अजूनकाही
आणीबाणी जाहीर झाली, विरोधकांनी त्या विरोधात आवाज उठवला. २७ जूनला आणीबाणीच्या विरोधात देशातील पहिला सत्याग्रह पुण्यात झाला. प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्याग्रहात सहभागी व्हायची मला संधी मिळाली. पहिल्या दिवशी आम्हाला येरवडा तुरुंगात फाशी गेट जवळच्या अंधेरी यार्डमध्ये ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यासाठी आम्हाला ती खोली रिकामी करायला लावली. आम्हाला टिळक यार्डच्या बराकीत हलवण्यात आले.
सकाळी संडाससाठी गेलो. लाईन होती. संडासला अर्धा दरवाजा असायचा. आतील माणूस उभा राहिला की दिसायचा. एका संडासातला माणूस उठला. मी पाहिले, तर तो ओळखीचा वाटला. त्याचे छायाचित्र पाहिल्यासारखे वाटत होते, पण लक्षात येत नव्हते. शेजारी उभ्या असलेल्या कैद्याला मी विचारले. तो म्हणाला, ‘ये तो अपने रतन खत्री साब है’.
डोक्यावर साईबाबासारखे फडके बांधलेले हीच त्याची ओळख होती.
आणीबाणीत जसे राजकीय कैद्यांना स्थानबद्ध केले होते, तसेच गुन्हेगारीच्या जगातील अनेक दादांनाही स्थानबद्ध करण्यात आले होते. त्या काळात दारूभट्टी, मटका व स्मगलिंग यात फार मोठ्या प्रमाणात लोक गुंतलेले होते. याशिवाय काळाबाजार व सावकारीनेही उच्छाद मांडला होता.
मटका हा त्या काळातील अत्यंत लोकप्रिय जुगार होता, बेकायदेशीर होता पण विश्वासार्ह होता. दररोज स्थानिक पातळीवरच्या बुकीकडे हजारो रुपयांचे पेमेंट व्हायचे. चार आण्यापासून हजारो रुपये त्यात लावले जायचे. मोबाईल, STD इत्यादी कोणतीही सोय नसताना मुंबईत काढलेला आकडा देशातल्या कानाकोपऱ्यात पोचायचा. आकडा काढायचे काम रतन खत्रीचे असायचे. ही व्यवस्था कार्यक्षम व बिनचूक असायची.
पोलीस आणि मटका यांचे संबंध मैत्रीपूर्ण असायचे. आकड्यांची बुकिंग स्वीकारणारा व विजेत्यांना पेमेंट करणारा प्रत्येक बुकी आपल्या अड्ड्यावर दहापासून शंभरापेक्षा जास्त पंटर ठेवायचा. पोलिसांना नियमित हप्ते पोचवले जातात अशी वदंता होती. या अड्ड्यावर अधूनमधून पोलीस धाड टाकायचे. काही वेळा पूर्वसूचना पण असायची. धाड पडली की दोन-चार पंटरांना अटक व्हायची. त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची काळजी अड्ड्याचा मालक घ्यायचा. अड्डा ज्या वस्तीत असेल तेथील अडचणीत असलेल्यांना अड्ड्याचा मालक मदत करी.
मटक्याचा नाद लागलेल्या पुरुषांना त्यांच्या घरातील बाया वैतागाच्या. अनेक महाभाग कमाईचा मोठा हिस्सा आकड्यात घालवायचे. कोणता आकडा येणार हे सांगणाऱ्या बाबा-बुवांची बक्कळ कमाई होत असे. वर्तमानपत्र मागील आठवड्यात लागलेले व पुढचे संभाव्य आकडे छापायचे. काही सायंदैनिके तर केवळ मटक्यावरच चालायची. पुण्यात ‘संध्या’ व ‘भोंगा’ ही सायंदैनिके आकड्यासाठी लोकप्रिय होती. न लागलेल्या आकड्यांची शक्यता वाढते, असा तर्क करत एखादा आकडा धरून त्यावर दर दिवशी दुप्पट पैसे लावणारे दर्दी दिसायचे.
येरवडा तुरुंगात रतन खत्रीबरोबर काहींनी मैत्री जुळवली. बेकायदा व्यवसाय करणारे एरवी चांगले असतात, असू शकतात. रतन खत्रीने निर्माण केलेला व त्यात दोन मिनिटांची भूमिका केलेला ‘रंगीला रतन’ या हिंदी सिनेमाचा एक खास शो आमच्यासाठी तुरुंगात आयोजित केला गेला. माझ्या पंधरा महिने वीस दिवसाच्या तुरुंगवासात हा आणि ‘आंधी’ हे सिनेमे पाहिल्याचे आठवते.
आणीबाणी संपल्यावर मटक्याऐवजी लॉटरी सुरू झाली. सुरुवातीला सणावारी असलेली लॉटरी दररोज व दिवसांतून पाच-सहा वेळा सोडतीपर्यंत आली.
आता गल्लीबोळात आकडे लावायची सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाइन, टीव्ही चॅनेल्सवर जुगार खेळता येतो. जुगार खेळण्याची परंपरा ही प्राचीन काळापासून आहे. महाभारतामध्ये याचा उल्लेख आहे.
राजे-राजवाडे व श्रीमंत लोकांपर्यंत सीमीत असलेला हा जुगार पार गरिबांच्या झोपड्यांपर्यंत नेण्याचा चमत्कार रतन खत्री घडवला. त्याने सुरू केलेली ही कामगिरी चढत्या कमानीने पुढे जात आहे.
..................................................................................................................................................................
लेखक अन्वर राजन सामाजिक कार्यकर्ते आहेत.
rajanaaa@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment