‘युगानयूगे तूच’: ही कविता आंबेडकरांना अभिप्रेत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा केंद्रबिंदू व क्रांतिबिंदू होते. भारतीय संविधानाचा मूल्यजागर करते.
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
कबीर उषा लक्ष्मण बोबडे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ‘युगानयूगे तूच’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Tue , 14 April 2020
  • ग्रंथनामा शिफारस युगानयूगे तूच Yuganuyuge Tuch अजय कांडर Ajay Kandar १४ एप्रिल 14 April डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr Babasaheb Ambedkar भारतीय राज्यघटना Constitution of India

कवी अजय कांडर यांचा ‘युगानयूगे तूच’ हा दीर्घ कवितासंग्रह लोकवाङ्मय गृहाकडून अलीकडेच प्रकाशित झाला आहे. ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समकाळाच्या संदर्भात जागर करणारी कविता आहे. एका सार्वत्रिक व सार्वकालिक भयाला वाचा फोडणारी, भवतालाच्या कोलाहलात हस्तक्षेप नोंदवणारी ही कविता आहे. दीर्घकवितेच्या एकूण परंपरेतली ही महत्त्वाची कविता म्हणायला हवी. कांडर या कवितेतून केवळ आंबेडकरांच्या विचारांचा ‘रोड मॅप’ उभा करत नाहीत, तर भोवतालच्या सामाजिक-राजकीय प्रश्नांवरही बोट ठेवतात. त्यामुळे एकार्थानं हे आजच्या अस्वस्थ वर्तमानाचं चित्र आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

या दीर्घ कवितेतून कांडर यांचा आंबेडकरांच्या विचाराप्रती असलेला आदर, महत्त्व आणि विश्वास दिसून येतो. आंबेडकरांवरील प्रखर निष्ठा आणि सामाजिक जाणिवेतून आलेली ही कविता आहे. आंबेडकर कांडर यांचं प्रेरणास्थान आणि श्रद्धास्थान आहे. पिढी बदलली की प्रश्न बदलतात, पण दु:ख आहे तिथंच असतं. व्यवस्था चैतन्यवादी तत्त्वज्ञानासारखीच असते आणि या व्यवस्थेची चिरफाड करणारी ही कविता आहे.

या दीर्घ  कवितेची सुरुवात आत्मटीकेनं होते. व्यक्तिगत स्वरूपाच्या आत्मगत निवेदनातून ही कविता प्रगटत असली तरीही ती सर्वसमावेशक सामाजिक जाणीवेचंही प्रकटन करते. कवी स्वत:ला तपासण्याच्या स्वरात एकटा नसून सर्व समूहमनाचा आवाज त्यात मिसळलेला आहे. त्यामुळे या कवितेमधला आत्मगत वैयक्तिक स्वर सामाजिक जाणिवेत रूपांतरित होतो, हे या कवितेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मुखवटे काढून स्वतःला तपासणं सोपं नसतं. कारण हे मुखवटे आपलं अस्तित्व, आपल्या अस्मिता बनलेल्या असतात. जातीचा, धर्माचा, कामाचा, भाषेचा, देशाचा असा कुठला तरी मुखवटा आपल्याला जगताना लागतोच. तो नसेल तर स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी खूप धडपडावं लागलं.

प्रखर सामाजिक भान बाळगणारी ही कविता शकलं झालेल्या सामान्यांचे आवाज प्रकट करते. या कवितेत व्यक्तीकडून समष्टीकडे असा वैचारिक प्रवास असल्यामुळे काळाला साद घालणारी ताकदही आहे. ही कविता प्रचंड अस्वस्थपणातून आलेली असल्यानं संवेदनशील वाचकाला अस्वस्थ करते. ही कविता सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व्यवस्थेविरुद्धचा उद्रेक आहे. डॉ. आंबेडकरांच्या जीवनप्रेरणेचा पांथस्थ होताना ही कविता मानवी मूल्यं उजागर करत आंतरिकता आणि आत्मिकता व्यक्त करते. 

या कवितेची सुरुवातच आश्वासक आहे-

'तू तुझे भक्त होण्याचे

सगळे विचार नाकारलेस

तरी मी गात राहिलो तुझ्याच भक्तीचा गोडवे

मग तुझ्याच विचारांचे

बोट धरून चालताना लक्षात आले

तुला भजत राहिल्यापेक्षा 

इथल्या निसर्गानुसार जगणं

म्हणजे तूच पुन्हा पुन्हा

विचारांच्या बीजातून रुजून येणं (पृष्ठ १) 

या कवितेतील नायक खचलेला वा अगतिक नसून तो केवळ भोवताल आणि आंबेडकर यांच्या विचारांचा ताळमेळ लावतोय. या कवितेतील जीवनाशय व्यापक स्वरूपाचा आहे. कांडर यांची जीवनदृष्टी आंबेडकरांच्या विचारांतून विकसित झाली, असल्यानं या कवितेचे स्वर जीवनवेधी आहेत.

भोवतालच्या सामाजिक पर्यावरणामुळे अस्वस्थ होऊन चिंतन करणारा कवी अस्वस्थ करणाऱ्या वर्तमानाचा गुंता सोडवण्यासाठी महामानवाच्या विचारापर्यंत पोहोचून थेट बुद्धाशी नाळ जोडून घेतो. म्हणतो- 

मला आधी तू भेटलास, नंतर बुद्ध 

तू भेटला तेव्हा कळलं 

तुला भेटणे म्हणजेच बुद्धाला भेटणे

आणि बुद्धाला भेटणे म्हणजेच 

दीनदुबळ्यांवर आयुष्याच्या अंतापर्यंत प्रेम करणे!

आत्मभान आणि विश्वभान यांना जोडणारा दुवा म्हणून कवी आंबेडकरांकडे बघतो. आंबेडकरांचे विचार आत्मभान जागवतात, आणि विचारांचा तोच धागा बुद्धाकडे जोडत नेला की, विश्वभान मिळतं.

डॉ. आंबेडकर हा जगातील एकमेव माणूस ‘माणूसहितदक्ष’ असल्याचं कवीला वाटतं. समतेचं महत्त्व सांगून माणसाचं गीत गाणारा हा महामानव कवीला ‘माणसांवर प्रेम करायला लावणारा हा जगातला एकमेव माणूस’ वाटतो. कवी म्हणतो-

‘या जगात तुझ्या एकट्याच्याच रक्तात 

जात, धर्म, देव, पंथ दिसला नाही मला...’ 

जन्मोजन्मी जगण्याचा तळ खोदत 

राहणाऱ्या साऱ्यांनाच 

पाणी मिळावे म्हणून होता तुझा जीव तहानलेला!  (पृष्ठ १७)

या ओळींतून महामानवाच्या काळजातली समष्टीची वेदना कवी मांडतो. आज आपण महापुरुष जातीपातींत वाटून घेतले आहेत. मात्र कवी अधोरेखित करतो की, हा युगपुरुष कुणा एका जाती धर्माचा नव्हे, तर संपूर्ण मानवजातीचा, शोषितांचा मुक्तिदाता होता. तो माणसांच्या माणुसकीच्या बाजूनं होता.

ज्यांनी दिला पाण्याला आपल्याच वर्णाचा रंग

आणि ज्यांनी पसरवली 

पाण्यात विषमतेची विषवल्ली

त्यांच्या विरोधात तू उभा होतास

पण, 

तुझ्या विचारांच्या अनुकरणातून लक्षात आलं

तू नव्हतास कुणाच्याच विरोधात

तू होतास फक्त माणसांच्या बाजूने! (पृष्ठ १७) 

एकविसाव्या शतकाचा उंबरठा ओलांडून झालाय. जागतिकीकरण येऊन गेलं आणि समाजामध्ये, व्यक्तींमध्ये आणि समूहांमध्ये अंतर्गत संघर्ष आणि मतभेद कमालीचा वाढला. लोकशाही नावाची गोष्ट केवळ नावालाच राहिली. मानवाच्या शकलीकरणाची प्रक्रिया या काळात अधिक वेगवान होत आहे. आपला समाज - देश आज एका मोठ्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. आपलं सामाजिक-राजकीय- सांस्कृतिक वास्तव अधिकाधिक निसरडं होत जातेय. या  अशा प्रचंड कोलाहल असणाऱ्या काळात कवीचा क्षीण आवाज या भवतालाशी सातत्यानं काहीतरी बोलतोय, प्रश्न विचारतोय. समाजातल्या मानवी मूल्यांचा ऱ्हास झाला आहे. वाढत जाणारी उथळ - स्वार्थी वृत्ती यांच्यामध्ये सापडलेला दीनदुबळा माणूस हैराण होऊन त्याचं दमन होतंय. समाजात मतभेद आणि संघर्ष आहे. त्यामुळे समाजात केवळ आणि केवळ हिंसा व दहशत असल्याचं दिसून येतं.

या सगळ्या विदीर्ण होत जाणाऱ्या भवतालात ही कविता सामाजिक जाणिवेनं विषण्ण होत प्रकट होते. भवतालातील कोलाहलाच्या पार्श्वभूमीवर अतिशय संयतपणे ठणकत राहणारी ही कविता आजचं समाजवास्तव आणि महामानवाचा विचार, जीवन यांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करते.

आज आपल्या भोवती, आपल्या समाजात स्वार्थापोटी तेढ निर्माण करणाऱ्या काही धर्मांध शक्ती प्रबळ झाल्याचं दिसतं. शिवाय मतपेढी वाढवण्यासाठी राजकारणी अस्मितांचं राजकारण करून स्वतःचा राजकीय हेतू सफल करत आहेत. त्यामुळे 'आम्हाला जातीअंत होण्यापेक्षा, जाती नायक होण्याची एवढी घाई झालीय का?' असा सवाल कवी उपस्थित करतो. राष्ट्रवादाच्या मुद्यावरून अल्पसंख्य समूहाचं मोठ्या प्रमाणावर दमन केलं जात आहे. त्यांचं जगणं निर्बंधित केलं जात आहे. ‘आम्ही भारताचे लोक’ ही ओळख प्रत्येक नागरिकाला मिळवून देणाऱ्या भारतीय संविधानात बदल करण्याचे, ते जाळण्याचे मनसुबे काही धर्मांध प्रवृत्तीच्या माणसांनी रचले आणि ते सत्यात उतरवण्याचे प्रयत्नही झाले.

कवी स्वतः पत्रकार असल्यानं त्यांना वर्तमानाचे संदर्भ माहीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कवितांतील चिंतनाची डूब लक्षात येते. आपला वर्तमान हा एका मोठ्या स्थित्यंतराचा कालखंड आहे. एक अदृश्य असं अराजक आपल्याभोवती नांदतं आहे. अशा वर्तमानाला कवी आपल्या कवितेतून प्रखरतेनं मांडत आहे. या कवितेतील सृष्टी खिन्न, व्याकूळ स्वरूपाची, मानवी हतबलतेला शब्दरूप देणारी आहे.

आंबेडकरांनी आयुष्यभर विभूतीपूजनाला, देवत्वाला विरोध केला असला तरी आपण त्यांच्या भक्तीचे गोडवे गात आहोत. त्यांच्या मूळ शिकवणुकीपासून दूर जात मिरवणूका काढून ढोल- ताशांच्या कर्कश आवाजावर नाचगाणी करतो. आपण आंबेडकरापासून नकळत दूर जातोय, असा सूर या कवितेत उमटतो. मात्र कवी नुसती जाणीव प्रगट करत नाही, तर असं नेमकं का होतं, याची मीमांसादेखील करतो. ही मीमासा करताना ‘मला कुणी प्रतिमेत तर अडकवत तर नाही ना’, हा प्रश्न कवीला पडून तो एका मोठ्या सांस्कृतिक राजकारणाकडे बोट दाखवतो.

आंबेडकरांना ‘बोधिवंत’, ‘युगवंत’, ‘महामानव’, ‘भारतरत्न’, ‘परमपूज्य’, ‘स्त्रीमुक्तिदाता’, ‘बोधिसत्त्व’, ‘बाबासाहेब’... अशी कितीतरी विशेषणं लावली जातात! आंबेडकर यांनी स्त्रीमध्ये आत्मविश्वास जागवून गुलामीची जाणीव करून तिला स्वातंत्र्य मिळवून दिलं, समतेचं तत्त्वज्ञान सांगितलं, स्त्रियांच्या उत्थानासाठी ‘हिंदू कोड बिल आणलं’, म्हणून कवी महामानवाचा गौरव ‘समग्र बाईपणाच्या अस्तित्वाचा पाठीराखा’ असा करतो. 

आंबेडकरांची ओळख ‘दलितांचे कैवारी’, ‘राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हणूनच केली जाते. परंतु  त्यांनी शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाचं काम केलं, याची दखल कोणी घेतली नाही. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून उपाययोजना करण्यासाठी पाणी, वीज हे महत्त्वाचे घटक असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. पहिल्यांदा बाबासाहेबांचा कृषीविषयक विचार या कवितेतून पुढे आला असून तो चिंतनशील आहे. 

कांडर म्हणतात, आपण आंबेडकरांचे कृषिविषयक विचार स्वीकारले असते तर शेतकऱ्यानं मरणाला जवळ केलं नसतं. आंबेडकरांच्या मते, शेती केवळ उत्पन्नाचं साधन नसून तो राष्ट्रीय उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. शेतीतून रोजगार निर्माण होतो, त्यामुळे तो महत्त्वाचा उद्योग आहे.  मात्र आंबेडकरांचे विचार नाकारून आपण शेतकऱ्याला अडचणीत टाकलं, हे वास्तव आहे.

आंबेडकरांच्या विचाराचं दर्शन घडवणारी, हा महामानव समजावून सांगू पाहणारी मराठी दीर्घकवितेच्या परंपरेतली ही महत्त्वाची कविता आहे. सध्या कवींना वाईट दिवस आहेत. त्यातल्या त्यात भूमिका घेऊन लिहिणारी संवेदनशील कवी तर हिटलिस्टवर आहेत. ‘आमच्या विरोधात लिहाल\बोलाल तर तुमचा दाभोळकर-पानसरे करू’, असं दहशतीचं वातावरण असताना कांडर यांची ही दीर्घकविता प्रकाशित होणं, ही महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे.

समाजातील वर्णव्यवस्थेला, जातव्यवस्थेला आव्हान देणारी ही कविता भारतीय संविधानाचा मूल्यजागर करते. तसंच आंबेडकरांना अभिप्रेत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा केंद्रबिंदू व क्रांतिबिंदू होते. माणसामधील बधिरलेल्या माणूसपणाला खडबडून जागे करत आपलं माणूसपण ओळखायला लावते.

.............................................................................................................................................

लेखक कबीर उषा लक्ष्मण बोबडे दृक-श्राव्य माध्यमात काम करतात.

kabirbobade09@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Sachin Shinde

Tue , 14 April 2020

Babasahebana apekshit aslela samaj Kamdar siranchi kavtetun vyakt kelay Ashi kruti hich Babasahebana aadaranjali asel......... Trivar Vandan Mahamanavala............


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......