‘PM Cares Fund’च्या खूप आधीची - १९४३-४४च्या बंगालमधील भीषण दुष्काळाच्या काळातल्या ‘बंगाल रिलीफ फंडा’ची - गोष्ट
पडघम - देशकारण
प्रज्वला तट्टे
  • PM Cares Fund आणि १९४३-४४च्या बंगालमधील भीषण दुष्काळाचं चित्तप्रसाद यांनी रेखाटलेलं एक चित्र
  • Tue , 21 April 2020
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी Prime Minister's National Relief Fund पीएम केअर्स फंड PM Cares Fund हिंदू महासभा Hindu Mahasabha श्यामाप्रसाद मुखर्जी Syama Prasad Mookerjee बंगाल दुष्काळ Bengal famine बंगाल रिलीफ फंड Bengal Relief Fund

करोना व्हायरसमुळे उदभवलेली राष्ट्रीय आपत्ती आपली खुंटी बळकट करण्यासाठी, स्वतःच्या लोकप्रियतेचा डंका वाजवत आपले व्यक्तिमहात्म्य वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वापरली नसती तरच आश्चर्य वाटलं असतं! ‘Prime Minister’s Citizen Assistance and Relief in Emergency Situations Fund’ अर्थात ‘PM Cares Fund’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी (Prime Minister's National Relief Fund, PMNRF) अस्तित्वात आहेच आणि त्याचा हिशोबही सार्वजनिक करावा लागतो. परंतु मोदींनी ‘PM Cares Fund’चं वेगळं खातं उघडलं आणि त्यात त्यांच्या समृद्ध भक्तांनी लगोलग देणग्याही टाकल्या. भारताच्या माजी पंतप्रधानांबद्दल मनात टोकाची घृणा आहे, अशा भक्तांना आतापर्यंत संसदेत ज्याचा हिशोब दिला जायचा, अशा ‘पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी’त एक खडकीही टाकावीशी वाटला नाही, पण त्यांनी ‘PM Cares Fund’मध्ये भरभरून दान दिले!

सोनिया गांधींनी ‘PM Cares Fund’चा पैसा पंतप्रधान सहायता निधीत वळता करावा, अशी जाहीररीत्या मागणी केल्यावर समाजमाध्यमांतून ‘पंतप्रधान सहायता निधी’तले पैसे फक्त नेहरू-गांधी घराण्याच्या सदस्यांच्या स्वाक्षरीनेच काढता येतात, म्हणून ‘PM Cares Fund’ची स्थापना करावी लागली आणि म्हणून सोनिया गांधी त्याला विरोध करतात, असे खोटे संदेश व्हायरल केले गेले. ‘मुख्यमंत्री सहायता निधीत दान न करता ‘PM Cares Fund’मध्येच का करावं’, याच्यासाठी भाजपचे आमदारही मराठी मातीशी द्रोह करत प्रचार करू लागले. मुख्यमंत्री सहायता निधीतल्या देणग्यांना करसवलत मिळणार नाही, अशीही हूल उठवून देण्यात आली. त्यासाठी काँग्रेसच कशी जबाबदार आहे, हेही समाजमाध्यमांतून सांगितलं गेलं.

‘PM Cares Fund’च्या पैशाचं काय झालं याचा कुठेच हिशोब द्यावा लागणार नाही, याबद्दल लोकांना स्पष्टता येईपर्यंत त्याचे नियम बदलले जातील. नोटबंदीच्या काळात जशी दर दोन दिवसांनी नवीन नियमावली यायची आणि त्या गोंधळात ज्यांना अफरताफरी करायची आहे त्यांचे साधून जायचे, तोच अनुभव ‘PM Cares Fund’बद्दल आल्यास नवल वाटणार नाही. इकडे करोनामुळे, लॉकडाऊनमुळे, भुकेमुळे लोकांचे जीव जात असताना, तिकडे कोट्यवधी रुपयांची उलाढाल करून राज्यांमधल्या सत्ता उलथवण्यात येत असल्याचे किंवा आणखी कुठे पक्षासाठी, संघासाठी किंवा व्यक्तिमहात्म्य वाढवण्यासाठी पैसा उधळला जात असल्याचे चित्र लगेच दिसायला लागू शकते. 

पहिल्याखेपी मोदी सत्तेत आल्यानंतर दोन वर्षांनी आलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जींच्या ११५व्या जयंतीनिमित्त नेहरू मेमोरिअल म्युझिअम अँड लायब्ररी या संस्थेने ‘Syama Prasad Mookerjee’s Vision of India’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजित केले होते. मुखर्जी हिंदू महासभेचे एक महत्त्वाचे नेते आणि भारतीय जनसंघाचे - जिने नंतर भारतीय जनता पार्टीचं रूप घेतलं - संस्थापकही. त्यानिमित्ताने ‘द वायर’ने २०१६मध्ये १९४३-४४मधल्या दुष्काळग्रस्त बंगालचे चित्रण करणाऱ्या चित्तप्रसाद या चित्रकाराने केलेलं रेखाटन आणि वार्तांकनांवर आधारित एक लेख प्रसिद्ध केला होता.

गेल्या दोन वर्षांत एखादी बंगाली व्यक्ती ‘नॅशनल फीगर’ बनली असेल, तर ती आहे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी. आणि का नाही? ते आधुनिक बंगालच्या शिल्पकारांपैकी एक असलेल्या आशुतोष मुखर्जी यांचे चिरजीव आहेत. आशुतोष यांनी तत्कालीन गव्हर्नरशी भांडण ओढवून घेत कलकत्ता विद्यापीठाला संस्कृती आणि शिक्षणाचं आंतरराष्ट्रीय केंद्र बनवलं होतं. श्यामाप्रसाद यांनी १९४३च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बंगालमधील अमेरी सरकारचा राजीनामा दिला, तेव्हा त्यांना रातोरात राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली होती. भीषण दुष्काळात बंगालमधील गव्हर्नराच्या विरोधात त्यांनी जोरकसपणे आवाज उठवला होता. भारताच्या चहूबाजूंनी त्यांच्या ‘बंगाल रिलीफ कमिटी’मध्ये काही लाखांच्या देणग्या जमा झाल्या होत्या. पण त्यांच्या गावाची काय स्थिती होती? 

या लेखात आजच्यासारखेच भुकेल्या लोकांच्या, त्यांच्यापर्यंत न पोहचलेल्या मदतीच्या कहाण्या आहेत. ‘Painful sights’ या शीर्षकाच्या त्या लेखाचा हा अनुवाद -

“मी एक साधारण बंगाली चित्रकार आशुतोष आणि श्यामाप्रसाद यांच्या जीराट या गावी जाऊन आलो. जूनच्या एके दिवशी मी कलकत्त्यापासून ४० मैलावरच्या खरनारगाचीपर्यंत रेल्वेने प्रवास केला आणि तिथून पुढे काही मील जीराटला चालत गेलो. वाटेतल्या बालघोर भागात मला सहा-सात खेडी लागली. मी जे पाहिलं ते भयानक होतं. या भागाला उभं कापत नेणाऱ्या बेहुला नदीला पूर येऊन वर्ष झालं होतं आणि तिने दोन्ही किनाऱ्यांवरची भूमी सुपीक मातीने भरून टाकली होती. किनाऱ्यावरच्या झोपड्या वादळात उडून गेल्या होत्या. सर्व गावांमधल्या भाताच्या राशी (धान-गोला) उदध्वस्त झाल्या होत्या. ६ गावं १२ दिवस पाण्याखाली होती आणि ७००० गावकरी उघड्यावर आले होते. हे सर्व गेल्या वर्षी झालेलं.

गेल्या वर्षीची हानी या वर्षी काही वेगळे, आशादायक परिणाम करणारी होती का? जी सुपीक माती पुरासोबत आली होती, त्यात चरं खोदून कुणी पेरणी केली होती का?, की त्यात काही उंच पिकं उभी होती? मुळीच नाही. गेल्या वर्षी पूर येऊन गेल्यावर लगेच या वर्षी बंगालमध्ये दुष्काळ पडला, आणि बालागोरला या वर्षी चढ्या भावात भात विकत घ्यावा लागला, कारण गेल्या वर्षी त्याचा स्वतःचा भात वाया गेला होता. तेव्हा झोपडी बांधण्यासाठी सरकारनं दिलेलं १० रुपयांचं कर्ज शेतकऱ्यांनी मूठभर तांदूळ विकत घेण्यासाठी वापरलं. तेही पैसे संपले तेव्हा बीज म्हणून रोवायला आणि नांगर घ्यायला कुणाजवळ पैसे राहिले नाहीत. गरीब आंबे खाऊन जगू लागले.

तर, मला काही भातशेतं दिसली नाहीत, फक्त पडीक तापत्या उन्हात भाजून निघालेली भेगाळलेली, कुठे कुठे गवत उगवलेली जमीन दिसली. काही शेतकऱ्यांनी ज्यूट लावला होता, पण या वर्षी मॉन्सून उशिरा आल्यामुळे पावसाअभावी तेही पीक करपलं. त्यांनी मला सांगितलं की, उशिरा आलेल्या पावसामुळे कसे रब्बीचे बटाटा, कांदा व तत्सम कलकत्ता बाजारात विकता यावे म्हणून घेतलेले पीकसुद्धा वाया गेले. आंब्याची झाडे मात्र विशाल आणि प्राचीन होती. ती पुरात उन्मळू शकली नाहीत, म्हणून वाचली. बालागोरमधली २५ टक्के कुटुंब आंबे नि त्यांच्या कोईवर गुजराण करत होती. आंबे फळ म्हणून खाता येतात, पण म्हणून ते काही मानवाचे पूर्णान्न होऊ शकत नाही.

म्हणूनच मी जिथे जात होतो, तिथे कॉलरा, मलेरिया, देवी, आणि त्वचा रोगाने बाधित रुग्ण दिसत होते. उदाहरणार्थ राजापूर गावात ५२ पैकी फक्त ६ कुटुंब उरली आहेत आणि तेही मलेरिया ग्रस्त. त्यांच्याकडे पुरेसे अन्न आणि वस्त्र नाही. ज्या गावात जातो तिथे अशीच परिस्थिती आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपल्या गावाच्या पंचक्रोशीतील लोकांसाठी काय केले? मी ज्याला त्याला प्रश्न विचारत होतो, पण वास्तविकता ही आहे की, यातलं कुणीही त्यांच्याबद्दल एक शब्द चांगलं बोलत नव्हतं.

त्यांनी मला सांगितलं की, कसं सरकारने एका गावात अन्नछत्र उभं केलंय, ज्यात ४०० लोक दोन महिन्यांपासून रोज जेवत होते. सरकारने कसे प्रत्येक कुटुंबाला १५ आणे दिले होते आणि कसे मूठ भर चुरा दर माणशी दिला. त्यानंतर युनियन बोर्डाने प्रत्येक पुरुषाला १४ पैसे, स्त्रीला १० पैसे आणि प्रति बालक ५ पैसे दिले होते. ते स्टुडंट फेडरेशनबद्दल चांगले बोलत होते, मुस्लिम लीगने त्यांना पूर येऊन गेल्यावर लगेच कापड दिले, १२ मौंड (maund) बियाणे दिले, भरपूर भाजीपाला दिला आणि प्रत्येक कुटुंबाला ५ रुपये दिले म्हणून सांगत होते. कम्युनिस्ट पक्षाने त्यांना प्रति व्यक्ती एक पाव तांदूळ आणि एक पाव आटा दिल्याचे सांगितले. दुमुर्दाहा उत्तम आश्रमाने दर कुटुंबाला २ रुपये आणि ८ शेर आटा नियंत्रित भावात दिल्याचे कळले. थोडक्यात प्रत्येकाने फुल नाही फुलाची पाकळी मदत केली. अपवाद फक्त श्यामाप्रसाद मुखर्जी या मोठ्ठ्या माणसाचा आणि त्याच्या हिंदू महासभा या मजबूत संघटनेचा.

मी श्रीकांती गावातल्या ज्येष्ठ व्यक्तीला सरळच विचारले की, बंगाल रिलीफ कमिटीने त्यांच्यासाठी काय केले? त्याने मुखर्जी आणि त्यांच्या बंगाल रिलीफ फंडाचे नावही ऐकलेले नव्हते. पण आशुतोष म्हणताच त्याला काय ते कळले. त्यानंतर जीराटला पोहचेस्तोवर मी श्यामाप्रसाद किंवा बंगाल रिलीफ फंडाचे नावच काढले नाही.

पण जसा जसा मी जीराटच्या जवळ गेलो, तशी मला आजूबाजूच्या गावांची हलाखी आणखी कळत गेली. एका शब्दात सांगायचं तर आपल्या निसर्गदत्त नेत्याने आपली जबाबदारी ऐन संकटसमयी झटकून द्यावी, तसं या गावकऱ्यांचं झालं होतं. श्यामाप्रसाद स्वतः त्यांची काही मदत करत नव्हते आणि या भागात इतकं मोठं असामी दुसरं कुणी नव्हतं की, जे त्यांची मदत करेल. त्यामुळे चोर, लुटारू तिथपर्यंत आलेल्या अन्न, कापड, औषधांच्या रूपात आलेल्या प्रत्येक मदतीवर हात मारून घेत होते.

उदाहरणदाखल श्रीकांती गावातली माणसे एका व्यक्तीबद्दल जो युनियन बोर्डाच्या मदत कार्यात सक्रीय होता- त्याचं नाव मी घेत नाही- त्याच्याबद्दल फार कडवटपणे बोलत होती. या माणसाने स्वतःच्या मर्जीतल्या माणसांना १-२ शेर तांदूळ दिले. पण जेव्हा कदमडांगा गावातले शेतकरी त्याच्याकडे मदत मागण्यासाठी गेले, तेव्हा त्याने त्यांच्यासमोर सरळ प्रस्ताव ठेवला की, तुम्हाला माझ्याकडून फुकट तांदूळ मिळणार नाही! माझ्या शेतावर मोबदल्याविना काम करा, मग मी तुम्हाला कंट्रोलच्या दरात तांदूळ विकेन. संपूर्ण गावाने याच्याविरुद्ध आवाज उठवला, पण तरीसुद्धा युनियन बोर्डाने त्याला ८३ कुटुंबांना ३ हप्त्यांमध्ये वाटण्यासाठी कापडाची १५ ठानं दिली. मग त्याने पुन्हा आपला जुनाच खेळ सुरू केला - सर्व गावकऱ्यांना मदतीविना परत पाठवले आणि स्वतःच्या मर्जातल्या माणसांना सर्व कापड वाटून दिले.

एकाच कुटुंबाकडे सर्वांची मालकी

या सर्व कथा ऐकतच मी श्यामाप्रसादांच्या स्वतःच्या गावात शिरलो आणि सरळच आशुतोष यांच्या जुन्या वाड्याकडे गेलो. आशुतोष यांच्या कुण्या गोस्वामी नावाच्या दूरच्या नातेवाईकाने या वाड्याला ‘आशुतोष मेमोरियल’ नाव दिलेले होते. ‘रॉयल बंगाल टायगर’ म्हणून प्रसिद्ध असलेले आशुतोष मुखर्जी मोठं प्रस्थ होतं आणि आधुनिक बंगालचे निर्माते! त्यांनी व्यवस्थित आराखडा तयार करून ज्याची बांधणी केली, तो हा त्यांचा वाडा आज त्यांचे विदीर्ण, उदास, पडझड झालेल्या स्मारकरूपात शिल्लक होता. मी स्वतः वाड्याचे रेखाटन केले आहे आणि तुम्ही स्वतः बघू शकता या चिरेबंदी वाड्याचे मजबूत कोरीव खांब कसे निखळत आहेत. विस्तीर्ण गच्चीचा अर्धा भाग कोसळला आहे- उरलेल्या अर्ध्या भागाच्या विटा सुटून बाहेर येत आहेत. शेवाळ आणि रान गवताने खिडक्या बुजल्या आहेत, खांबं उभी चिरून काढली आहेत.

अशा या पडझडीत आशुतोष यांच्या मुलांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘आशुतोष स्मृती मंदिर’ नावाने एक थातुरमातुर दवाखाना चालवला आहे. दवाखान्याची जबाबदारी ज्या डॉक्टरवर होती, त्याने कडवट तोंड करत सांगितले की, तो इथे रोज सकाळी ३ तास बसतो आणि रोज ३० ते ४० रुग्ण तपासतो. पण मी दोन दिवस लागोपाठ सकाळी गेलो तर दवाखाना एक तासदेखील सुरू नव्हता. गावात शेकडो माणसे मलेरियाने पीडित असताना इथे फक्त १०-१२च माणसं यायची. या सर्व जागेबद्दल काहीतरी गूढ असल्यासारखे जाणवते.

वडिलांचा वारसा दुर्लक्षित

ज्या वेळी बालगोरच्या प्रत्येक घरात पूर थैमान घालत होता, त्याच वेळी नेमकं अशुतोषांच्या मुलांनी नवा वाडा बांधायला घेतला. जुनं घर त्यांच्यासाठी पुरेसं नव्हतं. ऐन दुष्काळात, मैलोनमैलपर्यंत गावकऱ्यांच्या झोपड्या, घरं पडत असताना, वडिलांच्या घराची पडझड होत असताना या आशुतोषपुत्रांना नवा बंगला का बांधावासा वाटत असेल असा प्रश्न मला पडत होता. मी हे तिरस्करणीय, बडेजावी, बागबगीचावालं घर बघायला गेलो. संपूर्ण बालागोरमध्ये नव्याने बांधलं जात असलेलं आणि दोन धान-गोला तांदूळ भरून ठेवण्याची सोय असणारं म्हणून प्रसिद्ध हेच एकमेव घर होतं. आता फक्त आऊट हाऊसमध्येच रहिवाशी आहेत. गेटच्या दुतर्फा महागड्या फर्निचरने सुशोभित बैठका आणि पाहुण्यांच्या खोल्या आहेत. बालागोरमधल्या या सर्वांत श्रीमंत वास्तूला सुरक्षित ठेवण्यासाठी घराला मजबूत लोखंडी गेट आणि खिडक्यांना लोखंडी जाळ्या लागलेल्या आहेत. नीट आखलेला बगीचा आणि हरितगृह आहे.

ही संपूर्ण जागा म्हणजे वाळवंटातलं मृगजळ वाटते. मुखर्जी कुटुंबीय मोटारीत बसून सुट्टीच्या दिवशी कलकत्त्याहून डबे घेऊन सहलीसाठी येतात, गंगेत न्हातात आणि परत जातात. हे बीभत्स दिखाऊ नवं घर जुन्या प्रशस्त पण आताच्या पडक्या वडिलांच्या घराचा अपमान करतं. इथं जमा झालेली संपत्ती अवती-भवतीच्या उपाशी पोटी लोकांचा अपमान करते. मी निराश होऊन तिथून निघालो, पण ही कथा इथेच संपत नाही.

स्वतःच्या दुष्काळग्रस्त जीराट गावात श्यामाप्रसादांनी दोनदा चक्कर मारली, पैकी एका भेटीत वाजत गाजत एक मंडी सुरू केली, ज्याबद्दल बालागोरमध्ये फारच चर्चा होती. पण प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना तिथं जाण्यात रस नव्हता. ते या मंडीला नाके मुरडतात. का? कारण बालगोरच्या पंचक्रोशीत जीराटपासून जवळच सिजेय गावात आधीच एक मंडी (हाट) होती. एक मंडी पुरेशी होती. फक्त तिथल्या अडत्यांचा जरा बंदोबस्त गरजेचा होता. त्यादृष्टीने काही करण्याऐवजी श्यामाप्रसाद यांनी सिजेयला भरणाऱ्या पारंपरिक बाजाराच्या दिवशीच म्हणजे बुधवारीच जीराटमध्ये बाजार भरवायला सुरुवात केली. सिजेयची मंडी मोडून काढण्यासाठी श्यामाप्रसाद हे करतायेत, असं गावकऱ्यांना वाटत होतं.

महासभेच्या मदतकार्याचे वास्तव

श्यामाप्रसाद यांनी सुरू केलेल्या मंडीत अशा पद्धतीने नफेखोर अडत्यांचा सुळसुळाट सुरू झाल्यावर हिंदू महासभेने जीराट गावात सुरू केलेल्या मदतकार्याचे मला कौतुक वाटेनासे झाले. पण मी तिथे राहिलो कारण याच एकमेव गावातल्या लोकांना श्यामाप्रसाद यांच्या मदतकार्याबद्दल काही माहिती होती. इथले मदतकार्यही त्या ‘लोकसेवार्थ’ दवाखान्यासारखे आणि त्या मंडीसारखेच गौडबंगाल असल्याचे स्पष्ट होत गेले. आठवड्यातून एकदा २८ शेर आटा आणि २८ शेर तांदूळ वाटण्याचे कार्य आपल्या चार मदत केंद्रांवर हिंदू महासभेने घेतल्याचे समजते. या सोबतच श्यामाप्रसादच्या दोन भावांनी दुकान उघडले होते. तिथं ते बाजारभावापेक्षा अर्ध्या किमतीत तांदूळ विकत होते. पण त्या वेळी तांदळाचा बाजारभावच मुद्दलात ४० रुपये प्रति मौंड (maund) होता! गावातले गरीब शेतकरी आणि मासेमार मला म्हणत होते, “ही सर्व मदत बाबू लोकांसाठी आहे. २० रुपये प्रति मौंड मदत घ्यायची तीही विकत, म्हणजे मूठभर लोक सोडून इतरांसाठी खूपच महाग आहे!”

मुखर्जी बंधूंच्या वाढत्या श्रीमंतीमुळे ते जीराटमध्ये तिरस्काराचा विषय झाले होते, पण त्यातल्या त्यात श्यामाप्रसादांबद्दल गावकरी खूपच घृणा व्यक्त करत होते आणि त्यांना घाबरतही होते.

सामान्यतः हेच चित्र मला श्यामाप्रसाद मुखर्जींच्या गावात, जीराटमध्ये दिसले. मी बंगालच्या अनेक गावांमध्ये फिरलो, अशा गावांमध्ये गेलो जिथून मोठ मोठी बंगाली माणसं उदयाला आली. पण श्यामाप्रसाद यांच्याबद्दल बघायला मिळाला तितका कडवटपणा, तितका राग मला दुसऱ्या कोणत्याच गावातल्या श्रीमंत, विशेषकरून मोठ्या असामीबद्दल अनुभवाला आला नाही.

पण इकडे कोलकात्यात काही वेगळंच चित्र मांडलं जात आहे, जे मी अनुभवलं त्याच्या अगदी उलट आहे. असं दिसतंय जणू मध्यमवर्गाची संपूर्ण युवा पिढी त्यांच्या नेत्याची- डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी- यांची खोटी प्रशंसा करण्यात आकंठ बुडालेली आहे! बालागोर आणि जीराटच्या प्रत्येकाने मला सांगितलं होतं की, श्यामाप्रसाद मुखर्जी गेल्या दोन वर्षांत फक्त दोनदा बालागोरला फिरकले. पहिल्यांदा जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा आणि नंतर जीराट हाट सुरू केला तेव्हा.

आणि तरी शेजारच्या कलासपूर गावातल्या एका डॉक्टरने मला सांगितलं की, श्यामाप्रसाद काळकत्त्याहून कसं येणं-जाणं करत असतात आणि गेल्या दोन महिन्यांत ते कसे चारदा येऊन गेले. म्हणे, या माणसाचं गावावर खूप प्रेम आहे. जीराट मदत केंद्रावर तांदूळ आणि पिठाचे वाटप करणारा बिरनालेंदू गोस्वामी मला सांगत होता की, तो फक्त रविवारीच वाटप करतो. पण एक हायस्कुलचा तरुण विद्यार्थी मला सांगत होता की, या मदतकेंद्रांवर २४ विद्यार्थी रोज १००-१५० लोकांना खाऊ घालण्यासाठी राबतात!

श्रीमंतांचा जीराट गावात खूप राग केला जातो -आणि श्यामाप्रसाद मुखर्जींची तर फारच भययुक्त घृणा केली जाते. पण माझ्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात माझ्या लक्षात आले की, श्यामाप्रसाद यांच्या थेरांनंतरही बंगालची सनातन संस्कृती अजून जिवंत आहे आणि आशुतोष यांचे चैतन्य अजून टिकून आहे. एके संध्याकाळी कुलूप घातलेल्या शाळेसमोर झाडाखाली मुलं-मुली जमलेली होती. मुलांचा चिवचिवाट सुरू होता. तेवढ्यात कुणीतरी शिव्या द्यायला सुरुवात केली. तोच एक माणूस ओरडला, ‘कोण घाण भाषा वापरतंय? तुम्ही सर्व जनावरं झाला आहात की काय?’

‘आता शाळाच नाही म्हटल्यावर मुलं माणसांत राहणारच कशी?’, कुणीतरी उत्तर दिलं. मग कुणीतरी माझ्या सोबतच्या शेतकरी कार्यकर्ता असलेल्या वाटाड्याकडे आलं. म्हणालं, ‘आमच्या शाळेला शिक्षक द्या हो! आम्ही उपाशी राहून त्याला आमचं अन्न देऊ. मातीचं तेल दहा आण्याला एक पिंट (pint) मिळतं. पण आम्ही तेही देऊ. पण देवा! शाळा सुरू होऊ देत. नाहीतर आशुच्या गावातून सभ्यता मिटून जाईल. आमची मुलं वाया जातील...’ जगण्याची आणि श्रम करण्याची ही काय अदम्य इच्छाशक्ती आहे! इथली माणसं तशीच जगतील, आणि लढतील जसे बंगालचे पांढरे वाघ जगतात- श्यामाप्रसाद त्यांची मदत करोत किंवा नाहीत!

इथं चित्तप्रसाद यांचं वार्तांकन संपतं. पुरेशा संवेदनशीलतेने केलेल्या वार्तांकनाचा हा उत्तम नमुना आहे. या वार्तांकनातून व्यवस्थेने हातावर पोट असणाऱ्यांवर संवेदनाशून्यता आणि नियोजनशून्यतेमुळे लादलेले प्रसंग, त्यांचे संघर्ष, त्यांच्या प्राथमिकता, त्यांचे आर्त आणि शहरी-मध्यम-सुशिक्षित वर्गाने स्वतःच्या कोशात जपलेले गैरसमज, उभे केलेली दैवतं आणि त्या दैवतांचे मातीचे पाय यातलं तेव्हाचं आणि आजचं साम्य अधोरेखित होतं.

.............................................................................................................................................

‘द वायर’वरील मूळ इंग्रजी लेखासाठी पहा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 21 April 2020

च्यायला, ती हवेली दुष्काळ पडल्यावर धान्य लुबाडून बांधलेली नव्हती. ती आधीपासूनच तिथे असणार ना? शिवाय हा विन्स्टन चर्चिलने मुद्दाम पाडलेला दुष्काळ होता. चर्चिल घाण करेल ती श्यामाप्रसादने साफ करायची होय? लेखकाने हवं तर करावी चर्चिलची घाण साफ. उगीच श्यामाप्रसादांच्या नावाने बोंबलू नये. श्यामाप्रसाद निदान दुकान तरी उघडतो. लेखकाने काय शेतं उपटली? श्यामाप्रसादच्या दुकानात गैरप्रकार चालतात म्हणून श्यामाप्रसाद वाईट. मग चर्चिल, लेनिन व स्टालिन हे थोर साधूसंत कसे काय? या तिघांनीही भीषण दुष्काळ मुद्दाम पाडून लक्षावधी माणसं ठार मारली ना? आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्टं! फार छान. ही म्हणे पत्रकारिता! प्रस्थापित पत्रकारिता सोडून लोकं मेळामाध्यमांकडे ( = सोशल मीडियाकडे ) का वळले हे उपरोक्त लेखातनं छानपैकी समजून येतं.
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......