लेखक जीवन तळेगावकर यांचं ‘साठवणीतील महात्मा’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. जोश प्रकाशनातर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
१.
एखादी गोष्ट जीवापलीकडे जपली जाते, तेव्हा ती साठवणीत जाते. ती अध्येमध्ये आपण मनाच्या कुपीतून उघडण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आठवणींचा मोहोर सोबत घेऊन येते. तो आठव आपल्यात ऊर्जा भरून जातो, नवी प्रेरणा देऊन जातो, तसेच तरुणांच्या चैतन्याने भारलेल्या भारतात गांधीजींच्या अमीट विचारांचे व्हावे म्हणून, ‘साठवणीतील महात्मा!’
स्वातंत्र्य मिळून या देशाची साठीच काय सत्तरी उलटून गेली. ते मिळवण्यासाठी जे झटले ते साठवणीत गेले खरे, पण देशाच्या एकसंध मानसाच्या संभूतीत नव्हे, तर जातिपातीत विभागल्या असंभूतीत. त्यांचा आठव जयंती-पुण्यतिथीनिमित्ताने होतो, पण त्या त्या समाजाचे प्रतिनिधी म्हणून अधिक आणि राष्ट्रपुरुष म्हणून कमी. कुसुमाग्रजांनी एका कवितेतून ही परिस्थितीची विदारकता रेखाटली आहे-
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!
आता, सरकारी कचेऱ्यांतील कर्मचारी तरी भाग्यवान म्हणावे लागतील, ज्यांना रोज गांधीजी दिसतात तरी, खासगी क्षेत्रात तेही नाही. त्यामुळे त्यांच्या विचारांचे दर्शन नाही; मग ते आचारात उतरवण्याची उर्मी कशी मिळावी, अजून चलनी नोटांवर गांधीजी दिसतात म्हणून देशातील शीर्षस्थ बँकेचे आभारच मानले पाहिजेत.
राहून राहून वाटते की, आज महात्माजी असते तर, माणसांपासून दुरावलेला माणूस पाहून गहिवरले असते. आयुष्यभर ज्या स्वातंत्र्य-समतेसाठी संघर्ष केला, त्याचा परिपाक स्वतंत्र भारतात ‘दाह’ देणाऱ्या वाऱ्यात होईल ही कल्पनाही त्यांना सहन झाली नसती. मग प्रत्यक्ष ते वारे अंगावर घेऊन ते कुडकुडले असते. स्वातंत्र्यासाठी ‘बुध्याची’ स्वीकारलेले ‘भक्तीयोगा’चे वाण आपल्याला इप्सित देवून गेले, ‘स्वराज्याचे लेणे’ साकारले', या समाधानातील भ्रांत त्यांना जाणवली असती, कारण ती जाणवण्यासाठी आवश्यक असणारा ‘विवेक’ त्यांच्या ठायी होता. त्यांना ‘महात्मा’ हे आदरयुक्त संबोधन वापरण्यास विरोध करणाऱ्यांपासून ते त्यांच्या विचारांतील ‘महात्म्य’ न ओळखता त्यांना मखरात बसवून त्यांच्या नावाने राज्यकारभार चालवणाऱ्यांपर्यंत झालेला प्रवास त्यांना दिसला असता, कदाचित परकी सत्ता वाहूनही ज्यांचा कणा मोडला नाही ते ‘महात्मा’ नव्या भारताच्या उभारणीला पुन्हा सज्ज झाले असते, अंतर्मुख होऊन!
आयुष्यभर मानवाच्या उत्थानाचा विचार करताना ‘त्याच्या असण्याचे नेमके फलित कशात आहे’, यासारख्या मूलभूत प्रश्नांच्या उत्तरशोधार्थ जनमानस ढवळून कालातीत ‘विचारमौक्तिकं’ बहाल करणारे ‘महात्मा’ पुन्हा एकवार वळून ‘कुठे चुकले नेमके’ या प्रश्नाने काही काळ तरी भंडावून गेले असते, ‘पुनश्च: हरिओम’ करण्याआधी, हे मात्र निश्चित!
आता, त्यांच्या विचारांचा यज्ञ मांडण्याची ‘जबाबदारी’, ‘आपल्या चिमुकल्यांना उद्याचा सुंदर भारत आणि सुंदर जगत लाभावे’, असे ज्यांना वाटते; त्या सर्वांची आहे, त्यांच्या ‘अ-जर’ विचारांच्या मुशीतून उभा राहिलेले; राहणारे कार्य उद्याच्या भारताला आणि जगाला दिशादर्शक ठरले आहे; ठरणार आहे.
एक सामान्य माणूस; ज्याचे असणे एवढे इतरांत मिसळल्यासारखे होते; की त्याच्या अस्तित्वाची जाणीवच होऊ नये; एवढ्या अनामिकतेतून ज्यांच्या केवळ असण्याची जाणीव जगभरातील न्याय्य हक्कांसाठी उभ्या चळवळींना मार्गदर्शक ठरते; त्यांच्या हयातीत आणि नंतरही, हे विचारांच्या कालातीततेचे यश गांधीजींच्या कार्यप्रवणतेमध्ये पण आहे, ते केवळ खुर्ची उबवणारे विचारक नव्हते तर लोकांसोबत; लोकांसाठी राबणारे कार्यकर्ते होते, विचारांना आचारांत उरतवण्याची अंतःस्थ शक्ती त्यांच्या ठायी होती, हे हाती घेतलेल्या कार्याप्रती बाळगलेले झपाटलेपण कमावण्यासाठी लोकांचे प्रेम कमवावे लागते; त्यासाठी संघर्ष करावा लागतो; मनाने आणि तनाने थकून चालत नाही; आयुष्याच्या खडतर प्रवासात उद्विग्न करणारे क्षण त्यांच्याही वाट्याला आले पण त्यांच्यातील विजिगीषेने त्यावर मात केली, ही असामान्य ऊर्जा त्यांना जनतेने प्रदान केली, त्यांच्या कार्याची पराकोटीची प्रशंसा आणि पराकोटीचा द्वेष करणारे त्यांना विचलित करू शकले नाहीत, हे त्यांच्या सामान्यत्वापासून असामान्यत्वाकडे झालेल्या प्रवासाचे गमक आहे.
हा त्यांचा प्रवास सर्वांना सामावून घेणारा होता, त्यात एखादा विकलांग म्हणून त्याचा हात झटकण्याची वृत्ती नव्हती, म्हणून आपलेपणा होता, ‘दाखवायचे आणि खायचे’ दोन वेगळे दात नव्हते, जे होतं ते ‘लख्खं’, सर्वांसमक्ष, अ-बेगडी, म्हणून विश्वासाचा धागा होता, लोकांमध्ये आणि लोक-नेत्यांमध्ये असावा असा!
२.
‘यू आर द मेसेज’ नावाचे रॉजर एल्स यांचे पुस्तक आहे. जागतिक नेत्याने आपल्या कृतीतून कमावलेल्या अनुभवाच्या शिदोरीवरून आपले विचार स्थिर करावेत आणि मग लोकांशी संवाद साधावा, म्हणजे ते लोकांना पटतात, कारण ते विचार म्हणजे ती व्यक्तीच असते, अशा अर्थाने ऊहापोह केला आहे. ‘बी द चेंज यू विश टू सी’, असे गांधीजी म्हणाले होते, त्यामागे असेच तत्त्वज्ञान कार्यरत होते. आपले विचार आपल्या अनुभवाच्या कसोटीवर पारखून घेऊन नंतर ते प्रसृत करण्यामागील प्रयोगप्रियता गांधीजींकडे होती, म्हणून ते जनमानसाची नाडीपरीक्षा करू शकले. त्यांच्या विचारांना देश-सीमेचे; संस्कृतीचे बंधन राहिले नाही, कारण समाजमनाची गुणसूत्रं त्यांनी नेमकी ओळखली होती. म्हणून हे ‘महात्मा’ जगाच्या पाठीवरील ‘मानवी हक्कांच्या चळवळींचे’ प्रेरणास्थान बनले.
देशाबाहेर आपल्या राष्ट्रनेत्याचा होत असलेला सन्मान आपल्याला कायम चैतन्य प्रदान करत असतो, आणि त्यांच्या विचारांतून स्फूर्ती घेण्याची आठवण देत असतो, या कामी ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदे'ने मोलाची भूमिका वठवली आहे. बराक ओबामा दुसऱ्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून कृष्णवर्णीयांचा वर्णद्वेषाविरुद्धच्या चळवळीचा इतिहास जगभरात नव्याने चर्चेत आला. त्यातून अटलांटा येथील ‘मार्टिन ल्यूथर किंग ज्यु. यांचे स्मारक’ जगभरासाठी पुन्हा जिवंत झाले. ते आपण पाहतो तेव्हा जाणवते, ‘आय हॅव ए ड्रीम’ या भाषणातून अमेरिकेतील समाजमानस ढवळून काढणारा हा नेतादेखील आपल्या कार्याला गांधीजींच्या विचारांची ऊब आहे, हे मान्य करतो. ‘सविनय कायदेभंगा’चे पाठ किंग यांनी हेन्री डेव्हिड थोरो यांच्या विचारांतून घेतले असले तरी त्याचे प्रात्यक्षिक गांधीजींच्या अहिंसात्मक, सत्य व मानव-मूल्याधारित लढ्यातून उचलले होते, त्यांचे एक वाक्य आहे, ‘Gandhi was inevitable. If humanity is to progress, Gandhi is inescapable. He lived, thought and acted, inspired by the vision of humanity evolving toward a world of peace and harmony. We may ignore Gandhi at our own risk.’
हातात एक बाळ खेळवणाऱ्या कृष्णवर्णीय अमेरिकन माणसाचा पुतळा या स्मारकाच्या प्रवेशद्वारापाशी आहे, तसेच महात्मा गांधींजींचा प्रेरणादायी पूर्ण-पुतळा आहे. या स्मारकात, ‘किंग अँड द महात्मा’ नावाचे एक प्रशस्त दालनही आहे. त्यात गांधीजींच्या आठवणी जतन केल्या आहेत, ‘अन टू धिस लास्ट’ हे गांधीजींना ‘सर्वोदया’ची प्रेरणा देणारं जॉन रस्किन यांचं पुस्तक तिथं दिसतं. ‘It is no longer a choice, my friends, between violence and nonviolence. It is either nonviolence or nonexistence.’ म्हणणारा किंग आपल्याला अंतर्मुख करतो.
अशाच आठवणी साऊथ आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथील ‘नेल्सन मंडेला स्क्वेअर’मध्ये लार्जर-दॅन-लाईफ पुतळा पाहून मनात घर करून राहतात. दक्षिण आफ्रिकेत रंगभेदाविरुद्ध अहिंसात्मक लढा सुरू केल्यामुळे ‘Prisoner 46664’ यांना २७ वर्षांचा कारावास भोगावा लागला, ते नेल्सन मंडेला सुटका झाल्यावर म्हणाले, ‘I went on holiday for 27 years’. प्रदीर्घ सश्रम एकांतवास भोगूनही सकारात्मक राहण्याची ऊर्जा या असाधारण पुरुषांना लोकोत्तर चरित्रांतून मिळत असते, त्यांच्या मनात अखंड यज्ञ पेटलेला असतो, लाखो लोकांच्या आयुष्यात नंदनवन फुलवण्याचा, मग त्यांना त्या स्वप्नांसमोर स्वतःची दुःख हलकी वाटू लागतात, इतकी की, मुलाच्या प्रेतयात्रेत सामील होण्याचा त्यांचा विंनती अर्ज फेटाळला जाऊनही ती माणसं आपला अहिंसेचा मार्ग सोडत नाहीत, हे असामान्य धाडस नव्हे काय?
दक्षिण आफ्रिकेत डर्बन येथे देखील महात्माजींचे स्मारक आहे, तसे ते आता जगाच्या पाठीवर कित्येक देशांत आहे, ऐतिहासिक ठेवी कोणाही भारतीयानं अभिमानानं पाहाव्यात अशाच आहेत, कारण मानवाच्या कल्याणाच्या वैश्विक विचारांवर कोण्या एका देशाचा हक्क असत नाही, अशी माणसं आणि त्यांचे विचार सर्वांच्या ‘स्व’ आणि ‘समाजो’न्नती साठी असतात.
दुर्मीळ ऐतिहासिक ठेवा जसा वर्तमानाला दिशा देतो, तसे भविष्याला पण प्रेरणादायी ठरत असतो, त्याचे मूल्य जर जाणवले नाही, तर त्यात आपणच आपल्या भावी पिढ्यांचे नुकसान करत असतो. जगभरात बहुतेक सुसंस्कृत ठिकणी संग्रहालये आपलेपणाने सांभाळली जातात, भारतात मात्र आपण समृद्ध वारसा श्रद्धेने जपत नाही, असाच सार्वत्रिक अनुभव येतो, मग ते जयपूरचे ‘अल्बर्ट म्यूझियम’ असो, हैद्राबाद मधील ‘सालारजंग’ किंवा दिल्लीतील भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना मिळालेला ‘भारतरत्न’सारखा सुवर्णमंडित वारसा धुळीच्या पुटींतून दाखवणारं ‘राष्ट्रीय संग्रहालय’, काही संग्रहालयं अपवाद आहेत ती त्यांच्याकडून इतरांनी शिकण्याची आवश्यकता अधोरेखित करत. विचारांचा वारसा पण असाच दुर्लक्षिला जातो, अमेरिकेपासून आफ्रिकेपर्यंत बदल घडवून आणणारा गांधीजींचा ‘अहिंसात्मक सत्याग्रह’ आज त्यांच्याच देशात पूजला जात नाही, त्याचा पुरावा करणाऱ्यांची खिल्ली उडवली जाते, ही परंपरा जपणाऱ्यांच्या माथी उलट दोष चिकटवले जातात, ही वृत्ती मानवतेचा विचार करणाऱ्यांना विमनस्क करते.
इटलीच्या वास्तव्यात ‘वोडाफोन’ या दूरसंचार कंपनीची नेहमी दिसणारी एक जाहिरात कायम स्मृतीत राहिली, त्यात महात्मा गांधी व्याख्यान देत आहेत आणि त्यांच्या विचाराने आफ्रिका, भारत आणि अमेरिका बदलत आहे; गुलामीचे जोखड तुटंत चालले आहेत; लोक न्याय्य हक्कांबद्दल जागृत होत आहेत, असे दाखवले आहे. नंतर खाली एक टॅगलाईन येते – ‘आम्ही त्यावेळी जगभर पसरलेल्या दूरसंचार जाळ्यानिशी अस्तित्वात असतो, तर या महात्म्याची वाणी किती लवकर जगभरात पसरवली असती, सारं जगंच प्रकाशाच्या दिशेने अग्रेसर झालं असतं.’ मोठ्यांचं मोठेपण समजून घेण्यासाठी अंतःकरण ‘विमल’ करणे आवश्यक आहे, म्हणजे आपण धुळीची पुटं दूर सारू शकू.
रेखाचित्रं - प्रमोद दिवेकर
३.
गंगाधर गाडगीळ भाषेच्या बाबतीत म्हणतात, ‘सोपेपणा हा न्यूनाचा निदर्शक आहे, साधेपणा नाही.’ जीवनाच्या बाबतीत महात्माजींचे तसे होते, ‘साधे’ जीवन; ‘सोपे’ नव्हे. आजही गांधीनगरला साबरमती आश्रम पाहिला की, त्यांच्या राहणीतील साधेपणाचे दर्शन होते. साबरमती नदीच्या रम्य काठावर त्यांनी लहानसा आश्रम उभारला होता. तिथे ‘स्वावलंबना’चा पाठ देणारा चरखा, ‘स्वच्छता’ दर्शवणारी छोटी बैठक, ‘अपरिग्रहा’चा धडा देणारे आवश्यक तेवढ्याच गोष्टी असलेले नीटस स्वयंपाकघर, बाहेर आचार्य विनोबा भावे; ‘भूदान चळवळी’चे प्रवर्तक आणि १९४० मधील वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही; पुढे वर्ध्याच्या 'सेवाग्राम' आश्रमाची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली; त्यांची खोली इ. गोष्टी आजही प्रेरणा देतात.
आताशा तिथे आत प्रवेशताना मार्गात नव्याने काही फोटो व अवतरणे लावली आहेत, पण मूळ निवासस्थान बव्हंशी पूर्वीसारखेच जपले आहे. गांधीजी हातसडीचे तांदूळ आणि बकरीचे दूध घेत, ते पथ्य त्यांच्या प्रवासादरम्यान प्रत्येक वेळी सांभाळणे, ‘साधे’ असले तरी ‘सोपे’ नव्हते, म्हणून त्यांच्या सहकारी सरोजिनी नायडू एके ठिकाणी विनोदाने, ‘Do you know how much it costs every day to keep you in poverty?’ म्हटल्याची नोंद आहे. प्रयोगशील गांधींनी याची जाणीव ठेवून नक्कीच स्वभावपरिवर्तन केलं असेल आणि या विनोदावर खळखळून निर्व्याज मनाने हसलेही असतील.
गांधीजींच्या ठायी असलेल्या सामान्यपणामुळे, त्यांच्या असण्याचे ओझे कार्यकर्त्यांना जाणवत नसावे, संवादात मोकळेपणा असावा, असे मानण्यास जागा आहे, म्हणून तर ‘बापू’ या सामान्यनामाला गांधीजींमुळे विशेषनामाची उपाधी प्राप्त झाली. ‘बापू’ या संबोधनाने जो जिव्हाळ्याचा भाव पाझरला तोच ओतप्रोत गांधीजींच्या विचारांत भरुन आहे, व्यक्तीसाठी, समाजासाठी, देशासाठी, जगतासाठी, पर्यावरणासाठी, सर्वत्र अगदी सर्वांठायी असा. ‘साधे’पणा हा गुण त्यांच्या वागण्यात, बोलण्यात, राहण्यात, असण्यात सर्वत्र होता, हा निरहंकारी स्वभावच त्यांना जनमानसात प्रिय करुन गेला. ‘आत्ममग्न’ असतानाच ‘बहिर्मुख’ता जपणारी त्यांची दृष्टी त्यांना 'स्थितप्रज्ञ' 'राजकारणी' (क्रांतदर्शी) बनवून गेली. हे दोन शब्द त्यांच्या व्यकिमत्वात एकत्र आले होते अन्यथा ते विरूद्धार्थीच वाटावेत इतके भिन्न वाटतात हल्लीच्या राजकारण्यांच्या संदर्भात.
‘स्टेट्समन’ने ‘व्हिजनरी’ असणे राजकारणाच्या दृष्टीने फार आवश्यक असते, हा नेतृत्व-गुण अंगी बाळगणे व विकसित करणे ही जागतिक पातळीवर यशस्वी होण्यासाठीची गुरुकिल्ली समजली जाते, अशा नेत्याने, ‘लोकांना ते जेथे आहेत तेथून त्यांनी जेथे असणे योग्य तेथे न्यायचे असते’, उलट गांधींना केवळ ‘दूरदर्शि’तेच्या चौकटीत बसविणे त्यांच्यावर अन्याय करणारे ठरावे एवढे त्यांचे कर्तृत्व मोठे होते, राजकारणातील काही निकष ज्यांच्यामुळे घडवले गेले ते महात्माजी या क्षेत्रांतील अध्वर्युंपैकी एक होत, हे मात्र निश्चित. आजही जनसामान्यांची नस (पल्स) पकडता येणे; ही सत्ताकेंद्री राजकारणात सहज साध्य न होणारी गोष्ट त्यांना जमली होती; नव्हे ती अंतरी होती अशी की तिचे आडंबर माजविले गेले नाही आणि म्हणून तीत सहजता दिसली.
४.
गांधीजी त्यांच्या आयुष्यातील तीन वर्ष ब्रिटनमध्ये आणि २१ वर्ष साऊथ आफ्रिकेत राहिले, सगळा भारत देश ते फिरले, ‘उदारमतवादा’चे आणि ‘वसाहतवादा’चे वारे त्यांनी ओतप्रोत अनुभवले, या सगळ्या काळात ते वाचते आणि लिहिते राहिले, त्यांनी जगभरातील तत्त्वज्ञांचा अभ्यास करून आपली मतं पक्की केली. ते जसे दो-करांनी घेत राहिले, तसेच अनंत-करांनी देत राहिले. या काळात त्यांचे मानस विचारांची एक प्रयोगशाळाच होऊन राहिले होते. आजच्या जागतिक व्यापारयुगात जगभरात फिरणारे; वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असणारे तरुण पाहिले, की, त्यांनी गांधीजींकडून; जागतिक घडामोडींतून कायम शिकण्याचा ध्यास आणि आजूबाजूला जे घडते आहे त्याची डोळसपणे मीमांसा करणारी वृत्ती घेतली पाहिजे, असे वाटते. याशिवाय कित्येक निर्णयांच्या क्षणी एकटे पडल्याचा अनुभव त्यांना आला असतानाही ते यशस्वीपणे मार्ग काढत राहिले. आजही प्रत्येकालाच आपापल्या क्षेत्रांत वाटाघाटी कराव्या लागतात, प्रत्येक वेळी परिस्थिती अनुकूल असतेच असे नाही; बहुधा नसतेच; तरीही सकारात्मक दृष्टिकोनातून वाटाघाटी केल्यास मार्ग दिसू लागतो आणि बोलणी यशस्वी होतात; प्रसंगी मतांची देवाण-घेवाण करावी लागते; त्यासाठी आवश्यक अशी लवचीकता गांधीजी आजच्या व्यवस्थापकांना शिकवतात, आणि देतात ते नीतिशास्त्राचे अनुभवजन्य पाठ, अशा वेळी, ‘प्रत्येकालाच एक माणूस म्हणून विचारांचा ‘समानाधिकार’ (Egalitarian doctrine) आहे’, या गुणसूत्रावर श्रद्धा असावी लागते.
एन. आर. नारायणमूर्ती यांनी ‘ए बेटर इंडिया ए बेटर वर्ल्ड’ नावाच्या पुस्तकात ‘सीईओ, मुख्य कार्यकारी अधिकारी’ होण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गुणांची यादीच दिली आहे, पण त्यातील सर्वात महत्त्वाचा निकष कोणता हे ठरवताना मात्र ‘धैर्य’ (Courage), असे उत्तर दिले आहे. का? तर बाकीच्या गुणांचा प्रत्यय येण्यासाठी आधी अंगी बोलण्याचे ‘धैर्य’ पाहिजे. मग, खासगी क्षेत्रात ‘धैर्य’ एवढे महत्त्वाचे तर सार्वजनिक जीवनात/ राजकारणात ते किती महत्त्वाचे असते, याचा वेगळा ऊहापोह करायची गरज पडू नये.
गांधींजींची ‘धैर्या’ची व्याख्या भगवद्गीतेच्या, जैन आणि बौद्ध धर्मांच्या तत्त्वज्ञानातून अंकुरलेली होती. सत्याग्रहाचे त्यांना अपेक्षित स्वरूप हे धैर्याचे उदाहरण आहे. त्याला कोणी ‘पॅसिव्ह रेसिस्टन्स’ म्हटले तरी, अन्याय करणाऱ्याचा न्याय्य मार्गाने अहिंसात्मक विरोध करणे, हे असामान्य धैर्याचे द्योतक आहे. याही पुढे जाऊन ते म्हणतात, ‘The weak can never forgive. Forgiveness is the attribute of the strong.’ असे निकष घालून देणारा नीतीच्या मुशीतून दृगोचर होणारा त्यांचा ‘साहसवाद’ हा त्यांच्यातील ‘आत्ममग्न योग्याचे’ व ‘बहिर्मुख, दूरदर्शी राजकारण्याचे’ वैशिष्ट्य होते.
‘समाजाभिमुखता’ जपताना ‘आत्मसंयम’ सांभाळणे हे दोन ध्रुवांमधील सुवर्णमध्य साधण्यासारखे आहे, ते त्यांनी कृतीतून दाखवले. त्यांच्या व्यक्तिमत्वाची व्याप्ती स्वतःपलीकडे विचार करून सामान्य कार्यकर्त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर नैतिक अधिष्ठानाचे पैलू पडणारी होती. ‘साधनाची नाही शुचिता साधण्यातच धन्यता’, हे त्यांच्या वैचारिक कसोटीस उतरणारे नव्हते. ‘Means are as important as ends’, असे त्यांचे विचार.
कदाचित दुसऱ्या ‘गोलमेज परिषदे’त भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची फाशी रद्द करण्यात यावी, अशी अट नि:संकोचपणे न समाविष्ट करण्यामागे ही त्यांची वैचारिक भूमिका आडवी आली असावी. त्यामुळे आजही त्यांना आरोपित करण्यात येते, त्यांना खासगीत ‘माय वे इज हाय वे’, मानणारा नेता संबोधले जाते, पण त्यांच्या राजकारणी व्यक्तिमत्त्वामागील नैतिक अधिष्ठानाचा सूक्ष्म विचार होत नाही, दृष्टीपथातील ‘तारा’ जरी एकच असला तरी तेथपर्यंत पोचण्यासाठी फक्त ‘अहिंसे’चाच मार्ग त्यांना मान्य होता व तो ‘सत्या’चाच असला पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. त्याला ‘सत्याग्रह’ हे सामान्यांना समजणारे रूप त्यांनी दिले होते.
समाजकारणात मानवतेचा पाठ घालून देणारे, ‘सर्वभूतहितेरत’ होऊन, ‘हे विश्वचि माझे घर’ मानून ‘खळांची व्यंकटी सांडो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात’ या परंपरेचे पाईक असतात. सर्व जगतासाठी ‘नात्मार्थं नापि कामार्थं अथ भूतदयांप्रति’ या भावनेतून त्यांचे विचार पाझरत असतात म्हणून त्यांना धर्माच्या चौकटीत जखडायचे नसते आणि ‘स्वातंत्र्य’ हा एक संकल्प प्राप्त केल्यावर देशाच्याही, कारण अशी माणसे अवघ्या मानवजातीसाठी असतात. त्यांना भाषा, देश, धर्माच्या सीमा नसतात.
‘महात्मा गांधी मुस्लिम धार्जिणे होते’ किंवा त्यांना ‘देशासाठी संरक्षक फौज तयार करण्याची गरज भासली नाही’ किंवा ‘त्यांना मोठे उद्योगधंदे नको होते’, अशा प्रकारे गांधीजींचे विचारवैभव चंद्राप्रमाणे अंशत: आरोपित होते, अशा वेळी गांधीजी आपल्याला जेवढे कळतात, त्यापेक्षा जास्त कळलेले नसतात.
‘किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू’ या रशियन तत्त्ववेत्ता ल्येव तल्स्तोय यांच्या पुस्तकाच्या, तसेच ‘तदन्तरस्य सर्वस्य’ (ईश्वर अंतर्यामी आहे) या ‘ईशा’ मंत्राच्या प्रेरणेचा त्यांच्या मानसावर प्रभाव असतो. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर जरी ते अजून १० वर्षे राहते, तरी ‘समाजकारण’ आणि ‘अध्यात्माला’ वाहून घेते, असे म्हणण्यास जागा आहे. त्यांच्यापुरते त्यांचे अल्प-राजकीय-अवतारकार्य स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संपले होते. राजकीय नीतिमत्तेचे नवे जागतिक निकष घालून देणारे ‘महात्मा’ कदाचित पुढच्या राजकीय वाटचालीत विसंगत ठरते.
५.
गांधीजींच्या तत्त्वज्ञानात ‘भक्तीयोगा’चा व्यक्तिनिष्ठ व समाजनिष्ठ आविष्कार आहे. लो. टिळकांच्या तत्त्वज्ञानात ‘निष्काम कर्मयोगा’चा असा आविष्कार आढळतो. दोघांनीही एकाच गीतेतून एकमेकांपेक्षा वेगळे अर्थ आणि मार्ग निवडले, पण त्यांचे ध्येय एकच होते. गांधींनी गीतेतील ‘भक्ती’ निवडली तर टिळकांनी ‘कर्तव्यपरायणता’. राजकारणाच्या कुरुक्षेत्रावर गांधी यामुळे ‘युधिष्ठिर’ ठरतात तर टिळक ‘अर्जुन’. गांधीजींचा ‘भक्तीयोग’ केवळ आत्मनिष्ठ होता असे म्हणण्याचे धाडस कोणी करणार नाही. तसे असते तर अहिंसा, सत्याग्रह, स्वावलंबन, स्वदेशी, साध्य-साधन-काळ विवेक, विश्वस्तता, सविनय कायदेभंग, असहकार, स्पर्शभावना, शारीरिक-श्रम, प्रयोगशीलता, कार्यानुभव, रोजगाराभिमुख शिक्षण, असंग्रह, अस्तेय, समदृष्टी, निर्भयता, ग्राहककेंद्रित्व, स्वयंपूर्णता या व्यक्तिनिष्ठ विचारांना समाजनिष्ठ रूप देण्यापर्यंत, किंबहुना जनमानसात रुजवण्यापर्यंत ते यशस्वी ठरले नसते. त्यांचे जीवन व विचारवैभव एक गाथा होऊन राहिली आहे, तिची गुंफण उलगडण्यासाठी सम्यक दृष्टीने विचार करणाऱ्या विमल अंत:करणाच्या विवेकशील बुध्दीनिष्ठांची आवश्यकता असते, म्हणून ‘नेति नेति’ हा भाव स्वीकारणे ‘नेमके काय’ हे सांगण्यापेक्षा जास्त सोयीचे ठरते.
‘बृहदारण्यकोपनिषदा’त ‘वाक् ब्रह्म’, ‘कर्ण ब्रह्म’, ‘नेत्र ब्रह्म’, असा उल्लेख आहे. यावरूनच महात्मा गांधींनी ‘बुरा मत कहो, बुरा मत सुनो, बुरा मत देखो’ असा संदेश प्रसृत केला असावा असे वाटते. ‘बुरा मत सुनो, बुरा मत देखो’, हा भाव ‘मांडूक्योपनिषदा’च्या शांतीपाठातही आला आहे. ‘ॐ भद्रं कर्णेभि: श्रुणुयाम देवा: भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा:’ अर्थात हा संदेश आपण रोजच्या जीवनात किती पाळतो, याचा ज्याचा त्याने प्रामाणिकपणे विचार करावा.
इंग्लंडमध्ये सर एडविन अरनॉल्ड भगवद्गीतेला ‘Song Celestial’ म्हणायचे. गांधीजींनी गीतापाठ प्रथम तिथे केला, नंतर ती त्यांच्या विचार आणि आचारविश्वात सामावली. नीतीमत्तेच्या बाबतीत गांधीजी सार्वजनिक जीवनातील आदर्श ठरले. परमेश्वराने सांगितलेला दहाव्या अध्यायातील ‘विभूतियोग’ विलक्षण सुखावणारा आहे. यात भगवंताने आपली ‘विभूति’ कशाकशात आहे, हे सांगण्यासाठी ‘सर्वोत्तमभावा’चा (Superlatives) वापर केला आहे. उदा. ‘ब्रह्मर्षींत मी नारद, स्थविरांत मी हिमालय, महिन्यांत मी मार्गशीर्ष, ऋतूंत मी वसंत इ. आज भगवंताने जर गीतेची पुरवणी काढली तर, ‘राजनीतीज्ञात मी कोण?’ याचे उत्तर ‘गांधी’ असेच दिले असते. उगाच आइनस्टाइनसारखा वैज्ञानिक म्हणत नाही, ‘Generations to come, it may well be, will scarce believe that such a man as this one ever in flesh and blood walked upon this earth.’
जीवन समृद्ध करण्यासाठी स्थानिकांच्या सांस्कृतिक; आर्थिक मूल्यांचा अंगीकार शिक्षणात व्हावा, असे त्यांचे मत होते. शिक्षण हे हातांना काम मिळवून देणारे असले पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असे. आजचे ‘स्किल इंडिया’ हे ‘भाग्यविस्तारस्तुपा’च्या तळाशी (ग्रोथ-‘एट द बॉटम ऑफ द पिरॅमिड’) असणाऱ्यांसाठी कदाचित त्या दृष्टीने उचललेले पाऊल म्हटले पाहिजे. त्यांचा कल ‘गुरुकुल शिक्षणपद्धती’कडे होता, गुरुदेव रविंद्रनाथ टागोर शिक्षणव्यवस्थेसंदर्भात याच विचारांचे होते, तसेच स्वामी श्रद्धानंद, योगी अरविंद, याचा अर्थ इंग्रजी शिक्षणाला विरोध, असा होत नाही. शिक्षण इंग्रजी पद्धतीने दिले जावे असा विचार बळावत असताना, त्यातील अंतर हेरून स्थानिकांची मूल्यं सुरक्षित कशी राहतील यादृष्टीने त्यांचे विचारमंथन होते. राजा राममोहन रॉय, लो. टिळक, गो. ग. आगरकर, लाला लाजपतराय किंवा पंडित नेहरु हे मात्र रूग्रजी शिक्षणपद्धतीचे पुरस्कर्ते होते. मैथिलीशरण गुप्त ‘भारत भारती’ या काव्यसंग्रहात एके ठिकाणी गरुकुल शिक्षणपद्धतीचे वर्णन करताना म्हणतात, ‘पढते सहस्त्रों शिष्य थे पर फीस ली जाती नही। वह उच्च शिक्षा तुच्छ धन पर बेच दी जाती नही।। दे अन्न वस्त्र भी स्वयं कुलपती पढाते थे उन्हे। बस भक्ती में संतुष्ट हो दिन दिन बढाते थे उन्हे।।’
आज ‘शिक्षण’ आणि ‘रोजगार’ यांचा परस्परसंबंध उणावत जाताना पाहिला की, गांधीजींचे मत अधिक बरोबर होते. त्याला नव्या भारतात अजून व्यापक स्वरूप देता आले असते, असे वाटते. साधे उदाहरण म्हणजे, एकूणच आपली नवी पिढी गणित विषयात हवी तशी प्रगती करताना दिसत नाही. ज्या देशाने जगताला गणिताचे पाठ दिले; ‘शून्य’, ‘पाय’चे मूल्य दिले, तिथे ही अवस्था अनाकलनीय आहे. संस्कारक्षम वयात मुलांची प्रगती भारतापेक्षा पाश्चिमात्य व पौरस्त्य देशांत अधिक होते. त्यांची विषयाच्या अवगाहनाची आणि चहूबाजूंनी विचार करण्याची क्षमता बळावते; कारण शिक्षण मातृभाषेत आणि स्थानिक पद्धतीने दिले जाते, असे ‘प्रथम’सारख्या काही स्वयंसेवी संस्थांनी अभ्यासाद्वारे दाखवलेही आहे. हे अनुभवल्यावर, कदाचित भारतीय मानसाची, समाजव्यवस्थेची, अर्थशक्तीची, संस्कृतीची गांधीजींची ओळख अधिक सत्यस्पर्शी होती, असे मानावयास जागा आहे.
६.
आज आपण ‘स्मार्ट सिटी’ बनवतोय पण ‘स्वयंपूर्ण खेडे’ वा ‘ग्रामस्वराज’ ही मूळ कल्पना गांधीजींचीच. भारत हा खेड्यात वसणारा देश आहे. प्रत्येक खेडे ही स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था असली पाहिजे हा त्यामागील मूलभूत विचार. माणसाच्या कमीत कमी गरजा ध्यानात घेतल्या की, त्याच्या मानसिक समाधानाच्या दृष्टीने ही फार चांगली कल्पना आहे, पण अडचण येते ‘अर्थ आणि काम’ बळावू लागतात तेव्हा. न संपणाऱ्या एषणांच्या मागे माणूस धावतो तेव्हा तो इष्टानिष्टाच्या चक्रव्यूहात अडकत जातो. आज करोनासारखा एखादा ज्वर माणसाला पुन्हा गांधीजींच्या मूलभूत विचारांकडे वळण्यास प्रवृत्त करतो आहे, त्यांच्या प्रत्येक विचाराच्या मुळाशी साधेपणाची अपेक्षा आहे, हे विसरता नये. आज ‘स्वच्छ भारत मिशन’द्वारे आपण अशाच एका गांधीविचाराला नव्याने रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.
‘ईशावास्य’ उपनिषदात शांतीपाठानंतरचा पहिलाच मंत्र, ‘तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृध: कस्यस्विद् धनम्’ (ईश्वराच्या या जगताचा त्यागपूर्वक उपभोग घे, कोणाच्याही धनाची अभिलाषा धरू नकोस), असा आहे. याचा सार्वजनिक जीवनातील वस्तूपाठच जणू महात्मा गांधींनी घालून दिला. ‘A seditious half naked fakir’ असे विस्न्टन चर्चिल कुत्सितपणे म्हणाले असले तरी तोकडे कपडे घालून राहणे, त्यातून भारतीयांच्या दशेचे संकेतात्मक प्रकटीकरण करणे, हे येरागबाळ्याचे काम नव्हतेच मुळी. प्रचंड इच्छाशक्ती व तत्त्वांवरचा विश्वास यासाठी आवश्यक होता, जनमानसात लाभलेल्या तरणभावाचा (buoyancy) गांधीजींनी त्यागपूर्वक उपभोग घेतला. ‘One needs to be slow to form convictions, but once formed they must be defended against the heaviest odds’, एकदा मनाने घेतले की ते काम तडीस नेणे, ही त्यांची प्रकृतीच बनली. त्यांनी धनाढ्यांना; 'लोकांच्या हितासाठी परमेश्वराने आपणास केवळ ‘विश्वस्त’ बनवले आहे (Custodian of Wealth/ Trustee), या उदात्त भावनेतून वागा’, असा संदेश दिला, मग इतरांचे धन नेता बनून लाटणे तर सोडाच. ‘Crime is only the retail department of what, in wholesale, we call penal law', असे जॉर्ज बर्नार्ड शॉ सार्वजनिक अपहाराबद्दल व्यथित होऊन म्हणाले होते. आज मूल्यांपासून दूर गेल्यामुळे याचे प्रत्यंतर जगभरात येते आहे.
गांधीजींनी काळ-वेळेच्या पलीकडील नीतिशास्त्राशी संबंधित शाश्वत अमान्य असावेत असे सात दुर्गुण सांगितले आहेत, जसे, घामाशिवाय संपत्ती (Wealth without Work), विवेकाशिवाय सुख (Pleasure without Conscience), चारित्र्याशिवाय ज्ञान (Knowledge without Character), नीतीशिवाय उद्योग (Commerce/Business without Morality/Ethics), मानवतेशिवाय विज्ञान (Science without Humanity), त्यागाशिवाय धर्म (Religion without Sacrifice), तत्त्वाशिवाय राजकारण (Politics without Principle). अशी त्यांची रास्त भूमिका होती. चर्चिल यांच्या याच ‘फकिरा’ने इंग्रजांना मिठाची गुळणी धरून दांडी येथे लोटांगण घालावयास लावले हा इतिहास आहे. ‘आततायीपणा’ विरुद्ध ‘संयम’ असे या दोहोंतील वैचारिक द्वंद्वाकडे पाहावयास हवे. ‘Leaders of wartime are not cherished in peacetime’, हे सत्य दुसऱ्या महायुध्दानंतर लोकांनी क्लेमेंट अॅटली यांना पंतप्रधानपदी निवडून दिले तेव्हा सिद्ध झाले, उलटपक्षी गांधींसारखा ‘शांतीसाठी धडपडणारा’ (Peace Loving) ‘महात्मा’, ‘राष्ट्रपिता’ ठरला.
७.
‘स्वावलंबी बना’ या विषयावर तर लिहावे तेवढे थोडे आहे. भारतीयांपेक्षा अधिक हा मंत्र पाश्चिमात्य जपतात हल्ली असे म्हटल्यास वावगे ठरू नये. घरकामासाठी माणसं ठेवणं पाश्चिमात्य देशांत मनुष्यबळ कमी असल्यामुळे त्यांना परवडणारे नसते तेव्हा, साफसफाई, भांडी, धुणी, स्वयंपाक, गाडी पुसणे, बाजारहाट, बालसंगोपन इ. कामे स्वत:च करावी लागतात. आपल्याकडे अजून स्वावलंबनाचा वारा अंगी भिनायचा आहे. आर्थिक स्तरांमध्ये खूप तफावत असल्याकारणाने कमी पैशात कष्ट विकत घेता येतात. मग एखादी साथ आली की, सगळ्यांचे डोळे खाडकन उघडतात. आपण घरचे काम करताना, आपले ओझे किती वाढवून ठेवले आहे याची अनुभूती येते. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गोष्टी, असे अब्राहम मॅस्लो आपल्या ‘आवश्यकतेच्या पदानुक्रमा’विषयी सांगतो, पण जशी माणसाची आर्थिक उन्नती होत जाते, तसे त्याची आवश्यकता मूलभूत गोष्टींपलीकडे वाढत जाते, मग आपला अवलंब वाढत जातो आणि ओझेही. आपल्याला एक व्यक्ती, एक समाज, एक शहर, एक राष्ट्र म्हणून स्वावलंबी होता आले पाहिजे, म्हणजे इतरांशिवाय आपले काही अडता नये, याची सुरुवात गांधीजी स्वतःपासूनच करायला सांगतात. आणि त्यांनी स्वतःही ते केलंय, म्हणून यास पोकळ तत्त्वज्ञान म्हणता येणार नाही. नेहमी आपल्याला चांगली वेळा हाताशी असताना ‘स्वावलंबना’ची आठवण होत नाही, हे दुर्दैव.
भारतात हरीतक्रांतीची सुरुवात होण्यासाठी सुद्धा काहीतरी वाईट घडावं लागलं. ‘पी-एल ४८०’ अंतर्गत जो गहू अमेरिकेने भारतास स्वातंत्र्यानंतर पुरवला, तो तिथे जनावरांचे खाद्य म्हणून वापरला जात असे. आपण मात्र हापूस, द्राक्ष, संत्री, तांदूळ यातील सगळ्यात छान/उत्तम जे, ते निर्यात करतो, जे उरते ते इथे भारतात खपवतो. मग बाहेरच्या कंपन्यांनी बनवलेला ज्यूस अधिक पैसे देऊन आवडीने पितो. सर्वच क्षेत्रांत कच्चा माल पुरवण्याची आणि पक्का माल आयात करण्याची मानसिकता आता ‘मेक इन इंडिया’अंतर्गत बदलण्यास सुरुवात झाली आहे. आपण आधीच आपल्या वर्तमानाच्या आणि भविष्याच्या गरजा लक्षात घेऊन स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करायला हवी होती. आपण ‘स्वयंपूर्ण खेडी’ निर्माण केली असती तर आज पायाभूत सुविधांवर आणि पर्यावरणावर न संपणारा ताण निर्माण करणारी शहरे फोफावली नसती, महागाई आवाक्याबाहेर वाढली नसती, निदान गरजे पुरत्या वस्तू गावातच बनल्या असत्या, गाव एक ‘स्वयंपूर्ण पारितंत्र’ (Self-Sufficient Ecosystem) म्हणून ओळखले गेले असते.
हा जो ‘हवे-नको’ या वृत्तीचा समतोल आहे तोच गांधीजींच्या उद्योगधंद्याबाबतच्या विचारांत होता. त्यांची वृत्ती सम होती, तिच्यात संयमितपणा होता. आज तोंड पोळल्यावर त्याची जाणीव होते आहे. रत्न म्हणवणारे सरकारी उद्योग मोडीत निघाल्यावर शासनाने खासगी उद्योगधंद्यात उतरण्यामागील फोलपणा जाणवू लागला आहे. उद्योगांचे सरकारीकरण झाले, तेव्हा ते काळाची पाऊले ओळखून केले. रशियाचा प्रभाव समाजवादी विचारसरणीवर सर्वत्र होता, असे जरी मानले, तरी आता तेच चाक उलटे फिरवण्याची गरज भासते आहे. व्यूहात्मक पद्धतीचे म्हणजे संरक्षणासंबंधी व इतर मोजके उद्योग सोडले तर शासनाने खासगी व्यवसायांतून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. याचाच अर्थ आपण आपल्या देशाचे असे दीर्घ मुदतीचे ‘स्वदेशी’ धोरण ठरवण्यात कमी पडलो, हे मान्य करावयास हवे.
भारतीय शहरांतही अजून स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसत नाहीत. ३३ टक्के स्त्रिया पण एखाद्या आस्थापनेत असत नाहीत, याउलट दक्षिण आशियात ७० टक्क्यांवर स्त्रिया काम करतात. स्त्री-शिक्षण आणि सक्षमीकरण ज्या गतीने व्हावयास हवे होते, ते झाले नाही. मग ‘एक माता अवघ्या घरास शहाणे करते’, हे घडायचे कसे? आपल्याकडे पराजय स्वीकारावयास लोक का घाबरतात हेच न उलगडणारं कोडं आहे, हे पण गांधीजी आपल्याला शिकवतात. जेव्हा त्यांची चूक झाली, तेव्हा त्यांनी जाहीरपणे ती मान्य केली. माणूस चुकायचाच, पण म्हणून चुकांपासून शिकायचेच नाही हे अक्षम्य आहे.
शासकीय यंत्रणेत एखाद्यावेळी ‘आमच्याकडून निर्णय घेण्यात व योजना राबवण्यात चूक झाली. आता आम्ही ती सुधारणार आहोत, हा पाहा नवा आराखडा, आणि त्याचे यशस्वी कार्यान्वयन करबनच दाखवू’, असा सूर अळवणारा प्रांजळपणा सार्वजनिक जीवनातून लोपत चालला आहे, चुका लपवण्यात येतात आणि नेमके हेच जनतेचा विश्वास गमवण्यामागचे मूळ कारण ठरते. व्यवहारात प्रामाणिकपणा नसला, कामात कर्तव्यबुद्धी नसली की असे होते. ‘लोकशाही’त चुका करण्याची परवानगी असली पाहिजे आणि त्या मान्य करण्याचे धैर्य ‘Freedom is not worth having if it does not include the freedom to make mistakes.’ या सोबतच गांधीजींनी समाजकारण्यांसाठी सांगितलेली ‘पश्चात्तापा’ची शिक्षा (Penance) आज सोयीस्करपणे विसरण्यात येते.
८.
‘साठवणीतील महात्मा’ जसे जसे प्रकाशात येऊ लागतात, तसे ते तुकोबांपेक्षा ग्यानबांच्या अधिक जवळचे वाटतात. तुकाराम महाराज रोकठोक. ‘दया तिचे नांव भूतांचे पाळण, आणिक निर्दाळण कंटकांचे’ ही त्यांची ‘दयेची’ व्याख्या तर माणसाच्या चांगूलपणावर ज्ञानेश्वर महाराजांचा विश्वास, माऊलीच ती, तेव्हा, ‘खळांची व्यंकटी सांडो’ हा त्यांचा भाव, खळांचा नाश होवो, हा नव्हे. गांधीजींचे असेच. कदाचित यामुळेच आधुनिक भारतात त्यांना ‘मुस्लिम धार्जिणे’ ठरवण्यात आले. माणूस म्हणून चांगल्या व वाईट प्रवृत्ती हिंदू-मुसलमान दोहोंतही आहेत, असतात, त्या प्रवृत्तींचा नाश कसा होईल, यासंबंधी त्यांनी तोडगा सुचवला असता खास, पण या प्रश्नाने जेव्हा रौद्र रूप धारण केले, तेव्हा गांधीजींच्या आयुष्यातील उन्हं उतरणीला लागली होती. त्यांना विशेष वेळ असा मिळाला नाही, या सामाजिक प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी. कारण सामाजिक प्रश्नांची उकल व्हावयास एखाद्या दशकाचा वेळ सहज लागतो, तो त्यांना मिळाला नाही असे प्रामाणिकपणे वाटते. त्यामुळे भारताची रक्तरंजित ‘फाळणी’ त्यांना अपरिहार्यपणे स्वीकारावी लागली आणि ती होण्यास केवळ तेच जबाबदार होते असे नाही.
ही दोन प्रवृत्तींची रस्सीखेच होती. एक, ‘एकसंध’ भारत मागणारी आणि एक ‘द्वि-राष्ट्रवादा’स खतपाणी घालणारी. यात कोणी हरले त्याचा दोष पंचास कसा देता येईल. ‘…लखनौ-कराराच्या पुढे जाण्याची गांधी-नेहरूंची तयारी नव्हती, म्हणून पाकिस्तान अस्तित्वात आले, असा इतिहास आहे’, ‘महात्मा गांधी : काही चिंतन’ या ‘जागर’मधील लेखात नरहर कुरुंदकर गुरुजींनी याविषयी सखोल मौलिक विवेचन केले आहे.
आजच्या गतिशील बाजारव्यवस्थेत या प्रसंगाशी चालकानुमानाने (कंडक्टिव्ह लॉजिक) समानता शोधू गेले तर जाणवते की, एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीला समजा त्यांच्या वस्तू किंवा सेवेची आंतरराष्ट्रीय बाजारातील नेमकी मागणी; पुरवठा किती असेल आणि कोण प्रतिस्पर्धी आहेत वा असतील, याचे जेव्हा अनुसंधान बांधायचे असते, तेव्हा एखाद्या अनुसंधान यंत्रणेसोबत करार केला जातो. ते जो निष्कर्ष पुरवतात तो सगळ्या बाजाराचे पूर्ण मूल्यांकन करून पुरवणे अशक्य असते. तेव्हा केवळ कंपनीच्या व्यवसायाच्या आंतरराष्ट्रीय बाजाराचे महत्त्वानुरूप वर्गीकरण केले जाते. त्यातील काही महत्त्वाच्या विभागांना ‘विवेकपूर्ण नमुना’ (ज्यूडीशिअस सॅम्पल) मानून, त्यातून येणाऱ्या विदेचे (डाटा) विश्लेषण निष्कर्षाप्रत पोचवते.
थोडक्यात अनुसंधान हे ‘शास्त्र’ कमी आणि ‘कला’ जास्त आहे. हा ‘नमुना’ मात्र बाजाराच्या व्यापकतेच्या गुणोत्तरात असावा तेवढे पाहावे लागते. जर ‘गतिशील बाजारव्यवस्थे’त एवढी गुंतागुंत असते, तर जिथे दोन राष्ट्रांच्या उभारणीचा प्रश्न होता, कितीक लोकांच्या जीवीताचा; अस्तित्वाचा प्रश्न होता, तिथे ही रस्सीखेच आणि सामाजिक समीकरणं किती गुंतागुंतीची बनली असतील याचा विचार करावयास हवा. शिवाय ती केवळ दोन ध्रुवांमधील (Bi-polar) सस्सीखेच नव्हती, तर कितीक न दिसणारे ध्रुव (Poles) ती खेचण्यात गुंतले होते हे कसे विसरता येईल? आपण गांधीजींच्या काळावर केवळ नजर टाकली तर विविध विचारांच्या भूमिका वाहणाऱ्या कितीएक सक्षम व्यक्ती आणि त्यांचे कार्य हा धामधुमीचा काळ व्यापून राहिले होते, हे लक्षात येईल, म्हणून केवळ एका व्यक्तीला, जी निर्णय घेण्याच्या स्थानी होती हे ठाऊक असूनसुद्धा, दोषारोपित करणे योग्य नाही.
९.
गांधीजींच्या वाट्याला वैयक्तिक आयुष्यात मुलाकडून (हरिलाल) दु:ख प्राप्त झाले, वडिलांच्या जवळपास पोचण्याएवढेही कर्तृत्व कोणी मुलगा गाजवू शकला नाही. ‘पुत्रात् इच्छेत पराजयम्’ या बाबतीत सुख लाभले नाही तरी त्यांनी सार्वजनिक जीवनातील अग्रेसरत्वास मुरड घातली नाही. गांधीजींच्या वाट्याला ‘असीम प्रेम’ व ‘असीम निंदा’ या दोनही गोष्टी आल्या, पण ‘यस्मिन स्थितो न दु:खेन गुरुणापि विचाल्यते’ याप्रमाणे त्यांचे वर्तन सन्मार्गप्रविष्ट असेच राहिले. आपल्या उद्दिष्टापासून ते विचलित झाले नाहीत. त्यांचे वैयक्तिक आचरणही निष्कलंक (अपापविद्धम्) असेच राहिले. आजची काही नेते मंडळी ‘आपले स्वतःचे वैयक्तिक जीवन आहे, आणि ते समाजजीवनापेक्षा वेगळे असू शकते; तेव्हा त्यांत गल्लत करू नका’, असे सांगून मोकळी होतात. हा अगोचरपणा गांधीजींच्या नेतृत्वात नव्हता. उलट त्यांनी देशवासियांच्या सर्वांगीण उद्धाराबद्दल बाळगलेला भाव अधिक बळकट कसा होईल, त्याला चळवळीचे रूप कसे प्राप्त होईल ते कटाक्षाने साधण्यासाठी काही अगदी पोतडीतले खास प्रयोग केले.
यात १९०८ मध्ये केलेले ‘सर्वोदयास’ चालना देणारे गुजराती भाषांतर आले; ‘दरिद्रीनारायणा’च्या उद्धारासाठी आर्थिक समानतेचा पुरस्कार करणे; 'हरिजन' उद्धारासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे आले, स्वावलंबनाचा धडा देण्यासाठी स्वत: काँग्रेसच्या संमेलनात शौचालयं साफ केल्याचे उदाहरण मुद्दाम द्यावयास हवे. ‘लोकां सांगे ब्रह्मज्ञान’ असा प्रकार त्यांच्या नेतृत्वात नव्हता. लोकांसाठी खपणारे हाड, झिजणारे मन होते ते!
मग ‘स्वावलंबन’ व ‘स्वदेशीचे’ महत्त्व पटवण्यासाठी चरखा वापरून अखंड सूत कातणे असो वा परदेशी कपड्यांची संकेतात्मक होळी करणे असो, ‘Lead by Example’, ही गांधीजींची ‘नाममुद्राच’ होती. त्यांच्या निर्णयप्रक्रियेत ते ‘सर्वसमावेशक’ होते, असे म्हटल्यास प्रत्यवाय नसावा. कारण त्यावेळेच्या ‘राष्ट्रीय काँग्रेसचे’ निर्णय ठराव संमत करूनच होत असत. अर्थात त्यांच्यावर भक्ती जडलेली मंडळी त्यांच्या विरोधात उभी राहण्याचा प्रसंग क्वचित उद्भवला.
डॉ. पट्टाभिसितारामय्या आणि सुभाषचंद्र बोस निवडणूक प्रसंग १९१५-१९४७ या ३२ वर्षांचा कालपट लक्षात घेता अपवादात्मक म्हणावयास हवा. ‘हायकमांड’ पुढे बोटचेपी वृत्तीने वागणारी आणि कार्यकर्त्यांची बोटदाबी करणारी नेतेमंडळी पाहिली की दूरस्थास अस्वस्थ होते, तसेच या ‘आकाशस्थ यात्री’चे आज होत असेल का? नक्कीच, कारण परकीय शासकांच्या अरेरावीला जे धैर्याने सामोरे गेले, यातनांना त्यांनी महत्त्व दिलेच नाही मुळी, घुसमटून टाकणारे क्षण इंग्रजांविरुद्ध तत्त्वांची चळवळ उभारताना कमी का आले असतील? पण त्यातून न डगमगता स्वत:वर, माणसातील चांगुलपणावर असणाऱ्या अडिग विश्वासातून त्यांनी बळ कमावले व पुढील मार्ग प्रशस्त केला.
हा विश्वास ‘व्यवहार विज्ञाना’चा (Behavioural Science) एक अभ्यासक डग्लस मॅकग्ग्रेगर ‘वाय फॅक्टर थेअरी’मधून मांडतो. गांधीजींनी तोच स्थायीभाव संस्कारमूल्यांतून जोपासला होता, साधेपणातून वर्धित केला होता. आजूबाजूला वावरणाऱ्या लाखो सापळ्यांमध्ये प्राण फुंकून त्यांना एका स्वातंत्र्याच्या विचाराने भारून टाकले होते. जणू या ‘चांगुलपणावरच्या विश्वासाला’च त्यांनी ‘संजीवनी मंत्रा’चे सामर्थ्य प्राप्त करून दिले होते. त्यात कोणतीही चूक; त्रुटी खपवून घेतली जाणार नव्हती असे नव्हे; तर ती अपेक्षित नव्हती.
चौरी-चौरानंतर ‘असहकार आंदोलन’ थांबवले गेले ते यासाठी, चळवळीला मिळणारे अनिष्ट वळण भवितव्यात जे हवे त्या साठी उभारलेल्या संघर्षास ग्रहण लावणारे ठरेल ही दूरदर्शित्वाची जाणीव या पुढाऱ्यात होती म्हणून ते विवेककेंद्री ठरले. हे सामान्यांचे नेतृत्व त्यांच्याकडे कर्तृत्वामुळे चालत आले होते (कमांड), ते बळाने मिळवलेले नव्हते (डिमांड).
‘लीडर कमांडिंग रिस्पेक्ट’ आणि ‘लीडर डिमांडिंग रिस्पेक्ट’ या दोन बाबी परस्पर विरोधी आहेत. त्यांनी लोकांचा विश्वास आणि आदर मिळवला होता, ज्या लोकांचे नेतृत्व त्यांना करायचे होते त्यात शिक्षित बुद्धिजीवी होते, धनाढ्य होते, शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने होते आणि सगळे विविध आर्थिक व सामाजिक स्तरातून आलेले, ‘विजयी टीम’ निवडण्याचा अधिकार मात्र त्यांच्याकडे नव्हता. जे होते त्यांनाच परकीय सत्तेविरुद्ध जिंकण्यासाठी तयार करायचे होते. तेव्हा यशापयशाची जबाबदारी न निवडलेल्या टीमचा नेता म्हणून स्वीकारणे सहज नव्हते. त्यासाठी लागणारे ‘नैतिक अधिष्ठान’ त्यांनी प्रयासाने मिळवले होते. एखादी चळवळ फसल्याचा दोष त्यांनी अन्यांच्या माथी मारला नाही, नेता म्हणून स्वतःकडे तो घेतला व ‘उपोषणा’तून परिमार्जन केले.
त्यांच्या समकालीनांना त्यांचे असे वागणे पराकोटीचे आदर्शवादी आणि कालविसंगत वाटण्याचा संभव नाकारता येत नाही, म्हणूनच वेगवेगळे विचार प्रवाह आणि प्रवर्तक या काळात निर्माण झाले. याचा अर्थ प्रत्येक समर्थ प्रवर्तकाने आपल्याला योग्य वाटेल तो मार्ग आपल्या स्व-विचारसामर्थ्यावर निवडलेला दिसतो. जरी ध्येय ‘स्वातंत्र्य’ हेच ठेवले तरी, हा एका दृष्टीने भारताच्या ‘विविधतेतून एकता’ या दर्शनाचा विजय होता.
१०.
काळ जसजसा पुढे सरकतोय, तसतसे गांधीजींचे साठवणीतील विचार अधिकाधिक उपयोगी असल्याचे प्रत्ययास येत आहे. देशादेशांतील भू-राजनैतिक संघर्ष, वाढती व्यापार-स्पर्धा, आर्थिक ताण-तणाव, वाढता भ्रष्टाचार, वाढता जाती-विद्वेष, रोडावणारी आरोग्य व शिक्षण व्यवस्था, वाढती बेरोजगारी, सार्वजनिक अस्वच्छता, कोसळणारे उद्योगधंदे, ढासळणारी नैतिकता, बकाल होणारी शहरे, ओस पडणारी गावं, मावळता पर्यावरण विवेक आणि सरती नाती-गोती, या पार्श्वभूमीवर गांधीजी एका दीपस्तंभासारखे वादळवाऱ्यात भरकटलेल्या तारूस मार्गदर्शक ठरत आहेत. गरज आहे ती आपापल्या ‘साठवणीतील महात्मा’ अनुभवण्याची, त्यांची विचारमौक्तिकं वेचण्याची व आचरणातून सांभाळण्याची!
.............................................................................................................................................
लेखक जीवन तळेगावकर हे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील दिल्लीस्थित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करतात.
jeevan.talegaonkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment