एखादी साथ पसरते कशी आणि लॉकडाऊनशिवायही ती रोखता येते कशी?
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
प्रकाश बुरटे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 17 April 2020
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona virus लॉकडाउन Lockdown

जीवाणू-विषाणू हे अति सूक्ष्म असल्याने डोळ्यांना दिसत नाहीत. त्यांचं अस्तित्व कोणत्याही माणसाच्या पंचेंद्रियांना जाणवत नाही. परंतु जीवाणू-विषाणू ही काही न दिसणारी विश्वातील एकमेव गोष्ट नाही. जगण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी हवा कुठे दिसते? दिसत नसली तरी ती वाऱ्याच्या रूपानं किंवा माणसाचं नाक-तोंड बंद केल्यावर जाणवते. या उलट, पाणी आपल्या चांगलंच परिचयाचं. परंतु पाण्याचा एक रेणू (मॉलिक्युल) दिसत नाही, की पंचेंद्रियांना जाणवत नाही. कुठल्याही मूलद्रव्याचा, भले ते किरणोत्सारी असले तरी, अणू (अॅटम) देखील दिसत नाहीत. पंचेंद्रियांना न जाणवणाऱ्या अशा कित्येक सूक्ष्म गोष्टींच्या अस्तित्वाचा सामान्यांना पत्ता नसतो. तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या अत्यंत बुद्धिमान व्यक्तींनादेखील पत्ता नव्हता. साहजिकच या सर्व सूक्ष्म गोष्टींच्या असण्या-नसण्याचे भले-बुरे परिणामदेखील सामान्यांच्या अवाक्याबाहेर असतात.

लुईस पाश्चर (Louis Pasteur १८२२-१८९५) सारख्या आधुनिक संशोधकाला जीवाणू-विषाणू यांचं अस्तित्व मायक्रोस्कोपच्या मदतीनं समजलं. त्यांनी अनेक आजारांवरील लसींचा शोध लावला. आजार सूक्ष्म जंतूमुळे होतात असा त्यांनी सिद्धान्त मांडला. स्वतःच्या कृतीमागील हेतू तर फक्त मानवी मेंदूतच असतात. त्यांना प्रत्यक्ष भौतिकजगात अस्तित्व नसतंच. स्वतःच्या हेतूंची ओळख असणाऱ्या माणसांना अनुभव शिकवतो की, माणसाच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण कृतीमागे ती करणाऱ्या व्यक्तीचे काही हेतू असतात, भले ते समजत नसतील. यामुळे महत्त्वाच्या निर्णयक्षम व्यक्तींच्या नजरेतूनदेखील जीवाणू-विषाणूंच्या आजाराची साथ केव्हाही येऊ शकते अशा टोकावर आपण आहोत, हे राजकारणाच्या नेहमीच्या धबडग्यात लक्षात येत नाही. ‘वेळेत घातलेला एक टाका नंतर घालावे लागणारे नऊ टाके वाचवितो’ अशी जरी इंग्रजी म्हण असली, तरी तो महत्त्वाचा एक टाका घालायची वेळ निघून गेल्यावर म्हणीतील ते ‘नऊ’च काय, नऊ हजार टाके घालूनही आजाराने फाटायला लागलेले समाजाचे वस्त्र एकसंध टिकवता येत नाही. करोना विषाणूने जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांना असे रंगेहाथ पकडले आहे.

ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद तसेच सुश्रुत संहितेत उल्लेख असण्याइतका क्षय रोग प्राचीन काळापासून माहीत आहे. रॉबर्ट कुक (Robert Koch) या जर्मन वैज्ञानिकाने क्षयरोगाचे जीवाणू प्रथम शोधले आणि त्यामुळे क्षयरोग पसरतो, असे १८८२ मध्ये जाहीर केले. क्षयरोगाच्या जीवाणूंची बाधा झालेली व्यक्ती बोलताना, गाताना आणि श्वासोच्छवास करताना रोगाचे जीवाणू हवेत पसरतात.

तसे सध्या थैमान घालणाऱ्या नव-करोना आजाराचे विषाणू पसरत नाहीत, हा मोठा दिलासा आहे. ते पसरतात बाधित व्यक्ती खोकताना आणि शिंकताना उडणाऱ्या तुषारांमधून. हे तुषार जड असल्याने दोन मीटर किंवा सहा फूट अंतरापेक्षा जास्त अंतरावर उडत नाहीत. परिणामी खोकताना, शिंकताना नाक-तोंडासमोर रुमाल धरला, तर विषाणू पसरणार नाहीत. परंतु ते रुमाल वापरून अडवले नाहीत, तर शिंकणे-खोकणे यातून हे जंतू समोरील पृष्ठभागावर पसरतात. तेथे ते काही तास टिकतात. या काळात त्या पृष्ठभागास ज्याचा हात लागेल त्या हातावर हे विषाणू असल्याने, ते चेहऱ्यावरून हात फिरवताना नाकापर्यंत विषाणू पोहोचतात. दुसरी व्यक्ती बाधित होऊ शकते. ते टाळण्यासाठी वारंवार हात धुणे आवश्यक ठरते.

थोडक्यात नव-करोना आजाराच्या प्रतिबंधासाठी खोकता-शिंकताना नाक-तोंडासमोर रुमाल धरणे, दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुट अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे ही संरक्षक त्रयी काटेकोरपणे वापरणे पुरेसे आहे. हे बोलायला सोपे असले तरी वास्तवात ते सर्वांनाच जमत नाही. म्हणून परिसरातील जमतील तेवढे पृष्ठभाग वारंवार निर्जंतुक करणे हे किचकट काम वाढते. यांचा साथ आटोक्यात ठेवण्यास चांगला उपयोग होतो. हे सगळे जमले नाही तर साथ पसरू शकते. अशा वेळी सक्तीचे लॉकडाऊन, त्यासाठी कायदे, शिक्षा, पोलीस कारवाई इत्यादी मार्ग वापरणे भाग पडते.

सध्या जरी या आजाराविरुद्ध लस नसली तरी बाधित रुग्ण ओळखण्याच्या चाचण्या उपलब्ध आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांचा जोरदार वापर करून रुग्ण ओळखून त्यांचे विलगीकरण करणे आवश्यक ठरते. यांतील आपण स्वतःहून काय करायचे आणि काय कायद्याच्या उगारलेल्या बडग्याला घाबरून करायचे, हे ज्या त्या समाजाने ठरवावे.

नव-करोना विषाणूंचा माणसाला अनुभव नसल्याने, त्याच कुटुंबातील ज्ञात विषाणूंच्या साथींचे चलनवलन समजावून घेतले तर साथ पसरू न देण्याच्या कृतींची अंमलबजावणी स्वतःच्या इच्छेतून होईल. परिणामी वरून निर्णय लादण्याची गरज कमी होईल. ते लोकशाहीसाठी आवश्यक आहे. असा एक प्रयत्न म्हणजे हा लेख आहे.

सोबतच्या आकृती एकमधील आलेख करोना साथीच्या आजाराची पहिली लागण झाल्यापासून तिचा फैलाव कसा होऊ शकतो आणि शेवटी साथीला ओहोटी लागून ती कशी नष्ट होऊ शकते, याचे एक संकल्पनाचित्र रेखतो (संदर्भ : ‘How will country-based mitigation measures influence the course of the COVID-19 epidemic?’; by Roy M Anderson, Hans Heesterbeek et.al.; https://www.thelancet.com/pdfs/journals/lancet/PIIS0140-6736(20)30567-5.pdf). या आलेखांची पुढील संक्षिप्त चर्चा सामान्य माणसालादेखील साथीच्या आजाराचे अंतरंग थोडेबहुत उलगडून दाखवील अशी आशा आहे.

आकृती एकमध्ये तीन रंगांत तीन आलेख आहेत.

१) लाल आलेख-रेषा लागण कमी होण्याचा कसलाही प्रयत्न नसताना होणारा साथीचा फैलाव दाखवते,

२) हिरवी आलेख-रेषा परिसरातील माणसे सुरक्षित अंतर ठेवण्याची (दोन मीटरच्या आत, १५ मिनिटापेक्षा जास्त वेळ संपर्क) काळजी घेत असताना, तसेच वारंवार हात धूत असतील तर होणारा साथीचा फैलाव दाखवते.

३) निळी आलेख-रेषा व्यक्तींमधील सुरक्षित अंतर ठेवण्याचे निर्बंध मध्येच सैलावल्यावर पुन्हा उद्भवणाऱ्या साथीचा होणारा फैलाव कसा होतो ते दाखवते.

या तिन्ही आलेखांसाठी आडवा ‘क्ष’ अक्ष सामाईक आहे. तो अक्ष पहिला संसर्ग झाल्यापासूनचा काळ महिन्यांत दाखवतो. रुग्णसंख्या दाखवणारा उभा ‘य’ अक्षदेखील या तीन आलेखांना सामाईक आहे. परंतु त्यावर संख्यांचे अंकच कुठे दिसत नाहीत. त्यामागे एक कारण आहे. लाल शिखराची उंची आणि रुंदी संख्यात्मक दृष्टीने पाहू जाता पुढील अनेक अज्ञात घटकांवर अवलंबून आहे. उदा. विषाणूंची वैशिष्ट्ये, फैलाव होणाऱ्या वस्तीची लोकसंख्या, प्रत्येक घराचे चटई क्षेत्रफळ, घरांमधील मोकळ्या जागा, वस्तीची विरळता-दाटी (घनता), स्वच्छतेसाठी पाण्याची उपलब्धता, नागरिकांचा आहार, व्यायाम, प्रतिकारशक्ती इत्यादी. त्यांपैकी काहींचा उल्लेख त्याच लाल शिखराच्या आलेखाशेजारील चौकटीत केला आहे. परिणामी, आकृतीमधील तिन्ही आलेखांकडे संख्यात्मक नजरेने पाहण्याऐवजी साथीच्या स्टेजेस किंवा टप्पे पाहणे आणि योग्य प्रकारच्या हस्तक्षेपांतून जीवितहानी कमी करण्याचे मार्ग शोधणे, यासाठी या आकृतीकडे पाहणे अपेक्षित आहे.

प्रथम या तिन्ही आलेखांचे महत्त्वाचे टप्पे समजावून घेऊया. पहिली लागण झाल्यानंतरचा सुमारे दीड महिन्याचा काळ हा पहिला टप्पा आहे. या टप्प्यात तिन्ही रंगांच्या आलेख-रेषा (रुग्णसंख्या) ‘क्ष’ अक्षाला चिकटलेल्या दिसतात. म्हणजे रुग्णसंख्या अगदी कमी आहे. पुढील एक महिन्याचा काळ आहे दुसरा टप्पा. या टप्प्यात रुग्णसंख्या ‘क्ष’ अक्षापासून हलकेच उंचावते आहे. येथे तीन आलेख-रेषांचे वेगळेपण दिसू लागते. तिसरा टप्पा मात्र अति वेगाने रुग्णसंख्या वाढत राहण्याचा काळ आहे. लाल रंगातील आलेखाचा तिसरा टप्पा पाहून अशी भीती वाटते की, जगातील सर्व लोकांना रुग्ण बनवूनच हा टप्पा थांबणार आहे की काय? परंतु तसे होत नाही. रुग्णसंख्या विशिष्ट पातळीपर्यंत येऊन ती कमी होऊ लागते. येथे सुरू होतो चौथा टप्पा. याची दोन कारणे आहेत.

पहिले कारण करोना आजाराच्या रुग्णाचा संसर्ग पोहोचू शकत होता, तेथपर्यंतच्या परिसरातील काही रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आणि बरेच जण आजारातून बरे झाले आहेत. त्यांना हा आजार पुन्हा होणार नाही. कारण शरीराची या जंतूंशी जानपेहचान झाली आहे. विषाणूंच्या विरोधात शरीराने प्रतिकारशक्ती कमावली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढणे संपले आहे. रुग्णसंख्या कमी होण्याचे दुसरे कारण जास्त महत्त्वाचे आहे. परिसरात उरलेल्या सर्वांच्या शरीरात कमी प्रमाणत या विषाणूंचा डोस पोहोचला आहे. जणू त्यांना आजारविरोधी लस टोचली आहे. त्यांच्या शरीराने स्वतःची प्रतिकारशक्ती आता कमावलेली आहे. ही प्रतिकार शक्ती परिसरातील सर्व व्यक्तींमध्ये म्हणजे या परिसर-समूहात पसरली आहे. तीमुळे आता परोपजीवी विषाणूला आत शिरायला योग्य असा मानवी देह मिळणार नाही. त्यामुळे साथ उताराला लागली आहे.

साथ जशी सुरू झाली, त्याच्या उलट्या क्रमाने ती नष्ट होत असल्याचे तिन्ही रंगांच्या आलेख-रेषा दाखवतात. या साथीने लोकांना मोठ्या प्रमाणात पिडले आहे आणि अनेक बळीही घेतले आहेत. ते प्रमाण कसे कमी होऊ शकते ते आता आपल्याला पाहायचे आहे.

आकृती एकमधील तिन्ही आलेख-रेषांची ही समान लक्षणे लक्षात घेतल्यानंतर आता त्यांच्यातील फरक पाहुया. त्यासाठी आता पुन्हा एकदा आकृती एकमधील तीन रंगांतील तिन्ही आलेख आठवावेत किंवा परत पाहावेत.

तिन्ही आलेखांचे आकार जमिनीवर ठेवलेल्या घंटेच्या आकाराशी नाते सांगतात. आकृती एकने असे गृहीत धरले आहे की, रुग्णसंख्या ४ ते ७ दिवसांत दुप्पट होते. या तिन्ही आलेखांतील नजरेला जाणवणारा पहिला फरक म्हणजे तिन्ही रंगांच्या आलेख-रेषांसाठी ‘य’ अक्षावरील रुग्णसंख्येचे प्रमाण एकच असले तरी त्यांची उंची आणि रुंदीदेखील भिन्न आहे. प्रत्येक रंगाच्या आलेख रेषेची जास्तीत जास्त रुग्णसंख्या भिन्न आहे. लाल आलेख रेषेपेक्षा हिरवी आलेख रेषेच्या शिखराची उंची कमी आहे. म्हणजे घनिष्ट संपर्क टाळण्याचा मोठाच उपयोग झाला आहे.

दुसरा मुद्दा आहे- तिन्ही शिखरांच्या रुंदीचा किंवा पसरटतेचा. ती वेगळी असल्याचे डोळ्यांना दिसते आहे, परंतु ती आता प्रमाणित पद्धतीने मोजायची आहे. प्रमाणित पद्धत म्हणजे अक्षांचे प्रमाण, काळ, देश, यामधील बदलांमुळे तौलनिक रुंदी बदलणार नाही. शिवाय त्यात चुका कमी असतील. अशी पद्धत समजण्यासाठी आकृती दोनच्या चौकटीची मदत घेऊया.

आकृती दोनमध्ये असेच एक शिखर दाखविले आहे. सदर आकृतीमधील अर्ध्या उंचीवरील आडवी रेषा शिखराच्या दोन टोकांना जेथे छेदते, तेथून खाली ‘क्ष’ अक्षापर्यंत दोन उभ्या निळ्या लंब-रेषा रेखल्या आहेत. त्या ‘क्ष’ अक्षाला X1 आणि X2 या बिंदूवर छेदतात. त्यां दोन बिंदुंमधील फरक म्हणजे शिखराची अर्ध्या उंचीवरील पूर्ण रुंदी होय. शिखराची पसरटता शिखरांच्या या अर्ध्या उंचीवरील पूर्ण रुंदीमध्ये मोजली जाते (Full Width at Half Maxima). या दोन निळ्या रेषा आणि त्यांच्यावरील शिखराचा भाग यांतील क्षेत्रफळ शिखराखालील एकूण क्षेत्रफळाच्या ९६ टक्के असते.

ही पद्धत वापरून आकृती एकमधील तिन्ही रंगांच्या आलेख-रेषांच्या शिखरांची रुंदी दिवसांत मोजल्यास अशी येते :

१) लाल आलेख-रेषा लागण कमी होण्याचा कसलाही प्रयत्न नसताना होणारा साथीचा फैलाव दाखविते आहे. त्या शिखराची रुंदी ३७ दिवसांची आहे.

२) हिरवी आलेख-रेषा परिसरातील माणसे सुरक्षित अंतर ठेवण्याची (दोन मीटरच्या आत, १५ मिनिटापेक्षा जास्त वेळ संपर्क) आणि सतत हात धुण्याची काळजी घेत असताना होणारा साथीचा फैलाव दाखविते. त्या शिखराची रुंदी ६९ दिवस आहे.

आणि ३) निळी आलेख-रेषा व्यक्तींमधील सुरक्षित अंतर ठेवण्याचे निर्बंध मध्येच सैलावल्यावर पुन्हा उद्भवणाऱ्या साथीचा फैलाव दाखविते. त्या शिखराची रुंदी आहे ६२ दिवस.

आता या फरकाचा अर्थ पाहूया. लाल रंगातील आलेख-रेषा असे दाखवते की, साथ १ ते ७ दरम्यानचे सहा महिने टिकेल. परंतु यापैकी अर्धउंचीवरील पूर्णरुंदीच्या ३७ दिवसांच्या काळात ९५ टक्के रुग्ण आहेत असेही सांगते. परिणामी, थोडक्या काळात जास्त रुग्ण आणि जास्त मृत्यू. हॉस्पिटल बेड्स, मास्क, व्हेंटीलेटर, औषधे इतकेच नाही तर, डॉक्टर, नर्सेस या सगळ्यांची कमतरता जाणवण्याचा हा काळ आहे. या तुलनेत याच परिसरातील माणसे परस्परांत सुरक्षित अंतर ठेवण्याची काळजी घेत असताना आणि सतत हात धुण्याची काळजी घेत असताना होणारा साथीचा फैलाव हिरवी आलेख-रेषा दाखवते. लाल आलेख रेषेच्या तुलनेत हिरव्या आलेख-रेषेच्या शिखराची उंची खूप कमी आहे आणि शिखर रुंदी जास्त पसरट आहे.

याचा अर्थ लाल रंगांतील आलेखातील उच्चतम रुग्णसंख्येच्या तुलनेत हिरव्या रंगातील आलेखाची उच्चतम रुग्णसंख्या खूप कमी आहे. शिवाय एकूण रुग्णांपैकी सुमारे ९५ टक्के रुग्ण ३७ नव्हे तर ६९ दिवसांत विभागले गेले आहेत. परिणामी, रुग्णांची काळजी घेणे आता सोपे होणार आहे. हॉस्पिटल बेड्स, मास्क, व्हेंटीलेटर, औषधे इतकेच नाही तर, डॉक्टर, नर्सेस या सगळ्यांची कमतरता जाणवण्याची शक्यतादेखील खूप कमी झाली आहे. याचा अर्थ माणसांतील ‘घनिष्ट संपर्क’ मोठ्या प्रमाणत कमी करणे आणि सतत हात धुणे दोन तत्त्वे काटेकोरपणे पाळली तर वरील सर्व फायदे पदरात पडतील.

आकृती एकमधील तिसरा आलेख निळ्या रंगात आहे. संपर्क आणि म्हणून संसर्ग कमी करण्यासाठी लोकांवर निर्बंध टाकलेले आहेत. परंतु मध्येच काही कारणांनी निर्बंध शिथिल झाले किंवा केले, तर आजाराची दुसरी साथ वाट्याला कशी येते, ते हा आलेख दाखवतो. समजा हे शिथिलीकरण साथीच्या तिसऱ्या टप्प्याच्या अखेरच्या पर्वात झाले, तर दोन मोठ्या साथींचा एका पाठोपाठ सामना करावा लागतो.

आकृती एकमधील या तीन आलेखांचा एकत्रित विचार करता असे दिसते की, हिरवी आलेख-रेषा पाळणे गरजेचे आहे. म्हणजेच संपूर्ण साथीच्या काळात परिसरातील माणसांनी परस्परांत सुरक्षित एक मीटर अंतर ठेवण्याची काळजी घ्यावी. जास्त गर्दीच्या जागा तयारच होऊ देऊ नयेत. तसेच वारंवार हात धुणे आवश्यक आहे. हिरव्या आलेख-रेषेच्या शिखराची उंची खूप कमी आहे म्हणजे या काळतील कोणत्याही दिवशी लाल आलेखापेक्षा रुग्णसंख्या कमी असल्याने काळजी घेणे सुकर होते. ते जनतेने आपणहून पाळणे गरजेचे आहे.

त्यासाठी लॉकडाऊनच आवश्यक आहे असे नाही. उलट, ‘लॉकडाऊन’ या शब्दात वरील काळजीचा उल्लेख नाही. म्हणून तर काळजी घेण्याची स्वतंत्र आवाहने करावी लागतात. लॉकडाऊनमुळे गर्दीचे प्रसंग घडत नाहीत हा एकमेव फायदा आहे, एवढेच. परंतु लॉकडाऊनची किंमत प्रचंड असते - रोजगार बुडतात, उपासमार होते, अर्थव्यवस्था ठप्प होते, आत्महत्या वाढतात, शिक्षण बंद पडते, नैराश्य येऊ शकते इत्यादी इत्यादी. ही किंमत टाळून गर्दीचेही प्रसंग टाळण्यासाठी अनेक कल्पक मार्ग असू शकतात. हडेलहप्पीने ते साधत नाही.

.............................................................................................................................................

लेखक प्रकाश बुरटे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचे अभ्यासक आहेत.

prakashburte123@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......