करोना व्हायरसमुळे होणारी जीवितहानी पाहता अनेकांनी या संकटाची ‘युद्धपरिस्थिती’शी तुलना केली, हे समजण्याजोगे आहे!
पडघम - देशकारण
माधव दातार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 13 April 2020
  • पडघम देशकारण करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona virus लॉकडाउन Lockdown

करोना व्हायरसच्या साथीला आपण भिडण्याची सुरुवात होऊन तीन आठवडे झाल्याने या लढाईचा आतापावेतो थोडाफार प्रत्यक्ष अनुभव सर्वांनाच आला आहे! जगातील अनेक देशांत आज टाळेबंदी असली तरी या विश्वव्यापी संकटाचे परिणाम सर्वत्र सारखे नसून ते लक्षणीयरीत्या भिन्न आहेत. या घटनेची व्याप्ती व संभाव्य जीवितहानी पाहता अनेकांनी तिची युद्धपरिस्थितीशी तुलना केली, हे समजण्याजोगे आहे.

पण अधिक बारकाईने विचार केल्यास या युद्धात ‘बाह्य’ शत्रू नाही हे लक्षात येते. करोना व्हायरसचा प्रसार चीनने गलथानपणाने किंवा दुष्टपणाने केला असा आरोप होत आहे. त्याचा शस्त्र म्हणून वापर झाला असण्याची शक्यता कमी असली तरी प्रयोगशाळेतून विषाणू चुकून निसटला असण्याची शक्यताही आहेच. मात्र या विषाणूचे विशिष्ट व्यक्ती किंवा मानवी समूहाला लक्ष्य बनवणे, असे ‘उद्दिष्ट’ असू शकत नाही, हे सुस्पष्ट आहे.

चक्रीवादळे, टोळधाड, पूर, त्सुनामी, भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमागेही मानवी समाजाला हानी पोचवण्याचे ‘उद्दिष्ट’ नसतेच! पण या सर्व संकटांचा – त्यांची अचूक पूर्वसूचना मिळत नसली तरी - परिणाम स्थल आणि काल संदर्भात मर्यादित आणि दृश्य स्वरूपाचा असतो. भूकंप काही सेकंदांत मोठ्या जीवित आणि मालमत्ताहानीचे कारण बनत असला तरी त्यानंतर भूकंपग्रस्त लोकांना प्रथम त्वरित मदत पोचवणे आणि नंतर त्यांचे पुनर्वसन करणे ही आव्हाने सुस्पष्ट असतात. ही कार्ये बिनमहत्त्वाची किंवा सोपी असतात असे नव्हे, पण त्यात अनिश्चितता नसते.

करोना व्हायरसचे संकट अदृश्य आहे. संसर्गाची सुरुवात होऊन त्यांचा फैलाव झाल्यानंतर इस्पितळात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होईपर्यंत या संकटाची चाहूलही लागत नाही. साथ फैलावण्याचा वेग जास्त असल्याने काही दिवस दबा धरून वावरत असलेला करोना व्हायरस जेव्हा प्रगट होतो, तेव्हा भूमिती श्रेणीत वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पुरात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था वाहून जाण्याची स्थिती उद्भवते. तुटपुंज्या सुविधांचे वाटप मोठ्या संख्येतील रुग्णात करण्याचे धर्मसंकट वैद्यक व्यवस्थेसमोर उभे राहते.

या स्थितीत साथ फैलावण्याचा वेग कमी व्हावा म्हणून टाळेबंदीसारखा जालीम उपाय करावा लागतो. टाळेबंदीने साथ पसरण्याचा वेग कमी होतो; यातून उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त वेळात वैद्यक व्यवस्थेची डागडुजी करण्यास सवड मिळते; मात्र रोग नष्ट होत नाही. शिवाय लोकांच्या जीवावरील संकटाचे निराकरण करण्याच्या प्रयत्नातून अर्थव्यवहार ठप्प झाल्याने त्याचे रूपांतर रोजीरोटीच्या संकटात झाल्याचा अनुभव सर्वत्र येत आहे.

सामान्यपणे बाह्य शत्रूचा सामना करण्यासाठी समाजातील विविध समाजघटकांना आपसातील मतभेद - तात्पुरते का असेना – दूर ठेवत युद्धप्रयत्नांना मदत करण्याचे आवाहन सरकारमार्फत करण्यात येते. अशा प्रसंगी बहुतेक ठिकाणी सामाजिक एकोपा राखला जातो. बाह्य शत्रू दृश्य असतो. शत्रूची युद्ध उद्दिष्टे नेहमीच स्पष्ट नसली तरी त्याबाबत होरा बांधता येतो. त्यामुळे आपल्या हद्दीतील शत्रूच्या संभाव्य लक्ष्यांचे रक्षण करत शत्रूच्या हद्दीतील आपल्या लक्ष्यांवर हल्ला करणे, असा दोन्ही पक्षांचा कार्यक्रम असतो.

अघोषित युद्धात परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनते, पण दृश्य शत्रू (दहशतवादी लपूनछपून काम करत असले तरी त्यांचे कृत्य यशस्वी झाल्यावर ते पकडले गेले नाहीत, तरी त्यांचे अस्तित्व स्पष्ट होते) आणि त्याची संभाव्य लक्ष्ये या बाबी उघड लढाईसारख्याच असतात. मात्र संभाव्य दहशतवादी संकटाचा सामना करणाऱ्या देशांना कोणतेही लक्ष निवडू शकणाऱ्या दहशतवाद्यांचा तपास करण्याचे कठीण काम करावे लागते.

ही लढाई असमान असते. दहशतवाद्यांना एखादे यशही पुरे असते, पण त्यांचा सामना करणाऱ्या सरकारी यंत्रणांना मात्र एखादे अपयशही घातक ठरू शकते. मात्र सामान्य जनतेचे सहकार्य आणि विश्वास सरकारला राखता/मिळवता आला तर दहशतवादाविरुद्धची लढाई सोपी बनते. कारण जनसामान्यांचा पाठिंबा/आसरा नसला त्यांच्या कारवायांना चटकन पायबंद लागू शकतो.

करोना विरुद्धची लढाई मात्र याहीपेक्षा निराळी आणि जटिल ठरते. अदृश्य शत्रूशी मुकाबला करण्याचा उपाय उघड असला तरी त्याचा वापर प्रदीर्घ काळासाठी करणेही घातक ठरू शकते. 

नवी लढाई    

करोना व्हायरस ‘बाह्य’ असला तरी त्याचा प्रसार माणसांकडूनच होतो. या साथीवर प्रतिबंधात्मक उपाय (लस/औषध) अद्याप सापडला नसल्याने सुचवले गेलेले पर्यायी उपाय – हात धुणे, मास्क वापरणे आणि समाजात वावरताना गर्दी टाळणे – पूर्णपणे वैयक्तिक आणि सामूहिक मानवी वर्तणुकीशी संबंधित आहेत. लस किंवा परिणामकारक औषध शोध लागणे आणि ते सर्वत्र उपलब्ध होणे ही करोना व्हायरसविरोधातील आक्रमक चाल ठरेल; पण ते शस्त्र आज उपलब्ध नसल्याने सर्वच देशांना बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतो! त्यामुळे शत्रू बाह्य असला तरी लढाईची व्याप्ती किती/कुठे हे मानवी समाजाच्या वर्तणुकीवर अवलंबून असते. जे समाज/ अर्थव्यवस्था इतर प्रदेशांशी निगडित आहेत, तिथे त्यांचा संसर्ग लवकर होण्याची शक्यता जास्त असते. त्याचप्रमाणे या साथीपासून स्वत:चा बचाव करण्याची तयारी/कुवतही ठिकठिकाणच्या (भिन्न) मानवी समाजव्यवस्था, त्यांची आचरण पद्धती आणि सार्वजनिक आरोग्याबाबतची जागरूकता यावर अवलंबून असते.   

करोना व्हायरसच्या व्याप्ती आणि तीव्रतेबाबत जी माहिती जागतिक आरोग्य संघटना रोज प्रसिद्ध करते, त्यातून प्रसार आणि व्याप्ती संदर्भात विविध मानवी समाजव्यवस्था आणि वर्तणूक यांचे महत्त्व स्पष्ट होते. जागतिक आरोग्य संघटनेने २० जानेवारी २०२०पासून दैनिक वृतान्त प्रसिद्ध करणे सुरू केले, तेव्हा करोना व्हायरसचे रुग्ण चार देशांत आढळले, पण त्याची व्याप्ती मुख्यत: चीनमध्ये होती. मात्र ही परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. फेब्रुवारीअखेर ही साथ ५४ देशांत/प्रदेशांत पसरली, तर १० एप्रिलपर्यंत तिचा प्रसार २१२ देशांत/प्रदेशांत झाला होता.

इतरत्र साथीची तीव्रता वाढत गेली, त्याप्रमाणात चीनचा वाटा साहजिकच कमी होत गेला. अर्थात चीनने केलेल्या उपायांमुळेही त्याचा वाटा कमी झाला. एप्रिल मात्र या आकडेवारीचे महत्त्व ढोबळ स्वरूपाचे आहे. देशोदेशांत रोगाची चाचणी करण्याचे प्रमाण आणि निकष जसे भिन्न आहेत, त्याप्रमाणेच जाहीर केलेल्या आकडेवारीच्या सत्यतेबाबतही शंका घेण्यास जागा आहे. चीन जाहीर करत असलेल्या रुग्ण आणि मृतांच्या माहितीबाबत जसा संशय प्रगट होतो, त्याचप्रमाणे रोग चाचणीचे प्रमाणच जर अल्प असेल तर रुग्ण (आणि मृत व्यक्तीही) कमी असतील हे उघडच आहे! पण माहितीचे पर्यायी स्त्रोत उपलब्ध नसल्याने याच माहितीद्वारे रोगाचे स्वरूप वस्तुनिष्ठपणे जाणता येते.

तक्ता १ मधील माहितीतून रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढण्यातील झपाटा स्पष्ट होतो. फेब्रुवारीत रुग्णसंख्या जवळ जवळ १० पटीने वाढली, तर मार्चमध्ये ती पुन्हा आठपट वाढली. नंतरच्या १० दिवसात रुग्ण संख्या पुन्हा दुप्पट झाली. मृतांची संख्याही याचपद्धतीने – फेब्रुवारीत महिन्यात १६ पट वाढ, तर मार्चमध्ये ११ पट वाढ आणि नंतर दहा दिवसात दुपटीपेक्षा जास्त वाढली.

तक्ता १: कोविद १९- जागतिक व्याप्ती आणि तीव्रता

स्त्रोत : जागतिक आरोग्य संघटनेचे कोविड-१९बाबतचे दैनिक अहवाल

साथीची सुरुवात चीनमध्ये झाल्याने सुरुवातीला तिची व्याप्ती आणि तीव्रता चीनमध्ये दिसली, पण फेब्रुवारीत रोगाचा प्रभाव इतर देशांत दिसू लागल्यावर चीनचे आधिक्य झपाट्याने कमी झाले. सध्या एकूण रुग्णसंख्येत चीनचा वाटा ९ टक्के, तर मृतांत तो ४ टक्के आहे. चीनमध्ये या साथीची पुन्हा एखादी लाट निर्माण होण्याची कायम शक्यता असली तरी या साथीचा फैलाव नजीकच्या काळात कसा होतो, ते मुख्यत: इतर देशांतील परिस्थितीवर अवलंबून राहील.

भिन्न सामना

चीनमधील करोना व्हायरस इतर देशांत गेल्या दोन महिन्यांत पोचला. सर्वत्र सुरुवातीचा प्रसार परदेशी प्रवाशांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निगडित असला तरी नंतर साथीचा फैलाव अंतर्गत व्यापार/प्रवास आणि लोकांचे एकत्र येणे याच्याशी निगडित झाले. रोगाची लक्षणे (ताप, खोकला, श्वासाचा त्रास) नसलेल्या लोकांकडूनही संसर्ग शक्य असल्याने परिस्थिती बिकट बनते. शिवाय रोगाची तपासणी करण्याच्या सोयी मर्यादित असल्याने संसर्ग कोणाला झाला, त्याचा सुगावा लागत नाही.

देशातील नागरीकरण, गर्दीचे प्रसंग आणि वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता याप्रमाणेच रोग चाचणीचे प्रमाण आणि सुलभता या बाबीही विशिष्ट समूहांच्या जीवनपद्धतीचा भाग असल्याने रोग प्रसाराचा वेग, प्रमाण आणि तीव्रता सर्वत्र निराळी असते. शत्रूचा शिरकाव कसा/किती होतो आणि नंतरचा प्रतिकार (किंवा आत्मरक्षण!) विशिष्ट समाजाच्या क्षमतांवर अवलंबून राहते. (तक्ता २) निवडक दहा देशांचा विचार करता युरोप आणि अमेरिकेत साथीचा मोठा फैलाव दिसतो. एकूण रुग्णांच्या तुलनेत मृतांचे शेकडा प्रमाण असा तीव्रतेचा विचार करता जपान, कोरिया आणि जर्मनी यांची बचावक्षमता सर्वांत परिणामकारक ठरली, तर फ्रान्स, स्पेन आणि इटली यांना जास्त हानी सोसावी लागली. अमेरिका, भारत आणि चीन यांची कामगिरी मध्यम स्वरूपाची म्हणावी लागते.

तक्ता २ : कोविद १९- देश-प्रदेश (माहिती १० एप्रिल २०२०पर्यंत)

स्त्रोत : जागतिक आरोग्य संघटनेचे कोविड-१९बाबतचे दैनिक अहवाल

करोना व्हायरसचा प्रसार अनियमित असल्याने १० एप्रिलची माहिती पुढील काही आठवड्यात बदलू शकते. पण अमेरिकेसारख्या संपन्न, बलशाली देशांत मोठी रुग्णसंख्या दिसते ही बाब तेथील जास्त व्यापक तपासणीचे गमक आहे का गतिमान सामाजिक अभिसरणाचा तो अटळ परिणाम आहे? जपानमधील मास्क वापरण्याची चाल आणि शिस्तप्रियता यांना जपानच्या यशस्वी बचावाचे श्रेय मिळेल कदाचित, पण आता तिथेही अधिक तीव्र निर्बंध लागू होत आहेत. यावरून साथीची नवी लाट येत आहे का, अशी शंका निर्माण होते. कोरियाने मोठ्या प्रमाणात चाचण्या करून प्रभावित व्यक्ती आणि त्यांच्याशी संपर्क झालेले संशयित यांचे विलगीकरण करत सौम्य निर्बंध राखत करोना नियंत्रणात राखला असे मानले जाते.

त्याच पद्धतीने इटली, स्पेन आणि फ्रान्समधील जीवितहानीची कारणे आणि निर्बंधांचे अर्थव्यवहारातील परिणाम यांचा सविस्तर विचार भविष्यात होत राहील. उर्वरित देशांपैकी इराणमधील परिस्थितीची तीव्रता सरासरीपेक्षा थोडीशी कमी आहे, तर बाकी तीन मोठ्या देशांत (चीन, अमेरिका आणि भारत) रोगतीव्रता ‘मध्यम’ मानता येते, निदान आजतरी.

युद्धबंदी का युद्ध समाप्ती?

वुहान प्रांतातील निर्बंध ७६ दिवसांनंतर शिथिल झाल्याने चीनमधील साथीला उतार पडला आहे, असे मानून इतर देशांतही तसेच होईल अशी सार्वत्रिक समजूत आहे. आणि तसेच व्हावे अशी सर्वांची इच्छाही आहेच! पण करोना व्हायरसचा गडद प्रभाव आणि परिणाम त्याच्या जलद प्रसारामुळे जी अनिश्चितता निर्माण होते, त्यातून निर्माण होतो, हे लक्षात घेता करोना व्हायरसचा बंदोबस्त करणाऱ्या प्रतिबंधात्मक औषधाचा शोध लागेपर्यंत साथीची ही लाट ओसरल्यानंतर पुन्हा ‘सामान्य स्थिती’ निर्माण होईल का? करोना व्हायरससोबतच्या युद्धाची ही कायमची समाप्ती असेल, का ही फक्त तात्पुरती युद्धबंदी, जिचा कधीही भंग होऊ शकतो? कदाचित पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या वर्षी? याबाबत अनिश्चितता कायम राहील.

आणि मग करोना व्हायरसबरोबर पुन्हा पुन्हा शक्य होणाऱ्या चकमकींचा सामना करण्यासाठी आपल्या समाजव्यवस्थेत, अर्थव्यवस्थेत काय बदल आवश्यक ठरतीत हा प्रश्न पुढे येतो. मास्क लावून, सतत हात धुवून, गर्दी व वाहतूककोंडी न होता नित्य व्यवहार कसे करता येतील, याचा सामूहिक विचार आणि नंतर त्यानुसार कृती आवश्यक ठरेल. आत्ताच्या परिस्थितीत टाळेबंदीला पर्याय नसेलही, पण तो तात्कालिक उपाय आहे. ‘जान’ आणि ‘जहान’ दोन्ही राखण्याचे आव्हान सर्व जगासमोर असले तरी भारतापुढचे आव्हान जास्तच कठीण असेल याबाबत संशय नसावा.

.............................................................................................................................................

साभार - https://madhavdatar.blogspot.com/2020/04/blog-post.html

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......