अजूनकाही
ज्येष्ठ कवी वसंत दत्तात्रेय गुर्जर यांचे मन:पूर्वक आभार मानून…
मोदी मला भेटले, दिल्लीच्या अशोका रोडवरच्या
कार्यालयात एक पदाधिकारी म्हणून काम करताना
तेव्हा नव्हतं कसलंच वलय, रूपेरी किनार, अमोघ वक्तृत्व वगैरे
म्हणजे ते त्यांच्यात होतंच पण तिथे कुणालाच तशी तेवढी
कल्पनाबिल्पना नव्हती. कारण तेव्हा वक्तृत्व म्हणजे अटलजी,
नंतर प्रमोदजी…अंगार म्हणाव्या अशा ऋतंभरा उभा भारती,
जंटलमन जेटली, दक्षिणी हेलाचे व्यंकय्या, असे रथी-महारथी
त्यांचीच चर्चा, नावे, छबी…
तेव्हा मोदी मला भेटले कार्यालयीन वेळ संपल्यावर
संध्याकाळी सात\साडेसातनंतर जवळपास निर्मनुष्य होणाऱ्या
दिल्लीच्या त्या सत्तेच्या महामार्गावर…
इंडिया गेट, जंतर मंतर, नॉर्थ अॅव्हेन्यू, साऊथ अॅव्हेन्यू, संसद,
राष्ट्रपती भवन, जनपथ, कॅनॉट प्लेस, मंडी हाऊस,
लोधी गार्डन…देशाच्या सर्व शक्तिमान सत्तास्थानांचा
रोड मॅप स्वत:च्या मनाशी बनवताना…
मोदी मला भेटले जुन्या दिल्लीत, लाल किल्ल्याच्या आसपासच्या
गर्दीत, लाल किल्लाही चहूबाजूंनी घुटमळून पाहताना
इथूनच तर तिरंग्याची दोरी ओढून मग राष्ट्राला उद्देशून भाषण
करण्याची संधी या देशात फक्त एकाच पदाला मिळते – पंतप्रधान!
ते पद मिळण्याची स्वप्नील शक्यता चाचपडताना.
मोदी तेव्हाही मनात बोलत. मनातल्या मनात ठरवत
आपल्या मनाचा थांगपत्ता न लागू देता.
मोदी मला भेटले
अशोका रोडवरून अकस्मात अहमदाबादला जाऊन
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताना
गुजरातेत तळ ठोकून बसलेले वाघेला, केशूभाई
आणखी कोण कोण…तेव्हाही गर्दी आजच्या सारखीच
पण त्यात प्रेम कमी आणि धक्काबुक्की जास्त होती
सोनेरी काडीच्या आपल्या रिमलेस चष्म्याला
स्थितप्रज्ञ चेहऱ्यावर सांभाळत मोदी हळूहळू पुढे सरकत
होते. मोदी तेव्हाही मनात काहीतरी बोलत होते
पण अस्फूट हुंकारही ऐकू येत नव्हता…
मोदी अहमदाबादेत भेटले तेव्हा तिथे त्यांना
पाठवण्यात महाजनांना रस होता म्हणे, जेटलींचाही
आणि लालजींचा तर आशीर्वादच होता.
मोदी गुजरातेत मला भेटले तेव्हा गुजरात
काँग्रेसशासित एक अडगळीचे, फारसे चर्चेच नसलेले
सुरतेतल्या साथीच्या रोगांनी, कच्छच्या वाळवंटाने
भूजच्या भूकंपाने, आमीर खानच्या ‘लगान’ने अधूनमधून
बातम्यात येणारे छोटेसे राज्य होते.
वर राजस्थान, शेजारी मध्यप्रदेश, महाराष्ट्रासारखे
बलदंड शेजारी. साबरमतीची पुण्याई आणि दारूबंदीची
पताका मिरवणारे खमण ढोकळा फरसाणवाल्यांचे राज्य
ज्यातले लोक राज्य सोडून देशभर, जगभर पसरलेले
अशा त्या अर्थाने बंजर जमिनीवर मोदी मला भेटले
तेव्हा कुणालाच वाटले नव्हेत हा माणूस नाव, अडनाव
आद्याक्षरासह उभ्या आडव्या देशात एक वादळ बनून फिरेल.
मोदी मला भेटले
गुजरातेत मुख्यमंत्री दालनात तेव्हा शांतपणे
ते एकच मंत्र म्हणत होते. राजकारणात यशस्वी
व्हायचं तर मैदानातले शत्रू तर संपवायचेच असतात
पण घरातलेही वेचून काढायचे असतात.
साधारण नेहरूंची वाटेल अशी गालावर तळहात ठेवून
बसण्याची पोझ मोदींनी घेतली तेव्हाच मनोमन
त्यांनी या ‘प्रतिमा’ बदलाची प्रतिज्ञा मनोमन करून
घेतली.
मोदी मला भेटले
तेव्हा त्यांनी दिल्लीहून येतानाचा जोधपुरी बदलून
अर्ध्या बाह्याचा, चायनीज कॉलरचा सदरा आपल्या
कपडेपटात ‘स्वत:चा’ म्हणून सामावून घेतला.
आजवर गांधी टोपी, नेहरू शर्ट, जॅकेट…पुढे राजेश खन्नाचे
कुर्ते यापलीकडे वेशभूषेवर फारसे लक्ष नसलेले
भारतीय जनमन मोदींनी लक्षात घेतले होते.
मोदी मला भेटले तेव्हा
बाळासाहेब ठाकरेंनी पांढरी सुरवार, पांढरा कुर्ता, पांढरी शाल
सोडून भगवी कफनी परिधान केली होती आणि त्याआधी
एनटी रामाराव यांनी…व्हीपी सिंगाची फर कॅप, लालूंचा
पार हाताची बोटं झाकणारा खादीचा झब्बा बाकी
सगळे स्टिरियो टाईप कुर्ते जाकिटे यात स्थिरावलेले
मोदी मला भेटले
ते गोध्रा जळित कांडा नंतर…फारच संवेदनशील मुद्दा
कारसेवक, रामभक्तांवरचा हा भीषण हल्ला
देशच हादरलेला.
मोदी मला भेटले
गोध्रानंतर, योग्य वेळी मांड ठोकण्याची
संधी शोधणाऱ्या सेनापतीसारखे.
हीच ती वेळ म्हणत त्यांनी गोध्राची प्रतिक्रिया
क्रियेत बदलली. गुजरात पेटला. नरसंहार झाला
अशोका रोडवरचे कधी काळचे एक पदाधिकारी
आता राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यात भूतो न भविष्यती
असा आगडोंब. महाराष्ट्रात तुलनेने कमी आग असताना
सुधाकर नाईकांना पायउतार व्हावं लागलं. पण मोदी
डमगमगले नाहीत. हडबडले नाहीत. खेद, पश्चात्ताप, आरोप
प्रत्यारोपाच्या वादळात ते शीड धरून शांतपणे नौका हाकताना
मोदी मला भेटले
मोदी मला भेटले
गुजरातेत पुन्हा तेव्हा त्यांना कलंकित ठरविण्याची
अहमिका लागली होती. अटलजींनी थेट राजधर्माची
आठवण करून दिली, तेव्हा मोदी मनोमन व काहीच लोकांना
ऐकू येईल अशा आवाजात म्हणाले ‘तेच तर मी करतोय!’
एनजीओ, विरोधी पक्ष, न्यायालये, मानवाधिकारवाले
सगळे तुटून पडले तेव्हा अडवाणी, जेटलींनी छातीचा कोट
केला आणि तेव्हा मोदींना सापडले परवलीचे वाक्य
पाच करोड गुजराथीयोंकी अस्मिता!
देशाने आजवर काश्मिरी, पंजाबी, मराठी, दक्षिणी
अस्मिता ऐकली होती वारंवार! गुजराती अस्मिता!
राज्य, देश, जगभर पसरलेल्या गुजरातींना आधीच्याच मासात
आणखी मूठभर मास चढलं!
रामबाणापेक्षा जालिम ५ करोड गुजरातींची
अस्मिता इतकी दुमदुमली की रात्रीत अदानी, अंबानी
आणि करोडो गुजराती भांडवलदारांची घरवापसी झाली
आजवर साबरमतीच्या संताची भजने गात सामसूम
राहिलेला गुजरात रात्रीत व्हायब्रंट झाला
मोदी मला भेटले तेव्हा
तो गुजरातेत टग्या बसलाय ना, तसे आणखी
निर्माण व्हायला हवेत असं मातोश्ररीत बाळासाहेब
अष्टप्रधानांसमोर बोलले मात्र आणि हिंदूहृदयसम्राटाचे
सिंहासन गुजरातेत हलवण्याच्या इराद्याने
वांद्रयाकडे निघालेले मोदी समर्थक दादरमधूनच
परत अहमदाबादला पाठवले तेव्हा मोदी मला भेटले.
हृदय सिंहासन हे लक्ष्यच नाही आपलं असं मनात म्हणून
पुन्हा कामाला लागले मोदी तेव्हा काँग्रेस मोदींसाठी
हमरस्ता करण्याच्या कामात व्यग्र होती.
मोदी मला भेटले
यूपीएच्या ऱ्हासपर्वात, तेव्हा अण्णा हजारे आणि
केजरीवाल, रामदेव बाबांच्या लोकपाल उठावात लालकृष्णजी
सुषमाजी, मुरली मनोहर, जसवंतसिंग, यशवंत सिन्हा, राजनाथ
ते नितीन गडकरी डझनावर लोक गुडघ्याला बाशिंग बांधून
तयार होते. मोदी कलंकित, गुजरातचे छोटेसे राज्य. थेट मुख्यमंत्री
बनलेले. जगभर बदनाम होऊन अमेरिकेनेही व्हिसा नाकारालेले
मोदी मला भेटले तेव्हा सोनिया गांधी सुपर पॉवर तर मनमोहन
पॉवरलेस वावरत होते. लोक कंटाळले होते आणि मोदींनी ५ करोड
मध्ये १२० कोटींची भर टाकत ‘१२५ करोड भारतवासी’ हा नवा मंत्र छेडला!
मोदी मला भेटले तेव्हा त्यांनी हा मंत्र असा काही
छेडला होता की, पक्षाची निवडणूक यंत्रणा, प्रचारप्रमुख
ते पंतप्रधानपदाचे उमेदवार हा प्रवास इतक्या चपळतेने
केला की, सुषमासह, लालजींना कळलंच नाही की आपल्याला
अशा पुलावर आणून ठेवलंय, ज्याच्या खालून प्रपातासारखे
पाणी वाहून गेलंय आणि आपण वर असून लव्हाळी झालोय.
त्यानंतर मला दुसरे कुणीच नाही तर फक्त मोदी आणि
मोदीच भेटत राहिले. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, बेरात्री
राज्यात, देशात, परदेशात, रस्त्यावर, मैदानात, नदी किनारी
हवेत, आकाशात, ध्वनिलहरीत, प्रकाशलहरीत, वर्तमानपत्रात
छोटा फडदा, मोठा पडदा, समुदायात, व्यक्तित, कणाकणात, अणूरेणूत
फक्त आणि फक्त मोदीच भेट राहिले. पंतप्रधानपद एखाद्या महापौरा
सारखं खुजं वाटू लागलं त्यांच्यासमोर आणि मी अद्वैताचा साक्षात्कार
अनुभवत ‘तुका झाला आकाशाएवढा’ हे विसरून ‘नमो झाले
आकाशाएवढे’ असे तल्लीन होऊन गाऊ लागलो, नाचू लागलो.
मी मलाच मोदी समजून मलाच भेटू लागलो!
आता मोदी भेटत नाहीत अशी जागाच नाही राहिली
आणि मला कळले की म्हणजे मोदी आता ईश्वर झालेत! ते चराचरात
भरून राहिलेत. ते सर्वत्र आहेत. ते राम, रहिम, ईसा, जल, वायू, अग्नि,
पंचमहाभूतात, तराळ अंतराळात भरून राहिलेत. पृथ्वी अनेक असतील
आणि त्यांची प्रत्येकीची एक सूर्यमाला असेल, शास्त्रज्ञ काहीबाही शोधत
असतात पण मोदी मला भेटले आणि मला कळले की, ज्या पृथ्वीवर
मी राहतो तिला सूर्यमाला नाही तर मोदीमाला आहे.
मोदी आता रोज मला उठवणार आणि मायेनं थोपटून निजवणारेही!
मोदी मला भेटले
त्याची ही गोष्ट एकाच अपवादाने
मला पुन्हा पुन्हा भेटत राहते
ईश्वरप्रतिरूप झालेले मोदी मला फक्त
एकाच ठिकाणी भेटले नाहीत
सुरक्षारक्षकांच्या गराड्यात, मुलांना प्राथमिक
शिक्षण देणाऱ्या, यशोदाबेन नरेंद्र मोदी
या प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेच्या शाळेत
मोदी मला भेटले नाहीत
अर्थात कुसुमाग्रज म्हणालेच होते
ज्यांना हवाय त्यांच्यासाठी ईश्वर आहे
ज्यांना नकोय त्यांच्यासाठी तो नाही
या वाक्यासह शेवटी मोदी मला भेटले.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Rajashri Deshpande
Tue , 17 January 2017
Modijinchya sarwvyapi astittwache manodnya darshan...... Hah!!!!