अजूनकाही
१. विधानसभा निवडणुकीत भाजपची मुंबईतील ताकद वाढली आहे, याचे भान आणि ज्ञान शिवसेनेला आहे का? विधानसभा निवडणुकीत मुंबईतील निम्म्यापेक्षा अधिक प्रभागांमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत घाटकोपर ते मुलुंड दरम्यान शिवसेनेचे काही आमदार निवडून आले. मात्र या ठिकाणच्या २४ पैकी २१ प्रभागांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर आहे, याचे भान शिवसेनेला असायला हवे. : भाजपचे खासदार किरीट सोमय्या
मुंबईची जनता सगळे काँग्रेसचे खासदार निवडून पाठवते, तेव्हाही महापालिकेत युतीच्या हाती सत्ता सोपवते. वेगवेगळ्या निवडणुकांना लोक वेगवेगळ्या विषयांच्या आधारे मतदान करतात, याचं भान आणि ज्ञान सोमय्यांनी ठेवावं, ही अपेक्षा व्यर्थ आहे. ते सर्वज्ञ आहेत.
……………………………………………………
२. सीमेवरचे काही जवान समस्या मांडण्यासाठी समाज माध्यमांचा आधार घेत आहेत. याचा परिणाम सीमेवर तैनात शूर जवानांच्या मनोधैर्यावर होतो. जवानांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी इतर पर्याय आहेत. जवान त्यांचा वापर करू शकतात. यातूनही समाधान न झाल्यास जवान थेट माझ्याकडे तक्रार करू शकतात. : लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत
निदान आताच्या प्रकरणात तरी सोशल मीडियाचा मार्गच सगळ्यात प्रभावी असल्याचं दिसून आलेलं आहे. सैन्य शिस्तीवर चालतं, हे खरंच आहे; पण, सैन्य पोटावर चालतं, हे त्याहून अधिक खरं आहे. जवानांचं नीतीधैर्य आणि शारीरिक ताकद कदान्नाने अधिक खचते. रावत किंवा अन्य उच्चाधिकाऱ्यांनी, तक्रार करणाऱ्यांना कारवाईच्या धमक्या देण्याऐवजी, जवानांची अशी हेळसांड करणाऱ्यांना कठोर शिक्षा देऊ, असं म्हटलं असतं आणि तसं करून दाखवलं असतं, तर सीमेवरच्या जवानांचं नीतीधैर्य अधिक उंचावलं असतं.
……………………………………………………
३. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेली सायकल कोणाकडे राहणार, यावरून पिता मुलायम सिंह आणि पुत्र अखिलेश यादव यांच्यात संघर्ष सुरू असताना अखिलेश यांचा सावत्र भाऊ प्रतीक सिंह पाच कोटी रुपये किंमतीची लॅंबोर्गिनी कार घेऊन मौजमजा करताना सोशल मीडियावर झळकला आहे.
त्यात काय विशेष? सायकल जनतेसाठी आणि लँबॉर्गिनी, मर्सिडिझ, बीएमडब्ल्यू, रोल्सरॉइस, रेंजरोव्हर, पजेरो, मेबॅक, जॅग्वार अशा आलिशान गाड्या नेत्यांच्या कुटुंबियांसाठी ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. कार्यकर्त्यांनी वडापाव खाऊन लाठ्या काठ्या झेलायच्या असतात, राडे करायचे असतात; नेत्यांसाठी फाइव्ह स्टार हॉटेलांचे उंची सूट आजीवन बुक्ड असतात.
……………………………………………………
४. भारतीय जनता पक्षाने ९० टक्के जनतेला कंगाल केले आहे, तेव्हा या पक्षाने आता निवडणुकीत त्याच्या परिणामाला सामोरे जाण्यास तयार राहावे असा इशारा बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी दिला आहे.
तुमच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय काढायचा ताई? सात कोटींवरून सात वर्षांत १३० कोटींवर झेप घेणारा तुमचा भाऊ ९० टक्के माणसांमध्ये गणायचा की, त्याच्याकडे जमा असलेले पैसे ९० टक्के जनतेने वर्गणी काढून दिलेले आहेत, असं समजायचं?
……………………………………………………
५. मागील १५ वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने खोटी आश्वासने देऊन महापालिकेत सत्ता मिळवली. मात्र या दोन्ही पक्षांनी पुण्याचा कोणत्याही प्रकारे विकास केला नाही. पुणे शहरात पुष्कळ वेळा घड्याळे फिरली, हात फिरले, आता पुणे महापालिकेत कमळ फुलले पाहिजे. : भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन
फुलणार फुलणार, कमळच फुलणार. तुमच्या पक्षासकट सर्व पक्षांनी पुण्याचा असा काही चिखल करून ठेवलाय की, आता त्यात फक्त कमळच फुलू शकतं. आता बिनधास्त तुम्ही खोटी आश्वासनं द्या, पुणेकरांना सवय आहे!
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment