‘नाइन्टीन नाइन्टी’ : सचिन कुंडलकरमधील संवेदनशील वाचक, लेखक, प्रेक्षक आणि श्रोत्याला समोर आणणारं लेखन
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अक्षय शेलार
  • ‘नाइन्टीन नाइन्टीचं मुखपृष्ठ
  • Sat , 02 May 2020
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस नाइन्टीन नाइन्टी Nineteen Ninety सचिन कुंडलकर Sachin Kundalkar

सचिन कुंडलकरच्या ‘नाइन्टीन नाइन्टी’मधील जवळपास सगळंच लिखाण हे एका प्रचंड वैयक्तिक अशा अवकाशातून आलेलं आहे. ते कुंडलकर या लेखक-दिग्दर्शकाविषयी, या व्यक्तीविषयी जितकं आहे, तितकंच त्याच्या सभोवतालाविषयी आणि त्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाविषयी आहे. हा दृष्टिकोन त्याच्या जडणघडणीतून आणि वैयक्तिक, सामाजिक अवकाशातून निपजलेला आहे. हे लिखाण अनेक अर्थी प्रामाणिक आहे. वयाच्या अमुक एका टप्प्यानंतर पुण्यातील सदाशिव पेठी अवकाशातून आणि मर्यादित दृष्टिकोनातून बाहेर पडण्याबाबत इथे मांडलं जातं, पण सोबतच कधीकाळी आपण नको तितके ‘नाइव्ह’ होतो, याबाबतची कन्फेशन्सही इथे आहेत. 

समकालीन माध्यमं आणि समाजमाध्यमांमधील कथनव्यवस्था ही भूतकालीन जीवन आणि त्यात रममाण होण्यात गुंतलेली आहे. समकालीन जागतिक तसेच भारतीय पॉप-कल्चरमध्ये ‘नॉस्टॅल्जिया’ ही संकल्पना आणि त्याभोवती फिरणाऱ्या प्रत्येक गोष्टीला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हे पुस्तक त्याचं नाव सुचवतं तितकं काही ‘नॉस्टॅल्जिया’मध्ये रमणारं नाही. या पुस्तकातील लेखनात दिसणारा कुंडलकरदेखील याच्या अगदी उलट आहे. तो नवनवीन गोष्टी आत्मसात करू पाहणारा आहे. पुस्तकाला हे नाव मिळालं त्यामागील कारण हेच की, लेखकाच्या जडणघडणीमध्ये या दशकाचा महत्त्वाचा वाटा होता.

प्रस्तावनेऐवजी थेट ‘नाइन्टीन नाइन्टी’ याच नावाच्या दीर्घ लेखाने पुस्तकाची सुरुवात होते. ज्यात एके ठिकाणी लिहिलं जातं की, ‘प्रत्येक माणूस हा एका दशकाने घडवला जातो, ओळखला जातो’. कुंडलकरसाठी हे काम १९९०च्या दशकाने केलं. त्याला सिनेमाशी जोडलं, त्याच दशकात तो फ्रान्सला गेला. नवीन भाषा शिकला, नवीन देश फिरला. ज्याद्वारे नवीन संस्कृतीशी त्याचा संबंध आला. आपलं जग आणि अवकाश किती छोटेखानी आणि मर्यादित आहे याची त्याला जाणीव झाली. या जाणीवेने त्याला एक कलाकार म्हणून आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून अधिक समृद्ध होण्यास प्रवृत्त केलं. त्यामुळे ‘नाइन्टीन नाइन्टी’मधील लेख त्याला वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांत निरनिराळ्या व्यक्ती, स्थळं आणि गोष्टींनी कशा प्रकारे अधिक समृद्ध बनवलं याची टिपणं आहेत. 

याआधी मी कुंडलकरचं लिखाण ‘लोकसत्ता’मध्ये त्याचं सदर सुरू असताना वाचलं होतं, आणि त्यानंतर कधीतरी त्याच्या ब्लॉगवर त्याचं लेखन पुनःप्रकाशित केल्याचं कळल्यावर तिथे ते बिंज-रीड केलं होतं. (त्याचे काहीएक चित्रपटही पाहिलेले होते.) त्याच्या लिखाणाची शैली ही अधिक तिरकस आणि जे काही म्हणायचं आहे, ते स्पष्टपणे व्यक्त करणारी आहे. त्यात पॉलिटिकल करेक्टनेस वगैरेचा संबंध नाही. त्यामुळे साहजिकच त्याचं लिखाण हे वेळोवेळी विवादास्पद राहिलेलं आहे. मात्र, एकदा का हा ‘पॉलिटिकल करेक्टनेस’चा अट्टाहास सोडला तर त्याच्या लिखाणाचं लालित्यपूर्ण असणं, आपल्या आवडत्या लेखक, गायक, संगीतकार इत्यादींविषयी अधिक काहीतरी सांगू पाहणं हे सगळं अप्रिशिएट करता येऊ शकेल अशा मताचा मी आहे.

त्याच्या लिखाणातील तिरकस दृष्टिकोन हा कधीच काठावर किंवा ज्याला आपण ‘ऑन द व्हर्ज’ म्हणतो तसा नसतो, हे मी जरूर नमूद करेन. हा सूर अनेकदा निर्णायक तऱ्हेचा असतो. त्यामुळे कुंडलकर सलग वाचणं किंवा हा तिरकसपणा कुठून येतो हे समजून घेणं अवघड जातं, असं मला वाटतं. एकदा ही पूर्वग्रहवजा तक्रार बाजूला ठेवल्यास या लिखाणात रिलेटेबल वाटेलसं बरंच काही आढळतं. 

‘इस्तंबूलची डायरी’, ‘पॅरिस नावाची डायरी’ ही दोन प्रवासवर्णनं सुरेख आहेतच. या दोन्हींसोबतच ‘शहराचे छायाचित्र’ आणि ‘सातत्याने बदलणारी शहरे’ या दोन लेखांच्या माध्यमातून कुंडलकर शहरांकडे कोणत्या नजरेनं पाहतो ते लक्षात येतं. ही नजर काहीएक अंशी रोमँटिक जरूर आहे, पण त्यातही अकारण नॉस्टॅल्जिया टाळलेला आहे. या लेखांत त्या त्या शहरांना एका लाइव्हली दृष्टिकोनातून टिपलेलं आहे. ती शहरं, त्यातील ठिकाणं ज्या भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक संदर्भव्यवस्थेचा भाग आहे, तिची वैशिष्ट्यं जाणून घेण्याचा प्रयत्न यात केलेला आहे. त्या शहरांत भेटलेल्या लोकांची संक्षिप्त, पण प्रभावी व्यक्तीचित्रंही या लेखांत आढळतात.

एकाच माणसात अलिप्त, तरीही सामाजिक, संगतीप्रिय असे टोकाचे गुणधर्म कसे अस्तित्त्वात असू शकतात याचा नमुना म्हणजे या पुस्तकातील लेखनातून कुंडलकर या लेखकाचं निर्माण होणारं चित्र होय. ‘शहराचे छायाचित्र’मध्ये सुरुवातीला तो वाढलेल्या पुण्यामध्ये, शहरातील घरांच्या वास्तूरचनेमध्ये झालेले बदल सांगत असताना ते त्याला अप्रिय असल्याचं सांगतो. पण, सोबतच याला केवळ नॉस्टॅल्जिया हे कारण नसून आर्किटेक्चरल दृष्टिकोनातून शहराचं स्वतःचं असं जे वैशिष्ट्य असतं (किंवा असायला हवं) ते पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणापायी हरवत जाणं हेही एक कारण असल्याचं नमूद करतो. तर, शेवटाकडे जाताना ‘आपल्या मनातील आणि स्मृतीतील शहराचा अट्टाहास टाळायला हवा’ असंही म्हणतो.

लेखाचं आणि परिस्थितीचं कथन करत असताना त्यादरम्यान त्याच्या दृष्टिकोनात झालेला बदल आणि काहीएक प्रमाणात त्याची कारणमीमांसा ‘सातत्याने बदलणारी शहरे’मध्ये वाचायला मिळते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे नॉस्टॅल्जियाच्या पलीकडे जाणारं असं हे लिखाण आहे. 

पुस्तकात सर्वत्र इतर लेखक, त्यांचं लिखाण उद्धृत केलं जाणं; गायक, संगीतकार आणि त्यांच्या गाण्यांचे, चित्रपटांचे, चित्रकला आणि इतर कलांचे उल्लेख येणं असं बरंच काही घडतं. असं असलं तरी, ‘वॉकमन’, ‘मनाच्या पोकळीतील संगीत’, ‘पुस्तकांचे वेड’ आणि काहीएक प्रमाणात ‘मराठी साहित्याचे जग’ आणि ‘दृश्यकलेचे साक्षात्कार’ या लेखांमध्ये या संदर्भांना अधिकच महत्त्व आहे. हे लेख साहित्य, चित्रपट, संगीत, चित्र इत्यादी कुठल्याही कलाप्रकाराकडे एक वाचक, प्रेक्षक, श्रोता म्हणून गंभीरपणे पाहणाऱ्या व्यक्तीचं आणि त्याच्या सवयींचं प्रतिनिधित्व करतात. हे लेख म्हणजे या सर्व कलाप्रकारांच्या तांत्रिक अंगांकडे पाहत असतानाच त्याहून अधिक कॉन्शिअस, भावनिक आणि वैयक्तिक प्रतिसादाची नोंद करणारे आहेत.

उदाहरणार्थ, कुंडलकर एके ठिकाणी सिनेमाबाबत लिहितो की, सिनेमा एकट्या माणसाला स्वीकारतो. आतून आणि बाहेरून. निरनिराळ्या कलांना दिलेला हा वैयक्तिक पातळीवरील प्रतिसाद वैश्विक बनतो तो अशाच लेखनामुळे. अलिप्तपणा, एकटेपणाला कवटाळत असताना संगीत, साहित्य, चित्रपट या सर्व कला त्या एकट्या माणसाच्या साथीला असतात. एकट्या माणसाचं हे एकाकी असणं उद्विग्न असेलच असं नसतं, हा गरजेचा मुद्दा इथे नकळतपणे अधोरेखित होतो. 

कुंडलकर ‘मनाच्या पोकळीतील संगीत’ या लेखात संगीताबाबत जे बोलतो, ते पॅराफ्रेज करावंसं वाटतं. त्यातील गर्भितार्थ साधारण असा – ‘‘आजूबाजूचे जग आणि त्याचा चेहरामोहरा बदलत असताना जगण्याच्या प्रवाहात एक गोष्ट सतत माझ्यासोबत शांतपणे चालत राहिली, ती म्हणजे माझ्या आजूबाजूला असणारे, वाजणारे, ऐकू येणारे, गायले आणि वाजवले जाणारे संगीत. कविता, साहित्य ह्या सगळ्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या संगीताने मला हे सतत बदलते जग समजून घ्यायला नेहमी मदत केली.’’ माणसाने वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या तऱ्हेचं संगीत ऐकणं, निरनिराळ्या प्रकारचं संगीत एक्स्प्लोर करत राहणं या बाबी सदर लेखात उत्तमरीत्या प्रतिबिंबित होतात. 

कुंडलकर एकटेपणाकडे ज्या दृष्टीने पाहतो, त्या प्रकारचं लेखन मराठीत अगदीच क्वचित पहायला मिळतं. माणसाने एकटेपणाला कवटाळणं यात काहीच गैर नाही, हे तर साहजिक आहे. मात्र, कुंडलकरचं लिखाण यापलीकडे जात अलिप्त आणि एकटं असणं म्हणजे काय, एकटेपणाच्या सवयीसोबत कायम पिच्छा पुरवणारं नैराश्य आणि त्यावरील उपाय हे सगळं विस्तृतपणे मांडतं. ‘एकट्या माणसाला घर हवे’, ‘एकट्या माणसाचे स्वयंपाकघर’, ‘फिक्शन’ आणि ‘नैराश्याची सुबक नोंदवही’ या लेखांमध्ये हे अगदी समर्पकरीत्या उतरलं आहे.

सोबतच, ‘फिक्शन’, ‘प्रकरण’ आणि ‘शरीर’ या लेखांमध्ये तो प्रेम, प्रेमाची शारीरिकता या संकल्पनांकडे ज्या नजरेनं पाहतो आणि ज्या लालित्यपूर्ण शैलीत मांडतो, तेही मराठी साहित्यात सहसा न आढळणारं आहे.

याखेरीज, अनुक्रमे विजय तेंडुलकर आणि चेतन दातार यांच्यावरील ‘मोनोलॉग’ आणि ‘प्राइम टाइम स्टार’ हे दोन्ही लेख म्हणजे व्यक्तीचित्रणाचे उत्तम नमुने आहेत. समकालीन मराठी साहित्यामध्ये अशा तऱ्हेचं हळवं लिखाण वाचल्याचा अनुभव यापूर्वी राजू परुळेकरांचे तेंडुलकर आणि त्यांच्या आईवरील लेख वाचत असताना आल्याचं आठवतं. 

सचिन कुंडलकर सध्या मराठी चित्रपटदृष्टीत कार्यरत असलेल्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील चित्रपटकर्त्यांपैकी एक आहे. तो चांगला लेखक आहे, हे तर त्याच्या पहिल्या कादंबरीने ‘कोबाल्ट ब्लू’ने सिद्ध केलं होतंच. तर, ‘नाइन्टीन नाइन्टी’ त्याच्यातील संवेदनशील वाचक, लेखक, प्रेक्षक आणि श्रोत्याला समोर आणतं. ‘एकट्या माणसाची नोंदवही’ म्हणावंसं हे लिखाण एक सुंदर अनुभूती आहे. 

..................................................................................................................................................................

सचिन कुंडलकरच्या ‘नाइन्टीन नाइन्टी’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5068/Nineteen-Ninety

..................................................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

mangesh vanjari

Sat , 23 May 2020

सुंदर लिहलय.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......