करोना व्हायरसच्या ‘जागतिक महामारी’ला ‘जागतिकीकरणा’चे धोरणच जबाबदार आहे!
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
कॉ. भीमराव बनसोड
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 12 May 2020
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय देशकारण कोविड-१९ COVID-19 करोना विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

वैद्यकीय तज्ज्ञांनी ‘कोविड-१९’ असे नाव दिलेल्या करोनाच्या विषाणूने संपूर्ण जगभर जीवघेणे थैमान घातले आहे. जे स्वतःला संपूर्ण जगाचा ‘दादा’ समजत होते, अशा अमेरिकेसारख्या साम्राज्यवादी देशालाही या विषाणूने रडकुंडीस आणले आहे. इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, स्पेन, इटली, ऑस्ट्रेलिया यांसारख्या इतरही मातब्बर देशांची स्थिती तशीच आहे. त्यामुळे साम्राज्यवादी राज्यकर्ते या विषाणूपुढे पार हबकून गेले आहेत, भांबावलेत. काहींनी तर त्याच्यापुढे हात टेकलेत. या विषाणूच्या हल्ल्यातून जपान, दक्षिण कोरिया, रशिया, खुद्द आपला भारत यासारखे देशही सुटलेले नाहीत. आफ्रिकेतील देशाप्रमाणेच अरब देशांनाही त्याने आपल्या कवेत घेतले आहे. एवढेच नव्हे तर जगभरातील तब्बल १८७ देशांत त्याचा हा धुमाकूळ चालूच आहे.

जगातील सर्व वैज्ञानिक प्रयोगशाळा या विषाणूच्या खातम्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. पण या विषाणूचा बंदोबस्त अजून कोणीही करू शकलेला नाही. इस्त्राइलसारखे देश काहीही दावा करत असले तरी अजूनही लस तयार करण्यात कोणालाही यश आलेले नाही. नजीकच्या काळात अशी लस शोधण्यात यश आले तरी ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किमान दीड-दोन वर्षांचा अवधी लागेल, हे सर्व तज्ज्ञांनी आधीच सांगितलेले आहे. म्हणजे किमान तोवर या विष्णाणूचा सामना आणि त्याच्याविरोधात संघर्ष मानवाला करावा लागेल. स्वाभाविकच त्याची धास्ती सर्वांच्या मनात बसली आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये जगात सर्वप्रथम चीनमधील वुहान शहरात या विषाणूने पहिला बळी घेतला. ज्या डॉक्टरने या विषाणूचा मानवापुढे असलेला धोका दाखवून दिला होता, त्याचाही बळी या विषाणूने लगेच घेतला. त्यानंतर चिनी आरोग्य व्यवस्था खडबडून जागी झाली. त्या नव्या आजारावर कोणताही औषधोपचार नाही, हे त्यांच्या लक्षात आल्याने लॉकडाऊनचा तातडीचा मार्ग त्यांनी अवलंबला आणि जागतिक आरोग्य संघटनेला याची कल्पना दिली. संघटनेनेही या विषाणूंचा मानव समाजाला असलेला धोका ध्यानात घेऊन ही ‘जागतिक महामारी’ असल्याचे जाहीर केले.

पण जगातील उपरोक्त ‘दादा’ देशांनी त्याची सुरुवातीला गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांच्या चुकीचे भोग तेथील जनतेला भोगावे लागत आहेत.

ही झाली या लेखाची पार्श्वभूमी.

प्रश्न असा आहे की, डिसेंबर २०१९मध्ये पहिला बळी घेतल्यानंतर इतक्या ताबडतोब व तीव्र गतीने जगातील १८७ देशांत त्याने आपले हातपाय कसे पसरले? या विषाणूने आजपर्यंत २ लाख ८० हजार लोकांचा बळी घेतला आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. ही एवढी गती व एवढा जीवघेणा प्रहार या विषाणूने का व कशामुळे केला असावा, याचा आपणाला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा विषाणू चीनने आपल्या प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या बनवलेला आहे. त्याची त्यांनी जगाला माहिती दिली नाही. त्यामुळे आमच्यासारखे सर्व देश या विषाणूमुळे त्रस्त आहेत. पण याचे गंभीर परिणाम चीनलाही भोगायला लावू असे अनेकदा म्हटले आहे. ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी त्यांच्या या मताला दुजोरा दिला आहे.

पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या या मताचा फारसा गांभीर्याने विचार करण्याचे कारण नाही. त्याचे साधे कारण असे आहे की, या विषाणूपूर्वीही त्यांचे चीनबरोबर व्यापारी युद्ध चालूच होते. चीन या सर्वच देशांचा अर्थकारणातील व म्हणून राजकारणातीलही शत्रू आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे.

तसेच डोनाल्ड ट्रम्प व त्यांचे सहकारी साम्राज्यवादी देश काहीही म्हणत असले तरी वैद्यकीय क्षेत्रांतील तज्ज्ञांनी, खुद्द ट्रम्प यांच्या आरोग्यविषयक सहकाऱ्यांनी, त्यांच्या गुप्तहेर संघटनेनेसुद्धा ही बाब नाकारलेली आहे. असा विषाणू कोणत्याही प्रयोगशाळेत कृत्रिमपणे बनवता येत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेनेही अनेकदा जाहीर केले आहे. तेव्हा हा विषाणू पूर्वीच्या सार्स, इबोला, स्वाईन फ्लू या सारख्या विषाणूतून संक्रमित झालेला आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. पण आपले अपयश झाकण्यासाठी व शत्रू राष्ट्रावर आपला राग व्यक्त करण्यासाठी वरील प्रकारची बेजबाबदार विधाने केली जात आहेत. 

पण खुद्द चीन याबाबत काय म्हणतो? चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ‘हा राष्ट्राराष्ट्रामधील संघर्ष नसून मानव विरुद्ध निसर्ग असा हा संघर्ष आहे. तेव्हा हा संघर्ष राष्ट्राराष्ट्रांनी आपापसात लढण्याचा नसून आपण सर्वांनी एकत्र येऊन निसर्गातून निर्माण झालेल्या या विषाणूचा मुकाबला एकजुटीने केला पाहिजे’, असे आवाहन अमेरिकेसह सर्व देशांना केले आहे. पण ट्रम्प काही हे ऐकायला तयार नाहीत, त्यांनी आपला हेका कायम ठेवला आहे.

अशा परिस्थितीत हा विषाणू इतक्या तीव्र गतीने का व कसा पसरला, हा प्रश्न अजूनही कायम आहे.

खरे तर या विषाणूच्या वाढीला सर्वप्रथम जर कोण जबाबदार असेल तर जगातील अमेरिकादि साम्राज्यवादी राष्ट्रांनी स्वीकारलेले व उर्वरित जगावर लादलेले जागतिकीकरणाचे धोरण! या साम्राज्यवादी राष्ट्रांनी आपले नफेखोरीचे धोरण वाढवण्यासाठी, ते ज्या वस्तूचे उत्पादन करतात त्याच्या कच्च्या मालासाठी जमिनीच्या पोटात असलेली विविध खनिजे, समुद्राखाली असलेल्या पेट्रोल डिझेल व नैसर्गिक वायू, विविध देशांत असलेली ॲमेझॉनसारखी जंगले, नद्या-नाले, दऱ्या  खोऱ्या व पहाड इत्यादी सर्व नैसर्गिक साधनसंपत्ती निसर्गाचा वा पर्यावरणाचा अजिबात विचार न करता अगदी कवडीमोल किमतीने यांनी अमानुषपणे ओरबाडली आहे. अमेरिकेने तर पर्यावरणाचा काहीही विचार न करता, त्याच्या रक्षणासाठी झालेला आंतरराष्ट्रीय करारही धुडकावून लावला आहे.

नैसर्गिक संपत्तीच्या ओरबाडण्यामुळे निसर्गात असमतोल निर्माण झाला आहे. एक प्रकारे निसर्गाने मानवावर उगारलेला हा सूडच आहे, असे म्हणणे धाडसाचे असले तरी, सध्यातरी याला दुसरे काही म्हणता येत नाही. पण जगातील साम्राज्यवादी राष्ट्रांनी व त्याचे साथीदार असलेल्या तिसऱ्या जगातील राष्ट्रांनीसुद्धा स्वीकारलेले जागतिकीकरणाचे धोरणच याला जबाबदार आहे, असे स्पष्टपणे म्हणता येईल.

आता राहिला प्रश्न हा विषाणू इतक्या झपाट्याने, तीव्र गतीने कसा काय पसरला? एकदा जागतिकीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर त्याची जी गती राहील, त्याच गतीने हा विषाणू पसरणे स्वाभाविक आहे. ही गती काय आहे? तर भांडवलशाहीने उत्पादित केलेली वस्तू जितक्या गतीने ग्राहकाकडे जाईल, तितक्याच गतीने उत्पादकांना त्यांचा नफा मिळतो. त्यामुळे ही गती त्यांना अनेक कारणांनी वाढवावीच लागते. ती गती त्यांनी फारच वाढवलेली आहे. त्यातही जागतिकीकरणाच्या धोरणाशी संबंधित असलेल्या आधुनिकीकरणाचा हात आहे.

यासाठी आपणाला आज सर्वत्र आवश्यक झालेल्या मोबाईलचे उदाहरण घेता येईल. दक्षिण कोरियाच्या, अमेरिका वा चीनच्या एखाद्या कंपनीने मोबाईलचे नवीन मॉडेल जर काढले तर ते जगभरातील ग्राहकांना किती लवकर मिळते? ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांसारख्या पोर्टलवर लाँच झाल्याबरोबर हे मॉडेल काही मिनिटांतच संपून जाते. एखाद्याला पाच मिनिटं जरी उशीर झाला तरी ते संपलेले असते, इतकी तीव्र गती आपल्या वस्तू विकण्याबद्दल जागतिक कंपन्यांची झालेली आहे.

याच कंपन्या वेगवेगळ्या कंपन्यांशी डील करण्यासाठी, व्यापारी करार करण्यासाठी, आपल्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना, कामासाठी अधिकाऱ्यांना विमानाने इकडून तिकडे पाठवत असतात.

असेच काही कर्मचारी, व्यापारी व काही विद्यार्थीही चीनमधील वुहानला गेले. तिथे त्यांना या विषाणूची लागण झाली. नंतर ते आपापल्या देशात परत आले. त्यांच्यापासून या विषाणूची लागण त्यांचे कुटुंबीय, मित्रमंडळी, सहकारी यांनी झाली आणि ती जागतिकीकरणाच्याच गतीने पसरत गेली. ज्या गतीने एखादी वस्तू लगेचच जगभर पसरते, त्याच गतीने हा विषाणूही जगभर पसरला. पण ही कोणती एखादी वस्तू नसल्याने, हा संपर्कातून वाढणारा साथीचा आजार असल्याने आता तो सर्वांनाच त्रासदायक ठरला आहे.

जग आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. ते आपल्या कवेत आले आहे. ते आता एक लहानसे खेडे झाले आहे, असे म्हणून विविध देशांतील राज्यकर्त्या वर्गाबरोबरच समाजातील उच्चभ्रू व मध्यमवर्गानेही मोठ्या आनंदाने या जागतिकीकरणाचे स्वागत केले होते. त्यात त्यांना त्यांचा फायदा दिसत होता. जागतिकीकरणाचे जसे फायदे आपण घेतो, तसे त्याचे नुकसानही आपणाला - तुमची इच्छा असो अगर नसो - स्वीकारावे लागत आहे, अशी आजची आपली परिस्थिती झाली आहे.

तसे पाहिल्यास हा विषाणू अचानक आला आहे असे म्हणता येणार नाही. कारण त्यापूर्वी सार्स, इबोला, स्वाईन फ्लू व बर्ड फ्लूनेसुद्धा त्याबाबतचे इशारे दिले होते. पण त्याची दखल आपण घेतली नाही. म्हणून त्यापुढची ही संक्रमित आवृत्ती आता आपणाला जीवघेणी ठरत आहे.

..................................................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......