आता चीनमध्ये कोविड-१९चे नवीन रुग्ण सापडत नाहीत. मात्र लस मिळत नाही, तोवर ही टांगती तलवार आपल्यावर सतत राहणार आहे.
पडघम - विदेशनामा
अपर्णा अमित वाईकर, शांघाय, चायना
  • शांघायमधील लॉकडाउन
  • Sat , 23 May 2020
  • पडघम विदेशनामा करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

करोनाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाउन आहे. वेगवेगळ्या देशातल्या लॉकडाउनविषयीच्या दहा प्रातिनिधिक लेखांचा ‘देशोदेशीचे लॉकडाउन’ हा विशेषांक आज प्रकाशित करत आहोत. ही संपूर्ण कल्पना पत्रकार, ब्लॉगलेखिका सायली राजाध्यक्ष यांची. त्यांनी त्यांच्या ‘साडी आणि बरंच काही. Sarees and Other Stories’ या लोकप्रिय फेसबुक पेजवर गेले काही दिवस सातत्याने वेगवेगळ्या देशांतल्या मराठी भाषिकांशी संपर्क साधून त्यांना त्यांचे अनुभव लिहायला सांगितले. १० मे पासून त्यांनी त्यांच्या पेजवर ते अनुभव प्रकाशित करायला सुरुवात केली आहे. त्यातील काही निवडक लेख त्यांच्या पूर्वपरवानगीने येथे प्रकाशित करत आहोत. या विशेषांकातून वेगवेगळ्या देशांतल्या लॉकडाउनचे स्वरूप, प्रकार यांची तोंडओळख व्हावी ही अपेक्षा आहे.

..................................................................................................................................................................

सगळ्या वाचकांना शांघाय, चीनमधून ‘नि हाओ’ म्हणजेच हॅलो!!

आजकाल चीनचं नाव ऐकल्यावर सगळ्यांच्या कपाळाला आठ्या पडतात आणि ते साहजिकच आहे. सगळ्या जगाला हादरवून सोडणाऱ्या करोनाचा उगम चीनमध्ये झालाय, तेव्हा सगळ्या जगाचा या देशावर राग असणारच. आम्ही गेली १० वर्षं शांघायमध्ये आहोत आणि खरं सांगायचं तर या देशाइतकं सुरक्षित आम्हाला कुठेच वाटलं नाही. अगदी ज्या वेळी करोनाचा प्रादुर्भाव इकडे झाला, त्या वेळीही इथंच राहणं आम्हाला योग्य वाटलं, कारण आठ-नऊ तास प्रवास करून भारतात जाताना विमानात संसर्ग होण्याची शक्यता जास्त होती. पण इथंच जर आम्हाला हा संसर्ग झाला तर इथं त्याचे योग्य उपचार मिळतील ही खात्री होती.

१० वर्षांपूर्वी जर्मनीहून आमची इकडे बदली झाली, त्या वेळी केवळ तीन वर्षांसाठी आम्ही इथं राहणार होतो, पण इथं भेटलेल्या मित्रांमध्ये तिनाची दहा वर्षं कशी झाली ते कळलंदेखील नाही, इतके आम्ही इथे रूळलो. अर्थात मोठ्या मुलाची बारावी झाली की, मात्र कुठेही दुसरीकडे जाण्याची तयारी आहे.

तर इथे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ज्या वेळी हा करोनाचा प्रादुर्भाव लक्षात यायला लागला, त्या वेळी इथले लोक चिनी नववर्षाच्या तयारीत होते. आपल्याकडे जशी दिवाळीची धामधूम असते, तशीच इथे या चुन जिए म्हणजे स्प्रिंग फेस्टिव्हलची असते. जवळपास १५ ते २० दिवसांची सुट्टी असते. लोक शहरातून आपापल्या गावी जातात किंवा परदेशात फिरायला जातात. आणि अशा धामधुमीच्या काळात करोनाचा उद्रेक सुरू झाला.

सुरुवातीला न्युमोनिया म्हणून विशेष काळजी सारखं वाटलं नाही, पण अचानक संसर्ग झालेल्यांची संख्या वाढायला लागली आणि हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे, हे इथल्या सरकारच्या लक्षात आलं. वुहानमध्ये तर सगळ्यात झपाट्याने हा विषाणू पसरला. सरकारनं ताबडतोब वुहानला लॉकडाऊन केलं. पण तोवर प्रादुर्भाव सुरू होऊन एक आठवडा उलटून गेला होता आणि अनेक लोक सुट्ट्यांमुळे वुहानच्या बाहेर पडले होते. ही गोष्ट लक्षात येताच सरकारनं वुहानमध्ये जाणारे-येणारे सगळे रस्ते खोदून टाकले. रेल्वे, विमानसेवा अशी सगळी वाहतूक बंद करून टाकली. अक्षरशः रात्रभरात त्यांनी वुहान सील केलं

२३ जानेवारीच्या सुमारास सरकारनं संपूर्ण चीनमध्ये लॉकडाऊन जाहीर केला. बंद म्हणजे पूर्णपणे बंद. शांघायमध्ये असणाऱ्या सगळ्या रेसिडेन्शियल कंपाऊंडमधून कुणालाही बाहेर पडायला परवानगी नव्हती. दोन-तीन दिवसांतून एकदा एक जण सामान आणायला जाऊ शकत होता. त्याच्यासाठी स्पेशल परवानगीचं कार्ड होतं. ते दाखवूनच कंपाऊंडच्या बाहेर जायचं, जाता-येताना टेंपरेचर मोजलं जाई.

अत्यावश्यक सामानाची एक-दोनच दुकानं उघडी होती, तिथेच थोड्या फार भाज्या मिळत होत्या कारण भाजीबाजार बंद होता. त्या दुकानात जायच्या आधी पुन्हा टेंपरेचर चेक, सॅनिटायझर वापरून मग आत जायचं. सुरुवातीचे काही दिवस वस्तूंचा तुटवडा जाणवला, पण नंतर मात्र सगळ्या आवश्यक वस्तू कायम उपलब्ध होत्या. १५ दिवसांनी भाजीबाजार उघडला, पण केवळ सकाळी चार तास, नंतर बंद. कुठलीही पार्सल किंवा होम डिलिव्हरी सेवा त्या वेळी उपलब्ध नव्हती. सगळी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद होती.

नव्या वर्षाच्या सुट्टीत गावी गेलेले लोक तिकडेच अडकले, कारण सगळीच वाहतूक बंद होती. ती हळूहळू सुरू झाल्यावर माझी कामवाली बाई गावांहून तिच्या भावाच्या गाडीने परत आली. प्रत्येक गावाच्या बॉर्डरवर त्यांची सक्त तपासणी केली गेली आणि शांघायच्या बॉर्डरवर एक फॉर्म भरून घेतला. परत शांघायला आल्यावर तिला तिच्या घरी १५ दिवस सक्तीचं विलगीकरण होतं. तिला काहीही झालेलं नव्हतं तरी सरकारी लोक तिला रोज येऊन चेक करत होते. चार-पाच दिवस पुरेल एवढं खाण्याचं सामान, दूध आणि पाणी तिच्या दारात या विलगीकरणाच्या वेळी ठेवलं जात असे. त्यानंतर तिला हिरवा कोड मिळाला आणि दीड महिन्याने ती कामावर आली.

लॉकडाऊनच्या चार आठवड्यांनंतर हळूहळू पार्सल सेवा सुरू झाली, पण त्या वस्तू आम्हाला कंपाऊंडच्या मेन गेटवरून जाऊन आणाव्या लागत. कंपाऊंडच्या आत शिरायची कुणालाही परवानगी नव्हती.

हे सगळं चालू असताना इथं कुठेही त्याचा विरोध करताना लोक दिसले नाहीत. कारण चीनमध्ये एक गोष्ट अतिशय वाखाणण्यासारखी आहे, ती म्हणजे लोकांचा सरकारवर असलेला विश्वास. सरकार सांगतंय म्हणजे ते आपल्या हिताचंच असणार ही भावना. त्यामुळे इथं कोविड-१९चा पेशंट हॉस्पिटलमधून पळून गेल्याची उदाहरणं दिसत नाहीत. एखाद्या बिल्डिंगमध्ये पेशंट सापडला तर ती पूर्णपणे रिकामी करून सील करण्यात येत होती. पेशंटला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणि इतरांना विशिष्ट ठिकाणी सक्त विलगीकरणात ठेवलं जात होतं. यासाठी अनेक हॉटेल्स रिकामी केली गेली. तिथं विलगीकरणाच्या दृष्टीनं सगळ्या सोयी केल्या गेल्या.

लॉकडाऊन केल्याने संसर्गामध्ये नक्कीच फरक पडला. विशेषतः वुहानचं विलगीकरण केल्यानं इतर शहरांतून प्रादुर्भाव कमी झाला. जर ते केलं नसतं तर सगळ्याच चीनमध्ये हे विषाणूंचं थैमान वुहानसारखंच भयंकर प्रमाणात झालं असतं. केवळ आणि केवळ लॉकडाऊनमुळे आणि सक्तीच्या विलगीकरणामुळेच हा संसर्ग आटोक्यात आणणं चीनला शक्य झालं.

लॉकडाऊनचा सगळ्यात जास्त त्रास लहान मुलांना झाला. कारण दिवस-रात्र घरातच राहणं हे त्यांच्यासाठी फार कठीण होतं. ई-लर्निंग चालू होतं, पण अभ्यास झाल्यावर काय करणार हा भलामोठा प्रश्न होता, पण पर्याय नव्हता. टीव्ही किती पाहाणार! व्हिडिओ-गेम किती खेळणार!! मग त्यांना नवे बैठे खेळ शिकवले. त्यांच्याबरोबर बसून ‘हॅरी पॉटर’, ‘ॲवेंजर्स’ वगैरे चित्रपट पाहिले.

अगदी लहान मुलांच्या पालकांचं मला विशेष कौतुक वाटतं. कारण चार-पाच वर्षांच्या मुलांना दिवसभर घरात बसवून ठेवण्यासाठी त्यांना काय काय उपाय करायला लागले. थोडा वेळ पुस्तक वाचन, मग एखादं पझल सोडवणं, चित्र काढणं इत्यादी करूनही मुलं कंटाळतात. मग या सगळ्यांनी एक ग्रुप तयार केला आणि आळीपाळीने त्यांवर गोष्टींचे, गाण्यांचे व्हिडिओ टाकू लागले. आपल्याच आईकडून गोष्टी ऐकण्यापेक्षा दुसऱ्या कुणाकडून ऐकायला मुलांना जास्त आवडतं. तसंच या ग्रुपवरून मुलंही एकमेकांशी प्ले-डेट करू शकतात.

इथली माणसं मुळातच सोशिक आहेत आणि मागची पिढी तर आहे त्यातच समाधान मानणारी आहे. त्यामुळे वृद्धांकडून कटकट किंवा तक्रारीचा स्वर दिसला नाही. भीती जास्त जाणवली, कारण हा विषाणू वृद्ध लोकांसाठी फार वाईट आहे, हे त्यांनी फार मनावर घेतलं होतं. आणि त्यामुळेच सगळे आजी-आजोबा स्वस्थपणे घरीच बसले होते.

आमच्या ओळखीचा एक अमेरिकन परिवार सुट्टीत बाहेरच्या देशात गेला होता. लॉकडाऊननंतर परत येताना त्यातल्या स्त्रीला विमानात संसर्ग झाला असावा. ते लोक परत आले आणि नियमाप्रमाणे विलगीकरणात होते. अचानक तीन-चार दिवसांनी तिला खूप ताप आला. त्यांनी ताबडतोब योग्य लोकांना फोन केला . लगेच ॲम्ब्युलन्स आली, तिला हॉस्पिटलमधे नेलं आणि कोविड वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. तिच्या नवऱ्याला आणि मुलांना एका आयसोलेशनसाठीच्या हॉटेलमध्ये ठेवलं गेलं. नशीबाने त्यांना कुणालाही संसर्ग झालेला नव्हता, तरी १४ दिवस त्यांना तिकडेच राहावं लागलं. आता तीही पूर्ण बरी आहे. अतिशय चांगली सोय आणि उपचार तिला मिळाले.

अजून एका मित्र कुटुंबाच्या विमानात एक कोविड-१९चा पेशंट निघाल्यामुळे त्यांना घरी न जाता त्यांच्या सामानासकट हॉटेलच्या विलगीकरणात राहावं लागलं. लॉकडाऊनमुळे आधी इकडे येऊ शकले नाही आणि दीड महिन्याने घरी यायला मिळणार असताना हे झालं. यांची न्यूक्लेईक ॲसिड टेस्ट निगेटिव्ह आली. पण १४ दिवसांचं विलगीकरण करावंच लागलं. लहान मुलगी आणि आई एका खोलीत व बाबा दुसरीकडे असे ते १४ दिवस त्यांनी कसे काढले असतील याची केवळ कल्पनाच आपण करू शकतो! दिवसभरातून केवळ पाच मिनिटं ते एकमेकांना दुरून बघू शकत होते. १४ दिवसांनी त्यांना घरी पोचवलं गेलं. एवढी सक्ती इकडे बाळगत आहेत म्हणून नव्या केसेस होणं सरकार थांबवू शकलं आहे.

इथला लॉकडाऊन मार्चच्या अखेरीस उठला. इथे त्यांनी बिग डेटाचा वापर करून सगळ्या लोकांच्या फोनमधून लाल, केशरी आणि हिरवा QR कोड बघायला सुरुवात केली. तुम्ही कुठून आलात, किती दिवस त्या शहरात आहात यांवर या कोडचा रंग आपोआप बदलतो. हा हिरवा नसेल तर तुम्ही कुठेही आत जाऊ शकत नाही. सुरुवातीला ऑफिसेसमधून खूप गर्दी होऊ नये म्हणून लोक आळीपाळीनं एक दिवसाआड जात होते. मार्चमध्ये इकडे बरंच थंड असतं, पण व्हेंटिलेशन रहावं म्हणून सगळ्या खिडक्या उघड्या ठेवणं आणि हिटिंग बंद ठेवणं सक्तीचं होतं.

काही सुपर मार्केट्स उघडली, मॉल्स, रेस्टॉरंट उघडले, उद्यानं पण उघडली आहेत, पण प्रत्येक ठिकाणी टेंपरेचर आणि ग्रीन QR कोड चेक केल्याशिवाय आत जाता येत नाही. काही कारणाने हॉस्पिटलमध्ये जावं लागलं तरी अजूनही ते हा कोड चेक करतात. कुणामुळेच संसर्ग वाढू नये म्हणून ही खबरदारी घेतली जातेय. इथल्या शाळा प्रचंड खबरदारी घेत गेल्या आठवड्यात सुरू झाल्यात, पण केवळ दहावी, अकरावी, बारावीचे वर्ग. यांच्या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत. बाकी वर्ग हळूहळू सुरू होतील. मग जुलैपासून उन्हाळ्याची सुट्टी. प्राथमिक शाळा मात्र सरळ सप्टेंबरमध्येच उघडणार. मास्क हा कपड्यांइतकाच अविभाज्य भाग बनला आहे.

जरी लॉकडाऊन उठवला गेला असला तरी अजूनही सगळे लोक फारसे बाहेर पडत नाहीयेत. गरज नसेल तर कशाला कुठे जायचं हा विचार बरेच लोक करताना दिसताहेत. जेव्हा लॉकडाऊन उठला तेव्हा काही उद्यानांत, प्रेक्षणीय स्थळांना खूप गर्दी झाली, पण त्यामुळे काही ठिकाणी नव्या केसेस दिसल्यावर या सार्वजनिक जागा बंद करण्यात आल्या किंवा या जागांवर किती लोक जाऊ शकतात याची बंधनं घातली गेली. सार्वजनिक वाहतूक सुरू झालीय, रोज दोन-तीन वेळा बस, मेट्रोमध्ये जंतूनाशक फवारलं जातं, आत शिरायच्या आधी थर्मल स्कॅनिंग होऊन कोडही चेक होतो, मास्क लावणं गरजेचं आहे. सगळीकडे फोन ॲपवरूनच पैसे दिले-घेतले जातात, नोटांचा वापर अगदी क्वचितच होताना दिसतो.

मला वाटतं आपल्याकडेही अशाच पद्धतीनं हळूहळू लॉकडाऊन उठवायला हवा. अचानक एकाच वेळी सगळं चालू केलं तर ते रिस्की आहे. तसंच जे घरून काम करू शकतात, त्यांना तसंच करण्याची मुभा असावी. त्याने गर्दी टाळता येईल. कोविड-१९मुळे जो अनपेक्षित वेळ सगळ्यांना मिळाला, त्यामुळे घरांमधले, मित्रांमधले, बंद पडलेले संवाद पुन्हा सुरू झालेत, असं काहीसं मला वाटतं. शिवाय अनेकांना आपल्या आवडी जपायलाही वेळ मिळाला, जो एरवी बिझी असताना मिळत नाही. त्यामुळे एक प्रकारचं मानसिक समाधान मिळालं.

या काळात आम्ही मुलांच्या जास्त जवळ आलो. इ-लर्निंगमुळे त्यांच्या अभ्यासातही मदत करता आली. आपल्या लहानपणीचे अनेक बैठे खेळ त्यांना शिकवले. रेस्टॉरंट बंद असल्यामुळे निरनिराळे पदार्थ मी घरीच करायला लागले. खूप जुने-नवे चित्रपट पाहिले. कधी कधी खूप कंटाळा आला, एकमेकांवर चिडचिड व्हायला लागली असंही झालं. कारण कायम सकारात्मक राहणं हे घरात बंद असताना अशक्यच आहे. पण अशा वेळी मग त्या व्यक्तीला काही काळ एकटं सोडलं की जरा वेळानं सगळं ठीक व्हायचं.

आता चीनमध्ये कोविड-१९चे नवीन रुग्ण सापडत नाहीत. मात्र लस मिळत नाही, तोवर ही टांगती तलवार आपल्यावर सतत राहणार आहे. पुन्हा काही ठिकाणी संसर्गाची दुसरी लाट येऊ शकते, हे लक्षात घेऊन स्वच्छता, पर्सनल हायजीन, शक्य तेवढं सोशल डिस्टन्सिंग ठेवणं जरुरी आहे. तसंच हेल्थ आणि फिटनेस या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम यांना प्राधान्य देण्याची वेळ आलेली आहे. मानसिक संतुलन टिकवण्यासाठी योगा, मेडिटेशन, वाचन, एकमेकांशी संवाद करणं हिताचं आहे. या काही गोष्टी जर आपण पाळायला लागलो, तर कोविड-१९च काय पण कुठलाही रोग आपल्यापासून दूरच राहील.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......