अजूनकाही
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीबाबत घेतलेला निर्णय साहसी आणि कौतुकास्पद आहे. मोदींच्या या निर्णयावरूनच समजते की, ते करबुडवेगिरीला चाप बसविण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी समर्पित आहेत. भारताची वाटचाल योग्य दिशेने होत आहे. : फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री ज्याँ मार्क आयरॉल्ट
अभिमानाने छाती भरून आली ना? हे ज्याँ महोदय 'व्हायब्रंट गुजरात' (हो हो, तोच उपक्रम जिथे चारशेहून अधिक शालेय शिक्षकांना काल्पनिक कंपन्यांचे सीईओ बनवून हजर करण्यात आलं होतं गर्दी दाखवण्यासाठी) या व्यापारी संमेलनासाठी आले होते. भारतात आधीच हजाराहून अधिक कंपन्या असलेल्या फ्रान्सला अपारंपारिक ऊर्जा आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात भारतात गुंतवणूक करायची इच्छा आहे, ‘मेक इन इंडिया’ ही त्यांना त्यांच्या व्यवसाय वृद्धीची संधी वाटते, म्हणून काय झालं? जे अभिमानास्पद आहे, ते अभिमानास्पद आहे.
चित्र - सतीश सोनवणे
२. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समाजवादी पक्षाच्या वादात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची सरशी झाली आहे. समाजवादी पक्षाच्या सायकल या चिन्हावर पिता मुलायम सिंह आणि पुत्र अखिलेश यांनी दावा सांगितला होता. निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांच्या बाजूने निकाल दिला आहे.
यात आश्चर्य काय? 'बाबा, माला सायकल हव्वी, आत्ताच्या आत्ता!' असा हुकूम चिरंजीवांनी सोडल्यानंतर कोणत्या बापाची टाप असते तो नाकारण्याची? कॅरियरवर बसलेल्या पोराला सीटवर बसवून आपण चालत्या सायकलवरून पायउतार होऊन जाण्याची कसरत मुलायमसिंहांनी या वयात, अशा देहविस्तारासह किती चपळाईने केली, याचं कौतुक करायला हरकत नाही.
…………………………..…………………………..
३. सर्वसमावेशक विकासाच्या निकषांवर तयार करण्यात आलेल्या जगातील ७९ विकसित राष्ट्रांच्या यादीत भारताला ६०वे स्थान मिळाले आहे. जागतिक आर्थिक मंचाने म्हणजे वर्ल्ड इकनॉमिक फोरमने प्रकाशित केलेल्या ‘समावेशक वाढ आणि विकास अहवाल २०१७’मध्ये समावेशक विकास निर्देशंकात भारताला चीनपेक्षा खालचे स्थान तर मिळाले आहेच; पण या यादीत पाकिस्तानही भारताच्या वरच्या क्रमांकावर आहे. धोरणकर्त्यांकडून तयार करण्यात येणारे विकासाचे प्रारूप आणि विकास मोजण्याच्या निकषांमधील त्रुटी याला कारणीभूत आहेत.
अरे देवा, काय ही किचकट डोकेदुखी! एक अक्षर कळेल तर शपथ! यापेक्षा सौ करोड हिंदुस्तानी सीमेवर उभे राहून अमुक गोष्ट करतील, तर पाकिस्तानचं तमुक होऊन जाईल, ही जुमलेबाजी किती सोपी, किती सुटसुटीत!
…………………………..…………………………..
४. सर्वच प्राण्यांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन लागतो, उच्छवासातून कार्बन डाय ऑक्साइड बाहेर सोडला जातो. पण, उच्छवासातूनही ऑक्सिजनच देणारा गाय हा एकमेव प्राणी आहे. : राजस्थानमधील शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी
संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषीविषयक समितीने २००६ मध्ये दिलेल्या अहवालानुसार गायी-म्हशींसारखी गवत चरणारी जनावरं मिथेन, कार्बन डायऑक्साइड यांसारख्या वायूंच्या उत्सर्जनाला जबाबदार असतात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. चाऱ्याचं पचन होत असताना ढेकरच्या माध्यमातून हा वायू बाहेर पडत असतो, असं हा अहवाल सांगतो. पण, 'राजीव दीक्षित स्कूल ऑफ एव्हरीथिंग इन द युनिव्हर्स'चे विद्यार्थी असलेल्या देवनानी यांनी केलेलं हे मौलिक संशोधन पाश्चिमात्यांचे डोळे उघडून त्यांच्या मेंदूला काही गोजन्य ऑक्सिजनचा पुरवठा करील, अशी आशा आहे. गाय कोणत्या भागातून ऑक्सिजन देते आणि देवनानी महोदय त्या भागाजवळ काय करत असतात, एवढं फक्त जाहीर व्हायला हवं.
…………………………..…………………………..
५. नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना भाजपला ‘कैकयी’ आणि काँग्रेसला ‘कौसल्या’ म्हटले होते. सिद्धू यांच्या या विधानाचा समाचार घेताना सुखबीर सिंग बादल म्हणाले की, नवज्योत सिंग सिद्धू दररोज ‘आई’ बदलत असतात.
बादलसाहेब, नका एवढं जिवाला लावून घेऊ. हा धंदाच असा आहे. इथे कोणी ‘आई’ बदलत असतं, कोणी ‘बाप’. भाऊबंद तर काही विचारूच नका दिवसागणिक किती बदलतात ते!
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment