अजूनकाही
नुकतेच महाराष्ट्रात मॉब लिंचिंग प्रकरण घडले. व्हायरल व्हिडिओमुळे आणि चढलेल्या धार्मिक-राजकीय रंगामुळे ते जास्तच चर्चेत आले. १६ एप्रिल २०२० रोजी पालघरपासून ११० किमी अंतरावरील गडचिंचले या दुर्गम गावात गावकऱ्यांनी चोर समजून तीन जणांना ठेचून ठार मारले. या घटनेसंदर्भात ११० आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील ९ जण अल्पवयीन आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आली आहे. मृत तीन व्यक्तींमध्ये दोन साधू आणि त्यांचा ड्रायव्हर यांचा समावेश आहे. यांना का मारले गेले? प्रसारमाध्यमांतून आतापर्यंत ज्या बातम्या आल्या, त्यावरून असे दिसते की, मूल चोरी करण्याच्या अफवेमुळे त्यांचे बळी गेले. काही प्रसारमाध्यमांनी असे दाखवले की, काही मुस्लीम हिंदू वेषांतर करून गावात घुसणार असल्याच्या अफवेमुळे त्यांचे बळी गेले. काहींनी या घटनेचा व्हिडिओ एडिट करून ‘सोहेल’ हे नाव त्यात टाकून या प्रकरणाला धार्मिक रंग कसा देता येईल आणि धार्मिक द्वेष कसा वाढवता येईल, याचाही प्रयत्न केला.
प्रसारमाध्यमेदेखील धार्मिक आणि राजकीय रंग देण्याबाबत जास्त आक्रमक दिसून आली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे अर्णव गोस्वामीचा रिपब्लिकन टीव्हीवरील ‘२२ एप्रिल - पुछता है भारत’ हा कार्यक्रम. ज्यात त्याने पालघरच्या घटनेला एक धार्मिक आणि राजकीय भडक रंग दिल्याच्या बातमीवरून त्याच्याविरुद्ध भारतातील विविध राज्यांतून अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. सोशल मीडियावरील अफवांमुळे या प्रकरणात तीन निष्पाप जीवांचा बळी गेला, तसाच शंभराहून अधिक लोकांचा सराईत गुन्हेगार नसलेला एक जमाव अटक झाला, याचे गांभीर्य सोडून आपल्याकडील प्रसारमाध्यमे आणि राजकीय नेते या घटनेतून अजून धार्मिक तेढ निर्माण करून त्यातून कसा राजकीय फायदा करता येईल, या कडेच जास्त लक्ष देताना प्रकर्षाने दिसत आहेत. याचाच परिणाम म्हणून क्षुल्लक कारणानेही दिवसेंदिवस धार्मिक तेढ झपाट्याने वाढते आहे. त्यातून ‘हेट क्राईम’ आणि ‘मॉब लिंचिंग’सारख्या घटना घडत आहेत.
या मॉब लिचिंगचे गांभीर्य समजून घेण्यासाठी निष्पाप बळी गेलेल्या भारतातील काही घटनांचा थोडक्यात आढावा घेऊया -
दादरी हत्याकांड - सप्टेंबर २०१५. उत्तर प्रदेशमधील दादरी येथे अचानक रात्री मंदिरातील स्पीकरवरून अखलाखच्या घरी गायीचे मांस असल्याची अफवा पसरवली गेली. आणि मग जमावाने घरी तोडफोड करत कुटुंबियांना मारहाण केली आणि अखलाखची हत्याही केली. या प्रकरणातदेखील १९ जणांवर अटक केली गेली. २०१७मध्ये या सर्वांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. या प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या संजय राणा यांचा मुलगा विशाल राणाचाही समावेश होता. त्याचे सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रॅलीतील फोटो जास्त व्हायरल असतात.
पहलू खान - एप्रिल २०१७. राजस्थानमध्ये पहिलू खान, इरशाद आणि गावातील दोन जण गाय खरेदी करून गावाकडे जात असताना कथित गोरक्षकांनी त्यांचा रस्ता अडवून त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेऊन त्यांना जबर मारहाण केली. यात पहलू खानचा डोक्याला जबर मारहाण झाल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेचा त्यांना बेदम मारण्याचा, तसेच त्यांची गाडी तोडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात भरदिवसा, भररस्त्यावर जमाव त्यांना मारत होता. व्हिडिओत मारहाण दिसत असतानाही या घटनेमधील सातही आरोपी निर्दोष सुटले. तसेच दोन आरोपी अल्पवयीन होते. त्यांना तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा व्हायरल व्हिडिओ -
अलीमुद्दिन अन्सारी - जून २०१७. झारखंडमध्ये रामगढ येथे गो-मांस घेऊन जाण्याच्या संशयावरून अलीमुद्दिन अन्सारीचा झुंडबळी गेला. सदर प्रकरणात ११ जणांना अटक होऊन जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली, पण उच्च न्यायालयामध्ये त्यातील ८ आरोपींना जामीन मिळाला.
जुनैद खान - जून २०१७. दिल्ली - मथुरा पेसेंजरमध्ये बल्लागढ स्टेशनजवळ ट्रेनमध्ये २० ते २५ जणांच्या जमावाने मिळून जुनैद खान, हकीम आणि साकीर या भावंडांना ट्रेनमधील बसण्याच्या आसनावरून बेदम मारहाण केली. या मारहाणीत जुनैदचा मृत्यू झाला. बाकीचे भाऊ जखमी झाले. या प्रकरणाच्या वेळी हे भांडण सीटवरून होते की, बीफवरून अशा अफवा पसरत होत्या. फरिदाबाद पोलिसांनी या केसमध्ये चार जणांना अटक केली. मुख्य आरोपी नरेश याला महाराष्ट्रातील धुळेमधून अटक करण्यात आली.
हापूड हत्याकांड - २०१८. उत्तर प्रदेशमधील हापूड येथे गो-हत्या केली, या अफवेमुळे काफिर कुरेशी (वय ४५ वर्षे) आणि समरूद्दीन (वय- ६५ वर्षे) यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांची दाढी खेचून, क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणाचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली. त्यात राकेश ससोदिया हा मुख्य आरोपी होता. कालांतराने मुख्य आरोपी आणि इतर चार आरोपींना जामीन मिळाला. पोलिसांनी आरोपपत्रात रोडवरील मोटार सायकल अपघाताची घटना होती, असे लिहून हे प्रकरण दाबण्याचाही प्रयत्न केला. पण त्याच्या व्हायरल व्हिडिओतील सत्य मात्र वेगळेच होते. या प्रकरणात आरोपींना जामीन मंजूर झाल्यानंतर एनडीटीव्हीच्या पत्रकारांनी केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनमध्ये मुख्य आरोपी राकेश ससोदिया आणि त्याच्या भावाची मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी कशा प्रकारे तडफडवून मारले, हे अत्यंत गर्वाने आणि निर्दयीपणे सांगितले. या स्ट्रिंग ऑपरेशनचा व्हिडिओ रविश कुमारच्या ‘प्राईम टाइम’मध्ये दाखवला होता. या प्रकरणाचा व्हायरल व्हिडिओ –
धुळे हत्याकांड - जुलै २०१८. मुलांना पळवून नेण्याच्या सोशल मीडियावरील अफवेवरून धुळे जिल्ह्यातील राईनपाडा गावात भिक्षा मागण्यासाठी गावात आलेल्या नाथ गोसावी समाजातील पाच जणांची गावकऱ्यांच्या झुंडीने बेदम मारहाण करून हत्या केली. सदर प्रकरणात २३ जणांना अटक झाली होती. त्यातील नऊ प्रमुख आरोपी होते, तर महारु पवारला मुख्य आरोपी म्हणून अटक केली होती. या प्रकरणातील आरोपींपैकी कोणीही सराईत गुन्हेगार नव्हते.
रकबर खान - जुलै २०१८. हरयाणाती अलवर येथे रकबर खान आणि त्याचा मित्र अस्लम खान दूध विकण्यासाठी गाय विकत घेऊन पायी घरी जात असताना काही गोरक्षकांनी रस्त्यात अडवून बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्यात रकबरचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली. यातील आरोपी हे विश्व हिंदू परिषदेचे सभासद आणि भाजपचे समर्थक होते. यातील विजय या एका आरोपीला ऑगस्ट २०१९मध्ये जयपूरमध्ये अटक करण्यात आली, तसेच ऑक्टोबर २०१९मध्ये उच्च न्यायालयाने जामीन देण्यासही नकार दिला.
तरबेज अन्सारी - १७ जून २०१९. झारखंडमधील सरायकेला – खरसवा जिल्ह्यात तरबेज अन्सारी या तरुणाला चोरीच्या संशयावरून खांबाला बांधून जमावाने मारले. या प्रकरणाचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. ज्यात त्या मुलाला खांबाला बांधून बेदम मारहाण करत आहेत असे दिसत होते. त्याला ‘जय श्री राम म्हण’, ‘जय हनुमान म्हण’ असे स्थानिक भाषेत धमकावून सांगितले जात असल्याचेही दिसत होते. शेवट जबर मारहाणीमुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणात पाच जणांना अटक होऊन दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. हे प्रकरण अजूनही निकाली निघालेले नाही. या प्रकरणातील व्हायरल व्हिडिओची लिंक -
या सर्व प्रकरणांतून ‘मॉब लिंचिंग\झुंडबळीच्या घटनांमध्ये कोणत्या प्रकारचे साम्य आहे, हे सहज समजून येते. मॉब लिंचिंगसाठी अजूनही आपल्याकडे कोणताही कायदा नाही. काही घटना अजूनही पोलीस स्टेशनला रितसर नोंदवल्या गेलेल्याच नाहीत, तर काही ठिकाणी नीट तपास करण्यात आलेला नाही. NCRBकडे अजूनही मॉब लिंचिंगबाबत अहवाल सादर केला जात नाही.
असे असतानाही काही प्रसारमाध्यमांनी स्वतः भारतातील लिंचिंग प्रकरणांचे संशोधन करून आपले अहवाल तयार केले आहेत. ज्यात इंडिया स्पेंड, फेक्ट चेकर, ह्युमन /राईट्स वॉच आणि The Quintच्या ‘लिंचिस्तान’ या डॉक्युमेंटरी अहवालांचा समावेश होतो. या अहवालांनुसार २०१० ते २०१८ मध्ये गो-हत्येच्या संशयावरून आणि अफवेमुळे मॉब लिंचिंगच्या ८६ घटना घडल्या. त्यात ३३ जणांचा मृत्यू होऊन १५८ लोक गंभीर जखमी झाले. तसेच मूल चोरी या अफवेमुळे घडलेल्या घटनांची संख्या ७४ इतकी आहे. त्यात ३६ जणांचा मृत्यू झाला.
ह्युमन /राईट्स वॉचच्या अहवालानुसार मे २०१५ ते डिसेंबर २०१८ दरम्यान भारतातल्या १२ राज्यांमध्ये जवळपास ४४ लोकांची हत्या करण्यात आली. त्यातील ३६ मुस्लीम होते. याच काळात २० राज्यांत १०० प्रकरणांत जवळपास २८० जण जखमी झाले. संपूर्ण भारतात घडलेल्या एकूण मॉब लिंचिंगची संख्या २०१४मध्ये १८, २०१५ मध्ये ३०, २०१६ मध्ये ४२, २०१७ मध्ये ७३ तर २०१८ मध्ये ९२ इतकी आहे. ही आकडेवारी प्रसारमाध्यमांतूनही आलेली आहे. २०१४पूर्वीदेखील मॉब लिंचिंगच्या घटना घडत होत्या, पण त्या वर्षाला एक किंवा दोन-तीन या प्रमाणात होत्या, २०१४पासून मात्र झपाट्याने या आकड्यात वाढ झालेली दिसत आहे.
या अहवालानुसार मॉब लिंचिंगचा सर्वाधिक बळी मुस्लीम समुदाय दिसतो. त्यानंतर हिंदू धर्मातील ठराविक भटक्या किंवा दलित जाती. तसेच मॉब लिंचिंग करणारा जमाव हा अधिकतर अफवांना बळी पडलेला हिंदू जमाव दिसून येतो. तसेच या घटना काही ठराविक राज्यात सातत्याने घडत असल्याचे दिसून येते.
भारतात सातत्याने घडत असलेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांचे प्रमुख कारण आहे- गो-हत्या, गो-तस्करी, मूल चोरी करणे किंवा पळवून नेणे. हीच कारणे बहुतेक घटनांमध्ये सातत्याने दिसून येतात. त्यासोबतच सदर घटनांचे व्हिडिओदेखील कुणाची भीती न बाळगता अभिमानाने व्हायरल केले जातात. हे व्हिडिओ असताना आणि भा.द.वि. ३०२ किंवा ३०७ कलम लावलेले असतानाही आरोपी आधी जामिनावर आणि कालांतराने निर्दोष सुटतात.
या मॉब लिंचिंग प्रकरणात अल्पवयीन मुलांचाही आरोपी म्हणून समावेश झालेला दिसतो. कधी कधी तर पीडित व्यक्तीविरुद्धच केस दाखल होते की, त्याने जिल्हाधिकाऱ्याची परवानगी न घेता गाय घेतली कशी? जेव्हा सेलिब्रेटी मॉब लिंचिंगवर कठोर कारवाई होण्यासाठी आवाज उठवतात, निषेधार्थ पंतप्रधानांना पत्र पाठवतात, तेव्हा त्यांच्यावर बदनामीच्या केस दाखल केल्या जातात.
कोणीही मॉब लिंचिंगच्या सतत घडणाऱ्या घटनांकडे अधिक गांभीर्याने बघत आहे, असं वाटत नाही. कोणीही विचार करत नाही की, ज्यांचा बळी गेला ते नेमके कोण होते? एखाद्या घरातील एकुलती कमावती व्यक्ती गमावल्यावर त्यांच्या कुटुंबियांचे काय होते? सरकार अशा कुटुंबियासाठी काय करते? खोट्या अफवांना बळी पडून सराईत गुन्हेगार नसणाऱ्यांकडून जेव्हा हत्या होतात, त्यांना अटक होतात, त्यांचे पुढे काय होत असेल? त्यांच्या परिवाराचे काय होत असेल? हे प्रश्न समोर ठेवून जर प्रसारमाध्यमांतून आणि सोशल मीडियावर जनजागृती केली तर कदाचित लोक अफवांना बळी पडण्याआधी थोडा विचार करू लागतील.
वरील किंवा इतरही घटनांमधून हेच प्रकर्षाने दिसून येते की, अफवेचे कारण कोणतेही असले तरी बळी मात्र निष्पाप जीवांचाच जातो. ज्यांना अटक होते ते व्हॉटसअॅपसारख्या सोशल मीडियातून पसरवल्या गेलेल्या फेक न्यूजचे बळी होतात.
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या मॉब लिंचिंगच्या घटना अतिशय संतापजनक आहेत. त्या मागील एकसारखी कारणे आणि ठराविक समुदायातील निष्पाप बळी, हेदेखील चिंताजनक आहे. जातीय–धार्मिक तेढ आणि राजकीय फायद्यासाठी क्षणात व्हायरल केल्या जाणाऱ्या अफवांचा आधार घेणे किंवा त्या आधारे मूळ घटनेला वेगळे वळण लावणे अतिशय घातक आहे. मॉब लिंचिंग थांबवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अफवांना रोखणे नितांत गरजेचे आहे. त्याचबरोबर मॉब लिंचिंगसाठी स्वतंत्र कायदा बनण्याची गरज आहे. प्रसारमाध्यमांनीही बातम्या देताना धार्मिक आणि राजकीय द्वेष वाढणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.
मॉब लिंचिंग हा एक असा जमाव आहे, ज्याला कोणतेही ठराविक नाव नाही, रूप नाही, पण त्याला एक ठराविक विचारसरणीचा ढाचा मात्र आहे. आणि हा ढाचा बनवणे थांबले पाहिजे. त्यामुळे भारत अविवेकी, धार्मिक, जातीय, वर्णद्वेष करणारा बनत आहे. हे थांबवले गेले पाहिजे. आपल्याला गांधी-आंबेडकरांच्या आधुनिक भारताची गरज आहे, अशा मध्ययुगीन रानटी भारताची नाही.
.............................................................................................................................................
लेखिका अंजली प्रवीण नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली यांच्या नागपूर सेन्ट्रल जेलमध्ये सुरू असलेल्या उपक्रमात ‘सोशल वर्कर फेलो’ म्हणून कार्यरत आहेत.
amkar.anju@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment