फ्रान्सवगळता युरोपातली सगळी राष्ट्रं राजेशाही असलेली होती आणि त्यावर सगळे एकमेकांचे चुलत, मावस, आते, मामे भाऊच राज्य करत होते.
सदर - पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
आदित्य कोरडे
  • हे सगळे राजे एकमेकांचे भाऊबंद होते
  • Tue , 21 April 2020
  • सदर पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर पहिले महायुद्ध First World War जर्मनी Germany रशिया Russia फ्रान्स France इंग्लंड England

(वरील छायाचित्राविषयी - उभे असलेले डावीकडून १. राजा हाकोन सहावा नॉर्वेचा राजा, २. बल्गेरियाचा राजा झार फर्डीनंड, ३.पोर्तुगालचा राजा मन्युएल दुसरा, ४. जर्मनीचा कैसर विल्हेल्म दुसरा, ५. हेलेनीसचा राजा जॉर्ज पहिला, आणि ६. उंचच उंच राजा अल्बर्ट पहिला, बेल्जियमचा राजा बसलेले उजवीकडून ७. स्पेनचा राजा आल्फोन्सो तेरावा, ८. इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा (आपल्याकडचा प्रसिद्ध पंचम जॉर्ज- “भो पंचम जॉर्ज भूप धन्य, विबुधामान्य भूवरा, पाळी ही वसुंधरा...” हे गाणे मराठी शाळांतून तेव्हा घोकायला लावायचे ते याच्या नावाचेच) आणि ९. डेन्मार्कचा राजा फ्रेडरिक सातवा. हा फोटो २० मे १९१० रोजी इंग्लंडचा राजा एडवर्ड सातवा याच्या अंत्येष्टीसाठी एकत्र आले तेव्हा काढलेला आहे.)

१.

पहिले महायुद्ध सुरू कसे झाले याचा परामर्श घेताना अनेक व्यक्तिमत्त्वांशी आपली ओळख झाली. यातले काही पुढेही आपल्याला भेटत राहतील, पण काहींचा पुढे उल्लेख येत नाही. हे लोक पहिल्या महायुद्धाचा भडका उडायला कारणीभूत झाले, या राजकीय नाट्याचे ते रंगमंचावरचे सक्रीय कलाकार होते. त्यांचे पुढे काय झाले याविषयी…

१) गाव्रीलो प्रिन्सिपबद्दल मागे आलेलेच आहे. ज्या तेरेत्सीन तुरुंगात तो मेला, तेथे पुढे दुसऱ्या महायुद्धात जर्मनीचा ज्यू कॉन्सन्ट्रेशन कॅम्प होता. १४,५००० लोक तेथे कैदी म्हणून आणले गेले आणि ३३००० ज्यू व युद्ध कैदी मारले गेले. या कॅम्पचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे १९४३ साली रेड क्रोस संघटनेच्या एका संयुक्त गटाला (ज्यात इतर देशांच्या रेड क्रॉस संघटनेतील प्रतिनिधी आहेत असा गट) या कॅम्पची तपासणी करण्याकरता बोलावले गेले. हा एक जर्मन प्रपोगंडाचा भाग होता, पण त्यानिमित्ताने तरी काही काळ तिथल्या अभागी कैद्यांना चांगले अन्न आणि कपडे मिळाले... आता हा भाग झेक रिपब्लीकमध्ये येतो.

२) फ्रांझ फर्डिनांडच्या हत्येमागचा सूत्रधार आणि The Black Hand संघटनेचा संस्थापक द्रगुतीन दिमित्रीवीच उर्फ एपिस याच्यावर त्यांच्या सर्बियन शासनाने लष्करी कारवाई केली (Court Marshal) आणि २४ जून १९१७ साली त्याला गोळ्या घालून मारले. आरोप होता १९०३ साली त्याने केलेला राजा अलेक्झांडर आणि राणी ड्रेगाचा निर्घृण खून.

३) एपिसचा प्रतिस्पर्धी आणि महान मुत्सद्दी सर्बियन पंतप्रधान निकोला पॅसेज हा युद्धकाळात सर्बियाचा पंतप्रधान राहिला. त्याने आपल्या देशाची वाताहत पहिली. पुढे युद्ध संपल्यावर व्हर्साय इथे झालेल्या वाटाघाटीत सर्बियाच्या वतीने भाग घेतला आणि त्याने सर्बियाचे व सर्व स्लाव लोकांचे स्वप्न असलेले (प्रीन्सिपचेसुद्धा) संघराज्य म्हणजे युगोस्लाविया बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९२६ साली तो वारला

३) ऑस्ट्रो हंगेरियाचा सम्राट फ्रान्झ जोसेफ नोव्हेंबर १९१६ साली वारला आणि तो हप्स्बार्ग राजघराण्याचा शेवटचा शासक ठरला. त्याचा पुतण्या कार्लने अल्प काळ शासन केले, पण १९१८ साली त्याला पदच्युत केले गेले.

४) जुलै पेचातला महत्त्वाची व्यक्ती असलेला ऑस्ट्रियाचा परराष्ट्रमंत्री काउंट लिओपोल्ड बर्खटोल्डला १९१५ साली बडतर्फ केले गेले. त्यानंतर त्याने राजकारणातून निवृत्ती स्वीकारली. १९४२ साली तो हंगेरीतच वारला.

५) ऑस्ट्रियाच्या सर्बियावरील लष्करी कारवाईत खोडा घालणारा हंगेरियन प्रधानमंत्री इस्पहान तिशा हंगेरियन प्रधानमंत्री म्हणून युद्ध जवळ जवळ संपेपर्यंत कार्यरत राहिला. युद्धाच्या शेवटी शेवटी हंगेरीत साम्यवादी (बोल्शेविक) क्रांती झाली आणि क्रांतिकारकांनी ३१ ऑक्टोबरला त्याच्या घरात घुसून बायकोसमोरच त्याला गोळ्या घालून मारले.

६) ऑस्ट्रियन सेनापती कोनराड फॉन हॉटझेनडोर्फ हा युद्धात ऑस्ट्रियाचा सेनाध्यक्ष होता. त्याचे लष्करी कर्तृत्व आणि ऑस्ट्रियन सैन्याची कामगिरी इतकी लज्जास्पद होती की, शेवटी त्याला सेवेतून बडतर्फ केले गेले. पुढे तो एक निराश, हरलेला माणूस म्हणून जगला आणि १९२५ साली तशाच शोचनीय परिस्थितीत वारला.

७) बेथमान हर्त्विग जर्मनीचा १९१७ सालापर्यंत चान्सेलर होता, पण उत्तरोत्तर त्याचा राजकारणातला प्रभाव कमी होत गेला आणि सत्ता हळूहळू जर्मन सैन्याच्या हातात गेली. १९१७ साली त्याला बडतर्फ केले गेले. १९२१ साली तो विमनस्क अवस्थेत वारला.

८) जर्मनीचा शहेनशहा कैसर विल्हेल्म दुसरा हा सर्व युद्धभर जर्मनीचा सम्राटच राहिला. शेवटी युद्ध हरल्यावर युद्ध बंदीच्या दोन दिवस आधी त्याला गादी सोडून परागंदा व्हावे लागले. त्याने हॉलंडमध्ये राजाश्रय घेतला. त्याला पकडून आणून त्याच्यावर खटला चालवून शिक्षा करायचा जेत्यांचा मनोदय सफल झाला नाही. तो हॉलंडमध्येच मृत्युपर्यंत म्हणजे ४ जून १९४१ पर्यंत राहिला. तो काही बाबतीत थोडा सुदैवी होता असे म्हणता येते. त्याला शत्रू फ्रान्सला दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने खडे चारल्याचे आणि बेचिराख करत पूर्णपणे जिंकलेले पाहण्याचे भाग्य लाभले. त्याने त्या वेळी हिटलरला पत्र लिहून त्याचे अभिनंदनही केले होते. त्यात त्याने परत एकदा जर्मनीत राजेशाही स्थापन करावी व त्याला गादीवर बसवावे असे सुचवले होते. अर्थात हिटलरने त्याकडे दुर्लक्ष केले. (असे म्हणतात की, ते पत्र हिटलरने मोठ्याने वाचून दाखवले आणि मग इतर जनरल्सकडे पाहून उद्गारला, “काय मूर्ख माणूस आहे!”) त्याचा भाऊ आणि रशियाचा सम्राट झार निकोलसपेक्षा मात्र तो खरेच सुदैवी होता!

९) रोमोनाव्ह घराण्याचा शेवटचा शासक झार निकोलसला १९१७ साली साम्यवादी क्रांतिकारकांनी पदच्युत केले आणि कैदेत टाकले. १७ जुलै १९१८ साली त्याला बायको-पाच मुलांसमवेत गोळ्या घालून मारले गेले. सगळ्यात धाकटा मुलगा अलेक्सी तेव्हा १४ वर्षांचा होता. दिसायला अत्यंत सुंदर असलेली त्याची  मुलगी राजकुमारी अनास्ताशिया ही त्या हत्याकांडातून वाचली असावी आणि युरोपात कुठे कुठे राहत असावी, अशा वावड्या नेहमी उठत. याविषयी अनेक चित्रपटही निघाले, पण त्या फक्त अफवाच होत्या.

१०) झारचा परराष्ट्रमंत्री सर्गी सात्सोनाव्हला पुढे १९१६ साली झारच्या बायकोने, झारीनाने बडतर्फ केले. रशियात जेव्हा बोल्शेविक क्रांती झाली, तेव्हा त्या क्रांतीचा विरोध करणाऱ्या गटात तो सामील झाला. त्यांच्या पराभवानंतर त्याने फ्रान्समध्ये आश्रय घेतला. तेथेच तो १९२७ साली वारला.

११) प्वान्कारे १९२०पर्यंत फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष राहिला. पुढे तो दोनदा फ्रान्सचा पंतप्रधानही झाला. १९३४ साली तो वारला, तेव्हा तो फ्रान्समधला विजयाचा शिल्पकार म्हणून लोकप्रिय आणि आदरणीय नेता होता.

१२) फ्रेंच पंतप्रधान रेने विवियानी हा मात्र इतका सुदैवी नव्हता. सुरुवातीच्या फ्रेंच सैन्याच्या पराभवाला त्याला जबाबदार धरत त्याला ऑक्टोबर १९१५ मध्ये पदावरून हटवले गेले. त्यापुढे तो राजकारणातून निवृत्त झाला आणि निवृत्तीतच १९२५ साली वारला.

१३) ब्रिटिश परराष्ट्रमंत्री सर एडवर्ड ग्रे १९१६ सालपर्यंत उदारमतवादी मजूर सरकारचा परराष्ट्रमंत्री म्हणून कार्यरत होता. पुढे ते सरकारच कोसळले. युद्धानंतर १९२० साली तो अमेरिकेत इंग्लंडचा राजदूत म्हणून गेला. पण डोळे आणि प्रकृती साथ देईनाशी झाल्याने निवृत्ती स्वीकारली. तो १९२८ साली वारला.

१४) इंग्लंडचे नाविकदल मंत्री (First Sea Lord Of Admiralty, काय खतरनाक बिरुद आहे, मस्त! हे इंग्लिश लोक नावं भारीच ठेवतात आपण अर्थमंत्री किंवा finance Minister म्हणतो ते मात्र Chancellor Of Exchequer म्हणतात!) असलेल्या, स्वत:च्या अखत्यारीत नौसेनेला युद्धतयारी करण्यासाठी आदेश देणाऱ्या, तुर्कस्तानला जहाजांच्या सौद्यात तोंडघशी पडणाऱ्या विन्स्टन चर्चिल यांनी महायुद्धाच्या सुरुवातीला जवळ जवळ वर्षभर नाविकदल मंत्री म्हणून काम पहिले. पुढे दर्दानेल्स आणि गालीपोलीच्या तुर्की मोहिमेत आलेले प्रचंड अपयश आणि हानी करता जबाबदार धरून त्यांना नोव्हेंबर १९१५ मध्ये पदावरून हटवले गेले. ते सरकारमध्ये काही काळ राहिले, पण मग त्यांनीच राजीनामा दिला अन प्रत्यक्ष युद्धात सहभागी झाले. ते चक्क खंदकात जाऊन लढले, चांगले चार महिने. पुढे त्यांना परत सरकारमध्ये बोलावले गेले. त्यांनी हवाईदल मंत्री आणि दारूगोळा निर्मितीचे कामही पहिले. युद्धानंतर ते इंग्लंडचे अर्थमंत्री होते, पण दार्दानेल्स मोहिमेचा कलंक फार मोठा होता. त्यामुळे नंतर ते अनेक वेळा या कारणावरून टीकेचे धनी होत त्यांना अनेक चौकशी आयोगांना सामोरे जावे लागले.

१९२९ नंतर जवळ जवळ १० वर्षे ते राजकीय विजनवासातच गेले होते. त्यांनी कायम नाझी पक्ष आणि हिटलरच्या जर्मनीतल्या उदयावरून इंग्लंडला सावध करायचा प्रयत्न केला, पण सरकार आणि लोकमत त्यांच्या विरोधात होते. लोकांनी त्यांची युद्धखोर, प्रसिद्धीलोलुप म्हणून हेटाळणी केली. अखेर दुसऱ्या महायुद्धाचे ढग जसजसे क्षितिजावर जमू लागले, तसतसे त्यांचे म्हणणे लोकांना पटले आणि त्यांचे भाग्य पुन्हा उजळले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर सप्टेंबर १९३९ साली परत एकदा ते ब्रिटनचे नाविकदल मंत्री झाले. मे१९४० साली ते पंतप्रधान झाले. नाझी झंझावातापुढे एकट्या पडलेल्या ब्रिटनमध्ये ते खंबीरपणे पाय रोवून उभे राहिले. जवळपास निश्चित झालेल्या पराभवातून इंग्लंडला बाहेर काढून विजयाप्रत घेऊन गेले. नंतरही ते इंग्लंडचे पंतप्रधान झाले. १९५५ साली वयाच्या ८०व्या वर्षी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आणि १९६५ साली ते वयाच्या ९०व्या वर्षी वारले. आपल्या दोन्ही युद्धांच्या तसेच आधी भाग घेतलेल्या बोअर युद्धाच्या हकिगती त्यांनी लिहिल्या. इतरही विपुल साहित्य लिहिले, जे लोकप्रिय झाले. साहित्य सेवेबद्दल त्यांना १९५३ साली नोबेल पुरस्कारही मिळाला. ते चित्रही उत्तम काढत असत. ते वारले तेव्हा ते फक्त ब्रिटनमधीलच नाही तर जगातील सगळ्यात जास्त प्रसिद्ध आणि सन्माननीय व्यक्ती होते.

एका अर्थी त्यांच्या गुंतागुंतीच्या आणि विरोधाभासाने भरलेल्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहता ते १९व्या आणि २०व्या शतकाच्या संधिकालात युरोपात प्रचलित असलेल्या सनातनी आणि आधुनिक, उदार आणि सनातनी, लोकशाहीवादी आणि साम्राज्यवादी अशा परस्परविरोधी विचारधारेचे विचित्र मिश्रण होते. तत्कालीन ब्रिटिश समाजपुरुषच त्यांच्या रूपाने इतिहासाचे ओझे खांद्यावर घेऊन उभा राहिला आहे, असे त्यांच्या चरित्राकडे पाहून नेहमी वाटते.

असो.

२.

आता जर्मनीची दोन आघाड्यांवर लढण्यासाठीची योजना आणि सुरुवातीच्या घटना याबद्दल पाहू. पण त्याकडे जाण्याआधी म्हणजे पहिल्या महायुद्धाची कहाणी आता खऱ्या अर्थाने सुरू करताना युरोपचा एक थोडक्यात आढावा…

१९व्या शतकातल्या युरोपकडे बघताना जाणवते की, बऱ्याच घडामोडी, उलथापालथी तेथे घडत होत्या, पण त्याची दखल मात्र सर्वच पातळ्यांवर घेतली जात नव्हती. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात कामगार वर्ग - मध्यमवर्ग उदयाला आला आणि झपाट्याने फोफावला. विशेष म्हणजे हा वर्ग चरितार्थाच्या गरजेकरता म्हणून का होईना, पण शिकलेला आणि मुख्य म्हणजे इतर शेतकरी, शेतमजूर वर्गाप्रमाणे जमिनीशी बांधलेला न राहता कामाच्या शोधात देशांतर करणारा होता. त्या काळी जगताला कमीत कमी युरोपातला कुठलाही माणूस कुठेही जाऊन राहू शकत असे, नोकरी-धंदा करू शकत असे, शिक्षण घेऊ शकत असे. पासपोर्ट-व्हिसा असल्या भानगडी नव्हत्या. राष्ट्राराष्ट्रांच्या सीमा इतक्या उंच झालेल्या नव्हत्या.

शिक्षणाचा आणखी एक परिणाम (‘साईड इफ्फेक्ट’ म्हणा हवं तर) म्हणजे या वर्गात वैचारिक चळवळी मूळ धरू लागल्या. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जनताही आतापर्यंतच्या इतिहासाप्रमाणे फक्त निष्क्रिय पार्श्वभूमी/ मूकदर्शक न राहता सक्रीय घटक बनू लागली. राजेशाह्या, सामंतवाद यांना या नवीनच सक्रिय झालेल्या घटकाशी जुळवून घेत पुढचे डावपेच आखावे लागणार होते. आतापर्यंतच्या राजा, देव, धर्म यांच्यासाठी बलिदान करण्याच्या भावनाप्रधान आव्हानाला देश, देशप्रेम, देशभक्ती, राष्ट्रभक्ती यांची फोडणी दिली गेली. राष्ट्रवादाचा उगम आणि त्याची १९व्या (आणि २०व्याही) शतकातली उत्क्रांती याची साक्ष देतात.

वरकरणी राजाला नामधारी केलेलं आहे आणि राज्यशकट हाकण्यात जनतेला काही अधिकार दिले गेले आहेत, असे दाखवून काही काळ तरी या नव्या घटकाला काबूत ठेवण्याचे प्रयत्न केले गेले. त्याला मर्यादित प्रमाणात यशही मिळाले. पण सर्वसामान्य जनतेतून वर आलेल्या अनेक विचारवंतांना यातला फोलपणा कळत होता. मार्क्स-एंगल्स, रोझा लग्झेम्बर्ग, लेनिन असे अनेक लोक राष्ट्र व राष्ट्रवाद या फोल आणि भ्रामक संकल्पना असून त्या एकजूट होऊ पाहणाऱ्या शेतकरी-कामगार वर्गात फुट पाडून त्यांचे शोषण करण्यासाठी, त्यांना गुलाम बनवण्यासाठी वापरल्या जातात, अशा प्रकारची मते मांडू लागले होते.

या नव मध्यमवर्गाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो सद्य राजकारण, अर्थव्यवस्था, शासनाची धोरणे या बाबत कमालीचा जागरूक होता. शिवाय नव्याने उदयाला आलेल्या शहरांमध्ये, औद्योगिक वसाहत्यांमध्ये एकत्र झालेला होता. शिक्षण, पुस्तक, पत्र, प्रवास, निरनिराळी संमेलने आणि मंडळे, बातम्या अशा निरनिराळ्या मार्गाने तो सांधला गेलेला होता. ही परिस्थिती विचारमंथन आणि वैचारिक प्रबोधनाला अत्यंत पोषक ठरत होती.

हा वर्ग मोठ्या प्रमाणात ग्राहकही असल्याने नवअर्थव्यवस्थेचा कणा बनत चालला होता. १७व्या -१८व्या शतकात  साम्राज्यवादी सत्ता वसाहतीतून मसाले, कापडचोपड, चहा, जड-जवाहीर, रेशीम असल्या वस्तू येत, त्या प्रामुख्याने श्रीमंत, धनिक, जमीनदार, सरंजामदार, राजे उमराव यांच्यासाठी. म्हणजे आंतरारष्ट्रीय व्यापार कितीही फायद्याचा असला तरी त्याचा मुख्य घटक जो ग्राहक तो या संभ्रांत वर्गातून येत असल्याने त्यांच्या इच्छामर्जी याचीच कदर व्हायची. पण औद्योगिक क्रांतीनंतर या व्यापाराचे किंवा व्यवहाराचे स्वरूप अमूलाग्र बदलले. कच्चा माल वसाहतीतून आणून त्यावर प्रक्रिया करून तो विकणे अधिक किफायतशीर होते, पण त्याकरता मध्यमवर्गाची, त्यांच्या क्रयशक्तीची गरज होती. त्यामुळे नव्याने उदयाला आलेल्या भांडवलदार वर्गाला त्यांची दखल घेणे भाग होते. 

औद्योगिक क्रांतीनंतर धर्माची सर्वसामान्य लोकांवरची त्यांच्या जीवनावरची पकड जसजशी ढिली होऊ लागली, तसतसे प्रबोधनाचे एक पर्व युरोपात सुरू झाले. १९व्या शतकाचा इतिहास पाहिल्यास हे आपल्याला सहज जाणवते. नवनवे वाद, क्रांत्या, चळवळी, सामाजिक प्रयोग यांनी १९व्या शतकाचा युरोप ढवळून निघालेला दिसतो. यातला सगळ्यात प्रभावी वाद म्हणजे राष्ट्रवाद. औद्योगिक क्रांतीनंतर झालेल्या प्रगतीचे एक फलित म्हणजे तिने वसाहतवादाला साम्राज्यवादाला, सरंजामशाहीला दिलेले बळ. युरोपबाहेरच्या उर्वरीत जगाला (म्हणजे अमेरिका सोडून- आशिया आणि आफ्रिका प्रामुख्याने) आपल्या दावणीला बांधून, गुलाम बनवून  त्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर युरोपची उच्च मानवी संस्कृती बहरत होती. कला-साहित्य-समाजकारण-राजकारण- संशोधन अशा निरनिराळ्या विषयांत नेत्रदीपक प्रगती होत होती.

उच्चतर अशा मानवी संस्कृतीने युरोपात चांगलेच बाळसे धरले होते, पण अर्थात तिथेही दैन्य, उपासमारी, बेकारी, बकाली होतीच. शेतकरी – शेतमजूर यांच्या बरोबर नव्यानेच उदयाला आलेल्या कामगार वर्गाचे जीवन हलाखीचे होते. त्यांना रोज १६-१६ तास काम करावे लागत होते आणि तरी पगार तुटपुंजा मिळत असे. कामगारांचे हक्क वगैरे गोष्टी प्रत्यक्षात यायला अजून बराच काल जायचा होता. कामगार स्त्रिया आणि मजुरी करणाऱ्या लहान मुलांचा प्रश्न अजूनच जटील होता. कामगार चळवळी हळूहळू का होईना, पण निश्चित आकार घेऊ लागल्या होत्या. त्यांच्या मागण्यांना हळूहळू धोरणात्मक स्वरूप येत चालले होते. भांडवलदार मालक-कारखानदारांना अर्थातच हा फार तापदायक प्रकार वाटत होता आणि ते कोणत्या मार्गाने कामगार लढा दाबून टाकता येईल याच्या विचारात होते.

जॉन जॉरेस हा त्या सुमारास फ्रान्समधला मोठ्या वकुबाचा कामगार नेता. (इथे हे स्पष्ट केले पाहिजे की, हे फ्रेंच किंवा जर्मन उच्च्चार इंग्लिशप्रमाणे नसल्याने जसे आपण त्यांचे स्पेलिंग वाचतो तसे ते उच्चारात नाहीत. उदा. जॉन जॉरेस याचा फ्रेंच लोक ज्यां जॉरे असा उच्चार करतात.) तो गेले काही दिवस मोठ्या काळजीत होता. युरोपातले बडे कारखानदार आणि अनेक राजकारणी कामगारांचा लढा दाबून टाकण्याचा एक सोपा व प्रभावी उपाय म्हणून आता उघड उघड युद्ध सुरू केले पाहिजे असे बोलू लागले होते. राष्ट्राराष्ट्रातली स्पर्धा आणि परस्परांना शह-काटशह देण्यासाठीचे गुप्त, उघड करारमदार याने अभावितपणे सर्व युरोपियन राष्ट्रं शस्त्रसाठा करू लागली.

पण मागे सांगितल्याप्रमाणे १८७० नंतर म्हणजे जवळपास ४४ वर्षे युरोपच्या मुख्य भूमीवर युद्ध असे झालेच नव्हते. युरोपातल्या बहुतांश राष्ट्राच्या सेनानींना (फ्रान्स-ब्रिटनचा अपवाद वगळता- आफ्रिका, भारत, अफगाणिस्तान, सुदान, चीन अशा ठिकाणी युद्धाचा अनुभव होता.) प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव असा नव्हताच. शिवाय मधल्या जवळपास अर्ध्या शतकाच्या कालखंडात झालेली औद्योगिक प्रगती युद्धावर, युद्धतंत्रावर  कोणते इष्ट-अनिष्ट परिणाम करणार आहे, याचा स्पष्ट अंदाज तर कुणालाच येणे शक्य नव्हते.

३.

या प्रबोधनाच्या काळात आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे स्त्रियांचे राजकीय स्थान आणि मताधिकार यानिमित्ताने झालेली चळवळ. त्याला ‘सफ्राजेट चळवळ’ म्हणून ओळखले जाते. (सफ्रेज म्हणजे मताधिकार किंवा नागरी हक्क).

प्रबोधनाचे आणखी एक फलित म्हणजे भारतासारख्या युरोपीय राष्ट्रांची वसाहत असलेल्या राष्ट्रात सुरू झालेल्या स्वातंत्र्य चळवळी आणि स्वातंत्र्य लढे. २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत यातील बहुतांश देशांना स्वातंत्र्यही मिळाले. पण भारतासारखे एखाद-दोन अपवाद सोडता या नवस्वतंत्र राष्ट्रांत लोकशाही अभावानेच आलेली दिसते, हेही एक आश्चर्यच.

विल्हेल्मसारख्या कैसर, राजा, महाराजा, सम्राट अशी बिरुदावली मिरवणाऱ्या लोकांना तर आपण कोणत्याही पेचप्रसंगावर आपले नातेसंबंध, दोस्ती, ओळख वगैरे वापरून तोडगा काढू शकतो असे वाटत होते. युरोपातली फ्रान्सवगळता सगळी राष्ट्रं ही राजेशाही - नाममात्र का होईना - असलेली होती आणि त्यावर सगळे एकमेकांचे चुलत, मावस, आते, मामे भाऊच राज्य करत होते. पण ही एक अंधश्रद्धाच होती. बाकी युद्ध वगैरे मोठ्या घटना सोडूनच द्या, पण ते एकमेकांच्या आयुष्यात येणाऱ्या आपत्तीपासूनही एकमेकांना वाचवू शकले नाहीत. फ्रान्स आणि इंग्लंडच्या बरोबरीने युद्धात उतरलेल्या रशियात क्रांती झाली, तेव्हा झार निकोलसला त्याचा भाऊ असून जॉर्ज वाचवू शकला नाही. त्याला इच्छा झाली नसेल का? ज्या भयानक पद्धतीने त्याचा आणि त्याचा कुटुंबियांचा अंत झाला, हे पाहून त्याचे आतडे पिळवटून निघाले नसेल का? पण हे राजे खरेच खूप दुबळे होते. फार थोड्या गोष्टींवर त्यांचे नियंत्रण होते.

रशियाचा झार निकोलस डावीकडे (त्या सगळ्यांचा लाडका निक्की) आणि इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचवा एकत्र आहेत, दोघांच्या चेहऱ्यातले साम्य बरेच काही सांगून जाते. त्यांच्या आया एकमेकींच्या सख्ख्या बहिणी, तर निकोलसची बायको अॅलिक्स (झारिना) ही जॉर्जची आणि अर्थातच निकोलसाची मावस बहीण होती.

.............................................................................................................................................

या सदरातील आधीच्या लेखांसाठी पहा -

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/156

.............................................................................................................................................

लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

ADITYA KORDE

Thu , 23 April 2020

Gamma Pailvan, नमस्कार, लिंक नक्की पाहीन. उत्तेजनाबद्दल मन:पूर्वक आभार. लिखाण चालू आहेच आता इथून पुढे ते मिसळपाव वर टाकत जाईन. (तुम्ही तिथे आहातच हे माहिती आहे.)


Gamma Pailvan

Wed , 22 April 2020

नमस्कार आदित्य कोरडे!
चेकोस्लोव्हाक लेजन बद्दल विकिवर माहिती आहे : https://en.wikipedia.org/wiki/Czechoslovak_Legion
एक विनंती आहे. जरी प्रतिसाद मिळंत नसला तरी कृपया तुमचं लेखन अजिबात थांबवू नका. एक संदर्भ म्हणून तुमचे लेख अनमोल आहेत. तसंच खूपशा मराठी वाचकांना पठडीबाह्य ऐतिहासिक दृष्टीकोन कसा हाताळायचा ते पटकन कळंत नाही. तुमचे लेख वाचूनंच त्याची सवय होणार आहे. मराठी विचारविश्व संपन्न करण्यासाठी तुमचा हातभार लागतोय.
आपला नम्र,
-गामा पैलवान


ADITYA KORDE

Wed , 22 April 2020

Gamma Pailvan, Thanks for This Intersting info. Can you share its source? The First chapter(How world war1 started) will be completed in next article. But due to poor response we are discontinuing the series on Aksharnama . Thanks for appreciation Aditya Korde


Gamma Pailvan

Tue , 21 April 2020

नमस्कार आदित्य कोरडे,
रंजक व रोचक लेखमालिकेबद्दल आभार. तुम्ही बरीच मेहनत घेतलेली आहे. त्याचे कौतुक आहे.
हिटलरसंबंधी एका घटनेवर भाष्य करावंसं वाटलं म्हणून हा संदेश लिहितोय. हिटलरला अभिनंदनपर पाठवलेल्या पत्रात कैसर दुसऱ्या विलहेल्मने स्वत:स राजा म्हणून प्रस्तावित केलं. त्यामागे एक कारण आहे, असं मला वाटतं.
१९१७ ते पुढील तीनेक वर्षं चेकोस्लोव्हाक लेजन नावाची एक लोकसेना उभी राहिली होती. तिने रशियन नागरी युद्धात भाग घेतला होता. तिच्या ताब्यात ट्रान्स सैबेरियन रेल्वे व सैबेरियातली अनेक नगरे होती. ही पूर्णपणे स्वयंसेवकांची भरती होती. त्यांना लढायचा पूर्वानुभव शून्य होता. तरीपण ऑस्ट्रिया व हंगेरीच्या दडपणातनं मुक्त होण्यासाठी लोक एकत्र आले होते (निदान तसा दावा तरी होता). हिची संख्या सुमारे एक लाखापर्यंत फुगली.
या लोकसेनेस कालांतराने गळती लागली. कित्येक जवान बेपत्ता झाले, अनेकांनी कम्युनिस्टांशी हातमिळवणी केली. पण तरीही सुरुवातीस हिला भरपूर विजय मिळाले. विशेषत: सैबेरियात प्रचंड यश मिळाले. हिने १९१८ मध्ये एकातेरिनबर्ग वर ताबा मिळवला. या हालचाली लेनिनला दिसंत होत्या. याआधी सेनेने राजा शोधायचे अनेक प्रयत्न केले, पण सारे विफल झाले. जर झार निकोलस या सेनेच्या हाती लागला असता, तर ही सेना त्याला परत रशियाच्या सिंहासनावर बसवू शकेल हे लेनिनने ताडलं. म्हणून त्याने झारची सहकुटुंब हत्या घडवली. नंतर आठवडाभारत लेजन तिथे पोहोचले, पण अर्थात तोवर उशीर झाला होता. झार वाचला नाही.
कैसर दुसऱ्या विलहेल्मच्या मनात या घटनांचा संदर्भ असावा. पुढे यदाकदाचित परिस्थिती बदलली तर जर्मन सेनेवर फुटून विखुरण्याची वेळ येऊ नये म्हणून कैसरने पुढाकार घेतला असं मी तरी म्हणेन.
आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......