मानवजात या संकटातून बाहेर पडेलच, पण यापुढचं जग हे बदललेलं असणार आहे
पडघम - विदेशनामा
इंद्रनील पोळ, फ्रँकफर्ट, जर्मनी
  • जर्मनीमधील लॉकडाउन
  • Sat , 23 May 2020
  • पडघम विदेशनामा करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

करोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाउन आहे. वेगवेगळ्या देशातल्या लॉकडाउनविषयीच्या दहा प्रातिनिधिक लेखांचा ‘देशोदेशीचे लॉकडाउन’ हा विशेषांक आज प्रकाशित करत आहोत. ही संपूर्ण कल्पना पत्रकार, ब्लॉगलेखिका सायली राजाध्यक्ष यांची. त्यांनी त्यांच्या ‘साडी आणि बरंच काही. Sarees and Other Stories’ या लोकप्रिय फेसबुक पेजवर गेले काही दिवस सातत्याने वेगवेगळ्या देशांतल्या मराठी भाषिकांशी संपर्क साधून त्यांना त्यांचे अनुभव लिहायला सांगितले. १० मे पासून त्यांनी त्यांच्या पेजवर ते अनुभव प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. त्यातील काही निवडक लेख त्यांच्या पूर्वपरवानगीने येथे प्रकाशित करत आहोत. या विशेषांकातून वेगवेगळ्या देशांतल्या लॉकडाउनचे स्वरूप, प्रकार यांची तोंडओळख व्हावी ही अपेक्षा आहे.

..................................................................................................................................................................

करोनाबद्दल आम्ही पहिल्यांदा कधी ऐकलं? मी आणि अमृता गेले काही दिवस याच गोष्टीचा विचार करतोय. म्हणजे साधारण जानेवारीच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापर्यंत करोना हा विषय मेनस्ट्रीम आणि सोशल दोन्हीही माध्यमांवर व्यवस्थित चर्चेत आलेला होता हे तर नक्कीच. माझ्या आठवणीप्रमाणे जर्मनीच्या वर्तमानपत्रांमध्ये डिसेंबरच्या शेवटी शेवटी यावर लेख यायला सुरुवात झाली होती.

डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीचा पहिला आठवडा आम्ही दोघे स्वित्झर्लंडला फिरायला गेलो, तेव्हा तिथे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या एका लेखात वूहानचं वेट मार्केट आणि तिथून संभवतः सुरू झालेल्या एका नवीन रोगाबद्दल एक अतिशय इंटरेस्टिंग लेखपण वाचल्याचं नीटच आठवतंय, हा नवीन रोग म्हणजे कोविड-१९ असं त्याचं नामकरण तोपर्यंत बहुदा झालं नव्हतं. म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीला किमान जर्मनीमध्ये तरी या नवीन सार्ससदृश रोगाबद्दल मुद्रित माध्यमांमध्ये लेखन सुरू झालं होतं.

त्याच्याही आधी म्हणजे २०-२२ डिसेंबरच्या आसपास आम्ही दोघेही ‘नेटफ्लिक्स’वर ‘एक्सप्लेन्ड’ नावाची मालिका बघत होतो. त्यातला ‘द नेक्स्ट पॅन्डेमिक’ नावाचा भाग बघून झाल्यावर माझी आणि अमृताची चर्चा झाली की, रेडिटवर अशाच प्रकारच्या कुठल्यातरी न्यूमोनियासदृश रोगाबद्दल कुजबुज सुरूये, असं काहीसं मला अंधुकसं आठवतंय. म्हणजे आजपासून साधारणपणे पाच महिन्यांपूर्वी करोनाबद्दल कुठल्या न कुठल्या रूपात पहिल्यांदा माहिती माझ्या कानावर पडली असं मला वाटतं.

या पाच महिन्यात आमच्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी आमूलाग्र बदलल्या. बरेच नवीन अनुभव आले, आणि बरीच नवीन आव्हानं सुद्धा. पण पाच महिन्यांपूर्वी त्या ख्रिसमसच्या, थंडीच्या, आणि एकूण जर्मनीतल्या उत्सवाच्या वातावरणात जर कोणी आम्हाला म्हणालं असतं की ही जी नवीन रोगाबद्दल कुजबुज तुम्ही रेडिटवर वाचताय, ती पुढच्या दोन अडीच महिन्यात तुम्हाला आणि फक्त तुम्हालाच नव्हे तर जगभराला आतून बाहेरून हादरवून सोडणार आहे तर आम्ही त्यावर तसूभरही विश्वास ठेवला असता का याबद्दल मी साशंक आहे.

अर्थात अगदी दोन महिन्यात परिस्थिती बदलतेय अशी चाहूल लागलीच. म्हणजे, जर्मनीमध्ये लॉकडाऊन वगैरे सारखे परिणाम दिसायला १८ मार्च उजाडला असला तरी फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच स्थिती काहीशी गंभीर होत चालल्याची जाणीव व्हायला लागली होती. फेब्रुवारीच्या सुरुवातीला बव्हेरियातल्या एका मल्टिनॅशनल कंपनीत चीनहून आलेल्या एका कर्मचाऱ्यामुळे बऱ्याच लोकांना करोनाची लागण झाली, आणि हे लोण अधिकृतरीत्या जर्मनीच्या हद्दीत पोचलं. पण तरीही स्ट्रिक्ट लॉकडाऊन, जास्तीची खरेदी करणे, सुपरमार्केटमध्ये रांगा, या करोनामुळे जगभर पसरलेल्या सामाजिक लक्षणांचे वारे अजूनतरी जर्मनीत वाहायला सुरुवात झालेली नव्हती.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच सहा ते दहा मार्च आम्ही दोघेही इस्तंबूलला जाणार होतो. फेब्रुवारीच्या शेवटी शेवटी जशा करोनाच्या केसेस आधी इटली आणि नंतर तिथून जर्मनीसकट युरोपभर पसरू लागल्या, तसं तसं इस्तंबूलच्या ट्रिपबद्दल आमच्या मनात धाकधूक वाढू लागली. पण तरीही ट्रिप कॅन्सल करायची निकड आम्हाला अगदी पाच मार्चपर्यंत जाणवली नाही.

१८ मार्चनंतर पुढचे साधारणपणे दोन महिने स्वतःवर लादून घेतलेल्या आयसोलेशन, कोणालाही न भेटणे, आवश्यक खरेदीशिवाय किंवा व्यायामाशिवाय घराबाहेरही न पडणे, वर्क फ्रॉम होम इत्यादीनंतर आज मे महिन्यात असताना असा विचार मनात येतो की, मार्चच्या सुरुवातीला आम्ही कसे अगदी निर्धास्तपणे इस्तंबूलला फिरायला गेलो? आताच्या परिस्थितीत इतक्या निर्धास्तपणे अगदी एयरपोर्टवर जायची पण प्रामाणिकपणे भीती वाटते. पण तेव्हा अर्थात या गोष्टींची आणि गांभीर्याची जाणीव बहुदा व्हायची होती.

सहा मार्चला जर्मनीहून इस्तंबूलसाठी निघताना आम्ही एकच गोष्ट बघितली की, टर्कीमध्ये सध्या किती केसेस आहेत, उत्तर होतं शून्य. मग आम्ही फार काही विचार न करता बॅगा उचलल्या आणि एयरपोर्टला निघालो. तिथं आल्यावर मात्र परिस्थितीचं गांभीर्य थोडं लक्षात आलं. एयरपोर्टवरचे कर्मचारी आणि इतर लोक परिस्थितीबद्दल सतर्क झालेले होते. तोपर्यंत तरी फेसमास्क हे फारसे कॉमन न झाल्यामुळे एयरपोर्टवर सुरक्षा अधिकारी आणि कर्मचारी सोडले तर फारसं कोणी मास्क वगैरे लावून नव्हतं.

विमानात बसलो आणि पहिल्यांदा विचार मनात आला. विमान पुढचे चार तास पूर्णपणे बंद असणार, विमानात दोन अडीचशे प्रवासी, ९९ टक्के प्रवाश्यांनी मास्क लावलेला नाहीये, म्हणजे जर या दोन अडीचशे प्रवाशांपैकी एकालाही करोनाचा संसर्ग झालेला असेल आणि तो माणूस खोकला-शिंकला, तर आपल्यालाही करोनाची लागण होण्याची शक्यता आहेच. आणि पहिल्यांदा करोनाची भीती वाटली.

भरीस भर म्हणून आमच्या दोन सीट पुढे बसलेला माणूस फ्लाईटमध्ये पूर्ण चार तास सलग खोकत होता. आता विचार करताना वाटतं साधारण परिस्थितीमध्ये त्या माणसाचं खोकणं आमच्या फारसं लक्षातही आलं नसतं, एवढंच कशाला पोलन अॅलर्जीमुळे मलाही मार्च-एप्रिलच्या काळात बऱ्याचदा कोरड्या खोकल्याची उबळ येते. पण त्या क्षणी मात्र तो खोकला क्षणोक्षणी आमच्या मनात धडकी भरवत होता. आणि फक्त आम्हीच नाही तर विमानातले बरेचसे प्रवासी दिसून येण्याइतपत अस्वस्थ झाले होते.

त्या दिवशी मला पहिल्यांदा वाटलं की, करोना आपल्या जीवनातल्या सामाजिक सवयींमध्ये पुढच्या काही दिवसांसाठी का होईना पण बदल घडवून आणणार आहे. अर्थात आमची टर्की ट्रिप सुखरूप पार पडली. आम्ही जर्मनीला परत येईपर्यंत टर्कीमध्ये एकही केस नसल्यामुळे आम्हाला एयरपोर्टवरही काही त्रास झाला नाही. आम्ही परत आलो आणि लगेच एका आठवड्यात जर्मनीमध्ये kontaktverbot अर्थात सामाजिक भेटीगाठींवर काही काळासाठी बंदी आली. आम्हा दोघांच्याही ऑफिसने ‘वर्क फ्रॉम होम’ करायला सांगितलं आणि सरकारने आवश्यक ती दुकानं सोडून बाकीची सगळी दुकानं बंद करायला सांगितली. फ्रँकफर्टमध्ये तरी या सगळ्या काळात संपूर्ण संचारबंदी किंवा लॉकडाऊन नव्हता. म्हणजे तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ट्रेन-बस-ट्राममध्ये बसून शहरात जाऊ शकत होता. पण अर्थात सरकारने बरेच निर्बंध घातलेले होते उदा. दोनपेक्षा जास्त लोक एकाच वेळेस घोळक्याने बाहेर दिसता कामा नये, डिपार्टमेंट स्टोअरमध्ये एका वेळेस किती लोक जाऊ शकतील यावर बंधनं, इत्यादी.

सार्वजनिक वाहतुकीची फ्रिक्वेन्सी अर्थात कमी झाली होती, पण त्यातून प्रवास करण्यासाठी कुठल्या पास वगैरेची गरज नव्हती. मास्क लावण्याची सक्तीसुद्धा बऱ्याच उशिरा म्हणजे मेच्या सुरुवातीला आली. या सर्व काळात बाकी पाश्चात्य देशांसारखं इथेही टॉयलेट पेपर्सची साठेबाजी करणे वगैरे गमतीशीर प्रकार बघायला मिळाले. इतके की शेवटी बऱ्याच सुपरमार्केट्सना टॉयलेट पेपर्सचं रेशनिंग करावं लागलं. दुसऱ्या महायुद्धानंतर बहुदा जर्मन जनतेनं पहिल्यांदाच रेशनिंग अनुभवलं. या भरमसाठ खरेदीला जर्मनमध्ये शब्द आहे Hamsterkauf, ज्याचा अर्थ असतो ‘पॅनिक होऊन केलेली खरेदी’.

घरून काम करायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं की, लग्नानंतर दीड वर्षात पहिल्यांदाच आम्ही दोघे इतक्या दीर्घकाळ एकत्र आमच्या घरात कोंडलेले राहणार आहोत. मग एकमेकांचा कंटाळा येतो का काय अशी भीती जाणवू लागली. सुदैवाने असे कधीही झाले नाही पण हा सुद्धा नवीन अनुभवच होता. याबाबतीत आम्ही दोघेही नशीबवान आहोत की, आमचं काम किंवा ऑफिसला एकदम याची झळ जाणवली नाही आणि आमचं काम तुलनेने बऱ्यापैकी सुरळीत सुरू राहिलं.

पण कित्येक लोक एवढे नशीबवान नव्हते. जे लोक ऑटोमोबाईल किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात कामाला होते, त्यांचं प्रॉडक्शन बंद झाल्यामुळे त्यांच्यावर सक्तीची सुट्टी घेण्याचेही प्रसंग आले. जर्मनीमध्ये अनएम्पलॉयमेंट इन्श्युरन्सची एक व्यवस्था आहे, ज्याला kurzarbeit म्हणतात. म्हणजे जर कंपनी आर्थिक अडचणीत सापडली तर ते या kurzarbeit सिस्टीममध्ये तीन ते सहा महिन्यांसाठी जाऊ शकतात, ज्यात कामाचे तास कमी होतात आणि पगारसुद्धा काही प्रमाणात कमी होतो, पण नोकरी एकाएकी सुटत नाही.

करोनाच्या काळात जर्मन सरकारने या सिस्टममध्ये काहीशी शिथिलता आणत हातात मिळणाऱ्या रकमेच्या नव्वद टक्क्यांपर्यंत रक्कम मिळेल अशी व्यवस्था केली. त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये जितकी वाईट परिस्थिती उद्भवू शकत होती, तितकी वाईट परिस्थिती नाही उद्भवली.

त्याशिवाय इथल्या मराठी मंडळाचं काम करत असल्यामुळे काही वेगळ्या प्रॉब्लेम्सची पण ओळख या काळात झाली. जे भारतीय / मराठी लोक इथे वर्षानुवर्षे आहेत त्यांच्यासाठी हा काळ काहीसा कमी कठीण होता, पण असे बरेच लोक होते जे इथे फिरायला, अल्प काळाच्या प्रोजेक्ट्ससाठी आले होते. भारताच्या फ्लाईट्स एकाएकी बंद झाल्यामुळे त्यांना इथे बऱ्याच प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागलं. कित्येक लोकांचे वयस्कर आई-वडील दोन-तीन महिन्यांसाठी आले होते, त्यांची औषधं संपत होती. काही विद्यार्थी होते जे तीन-चार महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी आले होते, असेही लोक होते जे सेल्स टूर्सवर आले होते, हॉटेल्समध्ये राहत होते. यातल्या सगळ्यांनाच इच्छा नसतानाही जर्मन व्यवस्थेशी संवाद साधणं, देवाण-घेवाण करणं भाग पडलं.

काही अशाही दुर्दैवी केसेस झाल्या, जिथे इथे असलेल्या लोकांच्या आई-वडिलांचं भारतात निधन झालं पण लॉकडाऊनमुळे त्या लोकांना भारतात जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे आलेला मानसिक ताण हाही एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. व्हिसाचे प्रॉब्लेम्स, जर्मन भाषा येत नाही, राहण्याचे, फंड्सचे प्रॉब्लम्स असे नानाविध मुद्दे होते. मग आमच्या मंडळासारखी विविध मंडळं आणि भारतीय दुतावास यांची गरज पहिल्यांदाच एका मोठ्या समूहाला लक्षात आली. भारतीय दूतावासानेसुद्धा या काळात फार मोलाचं कार्य केलं.

या काळात अजून एक गोष्ट घडली, ती म्हणजे लॉकडाउनच्या काळात घरच्यांबरोबर वाढलेले व्हिडिओ कॉल्स. याआधी रोजचं ऑफिस आणि नानाविध कामांच्या व्यापांमुळे रोज घरी बोलणं झालं तरी ते व्हॉइस कॉल्सच्या माध्यमातून व्हायचं. त्यामुळे आई-वडिलांना आमचा आणि आम्हाला त्यांचा चेहरा वीकेंड्सनाच दिसायचा. लॉकडाउनच्या काळात मात्र हाताशी वेळ असल्यामुळे आणि काळजीपोटीही रोजचे व्हिडिओ कॉल्स सुरू झाले. तंत्रज्ञानामुळे एकमेकांपासून एवढं लांब असूनही एकमेकांबरोबर असण्याचं काही प्रमाणातलं मानसिक समाधान मिळू शकलं.

माझं एक आवडतं वाक्य आहे की, आमच्या आधीच्या पिढीसमोर आव्हान होतं ते नात्यातल्या समानतेला जपण्याचं, आमच्या पिढीसमोर आव्हान आहे ते म्हणजे नात्यातली लोकशाही जपणे आणि टिकवून ठेवणे. पण ही लोकशाही म्हणजे काय याचा बराच अनुभव या लॉकडाउनच्या काळात आला. शिक्षण आणि कामानिमित्त बरीच वर्षं एकटा घराबाहेर राहिलेलो असल्याने मी घरच्या कामांच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे आणि स्वयंपाकापासून ते घर आवरण्यापर्यंत प्रत्येक कामात माझा हातभार असतो असा उगीच कारण नसताना एक अहंभाव माझ्या मनात होता. आपण कामात लावलेल्या प्रत्येक हातभारामागे बायकोचा काकणभर अधिक सहभाग असतो, हे या काळात प्रकर्षानं जाणवलं.

म्हणजे स्वयंपाक करायचा म्हणला तर डिश डायनिंग टेबलवर आल्यावर माझा सहभाग संपतो, पण अमृतासाठी स्वयंपाक करणे म्हणजे जेवून झाल्यावर अन्न काढून फ्रीजमध्ये ठेवणे, मागून ओटा आवरणे, गॅस साफ करणे, ओटा पुसलेलं फडकं जागेवर वाळत घालणे, भांडी लावणे, वगैरे वगैरे असंख्य गोष्टी त्यात सामावलेल्या असतात. या लोकशाहीच्या कक्षा आपल्याला अजून बऱ्याच रुंदावायच्या आहेत हा लॉकडाऊनमध्ये मला मिळालेला धडा.

आम्हा दोघांनाही सुरुवातीपासून स्वयंपाक करायला फार आवडतं. लग्नाच्या आधीपासून आम्ही जेव्हा एखादा पदार्थ एकत्र करून त्याचे फोटो टाकायचो, तेव्हा मित्रमंडळी म्हणायची तुमचं स्वतःचं इन्स्टाग्राम/युट्यूब अकाउंट सुरू करा. पण रोजच्या धबडग्यात असं काही नवीन सुरू करायची एकतर उसंत मिळत नव्हती आणि दुसरं म्हणजे असा काही प्रयोग सुरू केला तरी तो किती सिरिअसली पुढे नेऊ याची शाश्वती नव्हती. या लॉकडाउनच्या काळात मात्र बाहेरचं खाणं, ऑर्डर वगैरे सगळंच बंद झाल्यावर आणि हाताशी बराच वेळ असल्याकारणाने अर्थात आम्हा दोघांचाही स्वयंपाकघरातला वावर कैकपटींनी वाढला, त्यातून विविध रेसिपीचे प्रयोग सुरू झाले आणि मग आम्ही ‘आमचे पाककलेचे प्रयोग’ या नावाने स्वतःच इन्स्टाग्राम अकाउंट सुरू केलं. लॉकडाउनच्या काळात काय नवीन, वेगळं, सकारात्मक केलं, याचं आमच्यापुरतं उत्तर म्हणजे- ‘आमचे पाककलेचे प्रयोग’.

अर्थात जर्मनीमध्ये आता परिस्थिती काहीशी पूर्ववत होते आहे, पण करोना हा इतक्यात कुठेही जाणार नाहीये याची खात्री आत्तापर्यन्त सगळ्यांनाच झालेली आहे. त्यामुळे करोनाबरोबर आयुष्य कसं जास्तीत जास्त सुरळीत आणि सुखकर करता येईल याकडे पुढच्या काळात इथे लोकांचा कल असणार आहे, असा माझा अंदाज आहे. मानवजात या संकटातून बाहेर पडेलच, पण यापुढचं जग हे बदललेलं असणार आहे, याबद्दल याक्षणी तरी माझ्या मनात कुठलीही शंका नाहीये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......