‘तुडवण’ : ग्रामीण सुशिक्षित बेरोजगारांची सोनोग्राफी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शंकर विभुते
  • ‘तुडवण’चे मुखपृष्ठ
  • Fri , 24 April 2020
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस तुडवण Tudavan कैलास दौंड Kailas Daund

कैलास दौंड ‘पाणधुई’, ‘कापूसकाळ’ या कादंबऱ्यांनंतर ‘तुडवण’च्या निमित्ताने पुन्हा वाचकांसमोर आले आहेत. दोनशे पंचेचाळीस पानांच्या अवकाशात सामावलेली ही कलाकृती आकृतीबंधाच्या विविध छटांना स्पर्श करते.

गोडजळगाव खेड्यातला नवनाथ सावंत नावाचा एक शेतकरी. त्याला नारायण व यमुना ही दोन मुले. अतिशय कमी असलेल्या कोरडवाहू शेतीत कष्ट करून तो आपला उदरनिर्वाह भागवतो, पण आपल्यावर आलेली संकटे मुलांवर येऊ नयेत म्हणून दोघांनाही शिकवतो. गरिबीमुळे मुलीचं शिक्षण दहावीनंतर बंद करावं लागतं. मुलगा नारायण मात्र प्राथमिक शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता पूर्ण करतो. पण वाढत्या लोकसंख्येमुळे व उपलब्ध नोकरीच्या कमी संधीमुळे डी.एड.सोबतच पात्रता चाचणी परीक्षा अनिवार्य केली जाते. त्यात नारायण अनुत्तीर्ण होतो. कुटुंबाला आर्थिक मदत करावी म्हणून तो टेम्पोवर कापूस भरण्यासाठी जातो, चंदन लाकूड चोरून विकतो, मोठ्या वाहनावर ड्रायव्हर साहाय्यक म्हणून काम करतो आणि शेवटी शेती विकून एखादी टेम्पो घेऊन जगण्यासाठी धडपडतो. पण सगळीकडे हाती निराशाच येते. गावातील एका जुन्या विहिरीचा गाळ काढताना त्याचा अपघातानं दुर्दैवी अंत होतो.

ही कथा कमी-जास्त स्वरूपात सगळीकडे, खेड्यापाड्यात, आजूबाजूला आपणास सतत पाहावयास मिळते. त्यामुळे त्यात काही नवीन नाही. पण ही कादंबरी कथा वाचकासमोर ठेवून थांबत नाही, तर ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांची चिरफाड करते. त्यातील सूक्ष्म निरीक्षण समोर ठेवून कोरडवाहू शेती शेतकऱ्याला विकू देत नाही आणि जगू देत नाही, या महत्त्वपूर्ण निष्कर्षाला आणून सोडते.

नारायण नवनाथ सावंत हा या कादंबरीतला मुख्य नायक. पण आपण समजतो तसा तो ‘नायक’ नाही. त्याला आपण खेड्यातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रतिनिधी मानूया. कारण तो आपल्या कल्पनेतील बुद्धिमान नायक असता तर टीईटी परीक्षा पास झाला असता, बुलेट गाडी घेताना, शेती विकत घेताना फसला नसता. नीतिमान राहिला असता, तर चंदन लाकूड चोरून विकण्याच्या व्यवसायात सहभागी झाला नसता. या सगळ्या कल्पना चित्रपटात चांगल्या वाटतात. वास्तवात ग्रामीण भागात नारायणसारखे अनेक सुशिक्षित बेरोजगार आपल्याला दिसतात. म्हणून परंपरेने चालत आलेल्या चित्रपटासारखी ही कादंबरी आशावाद निर्माण करत नाही.  

या कादंबरीत नवनाथ, राधाक्का, नारायण, यमुना, नागेश तोडकर, अंकुश, मुकादम हरिभाऊ, इक्रम  राहुल्या, बाल्या, तुकाराम, सुदाम, रुपली, सुभाष, शरद अशी अनेक पात्रे येतात. ही सगळी पात्रे आपल्या आयुष्यात आलेली संकटे सहन करत जगतात. यातील काही दयाळू आहेत, तर काही बेरकी. काही निष्पाप आहेत, तर काही चतुर. काही अहोरात्र कष्ट करणारी आहेत, तर काही फुकट खात बसणारी. परंतु या सगळ्या पात्रात एक समानता आहे. ती म्हणजे या कोणत्याही पात्रात  अमानवी शक्ती, दैवी शक्ती नाही तर सहज आजूबाजूला दिसणारी प्रवृत्ती आहे.

नवनाथ सावंतला वाटते शेती विकणे पाप आहे. मुलगा शिकवून काही उपयोग झाला नाही. तो दिवस-रात्र कष्ट करतो. कर्ज न काढता मुलीचे लग्न करतो. शेवटी जेव्हा त्याच्या भावनांना ठेच पोहोचते, तेव्हा तो घर सोडून निघून जातो. त्याचं काय झालं ते कुणालाच कळत नाही. राधाक्का नारायणची आई. नारायण तिला अक्का व वडिलांना तात्या म्हणतो. राधाक्का खूप मेहनती. सतत कामात गुंतून राहते. मुलीला घेऊन अहोरात्र शेतात कष्ट करते. मुलगा काम करत नाही, ऐकत नाही याचा तिलाही राग येतो, पण तिचं मन हळवं. ती कळत-नकळत मुलाला मदत करते. कादंबरीच्या शेवटी शेवटी तर तिला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. शेती जाते, नवरा घर सोडून निघून जातो, मुलगा मरून जातो, सून माहेरी निघून जाते. भविष्यात नातवाला (नारायणचा मुलगा प्रकाश) उभं करण्यासाठी त्याला घेऊन ती पुण्याला जाण्यासाठी घराबाहेर पडते.

कादंबरीचं मुख्य पात्र आहे नारायण सावंत. शिक्षण घेतलेला, पण टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण झालेला हा तरुण. तो नोकरीसाठी खूप प्रयत्न करतो, खाजगी संस्थेत मुलाखत देतो, संस्थेवाले नोकरीत घेण्यासाठी त्याला डोनेशन मागतात. त्यासाठी त्याला शेती विकाविशी वाटते. पण शेती विकण्याचा विषय घरी निघताच प्रचंड शिव्या मिळतात. गावातील इतर मुलांप्रमाणे तो रिकामटेकडा फिरत नाही. त्याला काहीतरी काम करावंसं वाटतं. म्हणून गावातील काही मित्रांच्या मदतीने टेम्पोमध्ये कापूस भरण्याच्या मजुरीवर जातो. ते काम संपतं. त्यानंतर तो गावातील एका माणसाच्या मदतीनं चंदन लाकूड चोरून विकण्याच्या व्यवसायात मदत करतो.

नंतर उल्हासनगर येथे एका ट्रकवर ड्रायव्हर साहाय्यक म्हणून काम करतो. वडापाव खाऊन दिवस काढतो. आपल्या भावनांचा विचार न करता बहिणीच्या नवऱ्याने म्हणजेच तुकारामने सांगितलेल्या मुलीसोबत लग्न करतो. पण संसारसुख फार मिळत नाही, तिला सोडून परत शहरात एक वर्षे काढतो. शेवटी आईच्या मदतीने शेती विकून टेम्पो घेण्याचा विचार करतो. शेती विकली जाते, पण मोबदल्यात मिळालेल्या पैशाचा योग्य विल्हेवाट लागत नाही, उलट वडील घरातून निघून जातात, तर हा विहिरीचं काम करताना स्वतःचा जीव गमावतो. गावातील बेरकी सरपंच, पैसावर डोळा असलेला शेटजी, मेव्हण्याला लुटणारा तुकाराम, मित्रप्रेम मदत करणारे रावश्या, बाल्या, सुदाम्या, अंकुश अशी अनेक पात्रे आपापल्या प्रकृतीधर्माप्रमाणे वर्तन करताना दिसून येतात.

या कादंबरीचं सगळ्यात महत्त्वाचं बलस्थान तिच्या भाषाशैलीत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड, पाथर्डी, शेवगाव आणि बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा, शिरूर कासार, गेवराई परिसरातील बोलल्या जाणाऱ्या नागरी बोलींमुळे ही कादंबरी पकड घेते. बोलीभाषेतील शब्दसंपत्ती, म्हणी, वाक्प्रचार, प्रतिमा यामुळे भाषिक सौंदर्य वाढले आहे. आयचचं, आघाप, आरदूळ, ईरवाळी, इसाब, करडांना, तरट, कन्हर, दुण्या, मपलं, बाटुक, पव्हरी, वसका, वारली, रोख, माळवं बिट्या, डंगाळ्या... यासारखे असंख्य शब्द या कादंबरीत येतात.

यासोबतच स्वप्नातून झोपडपट्टीला लागलेली आग आणि त्यासाठी होत जाणारे गढूळ राजकारण, वृत्तपत्रीय जाहिरात कात्रण, मुलाखतीचा नमुना, लग्नातील जागरण, यासारख्या भाषिक संरचनेची मोडतोड करून कादंबरी प्रयोगशीलतेकडे वाटचाल करते आहे.

कादंबरीच्या बलस्थाना सोबतच काही कळत-नकळत मर्यादा लेखकांच्या हातून झालेल्या दिसून येतात. उदा. नारायण कमावलेल्या पैशातून बहिणीला कपडे न घेता तो मोबाईल विकत घेतो. त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनते. हा प्रसंग कादंबरीत दोन ठिकाणी आलेला आहे. पान १०९ व ११७वर. त्यामुळे वाचक काही काळ संभ्रमात पडतो. नारायण सुशिक्षित असूनही चाळीस हजाराची गाडी विकत घेताना कोणतीच कागदपत्रे तपासून घेत नाही, शेती विकत घेतल्यावर जरी  नातेवाईकाची वारस म्हणून नोंद असली तरी संपूर्ण निकाल त्यांच्याच बाजूने लावून शेती जाणे, हे  फारसं पटत नाही. अर्थात याला काही मर्यादा किंवा कादंबरीचे उणीवा म्हणता येत नाहीत, त्यामध्ये बदल करणे लेखकाला सहज शक्य होते, असे वाटून जाते.

ग्रामीण भागातील शिक्षकांच्या बेरोजगारांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. एकीकडे नोकरी लागत नाही, दुसरीकडे शेतीचे काम येत नाही. अशा परिस्थितीत तरुणांची अवस्था ‘धोबी का कुत्ता घर का ना घाट का’ अशी झाली आहे. अशा तरुणाची मनाची घालमेल शब्दांत पकडणं अत्यंत कठीण बाब आहे. त्यातही बोलीभाषा मृत पावत असताना त्या बोलीभाषेतच समकालीन वर्तमान उतरवून मांडणं नक्कीच कौतुकास्पद आहे. या बाबतीत लेखकाला कमालीचे यश प्राप्त झाले आहे.

..................................................................................................................................................................

‘तुडवण’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5176/Tudawan

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......