साला, एक ‘मच्छर जंतू’ माणसाला हतबल करणारी साथ उद्भवण्यास कारण ठरतो…
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
प्रकाश बुरटे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 18 April 2020
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona virus लॉकडाउन Lockdown

साथीचे रोग फार पूर्वीपासून आपला इंगा दाखवत आले आहेत. पूर्वी माणसांच्या आणि सामानाच्या वाहतुकीसाठी प्राण्यांचा वापर होई. त्यामुळे माणसांचा वावर स्वतःच्या वस्तीबाहेर क्वचित असे. परिणामी तेव्हा साथीचा परिसर म्हणजे अशी एक वस्ती असे. अशाच एका वस्तीचं कल्पनाचित्र संदर्भासह सोबत दिले आहे.

आकृती १ : साथीचे संप्रेषण जाळे 
१) काळा ठिपका - परिसरातील अबाधित व्यक्ती, २) लाल ठिपका - बाधित व्यक्ती, आणि ३) त्यांना जोडणारी रेषा - साथीच्या प्रसाराची वाट.  
संदर्भ :
https://bmcpublichealth.biomedcentral.com/articles/10.1186/s12889-020-8243-6

दुसऱ्या वस्तीतून कुणी एक व्यक्ती म्हणजे या कल्पनाचित्रातील ‘लाल ठिपका’ या परिसरात आला आहे. तो संसर्गजन्य आजार झालेला आहे. परंतु ते त्याला सध्या माहीत नाही. तो जेथे निवाऱ्याला आला आहे, तेथील माणसांशी त्याचा संपर्क येणार. कारण तेथेच आपला ‘लाल ठिपका’ जेवणार, गप्पा मारणार. एखाद्या देवतेचे दर्शन घेणार. तेथे तो कट्ट्यावर गप्पा मारत देवाचिया दारी बसणार.

अशा प्रकारे त्याचा घानिष्ट संपर्क १५ लोकांपर्यंत पोहोचला आहे. त्यांतील (समजा) फक्त पाच लोक (काळे ठिपके) त्या आजाराने बाधित झाले आहेत. वस्तीतील हे दुसऱ्या पिढीचे पाच ‘लाल ठिपके. ते प्रत्येकी पुन्हा पाच काळे ठिपके लाल करणार. म्हणजे आता पंचवीस लाल ठिपके तयार होणार. तिसऱ्या पिढीत १२५ लाल ठिपके, चौथ्या पिढीत लाल ठिपके ६२५, पाचव्या पिढीत ३,१२५ होणार...

असे होत होत संपूर्ण परिसर या आजाराने बाधित होईल?

या प्रश्नाचे उत्तर मात्र ‘नाही’ असे आहे.

त्याचे कारण पाहूया.

मूळ लाल ठिपक्याने १५ काळ्या ठिपक्यांना स्पर्श केला. त्यातील फक्त पाच ठिपके लाल झाले. उरलेले १० काळे ठिपके लाल झाले नाहीत. कारण त्यांच्या शरीरात जरी हे जंतू पोहोचले तरी या आजाराविरुद्ध त्यांच्या शरीरानेच प्रतिकारशक्ती तयार केली. आता परिसरातील हे १० काळे ठिपके कधीही लाल होणार नाहीत, हे त्याचे कारण आहे. परिणामी पहिल्या काही पिढ्यांत लाल ठिपके ज्या ठिपक्यांना स्पर्श करतील, ते बाधित नसलेले काळे ठिपके असण्याची शक्यता जास्त आहे. परंतु पिढ्यांची संख्या जशी वाढेल, तशी परिसरात रोगप्रतिकारशक्ती आलेले काळे ठिपके वाढू लागतील. त्यामुळे आता लाल ठिपक्यांचा स्पर्श झाला तरी प्रत्येकी पंधरापैकी फक्त काळे पाच नव्हे, तर काळे चारच ठिपके लाल होतील. पुढच्या पिढ्यात हे प्रमाणदेखील उतरत जाईल. परिणामी साथ संपून जाईल.

अनेक साथी येतात. त्यांच्या आजाराने अनेक बाधित होतात, काहीजण बळी जातात, परंतु नंतर साथ जशी आली, तशी बळी घेऊन जाते, असाच माणसाचा अनुभव आहे. तो संकटातील माणसाचा दिलासा आहे.

आपण सोयीसाठी लाल आणि काळे ठिपके वापरले आहेत. प्रत्यक्षात ती माणसे आहेत. बाधित रुग्णांपैकी जे आजारातून बरे झाले, त्यांना पुन्हा तोच आजार होणार नाही. काही लाल ठिपके एकदम अदृश्य होतील, म्हणजे त्या व्यक्ती मृत्युमुखी पडतील. काही काळे आणि मोजके लाल ठिपके नव्याने जन्म घेतील. ते आपल्या चित्रात अवतरतील.

आणखीन एक शक्यता म्हणजे या वस्तीतील दोन-चार काळे आणि एक-दोन लाल ठिपके आपल्या परिसरातून उठून कुठल्या दूरच्या परिसरात जातील. अशी स्थलांतरे कधी साथीला घाबरूनही झाली आहेत. त्यातून परिसरामागे परिसर बाधित होऊ लागतील. एकविसाव्या शतकातील वाहतुकीच्या साधनांतील प्रगतीमुळे मोठाली नगरं आणि महानगरं हाच एक मोठा परिसर बनला आहे. हाताशी असणाऱ्या मोटारसायकल, कार किंवा लोकल-रेल्वे अशा साधनांच्या मदतीने दुसऱ्या महानगरात जाणे अवघड राहिलेले नाही. भारतीयांचा उच्चतर स्तर तर विश्वसंचारी बनला आहे. त्यामुळे संपूर्ण पृथ्वी हा आपला सर्वांत मोठा परिसर आहे.

पृथ्वी तर निसर्गानेच लॉकडाऊन केलेली आहे. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण ओलांडणे ही अवघड गोष्ट होती. परंतु आता माणसाने गुरुत्वाकर्षणाने घातलेली ती मर्यादादेखील ओलांडली आहे. मंगळावर जाण्यासाठी काही मंडळी तिकीटं खरेदी करू लागली आहेत. अशी जोरदार प्रगती होत असताना, एक ‘मच्छर जंतू’ माणसाला हतबल करणारी साथ उद्भवण्यास कारण ठरला आहे!

या साथीचा नेमका ‘परिसर’ संपूर्ण पृथ्वी, देश, शहर का शहराचा एक भाग हे सांगणं अवघड बनलं आहे. परिणामी साथीचं आकलन जास्त गुंतागुंतीचं झालं आहे. तरीही होऊन गेलेल्या साथींच्या अभ्यासातून माणूस खूप काही शिकला आहे. त्याची सविस्तर चर्चा वैज्ञानिक जर्नल्समधून सातत्याने झाली आहे आणि होतही आहे. त्यावर टीका आणि प्रतीटीका होऊन काही चुका सुधारल्या जात आहेत.

अशा अपूर्ण ज्ञानाच्या आधारानंदेखील काही प्रबुद्ध मंडळी साथीच्या संदर्भात थोडेबहुत भविष्य वर्तवू शकण्याच्या पायरीपर्यंत पोहोचली आहेत. त्यातील एक भविष्य असे आहे की, माणूस जरी संपर्कप्रिय प्राणी असला, तरी परिसरात अनेक सूक्ष्म जंतू मोठ्या प्रमाणात असल्याने आणि माणसाची प्रतिकारशक्ती मर्यादित असल्याने विशिष्ट ऋतूमानात घनिष्ट संपर्क हे कारण साथींना पुरते. त्यामुळे निमित्ताला टेकलेल्या आणि काळाच्या कोपऱ्या-कोपऱ्यांवर दबा धरून बसलेल्या साथी अनेकांना दिसत आहेत.

त्याच वेळी आपल्या आजूबाजूचे वास्तव वेगळे असल्याचे भानही आपल्याला आहे. गरिबी ही नाण्याची एक बाजू असेल, तर श्रीमंती ही दुसरी बाजू आहे. या दोन्ही बाजू टिकवून धरण्याचे काम उत्पन्न आणि संपत्ती यांची अत्यंत विषम विभागणी व्यवस्था करते आहे. माणसाला माणसासारखे जगण्यासाठी विषमता कमी करणारी धोरणे शासनांनी राबवली, तर विषमता खूप कमी होईल देखील. सध्या काही देशांत आर्थिक विषमता खूप कमी आहेच. भारतासारख्या काही देशांत मात्र गेली तीन-चार दशकं शिक्षण, आरोग्यसेवा, रेशनिंग, एवढेच नव्हे तर रेल्वे, बस सेवा, आयुर्विमा, फोनसेवा, खनिज तेल प्रोसेसिंग अशा अगणित क्षेत्रांतून शासन पाय काढून घेत आहे. खासगीकरणाकडे बऱ्याच राजकीय पक्षांचा ओढा आहे. त्याच्याशी सुसंगत अशी धोरणं राबवली जाताहेत.

सध्या साथींच्या भारतातील लपण्याच्या जागा पाहतो आहे. लोकांचे घनिष्ट संपर्क सध्या कुठे कुठे येतात, याचा शोध घेतो आहे. गरिबांच्या वस्त्या दाट लोकवस्तीच्या आहेत. त्या त्यांनी हौसेने निवडलेल्या नाहीत, हे माहीत आहे. ग्रामीण भागातून शहरांत आल्यावर पर्याय असता तर त्यांनी स्वतःसाठी बंगले नसते बांधले. पण आठ बाय दहा फुटाच्या एक दोन खोल्यांतून पाचदहा माणसं राहताना दिसताहेत. लोकल, बसमध्ये तोबा गर्दी आहे. त्यात अनेक जण रोज दोनेक तास प्रवास करताहेत. गर्दी जमवणारे धार्मिक, सामाजिक, राजकीय उत्सव. तिथं एकानं श्वास सोडल्याशिवाय दुसऱ्याला श्वास घ्यायला हवा मिळण्याची मारामार आहे. अपुऱ्या जागांतील मोठाल्या शिक्षणसंस्था, विविध करमणुकींचे भरगच्च हॉल्स, गजबजलेल्या बाजारपेठा, मॉल्स... अशी भली मोठी यादी नजरेसमोर येतेय.

झोपडपट्ट्यांमध्ये तर पाणी, मुलांना अभ्यासासाठी शांत जागा, चौरस आहार, रोजगाराची शाश्वती, प्रतिकारशक्ती, विविध वयाच्या मुलांना खेळायला मोकळ्या जागा, वृद्धांसाठी वस्त्यांतील बागा, अशा कितीतरी बाबतीत वंचितता दिसतेय. आला दिवस ढकलायचा कसा, याच्या चिंतेचं जीवन त्यांच्या नाकी नऊ आणतंय. हतबलता झाकण्यासाठी व्यसनं सरसावली आहेत. साथींच्या लपायच्या जागा स्वच्छ दिसताहेत. मुळात त्यांचं अस्तित्व तेथील नागरिकांचा मानवी सन्मान हिरावून घेतंय. सन्मानानं जगणं सर्वांना उपलब्ध झालं पाहिजे.

आजूबाजूच्या अनेकांचं मानवीपण हिरावलं जात असताना, कुणाचं तरी मानवीपण कसं टिकेल? होय, मी स्वतःलाच बजावतोय. मान्य, हे स्वप्नं पाहणं आहे. जॉन लेनॉन या मुळच्या बीटल गायकाचं ‘इमॅजिन’ शीर्षकाचं गाणं ऐकलंय बऱ्याच वेळा. त्यात तो मोठ्या विश्वासानं म्हणतोय, ‘You may say I'm a dreamer, But I'm not the only one.’

तपशील थोडे भिन्न असतील, क्रम वेगळे असतील, पण खात्री आहे, अनेक जण अशाच आशयाची स्वप्नं पाहत असतील. नाहीतर अगणित पेशींचं मानवी शरीर वर्षानुवर्षे व्यवस्थित कसं चालतं, या आश्चर्याइतकंच आश्चर्य गेल्या दोनएकशे वर्षांत मानवानं साथींचा केलेला खोलवर अभ्यास पाहून का वाटावं?

हे ज्ञान सर्व देशांचं, सर्व लोकांचं आहे आणि असलं पाहिजे. अशा वेळी मनात आईन्स्टाईन यांचे पुढील अवतरण कित्येकदा आवर्तत राहते -

“A hundred times every day I remind myself that my inner and outer life are based on the labors of other men, living and dead, and that I must exert myself in order to give in the same measure as I have received and am still receiving.”

हे ज्ञान सर्वांचे होण्यात भाषा, शिक्षण, देश, गरिबी, पेटंटस हे अडथळे जरूर आहेत. परंतु हेही काळे ढग मानवी प्रयत्नानेच जातील, हा आशावाद सोडून कसं चालेल?

.............................................................................................................................................

लेखक प्रकाश बुरटे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचे अभ्यासक आहेत.

prakashburte123@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......