अजूनकाही
त्यातल्या त्यात एक बरी बातमी अशी आली की, इटली जर्मनी-ऑस्ट्रियाशी त्रिसदस्यीय कराराने बांधला गेलेला देश होता, त्याने आपण या तंट्यात सध्यातरी भाग घेत नसल्याचे आणि तटस्थ राहणार असल्याचे कळवले. त्यांनी या मागचे कारण दिले ते मोठे हुशारीने दिलेले, समयसूचक (आणि बरोबरही) होते. त्यांच्यातला त्रिसदस्यीय करार हा मुख्यत: संरक्षणात्मक होता, म्हणजेच जर जर्मनी किंवा ऑस्ट्रियावर कुणी हल्ला केला असता तर इटली त्यांच्या बाजूने युद्धात उतरायला बांधील होता, पण इथे तर जर्मनी-ऑस्ट्रियानेच दुसऱ्या देशांवर आक्रमण केलेले होते. त्यामुळे इटली त्यांच्या बरोबरीने युद्धात उतरायला बांधील नव्हता. इटली सामर्थ्यवान देश नसला तरी त्याचा भूभाग आणि किनारपट्टी युद्धात जर्मनीला फार उपयोगी पडली असती. रशियावर आक्रमण करायची घाई करून जर्मनीने एका अर्थी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला होता. याचे परिणाम त्यांना पुढे युद्धात जेव्हा इंग्लंडने उत्तरेकडून त्यांची सागरी नाकेबंदी केली, तेव्हा भोगावे लागले. असो.
आतापुरते बोलायचे तर आपल्या दक्षिण सीमेबाबत फ्रान्स आता काहीसा निश्चिंत झाला.
इंग्लंडमध्ये मात्र मंत्रिमंडळाचे अजूनही एकमत होत नव्हते. अशात जर्मनीने दुसरी मोठ्ठी चूक केली. रविवारी २ ऑगस्टला संध्याकाळी ७ वाजता जर्मनीने बेल्जियमला निर्वाणीचे पत्र पाठवले. त्यात त्यांनी म्हटले की, फ्रेंच फौजा जर्मनीवर हल्ला करायच्या उद्देशाने बेल्जियमच्या हद्दीत घुसल्या आहेत. (हे साफ खोटे होते.) हा बेल्जियमच्या तटस्थतेचा आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचाही भंग आहे, तरी जर्मन सैन्याला त्यांचा मुकाबला करण्यासाठी बेल्जियन सरहद्द ओलांडून जाऊ द्यावे, बदल्यात जर्मनी बेल्जियमला काही त्रास देणार नाही, पण बेल्जियमने ऐकले नाही, तर मात्र जर्मनीला नाईलाजाने बेल्जियमवर आक्रमण करावे लागेल. उत्तर द्यायला त्यांनी बेल्जियमला फक्त १२ तास दिले. यामुळे इंग्लंडच्या मंत्रिमंडळात आतापर्यंत होत नसलेले एकमत एकदम झाले. जर्मनी चक्क खोटे बोलून बेल्जियमसारख्या लहान आणि या तंट्याशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या देशाच्या स्वातंत्र्याचा गळा घोटतो आहे. अजून फ्रान्सने जर्मनीवर युद्धच घोषित केलेले नाही, सैन्य हालचाली दूरच राहिल्या. म्हणजे जर्मनी हाच युद्धखोर आहे, त्याला धडा शिकवलाच पाहिजे असे मत सर एडवर्ड ग्रे आणि पंतप्रधान अस्क्वीथ यांनी संसदेत मांडले. लोईद जॉर्जने आपला विरोध मागे घेतला. आयर्लंडनेदेखील आपल्या मागण्या युद्ध काळापुरत्या स्थगित केल्याची घोषणा केली. एकमुखाने इंग्लंड जर्मनीविरुद्ध युद्धाला सज्ज झाले.
१२ तास संपल्यावरदेखील बेल्जियमने कोणतेही उत्तर जर्मनीला दिले नाही, पण आपल्या छोट्याश्या सैन्याला युद्धाला तोंड द्यायला सिद्ध राहायची तयारी करायला सांगितले. त्या दिवशी म्हणजे ३ ऑगस्टला संध्याकाळी जर्मन हद्दीवर फ्रेंच सैन्याच्या हालचाली आणि विमाने घिरट्या घालताना दिसत आहेत असे सांगून जर्मनीने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले. हे कारणही खोटेच होते. त्या दिवशीच इंग्लंडला ही बातमी समजली. इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयात सर्वत्र सामसूम होती. अंधार पडत असताना आपल्या कचेरीच्या खिडकीतून बाहेर लंडनच्या रस्त्यावर दिवे उजळताना पाहून सर एडवर्ड ग्रे म्हणाले, “Lamps are going out all over Europe : We shall not see them lit again in our life time.” (सर्व युरोपात दिवे मालवू लागले आहेत आणि मला नाही वाटत की, आपल्या हयातीत ते पुन्हा उजळलेले पाहायला मिळणार आहेत.) संध्याकाळच्या त्या कातरवेळी नियतीच त्यांच्या तोंडून बोलत होती का?
मंगळवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता जर्मन फौजांनी बेल्जियमची सरहद्द ओलांडली. बेल्जियमने इंग्लंड आणि फ्रान्सकडे १८३९च्या कराराची आठवण करून देत मदत मागितली. इंग्लंडने जर्मनीला विनाशर्त बेल्जियममधून फौजा मागे घेण्यास सांगितले. त्याकरता त्याच दिवशी रात्री १२ वाजेपर्यंत त्यांना वेळ दिला. जर्मनीने काहीही उत्तर दिले नाही. रात्री ११ वाजता लंडनमध्ये बिग बेनने ११ टोल दिले, तेव्हा बर्लिनमध्ये रात्रीचे १२ वाजत होते. जर्मनीकडून काहीही उत्तर आले नाही, हे पाहून इंग्लंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
अशा प्रकारे ४ ऑगस्टला रात्री १२ वाजता इंग्लंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारल्यावर हा जुलैचा पेच संपला, जग अनाहूतपणे एका महाभयंकर युद्धात ओढले गेले. त्यावेळी काही मोजके द्रष्टे सोडले तर पुढे काय वाढून ठेवले आहे, याची कल्पनादेखील कुणाला आलेली नसणार. पहिले महायुद्ध सुरू झाले होते.
५ ऑगस्ट रोजी मॉन्टेनेग्रो या सर्बियाच्या शेजारील चिमुकल्या बाल्कन देशाने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले. दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ ऑगस्टला सर्बियाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. त्याच दिवशी ऑस्ट्रियाने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले. ९ ऑगस्टला मॉन्टेनेग्रोने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. ११ ऑगस्टला फ्रान्सने तर १२ ऑगस्टला इंग्लंडने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले. २२ ऑगस्ट रोजी ऑस्ट्रियाने बेल्जियमविरुद्ध युद्ध पुकारले.
खरे तर ऑस्ट्रिया आणि बेल्जियमचा काही तंटाच नव्हता आणि युद्ध पुकारल्यावरही पुढची साडेचार वर्षे ऑस्ट्रियाचा एकही सैनिक बेल्जियमविरुद्ध लढला नाही की, एक गोळीही बेल्जियमने ऑस्ट्रियाविरुद्ध झाडली नाही. ऑस्ट्रियाने युद्ध पुकारणे ही फक्त एक औपचारिकता होती आणि युतीचा धर्म.
२३ ऑगस्टला मात्र एक उल्लेखनीय भिडू या युद्धात उतरला तो म्हणजे जपान. त्याने या युद्धात फ्रान्स, इंग्लंड, रशिया म्हणजे Triple Entanteच्या बाजूनेउडी घेतली. जपानचा आणि इंग्लंडचा संरक्षणात्मक करार जरी असला तरी त्या कराराप्रमाणे जर्मनीविरुद्ध युद्धात उतरावे असे जपानवर बंधन नव्हते, तशी अपेक्षाही इंग्लंडने केली नव्हती. पण या निमित्ताने चीन आणि आग्नेय आशियातल्या जर्मन वसाहतीवर आपण डल्ला मारू शकू, या लालसेने जपानने युद्धात उडी घेतली. त्यांनी चीनमधील चिंग ताओ, शान्ग्तून हे जर्मन अखत्यारीतले प्रदेश हस्तगत केले. शिवाय प्रशांत महासागरातली काही बेटे (मारियाना, कॅरोलिना आणि मार्शल आयलंड्स) हस्तगत केली. यापलीकडे प्रत्यक्ष युरोपातल्या युद्धावर जपानने युद्धात भाग घेतल्याने फार काही फरक पडला नाही. फार तर असे म्हणू की, प्रथमच युरोपातल्या भांडणात युरोपबाहेरची शक्ती सामील झाली.
१ नोव्हेंबर १९१४रोजी रशियाने ओट्टोमान साम्राज्याशी युद्ध पुकारले. कारण झाले होते २८ ऑक्टोबर १९१४ रोजी काळ्या समुद्रातली रशियन बंदर थिओडोसिया आणि सेवास्टोपोलवर तुर्की आरमाराने केलेला हल्ला.
तुर्कस्थान या युद्धात सामील कसे झाले याची हकीकत मोठी रंजक आहे. रशिया आणि तुर्कस्तानमध्ये काळासमुद्र, भूमध्य समुद्र इथल्या सामुद्री संचारावरून संघर्ष होता हे मागे आलेलेच आहे. पण इतर युरोपीय राष्ट्रांच्या पुढे तुर्कस्तानचे आरमार तुटपुंजे आणि मागास होते. आपले आरमार स्वत: अद्ययावत करायची तुर्कस्तानची पात्रताही नव्हती, पण रशियाशी मुकाबला करायला- तसेच ग्रीक, इटली, बल्गेरिया अशा युरोपीय /बाल्कन देशावर वचक राहावा म्हणून त्यांनी इंग्लंडला अत्याधुनिक (तत्कालीन) अशा ड्रेडनॉट प्रकारच्या दोन युद्धनौका बनवून द्यायची ऑर्डर दिली होती. (त्यांची नावे ही ठरवली होती- ‘सुलतान ओमार’ आणि ‘रशीद’. या युद्धनौका जवळपास तयार होत्या.) तुर्की खलाशांचे पथक त्या वापरायचे प्रशिक्षण आणि त्यांचा ताबा घ्यायला इंग्लंडमध्ये आलेही होते, पण इंग्लंडच्या नाविक दल मंत्री असलेल्या विन्स्टन चर्चिलनी ३१ जुलै रोजी अचानक या युद्धनौका तुर्कस्तानला सुपूर्द न करता ब्रिटिश आरमारात सामील केल्या, तुर्कस्तानच्या निषेधाला/विरोधाला न जुमानता. वर आणि जर तुर्कस्तान तटस्थ राहणार असेल किंवा त्यांच्या बाजूने युद्धात उतरणार असेल तर युद्ध सुरू असेपर्यंत दर दिवशी एक हजार पौंड एवढी क्षुल्लक रक्कम भरपाईदाखल द्यायची तयारी दर्शवली.
या दोन युद्धनौकांकरता तुर्कस्तानने ६० लाख पौंड एवढी प्रचंड रक्कम मोजली होती. आणि हा सगळा किंवा यातला काही पैसा जनतेकडून वर्गणी तसेच रोख्याच्या स्वरूपात उभा केला होता. खरे सांगायचे तर ही इंग्लंडने केलेली तुर्कस्तानाची शुद्ध फसवणूक होती, पण तेव्हा तरी तुर्कस्तान चरफडत स्वस्थ बसण्याव्यतिरिक्त काहीही करू शकला नाही.
पुढे ४ ऑगस्ट रोजी युद्ध घोषित झाले, तेव्हा जर्मनीच्या गोबेन आणि ब्रेस्लाव्ह या दोन युद्धनौका भूमध्य समुद्रात तैनात होत्या. युद्ध सुरू झाल्या झाल्या लगेच टूलोन आणि माल्टा येथील आपापल्या नाविक तळावरून फ्रेंच आणि ब्रिटिश आरमार त्यांच्या मागे लागले. कसेबसे त्यांना चुकवत या युद्धनौका इस्तंबूलच्या बंदरात पोहोचल्या आणि त्यांनी तुर्कस्तानकडे आश्रय मागितला. तुर्कस्तानने तो दिला आणि तटस्थ असल्याने ब्रिटिश आणि फ्रेंच आरमार हात चोळत बसले. आंतरराष्ट्रीय कायद्याने एखादा देश तटस्थ असल्याने २४ तास त्यांच्या बंदरात कुठलीही युद्धनौका आश्रय घेऊ शकते. पण २४ तास उलटल्यावर मात्र त्यांना ते बंदर सोडून बाहेर पडावे लागतेच. त्यामुळे २४ तासानंतर काय करायचे हा प्रश्न होताच. मग जर्मन सरकारने तुर्कस्तान पुढे प्रस्ताव ठेवला. त्यांना नुकतीच इंग्लंडने केलेली तुर्कस्तानची फसवणूक माहिती होती. त्यांनी तुर्कस्तानने त्याच्या बाजूने युद्धात उतरण्याच्या बदल्यात या दोन अत्याधुनिक आणि सामर्थ्यवान नव्या कोऱ्या जर्मन युद्धनौका फुकट द्यायची तयारी दाखवली. तुर्कस्तान लगेच तयार झाला. त्याप्रमाणे मग तुर्की झेंडे आणि गणवेश चढवून जर्मन नौसैनिकांनीच थिओडोसियावर गोळाबार केला.
याबरोबरच युद्ध मध्यपूर्वेतही पसरले आणि कॉकेशस पर्वत, अरेबिया, इजिप्त, आणि आजचे सिरिया, इराक हे प्रदेश पहिल्या महायुद्धाचे रणक्षेत्र बनले. पुढे जे घडले ते पाहता या दोन नौकांचा सौदा तुर्कस्तानला चांगलाच महागात पडला आणि त्यांचे साम्राज्य विखंडीत झाले. पुढे त्यातून सौदी अरेबिया, लेबनन, सिरिया, जोर्डन, इराक, आणि शेवटी इस्त्राईल (१९४८) असे नवे देश निर्माण झाले.
मे १९१५ मध्ये बराच वेळ कुंपणावर बसलेल्या इटलीने शेवटी जर्मनी आणि ऑस्ट्रियाविरुद्ध युद्धात उडी घेतली. पण इटली लष्करीदृष्ट्या इतका कमकुवत होता की, इंग्लंड-फ्रान्सने मदत केली नसती तर १९१७ साली तो संपूर्ण जर्मनीने पादाक्रांतच केला असता. इटली एका प्रकारे त्रिसदस्यीय देशांच्या पायातले लोढणेच बनला म्हणा ना. या युद्धामुळे इटलीत क्रांती होऊन लोकसत्ता नाहीशी झाली आणि तिथे बेनितो मुसोलिनीची हुकूमशाही अवतरली. अर्थात हे नंतर म्हणजे १९२२ साली झाले.
दोन अजून बाल्कन देश नंतर युद्धात सामील झाले. रुमानियाचा डोळा आधीपासून हंगेरीच्या ताब्यातल्या ट्रान्ससिल्वेनिया या प्रांतावर होता. त्याचा लचका तोडता यावा म्हणून त्यांनी ऑगस्ट १९१५मध्ये ऑस्ट्रियाविरुद्ध युद्धात उडी घेतली, तर मागे बाल्कन युद्धावेळी नाराज झालेल्या बल्गेरियाने ऑक्टोबर १९१५ साली जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतली. रुमानिया लगेचच जर्मनीने पादाक्रांत केला आणि बल्गेरियाने ऑस्ट्रियन आक्रमणाखाली पिचलेल्या सर्बियाच्या भूभागाचे लचके तोडले, अर्थात युद्ध संपल्यावर हे चित्र पालटले.
एप्रिल १९१७ साली सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा भिडू इंग्लंडच्या बाजूने युद्धात उतरला. तो म्हणजे अमेरिका.
पहिल्या महायुद्धाची सुरुवात कशी व का झाली, युरोपातली परिस्थिती कशी होती, कशी बिघडत गेली, हा भाग त्रोटक आणि जुजबी प्रमाणात सांगितला जातो. विशेषत: आपल्याला (भारतीयांना) युरोपातल्या तत्कालीन परिस्थितीबद्दल फारच कमी माहिती असते. त्यामुळे मुद्दाम हा भाग विस्ताराने, थोडा पाल्हाळ लावून इथवर सांगितला आहे. तरीही शक्यतो ज्या घटना महायुद्धाशी प्रत्यक्षरीत्या संबंधित आहेत त्यांचाच परामर्श घेतला. साम्यवाद, समाजवाद, कामगार चळवळी, औद्योगिक क्रांती, त्यातून उदयाला आलेली भांडवलशाही आणि तिचे आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध, वसाहतवाद यांचाही या पहिल्या महायुद्धाशी अप्रत्यक्ष संबंध आहेच.
या इतिहासाचा परामर्श घेताना अनेक व्यक्तिमत्त्वांशी आपली ओळख झाली. यातले काही पुढे प्रत्यक्ष युद्धाच्या इतिहासातही वेळोवेळी भेटत राहतील, पण काहींचा पुढे उल्लेख येत नाही. हे लोक पहिल्या महायुद्धाचा भडका उडायला कारणीभूत झाले. या राजकीय नाट्याचे ते रंगमंचावरचे सक्रिय कलाकार होते. म्हणून पुढे त्यांचे काय झाले, हे पुढच्या भागात थोडक्यात जाणून घेऊ.
.............................................................................................................................................
या सदरातील आधीच्या लेखांसाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/156
.............................................................................................................................................
लेखक आदित्य कोरडे टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
aditya.korde@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment