महाराष्ट्रीय राजकारणाचे सिंहावलोकन (१८५० ते १९५०)
पडघम - राज्यकारण
बा. रं. सुंठणकर
  • डावीकडून लोकहितवादी, न्या. रानडे, लो. टिळक, आगरकर, म. फुले आणि गोखले
  • Tue , 05 May 2020
  • पडघम राज्यकारण महाराष्ट्र दिन Maharashtra Day Maharashtra Din कामगार दिन Kamgar Din Labour Day संयुक्त महाराष्ट्राची ६० वर्षे

१ मे १९६० रोजी महाराष्ट्र एका संघर्षमय चळवळीनंतर ‘संयुक्त महाराष्ट्र’ म्हणून अधिकृतरित्या अस्तित्वात आला. त्याला १ मे २०२० रोजी ६० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने ‘संयुक्त महाराष्ट्रा’आधीच्या महाराष्ट्राचा हा थोडक्यात मागोवा...

१९२०पर्यंत सुधारणावाद, राष्ट्रवाद व बहुजनसमाजवाद हे प्रवाह परस्परविरोधाने मार्ग आक्रमित होते. १९२०नंतर सुधारणावाद मागे हटला. पहिल्या महायुद्धाने जगात उदारमतवादाचा बळी घेतला, तसा हिंदुस्थानात सुधारणावादाचा बळी पडला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रवादाच्या मर्यादा संपुष्टात आल्या हे सिद्ध झाले आहे. बहुजन समाजवादाचे जुने तत्त्वज्ञान टाकाऊ ठरल्यामुळे तो नवीन तत्त्वज्ञान शोधत आहे. एकंदरीत जुने राजकारण आज कुचकामी आणि टाकाऊ वाटत आहे. नव्या राजकारणाची आज आवश्यकता निकडीने भासत आहे. नव्या राजकारणाला स्फूर्ती देण्याची ताकद राष्ट्रवादात नाही. राष्ट्रवादी परंपरेकडे त्याकरता आशेने पाहणे व्यर्थ आहे. याबाबतीत सुधारणावादच प्रकाश देऊ शकेल. लोकहितवादी, रानडे, आगरकर, गोखले यांच्या परंपरेला उजळा देऊन तीपासून स्फूर्ती घेऊन आपल्याला पुढे जावे लागेल. महाराष्ट्राच्या इतिहासाने निर्माण केलेले हे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या प्रकाशात पुढची वाटचाल आपल्याला चांगल्या रीतीने करता येईल. योग्य मार्गाने गेलो तर सारा भविष्य काळ आपलाच आहे.

पूर्वप्रसिद्धी -  ज्ञानप्रकाश, दिवाळी १९५

..................................................................................................................................................................

लोकहितवादींची ‘शतपत्रे’ प्रसिद्ध होऊन आता शंभर वर्षे पुरी झाली आहेत. या कालावधीत भारताच्या इतिहासातील एक पर्व संपले आहे. या शतकात महाराष्ट्राच्या जीवनात अनेक घडामोडी घडल्या आहेत. लोकहितवादींच्या शतपत्रांनी महाराष्ट्रात नव्या युगाला सुरुवात केली. शतपत्रांत ज्या राजकीय ध्येयांची जाणीव प्रथम झाली, त्यांची पूर्ती आता झाली आहे. मध्यंतरीच्या काळात अनेक घटना-विघटना झाल्या, अनेक वाद माजले, त्यावर तट पडले. अभ्रे आली आणि गेलीही. यापैकी कित्येक वाद आज इतिहासजमा झाले आहेत. काहींची स्मृतीही नष्ट झाली आहे. गेल्या शतकातील या घडामोडींचे त्रयस्थाच्या नि:पक्षपाती दृष्टीने परीक्षण करता येणे आज शक्य झाले आहे. या कालाचे सिंहावलोकन केले म्हणजे आढळून येते की, महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाचा एकच ओघ या काळात वाहत आला असून त्यात निरनिराळे प्रवाह ठळकपणे दाखवता येतात. महाराष्ट्राच्या आजच्या जीवनाची बीजे या कालखंडाच्या प्रारंभीच्या काळात शोधता येतात. १८५० ते १८८० या ३० वर्षांच्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याची कुंडली घातली गेली असे म्हणता येईल. या कुंडलीत जे ग्रह पडले, त्यांची इष्टानिष्ट फळे पुढच्या काळात महाराष्ट्राला भोगावी लागली आहेत.

इंग्रजांचा अंमल सुरू झाल्यानंतर थोड्याच अवधीत आपल्या देशात सुशिक्षित वर्गांत रेनासान्सची-विचारपरिवर्तनाची लाट उसळली. राजा राम मोहन रॉय हे भारतीय रेनासान्सचे आद्यप्रवर्तक गणले जातात. महाराष्ट्रांत या विचारप्रवर्तनाच्या पहिल्या प्रवर्तकाचा मान लोकहितवादींकडे जातो. या प्रवर्तनाला चालना देणाऱ्या लागोपाठ तीन पिढ्या निर्माण झाल्या. लोकहितवादी, जोतीबा फुले आणि विष्णुबावा ब्रह्मचारी हे पहिल्या पिढीचे प्रतिनिधी होते. दुसरी पिढी न्या. रानडे, तेलंग, भांडारकर यांच्या संप्रदायाची होती. त्यानंतरची तिसरी पिढी आगरकर, टिळक, गोखले या कर्तृत्वशाली पुरुषांची झाली. या तीन पिढ्यांनी ज्या परंपरा घातल्या, त्यांनीच महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक जीवनाला वळण लागले आहे. राजकीय जीवनात सामान्यपणे तीन ठळक प्रवाह दिसून येतात. सुधारणावाद, राष्ट्रवाद आणि बहुजनसमाजवाद अशी नावे त्यांना देता येतील. लोकहितवादी, रानडे हे सुधारणावादाचे प्रवर्तक होते. त्यांचीच परंपरा आगरकर-गोखल्यांनी चालवली. राष्ट्रवादाचे अध्वर्यु विष्णुशास्त्री चिपळूणकर व टिळक हे होते. लोकहितवादी-रानड्यांना सर्वांगीण सुधारणा घडवून आणावयाची होती, तर राष्ट्रवादांचा सर्व भर राजकीय सुधारणांवर होता. या दोहोंच्या विचारसरणीमध्ये मूलभूत फरक होते. राजकीयदृष्ट्या त्यांच्यात जितकी भिन्नता त्यांच्या काळी भासत होती, तितकी ती नव्हती असे आता म्हणता येते. तिसऱ्या बहुजनसमाजवादी परंपरेचे नेतृत्व जोतीबा फुल्यांकडे होते. या तीनही परंपरांत विरोध होते, तसेच काही बाबतींत साम्य होते.

लोकहितवादींचे श्रेष्ठत्व हे की विचारपरिवर्तनाची आवश्यकता त्यांना अगदी प्रथम पटली होती. पुढच्या शंभर वर्षांच्या भारताच्या राजकीय प्रगतीचा क्रमवार विकास कसा होत जाईल, याचे दृश्य त्यांच्या नजरेसमोर उभे होते. १९४२ची ‘क्विट इंडिया’ चळवळ आणि १५ ऑगस्ट १९४७ची स्वातंत्र्यप्राप्ती ही त्यांनी एक शतक आधी सूचित करून ठेवली होती; म्हणून ते भविष्यवादी (Prophet) ठरले आहेत. नव्या युगाचा पुरस्कार करणारे ते आद्य महाराष्ट्रीय होत. आपल्या समाजजीवनाची - जुने आचार, विचार, परंपरा यांची - फेरतपासणी करण्याच्या कामाला त्यांनीच आरंभ केला. सर्वगामी स्वरूपाचे विचार त्यांनी शतपत्रांत मांडले आहेत. सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक इत्यादी सर्व सुधारणांचे ते पुरस्कर्ते होते. त्यांचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘लोकसत्ताक राज्या’ची पार्लमेंटची कल्पना सर्वांआधी त्यांना स्फुरली होती.

लोकहितवादींप्रमाणेच जोतीबा फुल्यांनाही समाजपरिवर्तनाची गरज तीव्रतेने भासली होती. त्यांच्या विचारसरणीतसुद्धा सर्वांगीण सुधारणा अभिप्रेत होती. त्यांच्या चळवळीचे उत्थापन ब्राह्मणांनी दडपलेल्या वर्गांतून झाल्यामुळे तींत प्रखर ब्राह्मणविरोध निर्माण झाला. अद्यापही बहुजनसमाजवादी चळवळ ब्राह्मण द्वेषापासून अलिप्त आहे असा निर्वाळा देणे कठीण आहे. समाजपरिवर्तन विचारपरिवर्तनाविना होत नसते हे सत्य त्यांना पटले होते. ब्राह्मणेतरांचे दास्य हे मूलत: वैचारिक आणि मानसिक आहे हे स्पष्टपणे मांडण्याचे श्रेय त्यांना आहे. त्यांचे कार्य धर्मसुधारणा, समाजसुधारणा आणि दलितोद्धार असे त्रिविध होते. त्यांना शेतकऱ्यांच्या चळवळीचे आद्यप्रवर्तक गणले पाहिजे. पुण्याला काँग्रेस भरल्यावेळी मंडपाबाहेर हिंदी शेतकऱ्याचा पुतळा उभारून शेतकऱ्यांच्या वतीने काँग्रेसला त्यांनी पहिले आव्हान दिले होते. तसेच ड्यूक ऑफ कनॉटच्या आगमनप्रसंगी दरिद्री शेतकऱ्याच्या पोषाखात हजर राहून त्यांनी हिंदी शेतकऱ्याचे चित्र राज्यकर्त्यांना दाखवले होते. बहुजन समाजवादी चळवळीचे जे बीज त्यांनी रोवले, त्याचा विस्तार झालेला आज दिसून येतो.

या काळचे तिसरे प्रतिनिधी विष्णुबुवा ब्रह्मचारी हे होत. ‘एक कुटुंब सर्व प्रजा’ अशा स्वरूपाचा रांगडा साम्यवाद त्यांनी मांडल्यामुळे त्यांना पुरोगामी म्हणून उचलून धरण्याची प्रथा महाराष्ट्रात पडली आहे. त्यामुळे विष्णुबुवा अस्सल सनातनी प्रवृत्तीचे होते, या सत्याकडे डोळेझाक केली जाते. वेदोक्त धर्मावर त्यांची नितांत श्रद्धा होती. ‘जुने ते सर्व चांगले, वेदांत सर्व काही आहे, वेदकाळी आतापेक्षा अधिक सुधारणा होत्या, आधुनिक विज्ञानाचे नियम वेदांतसुद्धा आहेत’ असे सिद्ध करण्याचा त्यांचा अट्टाहास होता. मिशनऱ्यांच्या हिंदुधर्मावर होणाऱ्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचे काम त्यांनी केले. पण एकंदरीत त्यांची विचारसरणी अशास्त्रीय आणि अतार्किक वाटते. त्यांचा साम्यवादही अनेक ख्रिस्ती संतांच्या साम्यवादाप्रमाणे युरोपियन साम्यवाद आहे. लोकांच्या सनातनी व प्रतिगामी भावना चेतवण्याचे कार्य त्यांनी केले. सुधारणावादाला कडवा विरोध करणाऱ्या सनातनवादाची पार्श्वभूमी त्यांनीच तयार करून ठेवली. चिपळूणकरांचे ते पूर्वसुरी होत.

हे तीन प्रवाह पुढे तीन दिशांनी वाढत गेले. सुधारणावादाला मूर्त स्वरूप देण्याचे कार्य न्या. रानडे यांनी केले. लोकहितवादींनी पुरस्कारलेल्या सुधारणावादाला त्यांनी शास्त्रीय तत्त्वज्ञानाचे स्वरूप दिले. १९व्या शतकाच्या उत्तरार्धातील महाराष्ट्राचे एकमेव प्रतिनिधी म्हणून कोणाचे नाव घेता येईल तर ते एकट्या रानड्यांचेच होय. त्यांचे कार्य राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, वाङ्मयीन अशा सर्वगामी स्वरूपाचे होते. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व चळवळींचा उगम त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतो. त्यांच्यापाशी योग्य असा ऐतिहासिक दृष्टीकोन होता. त्यांना सर्व बाजूंनी सुधारणा हवी होती. ‘You Cannot be liberal by halves’ हे त्यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. भारतीय राजकारणाला व्यवस्थित बैठक तयार करण्याचे कार्य त्यांनी केले होते. पुढच्या राष्ट्रवादाने ही बैठक उधळण्याचा प्रयत्न केला हे दुर्दैव होय. रानडे-तेलंग-भांडारकर यांची पिढी म्हणजे पंडितांची पिढी होय. या पिढीत पांडित्याचा प्रकर्ष होत होता. त्यांनी निर्माण केलेली विचारसंपदा अभिमानास्पद आहे. त्याबरोबरच त्यांच्या पांडित्याने भारतीय जनांत स्वत:बद्दल एक जबर विश्वास निर्माण करण्याचे कार्य केले.

न्या. रानड्यांनी तयार केलेल्या पार्श्वभूमीवर टिळक-आगरकर-गोखले हे विरोधी सामने खेळत होते. प्रथम आगरकर विरुद्ध टिळक आणि नंतर गोखले विरुद्ध टिळक असे वाद माजले. या वादांनी कित्येक वर्षे महाराष्ट्राचे आकाश ढगाळले होते. आगरकर-टिळक झगड्यांतून ‘सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी’ हा वाद निर्माण झाला. आणि गोखले-टिळक विरोधांतून नेमस्त व जहाल असे पक्ष बाहेर पडले.

वादाची ही बाह्य स्वरूपे असली तरी खरा झगडा नव्या-जुन्या विचारसरणींमधला होता. स्वराज्य ही राजकीय आकांक्षा तिघांतही सामान्य होती हे लक्षात ठेवले पाहिजे. आगरकर-गोखले विरुद्ध टिळक या झगड्याच्या मुळाशी सुधारणा विरुद्ध राष्ट्रवाद असा संघर्ष चालू होता. या संघर्षाचे मूलगामी स्वरूप समजून घेणे अवश्य आहे.

आगरकर हे बुद्धिवादी पंथाचे होते. त्यांचा बुद्धिवाद कडवा असून त्यात तडजोडीला स्थान नव्हते. मिल, स्पेन्सर, बेंथॅम, कॉम्टे इत्यादी पाश्चात्य विचारवंतांच्या मतांचा गाढ परिणाम त्यांच्यावर झाला होता. पाश्चात्यांच्या नव विचारांनी त्यांच्या ठायी नवयुगाचा संचार झाला होता. आपल्या व्यक्तिजीवित्वाला आणि राष्ट्रजीवित्वाला जी शीलावस्था प्राप्त झाली आहे, ती नाहीशी करून त्यात नवजीवनाचा संचार करण्याचे कार्य ते करत होते. समाजपरिवर्तनाची तीव्र आच त्यांना लागली होती. या परिवर्तनाकरता आवश्यक ती विचारक्रांती करण्याच्या हेतूने ते पुढे सरसावले होते. राजकीय स्थिती ही सामाजिक स्थितीपासून भिन्न नसते. समाजसुधारणेच्या द्वारे समाजस्थितीचा पाया भक्कम केल्याशिवाय नुसत्या राजकीय सुधारणा करू पाहणे म्हणजे पायावाचून कळस चढवणे आहे असे त्यांचे ठाम मत होते. आगरकरांच्या या म्हणण्यातला सत्यपणा आता स्वातंत्र्योत्तर काळात प्रत्ययास येत आहे. राजकीय ध्येय आपण गाठले पण समाजकारण आणि विचार या बाबतींत आपण खूपच मागे राहिलो आहोत. आगरकरांचे विचारक्रांतीचे ऐतिहासिक कार्य आपण पार पाडू शकलो नाही, या करता इतिहास आपल्याला दोषी धरल्याशिवाय राहणार नाही.

लो. टिळक हे राष्ट्रवादाचे महान अध्वर्यु आहेत. आमचा राष्ट्रवाद हा पुराणमतवादी आणि म्हणून प्रतिगामी होता. राजकीय मागण्यांच्या बाबतीत तो जहाल आणि पुरोगामी वाटत असला तरी सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक बाबतींत तो जुन्याला चिकटून राहणारा होता. चिपळूणकर हे महाराष्ट्रांत राष्ट्रवादाचे आद्यप्रवर्तक होत. त्यांचा वारसा टिळकांनी पुढे चालविला. चिपळूणकर हे विष्णुबुवा ब्रह्मचाऱ्यांचे वारसदार हे वर सांगितलेच आहे. सर्व अनर्थांचे मूळ परक्या इंग्रजांच्या राज्यांत आहे, ते गेले की, सारे काही ठीक होईल असा भ्रम चिपळूणकरांनी प्रथम निर्माण केला. त्यांनी सुधारणावाद्यांवर व नव्या विचारांवर चौफेर हल्ले चढवले. त्यांच्या प्रचाराला टिळकांनी राजकीय तत्त्वज्ञानाचे स्वरूप दिले. त्यांनी स्वयंपूर्ण राष्ट्रवादाचा सिद्धान्त मांडला. हा राष्ट्रवाद भूतकाळापासून स्फूर्ती घेत होता. भविष्याकडे पाठ फिरवून प्राचीन भारतीय परंपरेचे आणि मन:कल्पित प्राचीन वैभवाचे पुनरुज्जीवन करण्याकरता राष्ट्रवाद्यांना स्वराज्य हवे होते. भारत भूमी या राष्ट्रदेवतेचे ते उपासक होते. त्यांची चळवळ केवळ भावनेवर आधारलेली होती. इंग्रज आपल्या जुन्या संस्कृतीवर, परंपरांवर आणि समाजव्यवस्थेवर आघात करत होते, म्हणून त्यांच्याबद्दल पराकाष्टेचा द्वेष होता. गोऱ्यांबद्दल वर्णद्वेष हे शेवटपर्यंत आमच्या राष्ट्रवादाचे अविभाज्य अंग होते. ‘हिटलर किंवा जपान आला तरी चालेल, पण इंग्रज एकदाचे जाऊ देत!’ ही युद्धकाळातील सामान्य भावना हेच सिद्ध करते.

आर्थिक आणि राजकीय तत्त्वज्ञानाची पायाशुद्ध बैठक या राष्ट्रवादाला नव्हती. त्यामुळे तो अशास्त्रीय आणि प्रतिगामी स्वरूपाचा होता. समाजसुधारणेला आणि एकंदरीत नव्या विचारांना त्याचा सतत विरोध होता. सुशिक्षित वर्गाच्या असंतोषातून तो निर्माण झाल्यामुळे द्वेषादी विकारांनी भारला गेला होता.

सत्तेचा वाटा मिळवण्याकरता मात्र तो उतावळा झाला होता. त्याचे जहालपण यातच होते. विरोधाकरता विरोध आणि असहिष्णू वृत्ती ही राष्ट्रवाद्यांच्या अंगी पूर्ण बाणली होती. स्वत: तेवढे खरे राष्ट्रीय वृत्तीचे, बाकीचे सारे अराष्ट्रीय अशी त्यांची भावना होती. त्यामुळे इतर सर्वांवर ते सारासार विचार न करता तुटून पडत. अशा या राष्ट्रवादाचे टिळक हे अग्रणी होते. टिळकांचा एकंदर जीवनक्रम बारकाईने पाहिला तर त्यांचे राजकारण संधिसाधुत्वापासून अलिप्त होते असे म्हणणे जड जाईल. लोकांच्या सामान्य भावनांना आवाहन करून ते लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होत होते. त्यांचे खरे वैशिष्ट्य आणि श्रेष्ठत्व होते, ते त्यांच्या लढवय्येपणात होय. झुंजार वीराप्रमाणे सतत झगडणे हे त्यांचे ब्रीद होते. परिस्थितीप्रमाणे आणि प्रसंग ओळखून डावपेच बदलण्याचे चातुर्यही त्यांच्या ठायी होते.

रानड्यांनी तयार केलेली बैठक उधळण्याचा टिळकांनी प्रयत्न केला, पण ना. गोखल्यांनी ती शाबूत राखून तिचा विकास करण्याचा सतत प्रयत्न केला. हिंदी इतिहासात ज्या महान व्यक्ती होऊन गेल्या त्यात गोखल्यांचे स्थान मानाचे आहे. त्यांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन अद्याप व्हावयाचेच आहे. त्यांच्या तोडीचा उदारचरित पुरुष हिंदी राजकीय इतिहासात दुसरा झाला नाही, असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही.

महाराष्ट्राने त्यांची अवहेलना आणि अप्रतिष्ठा करण्याचे बुद्धिपुर:स्सर पातक केले आहे. त्यांनी केलेल्या थोर कार्याबद्दल कृतज्ञ होण्याची सुबुद्धी अद्यापही महाराष्ट्राला सुचलेली दिसत नाही. त्यांची कुचेष्टा करून स्वत:ची प्रतिष्ठा वाढवण्याचे उद्योग टिळकपंथीयांनी केले, पण इतिहास आज गोखल्यांच्या बाजूने कौल देऊ लागला आहे. ना. गोखल्यांची परंपरा ही इंग्लंडमधल्या अस्सल उदारमतवादाची होती. लोकशाहीची जाणीव नसलेल्या देशात लोकशाहीच्या परंपरा घालण्याचे कार्य त्यांना करावे लागत होते हे त्यांचे दुर्दैव होते. त्यांचे कार्यक्षेत्र विधिमंडळे हे होते. त्यांच्या कार्याचे स्वरूप पार्लमेंटमधील विरोधी पक्षाचे (Parliamentary opposition) होते. विरोधी पक्षाचा आदर्श पुढारी म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल, शक्य तेथपर्यंत सहकार्य आणि अशक्य तेथे जोरदार विरोध ही त्यांची पद्धती होती. सनदशीरपणाच्या चौकटीबाहेर ते जाऊ शकत नव्हते. काँग्रेसची प्रस्थापना झाली तिच्या मुळाशी ‘Her Majestry’s Opposition’ निर्माण करणे हा उद्देश होताच, हा उद्देश गोखले योग्य रीतीने सफळ करत होते. सरकार आणि काँग्रेस यांमधील दुवा सांधण्याची बिकट कसरत त्यांना करावी लागत होती. ही कसरत करताना दोघांचाही रोष पत्करण्याचे प्रसंगी येत असत. आपल्या राजकारणाची पातळी ते नेहमी उच्च राखत असत. ‘Politics must be spiritualized’ या त्यांच्या घोषवाक्याचा उद्देशही हाच होता. त्यामुळे त्यांचे राजकारण गढूळ होत नसे.

सेवावृत्ती आणि कार्याची तळमळ ही गोखल्यांची आणखी वैशिष्ट्ये होती. जनतेच्या होणाऱ्या नैतिक आणि आर्थिक शोषणाबद्दल (Moral and material drain) त्यांनी अतिशय हळहळ वाटत असे. सामान्य जनतेवर करांचा भार पडू नये म्हणून ते सरकारला सतत विरोध करत असत. त्यांच्या राजकारणाला व्यासंग, विचार आणि ज्ञान यांची बैठक होती. त्यांच्या शब्दांत राजकारणाचे रहस्य सांगायचे म्हणजे ‘अंधाराकडून प्रकाशाकडे आणि दास्यातून स्वातंत्र्याकडे’ जाण्याची चळवळ (Movement from darkness to light, from bondage to freedom) हे होते. या आपल्या ध्येयाच्या पूर्तीकरता त्यांनी ‘भारत सेवक समाज’ची स्थापना केली.

राष्ट्रवाद्यांनी ना. गोखल्यांना केलेला विरोध ही हिंदी राजकीय इतिहासातील एक दुर्दैवी घटना होय. भारत सेवक समाजाच्याद्वारे गोखल्यांनी ज्या उदात्त कार्याला प्रारंभ केला होता, त्याचा देशभर प्रकार होऊन ते फोफावले असते, तर आपल्या राजकीय जीवनाची कितीतरी अधिक प्रगती झाली असती यात शंका नाही. त्यामुळे आपल्या राजकीय जीवनाचा दर्जा वाढला असता. राष्ट्रवादाच्या आडमुठ्या विरोधामुळे त्या कार्याला यावे तसे व्यापक आणि मूर्त स्वरूप येऊ शकले नाही. ते खुरटल्यामुळे देशाची फार मोठी हानी झाली आहे. गोखल्यांचे हे उदात्त कार्य निष्प्रभ केल्याबद्दल भावी इतिहासकार राष्ट्रवादाला दोषी धरल्याखेरीज राहणार नाहीत.

गोखल्यांच्या पश्चात गेल्या ३५ वर्षांचा आढावा घेतला तर त्यांचाच मार्ग अधिक फलदायी झाला असता असा निर्वाळा देण्याची पाळी आज आली आहे. अनेक वर्षे त्यांच्याविरुद्ध झगडून टिळक अखेरीस त्यांच्याच मार्गावर आले होते. गांधी युगातसुद्धा काँग्रेस मधून मधून गोखल्यांच्या मार्गाकडे धाव घेतच होती. १९२४नंतर स्थापन झालेला स्वराज्य पक्ष, ‘Parliamentary mentality has come to stay’ अशी म. गांधींना १९३४ मध्ये द्यावी लागलेली कबुली, त्यानंतर काँग्रेसचा असेंब्ली प्रवेश, १९३७मध्ये मंत्रिपद स्वीकार, हे सर्व गोखल्यांच्या मार्गाचे विजयच होते. दुर्दैवाने या उपक्रमांच्या मागे गोखल्यांची भरीव बैठक नव्हती. यांच्याहीपुढे जाऊन असे म्हणता येईल की, ज्या विशिष्ट परिस्थितीने १५ ऑगस्ट १९४७चे सत्तांतर झाले ते गोखल्यांच्या मार्गानेही झालेच असते. इतकेच नव्हे तर ते अधिक सुकरतेने आणि व्यवस्थितपणे झाले असते. हिंदी राजकारणात गांधीयुग हे अनावश्यक ठरले नाही ना, अशीही शंका मनाला चाटून गेल्याखेरीज राहणार नाही!

गोखल्यांचा मार्ग चोखाळला असता तर आपले राजकारण अधिक कार्यक्षम झाले असते. आज राज्यकर्त्यांची जी त्रेधा उडताना दिसते, तशी ती उडाली नसती, आणि आज आपण कच्चे आणि अननुभवी म्हणून ओशाळण्याचा जो प्रसंग त्यांच्यावर येतो तो आला नसता आणि कितीतरी अनर्थ टाळताही आले असते. तो इतिहास गोखल्यांच्या बाजूला कौल देत आहे असे वर म्हटले ते याच अर्थाने.

आगरकर-गोखले विरुद्ध टिळक द्वंद्वाची पार्श्वभूमी लक्षात घेतली म्हणजे दिसून येते की, त्यांच्यातील विरोध वरवर दिसतो, तसा केवळ राजकीय स्वरूपाचा नसून दोन परस्परविरोधी अशा विचारसरणीतील तो झगडा होता. या झगड्याचे स्वरूप नवे विरुद्ध जुने, सुधारणावाद विरुद्ध पुराणमतवाद, पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी, बुद्धिवाद विरुद्ध राष्ट्रवाद, भौतिकवाद विरद्ध अध्यात्मवाद असे होते. या झगड्यात दुर्दैवाने बुद्धिवादी आणि पुरोगामी शक्ती पराभूत झाल्या. कारण राष्ट्रवाद्यांप्रमाणे सुधारणावाद्यांना उचलून धरणाऱ्या प्रबल शक्ती समाजात निर्माण झाल्या नाहीत. सुधारणावाद मागे पडला, राष्ट्रवाद फोफावला.

टिळकांच्या पश्चात गांधी युगाला सुरुवात झाली. या युगाने टिळकांच्या अनुयायांची वाताहत झाली. टिळकांचाच राष्ट्रवाद गांधीयुगाने पुढे रेटत नेला. पहिल्या महायुद्धानंतर परिस्थितीत पालट झाला. देशाची आर्थिक वाढ आणि आर्थिक वर्गाचे वाढत जाणारे वर्चस्व व जनतेच्या असंतोषातून झालेले सामुदायिक उत्थापन हे युद्धोत्तर कालाचे विशेष होते. व्यापारी वर्गांची वाढ आणि गांधीवादाची प्रतिष्ठापना या घटना एकाच वेळी घडून आल्या. काँग्रेसमध्ये या वर्गाचे वर्चस्व वाढले. व्यापार आणि भांडवल यांच्या अभावी महाराष्ट्र मागे पडला. त्याच्या हातातील नेतृत्व गेले. टिळकवाद पांगला गेला. टिळकवादांत तीन प्रवृत्तीचे मिश्रण दिसून येते. सनदशीरपणा, बंडखोरांचे लढाऊ राजकारण आणि धर्मनिष्ठा या त्या तीन प्रवृत्ती होत. प्रारंभी त्यांचा दहशतवादाकडे असलेला कल त्यांनी पुढे सोडून दिला. त्यांच्या दहशतवादी आणि धर्मनिष्ठ प्रवृत्तीचे पर्यवसान सावरकरवाद व रा. स्व. संघ यांत झाले. सनदशीर प्रवृत्तीला केळकरादी अनुयायी चिकटून राहिले. लोकशाही स्वराज्य पक्ष हे तिचे अपत्य होय. टिळकांची लढावू प्रवृत्ती मात्र काँग्रेसमध्येच विलीन झाली. एकंदरीत गांधीयुगांत टिळकवादाचे अध:पतन झाले असे म्हणावे लागते.

म. गांधी हे गोखले आणि टिळक या दोघांचाही वारसा घेऊन पुढे आले होते. पण त्यांच्यापाशी गोखल्यांचा आधुनिक दृष्टीकोन नव्हता आणि टिळकांचे पांडित्य नव्हते. गांधीवादात आधुनिक संस्कृतीचा तिरस्कार आणि शास्त्रीय दृष्टीचा अभाव आहे. लढावू वृत्ती आणि सनातन वाद यात टिळक-गांधीत साम्य होते. गांधी पार्लमेंटरी राजकारणाची अवहेलना करत होते, गोखल्यांप्रमाणे लोकशाहीची उपासना त्यांच्यापाशी नव्हती, इतके असूनही गोखले हे गांधींचे राजकीय गुरू होते हे खरे होते.

गांधींच्या राजकारणाचा उगम गोखल्यांच्या गंगोत्रीत शोधता येतो. ज्या मिठाच्या कराविरुद्ध गांधींनी कायदेभंगाचे रान उठवले, त्याच कराविरुद्ध गोखले वर्षानुवर्ष सरकारबरोबर भांडत होते, जनतेच्या ज्या दारिद्रयावस्थेबद्दल गोखले तळमळत असत, त्याला गांधींनी दरिद्री नारायणाचे स्वरूप दिले. ज्या बहिष्काराला गांधींनी सार्वत्रिक स्वरूप दिले, त्याचे राजकीय शस्त्र म्हणून गोखल्यांनी १९०५च्या काँग्रेसच्या अध्यक्षीय भाषणात समर्थन केले होते.

१९०९च्या काँग्रेसमध्ये गांधींच्या आफ्रिकेतील सत्याग्रहाचे तात्त्विक विवेचन गोखल्यांनी सुंदर रीतीने केले होते. कर्झनशाहीच्या जुलुमाला कंटाळून गोखल्यांनी उद्वेगाने सरकारला इशारा दिला होता की, असाच कारभार करणार असाल तर तुमच्याबरोबरच्या सहकार्याला रामराम असो. त्याचेच आचरण डायरशाहीनंतर गांधींनी अमलात आणले. राजकारणाच्या नैतिकतेवर गोखल्यांचाही भर होताच, पण गांधींनी राजकारणाला धर्मनिष्ठेचे स्वरूप दिले. परक्यांचे अंत:करण जिंकणे (to win the foreigner) या गोखल्यांच्या उद्दिष्टाला गांधींनी हृदयपरिवर्तन हे नाव दिले. भारत सेवक समाज आणि गांधींचे आश्रम आणि विधायक कार्य यांत साम्य आहे. मात्र गोखल्यांच्या पद्धतीशी तुलना करता गांधींची पद्धती अशास्त्रीय आणि रांगडी वाटते.

पुण्याच्या भारत सेवक समाजातील ग्रंथालय प्रथम ज्यावेळी गोखल्यांनी गांधींना दाखवले, त्यावेळी ‘इतके ग्रंथ घेऊन काय करायचे आहेत, त्यापेक्षा भंगी काम करणे बरें’ अशा आशयाचे उदगार गांधींनी काढले. त्यातच या दोघांतील भेद ठळकपणे प्रतिबिंबित होतो. गोखले हे एलिटचे- संस्कृतीमान वर्गाचे – प्रतिनिधी होते. गांधी हे अडाणी, मागासलेल्या जनतेचे पुढारी होते.

१९३०नंतर काँग्रेस पूर्णपणे गांधींच्या आहारी गेली. महाराष्ट्रात १९२० ते ३० या दशकात टिळक पक्षाने गांधी पक्षाशी अटीतटीने सामना दिला. टिळकांची धडाडी आणि मुत्सद्देगिरी त्यांच्या अभावी त्या पक्षाला अखेरीस नामोहरम व्हावे लागले. महाराष्ट्रात राष्ट्रवादाला विरोध करणारी बहुजनसमाजवादाची शक्ती होती. ही शक्ती टिळक आणि गांधी या दोघांनाही विरोध करत होती. ब्राह्मणेतर चळवळीत जोतीबा फुल्यांच्या कार्याचे अध:पतन झाले. फुल्यांच्या विचारसरणीचा कालानुरूप शास्त्रशुद्ध विकास ही चळवळ करू शकली नाही. जातीयवाद आणि राजनिष्ठा यावर ती उभारली गेल्यामुळे संधिसाधू नेत्यांच्या आहारी ती गेली. त्यागी कार्यकर्त्यांची परंपरा ती निर्माण करू शकली नाही. बहुजनसमाजाची पातळीही ती वाढवू शकली नाही. गांधीयुगाने याही चळवळीला मागे रेटले. बहुजनसमाजवाद्यांपैकी लढावू वृत्तीच्या गटाने आपल्या नेत्यांविरुद्ध बंड पुकारून १९३०नंतर तो काँग्रेसमध्ये सामील झाला. त्यामुळे काँग्रेसचा विस्तार महाराष्ट्रात वाढायला साहाय्य झाले. बहुजनसमाजवादी चळवळीची बैठक वेगळी असल्यामुळे ती चळवळ काँग्रेसशी कधीच खऱ्या अर्थाने एकरूप होऊ शकली नाही. १९३४नंतर महाराष्ट्रीय काँग्रेसमध्ये तिरंगी सामना सुरू झाला, व त्यात गांधीवाद, समाजवाद आणि बहुजमसमाजवाद यांचा परस्पर संघर्ष घडत होता. टिळक पक्षाला चीत करून विजयी झालेला गांधीपक्ष समाजवाद आणि बहुजनसमाजवाद यांना हाताशी धरून प्रसंगानुरूप एकमेकांविरुद्ध खेळवण्याचे डावपेच लढवत होता. या डावपेचांच्या साहाय्याने गांधीवादी पक्षाने आपले वर्चस्व व नेतृत्व बळकट केले. त्यातही बहुजनसमाजवाद्यांची भूमिका अनिश्चित असल्यामुळे तिचा फायदा या नेतृत्वाने घेतला नसता तरच नवल होते! महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उजवे विरुद्ध डावे असा सामना चालू होता. त्यात डावे तोकडे पडले. उजव्यांच्या नेतृत्वाला ते धक्का देऊ शकले नाहीत.

स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसला केवळ सत्ताधारी उजव्यांचाच पक्ष असे एकपक्षीय स्वरूप आल्यामुळे समाजवादी व बहुजनसमाजवादी या दोघांनाही बाहेर पडावे लागले. बाहेर पडताना जनतेत फैलावलेल्या असंतोषामुळे आपल्याला जनतेचा पाठिंबा मिळवता येईल ही या दोन्ही पक्षांची अपेक्षा खोटी ठरली आहे.

समाजवादी शक्ती ही काँग्रेसच्या चळवळीतूनच निर्माण झाली होती. सायमन कमिशनच्या वेळेपासून तो १९३०च्या चळवळीपर्यंत सुशिक्षित युवकांच्या बंडखोर शक्तीचा पारा वाढत चालला होता. या शक्तीच्या दडपणाखाली म. गांधींना चळवळ सुरू करावी लागली. १९३०-३२ची चळवळ प्रभावी करायला ही युवकांची शक्ती साहाय्यभूत झाली होती. या चळवळीच्या पराभवातून समाजवादाचे उत्थापन झाले होते. म्हणून एका अर्थी या समाजवादी शक्तीचा गांधीवादाशी अपत्यसंबंध आहे. त्यामुळे आज गांधी आणि मार्क्स यांमध्ये हेलकावे खाताना ती दिसून येते. महाराष्ट्रात समाजवादाची पार्श्वभूमी तयार करण्याचे कार्य आगरकरवादाने केले.

आगरकरवादाच्या परंपरेत वाढलेले युवकच समाजवादी पक्षाच्या संस्थापनेत प्रमुख होते, पण गांधीवादाच्या आकर्षणामुळे आगरकरांनी सुरू केलेल्या विचारक्रांतीचे कार्य तर्कशुद्ध रीतीने पुढे रेटत नेण्याचे कार्य करायला ते असमर्थ ठरले आहेत.

बहुजनसमाजवादाची संघटना आज शेतकरी कामगार पक्षात होत आहे. हा पक्ष म्हणजे फुल्यांच्या कार्याचे पर्यावसान आहे. पण हा पक्ष फुल्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याला पारखा होत आहे. राष्ट्रवाद्यांप्रमाणेच सत्तेच्या राजकारणात गुरफटून समाजाच्या इतर अंगांची हा उपेक्षा करत आहे. शे.का. पक्षाच्या आजच्या चळवळीची इंग्लंडमध्ये १०० वर्षांपूर्वी झालेल्या विल्यम कॉबेट याच्या चळवळीशी तुलना करता येईल. इंग्लंडमध्ये नेपोलियनच्या युद्धाची समाप्ती झाल्यानंतर ग्रामीण भागात असंतोष फार भडकला. सरकारवर प्रथम जोराचे दडपण आले, ते ग्रामीण भागाचे होय. विल्यम कॉबेट हा त्याचा नेता होता. हा प्रारंभी अँटी-जॅकोबिन म्हणजे प्रतिक्रांतिकारक होता, पण नंतर परिस्थितीच्या रेट्याने क्रांतिकारक बनला. तेदेखील तत्त्वे पटली म्हणून नव्हे, तर ग्रामीण जनतेच्या हलाखीच्या परिस्थितीची प्रतिक्रिया म्हणून. मुळात तो जुन्याचा अभिमानी होता. मानवी हक्कांची किंवा तत्त्वांची त्याला फारशी आस्था नव्हती; तर लोकांची दु:खे आणि गाऱ्हाणी यामुळे तो अस्वस्थ होत असे. त्याने दौरे काढून ग्रामीण भागात तुफानी प्रचार केला. वुईल्यम कॉबेटचे बरेच विशेष शे.का. पक्षाच्या चळवळीला लागू पडतात. पण कॉबेटच्या धडाडीच्या कर्तृत्वाने दलित जनतेच्या आत्म्यांत त्याने आत्मविश्वास आणि धैर्य ही ओतली. असा कॉबेट अद्याप येथे जन्माला यायचा आहे. आणि तो सुसंस्कृत आणि भविष्याकडे पाहणारा हवा आहे.

गेल्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाची सामान्य रूपरेषा ही अशी आहे.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Sanjay Pawar

Tue , 05 May 2020

या आढाव्यात बाबासाहेब आंबेडकर व त्यांची चळवऴ,गांधी आंबेडकर संघर्ष,पपणे करार.धर्मांतराची घोषणा बाबासाहेबांनी १९३२ सालीच केली होती.शाहू महाराज ही यात कुठे नाहीत!ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ नाही.कम्युनिझमवर शब्द नाही.सावित्रीबाई फुले,पमडिता रमाबाअ,र.धो.कर्वे,महर्षि कर्वे त्यांच्या सुधारणावादी चळवळी यांचा समांतर प्रभाव नव्हता?फुले टिळक झगडा तर गाजलेला.हे सगळे वगळून याला सिंहावलोकन कसे म्हणावे?


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......