अजूनकाही
‘मेरा नाम जोकर’ हे शोमन राज कपूरचे भव्य स्वप्न तिकिटबारीवर साफ भंगले. राज कपूर कर्जबाजारी झाला. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने ‘बॉबी’ हा छोट्या(!) बजेटचा चित्रपट करायला घेतला. ‘मेरा नाम जोकर’च्या वेळचे शैलेंद्र, शंकर जयकिशन, मुकेश असे अनेक काळाच्या पडद्याआड गेले होते. संगीत हे राज कपूरच्या सिनेमाचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य किंवा अविभाज्य अंग. हिट संगीत देणारे साथीदार सोबत नसताना राज कपूरने त्या वेळी नावारूपास आलेले लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना निवडले. त्यांच्यासाठीही हा सन्मानाचाच भाग होता.
संगीताच्या चर्चेसाठी राजसाहेबांनी एके सकाळी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना बोलावले. त्यांनी आपले गीतकार आनंद बक्षींनाही सोबत घेतले, कारण त्यांचे ट्यूनिंग चांगले होते, यशही नावावर होते.
वाटेत गाडीतल्या चर्चेत या तिघांनी विचार केला राजसाहेब या चित्रपटातून चिंटूला लाँच करताहेत व चित्रपटाचे नाव ‘बॉबी’ आहे, म्हणजे ते हिरोचेच नाव असणार!
आर.के. स्टुडिओत तिघे पोहचल्यावर राज कपूर यांच्या भल्या मोठ्या सिटिंग रूममध्ये या तिघांना बसवून नंतर चहापाणी, नाश्ता वगैरे देऊन सेवकवर्ग गेला. त्या भल्या मोठ्या रूममध्ये हे तिघेच. आता तर ना कुणी सेवक ना कुणी सहाय्यक, ना राजसाहेब. तसाही राजसाहेबांचा दिवस उशिरा म्हणजे दुपारी १२ नंतरच सुरू व्हायचा. चहा, पाणी, आपसातल्या गप्पाही संपल्या तरी काहीच हालचाल नाही. यांना वाटले सेवक विसरले तर नाही राजसाहेबांना सांगायला, की आपण वाट पाहतोय!
अशा कोंडीत आनंद बक्षी म्हणाले, “हम तुम एक कमरे में बंद हो, और चाबी खो जाय... तर काय होईल?” बरोबर त्याच वेळी दार ढकलून राज कपूर आत आले आणि म्हणाले, तुम्ही आता काही तरी म्हणत होता. आनंद बक्षी हसून म्हणाले, “काही नाही बराच वेळ या बंद कमऱ्यात बसून होतो तर यांना म्हणालो, ‘हम तुम एक कमरे में बंद हो जाय और चाबी खो जाय…” ही ओळ ऐकून प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे राजकपूर उद्गारले, “तेरे नैनो की भूलभुलैया में बॉबी खो जाय! मुखडा हो गया, अब ये गाना पूरा करो इसिसे शुरूआत करते है!
बॉबी हिट झाला. ॠषी व डिंपल रातोरात स्टार झाले. या गाण्यासह सर्व गाणी हिट झाली. बॉबी हे हिरोचं नाही तर हिरोईनच नाव आहे, हे प्रेक्षकांनाही नंतरच कळलं. ‘कमरे में बंद हो’ या गाण्याची पुढची सर्व कडवी अमूक एक झाले आणि मार्ग बंद झाले तर काय, असा प्रश्न व त्यावर तितकेच जीव ओवाळून टाकणारे उत्तर अशीच रचलीत. म्हटलं तर बालीश पण त्या ‘सोला बरस की बाली उमर’ला पूर्ण साजेशी कडवी.
लॉकडाऊनच्या चौथ्या पर्वात प्रवेश करताना, लोकांची अवस्था लक्ष्मीकांत-प्यारेलाल व आनंद बक्षींसारखी झालीय. तिथे उशिरा का होईना राज कपूर अवतरले व त्यांनी त्या ‘चाबी खो जाय’चं उत्तरही दिलं व पुढचा मार्गही दाखवला!
पण ५० दिवसानंतर पुढचा लॉकडाऊन जाहीर करताना केंद्र वा राज्य सरकारकडे या तालाबंदीचा शेवट कसा करणार, याचं उत्तर नागरिकांना हवंय आणि कुठल्याच सरकारकडे ते नाहीए. लॉकडाऊनच्या चौथ्या पर्वात लोकांना कुलुपबंद अवस्थेत ठेवताना आता शंका यायला लागलीय की, केंद्र व राज्य सरकार या कुलूपाची चावी तर हरवून बसले नाहीएत ना?
बाधितांच्या आणि मृत्यू पावणाऱ्यांच्या आकडेवाऱ्या जाहीर करत सरकार फक्त सांगतेय की, परिस्थिती बिघडत चाललीय. तीन झोन करून झालेत. पण या झोनचे रंग फिरत्या रंगमंचासारखे बदलताहेत. रेड झोनमध्ये सुरुवातीला मुंबई, ठाणे, नवी मुंबई व पुणे हे चारच जिल्हे होते. ५० दिवसानंतर त्यात पालघर, नाशिक व सोलापूर या तीन जिल्ह्यांची भर पडली.
यातून समजायचं काय? लॉकडाऊनची मात्रा कमी पडतेय, की रोगाच्या संक्रमणाचा वेग वाढलाय?
सुरुवातीला लोकांनी शिस्तीने, भीतीने सर्व पालन केले, पण आता केंद्र सरकार एक ठरवते, राज्य सरकार दुसरं ठरवते, जिल्हाधिकारी तिसरं आणि तहसीलदार वा वॉर्ड ऑफिसर चौथंच काहीतरी ठरवून मोकळे होतात.
“प्रतिबंधित क्षेत्रात सर्वच गोष्टी बंद राहतील, मात्र अत्त्यावश्यक सेवा सुरू राहतील. औषध दुकाने व भाजीपाला फक्त मिळेल,” असा आदेश येऊन आठ तास होत नाहीत तर दुसरा आदेश येतो – ‘यात किराणा दुकानासह चिकन, मटण, अंडी विक्री दुकानेही चालू राहतील!’
सकाळी त्यात आणखी एका ओळीची भर पडते – ‘घरपोच मद्यविक्रीसही परवानगी!’
या सेवा सुरू होतात नि चॅनेल नाहीतर पेपरात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडाल्याची बातमी येते. तसा नवा आदेश येतो – ‘सर्व गोष्टी सात दिवस बंद!’ लोकांचे जबडे वासलेले असतानाच नवा आदेश येतो, - ‘नाही. सर्व दोन तास चालू राहिल!’
सरकार एकाच वेळी पाया व कळस अशा दोन्ही बाजूंनी काम करतंय. त्यामुळे त्यांना कळसाकडून बघताना पाया खूप दूर दिसतो, तर पायाकडून सुरू करताना कळस लांब वाटतो. परिणामी ५० दिवसानंतरही ग्रीन झोनमध्ये नेमकं काय सुरू करायचं नि रेड झोनमध्ये सर्व किती दिवस बंद ठेवायचं हे जसं कळत नाहीए, तसंच ऑरेंज झोन म्हणजे रेड करून ग्रीनकडे जाणारा झोन समजायचा की, ग्रीनकडून रेडकडे जाणारा हेही निश्चित करता येत नाहीए.
यात केंद्राने पाच टप्प्यांत भले मोठे पॅकेज जाहीर केलं! ते म्हणजे अर्थमंत्र्यांचं अर्थसंकल्प वाचनाचं अपूर्ण राहिलेलं वाचन पाच भागांत पूर्ण केल्यासारखं वाटलं. वर्तमानपत्रांतील लेख वा चॅनेलवरील तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया ऐकूनसुद्धा सर्वसामान्य लोकांना या पॅकेजमधल्या शून्य गोष्टी कळल्या असाव्यात.
लोकांना आता ‘सर्व पूर्वपदावर कधी येणार?’ यापेक्षा ‘ते कसं येणार वा आणणार?’ याचा काही रोडमॅप सरकारकडे आहे का, यात जास्त इंटरेस्ट आहे.
लोकांना रोग कळलाय, परिणाम कळलाय, काळजी काय घ्यावी हे कळलंय. संक्रमण, मृत्यूदर कळलाय, लस तयार नाही, ती तयार व्हायला वेळ लागणार, हेही कळलंय. याशिवाय जे परदेशातून आले त्यांनी हा रोग आणला, तबलिगींनी पसरवला, मुसलमान पसरवताहेत, चीनने बनवलाय वगैरे नको ती माहितीही कळलीय.
१५ दिवसांनी २०२०चा सहावा महिना सुरू होईल आणि पुढचे सहा महिने चित्र काय असेल हे कुठलेच सरकार सांगत नाहीए. या महिन्याच्या २६ तारखेला ‘मोदीपर्व-२’ला एक वर्ष पूर्ण होईल. सरकार वर्षपूर्तीनिमित्त जनतेला काहीच सांगू शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. २०२० हे शुद्ध मराठीत ‘भाकड वर्ष’ जाणार हे आता लोक मनोमन धरून चाललेत. आणि आता हा सक्तीचा तुरुंगवास त्यांच्या अंगावर येऊ लागलाय.
स्थलांतरित मजूर पायी वाट फुटेल तसे निघालेत, तसेच जवळपास ७० दिवस लॉकडाऊन मधले शहरी, निमशहरी, ग्रामीण, खेडोपाडीचे गरीब ते श्रीमंत व्हाया मिडल, हायर मिडल क्लास असे सर्वच वर्ग आता मानसिकदृष्ट्या विचलित होऊ लागलेत. किराणा घेणे, जेवण बनवणे व टीव्ही पाहणे, मोबाईलवर बोलणे या चार क्रिया आलटून-पालटून करून करून तो आता भेलकांडायच्या स्थितीला आलाय!
कारण रोगाच्या, अर्थव्यवस्थेच्या आकडेवाऱ्या ऐकून, वाचून, पाहून तो कंटाळलाय. उत्तर नसलेलं गणित कसलं घालताय, असं म्हणत तो हळूहळू चिडीला आलाय.
वेतनात कपात, रोजगार बंद, पुढचे सहा महिने तरी उत्पन्न नाही किंवा ते अनियमित वा खंडीत मिळणार. वर रोगराईची भीती आहेच. एखाद्या अंधाऱ्या निर्वात पोकळीत दिशाहीन प्रवास करत रहावा तसा हा सगळा काळ आहे.
सरकारने आता लॉकडाऊन वाढवत बसण्यापेक्षा तो काढून लोकांना स्वयंशिस्तीने जगण्याचा सल्ला द्यावा व साथ आटोक्यात ठेवण्यास मदत करावी हे सांगावे. आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम कराव्यात. फॅमिली डॉक्टर्सनाही विश्वासात घेऊन मायक्रो लेव्हलवर सेवा तयार ठेवावी. रोगावर लस नाही पण रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय खावे, प्यावे, कुठली पूरक औषधे घ्यावीत? काय पूर्ण टाळावे यातून रोगाची भीती कमी करून त्याविरोधात सर्व शक्तीनिशी सामना करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात त्याला उतरू द्यावे. आज ना उद्या ज्या गोष्टीचा सामना करायला लागेल, तो आजच करून बघायला काय हरकत आहे? कारण केरळ, गोवा यांच्या मार्गाने जावे लागेल.
लॉकडाऊन एके लॉकडाऊनमधून ना रोग कमी होतोय, ना रोजचं जीवन सुरू होतंय. उलट अतिश्रमाने, कामाच्या तणावाने डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, पोलीस, हे ‘फ्रंट वॉरिअर्स’च धारातीर्थी पडताहेत. मग हा लॉकडाऊन नेमका वाचवतोय कुणाला?
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या काळात सतत लोकसंपर्कात असलेले भाजीवाले, किराणा दुकानदार, केमिस्ट वा चिकन-मटण-अंडीवाले यापैकी कुणाला बाधा झाल्याचं ऐकिवात नाही. घाऊक बाजारातलेही कुणी संक्रमित व दगावले नाहीत.
धारावी हॉटस्पॉट ठरत असताना त्या पद्धतीची कांदिवली, भांडूप, विक्रोळी, सायन अँटॉप हिल, माहीम मच्छीमार नगर, बांद्रा, खारदांडा, वर्सोवा हे सर्व सुरक्षित कसे? का इथे चाचण्याच नाहीत?
२० लाख हजार कोटीचं पॅकेज असो की सक्तीचा लॉकडाऊन, दोन्हीतून काही ठोस हाती लागलंय, लागतंय असं दिसत नाहीए. मग हे लॉकडाऊन मागे लॉकडाऊन पर्व कशासाठी?
सामान्य जनता आता वाट पाहून कंटाळलीय. कशाचेच ठोस उत्तर वा उपाय ना केंद्राकडे आहे, ना राज्य सरकारांकडे. नुस्तीच चालढकल वा एकमेकावर ढकलाढकली चाललीय. यातून आता एक शंका मनात येऊ लागलीय…
या कुलूपाची चावी तर हरवून बसले नाहीए ना केंद्र व राज्य सरकार?
..................................................................................................................................................................
लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment