अजूनकाही
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि राजकीय विचारवंत म्हणून प्रा. भास्कर लक्ष्मण भोळे यांचा महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळी, संस्था, उपक्रम आणि व्यासपीठ यांच्याशी जवळचा संबंध होता. त्यांनी प्रभावी लेखन आणि भाषण यांचा वापर सामाजिक परिवर्तनासाठी केला. जे बोलायचे ते मराठीतून, यावर त्यांचा नेहमी भर असायचा. गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांचे ज्येष्ठ अभ्यासक अशी ख्याती असलेल्या भोळे यांना २००२ मध्ये साहित्यिक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांनी मराठी समाज, साहित्य व संस्कृती यावर, तसेच सामाजिक चळवळींविषयी चिकित्सक लेखन केलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सचिव श्री नानकचंद रत्तू यांनी लिहिलेल्या ‘Reminiscences and remembrances of Dr. B.R. Ambedkar’ या इंग्रजी पुस्तकाचा त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर - अनुभव आणि आठवणी’ या नावाने मराठी अनुवाद केलेला आहे. या अनुवादित पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारदेखील मिळाला आहे.
या पुस्तकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, विविध पैलू आणि वैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या अंतरंगातील ओढाताण, व्यथा-वेदना आणि घालमेल यांचंही प्रत्ययकारी दर्शन होतं.
या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाची सुरुवात समाजातील अस्पृश्यतेच्या जाणीवेपासून केलेली आहे. अस्पृश्यतेच्या आठवणी आणि अनुभवाबद्दल रत्तू सांगतात, सुरुवातीला बाबासाहेबांनाही इतर लोकांप्रमाणे अस्पृश्यता ही एक स्वाभाविक बाब वाटत होती. अस्पृश्य घरात जन्माला आल्यामुळे आपल्या ठिकाणी काही अपात्रता निर्माण होतात, ही समाजाची प्रतिक्रिया त्यांना बालपण आणि शालेय जीवनापासून ते बॅरिस्टरी मिळवून मायदेशी परत आल्यानंतरच्या टप्प्यापर्यंत परिचयाची होती.
वर्गात कोपऱ्यात एकटं बसवणं, शाळेत येता-जाताना बसण्याचं पटकूर सोबत नेणं, नळावर पाणी देणारा शिपाई नसल्यास दिवसभर तहानेनं व्याकूळ राहणं, हे सारं त्यांना अंगवळणी पडलं होतं. बाबासाहेब नऊ वर्षांचे असताना नवीन कपडे घालून उत्साहानं आत्याच्या गावाहून येत असताना अस्पृश्यतेच्या प्रथेमुळे जीवघेण्या संकटात सापडतात. गाडीवान गाडीतून सोडायला तयार होत नाही. सोबत आत्याने दिलेले खाद्यपदार्थ असतात, पण कोणीही घोटभर पिण्याचं पाणी न दिल्यानं उपाशीपोटी रात्रभर जागून कसेबसे गावी पोहचतात.
या प्रसंगामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसला. त्यानंतर बॅरिस्टर झाल्यावरही त्यांना तशाच अनुभवला सामोरं जावं लागलं. हिंदूंच्या दृष्टीनं अस्पृश्य असलेली माणसं पारसी व मुस्लीम समाजांच्या दृष्टीनेही अस्पृश्य असतात, याचे कटू अनुभवही डॉ. आंबेडकरांना आल्याचे रत्तू यांनी या पुस्तकात सांगितले आहे.
दुसऱ्या प्रकरणात १९०९ ते १९४६ या दरम्यान घडलेल्या काही घटना वेगवेगळ्या साधनस्त्रोतांतून एकत्र केल्या आहेत. अस्पृश्यांची उपस्थिती हाही एक मोठा अपराध आणि विटाळ होता. मद्रास न्यायालयातील १९०९ मधील एक अनुभव आहे. या न्यायालयातील खटल्यात दोन्ही पक्षकार सवर्ण हिंदू होते. एकाचा आरोप असा की, दुसऱ्याने त्यांना मिरवणूक काढण्यास अडथळा आणण्यासाठी अस्पृश्यांना वाटेत उभं केलं. खालच्या न्यायालयानं हा आरोप प्रमाण मानून आरोपींना दोषी ठरवलं, तर उच्च न्यायालयानं त्यांना निर्दोष सोडलं. अशा आठवणीतून त्यावेळच्या विदारक परिस्थितीचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. हिंदू कधी डॉक्टरांनी ओल्या बाळंतीणीवर नीट उपचार न केल्यामुळे तिला मृत्यूला सामोरं जावं लागलं, तर कधी गावात आलेली कॉलराची साथ ही अस्पृश्यांमुळे आली म्हणून त्यांना जिवंत जाळलं गेले. असे अनेक प्रसंग नेमके संदर्भ देऊन सांगितले आहेत.
तिसऱ्या प्रकरणात खेड्यातील ग्रामव्यवस्था अस्पृश्यांना कोणतीही सोयीसुविधा आणि हक्क पुरवत नाही, तसंच अस्पृश्य तक्रारही करू शकत नाहीत, त्यांनी मिळालेली शिक्षा निमूटपणे भोगायची, याबाबतचे अनुभव सांगितले आहेत.
चौथ्या प्रकरणात बालपणीतील निर्धार आणि शाळेतील अनुभव आहेत.परिस्थितीवर मात करून अभ्यास करणं, ध्येयनिष्ठा, समर्पणाची भावना व त्याग बुद्धी या प्रकरणातील अनुभवातून दिसून येते.
पाचव्या प्रकरणात आंबेडकरांनी तरुणांकडून तसंच सहकारी कार्यकर्त्यांकडून ज्या अपेक्षा बाळगल्या होत्या, त्या रेखीवपणे व्यक्त केलेल्या आहेत. या प्रकरणांतून त्यांनी ‘केवळ वैयक्तिक सुखाच्या वाटेनं जायचं नाही, तर आपल्या समाजाला मुक्तीच्या, सामर्थ्याच्या आणि सन्मानाच्या दिशेनं घेऊन जायचं आहे’ असं आवाहन तरुणांना केलं आहे.
सहाव्या प्रकरणात आंबेडकरांनी वैयक्तिक तत्त्वज्ञान मांडलं आहे. त्यांना सत्कार, मानपत्र, समर्पण किंवा वाढदिवस साजरा करणं मनापासून आवडत नव्हतं. त्यांनी पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त ‘जयभीम’ साप्ताहिकाला आपली नापसंती कळवली होती. त्यात ते म्हणतात की, “व्यक्तिश: मला माझा वाढदिवस साजरा केलेला आवडत नाही. मी इतका लोकशाहीवादी आहे की, व्यक्तीपूजा मला रुचणंच शक्य नाही. व्यक्तिपूजेला मी लोकशाहीचे विडंबन समजतो. नेत्याबद्दल योग्य तो आदर, प्रेम, सदभाव असावा, पण त्याची ‘पूजा मुळीच क्षम्य नाही. ती (नेता आणि अनुयायी अशा) दोघांच्याही नीतीधैर्याला मारक ठरते.”
सातव्या प्रकरणात अस्पृश्यांच्या चळवळीच्या आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत.
या पुस्तकातील प्रकरण आठवं व नववं ही दोन प्रकरणं माझी सर्वांत आवडती आहेत. यात ज्यांना बाबासाहेबांचा प्रत्यक्ष सहवास लाभला असे काही निकटचे सहकारी, कार्यकर्ते यांच्या अनौपचारिक आणि व्यक्तीगत स्वरूपाच्या आठवणी एकत्र केल्या आहेत. ‘द अनटचेबल’चे लेखक मुल्कराज आनंद आणि आंबेडकर यांच्यातील सवांद, मुंबई विधी महाविद्यालयात डॉ. आंबेडकर प्राचार्य असताना यु. आर. राव यांच्यासोबतच्या आठवणी, डॉ. त्र्यं. कृ. टोपे, प्रा. हेलकर, जोगेंद्र नाथ मंडल अशा काही जवळच्या सहकारी सोबतच्या आठवणी आणि संवाद या प्रकरणांत आहेत. तसेच त्यांच्या लेखनाचे व स्वाक्षऱ्यांचे नमुने पुस्तकाच्या अखेरीस दिले आहेत.
नानक चंद रत्तू यांच्यासोबतचे आंबेडकरांचे शेवटचे संभाषण सुन्न करणारे आहे. कारण जे सुशिक्षित झाले, ते विश्वासघातकी निघाले असं आंबेडकरांना वाटतं. पुढारलेपणासाठी, सत्तेची हाव आणि वरिष्ठांच्या नोकऱ्या मिळाल्या म्हणून जे सुशिक्षित झाले, ते एक नव्या आत्मकेंद्री व बेगुमान वर्गात रूपांतर झाले आहेत, असं त्यांना वाटतं. सहकारी चळवळ पुढे चालवतील असा त्यांचा विश्वास कोलमडून पडला.चळवळीची वळणं आणि व्यथा त्यांनी सांगितल्या आहेत. चळवळीतील सहकारीदेखील नेतृत्वासाठी एकमेकांशी भांडत आहेत आणि विभक्त होत आहेत. या सर्वांचा होणारा मनस्ताप, घालमेल, असाह्यता आणि खंत आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.
आज आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं या पुस्तकाच्या माध्यमातून बुद्धिमान, कष्टाळू आणि संवेदनशील अशा डॉ. आंबेडकरांच्या वाटेत पूर्वग्रहांची अभेद्य व चिरेबंद भिंत कशी आडवी आली होती आणि तिने त्यांचं जीवनकार्य कसं संकटात आणलं होतं, तरीही समजूतदार, आस्थेवाईकपणे टिपलेल्या त्यांच्या सशक्त व चैतन्यमय व्यक्तिमत्त्वाच्या खुणा मांडाव्याशा वाटल्या.
असं हे चांगल्या-वाईट आठवणीनं आणि अनुभवानं भरलेलं पुस्तक सर्वांनी वाचलं पाहिजे.
.............................................................................................................................................
लेखिका अंजली प्रवीण नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली यांच्या नागपूर सेन्ट्रल जेलमध्ये सुरू असलेल्या उपक्रमात ‘सोशल वर्कर फेलो’ म्हणून कार्यरत आहेत.
amkar.anju@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sachin Shinde
Tue , 14 April 2020
khup chan............ hya pustakavishai khup aikun hoto pan ha lekh vachun itake manat baslay ki aata he pustak vachlyashivay gappach basnar nahi.
Sanjay Pawar
Tue , 14 April 2020
सध्याच्या लाॅकडाऊनच्या काळात वाचायला मिळालं असतं तर बरं झालं असतं,पण आॅनलाईनही विक्री बंद असल्याने आता 3 मे नंतरच हे पुस्तक घेता येईल. या लेखाने हे पुस्तक वाचावेसे वाटेल व त्याची आवॄत्ती संपावी ही अपेक्षा.
Samir Mohite
Tue , 14 April 2020
खूपच सुंदर