अजूनकाही
या देशात सामान्य माणसाची किंमत किती?
फारशी नाही.
कीडा-मुंगी आणि सामान्य माणसं यांच्यात फरक किती?
फारसा नाही.
नारायण सुर्वे यांनी लिहिलेल्या ‘शीगवाला’ या कवितेत ‘आता आदमी झाला सस्ता, बकरा म्हाग झाला’ असं एक वाक्य आहे. सुर्वे माणसांचं जगणं प्रत्यक्ष पाहणारे, अनुभवणारे, समजून घेणारे मुंबईकर कामगार होते. त्यामुळे त्यांचे शब्द केवळ कल्पनाविलासातून आलेले नाहीत हे तर नक्की. सुर्व्यांचा ‘आदमी’ हा ‘आम आदमी’ होता. तो सस्ता झाल्याची सुर्व्यांची नोंद सत्तरच्या दशकातली आहे. म्हणजे त्याच्या आधी किमान दशकभर सुर्वे ते पाहत आले असणार, जगत आले असणार. त्या ‘आम आदमी’चं सस्तेपण आजघडीला काय किमतीचं आहे?
ते अजूनच सस्तं झाल्याचं दिसतंय.
याची उदाहरणं लॉकडाउन जाहीर झाल्यापासून रोज पाहायला मिळत आहेत.
२४ मार्च २०२० रोजी पंतप्रधानांनी देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं आणि दोन-चार दिवसांतच मोठ्या शहरांतून आम आदमींचे तांडे आपलं चंबूगबाळं उचलून, बायका-पोरांना घेऊन हजारो किलोमीटरवर असलेल्या आपल्या घरांकडे पायपीट करत निघाले. तेव्हापासून उद्या वर्तमानपत्रांत कुठली हेडलाईन येईल, शेअर मार्केट कोसळून अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, मध्यमवर्ग काय म्हणेल, उद्योजक काय म्हणतील, याचाच विचार पदोपदी करणाऱ्या इव्हेंट मॅनेजर कम पंतप्रधानांनी या मैलोनमैल पायपीट करणाऱ्यांविषयीची साधी बातमी बदलण्याची फारशी तसदी घेतली नाही की, त्यांची छायाचित्रं बदलतील याचीही. त्यांनी इतकीच काळजी घेतली की, या बातम्या, ही छायाचित्रं सारखी सारखी हेडलाईन होणार नाहीत. किंबहुना त्याच्या बातम्याच होणार नाहीत, झाल्या तर त्या सहज लक्षात येणार नाहीत. त्यासाठी पंतप्रधानांनी आणि त्यांच्या समर्थकांनी ‘थाळ्या वाजवा’, ‘दिवे लावा’, ‘फुले वाहा’पासून‘तबलिगी जमाती’पर्यंत कितीतरी उपक्रम हाती घेतले. हिंदी चॅनेलवाल्यांनी हिंदू-मुस्लीम, राष्ट्रवाद, देशप्रेम यांचे नेहमीप्रमाणे चाटण चाटवले. त्यांच्या चेल्याचमच्यांनी, स्तुतिपाठकांनी थाळ्या वाजवण्याचे, दिवे लावण्याचे महत्त्व, नक्षत्र, वार यांचे माहात्म्य सांगायला सुरुवात केली. सरकारवर मेहेरबान असलेली जमात ‘पीएम केअर्स’मध्ये लाखो रुपयांच्या देणग्या जमा करू लागली. पंतप्रधान स्वत: नेहमीप्रमाणे सोळा-सोळा, अठरा-अठरा तास काम करू लागले!
आज लॉकडाऊनचा ५०वा दिवस! या काळात आपल्या इव्हेंट मॅनेजर कम पंतप्रधानांनी अनेक इव्हेंट सुखवस्तू मध्यमवर्गीयांना करायला लावले. त्यांनीही ते केले. केवळ एवढंच नव्हे तर इतर अनेक देशासाठीचे निर्णयही घेतले म्हणे! त्याशिवाय देशाची काळजी करणाऱ्या पंतप्रधानांना शांत कसे बसवणार? सुखाची झोप कशी लागणार? त्यामुळे त्यांनी परदेशात अडकून पडलेल्या भारतीयांना परत आणणे, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलणे, राज्याराज्यांतील स्थितीचा आढावा घेणे, लॉकडाउनचे नीतीनियम, ध्येयधोरणे बनवणे, असा कामांचा धडाका लावला आहे नुस्ता.
मग दिवसाचे सोळा-सोळा, अठरा-अठरा तास काम करणाऱ्या इव्हेंट मॅनेजर कम पंतप्रधानांना पायाचे तुकडे पडेपर्यंत जीवाच्या आकांताने घराकडे निघालेल्या आम आदमींकडे पाहायला कसा वेळ मिळणार? आणि त्यांच्या इशाऱ्यावर थाळ्या वाजवणाऱ्या, दिवे लावणाऱ्या आणि फुले वाहणाऱ्या सुखवस्तू मध्यमवर्गीयांना तरी स्वत:ची सुरक्षा सोडून त्यांच्याकडे कसं पाहवणार?
त्यात हे पायपीट करणारे आम आदमी मिळालेली भाजी-भाकरी खायची, मजेत पडून राहायचं सोडून रेल्वे रूळावर जाऊन झोपतात आणि मरतात. इतकं चालतात की त्यातच त्यांचा जीव जातो. उन्हातान्हात बायका-पोरांना घेऊन अशी पायपीट केल्यावर किंवा रेल्वे रूळावर झोपल्यावरही पंतप्रधानांनी आपलं ‘इव्हेंट मॅनेजर’चं काम सोडून त्यांचा जीव वाचवण्यासाठी यावं, ही अपेक्षाच किती मूर्खपणाची आहे!
पंतप्रधानांना तुम्ही निवडून दिलं असेल, दुसऱ्या वेळी पहिल्यापेक्षा जास्त मतांनी दिलं असेल, पण म्हणून काही त्यांनी तुमच्याच दिमतीला राहायचं? स्वत:चा, स्वत:च्या मातृसंघटनेचा, स्वत:चा पक्षाचा अजेंडा वाऱ्यावर सोडून द्यायचा? स्वत:ची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी बंद करून टाकायची?
भलेही तुम्ही पंतप्रधानांना इव्हेंट साजरे करण्यासाठी निवडून दिलं नसेल, पण या देशातल्या कित्येक मध्यमवर्गीयांनी त्याचसाठी निवडून दिलेलं आहे. पहिल्या वेळेपेक्षा दुसऱ्या वेळी अधिक मतांनी निवडून दिलेलं आहे. तुम्हा शे-पाचशे जणांसाठी पंतप्रधानांनी लाखो मध्यमवर्गीयांची निराशा करायची? काय बोलता काय तुम्ही? बरे आहात ना? की तुम्हाला क्वारंटाईन करायची गरज आहे?
सिमेंटचा राडारोडा वाहून नेणाऱ्या ढकलगाडीवर आपली बाचकीबोचकी टाकून त्यावरच आपल्या लहानग्यांना झोपवून किंवा एखाद्या पाळीव प्राण्याच्या पिल्लाला उचलावं तसं आपल्या पिल्लाला उचलत ट्रकला लटकून प्रवास करणाऱ्यांबरोबर सरकारने ९९ वर्षांचा करार केलेला आहे का? त्यांची सारखी सारखी जबाबदारी सरकारने काय म्हणून घ्यायची?
मॉब लिचिंगच्या वेळीही तसंच.
नोटबंदीच्या वेळीही तसंच.
दिल्ली दंगलीच्या वेळीही तसंच.
आणि आताही तसंच.
या देशात माणसं काय फक्त लॉकडाउनमुळेच देशोधडीला लागतात?
या देशात माणसं काय फक्त पायपीट करूनच मरतात?
दरवर्षी रस्त्यांवरील अपघातांमध्ये काय कमी माणसं मरतात?
कॅन्सरपासून टीबीपर्यंत अनेक आजारांनी मरणाऱ्यांची संख्या काय कमी आहे?
कुपोषणाने मरणाऱ्यांचीही संख्याही कमी नाही आणि हकनाक मरणाऱ्यांचीही.
या देशात माणसं नोटांच्या रांगेत मरतात.
रेशन कार्डाच्या रांगेत मरतात.
रेल्वे पकडण्याच्या रांगेत मरतात.
दंगलीत मरतात.
तशीच ती आता पायपीट करताना मरत आहेत.
आम आदमींच्या मरणाचा फारच बागुलबुवा करतात बुवा काही लोक!
आपल्या ध्येयाच्या वाटेवर असताना आलेलं मरण हे मोक्षाकडे नेणारं असतं, या भारतीय आध्यात्मिक परंपरेच्या सांगाव्याकडे दुर्लक्ष करता कामा नये! आपल्या ध्येयपूर्तीसाठी करावी लागणारी ही पायपीट स्वर्गप्राप्तीच्या दिशेने नेणारीच आहे.
असो.
गेल्या काही दिवसांत पायपीट करणाऱ्यांच्या किंवा घरी जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणाऱ्यांच्या बातम्यांनी, छायाचित्रांनी, व्हिडिओंनी थोडीफार प्रसारमाध्यमांची आणि बरीचशी सोशल मीडियाची जागा व्यापली होती. पाहणाऱ्याचे हृदय पिळवटून जाईल अशी छायाचित्रं, व्हिडिओ येऊ लागले होते.
आज संध्याकाळी ठीक आठ वाजता इव्हेंट मॅनेजर कम पंतप्रधान नवं चाटण चाटवतील. परिणामी उद्याच्या यच्चयावत हेडलाइन्स वेगळ्या असतील, ज्याला हल्ली ‘न्यू इंडिया’ म्हणतात त्याच्या असतील. तोवर तुम्ही कळ काढा, अशा बातम्यांची पानं उलटा, रिमोटचे बटन दाबून चॅनेल बदला किंवा मोबाईलचा स्क्रिन स्क्रोल करा. म्हणजे तुम्हाला ही दृश्यं विचलित करणार नाहीत.
ज्यांच्या मरणाने अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होत नाही, शेअर मार्केट कोसळत नाही, मध्यमवर्ग संतापत नाही, त्यांची काळजी करा कशाला?
.............................................................................................................................................
लेखक राम जगताप ‘अक्षरनामा’चे संपादक आहेत.
editor@aksharnama.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sanjay Pawar
Tue , 12 May 2020
अप्रतिम व आतड्यातून लिहिल्यासारखा लेख.मोदी भक्त तंदुलतनु वर्ग टाऴ्या नी थाळ्या वाजवीत निर्बॄध्द असंवेदनशीलतेचे प्रदर्शन करतीलच.शरम कशी वाटत नाही यांना?