्या लॅबमधल्या एका ज्येष्ठ सहकारी मैत्रिणीकडे (ती एकटीच राहते) आत्तापर्यंत इंटरनेट आणि लॅपटॉपदेखील नव्हता. बरेचसे काम ती लॅबमध्येच उशिरापर्यंत थांबून उरकायची. या लॉकडाऊनमुळे तिला घरून काम करण्यासाठी सोय करून घ्यावी लागली. असे छोट्या पातळीवरून ते कंपन्यांच्या पॉलिसीपर्यंत बरेच बदल होणारेत.
माझ्या नवऱ्याच्या कंपनीत डिसेंबरपर्यंत काही प्रमाणात घरून काम सुरू राहील असं दिसतंय. रस्त्यातून चालताना, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून जाताना आजूबाजूच्या माणसांविषयी साशंकता निर्माण होण्याच्या काळात पोचलोय असं वाटून दुःख होतंय. इराला बाल्कनीतून दिसणाऱ्या आजीकडे जायचं असतं, तिच्या भूभूला हात लावायचा असतो, पण ‘आत्ता नको, थोड्या दिवसांनी जाऊया’ असं सांगून समजूत घालायला लागतेय. बागेत कधी जायचं, विमानातून आजी-आजोबांकडे कधी जायचं या प्रश्नाला समाधानकारक उत्तर नाहीये. ‘मी उद्या जाणार आहे क्रेशला’ असं म्हटल्यावर ‘हो, लवकरच हां’ असे म्हणून शांत करायला लागतंय.
फ्रान्समध्ये आजपर्यंत २७ हजाराहून अधिक लोकांचे बळी गेले आहेत, याचं अतिशय वाईट वाटतंय. अनेक कुटुंबांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत. या सगळ्यामधून फ्रान्सला परत उभं राहायला वेळ लागणार आहे. नोकऱ्या जायचं प्रमाण वाढलंय, त्याला रोखावं लागेल. आर्थिक घडी बसवायला वेळ लागेल. हेल्थ सेक्टरमधल्या कमतरता उघड्या पडल्या आहेत. त्यावर काम करावं लागेल. या निमित्तानं संशोधनावर देखील प्राधान्यानं खर्च करावा लागेल. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा कस लागेल. जागतिकीकरण म्हणजे पुन्हा एकत्र उभं राहायची संधी हे परत लोकांच्या मनात ठसवावं लागेल, नाहीतर संकुचितपणाकडे जाणारं उलट चक्र फारसं आशादायक नसेल. लवकरच हे सगळं संपावं असे वाटतंय. हे सगळं होईल सुरळीत अशी आशा देखील वाटते आहे. संकटात भविष्यातल्या संधी दडलेल्या असतात, हे येत्या काळात खरं ठरावं. पुन्हा एकदा प्रत्येकाला आपल्या कक्षेत आणि जगात मुक्तसंचार करता यावा.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment