बाळासाहेब पवार : तेव्हा राजकारणी माणसं घडवत!
ग्रंथनामा - आगामी
प्रवीण बर्दापूरकर 
  • बाळासाहेब पवार
  • Fri , 24 April 2020
  • ग्रंथनामा Granthnama आगामी बाळासाहेब पवार Balasaheb Pawar काँग्रेस Congress

बाळासाहेब पवार हे मराठवाड्यातील काँग्रेसचे एकेकाळचे दिग्गज नेते. असे दूरदृष्टीचे नेते एकेकाळी राजकारणात होते, म्हणून आमची आणि नंतरच्या पिढ्या शिकल्या, धन आणि नावलौकिक कमावत्या झाल्या. एकजात सर्व राजकारणी भ्रष्ट, बेफिकीर, स्वार्थी नाहीत, अशी  माझी धारणा का आहे, ते स्पष्ट करणारा हा लेख. पत्रकार अच्युत भोसले यांनी लिहिलेल्या बाळासाहेब पवार यांच्या चरित्राची ही प्रस्तावना आहे…

..................................................................................................................................................................

१.

तेव्हा, आम्ही कन्नड तालुक्यातील अंधानेर या गावी होतो. वडील अकाली वारलेले, आई नर्स आणि तिच्या एकटीच्या पगारावर खाणारी चार तोंडं होती. साहजिकच परिस्थिती अत्यंत अभावाची होती. उन्हाळ्यात रोजगार हमी योजनेवर काम करून पुढील वर्षीच्या शिक्षणाची सोय करण्याची सवय अंगवळणी पडलेली होती. १९७२च्या उन्हाळ्यात मॅट्रिक झाल्यावर शिक्षणाचे पुढचे दरवाजे बंद होते, कारण तेव्हा महाविद्यालयीन शिक्षणाची सोय केवळ औरंगाबाद व वैजापूरला होती आणि तिथं जाऊन शिक्षण घेणं अर्थातच शक्य नव्हतं. पुढचं शिक्षण घेता येत नाही म्हणून हिरमुसल्या त्या पिढीत मीही होतो, पण परिस्थितीच अशी होती की गप्प होतो.

–आणि अचानक बातमी आली की, कन्नडला कला व वाणिज्य महाविद्यालय सुरू होतंय. तेव्हा आमदार असलेले नारायण पाटील नागदकर अंधानेरला येऊन गेले. बाळासाहेब पवार यांच्या पुढाकाराने कन्नडला कॉलेज सुरू होतंय, असं त्यांनी कन्नड तालुका पंचायत समितीचे तेव्हा सभापती असलेले लक्ष्मणराव मोहिते-पाटील यांच्या घरी झालेल्या बैठकीत सांगितलं. दोन दिवसांनी कन्नडला गेलो. बस स्टँडसमोरून वाहणाऱ्या नाल्यालगत असलेल्या नगरपालिकेच्या समाज मंदिर नावाच्या नवी कोऱ्या इमारतीत जाऊन वाणिज्य शाखेच्या प्री युनिव्हर्सिटी कोर्स (पीयूसी)ला प्रवेश घेतला. आज मुंबईत मान्यवर सनदी लेखापाल असलेले लक्ष्मण काळे आणि मी वाणिज्य शाखेच्या या वर्गात प्रवेश घेणारे या महाविद्यालयाचे पहिले-दुसरे विद्यार्थी आहोत!

या महाविद्यालयानं जगण्याची नवी दिशा दिली, पदवीचं शिक्षण आणि वाचनाचा, कन्नडचे डॉ. टी. एस. पाटील यांनी सेवा दल आणि समाजवादी विचारांचा संस्कार केला, काय वाचावं आणि कसं वाचावं हे शिकवलं. महाविद्यालयाचे तेव्हाचे ग्रंथपाल ओंकार पाटील यांनी वाचनाचे खूप लाड पुरवले. वाचन आणि शिक्षणाची ती शिदोरी तेव्हा मिळाली नसती तर, एक पत्रकार म्हणून आज जी काही मिळालेली आहे ती मान्यता मिळाली नसती, ना ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीचं संपादक होता आलं असतं, ना एक पत्रकार म्हणून मुंबई, दिल्ली, नागपुरात वावरता आलं असतं, ना असंख्य देशांचे दौरे करता आले असते, ना मराठीसोबतच अन्य भाषात विपुल लेखन करता आलं असतं.

एक माणूस म्हणून पुढे जगण्याची प्रेरणा, दिशा आणि धैर्य या महाविद्यालयात मिळालं. याच महाविद्यालयातल्या शिक्षकांनी माझ्यावर लिहिण्याचा संस्कार केला म्हणूनच हे महाविद्यालय, ते सुरू करण्याची प्रेरणा असलेले विशेषत: बाळासाहेब पवार, तसंच त्यांचे सहकारी नारायणराव पाटील नागदकर, त्र्यंबकराव नलावडे, बाबुराव औराळकर, रामराव पाटील बहिरगावकर, लक्ष्मणराव मोहिते-पाटील, शामराव पाटील गव्हालीकर प्रभृतींविषयी मनात कृतज्ञतेची भावना कायम तेवती आहे.

तीच कृतज्ञतेची भावना अच्युत भोसले यांच्या या पुस्तकासाठी बाळासाहेब पवार यांच्याविषयीचा हा मजकूर लिहिताना आहे. फार वर्षांपूर्वी एकदा दिल्लीत महाराष्ट्र सदनात तेव्हा खासदार असलेल्या बाळासाहेब पवार यांची भेट झाली. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही जर कन्नडला कॉलेज सुरू केलं नसतं, तर मी एव्हाना अंधानेर किंवा जास्तीत जास्त कन्नडला असतो. तुमचे माझ्यावरच नाही तर आमच्या पिढीवर उपकारच आहेत.’ त्यावर दरडावणीच्या त्यांच्या परिचित शैलीत बाळासाहेब पवार यांनी ‘हो, का?’ एवढंच प्रश्नार्थक उत्तर दिलं आणि तो विषय संपवला. केलेल्या जनहितार्थ कामाबद्दल आरत्या ओवाळून घेण्याचा त्यांचा स्वभाव नसल्याचं जे काही दरम्यान ऐकून होतो, त्याची खात्री पटवणारा तो प्रसंग होता.

ढगाळ पायजामे आणि सदरे घालून कॉलेजला येणारे आम्ही म्हणजे; मी, लक्ष्मण काळे, आज प्रथितयश वकील असलेले भीमराव पवार, नाना थेटे, दीपक भारुका, रामराव मालकर वगैरे आम्ही मंडळी वयानुरूप जास्तच चळवळे होतो. कॉलेजात शिकतोय याची ऐट आणि मिसरूड फुटण्याच्या त्या वयात कानात वारं शिरल्यागत आमचं वागणं होतं. त्या काळात महाविद्यालयाचे प्राचार्य हटावपासून ते कृषी विद्यापीठ स्थापनेची मागणी, मराठवाडा विकास चळवळीच्या आंदोलनांचे जे काही पडसाद कन्नड शहरात उमटले त्यात लक्ष्मण काळे अध्यक्ष आणि मी सचिव अशी स्वयंघोषित रचना असायची. गावभर मोर्चे-मिरवणुका काढत आम्ही उंडारायचो. म्हणजे नेतृत्वाचा संस्कारही याच महाविद्यालयानं आमच्यावर केलेला आहे.

त्या दिवसात बाळासाहेब पवार ही किती मोठं प्रस्थ आहे हे ऐकायला येत असे, पण म्हणजे नेमकं काय ते काही समजलेलं नव्हतं. आम्ही आमच्याच मस्तीत दंग होतो. पण बाळासाहेब येणार म्हटलं महाविद्यालयातले सर्वजण टरकून असत, हे मात्र चांगलं आठवतं. ‘प्राचार्य हटाव’ आंदोलनाचा एक भाग म्हणून आम्ही महाविद्यालय बंद पाडलं. मग बाळासाहेब पवार यांनी डाक बंगल्यावर लक्ष्मण काळे आणि मला भेटायला बोलावलं. आम्ही दोघंच गेलो, बाकी कुणाची हिंमतच झाली नाही. मात्र बाहेर आमचे बरेच समर्थक घोळका करून उभे राहिले. भेदक डोळे, करडा आवाज असलेल्या, डोईवर कडक स्टार्च केलेली किंचित तिरकी टोपी आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेल्या बाळासाहेब पवार यांनी आमच्याविषयी चौकशी केली. ‘प्राचार्य का नको?’, हे शांतपणे जाणून घेतलं आणि आम्हाला जायला सांगितलं. आमच्यावर कारवाई तर सोडाच बाळासाहेब आम्हाला रागावलेही नाहीत. यामुळे अनेकांना त्या वेळी धक्का बसला होता. स्वभावानं कडक म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब पवार इतरांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतात आणि पटलं तर ते स्वीकारतात, हे मात्र त्यावेळी प्रकर्षानं लक्षात आलं.

पुढे म्हणजे, १९७७च्या उत्तरार्धात मी पत्रकारितेत आलो. १९८१ साली विधिमंडळ आणि मंत्रालयात वावर सुरू झाला. संपादक माधव गडकरी यांच्यामुळे १९८४साली राजकीय पत्रकारितेत आलो. साहजिकच राजकारणाचे अनेक पदर उलगडू लागले, अनेक संदर्भ समजू लागले. राजकारणातील खाचाखोचा, पडद्याआडच्या खेळी आणि त्याचे अर्थ उलगडू लागले. मी ज्या वृत्तपत्रात काम केलं, त्यासाठी मराठवाडा हे बीट कायम माझ्याकडे असायचं. नेमक्या या काळात बाळासाहेब पवार विधिमंडळात नव्हते, पण मराठवाडा म्हटलं की, बाळासाहेब पवार यांच्या नावाचा उल्लेख अपरिहार्य असायचा. राजकारणात वावरताना कायम श्रेष्ठींच्या इशाऱ्याकडे लक्ष ठेवून वागायचं असतं, ‘कुर्निसात’ संस्कृती आत्मसात करायची असते आणि स्वाभिमान खुंटीला टांगून ठेवायचा असतो, हे बाळासाहेब पवार यांना कसं मान्य नव्हतं; म्हणजे ‘पंगे’ घेण्याच्या त्यांच्या अनेक हकिकती समजल्या. एक पत्रकार म्हणून त्या समज आणि आकलन उमलण्याच्या वयात बाळासाहेब पवार यांनी केलेल्या अनेक कृतींचे अर्थ आणि इतरांना क्वचित उद्धटपणा वाटणाऱ्या परखडपणाची मोजलेली किंमत लक्षात येऊ लागली. 

विधानसभेसाठी मुंबईचे डॉ. रफिक झकेरिया यांना औरंगाबादहून उमेदवारी आणि नंतर मंत्रीपद देण्यास बाळासाहेब पवार यांनी कसा ठाम विरोध केला, याच्या कथा आमच्या पिढीला ऐकून माहीत होत्या. मात्र बाळासाहेब पवार यांनी विरोध का केला आणि त्यासाठी आयुष्यभर सत्तेतला वाटा कसा नाकारला गेला हे मंत्रालय आणि विधिमंडळाच्या लॉबीत पत्रकारिता करताना समजलं. बाळासाहेबांचा विरोध रफिक झकेरिया यांना मुळीच नव्हता; बाहेरचा अल्पसंख्याक माणूस मराठवाड्यात आणून त्याला मोठं करण्यापेक्षा मराठवाड्यातला अल्पसंख्याक कार्यकर्ता मोठा व्हावा, ही बाळासाहेबांची इच्छा होती. विस्तारानं अत्यंत अवाढव्य असणाऱ्या औरंगाबादला सत्तेत सहभाग तर द्यावाच लागणार होता आणि तो द्यायचा तर राजकारणाचा एकूण वकूब, तसंच तोवर केलेलं काम लक्षात घेता औरंगाबाद (तेव्हा जालना जिल्हा झालेला नव्हता) जिल्ह्यात ही संधी बाळासाहेब पवार यांनाच द्यावी लागणार हे स्पष्ट होतं. म्हणजे आज ना उद्या, हा माणूस मराठवाड्याचा राजकीय प्रवक्ता होणार, शिवाय ताटाखालचं मांजर होऊन राहणार नाही, हे यशवंतराव चव्हाण यांनी ओळखलेलं होतं.

म्हणूनच विधासभा निवडणुकीत गोविंदभाई श्रॉफ यांच्याविरोधात रफिक झकेरिया यांचं नाव धर्माच्या आधारावर मिळणाऱ्या मतांतून येणाऱ्या संभाव्य विजयासाठी केवळ तुल्यबळ उमेदवार म्हणून यशवंतरावांनी पुढे केलेलं नव्हतं, तर राजकारणासोबतच शिक्षण आणि सहकार क्षेत्रात कर्तबगारीचे झेंडे फडकावणाऱ्या बाळासाहेब पवार यांना दिलेला तो शह होता. केवळ त्याच हेतूनं विनायकराव पाटील आणि बाबुराव काळे यांना बळ देण्यात आलेलं होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. (अर्थात राजकारण बाजूला ठेवून या तिन्ही नेत्यांनी परस्परात जोपासलेलं सौहार्द राजकारणात अभावानं आढळणारं होतं, हा भाग वेगळा.) 

आजही गेला बाजार संपूर्ण मराठवाड्यावर प्रभाव टाकेल असं दमदार राजकीय नेतृत्व औरंगाबाद (आणि जालना) जिल्ह्यात निर्माण झालेलं नाहीये हे लक्षात घेता, बाळासाहेब पवार यांनी तेव्हा पुकारलेल्या ‘त्या’ एल्गाराचं महत्त्व अधोरेखित होतं. तो काळ लक्षात घ्या, यशवंतराव चव्हाण यांचं नेतृत्व निर्विवाद  होतं, त्यांच्याविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत मनातल्या मनात करणंही अशक्य असण्याचे ते दिवस होते; तशा परिस्थितीत अत्यंत बेडरपणाने रफिक झकेरिया यांना विरोध करण्याची घेतलेली भूमिका बाळासाहेब पवार यांची भविष्यवेधी नजरही स्पष्ट करणारी आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या सर्वच अनुयायांनी नंतरच्या काळातही बाळासाहेब पवार यांना डावलण्याचं व्रत पाळलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याला महाराष्ट्राचे ‘जाणता राजा’ही अपवाद नाहीत!    

बाळासाहेब पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात भूमिका घेतली ती मराठवाड्याच्या हितासाठी आणि ते कमी काय म्हणून नंतर मराठवाड्यात विद्यार्थी आणि तरुणांनी उभ्या केलेल्या विकास आंदोलनाला बळ पुरवण्याची ‘गुस्ताखी’ तर बेडरपणे केलीच केलीच केली, शिवाय पुढे जाऊन राज्याचं मुख्यमंत्रीपद मराठवाड्याकडे द्या अशी मागणी जाहीरपणे करून राज्याच्या राजकारणावर स्वत:चं नियंत्रण ठेवू पाहणाऱ्या पक्षातील अनेक बड्यांचा रोष ओढवून घेतला. विकासाच्या त्याच चळवळीचा रेटा वाढल्यानं आणि बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे खरंच मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद मिळालं; याच चळवळीतून पुढे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, डॉ. भालचंद्र कांगो, विजय गव्हाणे, चंद्रशेखर राजूरकर, ज्ञानोबा मुंडे अशा अनेक तरुण राजकारण्यांची फळी उभी राहिली.

बाळासाहेब पवार यांच्याविषयी अढी निर्माण झालेल्या मंडळीकडेच उमेदवारी वाटपाचे अधिकार असल्यानं बाळासाहेब पवार यांना विधानसभेची उमेदवारी देताना नंतर डावललं गेलं. आधी विधानसभा आणि नंतर लोकसभेची उमेदवारी मिळवतानाही बाळासाहेबांना त्यांच्या पसंतीचा मतदार कन्नड/औरंगाबाद  हा मतदार संघ मिळू दिला गेला नाही. तरी चार वेळा विजयी होण्यात यशस्वी होण्याइतकं कार्यकर्ते, काम आणि चारित्र्याचं, कोणालाही हेवा तसंच जरबही वाटावं असं भांडवल त्यांनी जमा केलेलं  होतं. अर्थात अलीकडच्या २०-२५ वर्षांतील राजकारणाचा बाज पूर्ण बदलला आहे. राजकारण हे ‘करिअर’ आणि निवडणूक ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ झालेली आहे. या वातावरणात बाळासाहेब पवार यांचा नक्कीच जीव गुदमरला असता, यात शंकाच नाही.

सत्तेच्या राजकारणात डावललं गेलं तरी, बाळासाहेब पवार यांनी अविभक्त औरंगाबाद आणि परभणी, बीड या जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये सुरू करण्याची कामगिरी बजावली. त्यामुळेच पुढच्या पिढ्यांना शिक्षण घेण्याच्या मुख्य प्रवाहात सामावून जाण्याची संधी मिळाली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव या नात्यानं १८ महाविद्यालये, ५५ शाळा आणि १० वसतिगृह उभारण्यात त्यांचा निर्णायक पुढाकार होता. याशिवाय छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळानं कन्नडला सुरू केलेल्या महाविद्यालयाचा आज दिसणारा विशाल ज्ञानवृक्ष वेगळाच.

खाजगी क्षेत्रातला गंगापूर साखर कारखाना सहकार क्षेत्रात आणून यशस्वी करून दाखवण्याची अफलातून कामगिरी बजावणाऱ्या बाळासाहेब पवार यांनी कन्नड आणि जालना जिल्ह्यात रामनगरलाही सहकारी साखर कारखान्यांची उभारणी केली. राजकारणासोबतच शिक्षण, कृषी, बँक, सूत गिरणी, खरेदी विक्री संघ अशा, सहकाराच्या प्रत्येक आघाडीवर काम करताना बाळासाहेब यांनी त्यांच्यातील प्रशासकीय आणि संघटन कौशल्याचा अमीट ठसा उमटवला. एकाच वेळी इतक्या क्षेत्रात कर्तबगारी दाखवणारा हा नेता उद्या जड होणार या भीतीनंच प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या नाराजांच्या यादीत समाविष्ट झाला असला तर ते स्वाभाविकच म्हणायला हवं. पण त्यामुळे मराठवाड्याचं एक भावी प्रभावशाली नेतृत्व डावललं गेलं यात शंकाच नाही.  

बाळासाहेब पवार यांचा वावर आणि संपर्क सर्वपक्षीय होता. काँग्रेसचे विरोधक असलेले ‘मराठवाडा’कार अनंतराव भालेराव ते कम्युनिस्ट व्ही. डी. देशपांडे असा त्यांच्या संपर्काचा व्यापक परीघ होता. लोकांची काम करतानाही राजकीय विचार त्यांनी कधी आड येऊ दिला नाही. या संदर्भात कम्युनिस्ट नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी सांगितलेली एक हकिकत बाळासाहेब पवार यांच्या व्यक्तिमत्त्वावर झोत टाकणारी आहे- औरंगाबादला भगीरथ नावाचा एक सहकारी तत्त्वावरील सहकारी खत निर्मितीचा कारखाना होता. कारखान्यातील कामगार संघटना कम्युनिस्टांच्या ताब्यात होती. कॉम्रेड व्ही. डी. देशपांडे अध्यक्ष तर डॉ. भालचंद्र कांगो सचिव होते. कारखान्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्याचा प्रश्न खूप रेंगाळलेला होता आणि त्यामुळे कामगारांत असंतोषही होता. रोजंदारी कामगारांची मागणी योग्य असल्याची खात्री पटल्यावर बाळासाहेब पवार यांनी पुढाकार घेतला, सर्व राजकीय वजन वापरून त्या कामगारांना सेवेत कायम करण्यास व्यवस्थापनाला भाग पाडलं. अशा प्रकरणात मोठे आर्थिक हितसंबंध कायमच गुंतलेले असतात आणि ‘देव-घेव’ होऊन कामगार लुबाडला जाण्याची शक्यता कायम असते, हे स्मरणात ठेवून एका खडकूचाही व्यवहार होणार नाही, यावर बाळासाहेबांनी करडी नजर ठेवलेली होती, असं आजही डॉ. कांगो बाळासाहेब पवार याचं स्मरण निघालं की, आवर्जून सांगतात.

बाळासाहेब पवार माणसासारखे हांडा-मांसाचे माणूस होते. त्यामुळे माणसात असणारं स्वभावातलं भले-बुरेपण त्यांच्यात होतं. त्यांच्या क्रोधाचा फटका काहीना बसला तर लोकहितैषी वृत्तीचा लाभ लाखोंना मिळाला हेही विसरता येणार नाही. म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाच्या खात्यात जमा जास्त आहे. त्यांनी सुरू केलेले अनेक प्रकल्प त्या काळात आदर्श आणि पथदर्शक ठरले, पण नंतर खुली अर्थव्यवस्था जागतिकीकरणाच्या झंझावातात ते प्रकल्प सक्षमपणे तगवून ठेवणारं दुसऱ्या फळीचं नेतृत्व उभारण्यात बाळासाहेब पवार यांना पाहिजे तसं यश आलं नाही, हेही तेवढंच खरं आहे.

वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवन यांच्यातल्या सीमारेषा बाळासाहेब पवार यांनी कटाक्षाने पाळल्या. राजकारणात राहून-हजारोंचा पोशिंदा बनल्यावरही आर्थिक हितसंबंध आणि महत्त्वाचं म्हणजे चारित्र्यावर एक शिंतोडाही उडू दिलेला नाही. त्याबद्दल राजकारणी आणि प्रशासनात असलेली कौतुक व आदराची असलेली भावना मला अनेकदा अनुभवायला मिळालेली आहे.

इतकी वर्षं पत्रकारिता करताना राजकारणाच्या परिघात वावरल्याने ‘हे असं’ असणं म्हणजे खांद्यावर कायम काटेरी क्रूस बाळगण्यासारखं कसं असतं, हे मला चांगलं ज्ञात आहे. त्यांच्यातला वाचक (त्या काळात इंडिया टुडे, ब्लिट्झ, करंट अशी नियतकालिकं वाचणारे ते बहुदा मराठवाड्यातले तरी काँग्रेसचे एकमेव राजकारणी असावेत!), गरिबाविषयी असणारा कळवळा, लोकहिताचं राजकारण, त्यांची विकासाची दृष्टी, संघटन कौशल्य, उमदा स्वभाव याविषयी कोणीही शंका घेऊच शकणार नाही. टोकाचा परखडपणा हा त्यांचा ऐवज होता. तो विस्तवासारखा पेटता होता तरी त्यांनी तो अंगार बेडरपणे तळहातावर ऐटीत जपला.  त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या किंमतीबद्दल उसासे टाकण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. समोरच्याचे डोळे दीपवणारं असं ऐटीत जगणं सोपं नसतं, पण ते बाळासाहेब पवार या नावानं अस्तित्वात होतं, हे वास्तव आहे.

२.

बाळासाहेब पवार हे एक नि:संशय मोठी क्षमता असलेलं बहुपेडी व्यक्तिमत्त्व होतं. असं व्यक्तिमत्त्व  सहजासहजी कोणा एकाच्या कवेत मावत नसतं. अच्युत भोसले यांनी त्यांच्या या पुस्तकात बाळासाहेब पवार नावाचा हा कवेत न मावणारा विशाल वट वृक्षासारखा कर्तृत्ववान अंगार मोठ्या खुबीनं शब्दात पेललेला आहे. बाळासाहेब पवार यांच्या व्यक्तीमत्वानं भारावून गेलेले (का संमोहित झालेले?) अच्युत भोसले आणि त्यांच्या अभिव्यक्तीला आलेला भाषेचा बहर असा या लेखनाचा मनोहारी बाज आहे. अच्युत भोसले पत्रकारितेतही होते असं सांगण्यात आलं, पण त्यांचं लेखन काही माझ्या वाचनात आलेलं नव्हतं. त्यामुळे हे लेखन किमान मला तरी विलक्षण ताजं आणि टवटवीत वाटलं. साधारणपणे पत्रकारांची भाषा ‘लेजिटीमेट प्रोफेशनल वुईकनेस’ या सदरात मोडणारी असते. अच्युत भोसले यांची भाषा मात्र काळ्याशार मातीत भरघोस लगडलेल्या पिकांच्या हिरव्याकंच पानांवर सकाळी दिसणाऱ्या देखण्या दवबिंदूसारखी आहे. महत्त्वाचं म्हणजे ही भाषा बाळासाहेब पवार यांच्यासंबंधी कथन करताना कुठेही साचून राहत नाही, तर ती खळाळत राहते आणि आपल्यालाही त्या प्रवाहात सामील करून घेते.

पण काही वेळा अच्युत भोसले यांची भाषेवरची पकड सुटते हेही जाणवतं. उदाहरणार्थ – ‘मातीला मोल नसतं तेव्हा!’ या प्रकरणातील ‘कामाचं वेड असलेलं नेतृत्व आतल्या गाठीचं ‘नसतं’ सारखं अशास्त्रीय विधानं अच्युत भोसले करतात. बाळासाहेब पवार हे एक माणसासारखे माणूस होते, याचा विसर काही ठिकाणी अच्युत भोसले यांना भारावलेपणामुळे पडतो. अर्थात हे काही या पुस्तकाचं उणेपण मुळीच नव्हे. भारावलेपणा भक्तीच्या दिशेनं झुकला की, हे असं घडतंच.

आणखी एक गल्लत म्हणजे, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्याबाबत बाळासाहेब पवार यांची भूमिका आधी प्रतिकूल असल्याचा आमचा ठाम समज होता. मात्र बाळासाहेबांनी विद्यापीठाच्या नामांतराला अनुकूल भूमिका घेतलेली आहे, असा त्यांच्या समर्थकांचा दावा तेव्हा होता आणि आजही आहे. त्यामागची कारणे अर्थातच राजकीय होती. मात्र चरित्रलेखन करताना त्याबाबत अच्युत भोसले यांचं कथन स्पष्ट नाही. मोठ्या माणसांच्या संदर्भातल्या अनेक हकिकती कालांतराने दंतकथेत तरी रूपांतरीत होतात किंवा भक्तीभाव धारण करतात. चरित्र लेखन करणाराने हकिकत आणि किस्सा किंवा दंतकथा यातील सूक्ष्मभेद समजून घ्यायला हवे असतात, ते पथ्य या या संदर्भात तरी लेखकाकडून सुटलेलं आहे.

अच्युत भोसले यांनी हे चरित्रलेखन करताना शैली आणि भाषेचा एक वेगळा बाज पेश केलेला आहे. त्यातून एखाद-दुसरा अपवाद वगळता बाळासाहेब पवार नेमकेपणाने उभे राहतात. आजवर अनेकांना माहिती नसणारे प्रसंगही; बाबरी मस्जीद पाडली जाण्याच्या काळात काही मुस्लिमांच्या मदतीने औरंगाबादला राम मंदिराची उभारणी यासारखे अर्थगर्भ या लेखनात आहेत. त्यामुळे बाळासाहेब यांच्या वेगळ्या पैलूंवर प्रकाश पडतो, हे या लेखनाचं यश आहे.

शिक्षणाचा बंद झालेला माझ्यासारख्या असंख्यांचा मार्ग खुला करून देत आमच्या पिढीला जगण्याच्या संपन्न वाटेवर जाण्याची संधी देणाऱ्या आणि त्याबद्दल कोणतीही उपकाराची भावना कधीही न बाळगणाऱ्या बाळासाहेब पवार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल उद्योजक, बाळासाहेब पवार यांचे पुत्र मानसिंग पवार आणि या पुस्तकाचे लेखक अच्युत भोसले यांचा मी मन:पूर्वक ऋणी आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......