अजूनकाही
पहिल्या महायुद्धात साधारण १५ लाख भारतीय सैनिक सामील झाले. त्यापैकी १ लाख १० हजार मारले गेले किंवा जखमी झाले. ही आकडेवारी भयंकर आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पाचही मोठ्या युद्धांत मिळून साधारण २२ हजार ५०० भारतीय सैनिक मारले गेले आहेत! १९१४पूर्वी आपले सैनिक भारतीय उपखंडाबाहेर जाऊन लढले नव्हते. आधुनिक भारतीय सैन्याची जडणघडण आणि एकूणच त्याचा पाया या युद्धाने घातला, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
भारताचा, भारतातील समस्यांचा किंवा इतर कशाचाही काडीचाही संबंध नसताना या युद्धात भारत ओढला गेला, याचे एकमेव कारण म्हणजे आपण तेव्हा इंग्रजांचे गुलाम होतो. इंग्लंडच्या सगळ्या वसाहतीतूनच माणसं या कामी जुंपली गेली होती. त्याला भारतही अपवाद नव्हता. फक्त भारतातून सगळ्यात जास्ती लोक या कामाकरता भरती केले गेले ही लक्षात घेण्याची बाब. खरे तर गोऱ्या कातडीचे नसल्याने भारतीय (आणि इतर वसाहतीतले लोकही) कोणत्याही प्रकारे युद्धात सैनिक म्हणून घ्यायला लायक नाहीत असेच ब्रिटिशांचे मत होते. पण मनुष्यबळ आणि इतर साधनसंपत्तीचा प्रचंड मोठा स्त्रोत भारताच्या रूपाने त्यांच्या जवळ होता आणि युद्धात त्याची नितांत गरज असल्याने आपले जुने पूर्वग्रह बाजूला ठेवून त्यांनी भारताला या युद्धात ओढले.
भारतीय सैन्याला सगळ्यात मोठी ‘स्वयंसेवक सेना’ (volunteer army) असे म्हटले गेले, म्हणजे हे सैनिक स्वत:च्या इच्छेने सैन्यात भरती झालेले होते. पण वस्तुस्थिती तशी नव्हती. अनेक अशिक्षित आणि युद्धाबद्दल अनभिज्ञ भारतीय तरुण फूस लावून किंवा अगदी जोर जबरदस्तीने भरती केले गेले. अनेक गावांत जेव्हा भरती पथके जात आणि तेथील तरुण भरती व्हायला राजी होत नसत, तेव्हा गावाच्या चावडीवर सर्वांना बोलावून अख्ख्या गावाला धमकावले जात असे. प्रत्येक घरातून कमीत कमी एका तरी माणसाला पाठवायची सक्ती केली जात असे.
बडे बडे भारतीय नेते म्हणजे मोतीलाल नेहरू ते अगदी महात्मा गांधीजीपर्यंत अनेक जण भारतीयांनी ब्रिटिश सरकारला या युद्धात मदत करावी याच मताचे होते. त्या बदल्यात युद्ध संपल्यानंतर ब्रिटिश सरकारकडून काही भरीव राजकीय सुधारणा, साम्राज्यांतर्गत स्वातंत्र्य किंवा अंतर्गत बाबींत स्वयंनिर्णयाचा हक्क, अशी भरपाई मिळेल अशी त्यांना आशा होती. अर्थात ती फलद्रूप झाली नाही.
२८ ऑगस्ट १९१४ रोजी म्हणजे युद्ध सुरू झाल्यावर एका महिन्याच्या आतच भारतीय सैनिकांची पहिली तुकडी कराची बंदरातून फ्रान्सकडे रवाना झाली. भारतीय सैन्य फ्रान्समध्ये खंदकापासून ते आफ्रिकेच्या जंगलात आणि मध्य पूर्वेच्या तप्त, वैराण, रखरखीत वाळवंटात अशा सगळ्या प्रकारच्या भूभागात लढले. सैनिकांच्या म्हणजे मनुष्यबळाखेरीज पैसा, अन्नधान्य, कपडे, दारूगोळा लोखंड आणि पोलाद, इतर युद्ध साहित्य, तसेच पैसा या रूपात भारताकडून मदतीचा प्रचंड ओघ वाहू लागला. अमेरिका या युद्धात उतरेपर्यंत भारतासारख्या कामधेनूच्या जीवावरच इंग्लंड या युद्धात तगू शकले, ही वस्तुस्थिती आहे.
इंग्लिश साम्राज्याच्या झेंड्याखाली लढताहेत म्हणून भारतीय वा इतर वसाहतीतले सैनिक आणि गोरे सैनिक यांच्यात काही भेदभाव केला जात नव्हता, असे अजिबात नाही. एका गोऱ्या सैनिकाचा सरासरी पगार महिना ३० रुपये (२.२ पौंड) असे, तर भारतीय सैनिकाला महिन्याकाठी ११ रुपये (०.८ पौंड) मिळत. त्याहून संतापजनक गोष्ट म्हणजे त्यातून त्याच्या महिन्याचा जेवणाखाण्याचा खर्च कापून घेतला जाई. गोऱ्या सैनिकांना हा बहुमान(!) मिळत नसे. बाकीच्या बाबतीत काय बोलणार! आजारी, जखमी सैनिकांची इस्पितळेदेखील गोऱ्या व काळ्या सैनिकासाठी वेगवेगळी असत आणि अर्थातच तिथे स्वच्छता, सेवा-शुश्रुषा, औषधे, अन्न अशा बाबतीत भेदभाव होई.
या युद्धाआधी भारतीय सैनिकांना भारतीय उपखंडाबाहेर लढण्याचा अनुभव आणि प्रशिक्षण तर नव्हतेच, शिवाय त्यांचे कपडे आणि इतर युद्धसामग्रीदेखील तशी नव्हती, तरीही भारतीय सैनिकांनी या युद्धात अतुलनीय कामगिरी बजावली. घाबरून किंवा कंटाळून, युद्धाचा ताण असह्य झाल्याने युद्धभूमी सोडून पाळणाऱ्या सैनिकांना पकडून ठार केले जाई.
पहिल्या महायुद्धात अशा ३०८ ब्रिटिश, तर ९२० फ्रेंच सैनिकांना मृत्युदंड दिला गेला, पण यात एकही भारतीय सैनिक नाही. (ब्रिटिश किंवा फ्रेंच सैनिकांना कमी लेखण्याचा इथे हेतू नाही, तर ज्यांना गोऱ्या कातडीचे नाही म्हणून कमी लेखले जात होते, ते काळे सैनिक गोऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून तशाच खडतर परिस्थितीत लढताना कुठेही कमी पडले नाहीत उलट काकणभर सरसच ठरले, हे सांगणे एवढाच हेतू इथे आहे.) याउलट युद्धात अतुलनीय शौर्य, निष्ठा आणि समर्पणाचे प्रदर्शन केल्याबद्दल एक नाही दोन नाहीतर ११ भारतीय सैनिकांना सर्वोच्च लष्करी बहुमान व्हिक्टोरिया क्रॉस देऊन गोरवले गेले. त्यांची नावे अशी - खुदादाद खान, मीर दोस्त, दरवान सिंग नेगी, गब्बर सिंग नेगी, छत्ता सिंग, कुलबीर थापा, दफादार गोविंद सिंग, नायक लाला, रिसालदार बदलू सिंग, कारण बहादूर राणा, नायक शहमद खान.
या युद्धाकरता भारताकडून ८ कोटी पौंडाचे (११० कोटी रुपये) युद्धसाहित्य पुरवले गेले. (अर्थात जवळपास फुकट) तर ३१० कोटी रुपये युद्धाला मदत म्हणून उकळले गेले. यात संस्थानिकांकडून घेतलेल्या पैशाचा समावेश नाही, तो आकडा साधारण ५०० कोटी आहे. पण सगळ्या संस्थानिकांचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याने नक्की सांगता येत नाही. टाटा स्टीलसारख्या कंपनीकडून तीन लाख टन पोलाद आणि १५०० मैल लांबीचे रेल्वेचे रूळ इंग्रजांना पुरवले गेले. १९०८ साली या कंपनीची स्थापना झाली, तेव्हा “ह्यांनी उत्पादन केलेले पोलाद कोण घेणार? त्यांनी बनवलेले प्रत्येक पौंड पोलाद त्यांनाच गिळावे लागेल.” असे हिणकस उद्गार फ्रेडेरिक अपकोट या भारतीय रेल्वेच्या प्रमुख आयुक्त असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्याने काढले होते.
याउलट बऱ्याच क्रांतिकारक आणि जहाल संघटना, या सुवर्णसंधीचा फायदा उठवून ब्रिटिशांना तुर्कस्तान आणि जर्मनीच्या मदतीने भारतातून हुसकावून लावावे या मताच्या होत्या. तसेही तुर्कस्तानच्या ओटोमान साम्राज्याचा युद्धात प्रवेश इंग्रजांविरुद्ध झाल्याने भारतीय मुसलमान त्यांच्या धर्मबंधुंविरुद्ध कसे काय लढतील, असा प्रश्न आलाच होता. जतींद्रनाथ मुखर्जी (बाघा जतीन) आणि त्यांची जुगंतर (युगांतर) पार्टी, बर्लिन कमिटी ही जर्मनीतील भारतीय विद्यार्थ्यांची संघटना, पंजाबी लोकांची, मुख्यत: शीख समुदायाची सॅनफ्रान्सिस्को, अमेरिका येथे १९१३ साली स्थापन झालेली गदर पार्टी, असे अनेक लोक आणि संघटना जर्मनी व तुर्कस्तानची मदत मिळवून आपला स्वातंत्र्यलढा यशस्वी करण्याचा प्रयत्न करत होते.
पहिल्या महायुद्धाला ‘seminal tragedy’ म्हणजे दूरगामी परिणाम घडवणारी घटना म्हणून ओळखले जाते. युद्धात होरपळून निघालेल्या युरोपियन लोकांची अशीच भावना आहे. त्यात तथ्यांश आहे हेही खरे, पण ते पूर्ण सत्य नव्हे. आपल्यासारख्या गुलामीत जगणाऱ्या लोक समूहांना हे युद्ध एक इष्टापत्ती ठरले हे खरे. हे युद्ध झाले नसते तर शेकडो हजारो वर्षांपासून तग धरून असलेली सामंतशाही आणि युरोपातील साम्राज्यं नष्ट झाली नसती. जगाच्या राजकारणातला युरोपचा वरचष्मा नष्ट झाला नसता. रशियन क्रांती, लेनिन आणि स्टॅलिनचा उदय, सोविएत रशियाची स्थापना, हिटलर-मुसोलिनीचा उदय, नाझीवाद, दुसरे महायुद्ध, नंतरचे शीतयुद्ध झाले नसते.
ज्यूंचे शिरकाण, इस्रायलची निर्मिती, मध्य पूर्वेचा प्रश्न, पाकिस्तान आणि भारतासारखे देशांचे स्वातंत्र्य असे काही घडले नसते. कमीत कमी घटना ज्या पद्धतीने घडल्या, त्यापेक्षा नक्कीच वेगळ्या पद्धतीने घडल्या असत्या. हे जसे खरे, तसेच आणखी एका अंगाने विचार करायचं झाल्यास या युद्धाने वैद्यकशास्त्र, औषध निर्मिती, विमान तंत्र, रेल्वे, तारी आणि बिनतारी दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स, अभियांत्रिकी क्षेत्र अशा तांत्रिक बाबतीतील संशोधनाला आणि सुधारणेला वाव मिळाला. प्रचारतंत्र, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, तह, वचननामे, शांतीकरार, समझोते, व्यापारी संबंध, अर्थकारण यांच्या मागच्या तत्त्वांमध्ये मूलभूत बदल झाले. त्या दृष्टीने हे युद्ध इष्टापत्तीच ठरले.
१९३९साली जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू झाले, तेव्हा कुणालाही आश्चर्याचा धक्का बसला नाही. अनेकांना असे युद्ध होणार याची जाणीव झालेली होती. शिवाय ते पहिल्या महायुद्धाप्रमाणेच प्रचंड विनाशकारी आणि दीर्घ काळ चालणार आहे, याचाही अंदाज होता. चर्चिलने लिहून ठेवल्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धाचे काळे ढग १९३५ पासूनच क्षितिजावर जमा व्हायला सुरुवात झाली होती.
हे दुसरे युद्ध टाळण्याचा नेव्हिल चेम्बरलेनसारख्या लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नाला यश आले नाही हा भाग अलाहिदा, पण हे युद्ध सुरू होण्याला कारणीभूत असे हिटलर, मुसोलिनीसारखे हुकूमशहा त्यांच्या हुकूमशाही राजवटी, त्यांचे भ्रामक राष्ट्रवाद आणि मागील युद्धात झालेल्या अपमानाचा सूड घेण्याचे इरादे त्या मागे होते याबद्दल फार कुणाला शंका नव्हती.
पहिल्या महायुद्धाबाबत मात्र असे म्हणता येत नाही. एकतर मोरोक्कन पेच किंवा बोस्नियाचा पेच प्रसंग यावेळी शांततेने सामोपचाराने मार्ग निघाला होता. बाल्कन युद्ध पेटले तरी ते युरोपच्या एका कोपऱ्यात फक्त खेळले गेले. त्याने जागतिक युद्धाचे स्वरूप धारण केले नाही. त्यामुळे राजकारणी मुत्सद्दी लोक यातून तोडगा काढतील, कुणीतरी नमते घेईल शांतता टिकून राहील असे सर्व म्हणजे जर्मनी, ऑस्ट्रिया सकट सगळ्यांनाच वाटत राहिले. ते सगळे चूक होते.
या पहिल्या युद्धात प्रथमच एक देश कम्युनिस्ट राजवटीखाली आला. एखादा वाद किंवा विचारधारा विजयी होऊन एका खंडप्राय देशात सत्ताधारी बनली. हे या आधी कधीही झाले नव्हते. या कम्युनिझम किंवा साम्यवादी राजवटीमुळे पुढे २०व्या शतकाच्या उत्तरार्धात ‘शीतयुद्ध’ हा वेगळाच युद्धप्रकार जगाला पाहायला मिळाला. असे असूनही पहिले महायुद्ध सुरू करण्याला नक्की कोणा एकाला जबाबदार धरत येत नाही.
१९२० नंतर विजेत्या राष्ट्रांनी कैसरला खलपुरुष ठरवून त्याला आणि जर्मनीला या उत्पाताकरता जबाबदार ठरवले खरे, पण ते पूर्ण सत्य नव्हते.
(समाप्त)
.............................................................................................................................................
या सदरातील आधीच्या लेखांसाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/156
.............................................................................................................................................
लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
aditya.korde@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment