आज कॉ. लेनिन यांच्या १५०व्या जयंतीवर्षाची सांगता होत आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...
रशियन क्रांतीचा इतिहास आणि त्यातील लेनिन या महानायकाच्या नेतृत्वाची विलक्षण सर्जनशील भूमिका एका लेखात सांगणे केवळ अशक्य आहे. जगातली पहिलीवहिली कामगारवर्गाची क्रांती व सत्तास्थापना आणि लेनिनचे अभूतपूर्व नेतृत्व व विचार यांचे वर्णन एखाद्या लेखात करणे शक्य नाही. इतिहासकारांनी त्यावर खंडच्या खंड लिहिले आहेत आणि अजूनही त्याबद्दलची चर्चा सुरूच आहे! ज्या मांदियाळीने केवळ एकोणिसावे शतकच नव्हे तर विसावे व एकविसावे शतक घडवले, ती मांदियाळी अशी सहज पुसली जाणार नाही. प्रदीर्घ मानवी इतिहासाचे ते मानदंड आणि दीपस्तंभ आहेत!
.............................................................................................................................................
मार्क्स- एंगल्स- लेनिन- स्टालिन- माओ अशा मांदियाळीच्या ऐतिहासिक-प्रेरणादायी-आदर्शवादी संस्कारांत पहिली भारतीय (जागतिकसुद्धा) कम्युनिस्ट पिढी वाढली. व्लादिमीर इलिच उलायनॉव लेनिनच्या नेतृत्वाखाली झालेल्या बोल्शेविक रशियन कामगारवर्गीय क्रांतीने ब्रिटिश साम्राज्यशाही मुळापासून हादरली होती. खुद्द इंग्लंडमधील प्रचंड मोठा कामगारवर्ग त्या साम्यवादी क्रांतीच्या प्रभावाखाली आला होता. ब्रिटनमध्ये ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ ग्रेट ब्रिटन’ स्थापन झाली होती. ‘सीपीजीबी’ अशा आद्याक्षरांनी ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिश कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव इंग्लंडमध्ये कार्यरत असणाऱ्या भारतीयांवरही पडू लागला होता. खुद्द इंग्लंडमध्ये स्वत:चे सामर्थ्य उभे करण्यासाठी लेबर पार्टी ऊर्फ मजूर पक्षातही रशियन क्रांतीचे पडसाद उमटू लागले होते. ‘फेबियन सोशॅलिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विचारवंत-कार्यकर्त्यांमध्ये साक्षात जॉर्ज बर्नार्ड शॉसारखे प्रकांड नाटककारही होते. लोकमान्य टिळक १९१९ मध्ये इंग्लंडला गेले, तेव्हा त्यांनी घेतलेल्या जाहीर सभेत शॉ स्वत: व्यासपीठावर होते. ती सभा ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा देण्यासाठी’ ब्रिटिश कामगारवर्गाची होती!
‘लोकमान्य टिळक अशा सभेत कसे?’ हा प्रश्न तेव्हा, तसेच आजही अनेकांना पडलेला आहे. परंतु ते तितके आश्चर्यजनक नव्हते, कारण १९१७मध्ये लेनिनप्रणीत रशियन क्रांतीला टिळकांनी ‘केसरी’मधून जोरदार समर्थन दिले होते. किंबहुना, म्हणूनच लेनिन यांनी ब्रिटिश कम्युनिस्ट पक्षाच्या धुरिणांमार्फत ‘हे टिळक कोण?’ अशी विचारणा आत्मीयतेने केलेली होती. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षातील टिळक हे एक लोकप्रिय नेते होते. टिळकांना मुंबईच्या गिरणीकामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाठिंबा होता. म्हणूनच १९०८मध्ये टिळकांना सहा वर्षांची सजा होऊन मंडालेच्या तुरुंगात पाठवले गेले, तेव्हा मुंबईच्या कामगारांनी सहा दिवसांचा संप केला होता. अशा टिळकांचा ब्रिटनमधील कामगारांनी स्वागत-सन्मान केल्यामुळे इंग्रज राज्यकर्ते सावध झाले होते. खुद्द लेनिनही टिळक या व्यक्तीबाबत इतक्या कुतूहलाने चौकशी करत आहेत, याचा धसका त्यांना वाटणे साहजिकच होते.
वस्तुत: टिळकांनी मार्क्स-एंगल्स यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केलेला नव्हता. त्या वेळेस ते शक्यही नव्हते. लेनिनचे ‘मार्क्सवादी’ विचारही टिळकांनी अध्ययन केलेले नव्हते. पण लेनिन हे साम्राज्यशाहीच्या विरोधात लढून, क्रांती सिद्ध करू शकले होते- खरे म्हणजे, त्यांच्याच देशाच्या झारच्या साम्राज्यविस्तारशाहीच्या विरोधात कामगारांची बलाढ्य संघटना बांधून भांडवलशाहीला आव्हान देत होते- इतके आकलन टिळकांना पुरेसे होते. त्या निमित्ताने टिळकही भांडवलशाहीच्या विरुद्ध आणि कामगारवर्गाच्या बाजूने उभे राहत होते. पुढे १९२० मध्ये झालेल्या ‘आयटक’ ऊर्फ ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’चे उद्घाटक म्हणून टिळकांना पाचारण करण्याचेही ठरले होते. त्यांना त्या अधिवेशनाला बोलावण्यात पुढाकार होता तो कम्युनिस्ट कामगारनेत्यांचा. कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी टिळक आणि लेनिन या दोघांकडून प्रेरणा घेऊन कामगार चळवळीत जीवन झोकून दिले, ते त्याच काळात-म्हणजे १९१९ ते १९२१मध्ये.
रशियन क्रांतीने अवघ्या दोन वर्षांत इतका प्रचंड प्रभाव अवघ्या युरोपवर प्रस्थापित केला होता. याचे एक मुख्य कारण होते ते म्हणजे- लेनिनला हे क्रांतीचे लोण प्रथम जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स अशा देशांत न्यायचे होते. त्या देशांच्या जगभर जेथे-जेथे वसाहती होत्या, त्या सर्व वसाहतींमध्ये तो क्रांतीचा तेजस्वी वणवा पसरवायचा होता. कार्ल मार्क्सच्या ‘जगातल्या तमाम कामगारांनो, एक व्हा- तुम्हाला तुमच्या पायांतील शृंखलांखेरीज गमावण्यासारखे काहीही नाही’, या विचाराला अनुसरून लेनिन यांनी क्रांतीचा तो अश्वमेध सोडायचा निर्धार केला होता. त्या क्रांतीचा आधार असणार होता- प्रत्येक देशातील औद्योगिक कामगारवर्ग, त्यांचे संघटन करण्याचे माध्यम असणार होते- क्रांतिकारक कम्युनिस्ट पक्ष आणि त्या संघटनेची विचारसरणी होती, कार्ल मार्क्सचे तत्त्वज्ञान- त्याचा ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ ऊर्फ जाहीरनामा आणि वैचारिक आधार होता त्याच्या ‘द कॅपिटल’ या त्रिखंडी ग्रंथाचा!
भारतात १९१५मध्ये गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतून आगमन झाले होते. त्यांनी देशभर फिरून इंग्रज राजवटीने केलेल्या लूटमारीचा आणि अन्यायाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. त्यांचे चंपारण्यचे आंदोलन १९१७चे- म्हणजे ज्या वर्षी रशियात क्रांती झाली, त्याच वर्षीचे. गांधीजींच्या ‘अहिंसा’ आणि ‘सत्याग्रह’ विचाराला व संघर्षपद्धतीला त्यापासूनच आकार येऊ लागला होता. गांधीजीही ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या विरुद्ध आणि कष्टकऱ्यांच्या बाजूने लढण्यासाठी लोकांना सिद्ध करत होते. पण त्यांचा विचार व मार्ग वेगळा होता. गांधीजी लेनिनच्या बाजूने नव्हते आणि विरुद्धही नव्हते. त्यांचे मार्ग भिन्न होते. लोकमान्य टिळक आणि लेनिन यांच्या विचारांनी प्रेरित झालेले कॉम्रेड डांगे यांनी त्या काळात ‘गांधी विरुद्ध लेनिन’ अशी पुस्तिका लिहिली. डांगे तेव्हा फक्त २१ वर्षांचे होते!
एका अर्थाने त्या दोघांची ही दीडशेवी जयंती आहे. गांधीजींचा जन्म १८६९चा दोन ऑक्टोबर. लेनिनचा १८७०चा २२एप्रिल. म्हणजे गांधीजी लेनिनपेक्षा सात महिन्यांनी वयस्कर. दोघांचा प्रवास म्हटला तर समांतर; पण वैचारिक-राजकीय प्रवास मात्र वेगवेगळा. त्याचे कारण अर्थातच त्यांना प्रत्यक्ष भेडसावणारी तत्कालीन परिस्थिती. गांधीजी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात ‘अहिंसा’ हे शस्त्र घेऊन उभे ठाकले होते. लेनिनचा संघर्ष त्यांच्याच देशातील झारशाहीविरुद्धचा होता. झारशाही म्हणजे सरंजामशाही, रुजवणारी भांडवलशाही आणि विस्तारवादी साम्राज्यशाही. झारचा रशिया पहिल्या महायुद्धात लढत होता. झारशाहीचे सैन्य थेट युद्धात होते. रशियातील भल्या मोठ्या कारखान्यांमधील कामगार अतिशय कष्टाचे, अल्प वेतनाचे उपेक्षित जीवन जगत होते. रशियाचा औद्योगिक पाया बऱ्यापैकी रुजला असल्यामुळे कामगारांची संख्या मोठी होती, तरीही कृषिक्षेत्र मोठे होते आणि शेतकरी मोठ्या संख्येने होते. कार्ल मार्क्सच्या सिद्धान्तानुसार भविष्यकालीन समाज हा औद्योगिक कामगारांच्या राजकीय-आर्थिक नेतृत्वाखाली उभा राहणार होता. म्हणून बलाढ्य व द्रष्टा असा संघटित कामगारवर्ग व त्यांचा नेता असणे आवश्यक होते. लेनिनने स्वत:ला त्या भूमिकेत पाहिले होते. रशियन सैन्य मोठे होते, बऱ्यापैकी शस्त्रास्त्र सज्ज होते. ते सैन्य मुख्यत: शेतकरी आणि कामगारवर्गातून आलेले होते. त्या दृष्टिकोनातून पाहिले तर, सशस्त्र संघटनांचे जाळे विणणे आणि त्यांना मार्क्स-लेनिनवादी चौकटीत आणणे शक्य होते.
गांधीजींभोवती अगदी वेगळी स्थिती होती. त्यांनी भारतभर दौरा केला, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, सुमारे ८०-८५ टक्के समाज ग्रामीण होता. शेतीवर अवलंबून होता. कमालीचा दरिद्री होता. दोन वेळा जेवायची भ्रांत होती. कारखाने व त्या अनुषंगाने येणारे व्यवसाय नव्हते. ‘कामगारवर्ग’ म्हणून संबोधता येईल अशांची संख्या अत्यल्प आणि तीही मुख्यत: मुंबई, कलकत्तासारख्या शहरांमध्ये. म्हणजेच सामाजिक दृष्टिकोनातून रशिया आणि भारत यांची तुलना अशक्यच होती. गांधीजींसमोर अतिशय बलाढ्य असे शस्त्रसुसज्ज ब्रिटिश साम्राज्य होते आणि भारतातील बहुतेक लोक नि:शस्त्र व दरिद्री. वर म्हटल्याप्रमाणे पहिले महायुद्ध सुरू असतानाच लेनिन क्रांती करण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे समाजात शस्त्रे उपलब्ध होती.
लेनिन आणि गांधीजींच्या राजकीय प्रवासातही बराच फरक आहे. लेनिन विद्यार्थी चळवळीपासूनच राजकारणात होते. त्यांचे भाऊ तर क्रांतिकारकांच्या गटात होते. झारच्या पोलिसांनी त्यांना राजद्रोहाच्या आरोपावरून पकडले होते आणि १८८७मध्ये फासावर चढवले होते. लेनिन तेव्हा सतरा वर्षांचे होते. एका अर्थाने असेही म्हणता येईल की, लेनिन यांनी ती जुलमी राजवट उलथवून टाकण्याचा विडाच तेव्हा उचलला. परंतु नुसती जिद्द, विचारसरणी आणि लढाऊपणा असून चालत नाही; तर शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची संघटनाही असावी लागते, हे ओळखून लेनिन यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली. त्यातूनच मार्क्सवादी विचारावर आधारित ‘रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टी’चा (आरएसडीएलपी) जन्म झाला. पुढे या पक्षातही मवाळ आणि जहाल गट तयार झाले. मवाळ म्हणजे मेन्शेविक आणि जहाल म्हणजे बोल्शेविक. लेनिन अर्थातच बोल्शेविक क्रांतिकारक संघटनेचे. क्रांतीच्या आधीच्या वर्षी (१९१६) लेनिन यांनी ‘व्हॉट इज टू बी डन’ (What is to be done) हा छोटेखानी पुस्तिका लिहिली होती. ती पुढे कित्येक वर्षे जगभतील कम्युनिस्ट तरुणांची मार्गदर्शक पुस्तिका झाली.
विद्यार्थी चळवळ, युवा चळवळ, कामगार चळवळ अशा कोणत्याच प्रकारच्या सामाजिक-राजकीय प्रक्रियेत गांधीजी नव्हते. ते वकिली करू लागल्यावर लंडनमध्येही थेट राजकारणात नव्हते. खरे म्हणजे, दक्षिण आफ्रिकेला गेल्यानंतर त्यांना जेव्हा वांशिक विद्वेषाचा पहिला अनुभव आला आणि जेव्हा त्यांनी तेथील भारतीयांना मिळणारी ‘दुय्यम’ व ‘अपमानकारक’ वागणूक पाहिली; तेव्हा ते गौरवर्णीयांच्या वांशिक राजवटीविरुद्ध लढायला सिद्ध होऊ लागले. म्हणजे, गांधीजींचा राजकारणप्रवेश १८९३नंतरचा आणि तोही दक्षिण आफ्रिकेत. याउलट, लेनिनने १८८७नंतरच क्रांतिकारक राजकारणात उडी मारली होती. शिवाय झारशाहीचा रशियन लोकांवरच होणारा जुलूम आणि ब्रिटिशांनी भारताची बनवलेली वसाहत व त्यामार्फत तिची होणारी लूट या वास्तव परिस्थितीतही खूप फरक होता. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासातही भिन्नता होतीच.
लेनिन यांच्या राजकारणाचा परिसरच अतिशय हिंसक आणि स्फोटक होता. त्यांना १८९५मध्येच झारशाहीने ‘तडीपार’ करून सैबेरियाला पाठवले होते. (रशियाचे सैबेरिया म्हणजे आपले अंदमान. पण फरक हा की, सैबेरियात उणे ४० ते उणे ६० इतकी उग्र व भीषण बर्फाळ थंडी; याउलट अंदमान हा उष्ण प्रदेश! समान धागा इतकाच की, कैद्याला ‘काळ्या पाण्या’ची वा ‘पांढऱ्या बर्फा’ची शिक्षा’!)
या काळातच लेनिन यांना त्यांची मैत्रीण आणि पुढे झालेली सहचारिणी भेटली- क्रुपस्काया. क्रुपस्कायांनी लेनिनची अखेरपर्यंत (म्हणजे अगदी १९२४पर्यंत) साथ दिली. म्हणजे संघटना बांधण्यात, क्रांतीमध्ये, सत्ता स्थापन केल्यानंतर सत्ताव्यवहारात वगैरे.
गांधीजींबरोबर कस्तुरबाही दीर्घ काळ होत्या; पण त्या गांधीजींच्या अनुयायी, स्वयंसेवक आणि पतिव्रता पत्नी होत्या. याउलट, क्रुपस्काया या लेनिन यांच्या कॉम्रेड होत्या. कस्तुरबा गांधींचा मृत्यू १९४४मध्ये झाला. म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर तीन वर्षे आणि गांधी हत्येपूर्वी चार वर्षे! क्रुपस्काया मात्र लेनिनच्या मृत्यूनंतर सुमारे पंधरा वर्षांनी म्हणजे १९३९मध्ये मरण पावल्या.
मृत्यूसमयी लेनिन फक्त ५४ वर्षांचे होते. गांधीजींची हत्या झाली, तेव्हा त्यांचे वय ७९ वर्षांचे होते. लेनिन यांना क्रांती यशस्वी झाल्याचे आणि बोल्शेविक सत्ता प्रस्थापित झाल्याचे पाहता आले. क्रांतीनंतर सात वर्षांनी, १९२४मध्ये त्यांचे देहावसान झाले. गांधीजींना स्वातंत्र्य मिळाल्याचे पाहायला मिळाले, पण देशाची फाळणीही आणि प्रचंड हिंसाचार पाहावा लागला. स्वातंत्र्यानंतर साडेपाच महिन्यांनी, ३० जानेवारी १९४८ रोजी त्यांची हत्या झाली. लेनिन यांना सत्तेची घडी बऱ्याच अंशी बसवता आली, कारण १९१७ ते १९२४ अशी सात वर्षे त्यांना मिळाली. केवळ सत्ताच नव्हे, तर पक्षबांधणीही करून सत्तेला पक्षाची घट्ट चौकटही देता आली. गांधीजी मात्र स्वतंत्र भारताचे प्रजासत्ताक झाल्याचेही पाहू शकले नाहीत. फक्त त्यांच्या स्पष्ट व आग्रही सूचनेमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्याने ते नवभारताचे घटना-शिल्पकार झाले.
लेनिन यांना तसे अल्प आयुष्यच लाभले, असे म्हणावे लागेल. वय फक्त ५४ वर्षे. जर त्यांनाही किमान १५-२० वर्षे अधिक मिळाली असती, तर कदाचित रशियाचा क्रांतीनंतरचा इतिहास बराच वेगळा झाला असता. त्याचप्रमाणे गांधीजींची हत्या झाली नसती आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे ते सव्वाशे वर्षे जगले असते, तर भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासालाही वेगळे वळण मिळाले असते.
गांधीजींनी आपणहून पंडित जवाहरलाल नेहरूंना आपले वारस केले होते. लेनिन यांनी तितक्या स्पष्टपणे स्टालिन यांना सत्तेचे वाटप केले नसले, तरी लेनिन यांच्यापुढे मुख्यत: स्टालिन आणि ट्रॉट्स्की ही दोनच नावे होती.
स्टालिन पुढे रशियाचा जवळजवळ तीस वर्षे सर्वेसर्वा होता. हिटलरच्या नाझी भस्मासुराला खरोखरच भस्मवत् केले गेले ते स्टालिनच्या नेतृत्वाखालीच. तुलनेने (इंग्लंड-जर्मनी-फ्रान्सच्या तुलनेत) एक अप्रगत देश औद्योगिक दृष्ट्या आणि समर्थ अमेरिकेला आव्हान देऊ शकला, ती सिद्धता स्टालिनच्या काळातच झाली.
पण बहुतेक इतिहासकारांना (रशियातीलसुद्धा) वाटते की, लेनिन यांनी घालून दिलेली अनेक सूत्रे व मूल्ये पायदळी तुडवली गेली आणि स्टालिनला जगाने एक खलनायक ठरवले. स्टालिनच्या काळात क्रौर्याने परिसीमा गाठली. विज्ञान-तंत्रज्ञान-सामर्थ्य यात देश पुढे गेला, पण मानवी मूल्ये आणि लोकशाही तत्त्वे पायदळी तुडवली गेली.
काही इतिहासकारांच्या मते- लेनिन दीर्घ काळ हयात असते, तर असे झाले नसते. कुणी सांगावे, मग हिटलरचाही जर्मनीत उदय झाला नसता. स्टालिनने १९२४मध्ये रशियाची सूत्रे हाती घेऊन ज्या झपाट्याने औद्योगिक व वैज्ञानिक विकास सुरू केला, त्याला आव्हान देण्यासाठीच जर्मनीत हिटलरला पाठिंबा मिळाला, असे मानणारा एक पंथ आहे. अनेक जण तर स्टालिन आणि हिटलर या दोघांना एकाच मापाने मोजतात (अर्थातच हे त्यांचे माप बऱ्याच अंशी अनैतिहासिक आहे. असो). मुद्दा हा की, लेनिन यांच्या निधनाने रशिया वेगळ्या वळणावर आला.
लेनिन यांना त्यांचे टीकाकारही विसाव्या शतकाचे एक शिल्पकार किंवा सर्जनशील क्रांतिकारक किंवा एक युगपुरुष मानतात. मार्क्सवादी तत्त्वज्ञानाला आकार, रूप आणि एक प्रभावी साधन बनविणारा शिल्पकार मानतात.
लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पहिली सुमारे चाळीस वर्षे (१९१७ ते १९५७) जगातले सर्व कम्युनिस्ट ‘मार्क्सिझम-लेनिनिझम’ असा जोड उल्लेख करत असत. (आपल्याकडचे काही नक्षलवादी त्यांची ओळख सीआयपी-एमएल ऊर्फ कम्युनिस्ट पक्ष-मार्क्स-लेनिनवादी असाच करतात.) असा जोडउल्लेख करण्याचे काय कारण असावे? कार्ल मार्क्सचे निधन १८८३मध्ये झाले, तेव्हा लेनिनचे वय १३ वर्षांचे होते. त्यांची भेट होण्याचा प्रश्नच नव्हता. मार्क्सचे सर्व लेखन जर्मन भाषेत होते. लेनिन यांना जर्मन भाषा अवगत होती, पण मार्क्सचे सर्व साहित्य तेव्हा सहज उपलब्धही नव्हते (लेनिन भाषाप्रभू होतेच, पण महाविद्यालयात नेहमी प्रथम वर्गात प्रथम स्थानी असत.).
जगाचा इतिहास-विशेषत: अर्वाचीन जगाचा- हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. जग जरी अनेक राष्ट्रांमध्ये विभागले गेले असले, तरी देशा-देशांत जरी तणाव-संघर्ष-युद्ध होत असले तरी वस्तुत: अवघ्या जगाला जोडले गेले आहे ते श्रमाच्या म्हणजेच श्रमिकांच्या माध्यमातून! संपत्ती निर्माण करून संस्कृती व सभ्यतेचा इतिहास निर्माण होतो, तो या कामगार कष्टकऱ्यांनी दिलेल्या अन्यायाच्या, विषमतेच्या, पिळवणुकीच्या विरोधातील वर्गसंघर्षातून. उद्याचे समाजवादी जग निर्माण करण्याची; अवघ्या मानवाला मुक्त, सुखी आणि सुसंस्कृत करण्याची जबाबदारी त्यामुळे या कामगारवर्गावर आहे, अशी सूत्ररूपी मांडणी मार्क्सने केली असली, तरी प्रत्यक्ष क्रांती करून त्या कामगारवर्गाला सत्ता प्राप्त करून कशी द्यायची आणि ती सत्ता आल्यावर प्रत्यक्षात अंमल कसा करायचा, याबद्दल मार्क्सचे मार्गदर्शन नव्हते. पॅरिसमध्ये १८७१मध्ये झालेल्या कामगारांच्या उठावात जरी तेथे शासनसत्ता प्रस्थापित करता आली, तरी त्या पॅरिस कम्युनला पूर्णत: कत्तलीच्या आधारे नामोहरम केले गेले होते. म्हणजेच क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर प्रतिक्रांती दबा धरून बसलेली असते. तो वर्गसंघर्षाचाच एक अपरिहार्य भाग आहे.
लेनिनचे श्रेष्ठत्व त्यातच आहे की, १९०५नंतर लेनिन या प्रतिक्रांतिकारक शक्तींशी सतत १२ वर्षे संघर्ष करत राहिले- कधी ज्ञानाच्या आधारे तर कधी संघटनेच्या मदतीने, कधी गनिमीकाव्याने तर कधी थेट भांडवली सत्तेच्या गंडस्थळावर हल्ला करून.
भांडवली झारशाहीला संसदीय व सशस्त्र आव्हान देताना, लेनिन यांना स्वयंघोषित बुद्धिवाद्यांशी, विद्वानांशी आणि तत्त्वचिंतकांशीही लढावे लागले. ती लढाई झाल्यामुळेच मार्क्सवादी चिंतनात व व्यवहारात मोलाची भर पडली. सुमारे साठ खंडांमध्ये लेनिन यांची भाषणे, लेख, ग्रंथ संग्रहित केले आहेत. त्यातील मूलभूत चिंतन पाहून आजही अनेक स्वयंभू बुद्धिवाद्यांची प्रज्ञा पणाला लागते.
लेनिनची क्रांती सशस्त्र होती, हिंसक होती. मार्क्सच्या सिद्धान्तांचा धसका घेतलेल्या भांडवलदारांनी व त्यांच्या सत्ताधीश प्रतिनिधींनी क्रांतीच्या अगोदर काही वर्षे लेनिनच्या मागे गुप्तहेरांचा ससेमिरा लावला होता. ‘व्हाईट रशियन्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही हिंसक गटांनी बोल्शेविक क्रांतिकारकांवर घोर हल्ले केले होते. अशाच एका हल्ल्यात लेनिन जखमी झाले होते. जखम जिव्हारी होती. लेनिन वाचले, पण ती जखम पूर्णत: कधीच बरी झाली नाही. अखेरीस त्यांचा प्राण गेला, तेव्हा तेथील डॉक्टरांच्या मते ती पूर्ण न भरलेली जखमच निमित्त झाली होती.
गांधीजींना मात्र थेट गोळ्या मारून नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली. आज रशियात लेनिनप्रणीत कम्युनिस्ट राजवट नाही. सुमारे तीस वर्षांपूर्वी सोव्हिएट युनियनचे विघटनही झाले, परंतु रशियात कुणीही लेनिनवर हल्ला करणाऱ्यांचा ‘गौरव’ करत नाही. (अमेरिकेतही अब्राहम लिंकनची हत्या करणाऱ्याला कुणी ‘देशभक्त’ म्हणून संबोधत नाही, की त्याची जयंती-पुण्यतिथी करत नाही. भारतात मात्र नथुरामचे पुतळे उभारले जात आहेत आणि त्याला ‘राष्ट्रभक्त’ म्हणूनही संघपरिवार संबोधतो आहे.)
रशियन क्रांतीचा इतिहास आणि त्यातील लेनिन या महानायकाच्या नेतृत्वाची विलक्षण सर्जनशील भूमिका एका लेखात सांगणे केवळ अशक्य आहे. प्रचंड खळबळ, अफाट असंतोष, सतत उलथापालथींच्या येत असलेल्या लाटा- असे दीर्घ काळ सुरू होते. झारशाही दोलायमान अवस्थेत होती. विशेषत: १९०५मध्ये जेव्हा जपानने रशियाचा नाविक युद्धातही पराभव केला, तेव्हापासून झारशाही डळमळायला लागली होती झारच्या सैन्यातही असंतोष दिसू लागला होता. काही सैनिक बंडखोरीच्या विचारात होते आणि मेन्शेविक वा बोल्शेविक हे समाजवाद्यांशी संपर्क साधू लागले होते. युद्धामुळे महागाई, टंचाई, अर्थव्यवस्थेची एकूण दुर्दशा हे सर्व अराजकी स्थितीला उत्तेजन देत होते. या पार्श्वभूमीवर १९०५चे बंड झाले, पण ते फसले. एका अर्थाने ती रंगीत तालीम होती- भविष्यात होणाऱ्या क्रांतीची. या सर्व काळात लेनिन मुख्यत: स्वित्झर्लंडमध्ये असे. जर्मनी व एकूण युरोपातही तो संपर्क प्रस्थापित करत असे. ठिकठिकाणचे बंडखोर विचारवंत, मार्क्सवादी तरुण आणि लढाऊ कामगार संघटना यांना एका साखळीत आणण्याचे लेनिनचे प्रयत्न सुरू होते. या परिस्थितीतच युरोपवर पहिल्या महायुद्धाचे ढग जमा होऊ लागले होते.
पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले १९१४मध्ये. अगोदरच क्षीण व उद्ध्वस्त स्थिती आणि त्यात आलेले युद्धाचे ओझे, यामुळे परिस्थिती झारच्या नियंत्रणाबाहेर जात होती. त्यातून रशियन सैन्याला अनेक ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागत होते. सैन्याला युद्ध नको होते; पण आज्ञेचे गुलाम असल्याने निरिच्छेने का होईना, पण युद्धात सामील होत होते.
हा असंतोष आणि अराजक उफाळून आले जानेवारी-फेब्रुवारी १९१७मध्ये. पहिले महायुद्ध मध्यावर आले असताना. सैन्यामधील अस्वस्थता व समाजातील असंतोष एकत्र येऊन एक ठिणगी पडली आणि रशियाच्या त्या वेळच्या झारप्रणीत राजधानीत- म्हणजे पेट्रोग्राडमध्ये लोक उठाव करून राजवाड्यावर गेले. तसा हा उठाय निर्नायकी होता. निकोलस झारचे धाबे दणाणले. त्याला राजवाडा सोडावा लागला. बंडखोरांनी त्याच्या कुटुंबाचा पाठलाग केला. ही फेब्रुवारीत झालेली ‘पहिली क्रांती’. त्या क्रांतीतून एक ‘हंगामी’ सरकार पुढे आले. महिन्या-दोन महिन्यांत ते हंगामी सरकारही गडगडले आणि दुसरी फेब्रुवारी क्रांती झाली. या क्रांतीला मेन्शेविकांनी पाठिंबा दिला. पण बोल्शेविकांच्या मते, हे मेन्शेविकपुरस्कृत सरकार म्हणजे निम्न-भांडवली सरकार होते. लेनिनला अभिप्रेत होती कामगारवर्गीय क्रांती आणि भांडवली व्यवस्थेचे पूर्ण निर्मूलन!
लेनिन या वेळीही पेट्रोग्राडमध्ये नव्हते. पहिले महायुद्ध सुरूच होते. बहुसंख्य सैनिकांना केव्हा एकदा युद्ध संपते, असे झाले होते. लेनिन तेव्हा फिनलँडमधून जर्मनीच्या मदतीने पेट्रोग्राडला गुप्तपणे पोचले. म्हणजेच, रशियन क्रांतीच्या महानायकाला जर्मनीची मदत होत होती. लेनिन पेट्रोग्राडला पोचल्यानंतर त्यांनी बोल्शेविक कम्युनिस्ट पार्टीच्या, मुख्य कार्यकारिणीची बैठक बोलावली.
हीच वेळ आहे ‘हंगामी’ सरकार उलथवून टाकून क्रांती यशस्वी करण्याची, असे लेनिनचे मत होते. केरेन्स्की या मध्यममार्गी व्यक्तीकडे त्या सरकारची सूत्रे होती. असे बंडाचे (क्रांतीचे) प्रयत्न सुरू आहेत, याची कल्पना केरेन्स्की यांना होती. त्यांनीही बंड मोडून काढण्याची जय्यत तयारी केली होती. त्या यादवीत मोठ्या हत्याकांडाची शक्यता होती.
त्यामुळे लेनिनच्या पक्षातही आताच हे क्रांतीचे निशाण फडकवावे का, याबद्दल तीव्र मतभेद होते; पण लेनिन यांनी मतभेद व्यक्त करणाऱ्यांना धुडकावून लावून २५ ऑक्टोबर ही तारीख सर्वंकष बंडासाठी मुक्रर केली. (युरोपियन कॅलेंडरनुसार ७ नोव्हेंबर) लेनिन यांच्या मते, सर्व ‘ऑब्जेक्टिव्ह कंडिशन्स’ क्रांतीला पूरक होत्या.
कम्युनिस्ट मंडळींमध्ये ‘ऑब्जेक्टिव्ह कंडिशन्स’ या संकल्पनेला विशेष महत्त्व आहे- म्हणजे वास्तवाचे अचूक भान. लेनिन यांना ते होते. पक्षाच्या कार्यकारिणीत बहुतेकांना नव्हते. लेनिन यांनी २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीनंतर २५ ऑक्टोबरच्या पहाटे ठिकठिकाणी सज्ज केलेल्या क्रांतिकारकांना आदेश दिला की- आता हल्ला करा; विजय आपलाच आहे. काही तासांतच प्रस्थापित केरेन्स्की सरकार व सर्व मेन्शेविक नामोहरम झाले. क्रांती यशस्वी झाली आणि जगाच्या इतिहासातील नवे पर्व सुरू झाले.
जगातली पहिलीवहिली कामगारवर्गाची क्रांती व सत्तास्थापना आणि लेनिनचे अभूतपूर्व नेतृत्व व विचार यांचे वर्णन एखाद्या लेखात करणे शक्य नाही. इतिहासकारांनी त्यावर खंडच्या खंड लिहिले आहेत आणि अजूनही त्याबद्दलची चर्चा सुरूच आहे!
लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की, लेनिन या ऐतिहासिक युगपुरुषाचे चरित्र लिहिण्याची प्रेरणा ज्यांना मिळाली, त्यांनाच गांधीजींबद्दलही तितकेच- खरे म्हणजे अधिक- आकर्षण व आदरभावना वाटत आली आहे. त्यापैकी एक महत्त्वाचे प्रकांड लेखक-पत्रकार म्हणजे लुई फिशर. फिशर यांनी लेनिनचे चरित्र लिहिले आणि महात्मा गांधींचेही! (त्यांच्या गांधीचरित्राचे अप्रतिम भाषांतर नुकतेच ‘साधना’तर्फे प्रसिद्ध झाले आहे- भाषांतरकार वि. रा. जोगळेकर हे स्वत: ज्येष्ठ गांधीवादी आहेत.)
बरोबर शंभर वर्षांपूर्वी कॉम्रेड डांगेंनी ‘गांधी विरुद्ध लेनिन’ ही वैचारिक पुस्तिका लिहिली होती; परंतु प्रत्यक्षात कॉम्रेड डांगे यांनी त्यांच्या उर्वरित जीवनात जे राजकारण केले, ते मात्र गांधी आणि लेनिन यांच्यात समन्वय प्रस्थापित करणारे होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट कॉम्रेड बी. टी. रणदिवे हे १९३०नंतर दीर्घ काळ गांधीजींच्या विरोधात होते;. पण अखेरीस त्यांनी आपण गांधीजींचे चुकीचे मापन केले, असे स्पष्टपणे सांगून गांधीजींना ‘नैतिकतेचा सेनानी व क्रांतिकारक’ (मॉरल रिव्होल्युशनरी-क्रुसेडर) असे म्हटले.
कॉम्रेड डांगेंनी तर मार्क्स-लेनिन आणि महात्मा गांधी-पंडित नेहरू यांना सर्जनशील व प्रगत राजकारणाच्या मांदियाळीत जोडून घेतले. या लेखाच्या सुरुवातीस मार्क्स-एंगल्स-लेनिन-स्टालिन-माओ अशी कम्युनिस्ट परंपरेतील मांदियाळी दिलेली आहे, परंतु आता त्यात खूपच बदल झाला आहे. बहुतेक नक्षलवादी गट आता स्वत:ला माओवादी मानतात. (मार्क्स-लेनिनवादासोबत) दोन्ही अधिकृत भारतीय कम्युनिस्ट पक्षांनी माओंचा हात सोडला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्टालिनला पूर्ण सोडले आहे. स्पेनमधल्या एका कम्युनिस्ट पक्षाने लेनिनलाही सोडून स्वतःला फक्त ‘मार्क्सवादी कम्युनिस्ट’ म्हटले आहे. खुद्द रशियात आज लेनिन आणि स्टॅलिन दोघांना बऱ्याच अंशी ‘इतिहासजमा’ केले आहे- कम्युनिस्ट पक्षासकट! पूर्व युरोपातील जवळजवळ सर्व कम्युनिस्ट पक्ष आता तेथील प्रस्थापित राजकारणाबाहेर फेकले गेले आहेत. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आहे, पण माओंचे महत्त्व आता केवळ माओंचा मृतदेह स्मारक म्हणून जपला आहे, इतकेच उरले आहे- जसे रशियात लेनिनही तशाच शवपेटीत स्मारक म्हणून जपला आहे. क्युबात मात्र अजून मार्क्स-लेनिन तळपत आहेत.
ज्या मांदियाळीने केवळ एकोणिसावे शतकच नव्हे तर विसावे व एकविसावे शतक घडवले, ती मांदियाळी अशी सहज पुसली जाणार नाही. प्रदीर्घ मानवी इतिहासाचे ते मानदंड आणि दीपस्तंभ आहेत!
(‘साधना’ साप्ताहिकाच्या २५ एप्रिल २०२०च्या अंकातून साभार)
.............................................................................................................................................
लेखक कुमार केतकर ज्येष्ठ पत्रकार-संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत.
ketkarkumar@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Ram Jagtap
Thu , 23 April 2020
@ Rajesh Joshi - 'अक्षरनामा'वर प्रतिक्रिया देताना लॉग इन करावे लागते, ते तुमचं नाव, मेल आयडी दिल्यानंतर. शिवाय तुम्ही कुठे बसून काय पाहताय हे ऑनलाईन कळते, जगभर सगळीकडे, सर्वांना कळते. त्यासाठी काहीही रेकॉर्ड करण्याची गरज नसते. ऑनलाईन काहीही लपून राहत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. गैरवापर हा सायबर क्राईमच्या कक्षेत येतो. आम्ही गैरवापर करत नाही. गाढवाचा शोध घेतो इतकेच. शोध घेणे हा गुन्हा नसतो.
Rajesh Joshi
Thu , 23 April 2020
उत्तम लेख आहे. याविषयावर असे अधिक विश्लेषणपर लेख वाचायला मिळाले तर आवडेल. खालील प्रतिक्रिया वाचल्या. शिंदे यांच्या प्रतिक्रियांविषयी बोलण्याइतके मी पोर्टल फॉलो केलेले नाही. परंतु जगताप यांना विनंती करावीशी वाटते, आपल्या वाचकांचा नाव आणि पत्ता आपण त्यांच्या अपरोक्ष रेकॉर्ड करत असाल, तर तो कायदेशीर गुन्हा ठरतो. आपल्यासारख्या अभ्यासू पत्रकाराला याची कल्पना असेल, अशी आशा वाटते. कोणी खऱ्या अथवा वेगळ्या नावाने प्रतिक्रिया नोंदवणे हा गुन्हा मानला जात नाही. प्रतिक्रिया शिवराळ किंवा द्वेषपूर्ण असल्यास ती डिलीट करणे अधिक योग्य म्हणता येते. परंतु कोणत्याही संकेतस्थळाने वाचकांना माहिती न देता अशा पद्धतीने त्यांचे नाव आणि पत्ते रेकॉर्ड करणे हा सायबर गुन्हा मानला जातो. कृपया काळजी घ्यावी.
Ram Jagtap
Wed , 22 April 2020
@ Meghana Malusare - ताई, तुम्हाला या शिंदे नामक प्राण्याचा एवढा पुळका का आलाय माहीत नाही. पण हा प्राणी इथे येतो तेव्हा 'घाण' टाकण्यापालिकडे काही करत नाही. त्याला असं वाटत असावं की, ऑनलाईन माध्यमात आपली ओळख लपवली, नाव लपवलं म्हणजे इतरांना काही कळत नाही. पण या गाढवाला हे माहीत नाही की, तुम्ही फक्त गुगलवर गेलात तरी तुम्ही कुठे बसून ते पाहत आहात; मोबाईलवर की डेस्कटॉपवर असं सगळं काही तुमच्या नाव-पत्ता यासह कळते. आमच्या पोर्टललाही ही सोय आहे. त्यामुळे या प्राण्याची सगळी खबरबात आमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही अशा मूर्ख प्राण्याची बाजू घेऊ नये, ही नम्र विनंती.
Meghana Malusare
Wed , 22 April 2020
जगताप जी, आपण या संकेतस्थळाचे संपादक आहात. एखाद्या वाचकाने सभ्य भाषेत तक्रार केली असता आपण पातळी सोडून टीका करणे शोभत नाही. शिंदेजींनी रास्त मुद्दा उपस्थित केला आहे. मला व्हॉट्स-अॅपवर या लेखाची लिंक आली होती, परंतु हा लेख साधनाच्या संकेतस्थळावर असताना आपण केवळ पुनर्प्रकाशन करून काय हशील! आपण स्वतः लेख लिहून साधनाच्या लेखाचा निर्देश करणे योग्य राहिले असते. परंतु आपली प्रतिक्रियेही ही पातळी पाहून खेद झाला. शिंदेजींच्या प्रतिक्रियेमुळे साधनाची लिंक मिळाली याबद्दल त्यांचे आभार, त्यांनी तिथल्या गुळाचाही निर्देश केला आहे, त्यामुळे आमच्यासारख्या वाचकांचा लाभ होतो. जगताप यांनी स्वतःशी गाढव-गूळ यांचा खेळ खेळत राहावे.
Ram Jagtap
Wed , 22 April 2020
@Ramesh Shinde - गाढवांनी तत्त्वविचाराच्या गप्पा करायच्या नसतात. गाढवांना साधी गुळाची चव पण कळत नाही, त्यांनी इतरांना उपदेश करणे हे मूर्खपणाचे असते.
ramesh shinde
Wed , 22 April 2020
साधना साप्ताहिकाने या विषयावर काढलेला विशेषांक उत्तम आहे. त्यात संपादक विनोद शिरसाठ यांचा लेख, कुमार केतकर यांचा लेख, तसेच मॅक्झिम गॉर्की यांनी लिहिलेला लेनिन यांच्यावरील दीर्घ लेख समाविष्ट करण्यात आला आहे. आपण अनेकदा साधना साप्ताहिकातील लेख अक्षरनामावर पुनर्प्रकाशित करत असता, परंतु साधना साप्ताहिकाच्या संकेतस्थळाचा दुवा देत नाही. केतकर सरांचा लेख साधनाच्या वेबसाइटवर असताना आपण इथे पुनर्प्रकाशित करून काय साधता, ते आपल्यालाच ठावूक. परंतु, साधना वेबसाइटचा दुवा देणे संपादकीय सौजन्याचे ठरले असते (https://weeklysadhana.in/en/25april2020). असो. आपल्याला सौजन्याचे वावडेच असावे, असे इथले इतर लेखन वाचून वाटते. शिवाय, स्वतःहून आपण वैविध्यपूर्ण लेख मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे फारसे दिसत नाही. पुस्तकांमधले अंश, साधनेतील लेखांचे पुनर्प्रकाशन, यांवर अधिक भर असतो. असो.