अजूनकाही
१.
तीन मराठी शब्दकोशांतल्या सुमारे पावणेदोन लाख शब्दांचं एकत्र संकलन असलेल्या ‘बृहद्कोश' या प्रकल्पाचं महाराष्ट्र दिनानिमित्त लोकार्पण करण्यात येत आहे. ‘बृहद्कोश’ हा नवा शब्दकोश नसून हे अनेक कोशांचं एकत्रित ऑनलाईन संकलन आहे. बृहद्कोशामध्ये एखादा शब्द शोधल्यास अनेक शब्दकोशांत असलेले अर्थ एकाखाली एक मिळतील. त्याबरोबर, त्या शब्दाशी संबंधित शब्दही मिळतील.
मराठीच्या शब्दकोशांना दोनशेपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. मोल्सवर्थ, कँडी, दाते, कर्वे, इ० अनेकांनी मराठी शब्दकोशांना समृद्ध केलं आहे. याव्यतिरिक्त मर्यादित व्याप्ती असलेले किंवा विशिष्ट विषयांना वाहिलेले (माधव जूलियन यांच्या फार्शी-मराठी कोशासारखे) अनेक कोश आहेत. मराठीतलं हे समृद्ध कोशवाङ्मय विविध छापील ग्रंथांत विखुरलेलं आहे. कोशांचं काही प्रमाणात संगणकीकरण झालेलं असलं तरी हे सर्व कोश वेगवेगळ्या वेबसाईट्सवर वेगवेगळ्या संस्थांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. याचा तोटा असा, की एखाद्या शब्दाचा अर्थ पाहायचा असेल तर हे वेगवेगळे कोश तपासून पाहावे लागतात. एकाच क्लिकमध्ये, एकाच ठिकाणी हे कोश उपलब्ध नाहीत. एकाच शब्दाचा विविध कोशांतला अर्थ एकाच वेळी पाहता येत नाही.
माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मराठी कोशवाङ्मयाची ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न ‘बृहद्कोश’ प्रकल्पाद्वारे आम्ही केला आहे.
उत्तरोत्तर अधिकाधिक शब्दकोश ‘बृहद्कोशा’च्या छत्रीखाली संकलित व्हावेत अशी योजना आहे. समशब्दकोशासारखे किंवा पारिभाषिक कोशासारखे कोशही कालांतराने जोडले जातील. प्रकाशित कोशांच्या संकलनाबरोबर इंटरनेटमुळे मराठी भाषेत झालेले बदल टिपणारा कोशही प्रकाशित करायचा मानस आहे. त्या दिशेने प्रयत्न चालू आहेत.
‘बृहद्कोश’ प्रकल्प कोणत्याही व्यावसायिक प्रयोजनासाठी चालवलेला नाही. ‘बृहद्कोश’ सर्वकाळ मुक्त आणि विनामूल्य उपलब्ध राहील.
२.
एखाद्या शब्दाचा कोशातला आणि व्यवहारातला अर्थ वेगवेगळा असण्याची उदाहरणं कधीकधी बघायला मिळतात. अशा वेळी उत्स्फूर्तपणे येणारी प्रतिक्रिया म्हणजे, “ह्या:! काय फालतू कोश आहे! अर्थ चुकवून ठेवला आहे!” पण याबरोबरच एका आणखी शक्यता विचारात घ्यायला हवी, आणि ती म्हणजे काळाबरोबर शब्दाचा अर्थ बदलल्याची.
‘उचापत’ हा असाच एक शब्द आहे. हल्लीच्या वापरात ‘उचापत’चा उपयोग बऱ्याचदा ‘नसती’ हे विशेषण लावून होतो. ‘एखादी गोष्ट करायची गरज नसताना ती करणे किंवा करावी लागणे’ असा त्याचा अर्थ लावला जातो. “कोणी सांगितली आहे ही नसती उचापत?” किंवा “अमुकतमुक काम होण्यासाठी खूप उचापती करायला लागल्या!” असं ऐकू येतं.
पण कोश उघडून ‘उचापत’चा अर्थ बघितला तर काहीतरी भलतंच दिसतं.
मोल्स्वर्थ ‘उचापत’चा अर्थ ‘Taking (of goods) upon tick or credit’ असा देतो. आता ‘Taking (of goods) upon tick’ हाही सध्याच्या इंग्रजीतून हद्दपार झालेला वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ ‘Taking (of goods) upon credit’ असाच होतो. म्हणजे थोडक्यात : उधारीवर माल घेणे. ‘उचापतीचा रोजगार / धंदा / व्यवहार / व्यवसाय’ याचा विरुद्धार्थ ‘रोकडीचा रोजगार / धंदा / व्यवहार / व्यवसाय’ असा दिला आहे.
‘उचापत’ हा शब्द माल उधारीवर घेण्याच्या कृतीबरोबरच उधारीवर घेतलेल्या मालासाठीही वापरला जातो. मोल्सवर्थ “उचापतीचें पोतें सवा हात रितें” अशी एक म्हणही देतो.
म्हणजे : मोल्स्वर्थने कोश प्रकाशित केल्याच्या वर्षी - १८५७ साली – ‘उचापत’ या शब्दाला नकारात्मक अर्थ नव्हता. (कदाचित मोल्स्वर्थच्या ऐकण्यात नकारात्मक अर्थ आला नसेल, अशीही शक्यता आहे.) सरळसोट व्यावसायिक पद्धत वर्णन करणारा अर्थ होता. हाच अर्थ १९११ पर्यंत कायम राहिला, कारण वझे शब्दकोशातही नेमका, आणि फक्त, व्यावसायिक अर्थच दिला आहे.
आता ‘उचापत’ला नकारात्मक भाव कधी मिळाला, आणि आज वापरतो त्या अर्थापर्यंत पोचला याचा तपशील नाही.
पण मोल्सवर्थने प्रथम कोशात लिहिलेला अर्थच कायम होता का? की तोही बदलला आहे? या प्रश्नाच्या उत्तरासाठी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिकाच्या एका जुन्या अंकापर्यंत जावं लागेल.
भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सन १९७३च्या अंकात डॉ० अ० रा० कुलकर्णी यांचा ‘उचापत’ याचा शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात ते लिहितात, “[उचापत या शब्दाचा] व्यावहारिक अर्थ आणि कागदपत्रांतला अर्थ यांत महदंतर आहे. हिशेबाच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ उधारीने गावच्या खर्चासाठी आणलेल्या वस्तू अथवा काढलेली कर्जाऊ रक्कम असा होतो. गावकऱ्यांना काही खर्च गावच्या प्रतिष्ठेसाठी अनपेक्षितपणे करावे लागत. तेव्हा प्रथम खर्च करून नंतर सरकारी मंजुरी मिळवली जाई. तेव्हा अशा अनपेक्षित घडलेल्या खर्चाचा तपशील असलेल्या कागदास 'उचापत' असे म्हणतात.”
म्हणजे इथेही ‘उधार घेणे’ हा अर्थ आहेच, पण आणखी एक अर्थच्छटा मिसळली आहे, ती म्हणजे ‘बजेट-बाह्य, अनपेक्षितपणे करावे लागणारे - अॅड हॉक - खर्च, आणि त्या खर्चायला नंतर मिळवलेली मंजुरी’. बजेटबाहेरच्या खर्चांना मंजुरी मिळणं किती कटकटीचं असतं याचा अनुभव वाचकांपैकी अनेकांना असेल. त्यामुळे त्याला ‘उचापत’ हा शब्द - आधुनिक अर्थानेही - सार्थच म्हणायला पाहिजे!
शब्दांना एकापेक्षा अधिक पर्यायी अर्थही असू शकतात. त्यामुळे ‘उचापत’चे तिन्ही अर्थ (ऐतिहासिक, व्यावसायिक, आणि आधुनिक) कोशात येणं योग्य. दाते-कर्वे कोशात व्यावसायिक (उधार) आणि आधुनिक (उठाठेव, नसती उलाढाल) हे अर्थ दिले आहेत, पण ऐतिहासिक अर्थ दिलेला नाही. नवे शब्द, नवे अर्थ समाविष्ट करणं हेदेखील ‘बृहद्कोश’ प्रकल्पाचं ध्येय आहे. तांत्रिक बाबींवर काम चालू आहे. ते झालं की ‘उचापत’चा अर्थ, डॉ० अ० रा० कुलकर्णींच्या नामोल्लेखासह बृहद्कोशात जोडू.
शेवटी, मराठी भाषेतून दिसणाऱ्या मराठी समाजाच्या आर्थिक धारणांवर लिहिल्यावाचून राहवत नाही. ‘उधार घेण्या’सारख्या अत्यंत सामान्य व्यावसायिक गोष्टीला असलेला शब्द; आणि उठाठेव, नसती उलाढाल, भानगड यासाठीचा शब्द एकाच असावा याचा अर्थ मराठी मनात उधारी घेणे, कर्ज घेणे म्हणजे ‘नाही ती भानगड’ करणे अशी धारणा आहे हे स्पष्ट दिसतं आहे. मोल्सवर्थने दिलेली म्हण ‘उचापतीचें पोतें सवा हात रितें’ यातही थोडा खवचट नकारार्थी भाव आहेच, की बाबा, उधारीवर माल घेतलास तर मापात मारलं जाणं अपरिहार्य आहे!
३.
मराठीतला पहिला शब्दकोश ख्रिस्ती मिशनरी विल्यम कॅरे यांनी सेरामपोर (श्रीरामपूर) येथे १८१० साली प्रकाशित केला. त्यानंतर जगन्नाथशास्त्री क्रमवंत आणि त्यांचे सहा सहकारी, जेम्स थॉमस मोल्सवर्थ, थॉमस कँडी, य० रा० दाते, चिं० ग० कर्वे, इ० अनेकांनी मराठी शब्दकोशांना समृद्ध केलं आहे. याव्यतिरिक्त मर्यादित व्याप्ती असलेले किंवा विशिष्ट विषयांना वाहिलेले अनेक कोश तयार झाले. काही उदाहरणं :
१) एका विशिष्ट ग्रंथातल्या शब्दांचा कोश (उदा० रा० ना० वेलिंगकर यांचा ज्ञानेश्वरीचा कोश)
२) विशिष्ट कालखंडातल्या मराठी भाषेचा कोश (उदा० शं० गो० तुळपुळे - ॲन फेल्डहाऊस यांचा प्राचीन मराठीचा कोश)
३) इतर भाषांतील शब्दांचे मराठीत अर्थ दिलेला कोश (उदा० माधव त्रिंबक पटवर्धन यांचा फार्सी-मराठी कोश)
४) शासनव्यवहारासाठीचे विविध परिभाषा आणि पदनाम कोश.
गेल्या दोन दशकांतल्या इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शब्दकोशांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला आहे. या बदललेल्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मराठी कोशवाङ्मयाला आणखी समृद्ध करण्याची संधी आपल्यापुढे आहे. ‘बृहद्कोश’ प्रकल्प हे त्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे.
मराठीतलं हे समृद्ध कोशवाङ्मय विविध छापील ग्रंथांत विखुरलेलं आहे. कोशांचं काही प्रमाणात संगणकीकरण झालेलं असलं तरी हे सर्व कोश वेगवेगळ्या वेबसाईट्सवर वेगवेगळ्या संस्थांनी उपलब्ध करून दिलेले आहेत.
याचा तोटा असा, की एखाद्या शब्दाचा अर्थ पाहायचा असेल तर हे वेगवेगळे कोश तपासून पाहावे लागतात. एकाच क्लिकमध्ये, एकाच ठिकाणी हे कोश उपलब्ध नाहीत. एकाच शब्दाचा विविध कोशांतला अर्थ एकाच वेळी पाहता येत नाही.
तर, ही अडचण दूर करणे हे ‘बृहद्कोश’ प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट आहे.
‘बृहद्कोश’ हा नवा शब्दकोश नाही. बृहद्कोश हे अनेक कोशांचं संकलन आहे.
बृहद्कोश = बृहत् + कोश, म्हणजे ‘मोठा, विशाल असा (एकत्रित) कोश’.
‘मी तंव हमाल भारवाही’ हे तुकाराममहाराजांच्या अभंगातून घेतलं आहे. वर सांगितल्याप्रमाणे ‘बृहद्कोश’ प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट हे सर्व कोशवाङ्मय एके ठिकाणी, ‘शोधता’ येईल अशा पद्धतीने (searchable) उपलब्ध करून देणं हे आहे. ‘बृहद्कोश’ प्रकल्पाची भूमिका भारवाहकाची आहे, याची कायम आठवण राहावी म्हणून हे बीजवाक्य निवडलं आहे.
मूळ अभंगातल्या इतर ओळीही ‘बृहद्कोश’ प्रकल्पाला लागू पडतात. संपूर्ण अभंग खालीलप्रमाणे :
सकळिकांच्या पायीं माझी विनवणीं । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरे पारखून बांधा गांठी ॥
फोडिले भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ॥
तुका ह्मणे चाली जाली चहूं देशी । उतरला कसीं खरा माल ॥
१) सदरील कोशांचे संकलन कोणत्याही व्यावसायिक प्रयोजनासाठी उपलब्ध करण्यात आलेले नाही. त्याचा उपयोग केवळ शैक्षणिक / संशोधनपर उपक्रमात होणे अपेक्षित आहे. प्रकल्प संचालकांचा ह्यातील बौद्धिक संपदेवर कोणताही दावा नाही. प्रताधिकार कायद्याचे उल्लंघन करण्याचा कोणताही हेतू नाही, आणि मूळ कोशकारास श्रेय देण्यात आलेले आहेच.
२) हा कोश सर्वकाळ मुक्त आणि विनामूल्य उपलब्ध राहील. कोणताही व्यावसायिक लाभ (उत्पन्न अथवा नफा) मिळवण्यासाठी सदरील उपक्रम चालवलेला नाही.
३) ‘बृहद्कोश’ प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी आयुधं (tools) शक्यतोवर मुक्तस्त्रोत (open source) आहेत आणि असावी.
४) ‘बृहद्कोश’ प्रकल्प हा कधीच पूर्ण होणार नाही. भाषा अथांग आणि प्रवाही असते, आणि भाषेचा अर्थ लावणे ही सतत घडणारी प्रक्रिया आहे. याचा अर्थ असा, की नवनव्या कोशांची भर शब्दसंग्रहात घालणे हे ‘बृहद्कोश’ प्रकल्पाचं प्रमुख उद्दिष्ट आहे.
५) कोणाच्याही प्रताधिकाराचं किंवा बौद्धिक संपदेचं उल्लंघन करणे, किंवा श्रमांचा अवमान करणे हा ‘बृहद्कोश’ प्रकल्पाचा हेतू नाही.
‘बृहद्कोश’ प्रकल्प Attribution-NonCommercial-ShareAlike 3.0 Unported (CC BY-NC-SA 3.0) प्रकारच्या अटींचे पालन करेल. अधिक माहिती इथे : https://creativecommons.org/licenses/by-nc-sa/3.0/
- प्रत्येक कोशाचा आणि कोशकाराचा योग्य प्रकारे उल्लेख केलेला आहे.
- प्रताधिकारधारकाने एखादा कोश ‘बृहद्कोश’ प्रकल्पात समाविष्ट करू नये, अशी विनंती केल्यास त्याची अंमलबजावणी त्वरित केली जाईल.
- प्रकल्पात योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा उल्लेख केला जाईल.
६) प्रकाशित कोशसंपदेव्यतिरिक्त नवे शब्द तज्ज्ञ भाषाअभ्यासकांच्या शिफारसीने ‘बृहद्कोश’ प्रकल्पात समाविष्ट केले जातील.
७) ‘बृहद्कोश’ वापरण्यासाठी सोपा असावा. ‘बृहद्कोशा’चा आराखडा आणि दृश्यरूप किमानलक्ष्यी (minimalist) असावं.
..................................................................................................................................................................
‘बृहद्कोश’ पाहण्यासाठी क्लिक करा - https://bruhadkosh.org/
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Anand Sawant
Sat , 28 January 2023
सुत या शब्दाचा अर्थ दाते, वझे व मोल्सवर्थ या तिन्ही शब्दकोशांत पुत्र, लेक, मुलगा, प्रिन्स असा दिलेला आहे. परंतु शुद्ध मराठी कोश(बापट पंडित) यामध्ये मात्र वरील अर्थांव्यतिरिक्त शिष्य असाही अर्थ दिलेला आहे. शुद्ध मराठी कोशाच्या १८९१ साली प्रकाशित झालेल्या पहिल्या आवृत्तीत शिष्य हा अर्थ दिलेला नाही, फक्त पुत्र, मुलगा, लेक हेच अर्थ दिलेले आहेत. मग आपण शिष्य हा अर्थ सदर कोशाच्या कोणत्या आवृत्तीतून घेतला आहे व ती आवृत्ती कोणत्या साली प्रकाशित झाली ही माहिती मला हवी आहे. ती कृपया आपण द्यावी ही विनंती.
Milind Kolatkar
Mon , 04 May 2020
पाहिलं वापरून. मजा आली. धन्यवाद. -मिलिंद.