महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने दिला यंदाचा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे यांना नुकताच पुण्यात समारंभपूर्वक देण्यात आला. नाटकाच्या माध्यमातून एखादा कलाकार किती विषयांना हात घालू शकतो, किती प्रकारे विषयांची मांडणी करू शकतो, प्रेक्षक-श्रोत्यांच्या मनात किती खोल घुसू शकतो, हे समजून घ्यायचे असेल तर अतुल पेठे यांची चार-दोन नाटके पाहिली किंवा चार-दोन भेटीतील संवाद-भाषणे ऐकली तरी पुरेसे आहे. सर्जनशील व समाजसन्मुख जगणे कसे असते, हे अतुल पेठे यांच्या व्यक्तिमत्वात दिसते. मागील २५ वर्षे कलेच्या माध्यमातून सामाजिक जीवनातील हस्तक्षेप हा त्यांच्या विचारांचा व कार्याचा गाभा राहिला आहे. सामाजिक बदलांना गती देण्यासाठी कलावंत लोक, काही वेळा कार्यकर्त्यांपेक्षाही परिणामकारक भूमिका बजावत असतात, हे दाखवण्यासाठी हा पुरस्कार आहे. त्यानिमित्ताने साधना साप्ताहिकाच्या १४ जानेवारीच्या महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार विशेषांकात प्रकाशित झालेल्या पेठे यांच्या मुलाखतीचे पुनर्प्रकाशन…
………………………………………………………………………………..
दीर्घकाळ सकस काम करणारा प्रयोगशील, जीवनवादी नाट्यकर्मी ही अतुल पेठेची प्रमुख ओळख आहे. पण अभिनय, माहितीपट निर्मिती, छायाचित्रण, लेखन, सामाजिक चळवळींमध्ये सहभाग अशा विविध गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंगभूत भाग आहेत.
धरणाच्या दरवाजातून शांतपणे पाणी येत असतं, पण त्याच्यामागं असलेल्या पाण्याचा प्रचंड रेटा असतो. असंच काहीसं अतुलचं आहे. त्याच्या प्रत्येक कृतीमागं त्याच्या आत असलेल्या भावभावनांचा प्रचंड रेटा असतो. आपली अभिव्यक्ती सकस होऊ द्यायची आणि त्याचवेळी हा रेटासुद्धा सहन करत राहायचं, असा समतोल गाठायचा त्याचा सतत प्रयत्न सुरू असतो. आपलं जगणं आणि आपली कला वेगवेगळं न मानणारे काही मोजके लोक आहेत, त्यापैकी अतुल एक आहे.
गेल्या तीसेक वर्षांच्या काळात अतुलनं कोणकोणती कामं केली याकडं नुसती नजर टाकली तरी आश्चर्य वाटेल. क्षितिज, ऐसपैस सोयीनं बैस, वेटिंग फॉर गोदो, मामक: पाण्डवाश्चैव, शीतरुद्ध सदानंद, प्रेमाची गोष्ट, ठोंब्या, गोळायुग, उजळल्या दिशा, सूर्य पाहिलेला माणूस, आनंदओवरी, चौक, मी माझ्याशी, दलपतसिंग येती गावा, सत्यशोधक, रिंगणनाट्य हे नाट्यप्रकार त्यानं हाताळले. नाटककार सतीश आळेकर, तेंडुलकर आणि हिंसा- : काल आणि आज, बहिणाई, कचराकोंडी, अशोक केळकर, के.आर.दाते : ऊर्जेच्या शोधवाटा, डिरा, सेझ, गावगुंफण असे सकस माहितीपट त्यानं दिग्दर्शित केले, त्यांचं छायाचित्रण स्वतः केलं. अरुण कोलटकरांच्या कवितांचं सादरीकरण केलं. दृष्टिहीन लोकांसाठी मराठीतली दहा नाटकं त्यानं ब्रेल लिपीमध्ये छापली. आकाशवाणीवर ‘कोसला’ या कादंबरीचं नाट्यरूपांतर केलं. आरोग्यसंवाद शिबिरांमधून विविध थरातल्या लोकांना आरोग्यभान आणि आत्मभान देता येईल याचे प्रयत्न केले. अलीकडच्या काळात ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं रहस्य’ या संहितेचं नाट्यवाचन केलं. सिनेमा, नाटक, शॉर्टफिम्स अशा अनेक माध्यमांमध्ये अभिनेता म्हणून काम केलं. मनात धुमसत असलेल्या अनेक प्रश्नांना, विचारांना वाट करून देणारे अनेक लेख लिहिले. महाराष्ट्रात, भारतात असलेलं वैचारिक दारिद्य्र, उदासीनता, बेफिकिरी आणि नाट्य करताना त्यामुळं वाट्याला येणारे भोग मांडणारा ‘संडास संस्कृती’ हा लेख त्याच्या लेखनाचा उत्तम नमुना आहे. आत्यंतिक चीड आणि परिस्थितीचा हतबल स्वीकार, आणि तरीसुद्धा बदल घडवण्याची इच्छा या सगळ्यांतून या लेखाची भाषा तयार झालीय.
नाटक हे लोकांसाठी असतं आणि ते लोकांपर्यंत पोचलंच पाहिजे, या प्रेरणेनं अतुलनं आपली नाटकं महाराष्ट्रभर आणि इतरत्र कशी नेता येतील याची वेगळीच पद्धत तयार केली. कमी खर्चात, किमान खर्च भरून निघेल अशा पद्धतीनं दौरे आखण्याचं अर्थतंत्र त्यानं आत्मसात केलं. कलेचं बेट न बनवता समाजाशी, त्यातल्या घडामोडींशी आणि विचारप्रवाहांशी जोडून घेणं त्यानं महत्त्वाचं मानलं. नाटकांच्या प्रयोगांमधून विविध सामाजिक चळवळींसाठी वेळोवेळी निधी उभा केला. नाटकाचे दौरे चालू असतानाच अनेक महत्त्वाची पुस्तकं तो लोकांपर्यंत पोचवायचा प्ररत्न करत आला.
नाटक हे अतुलच्या जगण्याच्या केंद्रस्थानी आहे. अलीकडच्या काळात माणसं वेगवेगळ्या भुलभुलैयांमध्ये अडकत चालली आहेत आणि त्यामुळं नाटक टिकणं अवघड होत चाललंय. कलाकार, अभिनेते सगळ्यांचाच पोच कमी होत चाललाय. अशा वेळी नाटक कसं टिकवायचं, वाढवायचं या विचारानं अतुल पछाडला आहे. ठराविक वर्तुळाबाहेर नाटक न्यायचं तर ते आणखी सोपं, आणखी कमी खर्चाचं, आणखी कमी अवडंबर असणारं असलं पाहिजे हे त्याला जाणवत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर त्यानं जे रिंगणनाट्य आखलं, त्यामध्ये हा विचार त्याला कृतीमध्ये उतरवता आला. कमी खर्च, मंचावर कमी वस्तू लागणारं हे नाटक कोणत्याही जागी कोणत्याही काळी चटकन करता रेईल असं आहे.
‘वेटिंग फॉर गोदो’पासून रिंगणनाट्यापर्यंतचा प्रवास एका वेगळ्या अर्थानं अर्थपूर्ण आहे. अॅब्सर्डिटी समजून घेण्याच्या आणि मांडण्याच्या आधीच्या प्रयत्नापासून आता सगळ्यांनी मिळून केलेलं हे रिंगण, अशी ही प्रतिकात्मक वाटचाल आहे. म्हणजे अॅब्सर्डिटीची जाणीव खोटी मानायचं कारण नाही. पण इथल्या लोकांना इथली प्रतीकं जास्त कळू शकतात, विचारांनी पुढं नेऊ शकतात. गोल करून एकत्र येणं, संवाद करणं यातून वर-खालीची उतरंड नष्ट होते. पुढ-मागं ही स्पर्धा नष्ट होते. अतुलची सर्वच नाटकं त्याची सामाजिक-राजकीय भूमिका मांडत राहणारी असली तरी दलपतसिंग, सत्यशोधक या काळापासून तो इथल्या आव्हानांना आणि दाहकतेला जास्त थेटपणे सामोरं गेलाय असं जाणवतं. इथली विषमता, इथलं जातवास्तव ही वस्तुस्थिती कशा प्रकारे स्वीकारायची, हा पेच नेहमीच असतो.
अतुलला समजावून घ्यायचं तर नुसती त्याची नाटकं किंवा पूर्ण झालेली कामं बघून चालणार नाही. दोन नाटकांच्या मधल्या पोकळीत त्याची जी तगमग चालू असते, त्यातूनही तो कळत असतो. फॉर्मबाबत परत-परत त्याच वाटांवरून जाण्याचा त्याला कंटाळा रेतो. त्यामुळं तो सतत जास्त असुरक्षित गोष्टींच्या शोधात असतो.
सॉक्रेटिसची नैतिकता समजावून घेणं, गोदोकडून निरर्थकता समजावून घेणं, चौकातली व्यामिश्रता समजावून घेणं, कान्होबाचं देवाशी असलेलं भांडण समजावून घेणं, पांडुरंग सांगवीकरचा राग समजावून घेणं, के.आर.दात्यांची ऊर्जा समजावून घेणं, आरोग्यसंवादात शरीरामार्फत मन समजावून घेणं, श्री.अ.दाभोलकरांकडून आंतरपीकपालट समजावून घेणं, विजय तेंडुलकरांचं लखलखीत असणं समजावून घेणं, बहिणाबाईला वाकून नमस्कार करणं, अशोक केळकरांच्रा विद्वत्तेला सलाम करणं, सतीश आळेकरांच्या तिरकसपणात सामील होणं आणि डॉ.नरेंद्र दाभोलकर असताना आणि नसताना त्यांची विवेकवादी भूमिका समजावून घेणं या सर्व अतुलच्या जगणं समजावून घेण्याच्या पद्धती आहेत. आणि अशा अनेक दृष्टिकोनांनी मिळून समष्टी बनते, अशी त्याची धारणा आहे. जिथं शक्य आहे तिथं सामूहिक कृती, जिथं आवश्यक आहे तिथं एकट्यानंच कृती अशा मिळेल त्या मार्गानं तो अभिव्यक्त होत असतो. म्हणूनच ‘प्रोटेस्ट’ नावाचं त्याचं पंधरा मिनिटांचं निःशब्द नाटक ही टोकदार अभिव्यक्तीसुद्धा निर्माण होऊ शकते. जगण्याचे विविध आराम एकत्र करत, विविध कलांचा एकत्रित विचार करत, पुस्तकांबरोबर माणसांना वाचत, आपल्या चुकांची कबुली देत, मर्यादांचा स्वीकार करत तो आपली सामाजिक-राजकीय भूमिका वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करत सतत मांडत राहील, याची खात्री त्याच्या आत्तापर्यंतच्या कामाकडं पाहिलं की मिळत राहते.
शिपूरकर : माझा पहिला प्रश्न थोडा विस्तारित आहे. तुझ्या नाटकांची सुरुवात जेव्हा तू केलीस, तेव्हापासून आत्तापर्यंत जे बदल घडत गेले; त्यांचा आढावा मला यातून अपेक्षित आहे. तुझी सुरुवातीची नाटकं आणि आत्ताची- यांच्यात फार फरक पडलाय, असं तुला वाटतं?... विशेषतः तू नाटकातून सुरुवातीला हाताळत असलेल्रा ‘अॅब्सर्डिटी’चा प्रवास आता नेमकेपणाकडे झालाय, असं विधान जर मी केलं; तर ते योग्य ठरेल का? म्हणजे या अॅब्सर्डिटीपासून तू फारकत घेतलीयेस की, ती असण्याच्या एका अंतःस्थ जाणिवेसोबतच तू तुझा पुढचा प्रवास केलायस?... आणि या संपूर्ण नाट्यप्रवासात तुझी सामाजिक-राजकीय भूमिकाही बदलत गेली, असं म्हणता येईल का?
पेठे : या प्रश्नाचं उत्तर दोन स्तरांवर देता येईल. पहिलं असं, व्यक्तिगत आयुष्य जसजसं पुढे जात असतं तसतशी तुमची नाटकांची आवड-निवडही बदलत जाते. आपली अभिरुची बदलत जाते. आपला दृष्टिकोन बदलत जातो. आपल्याला अधिकाधिक स्पष्टताही येऊ लागलेली असते. थोडक्यात, एका बाजूला जेव्हा तुम्ही काम करत असलेल्या गोष्टींतून जसा तुमचा अनुभव वाढत असता, तसं काही ज्ञानही तुमच्या पदरात पडू लागतं. या ज्ञानाला जर एक विशिष्ट दिशा आपण देत गेलो असू, तर हे ज्ञानही एका दिशेनं आणि खोलवरचं होत जातं, असा माझा तरी आजवरचा अनुभव आहे.
आत्ता जे विधान तू केलंस की, माझी सुरुवातीची नाटकं ही अॅब्सर्ड होती; ते विधान खरं म्हणता येणार नाही. मी नाटकांची सुरुवात केली, ती बालनाटकांपासून. मुलांच्या भवतालातले प्रश्न, त्यांचं वैचारिक-भावनिक विश्व असे बालनाटकांचे विषय मी त्या वेळी हाताळले. अगदी काही नावंच घ्यायची झाली तर, माझं अगदी सुरुवातीचं ‘मैदान हरवलं आहे’ या संकल्पनेवरचं नाटक- यात मुलांना खेळायला आसपास मैदानं कशी कमी होत चाललीयेत, हा प्रश्न मी हाताळला होता. ‘आनंदीगावचा गंमतराव’ या नाटकातून मी एक लहान मुलगा चोरांशी कसा लढतो आणि आपलं धैर्य कसं दाखवून देतो, हे उभं केलं होतं. तर, माझी पहिली एकांकिका ‘चेस’ ही रॅगिंगसारख्या विषयावरची होती. हे सगळे विषय पाहता, माझी नाटकं अॅब्सर्ड होती, असं मला तरी वाटत नाही...
हो, मी ‘वेटिंग फॉर गोदो’ हेही नाटक त्यानंतर केलं, हे खरंय. या नाटकामुळेच मी अॅब्सर्ड नाटकं करतो, अशी माझी ओळख झाली... पण म्हणून ती माझी ओळख असल्याचं नाही म्हणता येणार. मघाशी मी उल्लेखलेल्या बालनाट्यांच्या सोबतीनेच इतरही काही वेगळ्या विषयांवरची नाटकं मी केलीयेत. मकरंद साठेंची जी नाटकं मी केली, ती बरीचशी सामाजिक-राजकीय धारणा असणारी होती- मग ते ‘सूर्य पाहिलेला माणूस’ असेल किंवा ‘गोळायुग’ असेल. ही आजचे प्रश्न व्याकुळतेने मांडणारी नाटकंच तर होती!... त्यामुळे मी आधी फक्तच अॅब्सर्ड नाटकं केली आणि नंतर कधी तरी सामाजिक नाटकांकडे वळलो, असं मला वाटत नाही. अॅब्सर्ड नाटक एका बाजूला अस्तित्वविषयक मांडणी करतं, तर दुसऱ्या बाजूला राजकीय भूमिकासुद्धा मांडत असतं. दुसरं असं की, पहिल्या टप्प्यावर आपण केलेली नाटकं ही बऱ्याचशा प्रमाणात आपल्या व्यक्तिगत आयुष्याशी जोडली गेलेली अशीच असतात. मला आठवतं- मी माझ्या सुरुवातीच्या काळात इतका गोंधळलेलो, घाबरलेलो- किंबहुना न्यूगंडाने पछाडलेलो होतो की, ज्याचं नाव ते. याचंच एक संपूर्ण प्रतिबिंब माझ्या नाटकांत त्या वेळी दिसत होतं. म्हणजे, नाटकांतून माझा अभिनय किंवा दिग्दर्शन हे फार नंतर सुरू झालं होतं... त्याआधी मी लिहायला लागलो होतो. मी त्या वेळी कविता करायचो. काही छोटी नाटुकली आणि एकांकिकाही लिहायला मी तेव्हा सुरुवात केली होती. त्यातून व्यक्त व्हायचो. त्या वेळी मला रोज कशाचा न कशाचा तरी राग रायचा. भीतीही वाटायची. त्याविषयी व्यक्त होण्याची गरज भासायची. माझ्या लिहिण्यातून मग मी ती भागवायचो.
...एके काळी मी नकारात्मक भावनांनी एवढा पछाडलो गेलो होतो की, आमच्या घरापाशी असलेल्या शनीच्या मारुतीला मी घाबरून रोज दोन-दोनशे फेऱ्यादेखील मारल्या आहेत. वेगवेगळ्या दबावांमुळे मी त्या वेळी अगदी एकटा पडलेलो होतो. अशा काळात कविता आणि साहित्याने मला साथ दिली होती. हेच सगळं प्रतिबिंब माझ्या नाटकांत पडलंय. यानंतरच्या काळात जेव्हा मी सतीश आळेकरांची नाटकं बघितली, तेव्हा त्यांचाही बराच प्रभाव माझ्यावर पडला. यानंतर मात्र काही विशिष्ट कालखंडानंतर माझ्या सामाजिक-राजकीय जाणिवादेखील अधिक प्रखर व्हायला लागल्या, हेही तेवढंच खरं. पुढे मग श्याम मनोहर आणि मकरंद साठे हे दोन लेखक जेव्हा माझ्या आयुष्यात आले, तेव्हा माझ्या समकालीन संवेदना अधिक विस्तृत पावल्या, असं मी म्हणेन. अर्थात, एके काळी माझ्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर जीवनात असणाऱ्या निरर्थकतेची जी अनुभूती मला जाणवली होती, ती नंतरच्या टप्प्यावर मात्र फार कधी जाणवली नाही. आयुष्याला अर्थ आपणच देऊ शकतो, याविषरीच्या माझ्या काही ठाम भूमिका लोकांमुळे, घटनांमुळे, नाटकांमुळे, साहित्यामुळे आणि जगण्यामुळे पुढच्या काळात निशिचतच प्रज्वलित होत गेल्या, असं मी म्हणेन.
शिपूरकर : एक दिग्दर्शक म्हणून तुझ्या नाटकप्रवासाचं एक योग्य प्रकारे मूल्यमापन, याची दर्जेदार समीक्षा आजवर केली गेलीय, असं तुला वाटतं का? तुझ्या वैचारिक प्रवासाची योग्य दखल घेतली गेलीय का?
पेठे : खरं उत्तर द्यारचं तर, ‘नाही’! माझ्या कामाचं योग्य मूल्यमापन झालेलं नाही. पण, यासोबतीलाच दुसरीकडे माझ्या आधीच्या पिढीतल्या लोकांच्या तरी कामाचं योग्य मूल्यमापन कुठे झालंय, असाही एक प्रश्न उद्भवतोच. हे पाहता असंही लक्षात येतं की, मराठी समाजात या अर्थाने मूल्यमापन करणारे लोकच मुळी अनुपस्थित आहेत.
वृत्तपत्रांबाबत या संदर्भात बोलायचं झाल्यास अशा कलांबाबात लिहिणारे रिपोर्टर्स आहेत, पण समीक्षक नाहीत. त्यामुळे अलीकडच्या काळात आपणच आपलं अंतर्मुख व्हावं... विचारांत पडावं, असं काही मला तरी आजवर फार कमी वेळा अनुभवायला आलंय.
खरं तर, एखादा दिग्दर्शक जेव्हा काही नाटकं निवडत असतो, तेव्हा ती नाटकं म्हणजे त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन असतो. हे एकेक नाटक म्हणजे त्याचं फक्त व्यक्तिगत आयुष्य नव्हे; तर त्या आयुष्याला चिकटलेला समाज, त्याच्या आजूबाजूचं राजकारण, आसपासची भौगोलिक परिस्थिती आणि परिसर हा त्याच्यात घट्टपणे, सेंद्रियपणे चिकटलेला असतो. त्यामुळे नाटकं कुठली केली, यावरून तुमचा तत्कालीन समाज कसा होता, प्रश्न कुठले होते; हे लेखांचे खरं तर विषय नक्कीच होऊ शकतात. पण अजून तरी ते माझ्या अनुभवाला आलेलं नाहीये.
मराठी समाजात टीका, समीक्षा, मूल्यमापन, पुनर्मूल्यांकन नावाची गोष्ट आज जवळजवळ अस्तित्वात नाही, याचा खेद वाटतो. व्यक्तिगत पातळीवर मात्र माझे अनेक मित्र आहेत, जे माझ्या कामाचं मूल्यमापन करण्याचा रोखठोक प्रयत्न करतात, हेही तेवढंच खरंय...
शिपूरकर : ... पण तू स्वतः मात्र मूल्यमापन करण्याचा एक प्रयत्न केलायस. ‘तेंडुलकर आणि हिंसा : काल आणि आज’ ही तू आणि मकरंद साठेंनी मिळवून बनवलेली तेंडुलकरांवरची डॉक्युमेंटरी फिल्म- हिच्याविषयी मी बोलतोय. याच फिल्मसारखं काही नाटकाच्या संदर्भात तुला करायला आवडेल का?... नाटकातल्या कुणाच्या कामाबाबत तुला असा काही प्रयत्न रस घेऊन करावासा वाटेल का?
पेठे : असे खरं तर खूप आहेत. मी असा प्रयत्न आळेकर आणि बहिणाबाई चौधरींविषयी केलाय यापूर्वी. नावं तर कैक घेता येतील. मला सांग, सत्यदेव दुबेंचं काय मूल्रमापन झालं आपल्याकडे? विजया मेहतांचं स्वतःचं लेखन राहू देत; पण त्यांचं अन् त्यांच्या नाटकांचं, त्यांच्या शैलीचं तरी चांगलं मूल्यमापन कुठे झालंय आजवर?... असे बहुतेक लोक कित्येकदा तर अनुल्लेखाने मारले गेले आहेत. त्यांचं मूल्यमापन आवश्यक असूनही होऊच शकलेलं नाही. मला ते करायला आवडेल. पण एकीकडे हे असतानाच, मला त्या-त्या कालखंडातली विशिष्ट नाटकं आणि त्यांचा त्या कालखंडाशी असणारा संबंध उलगडून पाहण्यातही रस आहे. तत्कालीन समाजरचना काय होती, त्या काळात कोण माणसं काय-काय करू पाहत होती, त्याचे समकालीन संदर्भ काय... अशा विषयाला घेऊन फिल्म करण्याचा माझा मानस आहे. ‘रंगभूमीचं रसग्रहण’ असं काही करता आलं, तर मला ते आवडेल.
शिपूरकर : आता मी थेट सध्या तू जे काम करतोयस, त्याकडे येतो. र. धों. कर्वेंच्या सबंध कामासंदर्भात तू ‘समाजस्वास्थ्य’ म्हणून जे नाटक करायला घेतलंयस, त्याविषयी मला बोलायचंय. समाजातील स्त्री-पुरुषांची लैंगिकता या विषयाला घेऊन तू करत असलेलं हे नाटक, त्या अर्थाने ‘रधों’चा क्रांतिकारी विचारच मंचित करणारं असणार आहे. हा विषय आजच्या काळातही तेवढासा चर्चिला जात नाहीच. शंभर वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेला हा विषय आज नाट्यरूपात पुढे आणावा, असं तुला का वाटलं?...
पेठे : खरं तर गेली अनेक वर्षं ‘रधों’चे विचार पुढे आणावेत, त्यांवर नाटक करावं, असं माझ्या मनात होतं. शिवाय, कर्वेंशी माझे त्या अर्थाने दोन ते तीन स्तरांवर संबंध आहेत, असं म्हणता येईल... एक म्हणजे, माझ्या आजोबांनी त्या काळी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक चालावं यासाठी आर्थिक मदत म्हणून जाहिराती मिळवून दिल्या होत्या. कर्वेंच्या सत्तरीच्या सत्कार-समारंभातही माझ्या आजोबांचा पुढाकार होता...
अर्थात, या त्या अर्थाने अगदीच खासगी स्वरूपाच्या संबंधांव्यतिरिक्तदेखील ‘रधों’शी माझे वैचारिकदृष्ट्या नातं सांगणारे संबंधही आहेतच. मला स्वतःला ‘लैंगिकता’ या विषयाला घेऊन इतर कुठल्याही भारतीय तरुणाला पडतील, तसे अनेक प्रश्न माझ्रा पौगंडावस्थेत पडलेले असायचे. मात्र, अशा विषयांना घेऊन जिथे जवळपास प्रत्येकच जण अळीमिळी-गुपचिळीचीच भूमिका घेत असतो, त्या आपल्या समाजात अशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कोण अन् कशाला देतंय?... अशा वेळी, यावर थेट काही भूमिका मांडू पाहणारे ‘रधों’ मला अर्थातच अधिक जवळचे वाटायचे.
...लैंगिकतेप्रति असणाऱ्या आपल्या सामाजिक अज्ञानामुळे लिंग व लिंगभाव यांतला फरक आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम, याकडे आपण कधीही लक्षच देऊ शकलो नाही. आपली शिक्षणव्यवस्थाही त्यात कमी पडली आहे. आपलं शरीर, आपल्या भावना, यासंबंधीचे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न या सगळ्याच्या उत्तरांचा शोध घेता-घेता एके दिवशी मी ‘रधों’पर्यंत येऊन पोचलो... आणि खरं सांगतो; या टप्प्यावर येऊन शब्दशः स्तिमित झालो!
सन १९२० मध्ये ‘समाजस्वास्थ्य’मध्ये जे विषय होते, ते आजच्या संदर्भातही तेवढेच प्रस्तुत आहेत, असं आपल्या लक्षात येईल. पण आपल्या समाजाचं दुर्दैवही असं की, आपण ‘रधों’नी मांडलेल्या संततिनियमनाला ‘कुटुंबनियोजन’ असं सोईस्कर नाव दिलं आणि बायकांच्या संदर्भातील समागम-वैचित्र्याचं जे एक महत्त्वाचं मूल्य कर्वे मांडू पाहत होते, तेच नेमकं आपण बाजूला सारलं. खरं तर, स्त्रियांच्या संदर्भातील लैंगिकतेचा एक प्रखर अन् खणखणीत असा स्त्रीवादी दृष्टिकोन ‘रधों’ मांडू पाहत होते... पण दुर्दैवाने आपण नेमकं तेच दुर्लक्षित केलं.
प्रखर बुद्धिप्रामाण्य, विवेकी विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन हे तर ‘रधों’च्या साहित्यात जाज्वल्य आहेच; पण या व्यतिरिक्त त्यांच्यात असणारी नवमतवादी दृष्टी हीदेखील तेवढीच महत्त्वाची आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, त्यांचा लढा हा तत्कालीन ‘जीर्णमतवादा’विरोधी होता. नवरचना काय असते, समाजातला मोकळेपणा म्हणजे काय, एकमेकांना अवकाश देणं म्हणजे काय- या सगळ्याच्या संदर्भात र.धों. कर्वेंनी जे काही म्हणून ठेवलंय, ते केवळ थक्क करणारं असंच आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रातल्या त्या-त्या काळात सोईस्कररीत्या दुर्लक्षिल्रा गेलेल्या अनेक थोरांप्रमाणेच कर्वेदेखील त्यांच्या काळात दुर्लक्षिलेच गेले. आम्ही जसं फुले आणि आगरकरांना दुर्लक्षिलं, नेमस्त म्हणत अनेकांचा जसा धिक्कार केला; तसंच ‘रधों’चं महत्त्वसुद्धा आम्ही जाणलं नाही, हेच खरं...
शिपूरकर : नक्कीच. हे नाटक खूप महत्त्वाचं ठरेल, यात शंका नाही. विशेषतः नव्या विचारांच्या सध्याच्या काळात जेव्हा स्त्रीवाद, स्त्री-पुरुष समता यासोबतच स्त्रीपुरुषाव्यतिरिक्तच्या लिंगांनासुद्धा मान्यता मिळण्याच्या मोकळ्या विचारांच्या अलीकडल्या काळात कर्वे नव्या अर्थाने कदाचित आपल्याला उमगू शकतील, अशी आशा करू या... आता मी थोडा मागे जातो. नुकतंच तू ‘व्हाईट रॅबिट, रेड रॅबिट’ या नावाचं एक नाटक केलंस. पूर्णतः एक नवा आणि वेगळा प्रयोग होता हा. त्यातून तुला काय उलगडलं, हे सांग ना-
पेठे : मला स्वतःला वेगवेगळी आव्हानं घ्यायला आवडतं. एक म्हणजे, आपण याआधी जे काही केलंय, ते सगळं पुसून टाकत नव्याने एखादी गोष्ट बिनदिक्कत करून पाहावी, असं मला नेहमीच आवडतं. त्यातच माझी प्रायोगिकता आहे, असं मी समजतो. मला नव्या रचना करता येतील का, मला नव्या शैली आत्मसात करता येतील का- हे मी पाहत असतो. ‘व्हाईट रॅबिट...’ हे अशाच एका प्रयोगाचा भाग.
इराणमधला लेखक नसीम सोलेमॅनपोर याने लिहिलेलं हे नाटक. यातली खरी गंमत आणि खरं आव्हानही हे की, या नाटकाची संहिता थेट रंगमंचावरच अभिनेत्याच्या हातात दिली जाते. याची कसलीही रंगीत तालीम वगैरे नसते. याला कुणी दिग्दर्शकही नसतो. आपणच आपलं नाटक दिग्दर्शित करायचं आणि वाचता-वाचता ते प्रेक्षकांपुढे मंचावर घडवत जायचं, ही त्यामागची मूळ संकल्पना! एक आव्हान म्हणून मी ते काही महिन्यांपूर्वी स्वीकारलं.
पण खरं सांगतो- सुरुवातीचा काही वेळ मला वाटणारी भीती आणि गोंधळ त्या नाटकाची संहिता वाचता-वाचता दूरच झाला. जगभरात सध्या सुरू असणारा गोंधळ, असहिष्णुता आणि सतत जाणवणारी एक अनामिक घुसमट याचं दर्शन घडवणारी ती संहिता... ती वाचता-वाचता मी तिच्याशी कधी थेट कनेक्ट झालो, हे लक्षातही आलं नाही. या ‘परकारा-प्रवेशा’नंतर या नाटकातली उत्स्फूर्तता ही आव्हान न राहता, जणू एक वैचारिक खाद्यच बनली आणि मी अंतर्मुख होऊन ते नाटक करू लागलो... मला वाटतं राजसत्ता जगभरात जिथे-जिथे म्हणून संवेदनशील माणसांना चिरडू पाहील, तिथे-तिथे हे असे छोटे-छोटे प्रयोग आणि लेखक अक्षरशः फुटून वर येत राहतील, ते थांबणार नाहीत. जमीन कितीही धोपटण्याचा प्ररत्न करा, पण तिच्यातून नवा अंकुर फुटल्याशिवाय राहणार नाही- अशी खात्री देणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रयोग असल्याचं मी म्हणेन.
शिपूरकर : ‘रिंगण’ नाटकानंतर आता जवळपास वर्षं उलटलंय. आज मागे वळून पाहताना त्या प्रयोगाविषयी, त्या कामाविषयी तुला काय मांडावंसं वाटतं?
पेठे : दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांच्या खुनानंतर न्यायासाठी रस्त्यावर उतरणं आणि आपला अहिंसक लढा चालू ठेवणं, हा एक विचार तर अर्थातच होता. पण, दुसरीकडे आपल्या लेखनातून फुले-शाहू-आंबेडकर यांची नावं घेणारे आणि प्रत्यक्ष कृतीतून मात्र मध्यमवर्गीय प्रतिमाच सतत उजागर करणारे- अशांनासुद्धा यातून काही कृतिशील संदेश मिळावा, असा हेतूही होता. त्या अर्थाने ‘रिंगण’ हे आमचं आक्रंदन होतं. आपण लहानाचे मोठे होत जाणं, म्हणजे आपला प्रवास व्यक्ती ते समष्टी असा होत जाणं... ‘रिंगण’ने हेच काही प्रमाणात साधण्याचा प्रयत्न केलाय...
(शब्दांकन : स्वप्नील जोगी)
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment