वेबसीरीजची उलटी गंगा आणि दात कोरून पोटे भरणारी मनोरंजक पत्रकारिता
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • रेखाचित्र - संजय पवार
  • Wed , 29 April 2020
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar बेवसीरीज Web series टीव्ही मालिका TV Serial टीव्ही पत्रकारिता TV journalism

वेबसीरीज हे भारतासाठी अगदी अलिकडचे माध्यम. म्हणजे जगभरातल्या वेबसीरीज इंटरनेट माध्यमातून निवडक भारतीय प्रेक्षक पाहत होताच. पण अ‍ॅमेझॉन व नेटफ्लिक्स हे आपल्या भारतीय घरातल्या दूरचित्रवाणी संचासह लॅपटॉप, टॅबलेट ते स्मार्टफोनवर अवतरले आणि या प्रचंड मोठ्या प्रेक्षक वर्गासाठी भारतीय वेबसीरीजची निर्मिती सुरू झाली. ती इंग्रजी, हिंदीसह मग हळूहळू सर्व प्रमुख प्रादेशिक भाषांतही सुरू झाली.

डिजिटल माध्यमाच्या वाढत्या प्रभावाने चित्रपट प्रदर्शन, वितरण व व्यवसाय यांची उतरती भाजणी सुरू झालेली होती. हिरोकेंद्रित आपल्या हिंदी व दक्षिणी चित्रपटसृ‌ष्टींनी या स्पर्धेतही १०० ते ७०० कोटींच्या कमाईचे विक्रम नोंदवले खरे, पण ते ‘हजारात दहा’ या प्रमाणात नोंदवले गेले. म्हणजे उरलेले ९०० निर्माते गर्तेत गेले. याच काळात आणखी काही चित्रपट तरले, ते होते छोट्या बजेटचे व छोट्या गावातली गोष्ट सांगणारे, स्टारपेक्षा अभिनेत्यांनी जिवंत केलेले. नव्या विषयांना हाताळणारे हे चित्रपट समांतर चित्रपटांसोबत बासू चॅटर्जी, सई परांजपे. हृषिकेष मुखर्जी, बासू भट्टाचार्य यांच्या सिनेमांची आठवण करून देणारे ठरले.

या पार्श्वभूमीवर अ‍ॅमेझॉन, नेटफिक्स यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला वेबसीरीजकडे वळवले. त्यांना प्रतिसादही लगेच मिळाला. त्याला कारणे दोन. पहिले उत्तम बजेट. प्रतिसाद मिळाला तर सीझन मागून सीझन करता येणार व दुसरे महत्त्वाचे कारण नुकतीच प्रौढ झालेली भारतीय चित्रपटसृष्टी भाषा, मांडणी व आविष्कारापर्यंत सेन्सॉरच्या कात्रीला विटलेली होती/आहे. वेबसीरीजला सेन्सॉरशिप नाही. त्यामुळे जो मुक्त वावर, विशेषत: हिंसा, लैंगिकता व शिवराळ भाषेला मिळणार होता, हे अधिकचे आकर्षण ठरले. यातून भारतीय लेखक, दिग्दर्शक व कलाकारांसह प्रेक्षकही अधिक प्रौढ होणार होता. वेबसीरीज हे सर्वार्थाने या युगाचे, पिढीचे माध्यम आहे भारतासाठी तरी.

त्यात पुन्हा काही वेबसीरीजसाठी गुन्हेगारी, हिंसा व लैंगिकता या प्रमुख अटीच होत्या. भारतीय अभिनेते / नेत्री यातला एक वर्ग हे सर्व करायला तयार होता आणि प्रेक्षकांनी सुरुवातीला दचकत व नंतर सरावाने स्वीकारले. बाकी आंबटशौकीन हा अमर वर्ग आहे, तो सर्वत्र, सदाकाळ राहणार तसा तो इथेही आहे. त्यांच्यासाठी बालाजी टेलिफिल्मसच्या ‘अल्ट’ या अ‍ॅपने खास सोय केल्याने तो वर्ग तिकडे स्थिरावला असावा.

या पसाऱ्यात मराठी वेबसीरीज चारदोन शिव्या, धुम्रपान, मदिरापान याच्यापलिकडे फारशा गेल्या नाहीत. त्यांचे विषयही काही फारसे वेगळे दिसले नाहीत. उलट काहींवरची पुणेरी छाप अनुत्साह वाढवणारीच ठरली. मराठी सिनेमाच जिथे अजून त्याअर्थाने ‘लार्जर दॅन लाईफ’ झाला नाही, तिथे मराठी वेबसीरीजही फारशी काही चमक दाखवू शकलेल्या नाहीत. वेबसीरीज म्हणजे महाकादंबरीसारखा ऐवज लागतो. मराठी वेबसीरीज लघुकथेपर्यंत मजल मारू शकलीय.

त्यात आता या वेबसीरीज मराठी वाहिन्यांवर दाखवणार! मराठी वाहिनीवरील कार्यक्रमांना सेन्सॉर लागतं. मग आता या वेबसीरीज बिप वाजवणार की, कापून चोपून मापात बसवणार?

यात निर्माता आर्थिक विचार करणार. अनेकदा डिजिटल माध्यमात तुम्ही तुमची कलाकॄती विकलीत की, ती माध्यमे चालवणाऱ्या कंपन्या त्याचे सर्वाधिकारच घेतात व नंतर ते कसेही ते अधिकार वापरतात. म्हणजे त्यांना साडी विकली तर ते त्याचे ड्रेस मटेरिअल किंवा ब्लाऊज पिस करूनही विकू शकतात. लेखक /दिग्दर्शक /कलाकार यांची अवस्था मुकी बिचारी कुणीही हाका अशी होऊन जाते. वेबसीरीज मराठी वाहिन्यांवर मालिकांसारख्या दाखवणे म्हणजे गंगा उलटी वाहून नेण्याचा प्रकार आहे. वेळ भरून काढण्यासाठी त्यांचा उपयोग करणे हे तर अनैतिकच आहे. ज्यांनी या वेबसीरीज बनवून घेतल्या त्यांनी आपल्या अधिकाराचा, स्वामित्व हक्काचा केलेला दुरुपयोग आहे.

हे मराठीबाबतच होऊ शकलं कारण मराठी वाहिन्यावरची मालिका व वेबसीरीज यातलं अंतर फारच पुसट आहे. हिंदी वेबसीरीज कुठल्या वाहिनीवर येऊ शकेल? शक्यता नाहीच. कारण त्यांनी त्या माध्यमाचा योग्य तो वापर केलाय. ते संकलित, संपादित स्वरूपात दाखवूच शकणार नाहीत. तर असे हे मराठी पाऊल पडते उलटे!

दुसरा एक मुद्दा मराठी मनोरंजन विश्वाशी संबंधितच.

सुजित सरकार म्हणून एक उत्तम दिग्दर्शक आहे. ‘मद्रास कॅफे’, ‘पिकू’, ‘पिंक’, ‘विकी डोनर’सारखे चित्रपट त्याच्या नावावर आहेत. संवेदनशील दिग्दर्शक आहे. त्याने नुकतंच एक ट्विट केलं की, आता करोनानंतर इंटिमेट सीन्स करणं शक्य आहे का? इंटिमेट म्हणजे शारिरीक जवळीक, चुंबन, आलिंगने इत्यादी. यात बेडसीनही आले, ज्याला आता भारतीय प्रेक्षक सरावलाय.

सुजितचं ट्विट हे मजेशीर होतं. कारण त्यात शेवटी तो म्हणतो- अन्यथा आपल्याला संहितेतच पर्याय शोधायला लागेल! अगदी या शब्दांत नाही तर साधारण मतितार्थ हाच. यावर लगेच संमिश्र प्रतिक्रियाही आल्या, पण सनसनाटी एकही नाही. ते ट्विट व त्या प्रतिक्रिया आजही तिथेच आहेत, ज्यांना वाचायच्या ते वाचू शकतात.

पण या ट्विटमुळे सध्या दात कोरून पोटे भरणाऱ्या मराठी वृत्तवाहिन्यांच्या मनोरंजन पत्रकारितेला एकदम शिरशिरी आली. सध्या मराठी नाटक, मालिका, चित्रपट व्यवसाय बंदच असल्याने प्रमोशन, रिव्ह्यू अशी कामे नसल्याने नोकर कपातीत मनोरंजनवाले गेले तर आश्चर्य वाटायला नको. अन्यथा त्यांना चेंबूरच्या भाजी मंडईत लॉकडाऊनचा फज्जा उडाला, अशा बातम्या देत रस्त्यावर यावे लागेल!

तर या वाहिनीने सुजित सरकारच्या हवाल्याने एक गरमागरम बातमी केली. स्टॉक इंटिमेट सीन्सचा मोंटाज व आता या दृश्यांचे काय होणार? कलाकार तयार होतील? असे छाती बडवल्यासारखे प्रश्न व्हॉईसओव्हरमध्ये. खरा विनोदी भाग पुढेच होता. यावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्याही हाती लागेल तो/तीच्या. आता मुळात मराठीत बेडसीन म्हणजे फक्त बेडरूममध्ये बेडवर केलेला सीन असतो. पुरुष बनियनमध्ये व बाई गाऊनमध्ये हेसुद्धा खूप. अन्यथा आहे त्या कपड्यावर चादर ओढून घेतली की झालं!

मराठीत इंटिमेट सीन्स झालेच नाहीत असे नाही. पालेकरांच्या ८० च्या दशकात आलेल्या ‘आक्रित’मध्ये पारधी जमातीच्या स्त्री-पुरुषांची श्रृंगारदृश्ये कलात्मक रीतीने टिपली होती, तर अलिकडच्या ‘जोगवा’त चुंबन दृश्य होतं. पण एकुण तुरळकच उदाहरणे. अशी दृश्यं द्यायला आज स्त्री-पुरुष कलाकार तयार आहेत. तेवढी प्रगल्भता त्यांच्यात आहे. पण निर्माताच माघार घेतो, कारण मग चित्रपटाला ‘प्रौढांसाठी’ असं प्रमाणपत्र मिळाले तर फॅमिली ऑडिअन्स जातो आणि सॅटेलाईट राईटसमध्येही अडचणी येतात. त्यामुळे मराठीत फारशी नसलेली इंटिमसी पोटेभरू टीव्ही प्रतिनिधीने ओढूनताणून आणून बातमी उठावदार करायचा अत्यंत स्वस्त प्रयत्न केला.

दात कोरून पोटे भरणाऱ्यांना वेळ भरण्याशी मतलब असतो, तसा तो त्यांनी केला. पण सुजितच्या ट्विटवर दिया मिर्झासारख्या अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया फार संयत व सुबुद्ध आहे.

ती म्हणते- आपले कलाकार सजग आहेत. मुळात शूटिंग कधी सुरू होताहेत हाच कळीचा मुद्दा आहे. आणि चुंबन दृश्यापलिकडे शूटिंगला कार्यरत शंभर एक जणांचा समूह कसा वावरेल आणि इंटिमसी दृश्यातच निकटता असते?

मित्र-मित्र, आई-मुलगा, वडील-मुलगा यांच्यातील जवळीकही करोनानंतर काढून टाकायची?

दियाने जे वळण दिले, ते आमच्या मराठी प्रतिनिधीच्या डोक्यातही आले नाही. कारण सनसनीखेज बातमी व तीही सर्वांत प्रथम देण्याची घाई, आपले बांधव कस्टडीची हवा खाऊन आले तरी सुटत नाही!

यातून पत्रकारितेचा, मनोरंजनविश्व वृत्ताचा स्तर (हा तसा मोठाच शब्द झाला, अशा घाईखोरांसाठी!) आपण कुठे नेऊन ठेवतो व आपली पोटेभरू पत्रकारिता किती हास्यास्पद होते, हे त्यांना कळेल तो सुदिन!

..................................................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......