गेल्या काही वर्षांपासूनच एका जागतिक साथीच्या आजाराच्या सूचना मिळालेल्या होत्या
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
प्रकाश बुरटे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 16 April 2020
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona virus लॉकडाउन Lockdown

सुमारे दोनशे प्रकारांच्या जवळपास एकूण ३० लाख-कोटी पेशींनी (३०च्या पुढे १२ शून्ये ठेवल्यावर होणारी संख्या) बनलेले मानवी शरीर हा आपली मती गुंग करणारा निसर्गाचा चमत्कार आहे. प्रत्येक पेशीचे काम वेगळे, जीवनचक्र वेगळे, त्यांचे जन्म-मृत्यूचे वेगवेगळे तरीही यांचे एकत्रित सहकार्य आणि उत्तम मॅनेजमेंट आपला श्वासोच्छवास, रक्ताभिसरण, पंचेन्द्रियांकडून येणारे-जाणारे निरोप सांभाळणं अशा किती तरी गोष्टी वर्षांनुवर्षे अगदी सुरळीत पार पडत असतात! एवढेच नाही तर, शरीरावर बाहेरून होणारे आजारांचे ‘हल्ले’ परतवणंसुद्धा कायम चालूच असतं.

सध्या गाजत असलेला कोविड-१९ हा साथीचा आजार आहे. तो डोळ्यांना न दिसणाऱ्या जंतूमुळे (जर्म्समुळे) होतो. सूक्ष्मदर्शक यंत्र, जंतू यांची मुळीच माहिती नव्हती, अशा काळापासून अनेक आजारांच्या साथी जगभरात येऊन गेल्या आहेत. पटकी, देवी, प्लेग, कांजिण्या, गोवर, हगवण, सर्दी-खोकला, फ्लू... अशा कितीतरी आजारांच्या जोरदार साथी येत असत आणि त्यात माणसे दगावतही असत. या जंतूंचे माणसाला चार मुख्य प्रकार सापडले आहेत - १) जीवाणू (bacteria), २) विषाणू (viruses), ३) बुरशी (fungi) आणि प्रोटोझोआ (protozoa). यातील बुरशीच फक्त बहुपेशीय असते. शिवाय तिची कॉलनी तयार होते; त्यामुळे ती डोळ्यांना दिसते. बाकी तिन्ही एकपेशीय प्रकार साध्या डोळ्यांना दिसत नाहीत.

या पैकी विषाणू हा जो जंतूंचा दुसरा प्रकार आहे, त्याचे वर्णन “तुज सगुण म्हणू की निर्गुण रे’ या चालीवर ‘तुज सजीव म्हणू की निर्जीव रेS’ असा आहे. प्रथिनांच्या आवरणात थोडेबहुत जनुकीय द्रव्य म्हणजे DNA अथवा RNA असणारे हे निर्जीव विषाणूंचे रेणू आहेत. हे रेणू त्यांच्या सोयीच्या जीवाणू पेशीत प्रवेशतात, तेव्हा त्यांच्यांत थोडी जान येते. जीवाणू पेशींच्या आत या परोपजीवी विषाणूच्या बऱ्याच हुबेहूब प्रतिकृती बनतात. तेच त्यांचे पुनरुत्पादन. त्या विषाणू प्रतिकृती जीवाणू पेशी फोडून बाहेर येतात. खरं म्हणजे विषाणूच्या नजरेतून त्याने केलेला हा ‘हल्ला’ नसून, ती त्याच्या निर्जीव-सजीवत्वाच्या प्रवासाची आणि अस्तित्वाची कथा आहे.

करोना कुटुंबातील एका नव्या विषाणूमुळे २०१९ साली उद्भवलेल्या आजाराला ‘नव करोना-आजार’ (COVID-19) असे नाव रूढ झाले आहे. वास्तविक या विषाणूंचा मूळ अधिवास वटवाघळांच्या शरीरात. त्यांच्यात उत्परिवर्तन (म्युटेशन) होऊन त्यांचा अधिवास मुंगस प्रजातीच्या प्राण्यात आणि नंतर माणसात तयार झाला. माणसात पहिल्यांदा त्याची लागण वूहान या चीनमधील शहरात झाली. वूहानमधून जगाच्या अनेक भागात पसरलेल्या आजारापायी नाकाला फडके बांधून दूध, भाज्या, किराणा माल आणायला बाहेर जाणे आणि बाकी दिवसामागे दिवस घरकैदेत घालवणे अचानक उद्भवलेले नसल्याचे पुढील दोन संदर्भ उदाहरणादाखल सांगतात. वास्तविक गेल्या काही वर्षांपासून देशोदेशींच्या राजकर्त्यांना अशा उद्भवू शकणाऱ्या आजाराच्या सूचना मिळाल्या होत्या. ते दोन संदर्भ असे :

१) The (US) Military Knew Years Ago That a Coronavirus Was Coming by Ken Klippenste, The Nation, 01 April 2020 

https://www.thenation.com/article/politics/covid-military-shortage-pandemic/

२) Covid-19 : The history of pandemics By Bryan Walsh, 26 March 2020

https://www.bbc.com/future/article/20200325-covid-19-the-history-of-pandemics

यांपैकी पहिला संदर्भ सांगतो - ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरुवातीला जरी वारंवार म्हणाले असले की, हा अनाकलनीय करोना-आजार कुठून कसा उद्भवला कुणास ठाऊक, तरी पेटँगॉनने २०१७ मध्ये तयार केलेल्या आराखड्याप्रमाणे (तो आराखडा ‘The Nation’ या प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्राने मिळवला आहे) नव्या विषाणूमुळे श्वासाला खूप त्रास देणाऱ्या फ्लूची साथ येऊ घातली आहे. त्याविरुद्ध संरक्षण करण्यासाठी व्हेंटिलेटर्स, चेहरा झाकणारे मास्क्स, हॉस्पिटल बेड यांची अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर कमतरता भासण्याची शक्यता आहे.’

करोना व्हायरस जगभर पसरले असल्याचे कारण हा आराखडा त्यासाठी देतो. त्यांची उत्परिवर्तने (म्युटेशन्स) होऊन नव्या आजाराची साथ जगभर पसरण्याची शक्यता दाट आहे. त्यावरील ‘गब्बरसिंग’ भाषेतील ट्रम्पसाहेबांचे पुढील ट्विट उदधृत वाचून आपले बोलणेच खुंटते’ -

General Motors MUST immediately open their stupidly abandoned Lordstown plant in Ohio, or some other plant, and START MAKING VENTILATORS, NOW!!!!!! FORD, GET GOING ON VENTILATORS, FAST!!!!!! @GeneralMotors @Ford; 134K; 8:53 PM - Mar 27, 2020.”

वरील दुसऱ्या संदर्भाचे लेखक ब्रियोन वाल्श म्हणतात, ‘‘मी स्वतः २०१९ ऑक्टोबरमध्ये अशा नव्या व्हायरससंबंधित साथीच्या रोगाची लागण होऊन काय घडेल, यावरील कार्यक्रम पाहिला होता. ‘टाईम’ नियतकालिकासाठी २०१७मध्ये मी जी स्टोरी केली होती, तिचे मुखपृष्ठावरील शीर्षक होते “Warning : the world is not ready for another pandemic”. असे लिहिणारी मी कोणी विशेष व्यक्ती मुळीच नाही. अशा विषयावर गेल्या १५ वर्षांत जगभरात अनेक लेख लिहिले गेले आहेत, अनेक श्वेतपत्रिका (White Papers) काढल्या आहेत. ‘BBC फ्यूचर’ या कार्यक्रमांत २०१८ साली आम्ही सांगितले होते की, या विषयांतील तज्ज्ञांच्या मते ‘श्वसनाला त्रास देणारी जागतिक महासाथ आता केव्हाही शक्य आहे.’ इतकेच नव्हे, तर २०१९मध्ये ट्रम्प यांच्या मानव आरोग्यसेवा खात्याने ‘किरमिजी जंतू’ (Crimson Contagion) नावाने एक प्रकल्प केला होता. त्यात कल्पना अशी केली होती की, एका विषाणूंची (व्हायरस) साथ चीनमध्ये (अमेरिकेत का नाही?) सुरू होऊन जगभर पसरते. त्यात सुमारे ५,८५,००० अमेरिकी नागरिक मृत्युमुखी पडतील.”

एवढी माहिती जगजाहीर असताना जगातील कोणीही नेता ‘करोना-आजार अपेक्षा नसताना आकाशातून उद्भवला, असे म्हणू शकत नाही.’ योगायोगाने प्रत्यक्षात नवा करोना व्हायरस चीनमध्येच सुरू होऊन पसरू लागल्यावरदेखील ट्रम्पसाहेबांची अमेरिका गाफील राहिली.

या वर्षीच्या जानेवारी ३० रोजी भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने तीन वाक्यांची एक प्रेस नोट प्रसिद्ध केली होती - “करोना विषाणूची लागण झालेला एक रुग्ण केरळमध्ये आढळला असून चीनमधल्या बुहान विद्यापीठात तो शिकत होता. त्याची तपासणी केली असता त्याला करोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचे आढळून आले असून रुग्णालयात स्वतंत्र कक्षात त्याला ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.” (संदर्भ : https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1601095)

परंतु त्याच्यासारखे इतर कुणी विद्यार्थी केरळमध्ये किंवा भारतात परत आले आहेत काय, याची माहिती काढून आणि संबंधितांच्या चाचण्या घेऊन मोजकी घरे लॉकडाऊन केली नाहीत. त्यानंतरही संपूर्ण फेब्रुवारी आणि मार्चचे पहिले तीन आठवडे परदेशांतून भारतात येणाऱ्या व्यक्तीची नोंद ठेवणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे, त्यांच्या या आजारासाठी चाचण्या करणे, त्यांना होणाऱ्या आजारांचा नंतरही मागोवा घेणे, ही कामे भारताने फार मोठ्या गांभीर्याने केली नाहीत. चाचण्या करण्यासाठी इतक्या कडक सूचना होत्या की फक्त वूहान, नंतर चीन, त्यानंतर इटली येथून येणारे आणि करोना आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींच्याच चाचण्या केल्या.

एक अंदाज असा आहे की, या काळात परदेशांतून सुमारे १५ लाख व्यक्ती भारतात आल्या असाव्यात. वास्तविक प्रत्येक देशांतील कितीतरी प्रवासी अनेक देशांत ये-जा करत असतात. त्यामुळे ज्यांच्या चाचण्या झाल्याच नाहीत त्यामध्ये करोनाची लक्षणे असणाऱ्या आणि नसणाऱ्या किती व्यक्ती असतील याची आपल्याला असलीच तर फार कमी माहिती आहे. उदाहरणार्थ, पुण्यात जी लागण झाली ती दुबईमधून आलेल्या व्यक्तीमुळे झाली आणि तेथून प्रसाराला सुरुवात झाली, असे मानले जाते.

आवश्यक ती कामे वेळेवर न करता फक्त चार तास आगाऊ सूचना देत सरकारने २४ मार्चच्या मध्य रात्रीपासून देशभरची टाळेबंदी जाहीर केली. भारतीय नागरिकांना आणि राज्यांच्या नोकरशाहीला कसलीही पूर्वतयारी करायला वेळ दिलाच नाही. अशा टाळेबंदीचे परिणाम नंतर दिसू लागले. अनेक शिक्षण संस्था, व्यवसाय अचानक बंद करावे लागले. वाहतूक व्यवस्था केवळ अत्यावश्यक सेवासाठीच चालू ठेवली होती. महानगरांतील मजुरी गमावल्याने उपाशीपोटी घरी बसलेले लोक आपल्या मूळगावी काही तरी सोय होईल, या आशेवर लहान मुलांना घेऊन अनेक जण पायी चालू लागले. या स्थलांतर करणाऱ्या कष्टकरी भारतीयांचे वाटेत फार हाल झाले. काही मृत्युमुखी पडले. काहींनी आत्महत्या केल्या. हातवार पोट असणाऱ्यांच्या जगण्याची शासनाने काहीही व्यवस्था केल्याचे आढळे नाही.

शिक्षण संस्था बंद असल्याने कदाचित सगळ्यांना पास केले जाईल. परंतु शिकणे झाले नाही, याची भरपाई कशी होणार? प्रत्यक्ष मानवी संपर्क कमी झाल्याने मानसिक ताण वाढणे क्रमप्राप्त आहे. हे टाळता आले असते. या आजाराच्या देशातील चाचण्यांची अत्यंत कमी संख्यादेखील फारशी पूर्वतयारी नसल्याचेच दाखवितात. या पावणेदोन महिन्यांत दर दशलक्ष लोकसंख्येमागे प्रथम दर दिवशी १८ चाचण्या होत होत्या. तो दर वाढला आणि ४ एप्रिल रोजी या चाचण्यांची संख्या १२१ वर पोहोचली. ४ एप्रिलचा वर्ल्डोमीटर साईटचा तपशील इतर काही देशांच्या प्रतीदशलक्ष लोकसंख्येमागे चाचण्यांची संख्या पुढील प्रमाणे नोंदवतो: ऑस्ट्रेलिया १२,९४६, नॉर्वे २१,००९, इस्रायेल १३,५५७, अमेरिका ६,७२५, स्पेन ७,५९३, ... आणि चीनचा हा रकाना चांगदेवांच्या कोऱ्या पत्राप्रमाणे मोकळाच दिसतो. चाचण्याच फारशा केल्या नाहीत तर या आजाराची रुग्णसंख्या कळणे अवघड आहे.

करोना आजाराच्या किती रुग्णांपैकी किती रुग्ण दगावले याची विश्वासार्ह माहिती संकलित होणे तर अशक्यच आहे. त्यामुळे साहजिकच हा आजार किती भयानक आहे याची साधार माहिती नसून फक्त मानसिक छबी आहे. खानोलकरांच्या ‘अजगर’ कादंबरीतील पावसकर नावाचे पात्र नेहमी कुणी तरी जखमी होणे, कुणी अचानक निवर्तणे या बातम्या “आहो, ऐकलात का” अशी सुरुवात करत त्यांच्या चाळीतीलच कुणी भुताटकीनं मारल्याच्या आविर्भावात सांगत राहते. लॉकडाऊनमुळे देशच जणू ‘पावसकर’ झाला आहे असे वाटते. चीनमध्येही हीच उणीव दिसत होती. भारताने चीन आणि इटलीपेक्षा ‘जास्त कडक’ लॉकडाऊन जाहीर करून गरिबांना बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे. त्यांच्या लहान मुलांच्या बालपणात भूक कोरली आहे. एरवी सुखवस्तू असणाऱ्यांना कामापासून वंचित केले आहे. अशा स्थितीत मानसिक आजार वाढले तर आश्चर्य नाही. देशाची अर्थव्यवस्था बंद करू शकणाऱ्या भारताला जास्त चाचण्या करणे परवडत नाही याचे मात्र सखेद आश्चर्य वाटते. देशांत अनेक विदेशी बनावटीच्या वस्तू उपलब्ध असताना चाचण्यांची किट्स आणि प्रोब आयात करावे लागतात, ही कारणे पटणारी नाहीत.

भारताच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने डिसेंबर २००५मध्ये ‘Contingency Plan For Management Of Human Cases Of Avian (पक्षीजन्य) Influenza (http://www.fao.org/docs/eims/upload/221470/national_plan_ai_ind_en.pdf) अशा शीर्षकाचा प्लॅन तयार केला होता. त्याची अंमलबजावणी झाली असती, तर त्याचा उपयोग करोना-आजार काळात नक्की झाला असता. आधीच्या सरकारने काहीच केले नाही, असे म्हणणाऱ्या सरकारने वास्तविक त्यापेक्षा जास्त परिणामकारक प्लॅन आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित होते.

साथीचे आजार उद्भवले तर साथी वेगाने पसरतील, असे सांगणारा वरील पुराव्यांपेक्षा अगदी वेगळा म्हणजे आपल्या डोळ्यांच्या सवयीचा एक साधा पुरावा आहे. तो आहे भारतातील दारिद्र्याचा. ट्रम्प भारतभेटीवर आले असताना दिल्लीतील या वस्त्या त्यांच्या नजरेपासून अगदी अलीकडेच लपविल्या होत्या. मुंबईतील धारावीसारख्या गजबजलेल्या देशभरच्या वस्त्या, त्यामधली गटारे आणि अरुंद गल्ल्या, शिक्षणाचा अभाव, पाण्यासाठी लांबलचक रांगा, कचऱ्याचे ढीग, ... या वस्त्या म्हणजे साथींना बहरण्याचे आमंत्रण आहे. आपल्या देशातील नागरिकांना मानवी प्रतिष्ठेचे जीवन मिळेल अशी धोरणे आखून ती अंमलात आणणे हे शासनाचे कर्तव्य आहे. ते हाती घेतलेच पाहिजे.

‘वेळीच घातलेला एक टाका नऊ टाके वाचवतो’, अशा अर्थाची इंग्रजीतील एक म्हण आहे. आता नऊ टाके घालणं वाचवण्यासाठी एक टाका घालायची वेळ केव्हाच निघून गेली आहे, हेच खरं. अजूनही मोठ्या प्रमाणावर विभागीय (Cluster) चाचण्या करून देशांतील कोणते विभाग जास्त बाधित असावेत याचे अंदाज घ्यावेत. आणि योग्य विभागातील सर्वांच्या चाचण्या घ्याव्यात. म्हणजे नवकरोना आजाराने बाधितांची जास्त वास्तव संख्या कळेल. त्यामुळे जास्त विश्वासार्ह मृत्युदर समजेल. त्या आधारे हा आजार नेहमीच्या फ्लूपेक्षा किती जास्त भयानक आहे याचेही अंदाज येतील. ही साथ प्रत्येक भारतीयाच्या हाती सोशल मीडिया आल्यानंतरची आहे. या आजाराची प्रत्यक्ष भयानकता आणि भीतीचा बागुलबुवा यांच्या जागा स्पष्ट होतील.

.............................................................................................................................................

लेखक प्रकाश बुरटे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींचे अभ्यासक आहेत.

prakashburte123@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......