अजूनकाही
संकटात संधी शोधणारे तत्त्वज्ञान भारताला नवीन नाही. भारतीयांना तर मुळीच नाही. एखादा कागद एखाद्या सरकारी पूर्ततेसाठी कमी पडला रे पडला की, संकट कोसळते ते सामान्य माणसावर आणि त्यात संधी सापडते ती सरकारी कर्मचाऱ्याला. तुटवडा, टंचाई, चणचण या गोष्टी तर सामान्य माणसाला जन्मापासून चिकटलेल्या. पण त्यात संधी त्याला नाही. व्यापारी काळा बाजार करणार, मध्यस्थ अव्वाच्या सव्वा किंमत लावणार आणि चणचण कायमची दूर होणार नाही ती नाहीच.
शेतकऱ्याचेच पाहा ना. जवळपास सतत संकटात. मात्र त्यात संधी शोधायची युक्ती त्याला कधी जमणार नाही. करोनाच्या काळात त्याची फळे, भाज्या, कोंबड्या, कांदे, कापूस असा सारा माल त्याच्याकडे संधी साधायची बुद्धी नसल्याने संकटमोचकाच्या हवाली होतोय. मालामाल त्या अवसरवाद्याची होतेय. प्रत्येक आपदा आपदधर्मासारखी निमूट भोगणाऱ्या उत्पादकाकडेच येतेय. तरीही प्रधानसेवक म्हणतायत- ‘आपदा में अवसर’!
तो स्थलांतराच्या उलट्या प्रवाहाने निघालेला श्रमिक बघा! केवढ्या आपदा सोबतीला घेऊन निघाला तो. किंबहुना रस्त्यावर येण्यापासून आपदांना आरंभ झाला. त्याने संधींची वाट पाहिली अन शेवटी निघाला ‘आत्मनिर्भर’ होऊन. स्वबळावर तो अन त्याचे कुटुंब कित्येक किलोमीटर्सची तंगडतोड करत सुटले. अवसरवादी त्याला खूप भेटले. ट्रकवाले, सायकल विक्रेते, तिकीट विकणारे सरकार, लाचखाऊ पोलीस आणि या आपदग्रस्तांच्या साहाय्याला आलेल्या असंख्य प्रसिद्धीपिपासू संघटना आणि व्यक्ती… आपदा कोणावर अन अवसर कोणाला!
तरी बरंय करोनाचं संकट नैसर्गिक आहे. हिंदी चित्रपटात तर संकट उत्पादन व संकट निवारण या विषयासाठी एक पात्रच रचलेले असते. खलनायक वा खलनायिका असे त्यांना म्हणतात. संधीच संधी शोधणारी ही पात्रे काय भारतीयांना माहीत नाहीत? अहो, असा हा भारतीय माणूस सदा संकटग्रस्त असतो म्हणून तर अवताराची अपेक्षा करत राहतो ना तो! विघ्नहर्ता, संकटमोचक, तारणहार, त्राता, जीवनदाता अशी कितीतरी नावे मग त्या त्या अवतारांना दिली जातात. म्हणजे संधी साधणारे तेच. सामान्य जन बिचारे आणखी एक संकट आणि आणखी एक अवतार यांत हेलकावत राहतात.
विनामोबदला मदत करावी, सेवेत स्वार्थ नसावा, कर्म करत राहावे व फळाची अपेक्षा धरू नये आणि ‘नेकी कर, दर्या में डाल’ अशा शिकवण्या लहानपणापासून याच भारतीयांना देणारे एकाएकी असे हिशेबी व फायदाउपटू कसे काय होतात?
जामिया मिलियात शिकणारा माझा एक विद्यार्थी इमाद उल हसन याने एक फेसबुक कथन केलेय. तो म्हणतो, ‘ ‘आपदा में अवसर’ हे मोदींच्या चरित्राचे शीर्षक असायला हवे! २००१पासून ते चरित्र सुरू केले तर. हेच योग्यय!!’
आपदांमध्ये अवसर दडलेले असतात हे खरे, पण ते शोधायला उसंत, नजर आणि परंपरा लागतात. हपापाचा माल गपापा हा अवसरवाद नव्हे. अस्पृश्यता ही आपदा होती. तीत उच्चवर्णीयांना अवसर दिसला. म्हणून अस्पृश्यांनी ही आपदा गौरवास्पद मानावी की काय? शारिरीक बळ ज्यांचे कमी ती आपदा म्हणून बलिष्ठांनी त्यांना छळावे की काय? त्यात कसला आलाय अवसर! आपदांमधला अवसर दिसतो, कारण त्यामागे प्रशिक्षण, शिकवण आणि निरीक्षण असते. ते कोण कोणाला देते आणि कोठे व कसे मिळते?
भारताचा बराच इतिहास असा आपदांचा स्वार्थासाठी वापर करायला लावणारा दिसतो. ज्यांनी ही समाजरचना जन्माला घातली, त्यांना व त्यांच्या वारस पिढ्यांना आपदांमधून मार्ग कसा काढावा याची शिकवण त्यांचे जातीपुंज, नातलग, हितसंबंधांच्या साखळ्या आणि कधी धाकदपटशा तर कधी लाचलुचपत यांमार्फत मिळत गेली. सत्ताधारी जातिवर्ग कायमच आपदांची संभाव्यता जाणून असतो. सत्ता टिकवायची तर जोखमी घ्याव्या लागतात. सबब जोखमींमधून सुटका कशी करवून घ्यायची हेही ते जाणतात. ज्यांना सत्ता, संपत्ता, प्रतिष्ठा, शिक्षण यांपासून सदैव बाजूला ठेवले गेले, त्यांना कशी असेल अवसरप्राप्तीची शिकवण?
पकड ढिली झाल्याची जाणीव होताच पक्षी व प्राणी आपल्या हल्लेखोरांपासून पळ काढतात किंवा प्रतिहल्ला करतात. पण त्यांची ती नैसर्गिक वृत्ती झाली. बचाव व स्वरक्षण प्रत्येक प्राणीमात्राचा हक्क आहे. मात्र माणूस बुद्धी, विचार, तर्क, कल्पना, इतिहास, अनुभव यांआधारे संकट आणि संधी दोन्ही उत्पन्न करू शकतो. उपद्रवमूल्य कधीकधी फिके पडते. उपकारापोटी गुलामी अथवा शरणागती आपण ठिकठिकाणी पाहिलीय. त्यामुळे मानव अप्रतिष्ठीत तर जगतोच, खेरीज अनेक पिढ्या तशाच पुढे वाढवत नेतो. प्रथा प्रघात, कुळाचार, पंथ, नवस आदी प्रकारांना याही छटा असू शकतात. त्याविरुद्ध बंड केल्यावरच त्यातून मुक्ती मिळवता येते.
अवसरवाद हा असा बंडखोरी, प्रतिकार आणि क्रांती करायला हतोत्साहित करतो. साहस व धाडस यांपेक्षा स्वार्थ व लबाडी यांचा वास ‘आपदा में अवसर’ यांत जास्त येतो. जिथे नीतीमूल्ये नसतात, तिथे संधीसाधूपणाच राज्य करत असतो. ‘क्रायसिस मॅनेजमेंट’ या विषयात कच्चे दुवे शोधून आपत्तीवीर मात करणे शिकवले जाते. परंतु नैमित्तिक वा प्रासंगिक बाबतीतच अवसर कसा काय पुढे येतो समजत नाही.
दारिद्रय, जातीव्यवस्था, विषमता, शोषण या गोष्टी कायमस्वरूपी आपदा समजून त्यात काही कायमचा अवसर सापडल्याचा दावा कोणी का करत नाही? कदाचित जात, गरिबी या फायदेशीर आपदा असाव्यात. उत्तम अवसर जात नामक आपदेमुळे मिळत असेल तर जातीला आपदा का माना, पेच पडणार नाही का? दारिद्रयामुळे शिक्षण नाही, शिक्षणाअभावी जाण नाही असे चक्र भेदायचे की फिरतेच ठेवायचे? अडाणी लोकांना गंडवणे आणि अल्पवयीनांचे लैंगिक शोषण करणे यांत अज्ञान हे संकट. त्यावर मात करायची की ते वाढवायचे हा पेच कसा काय असेल? नीतीमान माणसाला या आपदेची दुहेरी बाजू कशी दिसेल? ‘नाही म्हणजे नाही’ हे वाक्य सांगायला ‘पिंक’मधला वकील अमिताभ बच्चन कशाला पाहिजे हो!
संधी आलीच आहे तर कागद, छपाई, कर्मचारी, कर आदींवरचा खर्च घटवूया अशी युक्ती वृत्तपत्रांच्या मालकांनी आखलीय. प्रत्यक्षात तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच गेल्या आठ-दहा वर्षांपासून कागदी माध्यमाकडून डिजिटल माध्यमाकडे जाण्याची तयारी या मालकांनी केलेलीच होती. करोना वृत्तपत्रांमुळे पसरतो, पेपर टाकणारी पोरे बाधित होऊ शकतात, पत्रकारांना येणे-जाणे मना असल्याने बातम्या घटू लागल्या वगैरे कारणे सुरुवातीला पुढे आली. अनेक पत्रकार कामावरून काढले गेले. अनेकांच्या वेतनात ३० ते ५० टक्के कपात झाली. काही आवृत्त्याच बंद करण्यात आल्या. हा प्रकार ‘आपदा में अवसर’ म्हणून कौतुके साजरा करण्यासारखा कसा असेल?
तंत्रज्ञान प्रगत होत जाते, तसे उत्पादनाचे काही प्रकार जुने होत जातात. शिसाच्या टंकांऐवजी संगणक जुळणीसाठी आणले गेले, त्यावेळीही बेकारी झालीच. परंतु तो बदल दिसत होता. अपेक्षितही होता. करोना अचानक सुसंधीमध्ये कसा बदलून जातो हो? पगारकपात समजू शकते. नोकरकपात हा अवसर कसा?
‘आपदा में अवसर’ असे तत्त्वज्ञान पाजणारा प्रधानसेवक यासाठीच तर माध्यम मालकांना प्रिय झाला वाटते. तुमचा खप कमी झाला, वाचक रोडावले त्याला जबाबदार इंटरनेट व मोबाईल नाही. माहिती अती मिळाली म्हणून ती लाभदायक नसते. उथळ पाण्याला खळखळाट फार, तसा तथ्यहीन व बिनबुडाच्या माहितीला वेग फार. विचार, चिंतन, विश्लेषण यांची जागा जगभर अजूनही कागदावरच टिकून आहे. पण भारतीय मालकांनी व मोदीमित्र कारभाऱ्यांनी अंकांत सारा थिल्लरपणा भरला. सरकार धाकात ठेवणे सोडले. सरकारी भोंग्यांचे रूप धारण केले. मग काय होणार? गंभीर वाचक, जिज्ञासू नागरिक पर्याय शोधणार ना! तो खरा ‘आपदा में अवसर’. आता ‘चला, डिजिटल होऊ’ ही तर संकटावेळची वसुली झाली. एका रुपयात अंक विकले जाऊ लागले, तेव्हा इतर वृत्तपत्रांवर आपदा कोणी ओढवली? तिचा लाभ कोणी घेतला? दोन्ही जागी त्याच बड्यांची उपस्थिती होती.
आपत्तीला इष्टापत्ती फार कमी वेळा म्हणता येते. आपोआप काही लाभ संकटांमधून झाला तर ती इष्टापत्ती! अवकाळी पावसाने पीक आडवे झाल्यावर कोणता अवसर कोण्या शेतकऱ्याला सापडेल कोण जाणे! हां, सावकार खूश होईल. जमीन कसायला पुन्हा मिळाल्याचा आनंद बैलांना होईल की काय!
मुंबईत गिरणी कामगारांचा संप बेमुदत होताच एकेक कापड गिरणी बंद पडत गेली. बिल्डर-डेव्हलपर-नोकरशाही-नेते-गुंड यांचे कितीतरी फावले! हजारो अपार्टमेंटस उभा राहिली. मॉल्स, थिएटर्सही जन्मली. ही इष्टापत्ती म्हणावी काय? कारण ज्या गिरण्यांच्या जागी चित्रपटगृहे उभी राहिली, त्यात या इष्टापत्तीचा एक भागीदार असणाऱ्या माफियांची कथानके झळकू लागली. संकटात सुसंधी या तत्त्वाचा उत्तरार्ध जे होते, ते चांगल्यासाठीच हा असतो. यात दैव, कर्म, नशीब, ग्रह यांचा समावेश केला जातो. आपत्तीला भागधेयाची अपरिहार्यता ठरवले की झाले! मानवी कारस्थाने, कावे, लबाड्या यांकडे लक्षच जाणार नाही.
व्यापार वाईट नसतो. नफाही तसाच. तो नीतीनियमाने होत असल्यास हरकत नाही. हिंदुस्थान एअरोनॉटिक्सपाशी तयारी असूनही फ्रान्सकडून हवाई दलासाठी लढावू विमाने खरीदण्याचा कोणी अवसर मिळवला अन आपत्ती कोणती उपटली होती, हे काही अखेरपर्यंत समजले नाही बुवा!
असले, बरेच व्यापारी आता सत्तेत आहेत अन सत्ता व्यापारच झालीय.
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
??????? ??????
Fri , 15 May 2020
अतिशय मार्मिक विवेचन, सद्य परिस्थिती आणि भारतीय राजकीय परिघाच्या बेबंद व्यापारीकरणापूढे लोककल्याणाची पुंगळी वाजू शकत नाही हे वास्तव अत्यंत संयत शब्दात कथन केलेय.