अजूनकाही
२५ मार्च २०२० या दिवशी आयुष्यमान संजय उबाळे उर्फ कॉम्रेड बुद्धप्रिय कबीरचे दुःखद निधन झाले. गेल्या सव्वा ते दीड वर्षांपासून तो कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने त्रस्त होता. त्याच्या निधनाने केवळ औरंगाबादमधल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मार्क्सवादी व आंबेडकरवादी चळवळीत एक प्रकारे शोककळा पसरली. त्याच्या शोकाकूल प्रतिक्रिया या दोन्ही चळवळीतील कार्यकर्त्यांनी समाज व मुद्रित माध्यमातून व्यक्त केल्या. या दोन्ही चळवळींना मनापासून जोडणारा व त्यासाठी झटणारा तो कार्यकर्ता होता. या दोन्ही चळवळीचे राजकीय प्रतिनिधित्व करणारे अनेक पक्ष, संघटना महाराष्ट्रात आहेत. पण यातील कोण्या एका राजकीय पक्षाचा तो कार्यकर्ता नव्हता. तरीही तो या सर्वच पक्षांचा आवडता होता.
दलित, शोषित, पीडित यांच्यावरील अन्याय-अत्याचाराची कोणतीही घटना असो, तेथे बुद्धप्रिय कबीर धावून जायचा. जवखेड्यापासून पालपाथरीपर्यंत, झांजरडीपासून खर्ड्यापर्यंत त्याची उपस्थिती असायची. अन्यायग्रस्त कुटुंबीयांना भेटी देणे, पोलीस स्टेशनपासून शासकीय स्तरावर त्यांच्या प्रकरणाची तड लावणे, यासाठी तो रात्रंदिवस काम करायचा.
प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता म्हणून पोलीस स्टेशनमध्येही त्याचा नैतिक दबदबा होता. तो गेला आणि त्याच्या म्हणण्याची दखल घेतली नाही, असे फारसे कधी घडले नाही. पण जेव्हा कधी असे घडले, तेव्हा त्याने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध मोहीम उघडण्यास कमी केले नाही. त्यात त्याने संबंधित अधिकारी कोण्या समाजाचा आहे, याचीही फिकीर केली नाही.
खैरलांजी प्रकरणात औरंगाबाद शहरातील दलित वस्त्यांवर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. त्या वस्त्यातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. रात्री-बेरात्री घरात घुसून आया-बहिणींना मारहाण करण्यात आली. याच्या कहाण्या ऐकून तो फार चिडला होता. त्या वेळी त्याने त्या विरोधात अन्यायग्रस्तांचे व्हिडिओ शूटिंग घेऊन आणि ते प्रकरण मानवी हक्क आयोगाकडे पाठवून त्या प्रकरणाची चौकशी करण्यास आयोगाला भाग पाडले. नंतर संबंधित अधिकाऱ्यांची औरंगाबाद शहरातून बदली करण्यात आली.
आंबेडकर भवन पाडण्याचे प्रकरण असो, भीमा कोरेगावचा दलितांवरील हल्ला असो, त्या प्रकरणी औरंगाबाद शहरात दलित-सवर्ण संयुक्त मोर्चा आयोजित करणे असो अथवा रत्नाकर गायकवाड मारहाण प्रकरणी कार्यकर्त्यांवर झालेली दडपशाही असो, या विरोधातील सर्व आंदोलनात बुद्धप्रिय कबीरचा पुढाकार असायचा. आंबेडकर भवन पाडण्याविरोधातील मुंबई मोर्चाच्या तयारीसाठी त्याने स्वतःच्या गाडीला वेल्डिंग करून एक मोठा रॉड बसवला. त्यावर लाल व निळ्या रंगाचा एकत्र शिवलेला झेंडा लावला. काहींना विचित्र वाटले असेल, पण स्वतःही तसाच अर्धा निळा व लाल रंगाचा शर्ट परिधान करून शहरातील सर्व वस्त्यांतून पत्रके वाटून व स्पीकर लाऊन त्या मोर्चाची त्याने तयारी केली होती.
त्याच्या अशा कामांमुळेच तो औरंगाबाद जिल्ह्यातील ‘दलित अत्याचार विरोधी कृती समिती’चा सरचिटणीस बनला. त्यासाठी त्याला समितीचे एक स्वतंत्र कार्यालयही उघडून देण्यात आले. तेथील टेबल-खुर्ची व कपाटाची व्यवस्था समाजातील इतर कार्यकर्त्यांनी केली. त्याला काम करणे सोपे जावे म्हणून फिरण्यासाठी एक मोटर सायकलही घेऊन देण्याचा निर्णय झाला. वरील दोन्ही चळवळीच्या कार्यकर्त्यांनी निधी गोळा करून त्याच्या पसंतीची एक मोटरसायकल समारंभपूर्वक त्याला दिली. मोटर सायकलचा नुसता संकल्प जेव्हा जाहीर केला, तेव्हा दोन्ही चळवळीतील लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. गाडी सत्तावन्न हजाराची होती, पण ७८,००० रुपये एवढी रक्कम जमा झाली. पुढेही पेट्रोलसाठी त्याला कोणीही पैसे देत होते. काहीजण तर सोबत जाऊन गाडीचा टॅंक फुल करून देत.
तो राहायला साधासुधाच होता, पण त्याला आवडणाऱ्या कपड्यालत्त्याची, चप्पल, सॅंडलची त्याच्याकडे कमतरता नव्हती. रस्त्यात कोणीही भेटला तर तो कबीरला दुकानात बळजबरीने घेऊन जायचा, त्याच्या गरजेचे व आवडीचे सामान त्याला घेऊन द्यायचा. त्याच्याकडे असणारे मोबाईलही तसेच होते. त्यांचे चार्जिंग लोकच करून द्यायचे. कोणीही त्याला हॉटेलमध्ये जेऊ घालायचे, जेवायला पैसे द्यायचे, घरीही बोलवायचे. अनेक घरी त्याचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध होते. खऱ्या अर्थाने तो समाजाचा व समाजाने स्वीकारलेला कार्यकर्ता होता.
पण समाजानेही त्याला उगीचच स्वीकारले नव्हते. मोठ्या सामाजिक अन्याय-अत्याचाराच्या घटना विरोधात त्याचा जसा सहभाग असायचा, तसाच लोकांच्या वैयक्तिक अडचणीतही तो मदत करायचा. अगदी नवरा-बायकोचे भांडण मिटवण्यापासूनच्या तक्रारी त्याच्याकडे यायच्या. त्यातही तो लक्ष घालायचा. नाहीच मिटले तर कोणती दुर्घटना होऊ नये याचीही तो समज द्यायचा. एखाद्याचा शेजारी विनाकारण त्रास देत असेल तर अशा प्रकरणातही तो लक्ष घालायचा. अनेकांना आत्महत्या करण्यापासून त्याने परावृत्त केले. तरीही कुणी तसा प्रयत्न केलाच तर त्याचा जीवही त्याने वाचवला.
कोणत्या ना कोणत्या प्रकरणात तो ‘बिझी’ राहायचा. रात्री-बेरात्रीही त्याला मदतीसाठी अनेकाकडून फोन यायचे. तोही लगेच धावून जायचा. दवाखान्यात अॅडमिट करण्यापासून तर डिस्चार्ज मिळेपर्यंत तो त्यावर लक्ष ठेवून असायचा. एखाद्या कार्यालयात त्याच्या कोणीच ओळखीचा वा चाहता मिळाला नाही, असे माझ्या तरी आठवणीत नाही.
अगदी समाजकल्याण खात्यापासून विद्यापीठापर्यंत अनेकांची अनेक कामे तो सहज करायचा. एकेकाळी तर तो विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा नेताच होता. ही कामे कधीकधी अगदी साधीसुधी असायची. पण काम करणाऱ्यालाही त्याचे काम केल्याचे एक प्रकारे समाधान वाटायचे.
बुद्धप्रिय कबीर मूळचा औरंगाबादचाच असल्याने बालपणीचे त्याचे दोस्त-मित्र आता शासकीय नोकरीत विविध ठिकाणी, मोठ्या अधिकारी पदावर गेले आहेत. काही राजकारणात राहून विविध पक्षांत नगरसेवक बनलेत. त्यांनी आपापली आर्थिक परिस्थिती चांगलीच सुधरवली आहे. पण हा अजूनही ‘सुधारला’ नाही, याची खंत त्यांना त्याच्या आपुलकीतून वाटायची. ते तसा ‘सुधारण्याचा’ सल्ला त्याला द्यायचेसुद्धा. पण याने तो सल्ला कधी मानला नाही.
सर्वांनीच नाही पण बऱ्याच जणांनी आपली परिस्थिती कशी व कोणत्या मार्गांनी सुधारली याबद्दल बुद्धप्रिय कबीर त्यांच्या तोंडावर खरमरीत टीका करायचा. ते हसण्यावारी न्यायचे. ‘आम्हाला घरदार, कुटुंब चालवायचे आहे, तुझ्यासारखा फकीर राहून आम्हाला जमणार नाही,’ असे ते त्याला म्हणायचे. पण या काहीशा कटू वाटणाऱ्या चर्चेतून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला असेल, असे वाटत नाही. थोडाफार झाला असेलच तर तो कबीरकडूनच. या मित्रांनी त्याला कायम मदतच केली. तो कबीरचा नैतिक हक्क असल्याचे ते मानायचे.
याचा अर्थ कबीर घरचा दरिद्री होता असा नव्हे. त्याचे गौतमनगरात वडिलोपार्जित घर अजूनही आहे. ते भाड्याने दिलेले आहे. नव्याने वाढलेल्या औरंगाबाद शहरात वडिलोपार्जित शेतीचे त्याच्या भावाने प्लॉट पाडून विक्री केली. निम्मी प्रॉपर्टी तर याचीच होती. तिथे अजूनही काही प्लॉट्स आहेत. त्याच्या कुटुंबीयांची राहती घरे व याचीही खोली आहे. पण या सर्वांचा त्याग करून तो घराबाहेर पडला. कुटुंबीयांशी त्याने कधीच जुळवून घेतले नाही, अगदी अखेरच्या क्षणापर्यंत.
तरुणपणी झालेल्या प्रेमभंगातून त्याने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. त्यावर तो शेवटपर्यंत ठाम राहिला. याबाबत त्याचे अनेकांनी अनेक प्रकारे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रकारचे आमिषेही दाखवली, पण तो त्या निर्णयापासून तसूभरही ढळला नाही. अशा रीतीने त्याने समाजकार्यासाठी स्वतःला समाजावरच सोपवून दिले व समाजानेही ते स्वीकारले.
सुरुवातीला तो लाल निशाण पक्षाची संबंधित स्वतंत्र खोलीत राहत होता. तेथेच त्याचे एका वेगळ्या खोलीत कार्यालयही उघडून देण्यात आले होते. अशा प्रकारे त्याचे समाजाशी एकजीव होऊन सामाजिक कार्य चालू असताना अचानक त्याला आजार झाल्याचा व तोही अन्ननलिकेच्या कॅन्सरसारखा दुर्धर असल्याचे समजले, तेव्हा त्याच्याशी परिचित असलेल्या सर्वांना हळहळ वाटली. ते अस्वस्थ झाले. त्याच्या या दुर्धर आजारात ज्याने त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे व मगदुराप्रमाणे काम केले, सहाय्य व मदत केली. अनेक लोक दवाखान्यात दिवसभर त्याच्या सेवेत असायचे आणि रात्री विविध विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते त्याच्या मदतीला असायचे. त्यांनी आपल्या पाळ्याच लावून घेतल्या होत्या. अनेकांनी पाचशे रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली. न मागता व नाही नाही म्हणता ६२ हजार रुपये जमा झाले. ही केवळ माझ्याकडे जमा झालेली रक्कम आहे. त्याच्याकडे जमा झाली ती वेगळीच. बँक अकाऊंट व्यतिरिक्त २,३१,००० रुपये त्याच्याकडे रोख स्वरूपात जमा झाले होते. ही रक्कम आता, त्याच्या कुटुंबीयांकडे आहे.
बुद्धप्रिय कबीरला झालेला कॅन्सरचा आजार खर्चिक असला तरी त्याला मात्र अजिबात खर्च आला नाही. तसा तो येणार नाही, याची आम्हाला माहिती असल्यामुळेच आम्ही आर्थिक मदत जमा करण्याचे आवाहन केले नव्हते. तो सुरुवातीला काही दिवस आजारी असल्यामुळे नेहमीप्रमाणे त्याच्या डॉक्टर मित्रांनी त्याच्यावर मोफत उपचार केले. त्याच्या सर्वसाधारण विविध टेस्ट करून पाहिल्या, पण त्यातून त्याचे योग्य निदान झाले नाही. त्याची तब्येत ढासळत होती. म्हणून काही कार्यकर्त्यांनी एमजीएम हॉस्पिटलच्या प्रमुखांना भेटून उर्वरित टेस्ट आपण मोफत कराव्यात अशी त्यांना विनंती केली. संस्थेचे आणखीही काही पदाधिकारी तेथे उपस्थित होते. त्यांना कबीरच्या सामाजिक कार्याची माहिती होती. त्यांनी लगेच ॲडमिट करून घेतले. सर्व टेस्ट केल्यानंतर त्याला अन्ननलिकेचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्यावर ऑपरेशन हाच अंतिम इलाज असल्याचे डॉक्टरकडून सांगण्यात आले. मग ऑपरेशन कोठे करायचे असा प्रश्न कार्यकर्त्यांच्या पुढे होता. चर्चेअंती सर्वानुमते ते सरकारी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्याचे ठरले. त्याला आवश्यक असणाऱ्या केमोथेरेपीपासून ऑपरेशनपर्यंत, अगदी औषधोपचाराचा खर्चसुद्धा येणार नाही, अशा पद्धतीने सर्व मदत या हॉस्पिटलच्या प्रमुखांनीसुद्धा केली, हे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या परिचित असलेल्या विविध संस्थांची मदत घेतली. ऑपरेशन यशस्वी झाले.
ऑपरेशननंतर त्याची तब्येत ध्यानात घेऊन त्याची राहण्याची व्यवस्था आंबेडकरवादी पुढाऱ्याने एका चांगल्या वन बीएचके फ्लॅटमध्ये केली. काही महिने तेथे राहिल्यानंतर तो स्वराज अभियानच्या कार्यालयात राहायला गेला. तेथून काही महिन्यानंतर तो भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात राहायला गेला आणि तेथून नंतर तो पूर्वाश्रमीच्या बामसेफच्या कार्यकर्त्यांकडे राहायला गेला. शेवटी त्याची इच्छा बौद्ध लेण्यावर जाऊन राहण्याची होती. कार्यकर्त्यांनी तेथेही त्याची राहण्याची व्यवस्था करण्यास सुरुवात केली होती.
बुद्धप्रिय कबीरच्या ऑपरेशनवर डॉक्टर समाधानी होते, पण कडक थंडीमुळे ऑपरेशनचे टाके दुखतात, एवढेच त्याचे म्हणणे होते. हिवाळ्यानंतर बरे वाटेल, अशी त्याची अपेक्षा होती. पण दुखणे कमी होत नव्हते, म्हणून त्याला पुन्हा दवाखान्यात दाखल करण्यात आले. पुन्हा काही तपासण्या कराव्या लागल्या. त्यात आलेल्या रिपोर्टवरून त्याला पुन्हा काही केमो घ्यावे लागतील, अशा निष्कर्षाला डॉक्टर आले. पुढील केमोचा उपचार चालू असतानाच त्याचा आजार वाढला आणि त्यातच त्याचा अंत झाला.
हा मोठा धक्का होता. समाजाशी एकजीव झालेला कार्यकर्ता समाजातून निघून गेला. आजकाल असा कार्यकर्ता निर्माण होणे कठीण आहे. त्यामुळे चळवळीच्या कार्यकर्त्यांना हळहळ वाटणे स्वाभाविक आहे. करोनाच्या कर्फ्यूमुळे अजून त्याची शोकसभाही घेता आलेली नाही. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कामापासून स्फूर्ती घेता यावी, यासाठीचे काही संकल्प औरंगाबादचे कार्यकर्ते एकजुटीने करतील, याची मला खात्री आहे.
.............................................................................................................................................
बुद्धप्रिय कबीर यांची मुलाखत - भाग एक
बुद्धप्रिय कबीर यांची मुलाखत - भाग एक
.............................................................................................................................................
लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत.
bhimraobansod@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment