अजूनकाही
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र एका संघर्षमय चळवळीनंतर ‘संयुक्त महाराष्ट्र’ म्हणून अधिकृतरित्या अस्तित्वात आला. त्याला १ मे २०२० रोजी ६० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने ‘महाराष्ट्र’ या नावाच्या उत्पत्तीचा आणि अनुषंगाने महाराष्ट्र भूमीच्या इतिहासाचा हा थोडक्यात मागोवा...
..................................................................................................................................................................
महाराष्ट्र भूमीचा इतिहास पडताळून पाहताना लक्षात येतं की, महाराष्ट्राचा इतिहास जवळपास चारेक हजार वर्षांचा आहे! रामायणात ‘दंडकारण्य’ या नावे उल्लेख असलेली ही महाराष्ट्राची भूमी नंतरही बराच मोठा काळ ‘महाकांतार’ म्हणजे अनेक घनदाट वनांचा प्रदेश अशी ओळखली जात असे. ऋग्वेदकाळातल्या संदर्भांचा विचार करता महाराष्ट्राचे प्रामुख्याने अपरान्त, विदर्भ आणि दंडकारण्य असे तीन भाग मानता येतील.
ह्युआन श्वांग हा प्रवासी भारतात असताना जेव्हा महाराष्ट्रात आला, तेव्हा त्याने त्याच्या लेखनात ‘ही भूमी दंडकारण्य नावे ओळखली जात असे’ असा उल्लेख केला आहे. त्याच्या प्रवासवर्णनात महाराष्ट्राबद्दल केलेल्या नोंदीत त्याने महाराष्ट्राचा उल्लेख ‘महोलचे’ असा केलाय. तो म्हणतो, ‘‘इथली जमीन अतिशय सुपीक आहे. लोक सधन आहेत, पण लोकांची राहणी अतिशय साधी आहे. स्वाभावाने हे लोक अतिशय तापट असले तरी नाहक आक्रमक नाहीत. मात्र कुणी यांच्यावर आक्रमण केल्यास हे लोक आपल्या शत्रूचा पाठलाग करून त्याला समूळ संपवतात.”
महाभारतात दिलेल्या देशांच्या यादीत विदर्भानंतर रूपजीविक व अश्मक ही दोन राष्ट्रं आहेत. अश्मक हे आधुनिक मराठ्यांचे पूर्वज असा एक दावा आहे. त्यासंबंधीचा पुरावा आपल्याला बौद्धग्रंथांत मिळतो. बौद्धग्रंथांत सांगितलेल्या बुद्धाच्या वेळी प्रसिद्ध सोळा जमातींपैकी अश्मक एक आहे. त्या वेळी अश्मक गोदावरीच्या वरच्या भागाच्या काठी राहत असत, असा उल्लेख आहे. अश्मकांची राजधानी पैठण होती.
उत्खनन आणि इतिहासकारांच्या अभ्यासातून समोर आलेली आणखी एक गोष्ट म्हणजे सातवाहनांच्या आगमनाच्याही अनेक वर्षं आधी या भूमीत आर्यांचं दळणवळण सुरू होतं. या भागात तेव्हा लहान लहान ‘गोत्र’ म्हणजेच टोळ्या किंवा लहान लहान वसाहती होत्या. हे लोक ‘रट्ट’ म्हणवले जात. पुढे या वसाहती सीमा विस्ताराच्या अभिलाषेत एकमेकांत विलिन होत गेल्या आणि एकछत्र लोकवसाहत निर्माण झाली. इथले लोक ‘मरहट्ट’ आणि ही भूमी ‘मऱ्हाट’ म्हणून ओळखली जाऊ लागली. आठव्या शतकात होऊन गेलेल्या कोहुअल कवी त्याच्या काव्याच्या प्रस्तावनेत म्हणतो, ‘मी हे काव्य मरहट्टी प्रदेशात लिहिलंय.’
पण महाराष्ट्राचा संदर्भ कोहुअलच्या काळापेक्षाही जुना आहे. याच्या अनेक वर्षं आधी बौद्ध धर्माच्या ‘महावंस’ या ग्रंथात महाराष्ट्राचा उल्लेख आढळतो. जयपूरजवळच्या वैराट इथे सापडलेल्या इ.स.पूर्व २६० मध्ये लिहिलेल्या शिलालेखात लिहिलंय-
थेरो मोगलिपुत्तो दिक्खासोक मेंधकर प्रियदस्सि !
निठ ढापेनवान संगिती पेख्खमानो अनागति !!
सासनस महारठ्ठ महाधम्मरक्खित थेर नामक !
महारठ्ठ महानगर तिठ्ठं वरलजत्ता पुब्बो मेंधकर !!
तेनेव रख्खित थेरोपि तृषितग्राम योनक लवनवासे सिठी !
महापंद सवन वासेटी सकल धम्म देसेसि अमरतरसं पायेसि
हा शिलालेख तत्कालीन धम्मभाषा आणि धम्मलिपीत इ.स.पू. २६०च्या आयोजित तिसऱ्या धम्मसंगीतीनंतर कोरण्यात आलाय. याचा मराठीत अर्थ असा -
“महाधम्म संगीतीमध्ये थेरो मोगलिपुत्त तिस्स यांनी सम्राट अशोकांना मेंधकर प्रियदर्शी या नावाने सन्मानित करून दीक्षा दिली. धम्मशासनाच्या उद्देशाने त्यांनी महाधर्मरक्षित यांचे सोबत महाराष्ट्रात जावे असे ठरले. महाधर्मरक्षित हे वरलजत्ता (वेरुळ किंवा वारुलक) या गावी निवास करतील. मेंधकर स्थविरांनी त्यांचे पूर्वेला महाराष्ट्रातील महानगर येथे निवास करावा. तसेच यवनक स्थविरांनी लवणग्रामी, रक्षित स्थविरांनी रुषित ग्रामी आणी महापदन् यांनी सवनग्रामी वास्तव्य करावे.”
महाराष्ट्राचा कोकण भाग मौर्यसाम्राज्याचा भाग होता. टोलेमी याने कोकणविषयी केलेलं लेखनही महत्त्वाचं आहे. तो कोकणाचे पुढीलप्रमाणे चार विभाग करतो -
१. सौराष्ट्र (उत्तर गुजरात)
२. लारीके (लाट, दक्षिण गुजरात)
३. आरिआके (मराठा देश)
४. दामरिके (दामिल, म्हणजे तामिळ लोकांचा प्रदेश)
यांपैकी आरिआके म्हणजे आर्यांचा प्रदेश. त्याचे तीन भाग...
१. मुंबई व दक्षिणेचा काही भाग (Arisake Proper)
२. उत्तर कोकण, दमणपासून खाली राजापूरपर्यंत (Sadan's Ariake)
३. तिसरा भाग दक्षिण कोकण (Pirate Ariake)
मौर्यकाळाच्या सुमारे ३०० वर्षं आधीच्या इतिहासात महाराष्ट्राचा उल्लेख ‘अस्सक गण’ असा आढळतो. मौर्य घराण्याचा अस्त झाल्यानंतर सातवाहनांचा उदय झाला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा मौर्यकालीन राजकीय स्थैर्य आणि सामाजिक सुबत्ता आली. नाणेघाटात सातवाहनांचा एक शिलालेख आहे, ज्यात सातवाहन स्वतःला ‘महारठिनो गणकइरो’ (म्हणजे मऱ्हाठ/महारठ गणाचा सदस्य) असं म्हणवतात. यावरून त्या काळीही महाराष्ट्राच्या भूमीला मऱ्हाट आणि इथे राहणाऱ्या लोकांना मरहट्ट म्हणत असत असं दिसतं.
वेरूचीच्या प्राकृत व्याकरणात ‘महाराष्ट्र’ असा सरळ उल्लेख अभ्यासकारांनी अधोरेखित केलेला असला तरी त्यानंतरच्या सम्राट अशोकाच्या काळातल्या शिलालेखांमध्ये किंवा इतर कुठल्याही साहित्यामध्ये ‘महाराष्ट्र’ असा उल्लेख कुठेही आढळत नाही. त्यामुळे वेरूचीने वर्णन केलेला ‘महाराष्ट्र’ म्हणजे आपल्या आजच्या महाराष्ट्राचीच भूमी की कुठला वेगळा प्रांत याबाबत संभ्रम निर्माण होतो. १०व्या शतकातल्या राजशेखर कवीच्या लेखनात आलेला ‘चाहुआन कुळातील महाराष्ट्रीय मुलीशी विवाह केला’ असा उल्लेख ‘महाराष्ट्र’ या शब्दाचा लेखी पुरावा मानला गेलाय.
विविधं साहित्यात आणि शिलालेखांमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख ‘मऱ्हाट’ ते ‘मरहट्ट’ यादरम्यान आंदोलनं घेत असला तरी दक्षिण भारतीय साहित्यात मात्र महाराष्ट्रातल्या लोकांचा उल्लेख अगदी दुसऱ्या शतकापर्यंत ‘आरियेरू’ असा असल्याचं आढळतं. आर्यांसाठी ‘दक्षिण भारताकडे जाण्याचा सहज मार्ग’ अशीच महाराष्ट्राच्या भूमीची ओळख असल्याने ते या भूमीला ‘दक्षिणापथ’ असं सबोधत असत. या दक्षिणापथच्या विस्ताराचे विविधं ग्रंथांमध्ये विविधं उल्लेख आहेत; पण ढोबळमानाने हा विस्तार आजच्या महाराष्ट्र भूमीला व्यापून दक्षिणेकडे आजच्या चेन्नईपर्यंत आणि वर गुजरातच्याही पलीकडे असा आहे. थोडक्यात, ‘उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्याचा सोयीचा मार्ग’ अशी महाराष्ट्राची आणखी एक जुनी ओळख ‘दक्षिणापथ’ या नावे आढळून येते.
महाराष्ट्रात शेतीचा उगम तापी नदीच्या खोऱ्यात झाल्याचं पुरातत्व उत्खननातून दिसून आलंय, तेही जवळपास ४००० वर्षांपूर्वी! आज संगमनेर तालुक्यात एक गाव आहे, जोर्वे. तिथे जवळपास १५०० वर्षांपूर्वीच्या मनुष्य संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. विशेष म्हणजे या भागात तांब्याची रंगवलेली भांडी सापडली आहेत.
महाराष्ट्र अतिशय समृद्ध आणि म्हणूनच परकीय आक्रमणंही जास्तं! अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीच्या किल्ल्यावर हल्ला केला आणि फक्त वेढा दिला. या किल्ल्यासाठी कधीही युद्ध झालं नाही. रामदेवराय यादव हा शेवटचा राजा जो खिलजीसमोर झुकला. त्याचा मुलगा कृष्णदेवराय तेव्हा दक्षिण भारतात होता; तो परत येईपर्यंत रामदेवरायने खिलजीशी तह उरकला होता. तहात त्याने अवाढव्य संपत्तीबरोबरच त्याची मुलगी खिलजीला दिली.
कृष्णदेवराय परत आल्यावर त्याने खिलजीविरुद्ध एकतर्फी लढा दिला; पण देवगिरीच्या अभेद्य किल्ल्यात बसलेल्या खिलजीने त्याला नेस्तनाबूत केला. रामदेवरायने खिलजीबरोबर तो तह केला नसता तर खिलजीची तुटपुंजी सेना किल्ल्यातलं यादवांचं सैन्य आणि मागून चाल करून आलेलं कृष्णदेवरायचं सैन्य अशा कात्रीत पकडला गेला असता. त्यात भर म्हणजे देवगिरी किल्ल्याची अभेद्य बांधणी. कदाचित महाराष्ट्राने खिलजीला तिथेच संपवलाही असता! पण ... असो.
हरपालदेव, रामदेवरायचा जावई, गावात लपून बसला होता. त्याने कट रचून खिलजीचा काटा काढण्याचा एकहाती प्रयत्न केला, पण त्यात तो मारला गेला. अत्यंत क्रूरपणे त्याचा वध करून देवगिरी किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या टोकदार खुंटींना त्याचा मृतदेह टांगण्यात आला. खरं तर तो हरपालदेवचा मृतदेह म्हणजे जणू समस्त सुसंस्कृत महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं पार्थिव होतं.
यानंतरचा महाराष्ट्राचा इतिहास अतिशय संघर्षमय आहे. आधी खिलजी, मग तुघलक आणि त्यानंतर सुमारे १५० वर्ष बहामनींनी समृद्ध महाराष्ट्राला ओरबाडून लुळा केला. मोगलांच्या शासनकाळात महाराष्ट्र पार लयाला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांविरूद्ध तलवार उपसली आणि पुन्हा एकदा मराठा साम्राज्य स्थापन केलं. शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने संभाजी राजांना कपट करून पकडलं आणि अतिशय क्रूर छळ करत संभाजी राजांचा वध करण्यात आला. यानंतर जवळपास चार दशकांनंतर पेशव्यांनी मोगलांना परास्त केलं आणि बाजीराव पेशव्यांनी मराठी सत्ता अटकेपार पोहोचवली. पानिपतच्या लढाईत अहमदशाह अब्दालीकडून पेशव्यांना मोठा पराभव सहन करावा लागला. यानंतर महाराष्ट्रात पेशव्यांची सत्ता शिल्लक राहिली, तरी महाराष्ट्राबाहेरचं पेशव्यांचं वर्चस्व संपुष्टात आलं.
ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने त्यांचं हेडक्वार्टर मद्रासहून मुंबईला हलवताच मुंबई राजकीय केंद्रबिंदू बनली. मराठा आणि ब्रिटिश यांच्यात तीन युद्धं झाली; तिसऱ्या युद्धानंतर पेशव्यांचं अधिपत्य संपुष्टात आलं आणि ब्रिटिशांनी महाराष्ट्रावर जम बसवला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राने खूप मोठं योगदान दिलंय आणि म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळातही देशाच्या एकूण विकास आणि जडणघडण यामध्ये महाराष्ट्राची भूमिका खूप महत्त्वाची होती. य. दि फडके यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या इतिहासावर फार उत्तम लेखन केलंय.
स्वातंत्रोत्तर काळात भाषेच्या आधारवर राज्यनिर्मिती केली जात असताना तत्कालीन भारत सरकारने महाराष्ट्राची निर्मिती करताना त्यातून मुंबईला वगळलं. खरं तर मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विदर्भ, मराठवाडा, डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग मिळून महाराष्ट्राची निर्मिती अपेक्षित होती. तत्कालीन भारत सरकारच्या महाराष्ट्र निर्मितीविरूद्ध मराठी जनतेच्या प्रक्षोभाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं रूप धारण केलं. २१ नोव्हेंबरला सुरू झालेल्या चळवळीच्या या यज्ञात तब्बल १०७ हुतात्मे आहुती गेल्यावर डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर वगळून ‘मुंबईसह महाराष्ट्र’ निर्माण करण्याला मान्यता मिळाली आणि (अखेर) १ मे १९६० रोजी मराठी भाषिक महाराष्ट्राची निर्मिती झाली.
आज स्वतंत्र भारतातलं एक महत्त्वाचं विकसनशील राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. पश्चिम किनारपट्टीच्या सागरी लाटांना आपल्या भूमीवर खेळवणाऱ्या महाराष्ट्राला खूप मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. व्यवसाय, वस्त्रोद्योग, शेती आणि कलेच्या क्षेत्रात महाराष्ट्राने आजवर मोठं योगदान दिलं आहे. महाराष्ट्रात जन्माला आलेलं संतवाङ़्मय ही मराठी भाषेचं मोठं वैभव आहे. अशीही देदीप्यमान महाराष्ट्रीय संस्कृती मराठी माणसाने आज जगाच्या कानाकोपऱ्यात नेली आहे, महाराष्ट्र मंडळांच्या रूपाने रूजवली आहे.
संदर्भ -
१) Maharashtra, National Informatics, Central Government of India
२) संयुक्त महाराष्ट्र चळवळ, मायभूमी डॉट कॉम
३) History of the Mahrattas by James Grant Duff
४) Rise of the Maratha Power by Mahadev Govind Ranade (1999 reprint)
५) महाराष्ट्राचा वसाहतकाल - इतिहासाचार्य राजवाडे
..................................................................................................................................................................
लेखक ऋतुराज पतकी आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
ruturajvpatki@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Pankaj Ghate
Tue , 05 May 2020
छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांविरूद्ध तलवार उपसली आणि पुन्हा एकदा मराठा साम्राज्य स्थापन केलं.... ‘स्वराज्य’ हा योग्य शब्द आहे. साम्राज्य नव्हे. राज्य, स्वराज्य, साम्राज्य यांना विशिष्ट अर्थ आहे. महाराष्ट्रात पेशव्यांची सत्ता शिल्लक राहिली, तरी महाराष्ट्राबाहेरचं पेशव्यांचं वर्चस्व संपुष्टात आलं... हे विधान तपासून घ्यायला हवं.. ‘वर्चस्वाला धक्का पोहोचला’. याचा फायदा ब्रिटिशांनी बंगालमध्ये घेतला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचं हेडक्वार्टर मद्रासहून मुंबईला हलवताच मुंबई राजकीय केंद्रबिंदू बनली.... कलकत्ता ही राजधानी १९११ पर्यंत होती. मुंबईचे महत्त्व वाढले असले तरी केंद्रबिंदू ‘कलकत्ता’च होते. आणि मग दिल्ली. ब्रिटिशांनी महाराष्ट्रावर जम बसवला. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राने खूप मोठं योगदान दिलंय आणि म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळातही देशाच्या एकूण विकास आणि जडणघडण यामध्ये महाराष्ट्राची भूमिका खूप महत्त्वाची होती.... मधल्या काळात जांभेकर, फुले, लोकहितवादी, रानडे...ते गांधी यांचे योगदान एका वाक्यात उडवलंय.. (त्या खिलजी अन महाराष्ट्रासाठी २ परिच्छेद लिहिले त्याऐवजी इथे एखाद दुसरा अधिक प्रस्तुत ठरला असता.) य. दि फडके यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या इतिहासावर फार उत्तम लेखन केलंय.... त्याहीपेक्षा जास्त दर्जेदार लेखन त्यांनी १९ आणि २०व्या शतकाच्या पूर्वार्धावर (म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळावर) केले आहे. आज स्वतंत्र भारतातलं एक महत्त्वाचं विकसनशील राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. .. विकसनशील’ शब्दाचा अर्थ बदललाय की ?? महाराष्ट्रात जन्माला आलेलं संतवाङ़्मय ही मराठी भाषेचं मोठं वैभव आहे. ... संतांविषयी आधी एक ओळसुद्धा नाही. महाराष्ट्रीय संस्कृती मराठी माणसाने आज जगाच्या कानाकोपऱ्यात नेली आहे, महाराष्ट्र मंडळांच्या रूपाने रूजवली आहे... खरं तर ती इथे रुजवण्याची आज जास्त गरज आहे.. काही ठिकाणी रुजलेली आहे तिचा उल्लेख सोडून बाहेर की दिवे लागले ते कशाला?? ही पुस्तकं खूप जुनी आहेत. पण निरुपयोगी नव्हेत! ही सुद्धा नीटपणे वाचून छान लेख लिहिता आला असता..History of the Mahrattas by James Grant Duff, Rise of the Maratha Power by Mahadev Govind Ranade (1999 reprint), महाराष्ट्राचा वसाहतकाल - इतिहासाचार्य राजवाडे ‘शोध महाराष्ट्राचा’ हे विजय आपटे यांचे पुस्तक एकत्रितपणे महाराष्ट्र समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे.
Pankaj Ghate
Tue , 05 May 2020
महाराष्ट्राचा इतिहास जवळपास चार एक हजार वर्षांचा आहे!! भोंगळ आणि गंडलेला लेख!! महाराष्ट्र भूमीचा इतिहास पडताळून पाहताना लक्षात येतं की, महाराष्ट्राचा इतिहास जवळपास चार एक हजार वर्षांचा आहे! – असं म्हणताना जे पुरावे दिलेत ते खूप अलीकडचे आहेत. यासाठी महाराष्ट्राच्या पुरातत्त्व इतिहासावरील पुस्तकं पाहायला हवी होती. किमान म. के. ढवळीकर यांची ‘आर्यांच्या शोधात’, ‘कोणे एके काळी सिंधू संस्कृती’, ‘भारताची कुळकथा’ आणि महाराष्ट्रापुरते सांगायचे तर ‘महाराष्ट्राची कुळकथा’ हे पुस्तक पाहता आले असते. (जोर्वेचा एक उल्लेख पुढे केला तो आधी घ्यायला हवा होता.) ह्युएनत्संगाच्या वेळी महाराष्ट्रा (मोहोलोच) चा घेर १००० मैल होता. उत्तरेस माळवा, पूर्वेस कोसल आणि आंध्र, दक्षिणेस कोकण, आणि पश्चिमेस समुद्र या त्याच्या मर्यादा होत्या. चालुक्य सम्राट द्वितीय पुलकेशीच्या काळात तो आला आणि त्याच्या प्रजाजनांचे म्हणजे महाराष्ट्राचे आणि तेथील शूर, स्वाभिमानी व विद्याप्रेमी लोकांचे वर्णन तो करतो. (या चालुक्यांनी सहाव्या शतकात महाराष्ट्र जिंकून घेतला होता.) अमुकच प्रदेशाचे नाव महाराष्ट्र होते असे निश्चित नाही. पुढे मराठयांचे राज्य ज्या प्रदेशावर पसरले त्याला महाराष्ट्र म्हणत. पण मराठी राज्य फार काळ न टिकल्यामुळे व त्याच्या सीमा कायम बदलत राहिल्यामुळे हे नाव कोणत्याहि एका विशिष्ट प्रदेशास रूढ झालेले नाही. सध्या मराठी भाषा ज्या भागात प्रामुख्याने चालते त्याचा महाराष्ट्रात अंतर्भाव केलेला आहे. भाषावार प्रांतरचनेत याचा विचार केला गेला. म्हणून बेळगावचा प्रश्न तयार झाला. (अर्थात त्याला अजूनही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.) बौद्ध धर्माच्या ‘महावंस’ या ग्रंथात.. महावंसो (संस्कृत महावंश) महाराष्ट्र अतिशय समृद्ध आणि म्हणूनच परकीय आक्रमणंही जास्तं! .. हे जरा महाराष्ट्रावरच्या अती प्रेमामुळे लिहिलेलं असावं... असे भाग महाराष्ट्रातही अगदी थोडे आहेत. संपूर्ण भारत ताब्यात ठेवायचा असेल तर भौगोलिकदृष्ट्या आणि पुढे समुद्रामुळे सामरिक महत्त्वामुळे आक्रमणे झालेली आहेत. तो परत येईपर्यंत रामदेवरायने खिलजीशी तह उरकला होता. .. उरकला होता म्हणजे काय कळले नाही?? ती काय आंघोळ नव्हे! महाराष्ट्र या आक्रमणापुढे हरला!! कदाचित महाराष्ट्राने खिलजीला तिथेच संपवलाही असता! पण ... असो.... काहीही संपवता आला नसता.. त्या दोघांच्यात खूप फरक होता. आणि इतिहासात जर तर ला काहीही अर्थ नसतो! सुसंस्कृत महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचं पार्थिव होतं... आणि याला महाराष्ट्रच जवाबदार होता.
Praveen Mehetre
Tue , 05 May 2020
श्री.पंकजजी, link पाठवल्या बद्दल धन्यवाद ! मला व्यक्तीगत तुम्हा दोघांकडून माहिती मिळाली,दोघांचे मनःपुर्वक आभार !!!! इतिहास समजला तर वर्तमान-भविष्यशी आपला सुसंवाद होऊ शकेल! -प्रवीण मेहेत्रे ,संगमनेर
Pankaj Ghate
Tue , 05 May 2020
वाद घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही.. https://vishwakosh.marathi.gov.in/40977
Praveen Mehetre
Tue , 05 May 2020
श्री.पंकजजी, कृपया महाराष्ट्र संदर्भात आपलाही लेख आम्हाला वाचावयास मिळेल ही अपेक्षा ! वादे वादे जायते तत्व बोधः! प्रवीण मेहेत्रे
Pankaj Ghate
Tue , 05 May 2020
अत्यंत भोंगळ आणि गंडलेला लेख