कुठलाही आविर्भाव न आणता उद्धव ठाकरे बोलतात, तेव्हा हे त्यांनी वठवलेलं ‘नाटक’ नाही, हे चटकन कळतं!
पडघम - राज्यकारण
भाग्यश्री भागवत
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • Tue , 14 April 2020
  • पडघम राज्यकारण उद्धव ठाकरे Uddhav Thackeray शिवसेना Shivsena करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona virus लॉकडाउन Lockdown

करोना व्हायरसमुळे लॉकडाउन झाल्यापासूनच्या गेल्या २१ दिवसांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दर दोन-पाच दिवसांनी जनतेशी प्रसारमाध्यमांद्वारे संवाद साधत आहेत. त्यांचं चारेक वेळा संवाद साधणं तरी नक्की ऐकलेलं आहे. सुरुवातीला मी त्यांचं बोलणं केवळ उत्सुकतेपोटी ऐकलं. म्हणजे यू-ट्युब स्क्रोल करत असताना त्यांनी नुकत्याच साधलेल्या संवादाचा व्हिडिओ समोर आला. तेव्हा मनात आलं की, आपण आजतागायत या माणसाचा आवाजदेखील ऐकलेला नाही. ऐकून बघू. राजकारणाबाबतची मला असलेली एकूण माहिती, एकूण ज्ञान आणि माझा आवाका यथातथाच आहे. त्यामुळेच कदाचित असेल, पण एकुणात उद्धव ठाकरे हे व्यक्तिमत्त्व मला प्रभावहीन, करारी नसलेलं आणि मोठ्या वृक्षाच्या छायेत वाढल्यानं झाकोळ पडलेलं वाटत आलं होतं.

त्याचबरोबर ही भावनादेखील मनामध्ये तीव्र होती की, स्वतःच्या बळावर येण्यापेक्षा केवळ राजकारणाची गणितं करून, कुठलाही पूर्वानुभव नसताना हा माणूस मुख्यमंत्री झालेला आहे. त्यामुळे प्रभावक्षेत्र निर्माण न करता केवळ बेरजेच्या जोरावर मुख्यमंत्री झालेल्या माणसाचं कॅलिबर विशेष नसणार, असा दुजाभावही मनात कुठेतरी होता.

याशिवाय राज ठाकरे म्हणजे डावलला गेलेला कर्ण, धडाडी असलेला, बाळासाहेबांचा खरा वारसदार (अग्रेशन असल्याने), बोलण्यात हुशार (शब्दांच्या चलाखीलाच ‘हुशार’ म्हटलं जात असल्याने बहुधा) वगैरे गोष्टी डोक्यात होत्या. कदाचित ही माध्यमांनी तयार केलेली प्रतिमाच मीही बाळगून असेन.

तसंच मोदींच्या योजनांचा उडालेला फज्जा त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी सप्रमाण सादर केल्याने माझ्या मनातल्या त्यांच्या प्रतिमेला जरा बळकटी मिळाल्याचंही नाकारता येत नाही. त्यामुळे एकुणात भावना अशी होती की, क्षमता असलेला माणूस उपरा आहे आणि क्षमता नसलेल्याला निव्वळ वारशाने आणि राजकारणी गणितांनी पद मिळालं आहे.

वास्तविक, ‘कसं मिळवलं?’ यापेक्षा मिळवल्यानंतर वा मिळाल्यानंतर ‘काय केलं? कसं केलं?’ हे नागरिक म्हणून डोळे नीट उघडे ठेवले, तरी सहज कळत असावं, पण अतिरेकी भावनिकता, माहितीचा महापूर आणि सतत स्वतःला सिक्युअर करण्याचा वसा यातून आपण ‘नागरिक’ म्हणून अपात्र ठरत जातो. मीही ठरले\ठरते.

उद्धव ठाकरे यांनी साधलेला संवाद मी पहिल्यांदा ऐकला, तेव्हा सुरुवातीला मला त्यांचं बोलणं थोडं आवडलं. त्यांचं बोलणं ऐकून मी थोडी बुचकळ्यात पडले आणि ‘सुरुवातीची पंधरा मिनिटं फोलपटं आणि शेवटची पाच मिनिटं आपल्या कामाचं’ असा कोणाही अधिकारी व्यक्तीच्या बोलण्याचा हिशोब असल्यानं आणि तो या वेळी चुकल्याने थोडी गोंधळले. पण तरीही एक गोष्ट झाली. चारेक दिवसांनी त्यांनी त्यापूर्वी साधलेला संवाद मी यु-ट्यूबवरून शोधून काढून ऐकला आणि त्यानंतरच्या दोन वेळी ते बोलणार असलेल्या दिवसांचा हिशोब करून त्यांचं बोलणं लाइव्ह ऐकलं; मला ऐकावंसं वाटलं.

‘या माणसाच्या बोलण्यात असं काय असतं?’ हा विचार मनात दुसरीकडे समांतर चालू होताच. मला कदाचित माझ्यापुरता जाणवलेला आणि आवडलेला गुण म्हणजे, त्या बोलण्यात फर्डा वक्तेपणा नसणं आणि बोलण्याचा बाज ‘अजिबात’ मोटिव्हेशनल स्पीचसारखा नसणं. अधिक माहिती असलेल्या एखाद्या माणसाने (कुठलंही तत्त्वज्ञान न झोडता) तुलनेनं कमी माहिती असलेल्या माणसांना आपल्याकडची माहिती देणं, इतकं मला त्यांचं बोलणं साधं आणि थेट वाटलं. कुठलाही आविर्भाव न आणता त्यांचं बोलणं, हे त्यांनी वठवलेलं ‘नाटक’ नाही, हे त्यांच्या देहबोलीतून चटकन कळतं.

त्यांचं बोलणं फार आखीव-रेखीव नसतं. दोन-तीनच मुद्दे असतात, पण ३५ टक्केवाल्यांपासून ९० टक्केवाल्यांपर्यंत सर्वांना कळेल, ‘पोहोचेल’, इतकं सोपं आणि सहज ते बोलू शकतात. त्यांची भाषा अगदी घरगुती आणि सर्वसामान्य माणसांची भाषा आहे. तिला उदात्ततेची किनारही नाही; पण कदाचित म्हणूनच त्यांच्या संवादाची ‘कन्व्हिन्सिंग पावर’ खूप जास्त आहे, असं मला वाटतं.

करोना व्हायरसचा धोका काही प्रमाणात अधिक असलेल्या शहरात राहताना, राज्यात राहताना जर मुख्यमंत्री धीरोदात्ततेचेच डोस पाजायला लागला, तर सर्वसामान्य माणूस तोंड देण्याच्या विचारापेक्षा भयग्रस्त आणि बचावात्मक अधिक होतो. पण उद्धव ठाकरे अजिबात धीरोदात्ततेचा ‘क्लास’ घेत नाहीत. खबरदारी घेण्यावर ते उत्तम भर देतात, प्रसंगी आकडेही सांगतात, पण तुम्ही कुठे कुठे चुकताय, आम्ही किती बरोबर आहोत, तत्पर आहोत वगैरे वगैरे ‘ब्लेम गेम’मध्ये न पडता, भीती किंवा अपराधी भावना जागी करून स्वतःचा कोहळा न काढता किंवा फुकटच्या चर्चेला मुद्दा न पुरवता जनतेला विश्वासात घेण्याचा आणि तिच्यावर विश्वास दाखवण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात ते कुठलाही आव आणत नाहीत किंवा ओझं वाहत असल्याचं फिलिंगही देत नाहीत.

सांगण्यातल्या साधेपणाने, ‘थैमान, भयानक, भयावह’ अशी कोणतीही खास मीडियाजनक विशेषणं न वापरता, अतिशय संयत ‘भाषा’ वापरून ते संकटाची जाणीव करून देतात, पण फोकस मात्र या संकटावर न ठेवता त्यातून बाहेर पडण्याच्या मार्गांवरच ठेवतात. मी ऐकलेल्या त्यांच्या बोलण्यात आजपर्यंत एकदाही त्यांचा हा फोकस सुटलेला मला जाणवला नाही. त्यामुळे नागरिक म्हणून ‘पॅनिसिझम’ तर टळतोच, पण आपोआपच प्रोत्साहित व्हायला होतं.

त्यांच्या बोलण्यात अतिरंजितता, स्वतःचं ‘करणं’ जतवण्याचा भाव नसल्याने नागरिक म्हणून त्यांच्यावर सहज विश्वास बसतो. ‘आम्ही सरकार म्हणून अमुक अमुक करतोय; तुम्ही जनता म्हणून तमुक तमुक करू शकता; करा’ इतक्या साध्या पद्धतीनं ते सगळी परिस्थिती समजावून सांगतात.

सरकार आणि जनता या एका नाण्याच्या दोन बाजू असल्याचा भाव त्यांच्या बोलण्यातून आणि देहबोलीतून थेट आणि पारदर्शकपणे आपल्यापर्यंत पोहोचतो. यातून नागरिक म्हणून संकटात सहभागीदार होण्याची इच्छा जागृत होते. कारण जनतेला अशा पद्धतीनं ‘सहभागीदार’ समजण्याचा कदाचित मर्यादित अनुभव आपल्याला असावा. याचा अर्थ ते काहीच सूचना करत नाहीत, असा नाही. ते सूचना करतात, पण त्यांच्या सूचना समंजस पालकासारख्या वाटतात, ‘कमांडिंग’ आणि ‘डिमांडिंग’ पालकासारख्या वाटत नाहीत.

आपण आजारी असताना किंवा अत्यंत घाबरलेलो असताना कुठली गोष्ट आपल्याला आश्वस्त करते? ‘ही परिस्थितीही निघून जाईल’ असं एखाद्या वडील किंवा जबाबदार व्यक्तीचं ‘दृढ वर्तन’! प्रत्यक्ष वर्तन दिसल्याशिवाय त्या व्यक्तीच्या निव्वळ किंवा उसन्या शब्दांवर आपला विश्वास बसत नाही. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत हे जाणवतं. तापाचे दवाखाने उघडणं, जमातवादी राजकारणावर अजिबात भर न देणं, चाचण्यांची संख्या वाढवणं, कृतज्ञता व्यक्त करणं किंवा प्रसंगी माफीही मागणं या सगळ्याचं साधारण क्रॉस चेकिंग करताना त्यात स्टंटबाजी नसल्याचं जाणवतं. त्यामुळे ‘ही परिस्थितीही निघून जाईल’ ही भावना मूळ धरते.

.............................................................................................................................................

लेखिका भाग्यश्री भागवत ग्रंथसंपादक आहेत.

bhagyashree84@gmail.com 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Dattahari Honrao

Thu , 16 April 2020

हा लेख मला अत्यंत आवडला हे मुल्यमापन चुकीचे नाही. मुंबईची लोकसंख्या प्रचंड असल्याने सोशलडिस्टंट अवघड आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने प्रशासन आणि जनतेला विश्वासात घेऊन काम करीत आहेत ते उल्लेखनीयच आहे.दुसरे या संकटकाळात उद्धव ठाकरेंनी दाखवलेल्या नेतृत्व कुशलतेचा सर्वोच्च क्षण कुठला असेल तर तबलिगी जमातच्या प्रकरणावरुन सोशल मीडियावर सुरु असलेल्या विखारी प्रचारावर त्यांनी दिलेला कडक इशारा. ‘कोरोनाचा सामना करत असताना अफवांचा अजून एक व्हायरस समोर आला आहे. दुहीचा हा व्हायरस पसरवणाऱ्यांना सोडणार नाही,’ अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी अशा विषयावर इतकी ठाम भूमिका घेऊन सुनवावं याचा अनेकांना सुखद धक्का बसला.अशा संकट कळीच खरे नेतृत्व लक्षात येते. अन्यथा ऐकाधिकारशाहीचा अविर्भाव संपूर्ण देशाला धोक्यात घालून शकतो. त्यामुळे लोकशाहीत असेच सामुहिक जबाबदारीचे तत्व पाळणारे नेतृत्व लोकशाही सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरते. तेव्हा घटनात्मक पेचप्रसंगामुळे पद गेले तरी कोरोना या वैश्विक संकटात अत्यंत कार्यक्षम पणे काम करणारा मुख्यमंत्री असे नाव उद्धव ठाकरे हेच असेल. लेखकाचे मनपूर्वक अभिनंदन...


Nitin

Wed , 15 April 2020

मला तरी मा. उध्दव ठाकरे आश्वासक वाटतात. कुठल्याही प्रकारचे नाटकी बोलणे नाही, अनावश्यक आवाजातील चढउतार नाही. दिशा देणारे, काय करतो आहोत, काय करायला पाहिजे हे स्पष्ट सांगणारे, आपल्यातीलच वाटतात. येणारा काळच ठरवेल त्यांनी घेतलेल्या भूमिके बद्दल. (आणि हो मी कोणी शिवसैनिक नाही, माझेही मत असेच होते की वडिलांच्या पुण्याईने त्यांना संधी मिळाली, पण ते त्यासाठी पात्र आहेत हे आता सिद्ध होत आहे.)


??? ??????

Tue , 14 April 2020

चुकीचे असेसमेंट !धड मुंबई वर कंट्रोल नाही!महाराष्ट्र सांभाळण्याचा अनुभव अतिशय कमी कोणी तरी आघाडीचा ज्येष्ठ नेत्याने आता सांभाळावे अन्यथा सैन्याला बोलवा. नाहीतर मुंबई च्या नागरिकांना दडपण वाटेल.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......