अरुण फडके : प्रामाणिक, निर्भीड, व्यासंगी आणि ‘मराठी लेखन कोशा’चे शिलेदार
संकीर्ण - श्रद्धांजली
निर्मोही फडके
  • अरुण फडके
  • Fri , 15 May 2020
  • संकीर्ण श्रद्धांजली अरुण फडके Arun Phadake शुद्धलेखन Shuddhalekhan शुद्धलेखन ठेवा खिशात Shuddhalekhan Theva Khishat मराठी लेखन-कोश Marathi Lekhan-Kosh शुद्धलेखन मार्गप्रदीप Shudhlekhan Margprdeep

‘शुद्ध-अशुद्ध’ या शब्दांना वेगवेगळे रंग लावून, त्यावर नुसताच शाब्दिक गदारोळ उठवणाऱ्यांच्या काळात, गेली २० वर्षे मराठी प्रमाण-भाषेच्या स्वरूपात एकवाक्यता येण्याकरता ठामपणे उभे असलेले आदरणीय अरुण फडके सर यांचे काल १४ मे २०२० रोजी नाशिक येथे निधन झाले.  प्रामाणिक, निर्भीड आणि व्यासंगी असे फडके सर ‘मराठी लेखन-कोश’कार म्हणूनच ओळखले जायचे. मराठी प्रमाण भाषेचे व्याकरण आणि शब्दलेखन याचा एक अमोलिक खजिना आपल्यासाठी मागे ठेवून सर अचानक निघून गेले.

जवळपास एक हजार वर्षांचा इतिहास असणारी, दर बारा मैलांवर बोलींमधून बदलणारी, आधुनिक इंग्रजाळलेले रूप असणारी, मुंबई-हिन्दीच्या प्रभावातील अशा मराठीच्या सगळ्या मिश्रणांमधून प्रमाण मराठी भाषेतील शब्दलेखनासंदर्भात नियमबद्ध, सोदाहरण असे अभ्यासपूर्ण स्वरूपाचे पुस्तक प्रकाशित करणे म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखे होते. या संदर्भात सरांनी जे संशोधन केले, कष्ट घेतले त्याला तोड नाही.

ठाण्यातील वडिलोपार्जित मुद्रण व्यवसाय आणि आधुनिक तंत्रज्ञानानुसार संगणकीय अक्षरजुळणी करण्याच्या व्यवसायात असणाऱ्या सरांनी हे शिवधनुष्य केवळ उचललेच नाही, तर यशस्वीपणे पेलून धरले.

स्वतःला मराठी भाषेचा सामान्य अभ्यासक समजणारे फडके सर उत्तम प्रशिक्षकही होते. स्वतः अभ्यासून तयार केलेल्या मराठी लेखन-कोशाचे केवळ पुस्तक प्रकाशित करून ते थांबले नाहीत, तर योग्य लेखनाविषयीची एक चळवळच त्यांनी सुरू केली. मराठी प्रमाण-भाषेच्या योग्य लेखनाचा प्रसार व्हावा, अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत, अभ्यासकांपर्यंत हा अभ्यास पोहोचावा, याकरता सरांनी स्वतःची व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा, अभ्यासवर्ग इत्यादी आयोजित करण्यास प्रारंभ केला. हळूहळू या अभ्यासवर्गांमधून सरांचे अनेक विद्यार्थी तयार होण्यास सुरुवात झाली.

लेखन-कोशाच्या लेखनानंतर सरांची ‘शुद्धलेखन मार्गप्रदीप’, ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’, ‘सोपे मराठी शुद्धलेखन’, ‘चकवा शब्दांचा...’ ही पुस्तके प्रकाशित झाली. ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’, या पॉकेट-बुकमधून व्यवहारातील, लेखनातील १०,००० मराठी शब्द योग्य पद्धतीने कसे लिहावेत, हे समजले. नंतर या छोटेखानी पुस्तकाचे अॅपही अल्पावधीतच लोकप्रिय झाले.

सरांनी तयार केलेल्या ‘मुद्रितशोधन आणि संपादनकौशल्य’ या ४५ तासांच्या अभ्यासक्रमाला मुंबई विद्यापीठाने रीतसर मान्यता दिली. त्यामुळे सरांच्या भाषाविषयक प्रशिक्षण अभ्यासवर्गातून अनेक उत्तम मुद्रितशोधक आणि संपादक तयार होऊ लागले. मराठी भाषा विषयाचे अध्यापन करणाऱ्या शालेय शिक्षकांनाही काही प्रमाणात मराठीच्या योग्य लेखनाबद्दलच्या मार्गदर्शनाची गरज असते. अशा शिक्षकांना कसे मार्गदर्शन करावे, यासंबंधीचाही एक अभ्यासक्रम सरांनी तयार केला होता. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांत फिरून सरांनी अनेक कार्यशाळा घेतल्या. हजारो अभ्यासक, मुद्रितशोधक, संपादक, शिक्षक, विद्यार्थी घडवले.

नव्या काळाची गरज ओळखून सरांनी इंग्लिश स्पेल-चेकप्रमाणे मराठी स्पेल-चेकही तयार करण्यास सुरुवात केली. तसेच संगणकीय मराठी फॉन्ट तयार करण्याकरता हातभार लावला. शासनाच्या अनेक भाषा समित्या, मंडळे यांच्या कार्यात सरांनी योगदान दिले.

मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा मिळावा असे वाटत असेल तर तिच्या प्रमाण-भाषेचे लेखन हे एकसूत्री होणे गरजेचे आहे, याबद्दल त्यांचे विचार ठाम होते. ‘शुद्धलेखन हा आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे’ हे ब्रीदवाक्य त्यांनी आपल्या पुस्तकांवर छापले होते.

शासनाच्या निर्णयानुसार ‘योग्य शब्दलेखन’ ही संकल्पना नंतर रूढ झाली असली तरी, शुद्ध-अशुद्ध हे शब्द वापरल्यामुळे मराठीच्या इतर बोलीभाषा किंवा तिचा वापर करणारे यांना कमी लेखणे अशा संकुचित विचारसरणीला फडके सरांच्या अभ्यासात किंवा तत्त्वांमध्ये कधीच थारा नव्हता.

सरांच्या ‘शुद्धलेखन मार्गप्रदीप’ या पुस्तकातील प्रस्तावनेत सरांनी मांडलेले हे विचार त्याचे द्योतक आहेत. त्यांनी लिहिलेय –

भाषा ही प्रवाही आणि परिवर्तनशील अशी गोष्ट आहे. ती बोली स्वरूपात असते, तेव्हाही तिच्यात बदल होतच असतात, आणि ती लेखी स्वरूपात येते तेव्हाही तिच्यात बदल होतच असतात. भाषेचे स्वरूप हे नवीन पिढीला शिकवताना ते सर्व ठिकाणी सारखेच शिकवले जाणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे ह्या भाषेतून विविध विषयांचे लेखन ठिकठिकाणच्या लेखकांकडून होणार असते. त्यामुळे ह्या लेखनातही एकसूत्रता असणे आवश्यक असते.

... निरीक्षणांतून आणि विचारमंथनातून त्या भाषेचा काही विशिष्ट स्वभाव किंवा तिची विशिष्ट प्रवृत्ती समोर येते आणि मग त्याला अनुसरून तिच्या लेखनाचे काही नियम ठरवले जातात. भविष्यात भाषेत नव्याने येणाऱ्या किंवा तयार केल्या जाणाऱ्या शब्दांचे नियमन करण्यासाठीही हे नियम आवश्यक असतात. ह्या नियमांनुसार किंवा हे नियम पाळून केले जाणारे लेखन म्हणजेच ‘शुद्धलेखन’ होय.

... आजच्या काळात ज्या भाषा केवळ ‘संपर्काचे साधन’ एवढ्या उद्दिष्टापुरत्या राहिलेल्या नसून, ज्ञाननिर्मिती आणि ज्ञानप्रसार ह्यांचे एक प्रमुख साधन म्हणून त्यांचा वापर केला जातो, अशा प्रगत भाषांच्या बाबतीत एवढा संकुचित दृष्टिकोन बाळगून चालत नाही, चालणार नाही. मराठी ही अशा प्रगत भाषांपैकी एक भाषा आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

... शुद्धलेखन म्हणजे केवळ ऱ्हस्व-दीर्घ नव्हे. ते चुकले तरी ‘संदर्भाने’ अर्थ समजतो असे बहुतेकांना वाटते. अनेक बाबींचा अंतर्भाव शुद्धलेखनात होतो. प्रत्येकाने स्वतःच्याच मर्जीप्रमाणे आणि ज्ञानाप्रमाणे लेखन केले, तर अनेक शब्दांचे अर्थ बदलतील. ‘केवळ संदर्भाने’ ह्या सगळ्याचा योग्य तो अर्थ लावत बसायची वेळ आली तर ‘संपर्क’ हे किमान उद्दिष्ट साध्य होणेही दुर्लभ होईल.

सरांच्या पुस्तकातील प्रस्तावनेमधील विस्ताराने दिलेल्या या अंशामधून ‘शुद्धलेखन’ या वादग्रस्त संकल्पनेमागील त्यांची भूमिका स्पष्ट होते.

संस्कृत भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द, देशी मराठी शब्द, परकीय भाषांमधून मराठीमध्ये आलेले शब्द, बोली रूपांमधील व्यवहारात प्रचलित असलेले शब्द, नव्या विज्ञान-तंत्रज्ञानातील संकल्पनांकरता तयार केलेले शब्द इत्यादींचे लेखन, त्यांचे सामान्यरूप, वचन, जोडाक्षर, शब्दसिद्धी, विरामचिन्हे, वाक्यरचना इत्यादी, शब्दरचनेच्या अशा अनेक अंगांचा अभ्यास करून सरांनी आपल्या पुस्तकांतून आणि आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले.

सरांच्या कार्याबद्दल लिहू तेवढे कमीच आहे.

मराठी साहित्यातील बोलींचा गोडवा आणि ज्ञानभाषा, व्यावहारिक भाषा म्हणून तिच्यातील प्रमाण-भाषेचा एकसूत्रीपणा, तिचे नियम यांचे जतन, संवर्धन शाळा-पातळीपासून व्हावे ही त्यांची मनापासून इच्छा होती. या लहान वयात ही मुले हे दोन्ही फरक लवकर ओळखून भाषा आत्मसात करतात, याबद्दल त्यांना दृढ विश्वास वाटत होता.

अगदी शालेय विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर वर्गात मराठी साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत, तसेच अनेक शिक्षक, लेखक, पत्रकार, मुद्रितशोधक, संपादक, प्राध्यापक अशा मराठी वाचन-लेखनाशी संबंधित हजारो मराठी-प्रेमींच्या मराठी लेखनविषयक प्रश्नाकरता ‘अरुण फडके सर’ हे अंतिम उत्तर. सर केवळ उत्तर देऊन थांबत नसत, तर तो ठरावीक शब्द तसाच का, त्याबद्दलचा नियम, कारण, इतर उदाहरणे ही अवांतर माहिती देऊन प्रश्नकर्त्याचे पूर्ण समाधान करत.

मराठी भाषेच्या नावाने होणारे राजकारण, तिच्या परिस्थितीबद्दलच्या होणाऱ्या वायफळ, गळेकाढू चर्चा, मराठी माणसाकडूनच होणारी मराठीची चेष्टा, वादावादी अशा गढुळलेल्या वातावरणात फडके सर एकांड्या शिलेदाराप्रमाणे मार्ग काढत राहिले. विद्यार्थी घडवत राहिले.

आपल्याकडील ज्ञानाचा, माहितीचा कोणताही बडेजाव त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीच दिसला नाही. समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकेल असे बाह्य व्यक्तिमत्त्व नसणारे फडके सर बोलायला लागले की, मात्र समोरचा अवाक झाल्याशिवाय राहत नसे. विषयाला, नियमाला धरून, मुद्देसूद, सोदाहरण स्पष्टीकरण देत शांतपणे बोलणे. केवळ वादाकरता वाद घालणे, आवाज चढवून आपले मत मांडणे, एखाद्याची अवाजवी स्तुती करणे किंवा अवाजवी निंदा करणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते.

अतिशय साधे, सौम्य, संयत, पारदर्शी, ऋजू परंतु निग्रही व्यक्तिमत्त्व. समोरच्या व्यक्तीचा, त्याच्या मतांचाही आदर ठेवणारे. आपल्या अभ्यासपूर्ण तत्त्वांशी ठाम असणारे, पण एखाद्याने तितक्याच अभ्यासपूर्ण पद्धतीने आपले मत मांडले तर त्याचाही स्वीकार करणारे. एवढे मौल्यवान कार्य करूनही, कुठेही ‘मी’पणाचा लवलेश न दर्शवणारे. कुठलेही मोठे पुरस्कार, पदव्या, सत्कार-समारंभ, सोहळे, छायाचित्रे इत्यादी चकमकाटांपासून दूर राहून शांतपणे, ध्येयाने झपाटल्यासारखे आपले संशोधनाचे आणि अभ्यासवर्गांमधून ज्ञानदानाचे कार्य करणारे, असे फडके सर.

सोशल मीडियाच्या जगातही स्वतःला सामावून घेताना फक्त आपल्या विषयापुरते आपले तात्त्विक, अभ्यासपूर्ण उत्तर, मत मांडून बाजूला होणारे. विषयाला इतर अवांतर फाटे कधीच नाहीत. फोन केला तरी गप्पांमध्येही फक्त मराठी भाषा, तिच्याबद्दलचीच चर्चा.

कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराशीही त्यांनी तेवढ्याच निग्रहाने अडीच-तीन वर्षें लढा दिला. सरांचे कुटुंबीय आणि स्नेही यांच्या मानसिक आधाराचे बळही त्यांना सतत मिळत राहिले. पुन्हा नव्या उमेदीने आपल्या कार्यशाळा घेणे त्यांनी चालू केले. मराठी भाषाविषयक अनेक प्रकल्प करण्याचे त्यांनी योजले होते. भविष्यातील या योजनांबद्दल ते भरभरून बोलत... पण सरांविषयी इतक्या लवकर असे भूतकाळी वाक्यांमध्ये लिहायची वेळ येईल असे वाटले नव्हते.

फडके सर,

तुम्ही स्वतः व्रतस्थ राहून आम्हालाही व्रत दिले आहे. आपल्या मराठी भाषेकरता, आम्हा मराठी भाषा-प्रेमींकरता आपण केवढा तरी मोठा पुण्य-संचय मागे ठेवला आहे, पण तरीही आमच्यातून इतक्या लवकर, अचानक निघून गेला आहात, हे मान्य करणे मात्र खूपच त्रासदायक होत आहे.

विनम्र श्रद्धांजली!

..................................................................................................................................................................

डॉ. निर्मोही फडके

nirmohiphadke@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......