अजूनकाही
उद्या महात्मा बसवेश्वर यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...
..................................................................................................................................................................
समाजाच्या जडणघडणीमध्ये समाजसुधारकांचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. असेच एक समाजसुधारक कर्नाटकात बाराव्या शतकात होऊन गेले, ते म्हणजे क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर होत. प्राचीन काळापासून भारतीय समाज हा अनेक रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, कर्मकांड, विषमता, भेदभाव, स्त्रीदास्यत्व, जातीयता इत्यादीने त्रस्त झालेला होता. अशा परिस्थितीत समाजात नवचैतन्य निर्माण करण्याचे कार्य महात्मा बसवेश्वरांनी केले.
भारतात गौतम बुद्ध व भगवान महावीर यांच्यानंतर समाजातील विषमतेविरुद्ध बंड करणारे वैचारिक व कृतिशील समाजसुधारक म्हणून महात्मा बसवेश्वरांकडे पाहिले जाते. आपल्याकडे वेगवेगळ्या कारणांनी अनेक क्रांत्या झाल्या, परंतु बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांच्या नेतृत्वात झालेल्या सामाजिक व धार्मिक क्रांतीचे एक वेगळेच महत्त्व आहे. क्रांती म्हणजे प्रचलित व्यवस्थेविरुद्ध केलेले बंड होय. क्रांतीचे मूळ हे सामाजिक राजकीय किंवा आर्थिक असू शकते. महात्मा बसवेश्वरांनी समाजातील गरीब, उपेक्षित, अस्पृश्य लोकांच्या कल्याणासाठी क्रांती केली होती. त्यांच्या सामाजिक हक्कांसाठी त्यांनी प्रस्थापित अन्यायी समाजव्यवस्थेविरुद्ध विद्रोह केला होता. त्यांनी आपल्या विचार व कार्याने समाजातील विषमतेवर प्रहार करून सामाजिक समतेचा मार्ग प्रशस्त केला.
बसवेश्वरांच्या काळामध्ये कर्मठ संप्रदायाचा पुरातन, सनातन वैदिक धर्म हा ब्राह्मण पुरोहित लोकांच्या मुठीत होता. त्याचा वापर ते आपल्या स्वार्थासाठी हवा तसा करत असत. वैदिक धर्म हा विषमतेवर आधारलेला होता. चातुर्वर्णव्यवस्थेचे व जातिव्यवस्थेचे समर्थन करून बहुजनांचे मूलभूत हक्क नाकारले जात होते. अशा माणसामाणसांमध्ये भेद करून सामाजिक विषमता निर्माण करणाऱ्या वैदिक धर्माला बसवेश्वरांनी नाकारले.
वयाच्या आठव्या वर्षीच त्यांनी आपल्या मुंडन संस्कारला विरोध केला. त्यांनी जानव हे कर्मकांड समजून त्यास फेकून दिले. ज्या वेदांनी समाजात विषमतेचे बीज पेरले, त्या वेदावर परखडपणे आसूड ओढण्याचे काम केले. ते आपल्या भाषणात म्हणतात- “वेदावर खड़ग चालवीन, शास्त्रांना बेड्या घालेन। तर्काच्या पाठीवर चाबकाचे फटकारे ओढीन, आगमाचे नाक कापेन ।। महादानी कुडलसंगम, देवा मादार चन्नयाचा पुत्र असे मी।।। ”
अशा प्रकारे कर्मठ रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा व विषमतेचे समर्थन करणाऱ्या वैदिक धर्माचा त्याग करून समतेवर आधारित ‘लिंगायत धर्मा’ची स्थापना बसवेश्वर यांनी केली. जो धर्म रूढी, प्रथा, परंपरा यांचं समर्थन करतो, जातीयतेचं समर्थन करतो, त्या धर्माचा त्याग करून मानवतावादी लिंगायत धर्माची कास धरण्याचा संदेश बसवेश्वर यांनी दिला. तत्कालीन समाजात प्रत्येक जातीच्या लोकांसाठी जातीची एक चौकट निश्चित केली होती. त्या चौकटीत राहूनच त्यांनी कार्य केले पाहिजे. एखाद्याने चौकटीच्या बाहेर जाऊन वर्तन केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जात असे. त्याला सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत केले जात असे. त्यामुळे जातीयतेची चौकट मोडण्याचे धाडस कोणीही करत नसत. बसवेश्वरांनी मानवनिर्मित जातिव्यवस्थेचे खंडन करून वर्ण, लिंग, जातिभेदरहित नव्या लिंगायत धर्म व समाजाची स्थापना केली. ज्यामध्ये सर्व जातींच्या लोकांना समान वागणूक व समान अधिकार दिले गेले होते.
बसवेश्वर म्हणतात- “जन्माने कोणी उच्च-नीच ठरत नसतो. लोखंड तापविणारा लोहार झाला, कपडे धुणारा धोबी झाला, कपडे शिवणारा शिंपी झाला, वेद वाचणारा ब्राह्मण झाला, या जगात कोणी जात घेऊन जन्माला आला आहे काय?”
जातिव्यवस्थेमुळे आंतरजातीय रोटी-बेटी व्यवहारावर निर्बंध होते. अशा परिस्थितीत बसवेश्वरांनी आंतरजातीय विवाह घडवून आणला. चांभार जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत व मधुवरस ब्राह्मण मंत्र्यांची मुलगी कलावती यांच्यात विवाह घडवून आणला. हे खूपच क्रांतिकारक आणि धाडसी कार्य होते. कारण स्वातंत्र्योत्तर भारतात संविधानाने व कायद्याने जातीयता नष्ट करण्यात आली असली तरी आज समाजात आंतरजातीय विवाहाची मानसिकता अल्पसंख्यच आहे. कारण समाजातून जातीयता पूर्णपणे नष्ट झालेली नाही.
श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्यामध्ये फरक करून बसवेश्वरांनी अंधश्रद्धेचा निषेध केला. धार्मिक स्थळे ही त्या काळात अंधश्रद्धेची ठिकाणे बनली होती. लोकांचा हाताने श्रम करण्याऐवजी हातावरील रेषांवर विश्वास वाढला होता. नवस-सायास, अंगारे-धुपारे, गुप्त धनाची प्राप्ती, गंडा दोरे यांच्यामागे समाज धावत होता. या मानसिकतेवर बसवेश्वरांनी आपल्या वचनातून कडक ताशेरे ओढले. ढोंगी दैववादी व्यक्तींचा आपल्या वचनातून निषेध केला.
त्या काळात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील लोकांना मंदिरात प्रवेश नाकारला जात होता. त्यांच्या धार्मिक श्रद्धेचा विचार करून बसवेश्वरांनी देहालाच देवालय म्हणून प्रस्थापित केले. मंदिरे ही प्रस्थापित धार्मिक व सामाजिक संस्था होत्या. ज्यांचा तत्कालीन समाज जीवनावर खूप प्रभाव होता. देव व देऊळे ही विषमतेची व पिळवणुकीचे केंद्र बनले होते. त्या ठिकाणी कनिष्ठ जातीतील लोकांना प्रवेश नाकारला जात होता. बसवेश्वर एका वचनात देवालयाबद्दल म्हणतात -
“सधन बांधती देवालय, देवा मी गरीब काय करू? देहची माझे मंदिर, पायच माझे देवळाचे खांब, मस्तक माझे देवळाचा कळस, स्थावर पावे नाश…”
मंदिरे श्रीमंत लोकच बांधतात आणि तेही अनैतिक मार्गाने कमावलेल्या पैशांतून. नंतर ती मंदिरे गोरगरिबांना लुटण्याची केंद्रे बनतात. म्हणून बसवेश्वरांनी देव आणि माणूस यांच्यातील द्वैत नष्ट करून देहालाच देव मानले. ईष्टलिंगाच्या रूपाने देवाला २४ तास देहाजवळ स्थापित केले. सर्वांना एकाच प्रकारचे ईष्टलिंग धारण करण्याचा अधिकार दिला. त्यामुळे मंदिराच्या आधारे जोपासल्या जाणाऱ्या विषमतेला आपोआपच आळा बसला.
बाराव्या शतकात स्त्रियांची खूप वाईट अवस्था होती. सर्वत्र ती बंधनात जखडलेली होती. तिला स्वतःचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हते. घराच्या चार भिंतीत तिचं अस्तित्व बंदिस्त करण्यात आले होते. अशा परिस्थितीत बसवेश्वरांनी लिंगायत धर्माची स्थापना करून स्त्री-पुरुष समतेचा पुरस्कार केला. अनुभव मंटपाच्या माध्यमातून स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे स्त्रिया चर्चा करायला आणि वचने रचायला व लिहायला शिकल्या. त्यांचा आत्मविश्वास वाढला. शतकानुशतकं मूक असलेली स्त्री लिहायला आणि वाचायला शिकली. बसवेश्वरांनी ज्ञानसाधनेचा, निर्मितीचा व प्रसाराचा अधिकार पुरुषांइतकाच स्त्रियांनाही आहे, असे मूल्य स्थापित केले. त्यामुळे बसवकल्याणच्या शिवाअनुभव मंटपमधील ३४ स्त्री कवयित्रींनी वचन साहित्यात आपले योगदान दिले. विशेष म्हणजे या स्त्रिया त्या काळात अत्यंत हीन समजल्या जाणाऱ्या अस्पृश्य जातीतून आलेल्या होत्या.
स्त्रियांच्या अस्पृश्यतेचे आणखी एक कारण म्हणजे त्यांचा विटाळ. या नैसर्गिक क्रियेला अपवित्र मानून तिला धार्मिक ग्रंथाचे वाचन, पठण, श्रवण यांपासून दूर ठेवले होते. या प्रथेला बसवेश्वर व त्यांच्या अनुयायांनी विरोध केला. त्यांनी आपल्या वचनातून समाजाला प्रश्न केला की, ‘विटाळाशिवाय पिंडाच्या स्थिरतेला आश्रय आहे का? विटाळामुळेच जीवन जन्माला येते, मग स्त्री अस्पृश्य कसे होऊ शकते? ज्या स्त्रीत्वामुळेच पुरुषांचा जन्म झाला, ती स्त्री अस्पृश्य कशी?’ बसवेश्वरांनी सर्व स्त्री-पुरुष सर्व काळ शुद्ध व पवित्र असतात असे म्हटले आहे.
बसवेश्वर आपल्या आर्थिक चिंतनात दासोहा संकल्पनेला महत्त्व देतात. महात्मा गांधींनी विश्वस्त किंवा ट्रस्टीशिप ही संकल्पना मांडली होती. त्यांच्या मते समाजातील श्रीमंतांनी आपल्या संपत्तीचा मालक न होता विश्वस्त व्हावे, म्हणजेच त्याचा सांभाळ करणारे व्हावे व स्वतःला जेवढी गरज आहे, तेवढीच संपत्ती स्वतःजवळ ठेवावी व इतर सर्व संपत्ती समाजाच्या कल्याणासाठी वापरावी. बसवेश्वरांची दासोह संकल्पना विश्वस्त संकल्पनेपेक्षा थोडी भिन्न आहे. बसवेश्वरांच्या मते समाजाच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलाची निर्मिती ही शोषणा विरहित पद्धतीने झाली पाहिजे. त्याचे वितरण समता व सामाजिक न्याय मूल्याप्रमाणे झाले पाहिजे.
दासोह संकल्पनेत दात्यामध्ये दानाची भावना असू नये, असे बसवेश्वर सांगतात. कारण दान देणे आणि घेणे हे दोघांचाही दृष्टीने वाईट आहे. ते दात्याला अहंकारी आणि याचकाला लाचार बनवते. म्हणून दासोह संकल्पनेत आपणास लागणारे गरजेपुरते धारण करणे आणि उरलेले धन शिवनिधीमध्ये अर्पण करणे, ज्या शिवनिधीचा वापर समाजातील गरीब गरजू लोकांच्या कल्याणासाठी होतो. दासोह संकल्पनेत बसवेश्वरांनी निसर्ग संकल्पनेचा विचार केलेला आहे. पृथ्वी, पाऊस, वारा, वनस्पती जेव्हा प्राणवायू निर्माण करतात, तेव्हा त्यांच्याकडे दात्यांचा अहंकार नसतो. आणि श्रमाच्या साह्याने या वस्तूंचा उपभोग घेताना श्रमिकांच्या मनामध्ये लज्जा किंवा याचना उत्पन्न होत नाही. या प्रक्रियेमध्ये ज्याप्रमाणे देणाऱ्याला देण्याची जाणीव नसते आणि घेणाऱ्याला उपकाराची भावना नसते, अशी भावना दासोह संकल्पनेत अभिप्रेत आहे.
प्रत्येक व्यक्तीला स्वावलंबी जीवन जगायचे असेल तर श्रमाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे बसवेश्वर सांगतात. बसवेश्वरांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ‘कायक वे कैलास’ हा मूलमंत्र सांगितला. श्रम हाच देव, श्रम हेच भक्ती, श्रम हेच मुक्ती, श्रम हेच स्वर्ग अशा प्रकारे श्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. कायक म्हणजे स्वेच्छेने स्वीकारलेले उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणारे शारीरिक श्रम होय. शारीरिक श्रम न करणारी व्यक्ती ही हीन दर्जाची असते व प्रामाणिकपणे शरीरश्रम करणारा माणूस समाज श्रेणीमध्ये सर्वोच्च स्थानावर गणला गेला पाहिजे. म्हणून बसवेश्वरांनी प्रामाणिक श्रम हाच कैलासाचा/ स्वर्ग प्राप्तीचा/ मुक्तीचा मार्ग होय, अशी घोषणा दिली. दुसऱ्याच्या श्रमावर जगणाऱ्यांना, दलाली करून आयुष्य घालवणाऱ्यांना, फसवणूक करून ऐतखाऊ जीवन जगणाऱ्यांना बसवेश्वरांनी अस्पृश्य ठरवले.
बसवेश्वरांच्या विचारामुळे कष्टकरी शूद्रांना प्रतिष्ठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. जातीचा व व्यवसायाचा कोणताही संबंध नाही व सर्व व्यवसाय श्रेष्ठच आहेत, हे मूल्य त्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला. कोणताही व्यवसाय करणाऱ्या माणसाला आर्थिक, सामाजिक, धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रात आपले विचार मांडण्याचा, लिहिण्याचा, त्यावर चर्चा करून प्रचार करण्याचा अधिकार आहे, असे सांगून अनुभव मंटपाच्या रूपाने विचारपीठ उपलब्ध करून दिले. त्यामुळे कष्टकरी, श्रमिक यांनी लिहिलेले जगातील पहिले वैचारिक साहित्य वचन साहित्याच्या रूपाने निर्माण झाले.
बसवेश्वरांनी तत्कालीन अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीतील लोकांना अभिव्यक्तीसाठी, चर्चा करण्यासाठी, एकत्र येण्यासाठी, प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ असावे म्हणून ‘अनुभव मंटप’ची स्थापना केली. ही संस्था जागतिक धर्म इतिहासातील अनन्यसाधारण संस्था होय. वेद, शास्त्र, आगम यांना लाथाडणारे बसवेश्वर सर्व काही अनुभवातूनच आले पाहिजे या ठाम मताचे होते. अनुभव मंटपाचे मुख्य सूत्र समता हेच होते. त्यात स्त्री-पुरुष समता पहिल्या क्रमांकावर होती. त्याच बरोबरच शूद्रातिशूद्रांना समान पातळीवर आणण्याचा मुख्य उद्देश होता.
अनुभव मंटपाचे पहिले अध्यक्ष अल्लमप्रभू होते. अनुभव मंटपात जे पुरुष येत, त्यांना ‘शरण’, तर स्त्रियांना ‘शरणी’ असे संबोधले जायचे. अनुभव मंटपात ७७७ सदस्य होते, त्यामध्ये ७७ स्त्रियांचा समावेश होता. वेगवेगळ्या जातीतील शरण या ठिकाणी जमत आणि विविध विषयावर चर्चा करत. ही चर्चा लयबद्ध गद्यातून होत असे. त्यालाच पुढे ‘वचन साहित्य’ असे संबोधले गेले. अनुभव मंटपातील चर्चेच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य करण्यात येत असे. या वचन साहित्यातून शरणांनी प्रबोधनरूपी विचार पेरले.
बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या अनुभव मंटपामुळे गरीब, वंचित, शोषित वर्गातील लोकांना एक विचारपीठ उपलब्ध झाले. त्यांना त्यांच्या भावना, विचार प्रकट करण्यास संधी मिळाली. स्त्रियांनासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने आपले विचार प्रकट करण्याची संधी मिळाली. थोडक्यात स्त्री व बहुजनांचे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य तत्कालीन समाज व्यवस्थेने हिरावून घेतले होते, ते त्यांना परत मिळवून देण्याचे महान कार्य बसवेश्वरांनी केले. अनुभव मंटपाच्या रूपाने बसवेश्वरांनी समाजाला एक लोकशाही व्यासपीठ उपलब्ध करून दिलं.
आजही समाजात अंधश्रद्धा, सामाजिक व धार्मिक भेदभाव, विषमता, जातीयता, लिंगभेद, वर्गभेद, दारिद्र्य, विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध, दैववादी वृत्ती, स्वार्थीपणा, ढोंगीपणा यामध्ये वाढच होत आहे. अशा परिस्थितीत बसवेश्वरांचे विचार प्रासंगिक ठरतात.
..................................................................................................................................................................
लेखक प्रा. डॉ. अर्जुन गंगाराम येरगे श्री संपतराव माने महाविद्यालयाच्या (खानापूर जि. सांगली) राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक आहेत.
arjunyerge@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment