अजूनकाही
त्या दिवशी मुलाखत घेण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा खरे म्हटले तर मला धडकीच भरली होती. मुलाखत घेण्यासाठी वा पत्रकार परिषदेला जाताना असे सहसा कधी होत नाही. पत्रकार परिषद घेणारी एखादी व्यक्ती खवचट असते. एखादा अडचणीचा प्रश्न विचारला तर उत्तर देण्याऐवजी प्रश्नकर्त्याचा अपमान करण्याची तिची सवय असते. पण त्यामुळे पत्रकारांनी घाबरून जाण्याचे कारण नसते. त्या दिवशी मी ज्या व्यक्तीची मुलाखत घेणार होतो, त्या व्यक्तीच्या माझ्या आणि एकूण समाजमानसात असलेल्या प्रतिमेमुळे ही भीती निर्माण झाली होती. कारण युनिक फीचर्ससाठी मी ज्यांची मुलाखत घेण्यासाठी चाललो होती, ती व्यक्ती होती ज्येष्ठ अभिनेत्री ललिता पवार.
ही घटना असेल १९९२च्या दरम्यानची. आदल्या दिवशी मी ललिता पवार यांच्याशी फोनवर बोलून मुलाखतीची वेळ ठरवली होती. त्या वेळी बोलताना त्यांनी त्यांच्या घराचा पत्ता सांगितला होता. माझा फ्लॅट तळमजल्यावरच आहे, शोधायला अडचण पडणार नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले होते. त्यांच्याशी एव्हढे बोलूनसुद्धा माझी धाकधूक काही कमी झाली नव्हती.
मराठी-हिंदी चित्रपटात शेकडो म्हणजे जवळपास सातशे चित्रपटांत काम करून देशातील लोकामंध्ये आपली एक खास प्रतिमा निर्माण करणाऱ्या एका प्रतिभावंत अभिनेत्रीची मुलाखत मी घेणार होतो. खरे म्हणजे सिनेमे पाहणाऱ्या लाखो लोकांमध्ये असणारी त्यांची प्रतिमा हीच माझ्या मनात त्यांच्याविषयी भीती निर्माण होण्याचे कारण होते.
खलनायकांच्या भूमिका अगदी जीव ओतून करणाऱ्या जीवन, प्रेम चोप्रा, प्राण किंवा मदन पुरी यांसारख्या नटांनी ७०-८०-९०च्या दशकांत प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. विशेष म्हणजे हे खलनायक फक्त चित्रपटांतच नाही तर खऱ्या जीवनातही असेच वागत असतील असेच लोकांना वाटायचे, इतकी ते आपली भूमिका नैसर्गिकपणे वठवत असत. गब्बरची भूमिका करणारा अमजाद खान हा बहुदा हिंदी चित्रपटातला पहिला खलनायक असावा, ज्याच्याविषयी प्रेक्षकांमध्ये चीड वा संताप निर्माण होण्याऐवजी पसंतीची वा अनुकूल भावना निर्माण झाली.
मी आता भेटायला जाणाऱ्या ललिता पवार यांची जातकुळी प्रामुख्याने जीवन, प्रेम चोप्रा आणि प्राण यांच्यासारखी खलनायकी प्रवृत्तीची होती. मराठी आणि हिंदी चित्रपटांत त्यांनी कजाग सासूच्या वा इतर खलनायिकेच्या अनेक भूमिका वठवल्या होत्या.
अपघातामुळे एका डोळ्याची बदललेली ठेवण त्यांना या खलनायकी भूमिका करण्यास पूरक ठरली. रामानंद सागरांच्या ‘रामायण’ या मालिकेत त्यांनी कैकेयी राणीची दासी कुब्जा मंथराची भूमिका केली होती. तिने तर त्यांना घराघरांत नेले.
बॉक्स हिट ठरलेल्या अनेक हिंदी चित्रपटांत काम केलेल्या कलावंतांना छोटीशी भूमिका असूनही ‘शोले’ या लोकप्रिय चित्रपटाने आणि ‘रामायण’ या मालिकेने अक्षरश चिरस्मरणीय बनवले. रामायणाबाबतच बोलायचे झाल्यास कौसल्या राणीची भूमिका करणाऱ्या जयश्री गडकर, कैकेयीची भूमिका करणाऱ्या पद्मा खन्ना वा अभिमन्यूची पत्नी उत्तराची भूमिका साकारणाऱ्या वर्षा उसगावकर यांचे उदाहरण देता येईल.
तर आता मंथरासारख्या कजाग, दुष्ट प्रवृत्तीची प्रतिमा असणाऱ्या व्यक्तीच्या म्हणजे ललिता पवारांच्या घरी मी चाललो होतो. माझ्या मनाची धाकधूक होण्याचे ते कारण होते.
तळमजल्याच्या त्यांच्या फ्लॅटची बेल वाजवली, तेव्हा सकाळ अकरा किंवा साडेअकराचा सुमार असावा. काही क्षणांतच ललिता पवार यांनीच दार उघडले. मी पाहतच राहिलो. कित्येक चित्रपटांत पाहिले अगदी तसेच व्यक्तिमत्त्व. तो अर्धवट झाकलेला डोळा, पदर ओढून घेण्याची खास लकब आणि हालचालीत तो नेहमीचा चपळपणा. माझे स्वागत करून, बसायला सांगून त्या लगबगीने आता गेल्या आणि थंड लिंबू सरबत घेऊन आल्या. बहुधा तो मार्च वा एप्रिल महिना असावा. तेवढ्यात मी त्या वन बेडरूम फ्लॅटचे निरीक्षण करून घेतले होते. हॉलमध्ये मोजकेच आणि साधेच फर्निचर होते. मुंबईहून त्यांनी अलिकडेच पुण्याला आपला मुक्काम हलवला होत्या. या फ्लॅटमध्ये त्या एकट्याच राहत होत्या.
सरबताचा आस्वाद घेताना माझी भीड चेपली होती. मला पहिला धक्का बसला, जेव्हा त्यांनी मला थेट ‘अरेतुरे’ करून बोलायला सुरुवात केली. मी नुकतीच तिशी ओलांडली असली आणि ललिताजींनी ऐंशी पार केली असली तरी मी एक पत्रकार म्हणून असे एकदम ‘अरेतुरे’चे संबोधन मला नक्कीच अपेक्षित नव्हते. नंतर लक्षात आले की, एक ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गजांना त्या त्यांच्यावर कॅमेरा रोखलेला नसताना अशी ‘अरेतुरे’च करत असणार.
मुलाखतीसाठी बॅगमधून मी नोटपॅड काढले, तसे त्या आपल्याविषयी, आपल्या चित्रपट कारकिर्दीविषयी भरभरून बोलू लागल्या. आमच्या संभाषणाने मुलाखतीचे औपचारिक स्वरूप घेण्याआधीच स्वयंपाकघरात जाऊन चकल्या, लाडू, शेव असलेली एक गच्च भरलेली प्लेट त्यांनी माझ्यासमोर ठेवली होती. पुण्यात डेक्कन जिमखान्यावर बॅचलर म्हणून मंथली कॉट बेसिसवर राहत असल्याने ललिताजींचा हा पाहुणचार सुखावणारा होता. माझ्या मनात साठलेल्या एका खाष्ट, खडूस व्यक्तीची प्रतिमा या भेटीने बदलत होती.
जवळजवळ एक तास लांबलेल्या या मुलाखतीत ललितादींनी चित्रपटक्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीतील अनेक आठवणी जागवल्या. आपल्या सात दशकांच्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी तब्बल सातशे चित्रपटांत नायिका आणि नंतर चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले होते.
मी चित्रपट समीक्षक म्हणून कधी लिहिले नव्हते; चित्रपटांविषयीही मला विशेष माहितीही नव्हती. मात्र या मुलाखतीत ललितादींनी राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’, ‘अनाडी’ या चित्रपटांत काम करताना आलेले अनेक अनुभव सांगितले. ‘श्री ४२०’मध्ये बेघर असलेल्या राज कपूरवर माया करणाऱ्या केळेवाली गंगामाईच्या भूमिकेसाठी साजेलशी नऊवारी साडी मिळवण्यासाठी आपण किती हिंडलो, हे त्यांनी मला सांगितले.
मुलाखत चालू असताना समोरच्या प्लेटमध्ये असलेले लाडू, चकली आणि इतर खाद्यपदार्थ मी संपवावे असा त्यांचा आग्रह चालूच होता. ‘अरे, मी स्वतः सगळे बनवले आहेत. लाजू नकोस.’, ‘अरे, तरुण आहेस तू. टाक खाऊन सगळे.’ असे सारख्या त्या म्हणत होत्या.
पत्रकारितेच्या कारकिर्दीत ‘अरे, तरुण आहेस तू, टाक खाऊन सगळे’ असे दोन व्हीआयपी व्यक्तींनी मला उद्देशून म्हटलेली वाक्ये माझ्या कायम स्मरणात आहेत. ऐंशीच्या दशकात गोव्यात आपल्या सत्तरी येथील बंगल्यात आम्हा पत्रकारांचा पाहुणचार करणारे मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे आणि पुण्यातील लोहगाव विमानतळावर व्हीआयपी केबिनमध्ये मला चहा-बिस्कीटांचा आग्रह करणारे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह. चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्ती असलेल्या ललिता पवार यांच्याकडूनही मला असाच स्मरणीय पाहुणचार लाभला.
मुलाखत संपवून मी त्यांचा निरोप घेतला, तेव्हा ललिता पवार यांच्याविषयीची माझ्या मनातली आधीची नकारात्मक प्रतिमा साफ बदलली होती. ‘रामायणा’तल्या कुब्जा मंथराची प्रतिमा जाऊन तेथे आता ‘श्री ४२०’मधली मायाळू केळेवाली गंगामाईची प्रतिमा बसली होती!
..................................................................................................................................................................
लेखक कामिल पारखे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
camilparkhe@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment