आहिताग्नी राजवाडे (१३ ऑक्टोबर १८७९ – २७ नोव्हेंबर १९५२) हे विसाव्या शतकातील पुण्यातील एक व्युत्पन्न पंडित. देशभर फिरून त्यांनी धर्म, तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयांवर अनेक व्याख्याने दिली. अग्रिनहोत्र घेतल्याने त्यांना ‘आहिताग्नि’ ही उपाधी मिळाली होती. मराठी, संस्कृत, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. ‘गीताभाष्य’, ‘ईशावास्योपनिषद्भाष्य’, ‘नासदीयसूक्तभाष्य’, ‘सनातन वैदिक धर्म’, ‘नीट्झ्सेचा ख्रिस्तान्तक आणि ख्रिस्तान्तक नीट्झ्से’ ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यांचे ‘आत्मवृत्त’ हे आत्मचरित्र मात्र बऱ्याच उशिरा म्हणजे १९८० साली (श्रीविद्या प्रकाशन, पुणे) प्रकाशित झाले. त्यातील बराचसा भाग वादग्रस्त ठरण्यासारखा आहे, त्यामुळे कदाचित हा विलंब झाला असावा. असो. तो काही आपला विषय नाही. तर राजवाडे यांचे हे आत्मचरित्र विसाव्या शतकातले पुणे समजावून घेण्यासाठीचा एक चांगला संदर्भग्रंथ आहे. या आत्मचरित्रात राजवाडे यांनी ‘प्लेग’विषयी जवळपास ५० पानांचा मजकूर लिहिला आहे. तो वाचनीय आहे. त्यातील हा एक संपादित अंश…
१८९८ ते १९१८ या काळात भारतात प्लेगने हाहाकार माजवला होता. या वीसेक वर्षांत भारतात जवळपास एक कोटी माणसं या आजाराने मृत्यु पावली होती. या आजाराची ही पुण्यातली थोडक्यात हकिकत…
..................................................................................................................................................................
१.
इ. स. १८९७ हे साल पुण्याच्या इतिहासात फार महत्त्वाचे आहे. कारण या वर्षी पुण्यात प्रथम प्लेगचा प्रादुर्भाव झाला व तदनुषंगाने पुढील नाना प्रकारच्या कधी न विसरण्यासारख्या घटना घडून आल्या. मी कॉलेजात जाऊ लागल्यानंतर जेमतेम दोन महिनेपर्यंत कॉलेज पूर्ण भरात चालले. पण पुण्यात प्लेगची गडबड दिसू लागल्याबरोबर ते बंद करावे की काय असा प्रश्न उत्पन्न झाला. आमचे कॉलेज पुण्याच्या बाहेर पाच मैलावर असल्याकारणाने ते बंद करण्याची आवश्यकता नव्हती, पण त्याचा पुण्याशी संबंध तोडणे भाग होते. खुद्द पुण्यातील शाळा-कॉलेजे बंद होऊ लागली व डेक्कन कॉलेजची पहिली टर्म सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आल्याकारणाने परगावचे विद्यार्थी भराभर कॉलेज सोडून घरोघरी निघून गेले. दीडदोनशे विद्यार्थ्यांपैकी जेमतेम पाचपन्नास विद्यार्थी रेसिडेन्सीत कायम राहिले. त्यात आता गावातून येणाऱ्यांना बंदी झाल्याकारणाने मी व माझे सहाध्यायी रा. दातार दोघे कॉलेजात रेसिडेन्सीमध्ये राहावयास गेलो. रेसिडेन्सीत पुष्कळ जागा रिकाम्या झाल्या होत्या, म्हणून आम्हास एैसपैस एकेक स्वतंत्र खोली मिळाली व पूर्वीच्या विद्यार्थ्यांपासून त्या खोलीचे भाडे वसूल झालेले असल्याकारणाने आम्हाला मुळीच भाडे पडले नाही…
याप्रमाणे माझी कॉलेजातील पहिल्या वर्षाची पहिली टर्म संपली व जून महिन्यात दुसरी टर्म सुरू झाली. गेल्या टर्ममध्ये पुण्यात प्लेग सुरू झाला म्हणून म्हटले पण तो खास पुणे शहरातील लोकांत नव्हता. प्रथम प्रथम येथे बाहेरून आलेल्या तुरळक केसेस होऊ लागल्या, व मागून पाचसहा महिन्यांनी तो गावात भडकला. तथापि आरंभापासूनच सरकारचे प्लेगप्रतिबंधक कडक उपाय झाले. प्लेग इस्पितळे स्थापिली गेली; व क्वारंटाईन आणि सेग्रेगेशन जारीने अमलात आले. स्टेशनावर झडत्या सुरू झाल्या व गावात सोजिरांच्या घरटीप तपासण्या होऊ लागल्या. त्यावर देखरेख करण्याकरता रँड नामक एक गोरा अधिकारी प्लेग कमिशनर म्हणून नेमला गेला व त्याचा लोकांना फार जाच होऊ लागला. हे साहेब अगोदरच असिस्टंट कलेक्टरच्या नात्याने वाईतील लोकांवरील फौजदारी खटल्यात दुर्लौकिक कमावून आलेले होते, यासंबंधी त्या वर्षीच्या शिवाजी उत्सवात सन्मित्रसमाज मेळ्याने जे पद म्हटले होते, त्यातील पहिल्या चार ओळी पाहिल्या म्हणजे या जाचांची चांगली कल्पना येते. त्या चार ओळी अशा –
“रांडशाही आडदांडसवाई धिंड काढली सर्वांची
मी मी म्हणती कोणी न कामी फुकट वल्गना गर्वाची
सतीला मातीत घालण्या अधिकारी गोरा आला
ताप देऊन प्रजेस अतिशय प्रताप त्याने गाजविला”
आमच्या आळीत मार्च महिन्याच्या २-३ तारखेस एक प्लेग केस झाली, पण ती बाहेरची ठरली. तथापि त्यायोगे आळीतील सर्व घरांची सोजिरांकडून कसून तपासणी करण्यात आली. अशा या कडक बंदोबस्ताच्या योगे प्लेग काही काळ दबला गेलेला दिसला, पण तो वास्तविक गेला नव्हता तर उलट खोल मुरत होता. मात्र आता जून महिन्यात सर्व शाळा-कॉलेजे पूर्ववत सुरू झाली व आमचे कॉलेजही पूर्णपणे भरून गेले.
ता. २३ जूनच्याच सकाळी सगळ्या पुणे शहरभर एक भयंकर बातमी येऊन पसरली. ता. २१ व २२ जून हे व्हिक्टोरिया राणीच्या ज्युबिलीचे सण होते. ता. २२ जून रोजी संध्याकाळी गणेशखिंडीत गव्हर्नरच्या बंगल्यात लेव्ही होती. त्या लेव्हीला रँडसाहेब गेलेला होता. लेव्हीहून परत येताना तो आणि त्याचा एक मित्र आयर्स्ट हे दोघे एकामागून एक आपापल्या डॉक्कार्टमध्ये बसून जात होते. ह्या गाड्या गणेशखिंडीच्या नाक्याशी पोलीस चौकीजवळ येतात न येतात तोच रस्त्याच्या दोन बाजूंनी दोन बंदुकांचे बार झाले व त्यात हे दोघे साहेब गोळ्या लागून आणि घायाळ होऊन खाली पडले. आयर्स्ट हा तात्काळ इस्पितळात नेतानेता मृत्यू पावला. पण रँड मात्र पुरे दहा दिवस म्हणजे क्वारंटाइनमधला सेग्रेगेशनचा संपूर्ण काळ इस्पितळात खितपत राहून ता. ३ जुलैला मेला. सरकारने त्याचे ससून इस्पितळातून मोठे थाटाचे प्रोसेशन काढले होते. तो मरेपर्यंत दहा दिवस आम्हाला मोठी धाकधूक वाटत होती; म्हणून जेव्हा तो मेला तेव्हा त्या रात्री आम्ही सन्मित्र समाज मंडळींनी द्रविडांच्या देवळात पेढे खाल्ले. हे पेढे द्रविडबंधूंतील सर्वांत धाकटा भाऊ निळू याने बाजारातून विकत आणले होते आणि त्यात त्याच्या घरातील सर्व माणसे सामील होती. आता ज्या दिवशी प्रथमच ही खुनाची बातमी गावात येऊन थडकली त्या दिवशी ता. २३ जून रोजी जिकडे तिकडे लोकांच्या बोलण्यात हाच एक विषय होता. बाहेरून भयाचे वातावरण उत्पन्न झाले होते खरे, पण आतून माझ्यासारख्याच्या अंत:करणात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. कारण मी रँडशाही साक्षात अवलोकन केलेली होती.
२.
…हे इ.स. १८९७ साल. या काळी रोज सकाळी प्लेगच्या तपासण्या चालू होत्या. रँड मारला गेला तरी सरकारने एकाएकी पूर्वीच्या व्यवस्थेत काही बदल केला नाही. ही ब्रिटिश सरकारची पॉलिसीच होती. ते सरकार हळूहळू आपला प्रेस्टिज राखीत राखीत एखादा बदल घडवून आणी. अर्थात या वेळी रँडच्या वेळचे सर्व प्रकार जसेच्या तसे कायम होते. मात्र रात्रीच्या अचानक तपासण्या बंद झाल्या इतकेच. या तपासण्यांबाबत कित्येक ठिकाणी चोऱ्या झाल्याच्या व स्त्रियांवर हात टाकल्याच्या वदंता होत्या. त्या कारणाने माझे वडील रोज निजताना उशाशी नागवी तरवार ठेवीत व म्हणत, माझ्या घरात तपासणारे आले तर मी त्यांना सर्व घर उघडे करून दाखवीन, पेट्यासुद्धा उघड्या करीन, पण जर कोणी त्यातील जिनसेला हात लावला तर त्याचा हात छाटून टाकीन. परंतु दैवयोगे आमच्या घरात इतका प्रसंग कधी आलाच नाही.
आता हे प्लेगप्रतिबंधक प्रयोग म्हणजे मुख्यत: रोज सकाळी लष्करी गोऱ्या व काळ्या हडेलहप्पी यमदूतांची घरोघर कस्सून तपासणी व रोगी सापडला की त्याची संगमावरील सरकारी प्लेग इस्पितळात तडकाफडकी रवानगी. त्याकरिता रोग्याला नेणाऱ्या रेडक्रॉसच्या सुखासीन अम्ब्युलन्स गाड्या होत्या असे नाही, तर साधे बैलाचे एक्के होते व त्यात जितके रोगी कोंबता येतील तितके या मुडदेफरासांकडून हवेतसे त्यांच्या दु:खाकडे लक्ष न देता अत्यंत निष्ठुरपणे कोंबण्यात येत. अर्थात हे प्लेगचे इस्पितळ म्हणजे रोगी बरा करण्याचे स्थान नव्हते तर साक्षात मृत्युचे गृह होते.
याशिवाय रोग्याच्या भवतालच्या नातेवाइकांना स्वाराच्या गेटाजवळील सेग्रेगेशन कॅम्पमध्ये तयार केलेल्या तट्ट्याच्या झोपड्यात तब्बल दहा दिवस डांबून ठेवण्यात येई व पुन्हा त्यांची रोजच्या रोज तपासणी करून त्यात कोणी किंचित आजारी दिसला की, त्याची संगमावरील मृत्युगृहात ताबडतोब उचलबांगडी होई.
येथे इस्पितळात काय किंवा सेग्रेगेशनमध्ये काय गेलेल्या माणसांच्या खाण्यापिण्याची व निजण्याबसण्याची काहीच सोय नव्हती. ती ज्याची त्याने घरून करावी आणि घर तर रिकामे केलेले आणि धुऊन साफ झालेले. यावरून तुरुंगातही कैद्याची व्यवस्था बरी असते हे उघड ठरते. रोग्याजवळ नातेवाइकांना जाण्यास आणि बसण्यास परवानगी घ्यावी लागे आणि ती त्यांना हटकून मिळे असे नाही. अर्थात रोगी गावाच्या एका टोकाला संगमावरील इस्पितळात आणि त्याचे आईबाप व नातेवाईक एका कोसावर दुसऱ्या टोकाला स्वाराच्या गेटाजवळील सेग्रेगेशन कॅम्पात. रोग्याला आपल्या स्वत:च्या डॉक्टर वैद्याकडून औषधोपचार करून घेण्याची परवानगी नाही, इस्पितळातील डॉक्टर जी काय औषधे देतील ती खरी. मात्र मृत झालेल्या रोग्याच्या औषधपाण्याचा खर्च म्हणून मागाहून बिल पाठवून उगवण्यात येत नव्हते ही एक खैरच म्हणावयाची. नाहीतर जुलमाचा कळसच झाला असता. मृत रोग्याच्या प्रेताची व्यवस्था नातेवाइकांना कळवून त्यांनी केली तर परवानगी होती, पण अगोदरच सेग्रेगेशनमध्ये डांबलेल्या नातेवाइकांना ती करता येणे शक्य नव्हते. मग सरकारची व्यवस्था! गाड्यांतून घालून महार-मांगाकडून एका खाईत सरभेसळीने गाडून टाकावयाची किंवा जाळून टाकावयाची!
इकडे रोग्याला इस्पितळात आणि नातेवाइकांना सेग्रेगेशनमध्ये नेल्यावर त्याच्या घराची नासधूस काही विचारू नका. जमिनीचे खनन, वस्त्र-प्रावरणांची-बाडबिछान्यासह-होळी, आणि सर्व घरात भुईवर व भिंतीवर इंच इंच दोन दोन इंच चुन्याचे शिडकाव. परगावाहूनही कोणाला बोलावण्याची सोय नाही. कारण स्टेशनवर जाणाऱ्या-येणाऱ्याची डॉक्टरकडून कडक तपासणी. जरा ताप आल्याचा संशय आला की, इस्पितळात रवानगी, बरोबरच्या लोकांना दहा दिवस क्वारंटाइन व सर्व कपड्यालत्त्यांना वाफारा.
आता उद्या सकाळी आमच्या वाड्यात तपासणी येणार आणि हे सर्व विधी जसेच्या तसे अवलंबिले जाणार. याचीच आम्हाला मोठी काळजी वाटू लागली व भीती उत्पन्न झाली. माझे वडील घरी असते तर त्यांनी काय केले असते हे सांगता येत नाही, पण मला मात्र या वेळी या स्थितीत काय करावे हा बिकट प्रश्न येऊन पडला व माझे मन गोंधळून गेले. माझी आई मोठ्या धीराची बायको होती आणि माझे आजोबा वेदान्ती होते. आल्या प्रसंगाला तोंड देण्याची त्यांची तयारी होती. आम्ही प्रथम घरातील माणसे हालविली व गर्दी मोडली. शेजारच्या घरात तीन माणसे अत्यवस्थ होती. ती तशीच त्या स्थितीत टाकून आणि दाराला बाहेर कडी लावून टोके मंडळी संध्याकाळच्या संध्याकाळी आळंदीस निघून गेली. घराचा मालक गावात प्लेगचा प्रादुर्भाव झाल्याबरोबर पूर्वीच घर सोडून गेला होता. आमच्या घरात आमची आत्याबाई आपल्या मुलांमाणसांसह आपल्या दिराच्या घरी गेली. तिचा दीर शंकर निळकंठ वझे - हल्ली त्यांचा मुलगा रामचंद्र शंकर वझे हा एका डिस्ट्रिक्टचा सेशन जज्ज आहे – हा सदाशिव पेठच्या हौदासमोरील बोळात एका घरात बिऱ्हाडाने राहात होता व तो त्या वेळी कलेक्टर कचेरीत नोकर होता. तेथे ती रात्रभर राहून व आपल्या दिराला आमचा समाचार घेण्यास सांगून दुसरे दिवशी परत आपल्या मामलतीच्या गावी गेली. माझ्या लग्न झालेल्या बहिणीची मी संध्याकाळच्या गाडीने मुंबईस तिच्या सासरी रवानगी केली. माझ्या बायकोला कसबा पेठेत तिच्या माहेरी पाठविली. बाकी माझे दोन भाऊ आणि एक बहीण अशी तीन मुले खुन्या मुरलीधराजवळ डॉ. सहस्त्रबुद्धे यांचे वाड्यात माझ्या मावशीचा नवरा व डॉक्टरांचा चुलतभाऊ विष्णुपंतदादा सहस्त्रबुद्धे यांच्या घरी त्यांच्याबरोबर एक दागदागिन्यांची व एक कपड्यालत्त्यांची अशा दोन पेट्या देऊन रवानगी केली. मागे घरात आजारी मुलीच्या (बहीण) जवळ फक्त मी, माझी आई, माझे वृद्ध आजोबा-आईचे वडील, व माझा ३-४ वर्षांचा धाकटा भाऊ येवडे राहिलो. ह्या इतक्या सर्व गडबडीत त्या बिचाऱ्या आजारी मुलीकडे पाहण्यास कोणालाच वेळ नव्हता, आणि घरगुती काहीबाही औषधांवाचून डॉक्टर-वैद्याचे नाव घेणेही शक्य नव्हते.
३.
…पुढील वर्षाच्या आरंभी रँडच्या खुनाचा पत्ता लागल्यापासून सरकारच्या प्लेगच्या धोरणात एकदम पुष्कळ बदल झाला. रोजची तपासणी गोऱ्या-काळ्या शिपायांच्या हातातून निघून गावातील स्वयंसेवकांच्या हातात आली. त्या स्वयंसेवकांत बाळ गंगाधर साठे, बॅरिस्टर काशिनाथपंत गाडगीळ, रावबहादूर ओंकार, प्रो. भानु इत्यादी मोठमोठी धेंड होती व शिवाय पुष्कळ वकील, डॉक्टर, सुखवस्तू पेन्शनर, म्युनिसिपल कौंसिलर आणि सरकारी नोकर होते. या सर्वांवर डॉ. रीड आणि लेफ्टनंट अडाम्सन हे दोन गोरे अधिकारी असून त्या सर्वांवर कर्नल क्रीग – जो पुढे हिंदुस्थानचा कमांडर-इन-चीफ झाला तो मुख्य प्लेग ऑफिसर होता. अशा स्वयंसेवकांच्या पार्ट्या आता घरोघर तपासणीस जाऊ लागल्या. त्यांच्या बरोबर किरकोळ एकदोन शिपाई असत, पण ते आता पूर्वीप्रमाणे घरात शिरत नसत.
…सन १८९७ सालाप्रमाणे सन १८९९ सालीही पुण्यात प्लेगने फार कहर केला. गणपती झाले की तो यावयाचा व शिमग्यापर्यंत टिकून राहावयाचा असा जणू पायंडाच पडून गेला होता. ह्या सालच्या २-३ महिन्यांच्या अवधीत आमच्या नात्यागोत्याची व ओळखीपाळखीची पुष्कळ माणसे प्लेगला बळी पडली. आता सरकारने आरंभी एका बाजूने भीतीने व भ्रांतीने जरी हे बाहेरबाहेरचे अतिकडक प्लेगप्रतिबंधक उपाय जारीने अमलात आणले असले तरी दुसऱ्या बाजूने ते त्यावर एखादा जालीम औषधी तोडगा शोधून काढण्याच्याही खटपटीला लागले यात शंका नाही. या कामी त्यांनी पाश्चरच्या मार्गावर डॉ. हॉपकिन्सची योजना केली व हॉपकिन्सने या ब्युबॉनिक प्लेगच्या जंतूंपासून एक सिरम् तयार करून त्याचे प्रयोग इनॉक्युलेशनद्वारे प्लेगच्या भागातील लोकांवर सुरू झाले.
प्रथम प्रथम लोकांना या नवीन इनॉक्युलेशनचा विश्वास वाटेना. त्यापासून पुढे काय काय परिणाम होतील यासंबंधी त्यांचे मनात साहजिकच भीती उत्पन्न झाली. या कामी सरकारी डॉक्टरांना लोकांची समजूत घालण्यास जिवापाड परिश्रम करावे लागले. पण पुढे जसजसे या एका उपायावाचून प्लेगला तोंड देण्यास दुसरा मार्ग नाही असे लोकांना दिसू लागले, तसतसे ते आपण होऊन त्याचे अवलंबन करू लागले व त्याबरोबर बाकीचे सर्व उपाय हळूहळू ढिले पडत चालले. सेग्रेगेशने गेली, इस्पितळे बंद झाली आणि तपासण्या संपुष्टात आल्या.
…या वेळी सदर प्लेगाच्या टोचण्याबद्दल वर्तमानपत्रांतून वगैरे मोठे कडाक्याने वाद चालले होते व बहुजनसमाज टोचून घेण्याला फारसा अनुकूल नव्हता. या टोचण्यापासून आमच्या घरात कोणाला काही अपाय झाला नाही. पण मामीचा दंड मात्र वर्षभर बरा झाला नाही. तो तसाच दुखत राहिला व पुढे १३-१४ वर्षांनी पुन्हा असेच टोचून घेतल्यावर तिला ५-६ दिवसांत प्लेगने पछाडिले व त्यातच तिचा अंत झाला…
असा हा प्लेग पुण्यात १५-२० वर्षे भोवला. त्याचा हा येथवर झालेला विस्तार मी आता आटोपता घेतो व दुसऱ्या विषयाकडे वळतो. तथापि जाता जाता मला येथे असे सांगावेसे वाटते की, गेल्या ५० वर्षांच्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या चक्रातून या देशात इतकी नवीन इंग्रजी डॉक्टरांची पैदास झाल्यानंतर त्यांपैकी कोणा एकालाही जेथे या नवीन रोगाचे निदान करण्याचे ज्ञान नव्हते, तेथे तो त्यावर औषध काय काढणार आणि उपचार तरी काय करणार? मी पाहिले आहे की, जेव्हा हे डॉक्टर घरी वा आगगाडीत तपासणीस येत, तेव्हा ते प्रत्येकाला उभे करून त्याची नाडी पाहात. मग ह्या बेट्यांना त्या नाडीत काय समजत होते ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. पण हात जरा गरम लागला की, लागलीच तो प्लेगाचा रोगी ठरवून ते त्याची एकदम इस्पितळात उचलबांगडी करीत. अर्थात अशा ह्या रेम्याडोक्या हडेलहप्पी निर्बुद्ध लोकांकडून कशाचा शोध लागावयाचा होता? त्याकरिता बाहेरचा हॉपकिन्स यावा लागला व त्याने संशोधनपूर्वक काढलेली लस टोचण्याकरिता पिचकाऱ्याही बाहेरूनच आणाव्या लागल्या. मग येथील आमच्या डॉक्टरांनी काय केले? तर त्या पिचकारीत ती लस भरून ते लोकांच्या दंडात टोचू लागले इतकेच. पण तेही काम कित्येक दिवस त्यांना नीट साधत नसल्याचे दिसून आले ते निराळेच. यावरून येथील युनिर्व्हसिटी शिक्षणाची कोणालाही कल्पना करता येण्यासारखी आहे.
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment