उद्या, ३ मे, शकुंतला परांजपे यांची २०वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...
..................................................................................................................................................................
पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आणि त्या आजूबाजूला इतिहासाचे मैलाचे दगड अनेक आहेत. तेथील वैशाली हॉटेलला लागून असलेल्या बोळीत शंभर-दीडशे मीटर अंतरावर असलेला ‘पुरुषोत्तमाश्रम’ किंवा ‘रँग्लर परांजपे बंगला’ असाच एक मैलाचा दगड. एक पत्रकार म्हणून या बंगल्याशी काही काळ माझे घट्ट नाते जुळले होते. याचे कारण होत्या त्या बंगल्यातील त्यावेळच्या रहिवाशी शकुंतला परांजपे.
शकुंतलाबाई परांजपेंना १९९१ साली ‘पद्मभूषण’ किताब जाहीर झाला आणि त्यानिमित्ताने ‘इंडियन एक्सप्रेस’च्या बातमीदार संगीता जहागीरदार-जैन आणि छायाचित्रकार मिलिंद वाडेकर यांच्याबरोबर मी त्यांची त्यांच्या घरी जाऊन मुलाखत घेतली. नव्वदच्या दशकाच्या सुमारास पद्मश्री, पद्मभूषण वगैरे पुरस्कारांचे आजच्याइतके अवमूल्यन झालेले नव्हते. त्यामुळे वृत्तपत्रे पुरस्कार विजेत्यांच्या मुलाखती छापत असत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या शकुंतलाबाईंना ‘पद्मभूषण’ किताब जाहीर झाला होता. या मुलाखतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील एका अत्यंत ख्यातनाम कुटुंबाच्या ऐतिहासिक बंगल्यात मला प्रवेश मिळाला. त्या वेळी महाराष्ट्राच्या मागील पाच-सहा दशकांच्या सामाजिक इतिहासाची नव्वदीकडे वाटचाल करणाऱ्या शकुंतलाबाईंकडून वेगळीच तोंडओळख झाली!
मुलाखतीदरम्यान शकुंतलाबाईंना त्यांच्या या वयात फोटोसाठी साडी वा एखादा चांगला ड्रेस घालण्याचा आग्रह करणे शहाणपणाचे नव्हते. त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी बहुधा ते ऐकलेही नसते. म्हणून छायाचित्रकार मिलिंद वाडेकरने गाऊनआणि त्यावर जाकिट असे छायाचित्र घेतले. तेच मुलाखतीबरोबर छापण्यात आले.
महाराष्ट्राचा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहास परांजपे कुटुंबाचा उल्लेख टाळून होऊ शकत नाही. रँग्लर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हे इंग्लंडला जाऊन गणितातली सिनियर रँग्लर ही अत्यंत मानाची पदवी मिळवणारे पहिले भारतीय. विद्यार्थी असलेल्या विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी पुण्यात विलायती कापडांची होळी केली, तेव्हा शिस्तभंग म्हणून फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य असलेल्या परांजपे यांनी त्यांना दंड केला. त्यामुळे संतापलेल्या लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’त त्यांच्याविरुद्ध खरमरीत अग्रलेख लिहिला. तसे त्यांच्याविरुद्ध ‘केसरी’मध्ये अनेक अग्रलेख प्रसिद्ध झाले आहेत.
या रॅंग्लर परांजपे यांच्या शकुंतला या एकुलत्या कन्या. युरोपात केंब्रिजला शिक्षणासाठी असताना यूरा स्लेप्टझॉप या रशियन चित्रकाराशी त्यांनी लग्न केले. नंतर झालेल्या घटस्फोटानंतर १९३७ला मुलीला म्हणजे सईला घेऊन त्या परत वडिलांकडे पुण्याला राहायला आल्या आणि अखेरपर्यंत तेथेच राहिल्या.
युरोपातून परतल्यावर शकुंतलाबाईंनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत मध्यवर्ती भूमिका केल्या. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘कुंकू’ हा त्यांचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट. ‘दुनिया ना माने’ हा या चित्रपटाचा हिंदी रिमेक.
मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या आतेभावाने म्हणजे रघुनाथ धोंडो कर्वे यांनी आपल्या संततिनियमनाच्या प्रचारकामात मदत मागितली म्हणून त्या कुटुंबनियोजनाचा पुण्यातून प्रसार करू लागल्या. त्या काळात पुण्याबाहेर नदीपलीकडे असलेल्या भांबुर्डा येथील म्हणजे आताच्या शिवाजीनगरमधल्या परांजपेंच्या बंगल्यात त्या महिलांना संततीनियोजनासाठी खास बनवलेल्या टोप्या, जेली नाममात्र भावात विकू लागल्या. निरोध आणि गर्भनिरोधकांच्या गोळ्या वा संततीनियमनाची कुठल्याही पद्धती तोपर्यंत सुशिक्षित वा इतर सामान्य लोकांच्या कानावर पोहोचल्या नव्हत्या. लैंगिक विषयांवर बोलणे वा लिहिणे त्या काळात पूर्णतः निषिद्ध होते.
महर्षी कर्वे यांच्या रघुनाथ या मुलाने आणि फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यांच्या शकुंतला या मुलीने कामजीवनावर बोलावे, लिहावे आणि संततीनियोजनाचा प्रचार करावा ही कल्पना सनातनी मंडळींच्या पचनी पडणे अवघड होते. मात्र शकुंतला परांजपे या र. धों. कर्व्यांसारख्याच खमक्या स्वभावाच्या, बंडखोर, प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या असल्याने त्यांनी या कुणाला भीक घातली नाही. संततिनियमनाची ही चळवळ त्यांनी १९३८ पासून १९५८ पर्यंत चालवली.
शकुंतलाबाईंच्या त्या पहिल्या भेटीत त्यांची थोरवी माझ्या लक्षात येणे शक्य नव्हते. पत्रकाराने मुलाखतीला जाण्याआधी त्या व्यक्तीची माहिती वा कुंडली गुगलवर पाहण्याची सोय तीन दशकापूर्वीच्या जमान्यात नव्हती. आपला बायोडेटा टाईप करून ठेवण्याची प्रथाही तोपर्यंत रूढ झालेली नव्हती. शकुंतला परांजपे यांचे मोठेपण मला त्याच वेळी समजले असते तर कदाचित त्यांच्याकडे पुन्हापुन्हा जाऊन त्यांच्याशी गप्पा मारत बसण्याचे, त्यांना पूर्वसूचना न देता डिस्टर्ब करण्याची मला हिंमत झाली नसती.
शकुंतलाबाईंची माझी मुलाखत ‘टाइम्स ऑफ इंडिया’, पुणे प्लस आणि महाराष्ट्रातील काही मराठी दैनिकांत छापून आल्यानंतर काही दिवसानंतर मी त्यांना पुन्हा भेटायला गेलो. नंतर या भेटी वाढत गेल्या. आमच्या दोघांच्या राहण्याच्या जागेमध्ये केवळ फर्ग्युसन कॉलेज रस्ता होता. याचे कारण परांजपे बंगला वैशाली हॉटेलच्या मागे तर माझी कॉटबेस मंथली लॉज रस्त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीच्या मागेच होती. या काळात शकुंतलाबाईंची मुलगी नाट्य-सिनेमा दिग्दर्शिका सई परांजपे वा त्यांची नात विनी परांजपे मुंबईत राहत असत. त्यामुळे त्या दोघींची माझी कधीही भेट झाली नाही.
परांजपे कुटुंबियांच्या मार्जारप्रेमाविषयी तसेच ब्रिज खेळण्याच्या आवडीविषयी भरपूर लिहिले गेले आहे. शकुंतलाबाईंच्या घरी गेल्यावर छोटेसे फाटक उघडून तळमजल्यावरची बेल वाजवल्यावर केअरटेकरने दार उघडल्यानंतर डाव्या बाजूच्या खोलीत गेले की, शकुंतलाबाई समोर यायच्या. त्यावेळी त्यांच्या पायापाशी घुटमटणारी किमान पाच-सहा लहान-मोठ्या वयाची मांजरे असायची. शकुंतलाबाईंच्या हातात आयताकृती पत्र्याचा स्वीटचा बॉक्स असायचा. जुने लाकडी फर्निचर असलेल्या त्या खोलीत गप्पांसाठी बसले की, थोड्या वेळानंतर शकुंतलाबाई त्या बॉक्समधून काढून मला स्वीट द्यायच्या. आसपास लुडबुडणाऱ्या मांजरांशी बोलत त्यांनाही काहीतरी खायला द्यायच्या. मधूनच बॉक्समधून सिगारेट काढून ती लायटरने शिलगावणार. केंब्रिजला शिकायला गेल्यावर सिगारेट ओढण्याची सवय त्यांना लागली होती. त्या काळात गोव्यात सर्वाधिक लोकप्रिय असलेला फोर स्क्वेअर ग्रीन हा माझा सिगारेटचा आवडता ब्रँड. पण शकुंतलाबाई मला आपली बिनाफिल्टर पनामा सिगारेट ओढण्याचा आग्रह करायच्या. तो आग्रह मोडण्याचा अन त्यांचे मन दुखावण्याचे धाडस मी कधी केले नाही!
बुटकी मूर्ती, घारे डोळे असलेल्या, डोक्यावर पूर्ण पिकलेल्या केशसंभाराचा बॉबकट आणि तोंडाचे बोळके झालेल्या शकुंतलाबाईंचे हसणे अगदी निरागस असायचे. प्रसन्न मूड असला म्हणजे त्या स्वतःविषयी आणि र. धों. किंवा आप्पा कर्व्यांविषयी, जुन्या काळाविषयी भरभरून बोलायच्या. रघुनाथराव कर्व्यांबरोबर संततीनियमनाचा त्या कशा प्रचार करायच्या, संततीनियमनाची साधने घेण्यासाठी खानदानी महिला त्यांच्या घरी येण्यासाठी घाबरत असत याविषयी त्या सांगत असत. र. धों.च्या ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकात दरवेळी शकुंतलाबाईंच्या संततिनियमनाच्या साधनांची म्हणजे टोपी, जेली वगैरेंची जाहिरात असायची. ही जाहिरात पुढीलप्रमाणे असायची -
पुणेकरांची सोय
श्री शकुंतलाबाई परांजपे या स्त्रियांस स्वतः तपासून योग्य आकाराच्या रबरी टोपीची निवड करून ती वापरण्यासंबंधी संपूर्ण माहिती देतील. टोपीबरोबर वापरावी लागणारी जेली व टोपीही त्यांजकडेच विकत मिळेल. गरजूंनी त्यांजकडे चौकशी करावी. भेटण्याची वेळ दुपारी ३ ते ५. पत्ता नं १२२०, रँग्लर परांजपे रोड, भांबुर्डा, पुणे ४.
ही जाहिरात त्या काळात पुण्यात व बाहेरही सनातनी आणि आंबटशौकीन मंडळींच्या चेष्टेचा आणि टवाळीचा विषय बनली होती. नियतकालिकांतही या जाहिरातीबद्दल काहीबाही छापून येत असे. नव्वदच्या दशकात एका खासगी कंपनीने पूजा बेदी या मॉडेलला घेऊन टेलिव्हिजनवर आपल्या निरोध उत्पादनाची पहिल्यांदा जाहिरात केली, तेव्हा देशभरातील समाजात किती खळबळ उडाली होती! ही तर अगदी अलीकडची गोष्ट आहे. आता तर निरोधच्या जाहिराती सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत दाखवण्यास बंदीच आहे. आजची ही स्थिती आहे, तर शकुंतलाबाईंची ती जाहिरात तर मागील शतकाच्या चाळीसच्या दशकात प्रसिद्ध व्हायची!! त्या वेळी त्यांना किती टवाळखोरीला आणि निंदानालस्तीला तोंड द्यावे लागले असेल याची कल्पनाच केलेली बरी!!! मात्र शकुंतलाबाईंनी या टीकेला उडवून लावले. त्यांचा स्वभावच तसा होता.
अशाच एका भेटीत ‘समाजस्वास्थ्य’चा एक अंक शकुंतलाबाईनी मला दिला. मासिकाच्या मुखपृष्ठावर नेहमीप्रमाणे नग्न स्त्रीचा फोटो आणि आतल्या पानावर मासिकाचे पुढील ब्रीदवाक्य- ‘अश्लीलता हा कोणत्याही लेखाचा, चित्राचा किंवा इतर वस्तूचा गुण नसून तो फक्त तसा आरोप करणारांच्या मनाचा गुण होय.’ (ऑबसेनीटी लाईज इन दी आईज ऑफ दी बिहोल्डर) या प्रसिद्ध वाक्याचे हे मराठी रूपांतर. र. धों. कर्व्यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या मराठीतील पहिल्या वैज्ञानिक कामजीवनावरील मासिकावर अश्लीलतेचा आरोप करणाऱ्यावर हे ब्रीदवाक्य म्हणजे एक चपराकच होती. रघुनाथराव एका अश्लीलतेच्या दाव्यात दोषी ठरून त्यांना दंड झाला, तेव्हापासून त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’मध्ये मासिकात हे ब्रीदवाक्य छापण्यास सुरुवात केली. तो १५ मार्च १९४०चा दोन आणे किंमतीचा अंक आजही एक अमूल्य भेट आणि ऐतिहासिक वारसा म्हणून मी जपला आहे.
रघुनाथरावांच्या लेखांमुळे त्यांच्यावर अश्लीलतेच्या कायद्यानुसार खटले भरण्यात आले. रघुनाथरावांवर १९३१ साली पहिला खटला भरण्यात आला, तेव्हा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये जिनिव्हा येथे काम करणाऱ्या शकुंतलाबाईंनी त्यांना खटल्याच्या खर्चासाठी दोन पौंड पाठवून दिले होते. काही खटल्यांत रघुनाथरावांना शिक्षाही झाल्या. यापैकी एका अश्लीलतेच्या प्रकरणात तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी र.धो. कर्व्यांचे वकीलपत्र घेतले होते.
या मासिकात शकुंतला परांजपेंची एक लेखमालिकाही होती. रघुनाथराव कर्व्यांचे १४ ऑक्टोबर १९५३ ला निधन झाल्यावर हे मासिक पुढे चालवण्याची विनंती मात्र शकुंतलाबाईंनी धुडकावून लावली. त्याबाबत त्या म्हणतात – “ ‘समाजस्वास्थ’चा एकखांबी तंबू काळाचं बोलावणं येईपर्यंत आप्पानं खंबीरपणे उचलून धरला. तो गेल्यानंतर हे मासिक मी चालवावं अशी अनेकांनी गळ घातली. पण माझी कुवत मी ओळखते. धूमकेतूप्रमाणे चमकून गेलेल्या र. धो. कर्व्यांच्या ‘समाजस्वास्थ’चा मला विचका करायचा नव्हता.”
ब्रिटिश सरकारने १९४४ साली रँग्लर परांजपेंची ऑस्ट्रेलियातील हिंदुस्थानचे पहिले उच्चायुक्त म्हणून नेमणूक केली. त्यानिमित्ताने तीन वर्षे शकुंतलाबाईंचे ऑस्ट्रेलियात वास्तव्य होते.
कॉलेज जीवनात वीर सावरकरांना रँग्लर परांजप्यांनी शिक्षा केली होती, तरी ते नंतर परांजपे यांना भेटायला अनेकदा घरी येत असत. एकदा त्यांच्याबरोबर नथुराम गोडसेसुद्धा आला होता, अशी आठवण शकुंतलाबाईंनी सांगितली आहे.
शकुंतलाबाई १९५८ ते १९६४ या काळात महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभासद होत्या राज्यसभेच्या राष्ट्रपतिनियुक्त सभासद म्हणून १९६४नंतर एक मुदतभर त्यांनी काम केले. संसदेच्या कामकाजाच्या दर्जाबाबत आणि सभागृहातील खासदारांच्या वर्तनाबाबत त्यांनी आपल्या एका लेखात खंत व्यक्त केली आहे.
ब्रिज खेळणे हा परांजपे कुटुंबियांचा आवडता विरंगुळा. या खेळामुळे दिल्लीतील आपले जीवन सुसह्य झाले असे त्यांनी लिहिले आहे. राजधानीत अनुभवलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे, लोकशाही मूल्यांचा ऱ्हास, पक्षातंरे वगैरेंमुळे भ्रमनिरास होऊन दिल्लीला रामराम ठोकताना हायसे वाटले असे त्या म्हणतात…
मुंबई इलाख्यात १६ वर्षे पूर्ण केल्याशिवाय मॅट्रिकच्या परीक्षेला बसता येत नसे. शिक्षणमंत्री झाल्यावर रँग्लर परांजपेंनी हा नियम बदलला. याचा फायदा पंधरा वर्षांच्या शकुंतलाला होत होता. मात्र आपल्या मुलीसाठी हा नियम बदलला असा आरोप होऊ नये म्हणून त्यांनी तिला त्या वर्षी मॅट्रिकच्या परीक्षेला बसू दिले नाही. अशा शिक्षणमंत्र्यांची मुलगी असलेल्या शकुंतलाबाईंना दिल्लीतल्या या वातावरणाशी मिळतेजुळते घेणे अवघड वाटणारच.
सत्तरच्या दशकातील संसदेतील अनुभव सांगताना त्या लिहितात – “उत्तम वक्ता म्हणून कोणा व्यक्तीचे नाव घ्यायचे झाले तर ते श्री अटल बिहारी वाजपेयी यांचे. दोन्ही सभागृहांत त्यांचा हात धरणारा कोणी नाही. त्यांची विनोदबुद्धी त्यांच्या वक्तव्याइतकीच अभिजात आहे.”
शकुंतलाबाईंच्या फटकळ स्वभावाचाही मी अनेकदा अनुभव घेतला. तुम्ही आत्मचरित्र का लिहीत नाही, असे एकदा मी विचारल्यावर त्या खवळल्या होत्या. त्यांचा मूड लगेच ऑफ झाला, मग मी तेथून काढता पाय घेतला.
शकुंतलाबाईंच्या घरी झालेल्या अशा अनेक भेठीगाठीनंतर त्यांचे एक व्यक्तिचित्र मी लिहिले होते. ‘उत्तुंग’ या शीर्षकाच्या १९९३ साली प्रसिद्ध झालेल्या माझ्या व्यक्तिचित्रसंग्रहात त्याचा समावेश होता. माझ्या लग्नानंतर माझा मुक्काम डेक्कन जिमखान्यातून पिंपरी-चिंचवडला हलला आणि आमचे शेजारपण कायमचे तुटले.
मानववंशशास्त्रज्ञ इरावती कर्वे या रँग्लर परांजप्यांच्या घरी शकुंतला परांजपे यांच्याबरोबर वाढल्या. इरावतीबाईंनी ‘दुसरे मामंजी’ या आपल्या व्यक्तिचित्रणात रँग्लरांच्या सावलीत त्या दोघी कशा वाढल्या याविषयी छान लिहिले आहे. शकुंतलाबाईंनी मराठी आणि इंग्रजीतही भरपूर लिहिले आहे. र. धो. कर्व्यांवर ‘आप्पा कर्वे’ या नावाचा चटका लावणारा एक मोठा लेख त्यांनी लिहिला आहे. ‘सेन्स अँड नॉन्सेन्स’, ‘थ्री इयर्स इन ऑस्ट्रेलिया’ ही त्यांची इंग्रजीतील, तर मराठीतील ‘काही आंबट काही गोड’, ‘भिल्लिणिची बोरे’ ही मराठी पुस्तके गाजली. विनया खडपेकर यांनी संपादित केलेले ‘निवडक शकुंतला परांजपे’ या नावाचे एक पुस्तक राजहंस प्रकाशनने २०१७ साली प्रकाशित केले आहे. २९ लेखांचा आणि २७४ पानांचा हा ग्रंथ शकुंतलाबाईंच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची झलक दाखवतो.
‘माझी प्रेतयात्रा’ या लेखात शकुंतलाबाईंनी आपल्या जीवनाचे तत्त्वज्ञान मांडले आहे. आपले निधन झाले असे त्यांना स्वप्न पडून त्यानंतर आपली मुलगी सई, शेजारीपाजारी काय बोलतील, टिळक स्मारक मंदिरातील शोकसभेत काय भाषणे होतील, याविषयी हा लेख आहे. या कथित शोकसभेत मामा वरेरकर, कृष्णराव मराठे आणि आचार्य अत्रे वगैरे मंडळी शकुंतलाबाईंच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक घटनांचे, त्यांच्या सामाजिक कार्याचे आणि जीवनशैलीचे पोस्टमार्टेम करतात म्हणजे अक्षरशः वाभाडे काढतात. स्वतःकडे तटस्थ वृत्तीने पाहतानाच ‘आपल्याला आवडले ते सर्व आपण केले, भले ते इतरांना आवडो ना आवडो’ अशी अप्रत्यक्ष भूमिका त्या या लेखात मांडतात.
शकुंतलाबाईंचा जन्म १७ जानेवारी १९०६चा. वयाच्या ९४व्या वर्षी म्हणजे ३ मे २००० रोजी त्यांचे निधन झाले.
वटवृक्षाखाली रोपटे वाढत नाही असे म्हणतात. शकुंतला परांजपे यांनी संततिनियमनाच्या चळवळीत र. धों. कर्व्यांना मोलाची मदत केली. मात्र आधी रॅंग्लर परांजप्यांची मुलगी म्हणून आणि नंतर दिग्दर्शिका सई परांजपे यांची आई म्हणून शकुंतलाबाईंना ओळख मिळाली. त्यांच्या कर्तृत्वावर हा खरे तर अन्याय. सुदैवाने शकुंतलाबाईंना ‘पद्मभूषण’ किताबाने सन्मानित करून भारत सरकारने ही कसर भरून काढली आणि त्यांचे योगदान अधोरेखित केले. नाट्य आणि सिनेमा क्षेत्रातील कामगिरीबद्दल शकुंतलाबाईंच्या कन्या सई परांजपे यांनाही भारत सरकारने २००६ साली ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवले. हा मानाचा पुरस्कार मिळवणाऱ्या या बहुधा एकमेव मायलेकी असाव्यात.
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment