क्वारंटाइन, सेग्रिगेशन, डिसइन्फेक्शन, जुलूम, जाच, त्रास, मनस्ताप, गैरकारभार, भीती हे सारे प्रकार ‘प्लेग’च्या महामारीतही होते!
संकीर्ण - पुनर्वाचन
टीम अक्षरनामा
  • लेखात उल्लेख असलेल्या पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 08 May 2020
  • संकीर्ण पुनर्वाचन प्लेग Plague वॉल्टर चार्ल्स रँड Walter Charles Rand जागतिक महामारी Epidemic प्लेग कमिशनर Plague Commissioner

१८९८ ते १९१८ या काळात भारतात प्लेगने हाहाकार माजवला होता. या वीसेक वर्षांत भारतात जवळपास एक कोटी माणसं या आजाराने मृत्यु पावली होती. त्या काळातल्या काही मराठी चरित्र-आत्मचरित्रांचा शोध घेतला तर त्यात प्लेगने माजवलेला हाहाकार, वॉल्टर चार्ल्स रँड या पुण्याच्या प्लेग कमिशनरची, प्लेग हॉस्पिटल्सची, क्वारंटाइन, सेग्रिगेशन, डिसइन्फेक्शन यांचीही माहिती मिळते. मराठीमध्ये प्लेगविषयी कथा, कविता, कादंबऱ्या किती लिहिल्या गेल्या याविषयी फारशी माहिती मिळत नाही. पण चरित्र-आत्मचरित्रांमध्ये मात्र पुष्कळच माहिती मिळते. आहिताग्नी राजवाडे यांच्या आत्मचरित्राची तर तब्बल ५० पाने प्लेगसंदर्भात खर्च झाली आहेत. याशिवाय इतर काही पुस्तकांतील हा मजकूर…

..................................................................................................................................................................

१.

“इ. स. १८९७ हे साल पुण्याच्या इतिहासात फार महत्त्वाचे आहे. कारण या वर्षी पुण्यात प्रथम प्लेगचा प्रादुर्भाव झाला व तदनुषंगाने पुढील नाना प्रकारच्या कधी न विसरण्यासारख्या घटना घडून आल्या….

गेल्या टर्ममध्ये पुण्यात प्लेग सुरू झाला म्हणून म्हटले पण तो खास पुणे शहरातील लोकांत नव्हता. प्रथम प्रथम येथे बाहेरून आलेल्या तुरळक केसेस होऊ लागल्या, व मागून पाचसहा महिन्यांनी तो गावात भडकला. तथापि आरंभापासूनच सरकारचे प्लेगप्रतिबंधक कडक उपाय झाले. प्लेग इस्पितळे स्थापिली गेली; व क्वारंटाईन आणि सेग्रेगेशन जारीने अमलात आले. स्टेशनावर झडत्या सुरू झाल्या व गावात सोजिरांच्या घरटीप तपासण्या होऊ लागल्या. त्यावर देखरेख करण्याकरता रँड नामक एक गोरा अधिकारी प्लेग कमिशनर म्हणून नेमला गेला व त्याचा लोकांना फार जाच होऊ लागला. हे साहेब अगोदरच असिस्टंट कलेक्टरच्या नात्याने वाईतील लोकांवरील फौजदारी खटल्यात दुर्लौकिक कमावून आलेले होते, यासंबंधी त्या वर्षीच्या शिवाजी उत्सवात सन्मित्रसमाज मेळ्याने जे पद म्हटले होते, त्यातील पहिल्या चार ओळी पाहिल्या म्हणजे या जाचांची चांगली कल्पना येते. त्या चार ओळी अशा –

रांडशाही आडदांडसवाई धिंड काढली सर्वांची

मी मी म्हणती कोणी न कामी फुकट वल्गना गर्वाची

सतीला मातीत घालण्या अधिकारी गोरा आला

ताप देऊन प्रजेस अतिशय प्रताप त्याने गाजविला”

(‘आत्मवृत्त’ - आहिताग्नी राजवाडे, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९८०)

२.

“दुष्काळाच्या पावलावर पाऊल ठेवून प्लेग आला. सांध्यांत गाठ येऊन लोक पटापट शेकड्यांनी मरू लागले. या रोगाचा संसर्ग हांगकांगहून प्रथम मुंबईस आला व मुंबईहून तो द्रूत गतीने देशाच्या अंतर्भागात पसरला. मुंबईच्या प्लेगाची वार्ता कळताच, त्याचा संसर्ग न जाणो विलायतेत येऊन पोचेल, अशा आशंकेने विलायतचे सरकार अस्वस्थ झाले. वाटेल ते करून या प्लेगचा शक्य तितक्या लवकर नायनाट करून टाका अशा विलायतेहून तारावर तारा धडकू लागल्या. तेव्हा रोगबीज नाहीसे करण्यासाठी सरकारने घाबरटपणाने जुलमी, कल्पनाशून्य असे इलाज जबरदस्तीने लोकांवर लादण्यास सुरुवात केली. हे उपाय म्हणजे क्वारंटाइन, सेग्रिगेशन आणि डिसइन्फेक्शन असे तीन प्रकारचे असत.

क्वारंटाइन म्हणजे बाहेरगावाहून आलेल्या मनुष्याने गावांत प्रवेश करण्यापूर्वी रोगसंशयाच्या निवृत्तीसाठी काही दिवस एकीकडे, निराळ्या जागी राहणे;

सेग्रिगेशन म्हणजे प्रत्यक्ष रोग झालेल्या माणसाला अलग करून इस्पितळात रवाना करणे आणि त्याच्या कुटुंबीयांना सेग्रिगेशन कॅम्पात (विलगीकरण छावणीमध्ये) काही मुदतीपर्यंत ठेवणे;

आणि डिसइन्फेक्शन म्हणजे रोगी ज्या घरात असेल ते घर साफ, निर्जंतुक करणे.

या गोष्टी रोगनाशाच्या दृष्टीने तत्त्वत: ठीक होत्या, आणि त्यांचे ‘केसरी’तून टिळकांनी समर्थनहि केले. पण त्यांच्या अमलबजावणीत जुलमाचा व सुडेसोटपणाचा कहर झाला. रँड नावाचे कल्पनाशून्य आयसीएस गृहस्थ ता. १७ फेब्रुवारी १८९७ रोजी पुण्याचे प्लेग कमिशनर नेमले गेले. त्यांच्या हाताखाली वरील कामे करण्याकरिता गोऱ्या सोजिरांची पार्टी देण्यात आली. त्यांनी कसा धिंगाणा घातला, याचे वर्णन स्वत:च्या शब्दांनी देण्यापेक्षा त्या वेळचे सुधारक पत्रातील उतारे टिळक चरित्रात देण्यात आले आहेत. त्यातील काही अंश इथे देणे अधिक बरे.

“इंग्रज सरकारचे अंमलदार इतके बेगुमान होतील असें कधी वाटलें नव्हते! परंतु ब्यूबॉनिक प्लेग म्हणजे आजार नव्हे, सोजरांचें पेंढार आहे असें म्हणावें लागत आहे! पाहिजे त्यांचीं घरें फोड, पाहिजे त्या जिनगीची अफरातफर कर, पाहिजे त्या ठिकाणीं धिंगाणा घाल, पाहिजे त्याचा हात धर, आणि हवें त्याला ओढीत ने, ही का घरतपासणी, का लोकांची थट्टा? अर्जांची दाद नाही, फिर्यादीची फिकीर नाही,… अशीच रँडसाहेबांच्या यमदूतांपैकी कित्येकांची वागणूक आहे.”

“इतक्या दिवस चोरीवरच भाग होतें पण आता बायकोच्या अंगावर हात टाकण्यापर्यंतहि मजल येऊन ठेपली आहे! आणि इतके सारे प्रकार घडत असून आमचे लोक पाहावे तों आपले शांत! खरोखर आमच्या लोकांसारखे नामर्द लोक पृथ्वीच्या पाठीवर कोठेही सापडणार नाहीत असें मोठ्या शरमेने कबूल केलें पाहिजे.”

टिळक एकसारखे कार्यमग्न होते. दुष्काळासंबंधीच्या कामाबरोबरच प्लेगच्या जुलमाबाबत अर्ज करणे, विधायक सूचना करणे, तक्रारी योग्य अधिकाऱ्यांकडे पाठविणे हीही कामे चालली होती. याखेरीज विधायक स्वरूपाच्या लोकसेवेच्या गोष्टी त्यांनी अनेक केल्या. व्यापाऱ्यांचें मन वळवून पुणे शहरात दुष्काळपीडित लोकांकरिता त्यांनी स्वस्त धान्याची दुकाने काढविली, तसेच प्लेगपीडित लोकांकरिता लोकांच्या प्रयत्नांनी त्यांनी एक सार्वजनिक इस्पितळ उभे केले. त्याचा मध्यमवर्गीयांना बराच उपयोग झाला. ‘केसरी’तून अन्याय, जुलूम यांविरुद्ध कडक टीका चालूच होती. दुष्काळाबाबत ‘पोलिसाच्या पेटलेल्या बंदुकीच्या टप्प्यांत भरलेली रयतेची जंगी सभा’ अशा मथळ्याचे लेख ते लिहीत होते, त्याप्रमाणे प्लेगच्या जुलमी व्यवस्थेबाबत ‘पुण्यात सध्या चालू असलेला धुमाकूळ’ असे लेख लिहून निर्भीड टीकेबरोबरच विधायक सूचनाही करीत होते. लोकांची अंत:करणे चेतविली जात होती. पण टिळक आपल्या समजुतीने कायद्याच्या कक्षेच्या आत राहून सर्व लिखाण करीत होते.

टिळकांच्या समजुतीचा काही उपयोग नव्हता. भवितव्यतेने बार भरून ठेवलेला होता. व्हिक्टोरिया राणीच्या राज्योराहणाच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त ता. २२ जून १८९६ रोजी पुण्यात गव्हर्नमेंट हाऊसवर (सध्या पुणे विद्यापीठ वसले आहे त्या इमारतीत) बडा खाना झाला, तेथून प्लेग कमिशनर रँड घोड्याच्या गाडीतून परत जात असता मध्यरात्री त्याचा खून झाला! पुण्यावर जादा पोलीस बसविण्यात आले, पुण्याच्या कलेक्टरने प्रतिष्ठित लोकांना बोलावून त्यांच्यासमोर धमकीचे भाषण केले आणि वृत्तपत्रकारांवर आग पाखडली! टिळकांनी ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ (६-७-९७) आणि ‘राज्य करणे म्हणजे सूड उगविणे नव्हे’ (१३-७-९७) असे लेख केसरीत लिहिले. रँडशाहीच्या जुलमाचा काही पुरावा गोळा करून तो मुंबईच्या इंग्रजी पत्रांतून छापविण्याच्या उद्देशाने टिळक मुंबईस गेले असता ता. २७ जुलै रोजी रात्री राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना पकडण्यात आले!

मुंबई हायकोर्टापुढे ता. ८ सप्टेंबर रोजी खटला सुरू झाला तो ता. १४ रोजी आटोपून न्यायाधीशांनी आरोप शाबीत धरून टिळकांना ‘फक्त’ अठरा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सांगितली.”

(टिळक आणि आगरकर – श्री. ना. बनहट्टी, सुविचार प्रकाशन मंडळ, नागपूर, १ ऑगस्ट १९५६)

३.

“देशात दुष्काळ पडलेला होता व त्या दुष्काळाला मदत म्हणूनच की काय, ह्या देशात त्याच साली प्लेगने पहिल्याने पाऊल ठेवले. अलीकडील पिढीला प्लेग ही या देशात नवीन चीज आहे हे कदाचित खरेही वाटत नसेल, पण ह्या देशात प्लेग नसल्याचे कोट्यवधी लोकांना माहीत आहे व त्या वेळी प्लेगवाचून कोणाचे अडतही नसे. प्लेगने मुंबई बंदरात १८९६ सालच्या उत्तर भागात पाऊल टाकले व १८९७चे आरंभास तो सर्व महाराष्ट्रभर फैलावला. प्लेगच्या बंदोबस्तामुळे पुण्यात लोक इतके वैतागून गेले की, प्लेग बरा पण जीव नको, असे त्यांना होऊन गेले. ह्यावेळी सरकारने मि. रँड नावाचा एक करडा अधिकारी पुण्यात प्लेगचा बंदोबस्त करण्याकरता आणून ठेवलेला होता. त्याची अमलदारी चालविण्याची पद्धति लोकांना संताप आणण्यासारखी होती. त्यावेळी आगरकर मरून वर्ष दीडवर्षच जालेले होते. व त्यांचा बाणेदार ‘सुधारक’ प्रो. वासुदेव बळवंत पटवर्धन ह्या एका बाणेदार तरुणाचे हाती आलेला होता. ‘सुधारका’मध्ये रँडच्या जुलमासंबंधांने झणझणीत लेख येऊ लागले आणि रँडनिषेधाच्या ह्या मोहिमेत सामील होण्याच्या उद्देशाने ‘ज्ञानप्रकाश’ पत्राचे ऑफिसात लोकांची गाऱ्हाणी नमूद करण्याकरता एक नोंदणी-कचेरी मुद्दाम उघडण्यात आलेली होती. कै. गोपाळ कृष्ण गोखले हे वेल्बी कमिशनुपुढे साक्ष देण्यासाठी त्या वेळी विलायतेस गेले होते. त्यांना येथील त्यांच्या मित्रांनी प्लेगमधील जुलुमाची लालभडक वर्णने ज्या वेळी लिहून पाठविली, त्या वेळी त्या जुलुमांची तशीच वर्णने त्यांनी मँचेस्टर ‘गार्डियन’ला पत्रे पाठवून व इतर ठिकाणी लेक्चरे देऊन केली. इकडे प्रसिद्ध मिशनरी हिंदू विदुषी पंडिता रमाबाई ह्यानीही प्लेगमधील जुलुमाची बरीच हकीगत प्रसिद्ध केली.”

(अच्युतराव कोल्हटकर स्मारकग्रंथ, भाग १ – संपा. अनंत हरि गद्रे, १९३३)

४.

“रँडच्या खुनानंतर पंडिता रमाबाईंनी गार्डियन साप्ताहिकात १८ मे १८९७ रोजी एक दीर्घ पत्र लिहून पुण्यातील प्लेग हॉस्पिटलची दर्दभरी कहाणी सांगितली. ब्रिटिश संसदेत मेजर रॅश यांच्या प्रश्नाला उत्तर देताना २६ जुलै १८९७ रोजी लॉर्ड जॉर्ज हॅमिल्टन यांनी पंडिता रमाबाईंचे पत्रच वाचून दाखवले. मुंबईच्या गव्हर्नराने रमाबाईंचे म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यावर रमाबाईंनी पुन्हा पत्र लिहून त्याला ठणकावले.”

(महाराष्ट्राची तेजस्विनी – पंडिता रमाबाई – देवदत्त नारायण टिळक, १९६०)

४.

“कॉलेजची पहिली टर्म जानेवारीच्या आरंभी सुरू होऊन एप्रिलमध्ये संपत असे. दीड महिन्याची सुट्टी भोगून विद्यार्थी कॉलेजात परत येत; आणि जूनच्या आरंभापासून दुसऱ्या टर्मचे काम सुरू होई... ऑक्टोबर-नोव्हेंबर हा परीक्षांचा मोसम असे. डिसेंबर महिन्यांत निकाल लागत असत. पण तेव्हांच्या दिवसांत दुसरी टर्म बहुदा पुरी होत नसे. कारण तेव्हां प्लेग हा विद्येचा आणि सामाजिक स्वास्थ्याचा दावेदार, ऑगस्ट महिन्याच्या शेवटीं शेवटीं आमच्या जीवनाच्या दरवाजांत येऊन दाखल होई; सर्व योजना, सर्व बेत ढांसळूं लागत. गांव हळूहळू ओस पडूं लागें; आणि कॉलेजच्या जीवनाचें वारापाणीं होऊन जाई.

सध्याचे लोक कितीतरी सुखी आहेत. (सध्याचे म्हणजे १९५७च्या आसपासचे.) १८९५ सालापासून ते १९१६-१७ पर्यंत या प्लेगानें महाराष्ट्राला केवळ जर्जर केले होते; आणि प्रतिवर्षी उडत असलेल्या संहारानें माणसांना साऱ्याच गोष्टी अशाश्वत वाटूं लागत. या दुष्ट रोगाचा असा एक गुण होता कीं, तरुण पुरुष मरावेत. तुलनेनें पाहिलें तर बायका कमी मरत असत. गळ्यांत, खाकेंत किंवा जांघेंत अंब्याच्या कोयीएवढा गोळा उठत असे; आणि ताप आल्यापासून दोन अडीच दिवसांत, शेवटीं वात होऊन माणूस निकालांत निघत असे. हा संहार वर्षानुवर्षे चालू होता. सप्टेंबर महिन्यापासून माणसे गांवाच्या बाहेर झोपड्या बांधून रहात असत. गांवांत जिकडे तिकडे मेलेल्या उंदीर-घुशींची घाण सुटत असे. लस टोंचून घेणें, हा इलाज लोकांनीं हळूं हळूं पत्करला; पण रोगाच्या प्रसाराच्या मानानें या इलाजाचा प्रसार मात्र झाला नाहीं. स्थलांतर हा एकच इलाज हिताचा ठरला. टोंचून घेऊनसुद्धां गांवांत एकट्या-दुकट्याने राहणें धोक्याचें वाटे; आणि मेलेल्या उंदरांची घाण आळोआळीला येत असे. ज्यांना बाहेर जातां येणें शक्य नव्हतें, ते गांवांतच रहात; आणि बहुदा मरून जात. टोंचून घेतलेले मात्र दगावत नसत. मोठालीं शहरें सोडलीं, तर बाहेरच्या टापूंत रिकाम्या गांवांत चोरट्यांचा उपद्रव सुरू होई. मिळून वर्षाकांठी चार-पांच महिने माणसांना विलक्षण हालअपेष्टा सोसाव्या लागत.

परगांवच्या नातेवाइकांकडे रहावयास जावें, एखाद्यानें मोठें छप्पर घातलेलें असले, तर मैत्रीचा हक्क सांगून त्याच्या त्या छपरांत तुरमुंडी द्यावी, रात्रीच्या वेळी उघड्यावर पडावें, असा प्रकार गांवोगांवी चाललेला असे. मोठाल्या शहरांतून रोज अडीच अडीचशें, तीन तीनशें प्रेतें स्मशानांत जात असत! मुंबईला तर ही संख्या याच्या तिप्पटीवर जात असे! या संहाराची आठवण झाली, म्हणजे आतांसुद्धां अंगावर शहारे येतात. तरुण पुरुष मेल्यानें समाजांत वैधव्य जिकडे तिकडे दिसूं लागे; आणि एक तर्‍हेची हताशपणाची दाट छाया जीवनावर पडलेली दिसे. पुनर्विवाह समाजांत रूढ झाला, तो यामुळेंच होय. पण एक गोष्ट मात्र खरी कीं, अशा या दारुण परिस्थितीकडे लक्ष देऊन माणसें एकमेकांना साहाय्य करीत. परगांवाहून आलेल्या पाहुण्यांना आपल्या कुटुंबात सामावून घेत, आपल्या सोयीचा फायदा गरीब नातेवाईकांना देत, आणि सर्वांवरच आलेला प्रसंग कसान् कसा निभावून नेत. एखाद्या वेळीं मनांत येतें की, तसला घोर प्रसंग जर या राष्ट्रावर पुन्हां आला, तर विस्कळीत झालेल्या, परस्पर-उपेक्षेनें घेरलेल्या, कद्रू बनलेल्या, आणि गुन्हेगारी प्रवृत्ति बेसुमार वाढलेल्या या समाजाची केवळ दाणादाण उडून जाईल...

... शाळा-कॉलेजें अकालींच बंद होत, आणि मग विद्यार्थी केवळ मोकाट सुटत असत. प्लेग ही आपत्ति आहे, हें फक्त पालकांच्या ध्यानी येई. सुट्टी मिळाली म्हणून पोरांना आनंदच वाटे. वर्षाकांठी चारचार महिने झोपड्यांत राहून मोकळी हवा खावी आणि उनाडक्या करीत हिंडावें, असा मुलांचा दिनक्रम असे. वडीलमाणसें रोज मोठमोठाल्या मजला करून आपल्या नोकरीच्या ठिकाणी जात; मुलें अगदीं मोकळीं सुटत; आणि अनुभव असा येई कीं, प्लेगाच्या तावडींतून सुटलेल्या सर्व प्रजांची प्रकृति खरोखरच सुधारत असें! पण मनुष्यहानि आणि द्रव्यहानि यामुळें वडील माणसें अगदी रकमेला येत. मोठाल्या शाळांचे चालक बाहेर कोठेंतरी झोपड्या उभारून शाळा भरवीत; आणि बापडे शिक्षक कागदोपत्रीं भर पगारावर, पण हातावर निम्मा पगार घेऊन पोटासाठी कामें करीत. अशा प्रकारें एकीकडे रडावें, आणि एकीकडे हंसावें, असा प्रकार चालत असे. शेवटी प्लेगच दमला...

ह्या आपत्तीचा लक्षांत ठेवण्यासारखा दुसरा एक परिणाम सांगावयास हवा. दर वर्षी झोपडी घालावी आणि मोडावी; त्यापेक्षां ती एकदांच पुरेशी बळकट घालून ठेवावी, हा विचार अनेक लोकांच्या डोक्यांत येऊं लागला, आणि अनेक मोठाल्या शहरांच्या बाहेर पक्क्या झोपड्या दिसूं लागल्या. याच झोपड्यांच्या पुढें छोट्या छोट्या बंगल्या झाल्या. आज अनेक शहरांच्या बाहेर जीं निरनिराळ्या तर्‍हेची व आधुनिक पद्धतीची वस्ती झालेली आपल्याला दिसते, तिचें उगमस्थान प्लेगाच्या दिवसांत उभारलेल्या झोपड्या हे होय!”

(चित्रपट : मी व मला दिसलेलें जग - श्री. म. माटे, देशमुख आणि कंपनी, पुणे, दु. आ. २०१०)

५.

“माझ्या लहानपणी पुण्यास दर वर्षी थंडीच्या दिवसांत प्लेग नावाच्या रोगाची साथ येई. गणपतीचे दिवस आले की, उंदीर पडण्यास प्रारंभ होई. लोकांत थोडी खळबळ उडे. दसऱ्याच्या सुमारास माणसे मरू लागत आणि स्थानांतरच्या गोष्टी बोलण्यास प्रारंभ होई. काही लोक दिवाळीच्या आधी आणि काही शहरात दिवाळी साजरी करून चतु:श्रृंगीच्या मैदानात राहण्यास जात. हल्ली ‘पुणे ४’ असे ज्या टपाल विभागाला नाव आहे, त्याला पूर्वी चतु:श्रृंगी मैदान म्हणत. फर्ग्युसन कॉलेज आणि तीन खाजगी बंगले याशिवाय या भागात एकही इमारत नव्हती. साधारणपणे महाशिवरात्रीपर्यंत झोपड्यात राहून लोक परत शहरात येत. या तीन-चार महिन्यांचे झोपड्यातले जीवन मुलांना मोठे मजेचे जात असे. चार महिने शाळा बंद आणि मोकळ्या रानात भरपूर हिंडायला व खेळायला मिळे. शहरात तेव्हा पोहण्याची सोय नव्हती, परंतु झोपड्यांच्या जवळ मोठ्याला विहिरी आणि दगडाच्या खाणीतील तळी असत. त्यात पोहावयास मिळत असे. समान दर्जाची माणसे एका कॅम्पात झोपड्या बांधत आणि त्यामुळे ओळखीच्या माणसांचा संपर्क पुष्कळ येई.

मला मैदानी किंवा बैठे दोन्ही प्रकारचे खेळ आवडत नसत म्हणून खेळाच्या दृष्टीने झोपडीतील जीवन मला फायदेशीर झाले नाही; परंतु एकट्यानेच खूप लांब हिंडण्यास जाण्याची आणि नवीन नवीन जागा हुडकून काढण्याची फार आवड होती. हिंडताना माणसे, प्राणी आणि झाडे यांचे सूक्ष्म निरीक्षण मी करत असे. ‘पुणे ४’मध्ये आता प्राणी नाहीत, झाडे नाहीत पण माणसे मात्र चिक्कार आहेत. प्राण्यांची आवड मला फार होती. आम्ही कुत्री, मैना, पोपट, चिमण्या आणि कासवे हे प्राणी पाळलेले होते. जरी मी फारसे खेळत नसे तरी गोष्टी सांगणारा आणि ‘वुइट’ करणारा मुलगा म्हणून मित्रमंडळीत मी आवडता होतो. माझ्या बालमित्रांपैकी पंधरा-वीस जण अद्याप विद्यमान आणि ओळख राहिलेले आहेत.”

(विनोद चिन्तामणि - चिं. वि. जोशी, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, २०१४)

..................................................................................................................................................................

सन १८९९ सालीही पुण्यात प्लेगने फार कहर केला. गणपती झाले की तो यावयाचा व शिमग्यापर्यंत टिकून राहावयाचा असा जणू पायंडाच पडून गेला होता.

https://www.aksharnama.com/client/article_detail/4220

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......