पत्रकाराचीही, चूक ती चूकच!  
पडघम - माध्यमनामा
प्रवीण बर्दापूरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 25 April 2020
  • पडघम माध्यमनामा अविनाश पांडे Avinash Pandey श्रीकांत जिचकार Shrikant Jichkar काँग्रेस Congress संघ RSS

सध्या एका पत्रकारानं केली\न केलेली चूक आणि एका पत्रकारितेच्या नावाखाली भाटगिरी करणारावर झालेला हल्ला चर्चेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांनी ‘अक्षरनामा’वर ‘पत्रकारितेतील ‘त्या’ अनुचित आणि सहज टाळता येण्यासारख्या घटनेचा सल आजही माझ्या मनात आहे!’ या लेखात त्यांच्या एका चुकीची कबुली दिली आहे. त्यावरून मला माझ्या पत्रकारितेच्या सुरुवातीच्या दिवसातील एका धडा आणि एक चूक आठवली. प्रदीर्घ पत्रकारितेत कधी तोंडघशी पडण्याचा प्रसंग घडला नाही का, एखादी बातमी दिल्याचा पश्चात्ताप झाला का, अशी विचारणा अनेक तरुण पत्रकार तसेच वाचक करतात. अशा घटना म्हणा की चुका, जाणते-अजाणतेपणी पत्रकाराच्या आयुष्यात घडतच असतात.

तोंडघशी पडण्याचा अनुभव पत्रकारितेत आजवर एकदाच आला. पदोन्नती मिळाली तरी आपल्या बीटमधील स्त्रोत तोडून टाकू नये, तसेच ज्या विचारांशी एखाद्या वार्ताहराची भावनिक बांधिलकी आहे, त्याला त्या बीटमध्ये टाकू नये. कारण तो तटस्थ राहू शकत नाही, असे सीनिअर्स नेहमी सांगत त्याचा प्रत्यय आणून देणारी ती घटना आहे. 

‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचा मुख्य वार्ताहर होण्याआधी राजकीय वार्ताहर म्हणून काम करतानाच वर्षानुवर्षे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हे बीट मी बघत असे. मुख्य वार्ताहर झाल्यावर त्या बीटवर काम करायला मिळावे, असा आग्रह एका सहकार्‍याने धरला. संघाचा तो निष्ठावंत स्वयंसेवक होता, आजही आहे. त्याच्या स्वभावातील लाघवीपणा आणि कामाची धडाडी बघून संघ बीट त्याच्याकडे सोपवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक निवृत्त होण्याची परंपरा तेव्हा नव्हती. संघाच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक नागपुरात चालू असताना विशेष काही घडत तर नाहीये ना, असे मी वारंवार त्या वार्ताहराला विचारत असे. पण, सर्वज्ञाच्या आवेशात ‘विशेष काहीच नाही’, असा त्याचा दावा असे.

अशाच एका दुपारी ‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक अरुण टिकेकर यांचा मुंबईहून फोन आला. बाळासाहेब देवरसांनी निवृत्ती घेऊन सरसंघचालकपदी रज्जूभैयांची नियुक्ती केल्याची बातमी त्यांनी दिली आणि नागपूरच्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात मी अक्षरश: गारठलो. मुंबईपर्यंत जी बातमी पोहोचते, ती आपल्याला कळत नाही, यातून झालेलं ते गारठलेपण होतं. तरीही आमचा हा वार्ताहर गडी मात्र ते मान्य करायला तयारच नव्हता. थोड्याच वेळेत वृत्तसंस्थांनीही ती बातमी प्रसारित केली. या घटनेनं तोंडघशी पडण्याच्या दु:खासोबतच पत्रकार म्हणून आपण कधीच गाफील राहायला नको, हा धडा मी शिकलो.

बातमी देताना कळत नकळत का होईना चूक झाल्याने पश्चात्तापाची वेळ येण्याचा संबंध डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या गटाशी आहे. नागपूरच्या राजकारणात श्रीकांत जिचकार यांचे नेतृत्व प्रस्थापित होत असल्याचा तो काळ होता. गव्हाळ वर्ण असलेले आकर्षक व्यक्तिमत्त्व, अनेक पदव्या आणि तरीही नवनव्या परीक्षा देण्याची प्रचंड हौस तसेच उत्कृष्ट वक्तृत्व, यामुळे १९८० ते ९०  या दशकाचा प्रारंभ डॉ. श्रीकांत जिचकार आणि त्यांचे मित्रमंडळ नागपूरच्या केवळ राजकीय वर्तुळातच नाही, तर समाजाच्या सर्वच क्षेत्रात चर्चेचा विषय होते. राजकारणी म्हणून श्रीकांत जिचकार यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी कार्यकर्त्यांचा स्वत:चा संच तयार केला आणि तोही विद्यार्थ्यातून. या कार्यकर्त्यांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत; त्यांना धर्म, अर्थकारणही कळले पाहिजे, असा जिचकारांचा आग्रह असे. त्यासाठी ते नियमित ‘वर्ग’ही घेत असत. कार्यकर्त्यांची अशी शिस्तबद्ध फौज निर्माण करणारे जिचकार हे त्या काळातील काँग्रेसचे एकमेव नेते होते.

संयुक्त महाराष्ट्राची आग्रही भूमिका हा आम्हा दोघांतला समान दुवा होता. श्रीकांत जिचकार यांच्यासोबत तेव्हा अविनाश पांडे, अंबादास मोहिते, राज्य मंत्रिमंडळात एकेकाळी राज्यमंत्री आणि आता भाजपत असलेले डॉ. सुनील देशमुख, रमेश गिरडे, आता शिवसेनेत असलेले शेखर सावरबांधे आणि राज्य मंत्रिमंडळातील बदनाम मंत्री अनीस अहमद, अशी कार्यकर्त्यांची भलीमोठी फौज होती. एकेकाळी  बदनामीच्या शिखरावर असलेला अनीस अहमद तेव्हा मात्र एक अतिशय सालस मुलगा होता. नंतर बहुधा सत्तेने त्याला बदनामीच्या आणि वादग्रस्ततेच्या वाटेवर नेले असावे. मात्र, ही कथा अनीस अहमदची नसून अविनाश पांडेची आहे.

राजकारणात नुकताच प्रवेश घेतलेले राजीव गांधी या अधिवेशनाच्या निमित्ताने प्रथमच महाराष्ट्रात आले. राजबिंडं रूप, महत्त्वाचे म्हणजे राजकारणाला न शोभेसा निरागस चेहरा असणारे आणि स्वभावात कमालीची ऋजुता असणारे आणि विलास मुत्तेमवारांच्या विना वातानुकुलित अॅम्बेसेडरमधून नागपुरात फिरणारे राजीव गांधी जवळून बघता आले, ते याच काळात. एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेचे गाजलेले अधिवेशन याच काळातले. एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी नागपूरभर धुडगूस घातल्याने हे अधिवेशन चांगलेच गाजले.

नागपूरच्या राजकारणात तेव्हा एकूणच तरुणांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि या तरुणांना राजकारणात चांगल्या संधी मिळाव्यात, असाच प्रयत्न ज्येष्ठांकडूनही  सुरू होता. विलास मुत्तेमवार, रणजित देशमुख, सतीश चतुर्वेदी वगैरे काँग्रेसी नेतृत्व आकाराला येण्याचा तो काळ होता. विलास मुत्तेमवार खासदार, तर रणजित देशमुख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले होते. एनएसयूआयच्या अधिवेशनाच्याही काही छानशा आठवणीही आहेत.

संजय गांधींचे कट्टर समर्थक असलेले आणि थेट दिल्लीतूनच उमेदवारी मिळवलेले सतीश चतुर्वेदी, तेव्हा पहिल्यांदाच पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आणि अंतुलेंच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीही होते. नंतरच्या निवडणुकीत संजय गांधींचे भक्त असलेल्या सतीश चतुर्वेदींची उमेदवारी कापण्यात आणि त्या विधानसभा मतदारसंघात अविनाश पांडेची वर्णी लावण्यात श्रीकांत जिचकारांनी यश मिळवले. सतीश चतुर्वेदींनी बंडखोरी करूनही अविनाश पांडे विजयी झाले. वैभवसंपन्न कौटुंबिक पार्श्‍वभूमी असणारा आणि अतिशय सुसंस्कृत, अशी अविनाशची प्रतिमा त्या काळात निर्माण झालेली होती. राजकारणातलं त्याचं भवितव्यही उज्ज्वल असल्याचे संकेत मिळत होते. पुढील फेरबदलात त्याला मंत्रिमंडळात संधी मिळणार असं जिचकार सांगू लागले आणि नेमकं याच काळात अविनाश एका नको त्या वादात सापडला.

नागपुरात सुरू होणार्‍या एका स्पोर्टस क्लबच्या मद्य परवाना मान्यतेच्या प्रश्‍नावरून, त्याची आणि नागपूरच्या तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांची वादावादी झाली. त्या दोघांमध्ये मारामारीही झाल्याची चर्चा होती. मात्र ही बातमी खरे तर थोडीशी उशिराच ‘फुटली’! कर्मचारी संघटनेचा एक नेता असणार्‍याने त्यात मोलाची भूमिका बजावली. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लिखाण करणारे पत्रकार साधारणपणे बर्‍यापैकी लोकप्रिय असतात. त्या काळी नागपुरात पत्रकारांच्या या गटात मोडणारी जी काही नावे होती, त्यापैकी मी एक होतो. एका आमदाराने एका आयएएस अधिकार्‍याला मारहाण केल्याची बातमी स्वाभाविकच खळबळजनक आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नव्हती. मात्र, पत्रकारितेतला अल्पानुभव आणि वय यामुळे ही बातमी पुढे ताणून धरणार्‍यांसोबत मीही वाहवत गेलो, यात शंकाच नाही .

‘तरुण भारत’सोबतच ‘लोकसत्ता’तही ही बातमी स्वाभाविकपणे पहिल्या पानावर प्रकाशित झाली. अन्य वृत्तपत्रांमध्येही या बातमीला मोठी जागा मिळाली. पुढे बातमी रंगवण्याच्या नादात या बातमीला जातीय तसेच धार्मिक रंगही दिले जात आहेत, हे जसे तेव्हा लक्षात आले नाही, तसेच या बातमीचा वापर काँग्रेसच्या राजकारणातून अविनाशचा काटा काढण्यासाठी कसा पद्धतशीरपणे केला जात आहे, हेही लक्षात आले नाही. अविनाश पांडेनी त्या आयएएस अधिकार्‍याला न केलेली मारहाण किंवा त्याची न पकडलेली गचांडी, यामुळे काँगेसची प्रतिमा कशी मलीन झालेली आहे आणि अविनाश पांडे हा कुणी रस्त्यावरचा मवालीच असल्याचे चित्र त्या काळात प्रसिद्धी माध्यमातून रंगवले गेले.

या सर्व बातम्यांची हिंदी आणि इंग्रजीत भाषांतरे करून ती दिल्लीला पाठवण्याची सोय करण्यात आली. काँग्रेसमध्ये अशा पद्धतीने एखाद्या कार्यकर्त्याविरुद्ध मोहीम चालवण्याची प्रथा जशी आज आहे, तशी ती तेव्हाही होती. काँग्रेसची सर्व सूत्रे ज्यांच्याकडे असतात, त्यांना ‘हायकमांड’ म्हटले जाते. हायकमांडमध्ये असलेले जे कोणी नेते आहेत – म्हणजे, पक्षाध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या प्रभारी पक्षाध्यक्षांचे दृश्य आणि अदृश्य सल्लागार; ही मंडळी दिल्लीत आणि त्यांना मराठी कळणे शक्यच नसल्याने मराठीत प्रकाशित झालेल्या बातम्या प्रामुख्याने इंग्रजीतच भाषांतर करून तो तर्जुमा मूळ बातमीच्या कात्रणासह या पक्षश्रेष्ठी नावाच्या काँग्रेस नेत्यांना पाठवण्याची पद्धत तेव्हा होती; आजही आहे. त्याप्रमाणे अविनाश पांडेनी केलेल्या त्या कृत्याची भरपूर गार्‍हाणी, प्रसिद्ध करवून घेतलेल्या बातम्यांची भाषांतरे हायकमांडला पाठवून करण्यात आली. यथावकाश पुढच्या विधानसभा निवडणुकीत अविनाश पांडे यांची उमेदवारी कापण्यात या गोष्टींचे भांडवल करणार्‍या त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना यश आले. अविनाशच्या छोट्याशा चुकीचा गवगवा नंतरच्या काळातही मोठ्या प्रमाणात ‘करवला’ गेला आणि निवडणुकीच्या राजकारणात त्यानंतर अविनाशला प्रदीर्घ काळ प्रवेशच करता आला नाही.

दरम्यानच्या काळात हे सनदी अधिकारी विविध ठिकाणी काम करत असताना त्यांच्या ‘तिरसिंगराव’ वर्तणुकीचे फटके अनेकांना बसले. त्यांचे प्रशासकीय वर्तनही पूर्वग्रहदूषित, अतिशय हेकट, तसेच उर्मट असायचे आणि विशिष्ट लोकांनाच पाठीशी घालण्याची त्यांची भूमिका दूधखुळ्या माणसाच्याही सहज लक्षात यावी, इतकी लख्ख असायची. अनेक प्रकरणात ते वादग्रस्तही ठरले. त्यासंबंधी अनेक बातम्याही प्रकाशित झाल्या. त्यांच्या वादग्रस्त प्रकरणांची संख्या जसजशी वाढत गेली, तसतसे त्यांच्यात आणि अविनाशमध्ये झालेल्या वादावादीला आपण अननुभवामुळे विनाकारण अति रंगवले. वादावादी झाली, मारामारी नाही. वादावादीसाठी त्या अधिकार्‍याचा हेकट स्वभाव कारणीभूत होता, ही अविनाशची बाजू तेव्हा लक्षातच घेतली नाही. ज्येष्ठ पत्रकार सर्वच काही खरे सांगत नाहीत, दुसरी बाजू समजावून घेण्याची जबाबदारी आपली आहे, हे माझे भानच जणू काही हरवले होते.

चांगल्या माणसाचे राजकीय करिअर संपुष्टात आणणार्‍यांच्या टोळीत आपण नकळत का असेना होतो, अशी बोच मला आजही आहे. एका अर्थाने हे एक कन्फेशनच आहे.

निवडणुकीच्या राजकारणातून जरी अविनाशला बाहेर पडावे लागले, तरी श्रीकांत जिचकार यांच्यासारखा गॉडफादर असल्यामुळे संघटनेच्या पातळीवर मात्र त्याने नंतरच्या काळात अनेक मोठमोठी पदे भूषवली. काँग्रेस पक्षात राष्ट्रीय पातळीवरही पदाधिकारी म्हणून त्याच्यावर अनेक जबाबदार्‍या टाकण्यात आल्या आणि त्या त्याने अतिशय समर्थपणे पेलल्याही. मध्यंतरीच्या काळात राज्यात महामंडळांच्या नियुक्त्यांतही त्याला सन्मानजनक वागणूक मिळाली आणि ती त्याने चांगली पेललीही. त्याला राज्यसभेचे सदस्यत्वही एका टर्मसाठी मिळाले. हे सगळे खरे असले, तरी राज्याच्या राजकारणातून एक चांगला कार्यकर्ता काही काळासाठी बाहेर फेकला गेला, तो गेलाच!

अविनाश पांडे या काँग्रेसच्या युवक नेत्यावर, पत्रकार म्हणून नकळत झालेल्या चुकीची कबुली देणारा ‘डायरी’ या ‘लोकसत्ता’तील माझ्या सदराचा मजकूर ज्या दिवशी प्रकाशित झाला, त्याच दिवशी अविनाशची अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीवर निवड झाली. खरे तर, कावळा बसून फांदी मोडायला एकच गाठ पडावी, असा तो एक निव्वळ योगायोग होता, पण अनेकांना तो काव्यगत न्याय वाटला.

अविनाश पांडेविरुद्ध त्या काळात जी मोहीम चालवली गेली, त्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात दमदारपणे पाय रोवू पाहणारा श्रीकांत जिचकार यांचा गट कसा मागे फेकला गेला, अशा कार्यकर्त्यांची संख्या किती मोठी आहे, हे कन्फेशनला ‘चांदा ते बांदा’ या टप्प्यांतून वेगवेगळ्या लोकांनी दिलेल्या प्रतिसादातून स्पष्ट झाले आणि पत्रकार म्हणून आपण किती जबाबदारीने लेखन केले पाहिजे, याची जाणीव पुन्हा एकदा झाली. नागपूरच्या काही पत्रकारांनी केवळ आवेशापोटी जी काही भूमिका त्या काळात घेतली, त्यामुळे उमद्या कार्यकर्त्यांची एक मोठी फळी राजकारणाच्या पटलावरून कायमची बाहेर फेकली गेली, याची खंतही अधिक तीव्र झाली.

कोणताही हेकटपणा न करता, अभिनिवेश ना बाळगता, पत्रकारांनी आपली चूक प्रामाणिकपणे मान्य केली तर वाचकांना ते अधिक भावते, हा अनुभव मला हा मजकूर प्रकाशित झाल्यावर आला. शेकडो एसेमेस आणि शेकडो फोन आले, अविनाश पांडेही पुष्पगुच्छ घेऊन भेटायला आला आणि ‘जाने दो भैय्या’ म्हणत त्यानं गळाभेट घेतली, तो क्षण भारावून टाकणारा होता.  

म्हणूनच, राजीव खांडेकर, राहुल कुलकर्णी आणि एबीपी माझा या प्रकाश वृत्तवाहिनीने ‘रेल्वे सुरू होण्याची बातमी चालवण्यात आम्ही कांगल घाई केली’, हे मान्य केलं असतं तर ते ‘हिरो’ झाले असते आणि फार मोठ्या टीकेचे धनी झाले नसते.

असो.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......