अजूनकाही
बॉन्ग जून - हो दिग्दर्शित ‘पॅरासाईट’ हा कोरियन सिनेमा नुकताच ‘अॅमेझॉन प्राईम’वर आला आहे. या चित्रपटाने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात चार पारितोषिके पटकावली आहेत.
‘पॅरासाईट’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ ‘परजीवी’ असा आहे. दक्षिण कोरियातील एका शहरात वसलेल्या या चित्रपटात समाजातल्या वेगवेगळ्या वर्गांचे चित्र रेखाटले आहे. चित्रपटाची कथा मुख्यतः दोन कुटुंबांभोवती फिरते. त्यातले पहिले ‘किम’ हे कुटुंब शहराच्या सेमी-बेसमेंट प्रकारच्या खोलीमध्ये राहणारे आहे आणि त्यांच्या कुटुंबात चार जण आहेत – आई, वडील, मुलगी आणि मुलगा. ते जिथे राहतात त्या प्रकारच्या वस्तीमध्ये समाजातला आर्थिकदृष्ट्या मागासलेला वर्ग राहत आहे. हा वर्ग शिक्षणापासून, नोकऱ्यांपासून, सोयीसुविधांपासून वंचित आहे.
दुसरे आहे ‘पार्क’ कुटुंब. या कुटुंबातही चौघं जण आहेत, अगदी किम कुटुंबाचे प्रतिबिंब असल्यासारखे. पण हे त्या शहरातले उच्चवर्गीय कुटुंब असून त्यांच्याकडे मोठा बंगला, गाड्या, घरात मदतीला माणसे आहेत. शिवाय राहतात तो शहरातला भागही सुंदर आणि स्वच्छ आहे. या दोन्ही कुटुंबियांची परिस्थिती आणखी प्रखरतेने समजून येते, त्यांच्या रोजगाराच्या स्थितीवरून. किम कुटुंबातील कुणालाच नोकरी नाहीये, तर पार्क कुटुंबाचा स्वतःचा मोठा व्यवसाय आहे.
या सिनेमामध्ये ‘ओपनिंग शॉट’ म्हणून मोजे लटकवलेले दाखवले आहेत. हे एक असे दृश्य आहे, ज्यातून या कुटुंबाच्या परिस्थितीचा लगेच अंदाज बांधता येतो. हा सिनेमा समजून घेताना हे लक्षात ठेवले पाहिजे की, यामधली जवळजवळ प्रत्येक वस्तू आणि क्रिया रूपकात्मक आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच किम कुटुंबातील मुलाचा मित्र एक मोठा दगड त्यांना आणून देतो आणि हा दगड त्यांची आर्थिक परिस्थिती सुधरवायला मदत करेल असे सांगतो. हा दगड नशिबाचे रूपक आहे. त्यावर त्वरित विश्वास बसण्यासारख्या काही घटना घडायला लागतात. मित्रामुळे मुलाला पार्क कुटुंबातील मुलीला इंग्रजी शिकवण्याची नोकरी मिळते आणि मग हळूहळू युक्त्या लढवत त्या घरातील विविध कामांसाठी असलेल्यांना नोकरी सोडावी लागेल असे कट रचण्यात येतात. प्रत्येक कटाअंती किम कुटुंबातील एक एक व्यक्ती त्या त्या नोकरीसाठी नेमली जाते. या सर्वच नवीन कर्मचारी आणि मदतनीसांसोबत पार्क परिवार अतिशय सन्मानपूर्वक वागत असते.
याबरोबरच आणखी एक पैलू या कथेला मिळतो, जेव्हा पूर्वीची मदतनीस अचानक एक दिवस बंगल्यात येते आणि तळघरात जाऊ देण्याची नवीन बाईकडे विनंती करते. या तळघरात तिच्या नवऱ्याला तिने गेली चार वर्षे लपवून ठेवलेले असते. तिला काही कारणांमुळे किम कुटुंबाचे सत्य कळते आणि ती ते पार्क यांना सांगण्याचे खूप प्रयत्न करते. ती आणि तिचा नवरा समाजातल्या त्या घटकाचे प्रतीक आहेत, ज्यांच्याकडे किम कुटुंबासारखी किमान सेमी बेसमेंटसारखी पण राहण्याची जागा नाहीये. या बाईची नोकरी सुटल्यामुळे तिला आता डोक्यावर छप्पर नसते.
या चित्रपटाचे महत्त्व त्याच्या कथेपलीकडचे आहे. यात समाजातल्या तीन स्तरांचे, वर्गविभाजनाचे चित्रण आहे - उच्चवर्गीय, मागासवर्गीय आणि अतिमागासवर्गीय. ही कथा दक्षिण कोरियामध्ये घडत असल्याने सामाजिक स्तर समजून घेताना आर्थिक परिमाण लक्षात घ्यायला हवेत.
किम कुटुंबाच्या घरी जाण्यासाठी रस्त्यावरचा उतार उतरून, घराचा जीना उतरून जावे लागते. पार्क कुटुंबाच्या घरी जाण्यासाठी एक स्वच्छ भागातला रस्त्यावरचा चढ चढून, घराच्या मोठ्या अंगणाच्या पायऱ्या चढून जावे लागते. तसेच आधीच्या मदतनीस बाईला तिच्या नवऱ्याकडे जायला याच घरातील खूप जिने उतरून तळघरात जावे लागते. दिग्दर्शकाने जिने, चढ आणि उतार यांचा वापर लोकांचे सामाजिक व आर्थिक स्तर दर्शवण्यासाठी केला आहे. जेवढ्या वर जावे, तेवढा स्तर मोठा; जेवढे खाली जावे, तेवढी परिस्थिती बिकट. या पायऱ्या आणि हे चढ-उतार सामाजिक उतरंड दर्शवतात. या उतरंडीमध्ये जसे-जसे तळाला जावे तसे समाजातला वंचित वर्ग, तर जसे-जसे वरच्या दिशेला जावे, तसा समृद्ध वर्ग दिसतो.
याचबरोबर दिग्दर्शकांनी खूप हुशारीने सूर्यप्रकाशाचा उपयोग समृद्ध जीवन दाखवण्यासाठी केला आहे. किम यांच्या घरी तुरळक सूर्यप्रकाश येत येतो, पार्क यांचे अंगण सूर्यप्रकाशात दिपते, तर त्यांच्या तळघरात सूर्यप्रकाश पोहचण्याचा प्रश्नच येत नाही. हा सूर्यप्रकाश जसे समृद्धीचे प्रतीक आहे, तसेच आशेचेही. आयुष्यात किती आशा आहे किंवा कोण किती आशावादी राहू शकते, हे किती सूर्यप्रकाश लाभला आहे, यावरून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढची महत्त्वाची नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे खिडकी. किम यांच्या घराच्या खिडकीबाहेरचा रस्ता अतिशय अस्वच्छ असतो, त्यावर जागोजागी कचरा पडलेला दिसतो; तर पार्क यांच्या खिडकीबाहेर मोठे हिरवेगार अंगण (लॉन) असते, जे श्रीमंतीचे, समृद्धीचे प्रतीक आहे. शिवाय काही दृश्यांमध्ये विशिष्ट कॅमेरा अँगलचा वापर करून खिडकीचा उपयोग पडद्यासारखा (स्क्रीन) केला आहे, जणू दिग्दर्शकाला सिनेमात घडत असलेल्या गोष्टी त्या खिडकीच्या स्क्रीनवरून ठळक करायच्या आहेत.
परजीवी (पॅरासाईट) म्हणजे असा जीव जो दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे आणि यात त्या दुसऱ्या जीवाचे थोडे नुकसानही करत आहे. या चित्रपटामध्ये किम कुटुंबाला परजीवी मानले गेले आहे असे बघणाऱ्याला वाटू शकते. या शब्दाच्या शाब्दिक अर्थाप्रमाणे त्यांचे बिऱ्हाड पार्क कुटुंबावर अवलंबून असते. आधी एकच व्यक्ती त्या कुटुंबात येते आणि नंतर हळूहळू संपूर्ण कुटुंब त्या घरात वास्तव्य करायला लागते. त्या मदतनीस बाईंनी आणि तिच्या नवऱ्याने तर वर्षानुवर्षे बंगल्याच्या तळघरात कुणालाही पत्ता लागू न देता आपला संसार मांडलेला असतो, अगदी एखाद्या परजीवीसारखाच!
इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की, या समाजामधले वर्गविभाजन बघता, एखाद्याच्या आर्थिक परिस्थितीवर त्या व्यक्तीचे जीवनमान अवलंबून आहे, हे तर उघडच आहे, पण जर हा श्रीमंत वर्ग त्याच्या श्रीमंतीमुळे नैसर्गिक संसाधने आणि सामाजिक सोयीसुविधा यांचा उपभोग घेणार असेल तर त्याचा थेट परिणाम वंचित समाजाच्या जीवनमानावर होतो, हे पण तितकेच उघड आहे. एका वर्गाच्या अति उपभोगामुळे इतर वर्ग कायम वंचित राहिले आहेत. शिवाय या श्रीमंतांना श्रीमंत बनवण्यात आणि श्रीमंत ठेवण्यात या वंचित समाजाचे कष्ट गुंतले आहेत, ज्याचा मोबदला कष्टाएवढा मिळत नाही, पण परिस्थिती हलाखीची असल्याने श्रीमंतांची चाकरी करावीच लागते. हे सामाजिक चक्र असेच सुरू राहते.
हे सगळे लक्षात घेता, नक्की कोण परजीवी आहे हा प्रश्न उद्भवतो. कारण या समाजचक्रावर ताबा मिळवणारे आणि त्याचा पुरेपूर उपभोग घेणारे समाजाच्या वरच्या स्तरांवरचे लोक आहेत, वंचित समाजातले नाही. वंचित समाज वंचित राहत आहे, तो या व्यवस्थेमुळे ज्याची रचनाच मुळात असमानतेवर आधारित आहे.
या चित्रपटात एक दृश्य आहे, जिथे किम कुटुंबीय पार्क कसे चांगले आहेत याची चर्चा करत असतात. या संभाषणात ‘श्रीमंत आहेत, तरी चांगले आहेत’ आणि ‘श्रीमंत आहेत, म्हणून चांगले आहेत’ अशी दोन वक्तव्ये येतात. शिवाय ‘मी श्रीमंत असते, तर मी पण चांगली वागले असते’ असेही ती बाई म्हणते.
याचबरोबर वेळोवेळी एक गोष्ट दाखवली आहे की, पार्क यांना त्यांच्या नोकरांच्या अंगाचा, कपड्यांचा वास सहन होत नाहीये. अतिशय घृणास्पद अशी ही भावना आहे. हा वास किम जिथे राहत असतात, तिथल्या भागाचा असतो. हाच वास गरिबीचा, हतबलतेचा आणि अत्याचाराचाही असतो. पण पार्क यांना त्यांच्या सामाजिक स्तरामुळे, वर्गवर्चस्वेच्या भावनेमुळे या वासाचा त्रास होतो. म्हणजे एकीकडे सामान्यतः चांगले वागणे, पण खरेतर त्यांचा वासही सहन न होणे! आपण हा पण मुद्दा विसरता कामा नये की, असलेल्या लोकांच्या नोकऱ्या घालवून किम कुटुंबीयांनी तिथे आपला तळ ठोकलेला असतो.
शिवाय किम यांच्या मुलीला इजा झाल्यावर पार्क जसे स्वार्थीपणाने वागून निघून जातात, तसेच किम सांडपाण्याच्या पुरात एका माणसाने मदत मागितली असता त्याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या घरची परिस्थिती बघायला पळतात.
या घटना व दृश्ये आपण पाहिल्यावर नक्की चांगले कोण आहे आणि कोण वाईट असा प्रश्न पडतो. चांगले वागणे किंवा नैतिकता जपणे हे काळ – वेळ यांना अनुसरून सापेक्ष आणि त्यात व्यक्तीच्या परिस्थितीनुसार व्यक्तीसापेक्षसुद्धा असते. पण ही सापेक्षता आणि व्यक्तिसापेक्षता निर्माण करण्यात व्यवस्थेचाही मोठा आणि महत्त्वाचा वाटा आहे. हा एकूणच माणसाच्या आयुष्यात असलेला एक पेच आहे. म्हणजे माणसाने परिणामवादी (एक प्रकारचा उपयुक्ततावाद ज्यात परिणाम काय असणार आहे यावरून ठरवले जाते की वागायचे कसे) असावे, की नैतिक विशिष्टतावादी (जिथे प्रसंगानुसार नैतिकता जपावी का नाही हे ठरवले जाते) असावे, की पूर्णतःच नितळपणे, अखंडपणे नैतिक असावे?
पण मग पुन्हा इथे प्रश्न आहे की, एकासाठी नैतिक ते दुसऱ्यासाठी पण असेल का, कारण सापेक्षता डोके वर काढणारच आहे. त्यामुळे कुणाच्या कृतीवरून ते चांगले का वाईट असे ढोबळपणे सांगणे कठीण आहे. हेच आपल्या आजूबाजूला सगळीकडे दिसते आणि हेच या चित्रपटामार्फतही सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
एका मोठ्या घटनेनंतर चित्रपटाच्या शेवटाकडे येताना परिस्थिती सुधरवायला की – वू, किम कुटुंबातील मुलगा, पार्क यांचा बंगला विकत घेण्याचे स्वप्न बघतो. त्याच्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी या बंगल्याची त्याला ओढ आहे, हे चित्रपटात काही दृश्यांमध्ये आधीच आले आहे. इथे बंगला विकत घेण्याचे स्वप्न समृद्धीकडे जाण्याचा मार्ग म्हणून तो बघत आहे. ही समाजरचना एका चक्रासारखी आहे. जे आरे (स्पाईक्स) वर जातात, त्यांची जागा मागून येणारे आरे घेतातच. त्यामुळे एक कुटुंब जरी त्या सेमी बेसमेंटमधून बाहेर पडले तरी दुसरे कुणीतरी तीच जागा व्यापणार आहे. समजा की-वूला पुढे जाऊन तो बंगला घेता आला तरी त्या वंचित घटकामधला तो एकटाच असणार आहे, जो या परिस्थितून बाहेर येईल.
समाज म्हणून आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो, तो वंचित घटकाला एक वर्ग म्हणून वर उचलायला काय करता येऊ शकते याचा. या प्रश्नाचे उत्तर एक बंगला विकत घेणे हे नक्कीच नाहीये! अशा वेळी या चित्रपटाच्याच संकल्पनेनुसार विचार करायचा झाला तर एखाद्याने समृद्धीकडे जाण्याचा विचार करणे हाच मुळात परजीवी प्रवृत्तीचा विचार आहे का, असा प्रश्न पडतो. म्हणजे या विचाराने तुम्ही इतके पोखरले जाता की, यात तुमचे आणि इतरांचेही नुकसान आहे. कारण ही कथा संपताना अगदी सुरुवातीच्या दृश्याप्रमाणेच लटकवलेले मोजे दाखवून त्या तरुणाला तो बंगला घेणे किती अवघड आहे किंवा कसे अशक्य आहे हे दाखवले आहे. म्हणजे जिथे सुरुवात झाली आहे तिथेच चित्रपट संपत आहे. थोडक्यात, काही जणांना स्वप्न पूर्ण करणे अवघड असते!
हे सगळे लक्षात घेता शेवटाकडे येताना आपल्यासमोर एक प्रश्न उपस्थित होतो की, परजीवी नक्की कोण आहे – किम कुटुंब, पार्क कुटुंब, मदतनीस व तिचा नवरा की समृद्धीची आशा? कारण त्या नशिबाच्या दगडामुळे परिस्थिती बदलण्याची एक आशा निर्माण होऊन पुढील सर्व गोष्टी घडत जातात; परिस्थिती बदलली आहे असा आभासही एका क्षणी निर्माण होतो, पण पुढच्याच क्षणी पुन्हा सगळे कोसळते. त्यामुळे या समाजव्यवस्थेत ‘आशा’च परजीवी ठरावी, अशी व्यवस्था असल्याचे जाणवते!
या समृद्धीच्या आशेला जडवादाचे वलय आहे आणि त्यामुळे ही खरेतर आशा नसून हर्बर्ट मार्क्युझ (जर्मन – अमेरिकन राजकीय तत्त्वज्ञ) म्हणतात त्याप्रमाणे ‘खोटी जाणीव’ (फॉल्स कॉन्शसनेस) आहे. ही व्यवस्था समृद्धीचे काही परिमाण अधोरेखित करून समाजात खोटी जाणीव निर्माण करते, ज्यानुसार समाजातील प्रत्येक व्यक्ती त्यालाच खरे मानून आपला प्रवास ठरवते.
अशा प्रकारे बॉन्ग जून - हो बऱ्याच गोष्टींवर भाष्य करत काही प्रश्न आपल्याला विचार करण्यासाठी अनुत्तरीत सोडतात. या प्रश्नांना आपण जेव्हा वेगवेगळ्या भौगोलिक अवकाशात पाहण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते आणखी जटील होतात. उदाहरणार्थ, भारतीय समाजरचनेत वर्गविभाजन हा आर्थिक मुद्द्यासोबत जातीय मुद्दासुद्धा आहे. त्यामुळे अशा प्रश्नांचा आणि परिस्थितीचा समाज म्हणून आपल्याला संवेदनशीलतेने आढावा घेण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याला गोष्टी आहेत, तशा स्पष्ट दिसण्यासाठी मदत होईल, आपण आपल्या पूर्वग्रहांच्या आणि अनुमानांच्या थोडे पलीकडे जाऊ आणि तेव्हाच एखाद्या परीघावरच्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे मार्ग शोधण्यात आपण काही प्रमाणात यशस्वी होऊ.
.............................................................................................................................................
‘पॅरासाईट’ हा ऑस्कर विजेता सिनेमा बांडगुळं आणि अस्तित्वासाठी परोपजीवी झालेले प्राणी यातील फरक अधोरेखित करतो! - अलका गाडगीळ
https://www.aksharnama.com/client/article_detail/4029
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
लेखिका सायली कुळकर्णी स. प. महाविद्यालय, पुणे येथे राज्यशास्त्र विभागात अभ्यागत प्राध्यापिका आहेत.
saileek0108@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment